महिलादिन सामाजिक उपक्रम २०१५च्या अंतर्गत पुणे कोथरुड येथील अंधशाळेला मिळालेल्या देणगीचा अहवाल

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 11 October, 2015 - 09:15

नमस्कार!

महिलादिन सामाजिक उपक्रम २०१५च्या अंतर्गत पुण्याच्या कोथरुड येथील मुलींच्या अंधशाळेला शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी मायबोलीकरांनी एकूण २५०००/- रुपये देणगी दिली. परंतु शाळेच्या प्राचार्या काही कारणाने रजेवर असल्यामुळे शैक्षणिक साहित्य खरेदीचे काम रखडले होते. तसेच पुण्यातील भवानी पेठेतील डॉ रमेश साठे व त्यांचे बंधू यांचेकडून साहित्य मागवायचे ठरले होते. डॉ. साठे यांनी दृष्टीहीन, अंधुक दृष्टी असलेल्या व्यक्तींसाठी बर्‍याच प्रकारची उपकरणे तयार केली आहेत व त्यांचे सुयोग्य प्रकारे ते वितरण व विक्रीही करत आहेत. त्यांच्याकडून अंधशाळेने जमा झालेल्या देणगीतून वेगवेगळ्या प्रकारची मॅग्निफायर्स मागवली होती.
सबब उपकरणे जोडायचे काम व त्यांना व्यवस्थित जागा देऊन त्यांचा मुलींना चांगल्या प्रकारे उपयोग करता यावा यासाठीची व्यवस्था अंधशाळेच्या प्राचार्या रजेवरून परत आल्यावरच झाले आणि म्हणूनच हा अहवाल प्रसिद्ध करण्यास विलंब झाला. त्याबद्दल दिलगीर आहोत!

एकूण देणगीतून १५,०००/- रुपयांची मॅग्निफायर्स खरेदी करण्यात आली. फ्लेक्सिबल आर्म मॅग्निफायर, पॉकेट मॅग्निफायर, टॉर्च हँड मॅग्निफायर, मोनोक्युलर टेलिस्कोप नेक बँड, रीडिंग स्टँड अशी ही खरेदी होती.
सर्व साहित्य आता अंधशाळेत वरच्या मजल्यावर एका खोलीत खास राखीव अशा जागेत छोटेखानी लॅबमध्ये ठेवले आहे. एरवी हे साहित्य कपाटात बंदिस्त असते. परंतु मुलींच्या लॅबच्या तासाला त्यांना हे साहित्य हाताळायला, त्याचा उपयोग करायला शिकविले जाते. त्यासाठी शाळा सुरुवातीला मुलींना चित्रकला, रंगकामाचे माध्यम वापरून ही उपकरणे हाताळायला शिकविते. लॅबमधील पर्यवेक्षिका व साहाय्यक त्यांना या साहित्याची हाताळणी करायला शिकवतात व त्यांच्यावर देखरेखही करतात. ज्या मुलींना अंधुक दृष्टी आहे त्यांना ही उपकरणे वापरून पुढे लिहा-वाचायला व इतर गोष्टी करायला शिकविले जाते.

देणगीतून विकत घेतलेली उपकरणे (मॅग्निफायर्स) व ती वापरायला शिकत असताना मुली

१.

anmagn1.jpg

२.

anmagn2.jpg

३.

anmagn3.jpg

४.

anmagn4.jpgखरेदीची पावती

invoice1.jpgअंधशाळेच्या येत्या काळातील गरजा :

मुलींसाठी सध्या अस्तित्त्वात असलेली घसरगुंडी, सी-सॉ व इतर खेळाचे साहित्य उन्हा-पावसांत बरेच जीर्ण झालेले व गंजलेले असून ते आता बादच झाल्यात जमा आहे. मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने ते वापरणे आता योग्य नाही, परंतु नवीन साहित्याची आर्थिक तजवीज अद्याप झालेली नाही. तर अंधशाळेला घसरगुंडी, सी-सॉ व तत्सम खेळाच्या, पावसात व उन्हात खराब न होणार्‍या मटेरियलच्या साहित्याची गरज आहे. इच्छुक देणगीदार शाळेशी संपर्क साधून थेट वस्तूही खरेदी करून देऊ शकतात किंवा त्या वस्तूसाठी शाळेला देणगी देऊ शकतात.

त्याचप्रमाणे शाळेच्या इमारतीत व इमारतीबाहेरील प्रांगणात मुलींना चालायला सुरक्षित असा मार्ग करण्याची शाळेची योजना आहे. त्यासाठी जमीनीवर विशिष्ट प्रकारचे विटेसारखे मॅटिंग बसवायला लागते. त्यासाठीही शाळा देणगीदार शोधत आहे. इच्छुक देणगीदार यासाठीही देणगी देऊ शकतात.

अद्याप सामाजिक उपक्रमांतर्गत एकूण जमा देणगीतून जवळपास १०,०००/- रुपयांची शैक्षणिक साहित्य खरेदी बाकी आहे. तीही लवकरच आटोपेल. त्यानंतर त्याबद्दलचा अहवालही इथेच देऊ.

धन्यवाद!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरु, ग्रेट! ते फोटो बघून खूप छान वाटलं.

ह्या मुलांना किंवा अश्या उमलत्या पिढीला नेत्रदानांतून दृष्टी मिळाली तर!

सादर नमस्कार ह्या कार्याला! काही काम असल्यास हक्काने सांगावे. माझ्या घरापासून फक्त दिड-दोन किलोमीटरवर आहे ही अंधशाळा!

धन्यवाद केश्विनी व बेफ़िकिर!

केश्वे, हो, असं वाटतं खूप.

बेफ़िकिर, शाळेला वेगवेगळ्या कामांना, गोष्टींसाठी लोकांची गरज कायमच असते. शाळेतील वेगवेगळे उपक्रम, व्होकेशनल ट्रेनिग सेंटर इत्यादी ठिकाणी जमल्यास अवश्य भेट द्या. (भेट दिली नसल्यास!) अगदी शाळेचे गॅदरिंग बसवण्यापासून ते मुलींना सक्षम करण्यासाठीच्या अनेकविध उपक्रमांत स्वयंसेवकांची गरज असते. काही काळापूर्वी जर्मन मुलींच्या एका ग्रूपने शाळेत कायमस्वरूपी स्टेज बनवण्यात पुढाकार घेतला. मुलींना हाताच्या स्पर्शाने 'पाहाता' येईल असे चित्र भिंतीवर तयार केले. करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. Happy

अरुंधती Happy

ह्यातील बहुतेक गोष्टी मला माहीत आहेत. ह्या शाळेतील मुलींसाठी मी दोन कार्यक्रम (त्यांना आवडतील अश्या कवितांचे) केलेले आहेत. काही देणग्याही दिल्या आहेत. (पैसे / वस्तू वगैरे). खरे तर तेथील एका महिला अधिकार्‍याबाबतचा माझा अनुभव जरा कडवटच आहे. इतकेच काय तर अनेक मुलीसुद्धा मला डिझर्व्हिंग नाही वाटल्या. परदेशी तरुणींशी माझे बोलणे झाले होते. आपल्या उपक्रमाअंतर्गत काही स्पेसिफिक काम सांगितलेत तर अगदी अवश्य करेन मात्र! तुमच्या प्रतिसादानंतर मी वर लिहिलेल्या गोष्टी लिहिणे मला आवश्यक वाटले म्हणून लिहिल्या. पहिल्या प्रतिसादात असे काही लिहावेसे वाटले नव्हते. कृपया गैरसमज नसावा. Happy

थँक्स जाई! Happy

बेफ़िकिर, काही काम असेल तर अवश्य सांगेन! सेवाभावी संस्थांमधील कर्मचाऱ्यांविषयी पुन्हा कधीतरी.... (असे अनेक अनुभव ठिकठिकाणी येतच राहातात. परंतु ज्यांच्यासाठी ही धडपड चालू आहे त्या मुलामुलींसाठी मी ते अनुभव बाजूला ठेवते व कामाला लागते! Happy )

खूप छान काम सुरू आहे. कौतुक आणि शुभेच्छा!

इतकेच काय तर अनेक मुलीसुद्धा मला डिझर्व्हिंग नाही वाटल्या. >>> म्हणजे काय ते कळलं नाही बेफी. जरा सविस्तर सांगा कृपया.

खूप मस्त. अनेकानेक शुभेच्छा!

परंतु ज्यांच्यासाठी ही धडपड चालू आहे त्या मुलामुलींसाठी मी ते अनुभव बाजूला ठेवते व कामाला लागते! हे खूप भारी करतेस अकु Happy

गुड वर्क अकु!
परंतु ज्यांच्यासाठी ही धडपड चालू आहे त्या मुलामुलींसाठी मी ते अनुभव बाजूला ठेवते व कामाला लागते! हे खूप आवडले.

बेफी,
>>>इतकेच काय तर अनेक मुलीसुद्धा मला डिझर्व्हिंग नाही वाटल्या. >>> काय झाले? प्लीज, नकारात्मक कशामुळे वाटले ते सविस्तर लिहाल का?

छान आणि आश्वासक वृत्तांत.

अरुंधती कुलकर्णी आणि त्यांच्याबरोबरीने हे समाजोपयोगी कार्य करणा-या सर्व सहकारी व्यक्तींचे मनःपूर्वक अभिनंदन !

एक मित्र गंभीर अवस्थेत असल्यामुळे माबोवर सध्या फार येता येत नाही आहे. वेळ झाला की स्पष्टीकरण लिहितो.

उर्वरित १०,००० रू. देणगीतील जवळपास २६६२ रू. वगळून अंधशाळेने घेतलेले शैक्षणिक खेळ, प्रयोग किट्स, पुस्तके इत्यादी. (उरलेल्या रकमेची खरेदी बाकी आहे.)

१)

IMG_20160108_180223.jpg

२)

IMG_20160108_180140.jpg

३)

IMG_20160108_180054.jpg

४)

IMG_20160108_180006.jpg

खूप चांगलं काम करता आहात अ.कु.
परवा पेपरात ओरिसाच्या अंधशाळेला ब्रेल पुस्तकं मिळत नाहीत वाचलं आणि हा आणि मायबोलीवरचा अजून एक धागा आठवला ज्यात कोणीतरी सुयांनी ब्रेल पुस्तकं घरी बनवतं.