भाग १- किल्ले लहूगड, जंजाळा, घटोत्कच लेणी, आणि वेताळवाडी
औरंगाबाद ! नुसते नाव जरी घेतले तरी डोळ्यासमोर एक वेगळाच ईतिहास उभा रहातो. जगात प्रसिध्द पावलेली वेरूळ-अजिंठा लेणी, घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग तसेच यादवांची राजधानी किल्ले देवगिरी.
याच भागातल्या मुख्य अजिंठा डोंगररांगेत त्या काळी राजधानी देवगिरीकडे येणार्या मार्गांवर-घाटवांटावर टेहळणी साठी काही किल्ले बांधले गेले. हा बराचसा भाग 'गौताळा अभयारण्य' या नावाने ओळखला जातो. याच गौताळाच्या मुलुखात असलेल्या किल्ल्यांना भेट देण्याचा योग जुळुन आला तो विकेंडला जोडून आलेल्या गांधी जयंतीच्या सुट्टी मुळे. मुंबई पुण्यापासून हा मुलुख दूर, पण प्रचंड अवशेष समृध्द, खणखणीत तटाबुरूजांचे शेला पागोटे चढवून अजुनही दिमाखात उभे असलेले हे किल्ले अस्सल दुर्ग भटक्यांना आपल्याकडे खेचणार नाही तर नवलच.
मुख्य प्रवाही किल्ल्यांपासून जरा र्दुलक्षित पण आपला खासा ठसा मात्र मनाच्या स्मृती पटलावर कायमचा उमटवतात.
किल्ले लहूगड, घटोत्कच लेणी, जंजाळा, वेताळवाडी, सुतोंडा, अंतुर आणि लोंझा.
चर्चेला सुरूवात झाली. या मोहिमेच्या नियोजनात 'ओंकार ओक' ची मोलाची मदत झाली. जाण्याचा मार्ग व तेथील स्थानिकांचा संपर्क अशी बरीच माहिती ओंकार ने दिली. त्याचा आमच्या नियोजनात खुपच फायदा झाला.
या मोहिमेत सहभागी होते, ई.एन.नारायण (अंकल), विवेक नारायण हि बाप लेकाची जोडी, मिलिंद कोचरेकर आणि मी. अंतिमत: असा मार्ग ठरला.
गुरूवारी १ तारखेलाच रात्री निघून.
कल्याण-नाशिक-येवला-वैजापूर-खुल्दाबाद-वेरूळ-फुलांबरी-पालफाटा-नांद्रा-किल्ले लहूगड-पालफाटा-सिल्लोड-उंडणगाव-अंभई-किल्ले जंजाळा- किल्ले वेताळवाडी-हळदा घाट-सोयगाव-पाचोरा-खडकदेवळा-बनोटी मुक्कामी अमृतेश्वर मंदिर हा पहिल्या दिवसाचा टप्पा होता.
रात्री निघण्याबाबत बरेच मतभेद झाले. पण मग ठरवले, या वेळी पल्ला लांबचा आहे. जेवढे शक्य होईल तेवढे अंतर पार करू, अगदीच झोप अनावर झाली तर गाडी बाजूला घेऊन आराम करू. खऱेतर या मुळेच आमचा खुप फायदा झाला, रात्री हायवेवरची छोटी मोठी गावं पटकन पार झाली, ना फेरीवाले, ना रिक्षावाले, ना मधे मधे घुसणारे बाईकवाले असे कोणतेही अडथळे नव्हते. रात्री दहा वाजता कल्याणहून निघून आम्ही साडेचार तासातच येवला गाठले. जास्त प्रवास हा गाडीतूनच असल्यामुळे काही चांगल्या मराठी गीतांच्या ‘आनंदघन’, ‘मेंदीच्या पानावर’, ‘निवडक जगदिश खेबुडकर’ अशा सीडीज घेतल्या. तसेही विवेक सोबत असल्यामुळे गाडीत विषयाला काही तोटा नव्हता, अमेरीका ते रशिया तसेच अगदी अघोरीनाथा पासून नवनांथापर्यंत सर्व विषय चघळले गेले. असो तर पुढे येवलाहून अर्ध्या तासात वैजापूर. मग वैजापूरहून वेरूळ साठी डावीकडे वळालो आणि खराब रस्त्याची सुरूवात झाली. हेमा मालिनी आणि ओम पुरीचे गाल, तसेच लोण्याचा गोळा ते नागलीचा पापड अशी सर्व तुलनात्मक विशेषणे उध्दार करत लावून झाली.
ओंकारने या रस्त्यांचा महिमा सांगितला होता, त्यामुळे आमची व गाडीची धक्के खाण्याची मानसिकता तयार होतीच.
भल्या पहाटे वेरूळ-खुल्दाबाद पार करत फुलांबरी गावात पोहचायला सकाळचे ६ वाजले, थोडक्यात काय तर वैजापूर ते फुलांबरी हे जवळपास ११० किमी अंतर कापायला चक्क ३ तास लागले. राज्य महामार्ग असुनही रस्त्याची ही अवस्था.
फुलांबरीत चहापाणी करून सिल्लोड रोड वर ४ किमी जाऊन उजवीकडे पालफाटा ते राजूर रस्ता पकडला. पालफाट्याहून अंदाजे ६ किमी वर लहूगडासाठी ( जातेगाव - नांद्रा ) उजवी मारली.
इथेच लहूगडाची पाटी लावलीय. नांद्रा गावाच्या पुढे शेतातल्या रस्त्यामधून गाडी गडाच्या पायथ्याजवळ नेली. लहुगड हा तसा अंजिठा डोंगररांगेत नसून, तो वेरूळ लेण्यांच्या टेकडीच्या रांगेत वसलेला आहे. पण आहे मात्र अवशेषपूर्ण.
आजचा आमचा कार्यक्रम लहूगड, घटोत्कच लेणी, जंजाळा आणि वेताळवाडी पाहून हळदा घाटाने उतरून सोयगाव मार्गे बनोटी गावात अमृतेश्वर मंदिरात मुक्काम असा होता.
सकाळच्या कोवळ्या ऊन्हात छोटेखानी लहूगड चांगलाच उठून दिसत होता. गडावर जाण्यासाठी सुरूवातीला सिमेंटच्या पायर्या बांधल्या आहेत. वाटेत एक शिवलिंग व नंदी आहे, थोडे वर चढून आल्यावर सपाटी लागते.
तिकडेच उजव्या हाथाला मोठी गुहा व मंदिर आहे, त्यावरील कोरीव काम तर लाजवाब.
थोडे पुढे गेल्यावर सांधूचा मठ नजरेस पडतो.
गुहा मंदिराच्या डाव्या बाजूने कातळकोरीव पायर्या ने वर गेल्यावर
कातळकोरीव छोटा दरवाजा लागतो, तिथेच डावीकडे हि लहान गुहा दिसते. तसेच वर चढून गेल्यावर छोट्या टाक्यांचा समूह दिसला.
इथूनच उजव्या बाजूने गडप्रदिक्षणा करता येते, वाटेत अनेक पाण्याची टाकी आणि काही खांब टाकी आहेत, अंदाजे २५ टाकी तरी असतील.
आणखी पुढे गेल्यावर नजरेस पडली ही एक आगळी वेगळी गुहा. सध्या बरीच पडझड झाली असली तरी कातळात खोदलेली टाकी, मध्येच छोटेसे मंदिर हे पाहून थक्क झालो.
गडाला काही ठिकाणी तटबंदी आहे पलीकडच्या आंजनडोह गावात एक वाट उतरते,तिथूनच पुढे औरंगाबादच्या दिशेला जाता येते.
गडाच्या रांगेत दोन्ही बाजूला डोंगर आहे. त्यात एका डोंगरावर छोटे नवलाई देवीचे मंदिर आहे.
दुसर्या बाजूच्या डोंगराला चांभार टेकडी म्हणतात. तिथे काही लेणी आहेत.
दिड तासात गडफेरी करून खाली आलो. वाटेत हा वटवृक्ष दिसला.
आता पुढचा पल्ला होता, किल्ले जंजाळा उर्फ वैशागड.
पुन्हा आल्यामार्गाने जातेगाव पालफाट्याहून उजवीकडे सिल्लोड रोड पकडला तो थेट गोळेगाव पर्यंत, हा औरंगाबाद- अजिंठा मुख्य रोड असुनही भले मोठ्ठाले खड्डे रस्त्यात जागोजागी होते. मुख्य पर्यटन स्थळ अजिंठा आणि रस्त्याची हि अवस्था. गोळेगावहून डावीकडे उंडणगावसाठी वळालो. इथेही खराब रस्ता आमचा सोबती होता. साधारण १२ च्या सुमारास उंडणगावात पोहचलो, इथून दोन रस्ते जातात, डावीकडचा अंभई मार्गे जंजाळा व उजवीकडचा हळदा मार्गे वेताळवाडी. आमच्या प्लान नुसार आम्ही पाऊण तासात अत्यंत खराब अरूंद व मातीकम डांबर या स्वरूपातल्या रस्त्यावरून पाऊण तासात, जंजाळा गावात पोहचलो.
गावात शिरताना हे सामोरे आले, पाहुन फेविकॉल ची जाहिरात आठवली.
एखाद्या सिनेमात पाकिस्तान दाखवितात तसेच हे गाव, खऱ सांगतो, अजिबात प्रसन्न वाटले नाही. स्वच्छता, टापटिपपणा, नेटकेपणा या गोष्टींचा लवलेशही नाही. भर उन्हात एका छोट्या दुकानापाशी गाडी उभी करून, जेवणाचा डबा व पाण्याची बाटली सोबत घेऊन घटत्कोच लेणी पाहण्यासाठी निघालो. जंजाळा गाव हे पठारावर वसलेले आहे. गावातल्या मका व बाजरीच्या शेतातून वाट काढत उजव्या बाजूला घटत्कोच लेणी व डाव्या बाजूच्या पठारावर जंजाळा किल्ला आहे. दोंघाच्या मध्ये दरी आहे.
लेणीत जाण्यासाठी पुरात्तत्व खात्याने बांधलेल्या पायरांच्या मार्गाने उतरत जावे लागते.
घटत्कोच लेणी हि बौध्द लेण्यांमध्ये मोडते. लेणी खुपच प्रशस्त आहे.
मधल्या भागात बुध्दाची मोठी आसनस्थ मुर्ती आहे.
लेणीचा माहितीवजा फलक.
तिथेच दुपारचे जेवण उरकले.
खऱच एवढ्या आडमार्गाला हि प्रचंड लेणी पाहून थक्क झालो.
भर दुपारच्या उन्हात पुन्हा पायर्या चढून, समोरच्या पठारावर आलो. थोड्या अंतरावरच शेतकरी दादा आरामात बसलेले दिसले.
बाजूलाच पिण्याच्या पाण्याचा छोटासा झरा त्यांनी दाखविला. ते गार पाणी मनसोक्त पिऊन, पुन्हा नव्याने बाटलीत भरून घेतले.
इथून उजवीकडे वळून जंजाळा किल्ल्याकडे निघालो, वाटेत पठारावर काही घर आहेत, बाजरीची व मक्याची शेती तसेच जोडीला भरपूर गाई गुरांचा ,शेळ्या मेंढ्याचा वावर.
लेणी सोडल्यापासून अर्ध्या तासानंतर गडाच्या तटबंदीपाशी आलो. तटबंदी अलीकडच्या पठारावरची ही तोफ
पुढे गेल्यावर याच तटबंदीत चोर दरवाजा दिसला.
पुढे आणखी एक कमानवजा दरवाजा व एक मोठा तलाव.
गडाला बरेच अवशेष व खुपच भले मोठे पठार लाभले आहे.
त्यात पश्चिमेला जरंडी दरवाजा, दर्गा, पीर, कमानवजा मस्जिद, दुरवर एकसंध अशी अजिंठा रांग ,पूर्वेचा वेताळवाडी दरवाजा आणि किल्ला नजरेस पडतात.
घड्याळाचे काटे भराभर पुढे सरकत होते. समोरच असलेला आजच्या दिवसाचा वेताळवाडी किल्ला आम्हाला खुणावत होता. पुन्हा गाडीतून नाणेगाव-अंभई असे करत पुन्हा उंडणगावात आलो. त्यात वाटेत अंभई ते उंडणगाव दरम्यान पावसाची एक मोठी सर हवेत चांगलाच गारवा निर्माण करून गेली. उंडणगावात पुढच्या रस्त्याची खात्री करून घेण्यासाठी विचारले तर जे उत्तर आले ते ऐकून चाटच पडलो. दोन तीन दिवसापूर्वीच्या जोरदार पावसाच्या तडाक्यात हळदा घाटातला अर्धा रस्ता दोन तीन ठिकाणी खचलाय. कालपासून सोयगावहून घाटातून येणारी एस टी पण बंद आहे. आता हे खऱ खोट तपासात न पडता लवकरात लवकर वेताळवाडीच्या दिशेने निघालो. सुर्यराव पश्चिमेकडे निघाले होते. रस्ता तर फारच भयानक काही अंतर गेल्यावरच वरच्या चौकशीची खात्री पटू लागली. ताशी २० किमी च्या वेगाने रखडत रखडत सुमारे अर्ध्या तासानंतर हळदा घाटाच्या सुरूवातीला वेताळवाडी किल्ल्याचे दर्शन झाले.
मोठ्ठाले दोन वळण पार करून घाटातच एका कडेला गाडी उभी केली. किल्ल्याची एक सोंड घाटात रस्त्यानजीकच उतरली आहे. मोजकेच सामान घेऊन पळतच सुटलो.
थोडे वर आल्यावर उजवीकडे हळदा घाटाकडचे किल्ल्याचे प्रवेशद्वार लागले.
प्रशस्त प्रवेशद्वार वर शरभ शिल्प कोरलेली व आतमध्ये पहारेकर्यांची देवडी खासच.
प्रवेशद्वारातून वरती आतल्या बाजूच्या जीन्याने वर चढून गेलो. वर गेल्यावर नजारा मात्र खिळवून ठेवणारा समोर आम्ही आलो ती हळदा घाटाची सुरूवातीची वळणे.
खाली वेताळवाडी धरण, दूरवर काही क्षणापूर्वी आम्ही जिथे होतो तो जंजाळा किल्ला.
पुढे उजवीकडे खणखणीत तटबुरूजांची मालिका.
समोरच मोठे बुरूज आणि अंदाचे २०-३० फूट उंचीची तटबंदी पाहून खरच थक्क झालो.
तटबंदीच्या वरच्या बाजूला जंग्या तसेच काही ठिकाणी नक्षीदार कलात्मक बांधकाम दिसते.
पुढे गेल्यावर बालेकिल्ल्याची तटबंदी उजव्या बाजूने वळसा घालून गेल्यावर हा बुरूज सामोरा आला.
वर आल्यावर एक भग्न ईमारत आणि मोठा शेवाळलेला तलाव पण पाणी मात्र पिण्यालायक नाही.
अंबरखाना शेजारी हा पुरातत्व खात्याचा फलक
ऐन सायंकाळी वातावरण चांगलेच ढगाळ झाले होते. तसेच बालेकिल्ल्यातून उत्तर दिशेला हि कमानवजा ईमारत.
किल्ल्याची सर्वात सुंदर आणि रमणीय अशी हि जागा. थोडा वेळ तिथे शांततेत हवा खात बसलो.
खर सांगतो दिवसभराचा प्रवासाचा शीणवटा कुठच्या कुठे पळून गेला.
इथूनच रूद्रेश्वर लेणीचा डोंगर, वेताळवाडी गाव आणि त्या दिशेला असणारा दरवाजा. सूर्यास्त झाला होता अर्थातच वातावरण ढगाळ असल्यामुळे दिसला नाही. एवढा अवशेषपूर्ण किल्ला पहाताना वेळ कसा गेला ते कळालेच नाही. खर तर आमच्या तिघांचीही निघायची ईच्छा होत नव्हती. मनात तोच विचार येत होता कि एवढा चांगला किल्ला पण मुक्काम आणि पाण्याची खासा सोय नाही. असो पुढचा पल्ला आणि हळदा घाटाची बातमी आठवून आल्यामार्गे गड उतरून गाडीजवळ आलो. संधीप्रकाशातच हळदा घाट उतरायला सुरूवात केली. रेती मिश्रीत डांबर उखडलेला जागोजागी खड्डे असलेला रस्ता. बॉलबेरींग वरून गाडी जातेय की काय असे काही ठिकाणी वाटले. मध्येच एके ठिकाणी वेताळवाडी गावाच्या दिशेला असलेला वेताळवाडी दरवाजा दिसला. पुढे एका अवघड वळणावर आलो तर खऱच अर्धा रस्ता पूर्ण पणे खचला होता. जेमतेम छोटी कार किंवा जीप एकावेळी जाऊ शकेल एवढीच जागा शिल्लक होती. पुढे सुध्दा एका वळणावर तीच स्थिती. सावकाशपणे घाट उतरून वेताळवाडी गावात आलो तेव्हा दिवेलागणीची वेळ झाली होती. वेताळवाडी गावातून सरळ जात पंधरा ते वीस मिनिटांत सोयगाव ला चहा नाश्ता साठी थांबलो. सोयगाव हे औरंगाबाद जिल्ह्यातील एक तालुक्याचे गाव. पण गावात सर्वत्र धुळीचे साम्राज्य, त्यात रस्त्याची अवस्था तर फारच भीषण. छोट्याश्या हॉटेलात चहा बिस्कीटे खाऊन, पेट्रोल पंप शोधून गाडीत पुन्हा डिझेल भरून घेतले. कल्याण सोडल्यापासून सायंकाळपर्यंतचा जवळपास ५०० किमी प्रवास झाला होता. तसेच आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार पुढच्या प्रवास मार्गात चाळीसगाव पर्यंत पेट्रोल पंप नाही.
आता सोयगावहून आम्हाला नियोजनाप्रमाणे बनोटी या गावी मुक्कामी जायचे होते. सोयगावहून बनोटी ला तिडका मार्गे सरळ रस्ता जातो. अंदाजे अंतर ३५-४० किमी. पण चौकशी केल्यावर कळाले रस्ता प्रचंड खराब आहे. खर सांगायचे तर दिवसभर गाडी हाकून पुन्हा त्या प्रचंड खराब रस्त्यावर गाडी चालवायची माझी मुळीच ईच्छा नव्हती. साहजिकच थोडा लांबचा पण चांगल्या रस्ता निवडला.
सोयगाव - शेंदुर्णी - वारखेडी- पाचोरा - खडकदेवळे - निमबोरा - बनोटी असा जवळपास ६०-७० किमी चा हा मार्ग. सुरूवातीला खराब रस्ता मध्ये जरा बरा परत खराब थोडक्यात दगडापेक्षा वीट मऊ असा प्रकार. शेंदुर्णी गावात रात्रीच्या अंधारात एका चौकात थोडे गडबडायला झाले, रस्ता हाच आहे ना अशी शंका येऊ लागली. मग चौकाच्या अलीकडे दोघे जण दिसले, त्यांना पाचोरा जाण्यासाठी हाच रस्ता ना हे विचारतो. तर दोंघाचे हाथ एकेमेकांच्या विरूध्द दिशेला. हा काय प्रकार चाललाय, जवळ गेल्यावर कळले की त्या दोंघाची गाडी टॉप गीअर मध्ये होती. गांधी जयंतीचा ड्राय डे सायंकाळी त्यांनी सत्कारणी लावला होता. आमच्या नकाशानुसार डावी मारली, गावातून वाट काढत भडगाव पाचोरा राज्य महामार्गावर आलो. ३० ते ४० मिनिटांत पाचोराच्या थोडे अलीकडे निमबोरा साठी डावीकडे वळालो. निमबोरा- गोंडेगाव अशी छोटी गावं पार करत रात्री साडेनऊच्या सुमारास बनोटी गावात दाखल झालो.
बनोटीतल्या शिरसाठ यांचा नंबर होताच. त्यांच्याच खानावळीत रात्रीचे जेवण केले. मुक्कामासाठी गावातल्या अमृतेश्वर मंदिरात गेलो. मंदिर फारच स्वच्छ आणि प्रशस्त. रात्री मंदिराजवळ गाडी लावली तेव्हा ट्रीप मीटर चेक केले तर काल रात्री पासून २४ तासात ५६४ किमी प्रवास झाला होता.
योग्या फॉर्मात..मस्त भटकंती
योग्या फॉर्मात..मस्त भटकंती सुरु आहे.. आणि लिखाण पण .. नकाशे फोटो सगळं मस्त.. या भागात फिरायला जाताना तुझ्या लेखाची मदत होईल.. धन्यवाद
जबरी..
जबरी..
किती अनोख्या प्रदेशाची माहिती
किती अनोख्या प्रदेशाची माहिती आहे ही ! लेणी खरेच प्रशस्त आहेत. सुंदर वर्णन आणि फोटो.
हे फुलंब्री म्हणजे मास्टर कृष्णरावांचे गाव का ?
अतिशय माहितीपूर्ण लेख! फक्त
अतिशय माहितीपूर्ण लेख!
फक्त थोडक्यात आटोपल्यासारखा वाटला.
सुंदर फोटोज व माहितीपुर्ण लेख
सुंदर फोटोज व माहितीपुर्ण लेख
मस्त रे योगेश, चांगलीच
मस्त रे योगेश,
चांगलीच दांमटलीस गाडी मग!
आमच्या गावाजवळून गेला होतास आणी - भडगाव.
अवांतर- पण तारीख १ जानेवारी लिहीली आहेस ( त्या विकेंड ला कशी काय गांधी जयंती बुवा?)
@ यो - नक्कीच जाऊन पहावा असा
@ यो - नक्कीच जाऊन पहावा असा हा मुलुख. निदान दुर्गरसिकांनी तरी.
धन्यवाद हिम्सकुल आणि महेशकुमार
@ दिनेशदा - मला तरी नाही वाटत.
@ विजय - होय, आटोपशीर लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.
@ संदिपभाऊ - आम्ही १ ऑक्टोबर
@ संदिपभाऊ - आम्ही १ ऑक्टोबर २०१५ ला रात्री निघालो. २ ऑक्टोबर हि गांधी जयंतीची सुट्टी शुक्रवारी होती. आणि ३-४ ऑक्टोबर शनि रवि हा विकेंड.
अतिशय माहितीपूर्ण लेख! फोटो
अतिशय माहितीपूर्ण लेख! फोटो आणि लिखाण पण छान !
त्या भागातल्या बर्याचश्या
त्या भागातल्या बर्याचश्या किल्ल्यांवर बरेचसे अवशेष शिल्लक आहेत पण.. हे कसे शक्य झाले हे बघावे लागेलच.. इकडे मावळ भागातल्या किल्यांवर अगदीच मोजके अवशेष दिसतात...
मस्तच! आम्हाला कधी या परिसरात
मस्तच! आम्हाला कधी या परिसरात जायला मिळणार देव जाणे!
मस्त माहिती, फोटो आणि नकाशा
मस्त माहिती, फोटो आणि नकाशा सुद्धा.
भटकत रहा, लिहित रहा, जळवत रहा
धन्यवाद चंबू. मित, आणि
धन्यवाद चंबू. मित, आणि सतिश.
@ हिम्सकुल - याची कदाचित दोन कारणे असु शकतात.
१- मावळात या भागाच्या तुलनेत प्रचंड वारा आणि पाऊस.
२ - हे बरेचसे किल्ले बुरान निजामशाहच्या ताब्यात होते. मावळ प्रांताच्या तुलनेत शिवशाहीचा फारसा विस्तार या भागात झाला नाही. तसेच इथे खुप मोठ्या लढाया झाल्याचे ही काही ऐकिवात नाही.
जाणकांराना अधिक काही माहित असल्यास जरूर सांगावे.
मस्त माहिती, फोटो आणि नकाशा
मस्त माहिती, फोटो आणि नकाशा सुद्धा. >>>> +१११११११
ओके.. म्हणजे लेख ऊशिरा टाकला
ओके.. म्हणजे लेख ऊशिरा टाकला होय
खुप छान लिव्हलय... या भागाची
खुप छान लिव्हलय...
या भागाची भटकंती करायला आवडेल..
शशांक, रोहित धन्यवाद !
शशांक, रोहित धन्यवाद !