मिक्स सॅलडचा झुणका आणि ज्वारीची भाकरी

Submitted by हर्ट on 5 February, 2016 - 02:11
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

झुणक्यासाठी:
# मिक्स सॅलडचा एक पॅक पुरेसा आहे
# एक मध्यम आकाराचा कांदा
# अर्धा गाठा छोटा लसूण
# फोडणीसाठी - तेल, जिरे, मोहरी, हळद, सुक्या मिरच्या, कांडलेले लाल तिखट, मिठ इत्यादी.
# चण्याच्या डाळीचे चार चमचे पिठ अर्थात बेसन
# किंचित ओवा

भाकरीसाठी:
# ज्वारीचे ताजे पिठ
# मिठ
# खदखद उकळलेले पाणी

क्रमवार पाककृती: 

१) मिक्स सॅलडची पाने दोन ते तीन वेळ न हाताळता नळाखाली धुवून घ्यावी. ही पाने नाजूक असल्यामुळे त्यांना हाताळायची गरज नाही. जर पाने कोंबून भरलेली असेल तर त्यात एक दोन शेवळी तंतू नजरेस पडतात ते पाण्यावर येतात त्यांना काढून टाकावे. पाने धुताना भरपुर उजेडात ती निरखून घ्यावी म्हणजे काडीकचरे असल्यास निवडता येईल.

२) ह्या मिक्स सॅलडमधे अनेक वेगवेगळ्या प्रकारची पाने आहेत. ती कुठली आहेत ह्यासाठी खालचे चित्र बघा. माझ्याकडे महिन्यातून दोन तीन वेळा मी हा पॅक आणतो. तो ताजा असेल तेंव्हाच संपला तर बरा असतो. पण, इतका मोठा पॅक संपवणे मला शक्य होत नाही म्हणून मी त्याचा झुणका नाहीतर पित्झा करतो. अशानी तो एका खेपेतच संपून जातो.

३) फोडणीसाठी मी कांदा आणि लसूण अनुक्रमे चिरुन.. निवडून घेतले.

४) कांदा पावभाजीला जसा असतो तसा बारीक चिरुन घेतला.

५) बेसन तव्यावर एक दीड चमचे तेलात परतून घेतले. बेसन परतताना कालथा सतत मागे पुढे न्यावा लागतो आणि आच अगदी मंद ठेवावी लागते. नाहीतर बेसन जळून जाते. बेसन नीट भाजले गेले ह्याची एक खूण म्हणते त्याचा सुवास. बेसन, रवा, गव्हाचे पिठ भाजताना त्याचा एक भुक चाळवणारा दरवळ किचनमधे येतो. बेसन जेवढे रवाळ तेवढे उत्तम. जर तुमच्याकडे डाळीची भरड असेल तर मग काय बात अहाहा!!!

६) भाजलेले बेसन तव्यावरुन ताटलीत काढताना मी ताटली थेट सिंक मधे ठेवतो जी स्वच्छच असते. असे केले की माझे पिठ सांडले तरी ओटा खराब होत नाही.

७) आता फोडणीसाठी मी त्याच तव्यावर तो तवा न धुता त्याच्यावरच तेल घातले. तेल तुम्हाला हवे तेवढे तुम्ही घाला. पण झुणक्याला जरा अधिक तेल ..तिखट लागते. तेल तापले की त्यावर मी आधी सुक्या मिरच्या घातल्या. मग जिरे मोहरी.

८) झुणक्याला एक खास आकर्षक रंग येण्यासाठी मी त्यावर ही घरची मिरची पावडर सुद्धा घातली पण अगदी जेमतेल रंग येण्यापुरती. ओवा घालायला मला आवडतो म्हणून मी घातला.

९) आता ताटामधे धुतलेला सॅलड आच कमी करुन तव्यावर हळूहळू खाली सांडू न देता घालावा. थोडा सॅलड घालून तो आधी परतावा कारण खूप मोठा सॅलड घालून तो परतायला जागाच उरणार नाही. मग, ह्यावर उरलेला सॅलड रचावा. डोंगर दिसेल असा.

१०) लगेच एक ताट तव्यावर ठेवावे. ही पाने इतकी हलकी असतात की ती सहज एका ताटाखाली मावतात. जर ताट उघडे पडत असेल तर त्यावर कुकरचे एक पातेले पाणी भरुन ठेवले की ताटावर वजन पडेल.

११) दोन मिनिटात पाने शिजतात आणि भाजीचा गोळा होतो. ही पाने फार शिजवायची नाही. ती फार नाजूक असतात. त्यातला रस थोडा झिरपायला हवा आणि थोडा पानांमधेच रहायला हवा. हे ह्या कृतीचे एक गमक आहे. ह्यात आता मिठ घालायचे.

१२) शिजलेल्या पानांवर भाजलेले बेसन भुरभुरत घालायचे आणि ते लगेच ढवळायचे. ह्यावेळी बेसन पळीला आतमधे चिकटून जाते. म्हणून दुसरी एक पळी वा चमचा घेऊन ते खरडून टाकायचे.

१३) आता ह्या क्षणाला हे मिश्रण परत एकदा ताटाखाली झाकूण ठेवायचे. ह्यावेळी कुकरचा डबा लागणार नाही. दोन मिनिटांनी गॅस विझवून टाकायला पण.. पण .. पण ताट काढायचे नाही. ती वाफ तशीच आतामधे १० मिनिटे राहू दिली की झुणका इतका मऊ होतो की तो जिभेवर टाकला की विरघळतो आणि त्याची चव जिभेवर रेंगाळत राहते. ह्या दहा मिनिटात तुम्ही सगळी चाटली-बुटली भांडी धुवून काढू शकता.

१४) हा झाला तयार हिरवा तजेलदार झुणका.

आता भाकरी:

१) परातीत भाकरीचे पिठ खळ करुन घ्यायचे. त्यात अर्धा चमचा मिठ घालावे. खदखद उकळलेले पाणी त्यात घालावे. आणि कालत्यानी पिठ आणि पाणी एकत्रित करावे. पाण्याचे प्रमाण कमी पडले तर चालेल पण जास्त होऊ नये. दहा मिनिटे हे पिठ असेल राहू द्यावे. नंतर ते मळून घ्यावे. आणि पोळपाटावर इतके पिठ पसरवावे की पो.पा.चा लाकडी भाग दिसेनासा होईल. जो भाग पिठाकडे आहे तो तव्याच्या वर येईल तो अक्षरश: पाण्यानी सारवतो तसा सारवून घ्यावा म्हणजे भाकरीला नीट पापुद्रा येतो.

२) वरचा भाग कोरडाठिक्क दिसायला लागला की भाकरी उलटून घ्यायची.

३) भाकरीला फुगा आला की भाकरी आचेवर धरायची.

४) ही झाली पहीली भाकरी:

५) आणि ही दुसरी:

अधिक टिपा: 

तुमच्याकडे सॅलडचा पॅक नसेल तर इतर कोवळ्या भाज्या वापरता येतील.

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सलाड पाने कोवळी असल्यामुळे ती चिरली नाहीत. असे म्हणतात, भाज्या निवडाव्या, खुडाव्या, मग धुवून घ्यावा पण शक्य असल्यास चिरू नयेत. सत्त्व कमी होत.

बीराव तुमच्या रेसिपी एकदम हेल्दी असतात आणि बनवण्याची पद्धत/मॅनेजमेंट पण एखाद्या सुगरण गृहिणीसारखी.
बाकी सिंकमध्ये ताट बद्दल ज्याच्या त्याच्या सिंक वर अवलंबून, परदेशी किचन्स मध्ये जिथे स्वच्छता असते/खाणे कमी बनते/थंड हवेत किटक कमी होतात तिथे असे थोडावेळ ठेवायला हरकत नसावी.

तव्यावरचा झुणका पाहून तोंपासु ! रवाळ बेसन आणायला हवे आता.
तव्यावर परतलेली कांद्याची पात आणि चेरी टोमॅटोची भाजीही लक्षात आहे.

नुसतं बी म्हणवत नाही आणि यांचा तिशीतल्या तरुणासारखा वाटणारा मेंटेन्ड फोटो पाहिल्यावर बीकाका बिकाही म्हणवणार नाही म्हणून बीराव Happy .

मस्तच!

सर्वांचे धन्यवाद.

भाकरीबद्दल तुम्ही कौतुक करता पण भाकरी मी खूप कष्टाने शिकलो. त्यात एक सातत्य होते. भाकरीचा माझा प्रवास बारा तेरा वर्षाचा आहे. ती जमत नव्हती म्हणून करणे सोडले नाही. एक घास खावून उरलेली भाकरी वाया घालवली आहे. एक भाकरी थापून उरलेले पिठ केरात टाकून दिले आहे. चुकीची भाकरी खावून पोट बिघडवले आहे. दिसेल त्या अ‍ॅमिकेबल..प्रेमळ स्त्रिला तुम्ही भाकरीबद्दल टिप्स द्या असेही करुन झाले आहे. रस्त्यावर खोपटी टाकून तीन खांड्याच्या चुलीवर भाकरी करणार्‍या स्त्रिपुढे बसून ती कशी भाकरी करते हे निरखले आहे. कधी पोळपाटावर, तर कधी मेणकापडावर, तर कधी केळीच्या पानावर, तर कधी फडक्यावर, तर कधी निरलेपच्या तव्यावर, कधी तेल तुप बटर लावून, कधी आकारानी अगदी छोटी, कधी कणकेचे पिठ मिसळून, तर कधी बेसन मिसळून असे अनेक माध्यम वापरुण आणि प्रयोग करुन पाहिले आहे. जमता जमता मला भाकरी पोळपाटावर फिरवला आली. किती पिठ घ्यायचे किती पो. पा. पसरवायचे, किती तो थर मोठा असावा, भाकरी कशी उलटवावी, तव्यावर टाकताना फुगा का येतो.. तो येऊ नये म्हणून काय चुकते, भाकरीचा दुसरा भाग कसा भाजायचा, परत दुसरा भाग कधी उलटवायची, भाकरीवरचे पिठ पाण्यानी कसे सारवायचे ह्या आणि अशा अनेक गोष्टी अनुभवातून शिकताना अनेक वर्ष गेली. मला माझे अन्न बनवले शेवटी निकराने शिकावे लागले. आता इतक्या वर्षानंतर मला कुठल्याही ज्वारीच्या पिठाची भाकरी करता येते पण तरीही मला हातावरची भाकरी शिकायची महत्त्वाकांक्षा आहे. मला नाचणीची भाकरी शिकायची आहे, मला कळण्याच्या भाकरीचे मिश्रण शिकायचे आहे, मला चुलीवर निखार्‍यावरची भाकरी करुन पहायची आहे. एकदा भाकरी शिकली की त्याचे फायदेही मग पुढे आले. भाकरीला वेळ कमी लागतो. परातीत पिठ चिकटत नाही म्हणून ती विसळून ठेवता येते. लाटणे लागत नाही. तेल लागत नाही म्हणून तावाही तेलकट होत नाही. भाकरीमधे फायबर अधिक आणि ग्लुटेन कमी असते म्हणून ती पोळीपेक्षा अधिक पौष्टिक. नाचणीची भाकरी शिकलो तर त्यातून CA (Calcium) and Iron (Fe) मिळेल.

तोंडभरुन कौतुक केल्याबद्दल संधी मिळाली की मी तुम्हाला माझ्याहातची भाकरी भाजी गरम गरम करुन खाऊ घालेन. या मग...

छान कृती.
स्टेप बाय स्टेप फोटो मस्त.!
भाकरीसाठी खूप कौतुक वाटतयं तुमचं.मस्त फुगलीये.फुल मार्कस्.!

Pages