मिक्स सॅलडचा झुणका आणि ज्वारीची भाकरी

Submitted by हर्ट on 5 February, 2016 - 02:11
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

झुणक्यासाठी:
# मिक्स सॅलडचा एक पॅक पुरेसा आहे
# एक मध्यम आकाराचा कांदा
# अर्धा गाठा छोटा लसूण
# फोडणीसाठी - तेल, जिरे, मोहरी, हळद, सुक्या मिरच्या, कांडलेले लाल तिखट, मिठ इत्यादी.
# चण्याच्या डाळीचे चार चमचे पिठ अर्थात बेसन
# किंचित ओवा

भाकरीसाठी:
# ज्वारीचे ताजे पिठ
# मिठ
# खदखद उकळलेले पाणी

क्रमवार पाककृती: 

१) मिक्स सॅलडची पाने दोन ते तीन वेळ न हाताळता नळाखाली धुवून घ्यावी. ही पाने नाजूक असल्यामुळे त्यांना हाताळायची गरज नाही. जर पाने कोंबून भरलेली असेल तर त्यात एक दोन शेवळी तंतू नजरेस पडतात ते पाण्यावर येतात त्यांना काढून टाकावे. पाने धुताना भरपुर उजेडात ती निरखून घ्यावी म्हणजे काडीकचरे असल्यास निवडता येईल.

२) ह्या मिक्स सॅलडमधे अनेक वेगवेगळ्या प्रकारची पाने आहेत. ती कुठली आहेत ह्यासाठी खालचे चित्र बघा. माझ्याकडे महिन्यातून दोन तीन वेळा मी हा पॅक आणतो. तो ताजा असेल तेंव्हाच संपला तर बरा असतो. पण, इतका मोठा पॅक संपवणे मला शक्य होत नाही म्हणून मी त्याचा झुणका नाहीतर पित्झा करतो. अशानी तो एका खेपेतच संपून जातो.

३) फोडणीसाठी मी कांदा आणि लसूण अनुक्रमे चिरुन.. निवडून घेतले.

४) कांदा पावभाजीला जसा असतो तसा बारीक चिरुन घेतला.

५) बेसन तव्यावर एक दीड चमचे तेलात परतून घेतले. बेसन परतताना कालथा सतत मागे पुढे न्यावा लागतो आणि आच अगदी मंद ठेवावी लागते. नाहीतर बेसन जळून जाते. बेसन नीट भाजले गेले ह्याची एक खूण म्हणते त्याचा सुवास. बेसन, रवा, गव्हाचे पिठ भाजताना त्याचा एक भुक चाळवणारा दरवळ किचनमधे येतो. बेसन जेवढे रवाळ तेवढे उत्तम. जर तुमच्याकडे डाळीची भरड असेल तर मग काय बात अहाहा!!!

६) भाजलेले बेसन तव्यावरुन ताटलीत काढताना मी ताटली थेट सिंक मधे ठेवतो जी स्वच्छच असते. असे केले की माझे पिठ सांडले तरी ओटा खराब होत नाही.

७) आता फोडणीसाठी मी त्याच तव्यावर तो तवा न धुता त्याच्यावरच तेल घातले. तेल तुम्हाला हवे तेवढे तुम्ही घाला. पण झुणक्याला जरा अधिक तेल ..तिखट लागते. तेल तापले की त्यावर मी आधी सुक्या मिरच्या घातल्या. मग जिरे मोहरी.

८) झुणक्याला एक खास आकर्षक रंग येण्यासाठी मी त्यावर ही घरची मिरची पावडर सुद्धा घातली पण अगदी जेमतेल रंग येण्यापुरती. ओवा घालायला मला आवडतो म्हणून मी घातला.

९) आता ताटामधे धुतलेला सॅलड आच कमी करुन तव्यावर हळूहळू खाली सांडू न देता घालावा. थोडा सॅलड घालून तो आधी परतावा कारण खूप मोठा सॅलड घालून तो परतायला जागाच उरणार नाही. मग, ह्यावर उरलेला सॅलड रचावा. डोंगर दिसेल असा.

१०) लगेच एक ताट तव्यावर ठेवावे. ही पाने इतकी हलकी असतात की ती सहज एका ताटाखाली मावतात. जर ताट उघडे पडत असेल तर त्यावर कुकरचे एक पातेले पाणी भरुन ठेवले की ताटावर वजन पडेल.

११) दोन मिनिटात पाने शिजतात आणि भाजीचा गोळा होतो. ही पाने फार शिजवायची नाही. ती फार नाजूक असतात. त्यातला रस थोडा झिरपायला हवा आणि थोडा पानांमधेच रहायला हवा. हे ह्या कृतीचे एक गमक आहे. ह्यात आता मिठ घालायचे.

१२) शिजलेल्या पानांवर भाजलेले बेसन भुरभुरत घालायचे आणि ते लगेच ढवळायचे. ह्यावेळी बेसन पळीला आतमधे चिकटून जाते. म्हणून दुसरी एक पळी वा चमचा घेऊन ते खरडून टाकायचे.

१३) आता ह्या क्षणाला हे मिश्रण परत एकदा ताटाखाली झाकूण ठेवायचे. ह्यावेळी कुकरचा डबा लागणार नाही. दोन मिनिटांनी गॅस विझवून टाकायला पण.. पण .. पण ताट काढायचे नाही. ती वाफ तशीच आतामधे १० मिनिटे राहू दिली की झुणका इतका मऊ होतो की तो जिभेवर टाकला की विरघळतो आणि त्याची चव जिभेवर रेंगाळत राहते. ह्या दहा मिनिटात तुम्ही सगळी चाटली-बुटली भांडी धुवून काढू शकता.

१४) हा झाला तयार हिरवा तजेलदार झुणका.

आता भाकरी:

१) परातीत भाकरीचे पिठ खळ करुन घ्यायचे. त्यात अर्धा चमचा मिठ घालावे. खदखद उकळलेले पाणी त्यात घालावे. आणि कालत्यानी पिठ आणि पाणी एकत्रित करावे. पाण्याचे प्रमाण कमी पडले तर चालेल पण जास्त होऊ नये. दहा मिनिटे हे पिठ असेल राहू द्यावे. नंतर ते मळून घ्यावे. आणि पोळपाटावर इतके पिठ पसरवावे की पो.पा.चा लाकडी भाग दिसेनासा होईल. जो भाग पिठाकडे आहे तो तव्याच्या वर येईल तो अक्षरश: पाण्यानी सारवतो तसा सारवून घ्यावा म्हणजे भाकरीला नीट पापुद्रा येतो.

२) वरचा भाग कोरडाठिक्क दिसायला लागला की भाकरी उलटून घ्यायची.

३) भाकरीला फुगा आला की भाकरी आचेवर धरायची.

४) ही झाली पहीली भाकरी:

५) आणि ही दुसरी:

अधिक टिपा: 

तुमच्याकडे सॅलडचा पॅक नसेल तर इतर कोवळ्या भाज्या वापरता येतील.

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा! मस्तच झालाय बेत....
सोबत लसणाची चटणी, लिंबाचे गोड लोणचे पाहिजेच. आणि हो पिठल्यावर घरचं तूप मस्त लागतं एकदम...

धन्यवाद विजय आणि आशूडी Happy

विजय हो माझ्याकडे दोन्ही गोष्टी होत्या पण मला झुणक्याचा पुरेपुर आस्वाद घ्यायचा होता Happy

केश्वीनी धन्यवाद.

मस्त! भूक लागली.

भाकरीचे सुरुवातीचे फोटो लालसर कसे आहेत? त्यामुळे नाचणीची भाकरी असल्यासारखे वाटले आधी.

भाकर्‍या आणि झुणका दोन्ही मस्त . भाकर्‍या छानच जमतात हो तुम्हाला !

भाजलेले बेसन तव्यावरुन ताटलीत काढताना मी ताटली थेट सिंक मधे ठेवतो जी स्वच्छच असते. >> तुमची ओटा स्वच्छ ठेवण्याची आयडिया मस्त आहे पण मला नाही डेअरिंग होणार तस ठेवायला.

भाकर्‍या आणि झुणका दोन्ही मस्त . भाकर्‍या छानच जमतात हो तुम्हाला ! >> +१

एखाद्या नवशिक्याला अत्यंत उपयुक्त पाकृ. Happy

गजानन, तो लाल रंग बहुतेक मी लाईट लावल्यामुळे आला असेल. त्या दिवशी आमच्याकडे ढगाळ हवामान होते. फोटोसाठी पुरेसा उजेड नव्हता म्हणून गॅसवरचा लाईट लावला.

सर्वांचे आभार.

तुमची ओटा स्वच्छ ठेवण्याची आयडिया मस्त आहे पण मला नाही डेअरिंग होणार तस ठेवायला.>>>>> +१०० ओटा स्वच्छ करेन अगदी सांडलच पिठ तर पण थेट सिंक मधे ताट................ Uhoh

मनिमोहर आणि स्निग्धा, सिंक मधे आपण तांदूळ धुतो, भाज्या धुतो, फळ धुतो, भांडी ठेवतो आणि धुतो. हे जर चालत असेल तर एक मिनिट ताट ठेवून भाजेलेले बेसन त्यात काढायला काय हरकत आहे आणि मुळात सिंक सततच्या पाण्याच्या वापरामुळे स्वच्छ असतो. आठवड्यातून एकदा आपण त्याला घासून लखलखीत करतो. म्हणून मी सिंक वावरला आहे इथे. पण मर्जी आपापली. कुणाला हे करायला आवडणार नाही हेही खरे आहे. प्रत्येकाची मानसिकता असते.

बी जबरी बेत आहे.
तव्यावरच्या फोडणीचा फोटो पाहिल्यावर सुरेख खमंग वास जाणवला आणि पोटात एक कावळा हळूच कोकलला (जेवण झालेले असून :))

काही बी म्हणा पण फोटु लईच भारी आलेत! भाजी बी एकदम झकास दिसतिया!! Happy

पर ते सॅलड पॅक कुठं मिळतं म्हणायचं??

आणि कंच्या कंच्या भाजीचा पाला हाय तो ते तरी समजूद्या?!

कृष्णा, धन्यवाद. तुम्ही जर पुणे मुंबईत असाल तर हे सॅलड मिळत. इतर गावी माहिती नाही. पण मी पुण्यात चांगल्या सुपरमार्केटमधे पाहिले आहे. आमच्या बावधनच्या मोअरमधेही पाहिले आहे.

ह्यात सॅलड म्हणून जी पाने आहेत त्याची नावे चित्र क्रमांक दोन मधे आहेत.

हा ऑस्ट्रेलियन सॅलड आहे.

Pages