पूर्वसूत्र येथे वाचू शकता - http://www.maayboli.com/node/56946
"हॅलो फेलाज, माईंड इफ वी जॉईन द पार्टी?"
किलरच्या आवाजाला मूळातच एक तिरकसपणा होता. त्यात अत्यंत कुत्सितपणे हसत विचारलेल्या या प्रश्नाकरवी तो जणू वॉर्निंग देत होता. डोन्ट मेस विद मी एनिमोअर. या सर्व गोंधळात रसूलचे डोळे जॉनीला शोधत होते. त्याची सोन्याची अंडे देणारी कोंबडी होती ना ती!
"नॉट रिअली, दो वी वुड अॅप्रिशिएट इफ यू मेंटेन द डिस्टन्स." सायरसने कमालीचा शांतपणा दाखवत किलरला उत्तर दिले.
रसूलचे मात्र इकडे लक्ष नव्हते. तो सरळ 'जॉनी जॉनी' म्हणत वर्तुळाकडे धावला आणि डोळ्याची पापणी लवते न लवते तोच तो वर्तुळाच्या कडेवर आपला गळा धरून कोसळला.
"आय वोन्ट रिपिट धिस अगेन. मेंटेन द डिस्टन्स जेन्टलमेन अॅन्ड माय लेडी" सायरसने प्रज्ञाकडे वळत वाक्य पूर्ण केले. बोलता बोलता त्याने पँटच्या खिशातून रुमाल काढला. प्रज्ञाकडे एक ओझरता कटाक्ष टाकून मग त्याने जणू काही घडलेच नाही अशा आविर्भावात स्कालपेल वरचे रक्त पुसले.
रसूल मेल्याने किलर वगळता इतर कोणाला फारसा फरक पडत नव्हता. अर्थात किलरवर रसूलच्या अचानक मृत्युचा काही परिणाम झाल्याचे जाणवत नव्हते. त्याने रसूलकडे बघत एक खेदपूर्वक हास्य केले आणि खिशात हात घातला. समोरून काही हालचाल व्हायच्या आत विजेच्या चपळाईने त्याने सिगारेट आणि लायटर दाखवत आपण कोणताही वेडेपणा करत नसल्याचा पुरावा दिला. दोन झुरके घेतल्यानंतर त्याने बोलायला सुरुवात केली.
"जर सगळे संपतच आले आहे तर का नाही एकदा उजळणी करुया. कोण कोण अॅगाथा ख्रिस्ती फॅन आहे इकडे?"
सायरसलाही यावर हसू आवरले नाही. काही क्षण त्याच्या गडगडाटी हास्याने व्यापले.
"तू काय स्वत:ला पॉयरो समजतोस? जो शेवटी सगळ्याचं एक्सप्लेनेशन देशील. तसे देखील जर तुम्ही इथे पोचले आहात तर अजून किती माणसे घेऊन आला आहेस काय माहित."
"आणि जर आम्ही एवढेच जण आहोत, बाहेर इतर कोणी नाही; असे मी सांगितले तर?" - प्रज्ञा
सायरस हसला. "आलोक. तुझा लव्ह इंटरेस्ट इतका बोल्ड असेल असं वाटलं नव्हतं. आय मीन त्या दिवशी तुला ड्रॉप केला तेव्हा लांबून पाहिली होती हिला. पण हे तर काही निराळेच रसायन दिसतंय. कदाचित सतत युरुगुच्या पुस्तकाच्या आसपास राहिल्याने असा बदल घडून आला असावा. एनीवे, आय डोन्ट रिअली माईंड किलिंग टाईम टिल द गेट ओपन्स. ला तू क्रिया सुरु कर. रेश्मा, अल्बर्ट बी ऑन गार्ड." सायरसने करड्या आवाजात हुकूम सोडले. नोम्मोला मारल्याचा त्याला आता पश्चात्ताप होत होता. कितीही म्हटलं तरी मॅनपॉवर इज मॅनपॉवर!
प्रज्ञाने डोळे किंचित बारीक करत ला कडे पाहिले आणि तिचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. मग तिची नजर किलर वर पडली. त्याने कॅरी ऑन चा इशारा देत धुरांची वर्तुळे हवेत सोडली.
"याची सुरुवात झाली बुसुलीच्या कबिल्यात. कधी झाली वगैरे सांगण्यात काही अर्थ नाही कारण काळ, अवकाश या सगळ्यावर या पुस्तकाचा अत्यंत वाईट परिणाम झाला आहे. ला या कबिल्यातीलच एक! बुसुलीचा कबिला या पुस्तकाचे कित्येक वर्षे रक्षण करत आला आहे. बुसुलीचे ला वर प्रेम असल्याने त्याने नकळत तिला युरुगुच्या पुस्तकाविषयी सांगितले. ला महत्त्वाकांक्षी होतीच पण तिला पुस्तकाविषयी इतकी माहिती मिळवता येईल असे बुसुलीला कधीच वाटले नव्हते."
"गेनासेयरा!" सायरस उद्गारला.
रेश्मा, अल्बर्ट वगळता सगळे चमकून त्याच्याकडे बघू लागले. ला आता क्रियेचे शेवटचे मंत्र म्हणण्यात मग्न होती. बुसुलीने तिच्याकडे एक भयचकित कटाक्ष टाकला आणि सायरसला विचारले, "तुला हे नाव कसे माहित?"
सायरसच्या चेहर्यावर अतीव तुच्छतेचे भाव झळकले. तो, रेश्मा व अल्बर्ट प्रचंड जोरजोरात हसू लागले. रेश्माने म्हणाली,
"हे नाव या लोकांच्या कबिल्याची सर्वात रहस्यमय दंतकथा आहे. ला कडून आम्हाला कळली ति सगळी कथा, गोरो आणि इलेगुआ आणि त्यांंच्यातला संघर्ष! अर्थात बुसुलीला देखील गेनासेयरा म्हणजे नक्की कोण हे माहित नसावे. गोरो आणि इलेगुआची कथा अनेकदा ढोबळ मानाने सांगितली जाते. पण इलेगुआला मदत करणारी गेनासेयरा नावाची एक व्यक्ती होती हिचा खूप कमी ठिकाणी पुसटसा उल्लेख येतो. बरोबर? आता हे सर्व आम्हाला कसे ठाऊक? तर ला महत्त्वाकांक्षी वगैरे सगळं ठीक आहे पण तिला चेतवणारा पण कोणी तरी पाहिजे ना! होय, ला गेनासेयराला भेटली होती."
*****
एका झाडावर बसून तो सहज ला बरोबर गप्पा मारत होता. ला अनेकदा बुचकळ्यात पडत असे कि याला युरुगुच्या पुस्तकाविषयी इतके सर्व कसे माहिती आहे. तिचा आज निश्चय पक्का होता. नोम्मो या अकलेने कमी पण शारिरिक ताकदीत बुसुली वगळता कोणाला हार जाणार नाही अशा तरुणाला देखील तिने गटवले होते.
"खरे तर बुसुली आपल्या बाजूने आला असता तर इतका त्रास झालाच नसता."
"हरकत नाही. तुला काही योद्धे मिळतील. कोल्ह्याच्या पांघरलेल्या कातड्याने ते लगेच ओळखू येतील. एकदा का त्यांनी पुरेसा गोंधळ माजवला कि तू ते पुस्तक ताब्यात घे आणि नदीमार्गे पळ काढ."
"आणि तू सांगितल्याप्रमाणे..........."
"श्श्श..... ही वेळ नाही अशा गोष्टी मोठ्याने बोलण्याची. आता तू जा. युरुगु देवांच्या शक्तीचा वारसदार व्हायचंय ना तुला? मग शब्द कमी आणि कृती जास्त!"
*****
"ला आणि गेनासेयरा मध्ये काही तरी अलिखित करार आहे हे मात्र खरं. पण त्याने काही फरक नाही पडत म्हणा. शेवटी..."
"... शेवटी पुस्तक मिळणे महत्त्वाचे." सायरसने रेश्मा अतिउत्साहात अजून काही बोलण्याच्या आत तिचे वाक्य तोडले.
"गेनासेयरा हा शब्द त्या जुन्या कागदपत्रांमध्ये होता खरा पण मी आणि डॉ. नाडकर्णींनी त्याचे भाषांतर 'निनावी' असे केले जे अगदीच काही चुकीचे नाही आहे. एक कोणी व्यक्ती असा संदर्भ असावा हा आमचा निष्कर्ष होता. इलेगुआचा एखादा सेनापती वगैरे. नो वंडर ही शक्यता आपल्या ध्यानातून सुटली कि गेनासेयरा सारखी कोणी व्यक्ती युरुगुचे पुस्तक पुन्हा उघडण्याचा प्रयत्न करत असेल." कुणाल म्हणाला.
"तरीच ला बरोबर त्या दिवशी युरुगुचे योद्धे होते." बुसुलीने बोलायला सुरुवात केली. "गेनासेयराची दंतकथा आमच्या कबिल्यात पुष्कळच प्रचलित आहे. असेही सांगितले जाते कि गेनासेयराने इलेगुआला पुस्तक बनवायला मदत केली आणि गेनासेयराकडे स्वतःचे असे एक कमी शक्तिशाली युरुगुचे पुस्तक आहे. इतक्या वर्षांमध्ये अनेकदा कबिल्यावर जेव्हा जेव्हा कोल्ह्याच्या कातडी पांघरलेल्या सैनिकांचा हल्ला झाला तेव्हा तेव्हा त्याच्यामागे गेनासेयराचा हात असल्याची अफवा उठायची. अगदी मिशनर्यांचे खून होण्यामागे पण तोच होता असे कित्येक जण खात्रीपूर्वक सांगायचे. कारण मिशनरी प्रचार करताना काही नियम उदा. तुमची सर्व पापे येशू निश्चितपणे धुवून काढेल ठासून सांगायचे. 'निश्चित' हा शब्द युरुगुच्या उपासकांच्या थेट विरोधातला असल्याने गेनासेयराची नजर त्यांच्यावर पडत असावी. पण गेनासेयराचे अस्तित्व खरे निघेल असे वाटले नव्हते."
"गेनासेयरा असो वा नसो, त्या दिवशी ला तुझ्या हातून निसटली हे मात्र खरे." किलरने गाडी पुन्हा मुद्द्यावर आणली.
"हो. त्या दिवशी मला पुस्तकाजवळ थांबण्याची आज्ञा दिली होती पण ला ने मला फसवून तिला वाचवण्याच्या नादात थोडे दूर आणले आणि तेवढ्या वेळात नोम्मोने ते पुस्तक चोरले." बुसुली जॉनीच्या पाठीवर असलेल्या पुस्तकाकडे बघत बोलला.
"त्यानंतर ला आणि नोम्मो ते पुस्तक घेऊन लांब पळाले. प्रथम ते कैरोच्या दिशेने पळाले. अर्थात जोवर ते आफ्रिकेत होते तोवर बुसुली त्यांना आज ना उद्या शोधून काढेल हे त्यांना ठाऊक होते. त्यामुळे त्यांना शक्य तितकी सेफ जागा हवी होती. आफ्रिकेतून दूर कुठे तरी म्हणून त्यांनी मुंबईची निवड केली. बोटीने प्रवास करून त्यांनी मुंबईत बेकायदेशीररित्या प्रवेश केला. त्या बोटवाल्याला रिपोर्टरने शोधून काढले आहे. बरोबर?" प्रज्ञाच्या या प्रश्नावर रिपोर्टरने मान डोलाविली.
"बुसुली देखील नंतर मुंबईत आला तो मोदिबो या त्याच्या कबिल्याच्या एका वृद्ध सदस्येच्या बातमीमुळे. मोदिबो येथे कैक वर्षांपूर्वी स्थायिक झालेली असल्याने ला तिच्याविषयी बहुधा विसरली. अन्यथा ला आणि नोम्मो मुंबईत आहेत हे कदाचित कधीच कळले नसते."
"काय योगायोग! युरुगु देव नक्की प्रसन्न झाले असतील." किलर नवीन सिगारेट शिलगावत म्हणाला.
"आणि युरुगुच्या पुस्तकाने पहिला बळी घेतला." जाधवांनी कहाणी पुढे सुरु ठेवली.
*****
त्या दिवशी अनिरुद्धचे तिथे पोहोचणे, त्या क्षणी तिथे असणे हा केवळ योगायोग होता. त्याच्या जागी इतर कोणीही असू शकला असता, दुर्दैव त्याचे! हे दुर्दैव तो पडल्या पडल्या बघू शकत होता, अनुभवत होता पण त्याच्या डोक्यात ते कितपत नोंदले जात होते हे सांगता येणे शक्य नव्हते. असे म्हणतात कि कोमाचे पण अनेक प्रकार असतात. अनिरुद्ध देखील जणू कोमात होता, त्याला कळत होते पण वळत नव्हते. तो विचार करू शकत होता पण ते विचार टेम्पररी मेमरी सारखे लगेच विरूनही जात होते. मी रात्री फोन न घेता का बाहेर पडलो? मी बाहेरच का पडलो?
०००
"अरे तो फोन विसरला घरी. हां, तेच म्हणते आहे मी कि मला तो पोचला फोन करशील किंवा एक मेसेज टाकला तरी पुरे. नक्की करशील ना? ठीक आहे ठेवते मी. बाय" अनिरुद्धच्या आईने फोन ठेवला. तिच्या हातात अनिरुद्धचा मोबाईल होता. त्याचे बॅटमॅनचे बॅक कव्हर बघून तिची आणखीन चिडचिड झाली. मानसीला तिच्या रागाची पहिली लाट थोडा वेळ सहन करावी लागणार होती.
"पण मी म्हणते काय सोनं लागलंय त्या बॅटमॅनला? मेला काळे कपडे घालून वावरतो अंधाराचा. दळभद्री लक्षणं कुठली!"
मानसी ५ सेकंद गप्प राहिली आणि मग फुर्रर्रकन तिचे हसू ओसंडून वाहू लागले. आईचा मूड एकंदरीत इतकाही बिघडला नाही आहे. थोडं तिला समजावूयात.
"अगं ते सगळं बरोबर आहे, पण दादासाठी तो हिरो नं १ आहे ना! त्यात तो अरखम नाईट गेम नवीन आला ना नुकताच, मग खेळायला हवाच. तसंही त्याचा तेवढाच तो एक छंद आहे. जाऊ दे ना, कुठे लांब गेलाय आणि? इथे दातार कॉलनीत तर गेला आहे. चल ना मला भूक लागली आता आणि जेवणात मी बॅटमॅन तर नाही खाऊ शकत ना?"
"हो गं. बाहेर हवा काही मला फार चांगली वाटत नाहीये. म्हणून........"
थोडा वेळ त्यांचे असेच बोलणे चालले. तात्पुरतं तरी त्या घरात अनिरुद्धची काळजी नव्हती, प्रत्यक्षात ती असायला हवी होती. दे शुड हॅव बीन व्हेरी व्हेरी वरीड!
०००
अनिरुद्ध त्याच्या तंद्रीत अॅक्टिव्हा चालवत होता. अनेकदा तो या रस्त्याने गेला असल्याने तो आत्तासारख्या कमी रहदारीच्या वेळी डोळे मिटूनही गाडी चालवू शकला असता. जेव्हा त्याच्या मसल मेमरीने त्याला भानावर आणले तेव्हा त्याने ब्रेक दाबले, गाडी साईड स्टँड वर घेतली आणि आता गेट उघडायला लागेल तेव्हा किल्ली तात्पुरती राहू देत असे म्हणत त्याने किल्लीवरचा हात काढला न काढला तोवर त्याच्या डोक्यात ती गफलत नोंदली गेली. समोर माहिमचा किल्ला होता. काहीतरी जबरदस्त चुकले होते. तो माहिमल पोचणे शक्य नव्हते. जणू स्पेस वार्पने त्याच्या रस्त्याची लांबी, दिशा सगळं सगळं बदलून टाकले होते. तो गोंधळलेल्या अवस्थेत काही क्षण तसाच गाडीवर बसून त्या किल्ल्याकडे अवाक् होऊन बघत राहिला. जर तो त्या क्षणांमध्ये तिथून निघाला असता तर कदाचित वाचला असता पण त्याच्या नशीबात ते नव्हते. समोरून आलेल्या त्या आफ्रिकन स्त्री-पुरुष जोडीला त्याने पाहिले कदाचित थोडे आधी पण ते जेव्हा त्याच्या अगदी जवळ येऊन उभे राहिले तेव्हा त्याच्या मेंदूने त्यांच्या अस्तित्त्वाची नोंद घेतली. "तुम्ही कोण?" हे अनिरुद्धचे शेवटचे शब्द होते. नोम्मोने त्याला कसली तरी मुळी हुंगवली आणि मग तो मरेपर्यंत त्या कोमाटोज अवस्थेत होता.
~*~*~*~*~*~
"हम्म, त्या पोराशी आमचे काही वैयक्तिक शत्रुत्व नव्हते." ला ने मध्येच हस्तक्षेप केला. तिचे बेसिक मंत्र म्हणून झाले असावेत.
"त्या दिवशी मोदिबो आमच्या इतक्या जवळ राहते आहे हे आमच्या लक्षात आले. अन्यथा आम्ही इतकी घाई करणार नव्हतो. तिने जर आम्ही भारतात, मुंबईत आलो आहोत हे कळवले तर आम्हाला कितपत वेळ मिळेल हे आम्ही सांगू शकलो नसतो."
"बेसिकली दे पॅनिक्ड!" अल्बर्टने पुष्टी जोडली.
"तेच ते. या पुस्तकाचा खरा मालक, इलेगुआ आता कुठे आहे कोणास ठाऊक! जिवंत आहे का नाही हे देखील कोणी छातीठोकपणे सांगू शकणार नाही. जर खरा मालक, जसे आता जॉनी, उपस्थित असेल तर हे पुस्तक सुरक्षितपणे उघडून युरुगुच्या जगात प्रवेश करणे फार अवघड काम नाही फक्त प्रक्रिया वेळखाऊ आहे. पण जर मालक तुम्ही नसाल तर प्रक्रिया लवकर पूर्ण होणारी असली तरी तुम्हाला पुस्तक ओळखणार नाही आणि पुस्तकाचा रक्षक -> तो कोल्हा तुमच्या बरोबर काहीही करू शकतो. तुम्ही पूर्णपणे त्या पुस्तकाच्या फाश्याच्या निकालावर अवलंबून राहता. मग तुमच्या बरोबर ते पुस्तक काहीही करू शकते. जसे अनिरुद्धला त्या पुस्तकाने भयानक पद्धतीने आत्महत्या करायला लावली. त्यामुळे कोणाला तरी बळीचा बकरा बनवून त्या पुस्तकाच्या उघडलेल्या दरवाज्यात प्रवेश करायचा ही गेनासेयराची कल्पना होती. ते मिशनरी असेच बळीचे बकरे होते जे त्याने माझ्या आधी मदत घेतलेल्या लोकांचे बळी ठरले पण पुस्तकाचा दरवाजा पुरेसा उघडला नाही. जणू दार किलकिले व्हायचे आणि परत बंद व्हायचे. आम्ही एक प्रयत्न करून पाहायचा ठरवला तर चक्क पुस्तकाच्या रक्षकाने दार पूर्ण उघडले! पण, पण आम्ही आत जाऊ शकलो नाही आणि तो कोल्हा गायब झाला. कारण," तिने जॉनीकडे जळजळीत कटाक्ष टाकला, "कारण त्याने याला वारस म्हणून निवडले आणि हा नेमका त्यावेळी शुद्धीत होता. आता त्याच्या परवानगीशिवाय आम्ही आत कसे जाणार? नशीब ते पोरगं होतं म्हणून नाहीतर माझा आणि नोम्मोचा बळी गेला असता. काय पाहिलं याच्यात कोणास ठाऊक?"
"हा माझा फक्त अंदाज आहे," किलर तिचे बोलणे तोडत म्हणाला. "जर युरुगुच्या पुस्तकाला सर्व काही गेम ऑफ चान्स वर सोडायला आवडतं तर अर्थात तो कोल्हा म्हणजे त्याचा रक्षक असा मनुष्य प्रेफर करेल जो लकवर विसंबून जगतो. जॉनीसारखा बेफिकीर जुगारी त्याचा सर्वोत्कृष्ट वारस आहे यात काही डाऊट नाही."
प्रज्ञा - "जे काही असो! जॉनी वारस निवडला गेला त्यामुळे रक्षकाने आपली शक्ति आणि युरुगुच्या पुस्तकाचे अधिकार जॉनीकडे दिले. पण युरुगुचे पुस्तक काय आहे हे जॉनीला नीट कळत नसल्याने त्याने ते पुस्तक शोधण्याचा प्रयत्न केला नाही आणि म्हणून ती शक्ति संपूर्णपणे त्याला अंकित झालीच नाही! त्यामुळे जॉनीचे सर्व व्हिक्टिम्स मेले नाहीत तर अनेकदा त्यांना फक्त वेड लागले. त्याच्याकडे शक्ति मात्र होती त्यामुळे जेव्हा जेव्हा त्याच्या भावनांचा तोल ढासळला तेव्हा तेव्हा त्या कोल्ह्याने पुस्तकाच्या वन टाईम युसेज कॉपीज बनवल्या. दॅट एक्स्प्लेन्स मोदिबोज् अॅनॅलिसिस - कि एकाच वेळी मुंबईत अनेक युरुगुची पुस्तके पसरली होती. त्यात किलर आणि रसूलला जॉनीला सुगावा लागला."
"येस! आम्ही अशा माणसाला वाया जाऊ देणं शक्यच नव्हतं. त्यामुळे त्याची समजूत करून देणं भाग होतं कि तो आमच्या उपकारांखाली दबलेला आहे. त्यात आम्ही त्याला त्याचं आवडतं काम करू देत होतो - जुगार खेळण्याचं! त्याच्या मदतीने आम्ही आमचे कित्येक प्रतिस्पर्धी या जगातून नाहीसे केले."
"त्यामुळे आमचे, पोलिसांचे लक्ष या खुनांकडे अधिक वेधले गेले. कारण एक गँग आता उघड उघड प्रबळ ठरत होती. तसे ते आधीही होतेच........" जाधवांनी वाक्य अर्धवट सोडले.
"बिकॉज ऑफ युअर्स ट्रुली" सायरसच्या या उत्तरात हलकासा गर्व होता. साहजिक होते कि त्याला त्याच्या कृत्यांचा जरासाही पश्चात्ताप नव्हता. रेश्मा व अल्बर्टही यावर जोरात हसले.
"पण सर का? एक डॉक्टर लोकांचे प्राण वाचवता, त्यांचे खून करत सुटत नाही."
"आलोक माय फ्रेंड, हे बघ तुला किती धक्का बसला असेल हे मी समजू शकतो. आफ्टर ऑल आय वॉज युअर आयडॉल राईट? आपल्याकडे आता वेळ नाही अदरवाईज मी तुला माझा भूतकाळ आनंदाने सांगितला असता. ऑफिसर तुमच्या कमिशनरांना मी एका पार्टीत भेटलो होतो. त्यांच्याप्रमाणे तुमची निरीक्षणशक्ति चांगली आहे का बघूयात. काय वाटतं माझ्याकडे बघून तुम्हाला माझ्याकडे बघून?"
जाधवांनी सायरसला पुन्हा एकदा निरखून बघितले. जर त्यांना माहित नसते कि आपल्या समोर एक खूनी उभा आहे तर त्यांनी नक्की सायरसचे वर्णन एक देखणा चाळीशीतला पुरुष असे केले असते कदाचित. त्यांनी खांदे उडवले.
"तू पारशी नाहीस. तू दावरांचा रक्ताचा मुलगा नाहीस, तुला दत्तक घेतले होते बरोबर?"
सायरस हसला. "किलर हे नाव मी माझ्या काही भक्ष्यांकडून ऐकले होते. त्यांना शंका होती कि रसूलचा उजवा हात, कोणी किलर हे सगळं माझ्याकडून करवून घेत आहे. तुझी दहशत का आहे याची थोडी कल्पना आली मला आता. होय, मी कोण आहे कुठून आलो मला स्वतःला माहित नाही. माझी सर्वात पहिली आठवणच मुळात माझ्या आईचा मृत्यु आहे. माझ्या वडलांना, आय मीन, मि. दावरना त्यांच्या मरणासन्न मुलाऐवजी एक हुशार मुलगा हवा होता आणि माझ्या अनाथालयात मी त्यांना पसंत पडलो. नरभक्षक प्रवृत्ती माझ्यात तेव्हाच होती फक्त मधल्या वर्षात ती काहीशी दबली गेली. कदाचित मला आवडेल असे उत्तम वातावरण मला होमींनी दिले. मी कधी कधी स्वतःला जंगली समजतो, त्याप्रमाणेच माझ्याशी जे जे चांगले वागले त्यांना मी कधीच अंतर दिले नाही, भक्ष्य समजले नाही. एके दिवशी मात्र माझ्यावर एका गुंडाने रात्री हल्ला केला. मला लुटण्याचा विचार होता बहुधा त्याचा. तेव्हा मी जिवाच्या भीतिने त्याचा हाताचा कडकडून चावा घेतला आणि त्या निद्रिस्त प्रवृत्ती जाग्या झाल्या. त्यात रस्त्यावरची भिकारी मुले मला माझ्या बालपणाची आठवण करून द्यायची व त्यांच्या मृत्युचे कोणाला सोयरेसुतक नव्हते. त्यामुळे मुख्यत्वे ती मुले, गुंड आमच्या भुकेला बळी पडले."
आलोकला संताप आवरला नाही. त्याने सायरसच्या कानाखाली जाळ काढला. त्याचा आवाज त्या नीरव शांततेत घुमला.
"ती लोकं जिवंत माणसं होती तुमच्या-माझ्यासारखी! थोडी तरी लाज बाळगा सर!"
"चिल आलोक. मी आणि अल्बर्ट सुद्धा सुरुवातीला थोडा गिल्ट बाळगून होतो. पण माणूस जिभेचा गुलाम असतो. एकदा ती चव तोंडात बसली कि..... आय मीन आय कॅन एम्पथाईज विथ डॉक!"
"रेश्मा........" आलोक रागात अजून काही बोलणार इतक्यात ला ओरडली.
"बाऽऽस!! प्रक्रिया पूर्ण झाली आहे. वारस शुद्धीत नसल्याने आता कुठल्याही क्षणी दरवाजा उघडेल आणि युरुगु देवांची परीक्षा घेण्याची संधी मिळेल. मग नवीन वारस तो बनेल जो ही परीक्षा पास होईल."
"परफेक्ट!! तुम्हा सर्वांना इथे मरावे लागेल. आणि सुरुवात तुझ्यापासून होईल ला" सायरसने हातात स्कालपेल धरत लाकडे काही पाऊले टाकली.
"सॉरी ला, पण या पुस्तकाचा मला तुझ्यापेक्षा जास्त उपयोग आहे. याच्या मदतीने आम्हाला उगाच रात्री बेरात्री रिस्क घेत शिकार करायची गरज उरणार नाही, नव्हे आमची शिकार कदाचित बंदही होईल. अखेर याच्यावर रिसर्च करणं इन्फायनाईटली जास्त इंटरेस्टिंग आहे. सो तयार हो." असे म्हणत त्याने स्कालपेल आडवा फिरवला.
"तू मला मारलेस तर पुस्तक उघडणार नाही." स्कालपेलचे पाते जेमतेम इंचभर अंतरावर थांबले. सायरसच्या चेहर्यावर प्रश्नचिन्ह होते. "काय म्हणालीस?"
"पुस्तक उघडायला वारस महत्त्वाचा आहे हे बरोबर कारण तो आपला रक्षणकर्ता आहे. तसेच पुस्तक उघडायला पुस्तकाच्या किल्लीचा रखवालदार, त्याचा रक्षक हवा ना. गेनासेयरा त्याला घेऊन येत असेलच, तेव्हा आपण काय ती बोलणी करू. पण तोवर तो कोल्हा इथे नाही आणि तो येईपर्यंत पुस्तक उघडायची कोणाला इच्छा असेल तर त्याने खुशाल आपल्या जबाबदारीवर उघडावे."
सायरसच्या चेहर्यावर संताप स्पष्ट दिसून येत होता. त्याची इच्छा नसतानाही त्याला ला ला जिवंत ठेवणे भाग होते.
"मग तुमची पाळी आधी" तो रागात त्या सर्वांकडे वळला. रेश्मा आणि अल्बर्टने रसूलच्या अड्ड्यावरून उचललेली पिस्तूले बाहेर काढली.
"बोलतोयस तितकं सोप्पं नाहीये ते" जाधव, किलर आणि रिपोर्टर झटक्यात पुढे झाले. त्यांनी आपापली हत्यारे बाहेर काढली.
..............
..............
..............
"कोणीही काहीही करणार नाहीये" सर्वांनी चमकून त्या आवाजाकडे पाहिले. सर्वाधिक आश्चर्यचकित ला होती. तिचा चेहरा पांढराफटक पडला. जॉनी वर्तुळाच्या मधोमध एका हातात पुस्तक घेऊन हेलकावत उभा होता. त्याला दिली गेलेली नशा पूर्ण उतरली नसली तरी त्याला सर्वात चुकीच्या वेळी शुद्ध आली होती.
"तुम्ही सगळे साले मला xxx समजता, होय ना? xxxxx xxxx जॉनीसे पंगा? जॉनीला मूर्ख बनवलंत, या जॉनीला? अरे माझा मित्र, कुठे गेला मित्रा, माझा मित्र युरुगु इथे असायला हवा होता. xxxx कुठे गेला?"
सर्वांनी एकमेकांकडे नजरा फिरवल्या. जॉनी येथेच्छ शिव्या देत होता. निश्चितपणे तो कोल्ह्याविषयी बोलत होता. त्यांच्यापैकी कोणालाच माहित नव्हते कि कोल्हा आत्ता निश्चितानंदाच्या तावडीत होता. गेनासेयराचाही नाईलाज होता. तो काही जादूगार नव्हता. त्याला खर्या जगाचे काही नियम पाळणे बंधनकारक होते. त्याच्या गणितात एक चूक होती कि कोल्ह्यावर त्या भूल दिल्याचा विचित्र परिणाम झाला होता आणि त्याची अटकळ कि नैसर्गिक ओढीने कोल्हा वेळेत जॉनीकडे धाव घेईल ती खोटी ठरली होती. जॉनी आधी लाच्या क्रियेने आणि नंतर दिलेल्या नशेने बेशुद्ध पडून होता आणि त्याचे कनेक्शन तुटले होते. आता खूप उशीर झाला होता.
"xxxx आता हे पुस्तक मी उघडणारच! सालं आहे काय या पुस्तकात असं?"
लाच्या थांबण्याच्या इशार्याकडे साफ दुर्लक्ष करीत जॉनीने त्या पुस्तकातले एक कुठले तरी पान उघडले आणि तत्क्षणी तिथे उपस्थित असलेले सर्व प्रचंड ताकदीने जॉनीच्या दिशेने खेचले जाऊ लागले. जॉनीची धुंदी खाडकन उतरली. त्याने भयचकित होऊन पुस्तक हवेत भिरकावले. त्याच अपेक्षित परिणाम मात्र झाला नाही. उलट जॉनी अधांतरी तरंगू लागला. प्रज्ञा घाबरून ओरडली. जॉनी हळू हळू त्या पुस्तकात शिरत होता. इतरांचीही लवकरच तीच गत होणार होती. नेमक्या त्या क्षणी तो कोल्हा निश्चितानंदाचे चाबकाचे फटके खात होता. आता खूप उशीर झाला होता. ला आणि तिच्या पाठोपाठ प्रज्ञा पुस्तकात खेचल्या गेल्या. हे पाहून सायरसने दात ओठ खाऊन प्रवाहाच्या दिशेने उडी मारली आणि बघता बघता तो ही दिसेनासा झाला. हे बघून आलोकने कुणालला एक लाथ मारली आणि जाधवांना इशारा केला. त्यांनीही बुसुली व रिपोर्टरवर तोच प्रयोग केला पण किलरने लाथ चुकवली. रेश्मा व अल्बर्ट आसपासच्या वस्तुंना धरून टिकून राहिले. आलोक व जाधव दिसेनासे झाल्यावर किलर आत शिरला पण शिरता शिरता त्याने काही क्षण पुस्तकाच्या कडांना धरले. तो तोंडातली सिगारेट फेकत जोरात ओरडला "अरे पोर्टल बंद होऊ देऊ नका, तेवढ्यासाठी तुम्हाला लाथा घातल्यात त्यांनी."
त्या पुस्तकाची उघडं राहण्याची मुदत संपली आणि ते तसेच्या तसे खाली पडले. किमान त्याचे आकर्षण बल थांबले. रेश्मा आणि अल्बर्ट थरथरत होते. बुसुली, कुणाल आणि रिपोर्टर एकमेकांकडे बघत होते.
"किलर जाणे अपेक्षित नव्हते ना?" किलरने स्वतःची मूव्ह करून सगळ्यांना गोंधळात टाकले होते.
~*~*~*~*~*~
आत शिरल्यानंतरही ते गरगर फिरतच होते. जणू एका प्रचंड अशा चक्रीवादळात ते सापडले होते. हे चक्रीवादळ कधी थांबणार होते, ते त्यांना कुठे नेऊन सोडणार होते कोणाला ठाऊक नव्हते. ला ला अचानक आठवण झाली, नव्हे ती भानावर आली. गेनासेयराने सांगितलेले तिला सर्व क्षणार्धात आठवले. तिला हे माहित नव्हते कि गेनासेयराने अगदी तेच आणि शब्दशः तेच कित्येक शतकांपूर्वी गोरोला सांगितले होते.
०००
"ऐक तर. पुस्तकात गेल्यानंतर तुम्हाला आधी एका वादळाचा सामना करावा लागेल. खरे म्हटले तर ते वादळ नाही तर एक मोठा प्रवाह आहे. तुम्ही जसे त्या प्रवाहात वाहता तसे पुस्तक तुमचा सर्व डेटा... अर्र, माहिती गोळा करते. हे करण्यामागे एक आणखी उद्देश्य असतो, तुम्ही वारसाबरोबर आहात का? आता माणसे एकमेकांसारखी असू शकतात. उदा. दोन कबिल्यांच्या सरदारांची पुस्तकाने गोळा केलेली माहिती थोडी फार सिमिलर असु शकते. त्यामुळे कधी कधी पुस्तकाला हे सर्व टेस्ट करायला वेळ लागू शकतो किंवा अनेक जण एकत्र पुस्तकात घुसत असतील तर देखील वेळ लागू शकतो. तुला याच गोष्टीचा फायदा उठवायचा आहे. तू आणि इलेगुआ भाऊ आहात तर इलेलगी इलेगुआची सख्खी बहिण आहे. इतका जवळपास समान वाटणारा माहितीचा नमुना या काय कुठल्याच पुस्तकाने पाहिला नाहीये. इलेगुआ ज्या अपेक्षेने आत जाईल कि लगेच तो वारस म्हणून ओळखला जाईल आणि पुस्तकातला रूट त्याला आत घेईल ती फोल ठरेल कारण पुस्तक वेळ घेईल. जेव्हा तो असा गोंधळलेला असेल तेव्हा तू काय करशील?"
"उम्म, इलेगुआवर हल्ला करून इलेलगीला माझ्या ताब्यात घेईन आणि ..."
"मूर्ख आहेस तू! तू भलेही इलेलगीला परत मिळवशील पण तात्पुरताच! एकदा पुस्तकाने इलेगुआला त्याचा मालक म्हणून ओळखले कि तो तुझ्याबरोबर त्या पुस्तकात काहीही करू शकतो. आता मी सांगतो ते नीट ऐक. जेव्हा इलेगुआ गोंधळेल आणि चिडचिड करेल कि एवढा वेळ का लागतो आहे तू लगेच म्हण कि मला नाही माहित मी कोण आहे."
"काऽऽऽय???"
"हां. किंवा असं म्हण कि मी विसरलोय मी कोण आहे. किंवा अजून काही तत्सम. फक्त त्या वाक्यातून एवढे स्पष्ट होऊ दे कि तू तुझी ओळख विसरला आहेस."
"पण मी गोरो आहे. मला माहित आहे कि मी कोण आहे, मी इथे कशाला आलोय..." गोरो अजूनच गोंधळला.
गेनासेयराने त्याला या बदल्यात अतीव तुच्छतादर्शक भाव दाखवले. तो एक निश्वास टाकत म्हणाला "तुला हे कळू शकले असते तर किती छान झाले असते. मी सांगतो आहे तेवढे कर म्हणजे झालं."
"पण त्याने काय होईल?"
"अरे पुस्तकाला त्याची चाचणी पूर्ण करता येणार नाही. त्यामुळे तुला किमान रूटसमोर तुझी ओळख पटवण्याची संधि मिळेल अन्यथा इलेगुआ तुला पुस्तकातून बाहेर पडण्याची परीक्षा द्यायला लावेल."
"पण हा रूट कोण आहे?"
गेनासेयरा त्यावर हसला. "ते फारसं महत्त्वाचं नाही. तुला तिथे पोचल्यावर कळेलच. तिथे गेल्यावर......"
०००
इतके सगळे लोक एकत्र कधीच पुस्तकाने एकत्र आत घेतले नसावेत. त्यामुळेही त्याचा गोंधळ वाढला असावा. तसंही जॉनीला काहीच माहित नसल्याने आणि पद्धतशीररित्या इलेगुआकडून पुस्तकाची मालकी जॉनीकडे न गेल्याने अजून मूळ प्रत जॉनीला मालक म्हणून ओळखत नाही. त्यामुळे गेनासेयरा म्हणत होता तसे आम्हाला पुष्कळ वेळ लागत आहे. त्यामुळे आताच संधि आहे....
"..... आमच्यापैकी कोणाला माहित नाही आम्ही कोण आहोत, कुठे आहोत."
ला दचकून त्या दिशेने बघू लागली. सायरसला हे कसं काय माहित? गेनासेयराशी संपर्क प्रस्थापित केला असताना झालेले बोलणे त्याने ऐकले होते कि काय? नाही, आता सायरस रूट जो कोण आहे तिथे जाईल. लाची चिंता अगदीच निरर्थक नव्हती पण पुढे जे काही घडले त्याने ला आणि पर्यायाने गेनासेयराच्या प्रयोगाच्या अपेक्षित परिणामांना पूर्णपणे सुरुंग लावला.
"Unexpected voice command input. Inconclusive matching signature and invalid interrupt request. Evaluating environment variables, restoring task state. Execute intro_situation7384593863."
सायरसलाही आता काहीतरी घोळ झाल्याचे लक्षात आले. त्याने असे काहीतरी होईल याची अपेक्षा केली नव्हती.
"तुम्ही सर्व जे कोणी असाल, तुमच्या बरोबर वारस आहे हे नक्की कारण एक फेंट मॅच आहे खरा. पण आता या विचित्र कमांडने गोंधळ घातला आहे. त्यामुळे आता वारस म्हणून आणखी एकाला चाचणी घेता येईल. हे सर्व काय आहे हे विचारून तुमचे डोके शिणवू नका. तुम्हा सर्वांचे नशीब उत्तम असल्याने या परिस्थितीत इतर अनेक शक्यतांपैकी कोअरने ही शक्यता निवडली अन्यथा तुम्ही इन्फायनाईट लूप मध्येही जाऊ शकला असतात. आता वारस निवडला जाईपर्यंत तुम्हाला फ्लो मधून मुक्त करण्यात येईल. त्यानंतर तुम्हाला कोणत्या प्रकारच्या परीक्षेला सामोरे जावे लागेल हा वारसाचा निर्णय असेल."
फ्लोचा करंट अचानक अधिक वेगवान झाला आणि सर्व इतस्ततः विखुरले.
~*~*~*~*~*~
गेनासेयराने त्याच्या नेहमीच्या पद्धती वापरून फ्लो मधून सुटका करून घेतली. तो आत आला होता खरा पण यावेळी परिस्थिती वेगळी होती. पूर्वी तो जेव्हा जेव्हा इथे आला होता तेव्हा तेव्हा त्याला पुस्तकाचा मालक कोण आहे हे ठाऊक होते. गरज पडली तर तो त्या मालकाची मदत घेऊन सुटू शकत होता पण आता गडबड मोठी होती. त्याला अनपेक्षित असा बदल झाल्याने वारस बदलला जाऊ शकत होता. त्याच्या विषयी नको तितकी माहिती या वारसाकडे असणार होती. ही रिस्क होती पण ती घेणे आवश्यक होते कारण इथून पुढे त्याला परत कधीच पुस्तक अॅक्सेसही करता येईल का अशी परिस्थिती उद्भवू शकत होती. तो कोअरचे इंटर्नल मेसेजेस ट्रॅप करू लागला आणि त्याला नेमका नको असलेला मेसेज त्याने ऐकला.
"Account Setup Complete!"
०००
आणखी थोडा वेळ गरगर फिरल्यानंतर पुस्तकात शिरलेले ते तिघे त्याच ठिकाणी आले जिथे कित्येक शतकांपूर्वी इलेगुआ आला होता. प्रत्येकाच्या डोळ्यासमोर वेगवेगळ्या लिपीत, भाषांत 'वेलकम' या अर्थाची अक्षरे झळकली. मग सतत त्यांच्या अवतीभोवतीचे दृश्य बदलू लागले. कधी समुद्र, कधी फुले, फुले सुद्धा वेगवेगळी! काही काही तर कधी नाही पाहिली अशी! त्यांनी हात फिरवला तर ते दृश्य रिअॅक्ट करत होते पण ते खरे नव्हते याची जाणीवही करून देत होते.
"आपण कुठे आलो आहोत? कोणाला काही कल्पना?" जाधवांनी किलरकडे एक नजर टाकत सर्वात आधी प्रश्न केला.
कोणाकडेच याचे उत्तर नव्हते. त्या जागेला ना प्रवेशद्वार होते ना बाहेर जाण्याचा रस्ता! प्रत्येकासाठी तो नवीन अनुभव होता. युरुगुचे पुस्तक इतके शांत आणि सुंदर असेल अशी कल्पना त्यांनी नक्केच केली नव्हती. अर्थात सर्वांना हे पक्के ठाऊक होते कि ही सुंदर दृश्ये आभासी आहेत. हात लावताच जशी पाण्यातील प्रतिमा फिस्कटते तशीच ही दृश्येही फिस्कटत होती.
"लाईव्ह वॉलपेपर!" आलोक अचानक उद्गारला. "हे सर्व एखाद्या लाईव्ह वॉलपेपर सारखं आहे. लाईव्ह, एव्हर चेंजिंग वॉलपेपर!"
किलरने त्याला अनुमोदन दिले. "गुड जॉब! मला वाटलं होतं तितका काही तू युजलेस नाही."
जाधवांनी अचानक पुढे येत त्याला किंचित मागे ढकलले. राग व्यक्त करण्याची पद्धत होती ती.
"जर आपले ठरले होते कि तू बाहेर राहणार तर मग तू का आत आलास?"
"आपले ठरले होते?" किलरने दात विचकले. "काय बोलताय तुम्ही सर? मी असं काहीतरी बोललो होतो का?"
"सर" आलोकने जाधवांना शांत करण्याचा प्रयत्न करत म्हटले. "सर, तसेही आपण असे काहीतरी होऊ शकेल गृहीत धरले होतेच ना! हाच तर याचा प्लॅन होता ना कि एकमेकांची मदत करायची. पुस्तक आपल्या ताब्यात राहील आणि जॉनी यांच्या ताब्यात."
"हो पण, त्याला मी कबूल झालो कारण आत जाऊन आपण जॉनीची मालकी कॅन्सल करणार होतो. त्यासाठी हा आत आलेला कसं चालेल?"
किलरने एक भुवई उंचावली. त्याच्या चेहर्यावर स्पष्ट भाव होते कि चिडायला कोणी पाहिजे आणि भडकलं कोण आहे. अजून काही वादावादी होणार इतक्यात कोणीतरी तिथे आले असल्याची जाणीव त्या तिघांना झाली.
"तुमच्या बरोबर माझा अखेरचा प्रवास करायला एकंदरीत बरीच मजा येणार असं दिसतंय. नाईस टू मीट यू"
"पण तू कोण आहेस?"
"मी?" हसण्यापुरते त्याचे ओठ विलग झाले. "मी इलेगुआ!!"
०००
"हॅलो डॉक, मी कुणाल बोलतोय. बुसुलीने प्रायमरी स्टेप्स सगळ्या केल्यात. तुम्ही आणि मोदिबो तिकडून बुसुलीचा स्टॅमिना टिकवण्यासाठी जे काही करायला लागेल ते करायला सुरुवात करा."
उघडलेले पुस्तक, तो युरुगुच्या जगात नेणारा मार्ग बंद झाला तर काय होईल आणि काय नाही हे सांगता येणे कठीण होते. त्यामुळे ही कल्पना नाडकर्णींनी सुचवली होती कि पोर्टल उघडे ठेवायचे. जेणेकरून वेळ पडल्यास तिथून निसटता येईल. तसेही कोणी काहीच सांगू शकत नव्हते कि काय होईल आणि काय नाही. त्यामुळे शक्य तितकी खबरदारी घेणे ही लॉजिकल स्टेप होती.
रिपोर्टर, अल्बर्ट आणि रेश्मा शांतपणे त्या दोघांकडे पाहत होते. त्या तिघांनाही पोर्टल उघडे राहिलेले हवेच होते. रिपोर्टरचा प्रश्नच नव्हता आणि अल्बर्ट आणि रेश्माकडे यांच्या कलाने घेण्याखेरीज पर्याय नव्हता. त्यांना काय करायचे, काय होईल माहिती थोडेच होते. गपचूप बसून होते ते देखील! अचानक रेश्मा किंचाळली.
"ते, ते मला न्यायला आलेत. अल्बर्ट, अल्बर्ट बघ ते मला ओढतायेत. ते बघ तो स्कालपेल उचलला त्याने...."
अल्बर्टला काही कळेना. स्कालपेल रेश्माने स्वतःच उचलून धरला होता. हा गोंधळ मिटण्याआधीच अचानक रेश्माने स्कालपेलने स्वतःचाच गळा चिरला. २-३ आचके देत तिचे निष्प्राण शरीर जमिनीवर पडले. पाव मिनिटभर तिथे स्मशान शांतता होती. नाडकर्णींचा मधून येणारा हॅलो वगळता काही ऐकू येत नव्हते. अल्बर्ट भानावर येत जोरात ओरडला.
"हे काय आहे? रेश्मा, रेश्मा का?"
"आत काहीतरी चूक झाली असणार." बुसुली शांतपणे उत्तरला. त्याने असे कित्येक मृत्यु पाहिले, ऐकले असल्याने त्याला विशेष धक्का बसला नव्हता. "मूळात युरुगुचे पुस्तक वाचणारे लोक मरण्याचे कारण हेच आहे. पुस्तक त्यांना मालक वा परवानगी नसताना आत घुसण्याचा प्रयत्न केल्याची शिक्षा देते. इथे आपण अनेक जण आत घुसत होतो, जॉनीकडून वारस असल्याची ओळख पटवताना काहीतरी गडबड झाली असावी किंवा अजूनही कित्येक शक्यता आहेत. त्यामुळे पुस्तक एक बळी तर घेणारच! इट जस्ट हॅपन्ड टू बी हर!"
बुसुलीचा तो कॅज्युअल स्वर ऐकून अल्बर्टचे डोके फिरले. त्याने जवळचे एक स्टूल उचलून बुसुलीवर फेकून मारले.
"हे तू काय करतोयस?"
"जर माझी रेश्मा या लोकांच्या गडबडीने गेली तर मग त्यांना हा सेफ पॅसेज का?"
"अरे पण सायरस देखील आत आहे. तुझा बॉस आत आहे."
"असू दे. आय डोन्ट गिव्ह अ डॅम एनीमोअर. आता हे पुस्तक बंद होऊनच राहणार." असे म्हणत त्याने मध्ये उभ्या राहिलेल्या रिपोर्टरला एका हाताने झुगारून दिले.
"बुसुली. मला वाटतं याला आवरायला २ जण किमान लागतील आणि कुणाल त्या २ पैकी एक नक्कीच असू शकत नाही."
बुसुलीने आवंढा गिळला. तो स्वतःला सावरत म्हणाला "कुणाल, प्रयत्न कर ते पुस्तक बंद होणार नाही. त्याच्या बंद होण्याचा वेग कमी करण्यात मी यशस्वी झालो होतो त्यामुळे ते लगेच काही बंद होणार नाही पण तो वेग परत वाढू पण शकतो. मला माहित आहे तुझे शरीर माझ्या इतके इफेक्टिवली काम करणार नाही आणि मोदिबो तुझा स्टॅमिना फार काळ टिकवू शकणार नाही पण प्रयत्न करणे आपल्या हातात आहे."
कुणालने मान डोलावत बुसुलीची जागा घेतली. बुसुलीने फोन हातात घेतला "नाडकर्णी, तुम्ही कुणालचा स्टॅमिना टिकवणार आहात. मोदिबोला कल्पना द्या म्हणजे ती योग्य ते बदल करेल."
"अरे पण... ते कितपत काम करेल?"
समोर उभ्या असलेल्या अल्बर्टच्या डोळ्यातली खुनशी झाक बघून बुसुली १ क्षण स्तब्ध राहिला. रिपोर्टरने अल्बर्ट काही करण्याच्या आत त्याला पोटाशी धरून बेसमेंटच्या जिन्यावरून वर ढकलले.
"आपल्याकडे त्याच्यावर विचार करायला वेळ नाही आहे. वी हॅव गॉट अ मॅड मॅन हिअर!" त्याने फोन खाली टाकला आणि रिपोर्टरच्या मदतीला धाव घेतली.
०००
सायरसने पुन्हा एकदा ला ला दूर ढकलले. ती तरीही पुन्हा एकदा त्याच्यावर चालून गेली. यावर सायरसचा प्रतिसाद एक सणसणीत थोबाडीत लावण्याचा होता. लाच्या ओठातून रक्त आले होते. सायरसने चिडून नजर इकडे तिकडे फिरवून शांत राहण्याचा प्रयत्न केला पण त्याचा संयम संपला. तो जोरात खाली पडलेल्या ला पाशी गेला आणि त्याने दात ओठ खाऊन तिच्या पोटात लाथ मारली. एक दोन दीर्घ श्वास घेत त्याने पुन्हा एकदा शांत होण्याचा प्रयत्न केला पण लाच्या विव्हळण्याच्या आवाजाने त्याचे डोके पुन्हा फिरले आणि त्याने अजून २ लाथा एका पाठोपाठ घातल्या. मग तिचे केस पकडून तिला फरफटत दूर भिरकावले. त्याच्या चेहर्यावर प्रचंड राग दिसत होता.
"शिट. या ठिकाणाला, खोलीला काही सीमा आहेत का नाही? हिला नजरेसमोर दूरही करता येत नाहीये."
"तेच मलाही करायचंय." ला कण्हत म्हणाली.
"तुझ्यामुळे किती मोठा घोळ झालाय तुला कळतंय का? आणि तुला कसं कळलं कि रुटपर्यंत कसं पोहोचायचं?"
सायरसने एक सुस्कारा सोडला. "तुझं आणि त्या गेनासेयराचं बोलणं थोडं फार रेश्माने चोरून ऐकलं आणि मला येऊन सांगितलं. आफ्टर दॅट इट वॉज नॉट डिफिकल्ट टू फिगर ऑट दॅट धिस थिंग फंक्शन्स लाईक अ कंप्यूटर!"
"कंप्यूटर?"
सायरसने तुच्छतेने हूं केले. "तुला काय कळणार? हे सगळं जे तो तुझ्याकडून करवून घेत होता ते एकप्रकारे फॉरगॉट पासवर्ड किंवा लॉस्ट पासवर्ड, फॉरगॉट आयडी या प्रकारचं आहे. आता इथे रिकव्हरीचा एकच ऑप्शन असू शकतो या संगणकरुपी जगाचा कोणीतरी अॅडमिनिस्ट्रेटर असेलच. तोच तुझा रूट दिसतोय. माझा इरादा होता कि आपण तिथे पोहोचून या पुस्तकाची मालकी मिळवावी. तसेही दुसरा कुठला मार्ग नाही हे करण्यासाठी त्यामुळे मी चान्स घ्यायचा ठरवला. पण हे सांगून तुला काय उपयोग? आता ते शक्य नाही आणि तुला काही कळणार पण नाही मी काय बोलत होतो."
"नाही." ला अचानक मोठ्याने म्हणाली. "नाही मला सगळं कळतंय. मला तू आत्ता जे काही बोललास ते सर्वच्या सर्व कळलं. पण का? आय मीन कसं? आणि मी ही भाषा कशी काय बोलू शकते?"
"फ्लो मधून गेल्यानंतर पुस्तक जसं तुमचा डेटा अॅबसॉर्ब करते तसं तुम्हालाही काही डेटाला अॅक्सेस मिळतो."
एक मनुष्य त्यांच्या दिशेने देव जाणे कुठून चालत येत होता.
"तुझा तर्क बरोबर आहे. आणि तू.." तो लाकडे वळत म्हणाला "गेनासेयराने वापरलेला लेटेस्ट मोहरा! असो. हे बरोबर आहे कि हे संगणकासारखं काम करतं पण संगणकापेक्षा यात काही जास्तीच्या गोष्टी देखील आहेत. म्हणून तर हे युरुगुचे पुस्तक आहे."
ला आणि सायरस भांबावून त्या नव्या पुरुषाकडे आणि एकमेकांकडे आळीपाळीने बघू लागले.
"पण तू कोण आहेस? आमच्या बरोबर काय करणार आहेस?"
तो जोरात हसला. "तुम्हाला माझी गोष्ट सांगितली गेली आहे ना? हां म्हणा तुम्ही चेहरा नाही पाहिला कधीच माझा. माझं नाव गोरो!"
गोरो कोण आहे हे ध्यानात आल्यानंतर दोघांनाही धक्का बसला. गोरोची भेट इथे का घडत आहे? तो तर कित्येक शतकांपूर्वी मेला ना. मग हा......
"विचार नंतर करा. डोक्याला उगाच ताण देऊ नका. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी प्रवासात देईन. तसेही तुम्ही खूप नशीबवान आहात. वारस तुम्हा लोकांवर फारच खूश आहे बहुतेक. सहीसलामत सुटाल तुम्ही बहुधा आणि माझीही कदाचित सुटका होईल."
"म्हणजे वारस निवडला गेला?"
गोरोने स्मित केले. "हो. नवा वारस आहे........."
०००
प्रज्ञासमोरचे दार सर्रकन बाजूला झाले. ऑटोमॅटिक डोअर, ती स्वतःशीच पुटपुटली. त्या खोलीत एक प्रकारची जादू होती. खूपच रिलॅक्सिंग वातावरण होते त्या ठिकाणी. प्रज्ञाला आवडणार्या कॉफीचा वासही हवेत भरून राहिला होता. समोरच दोन छोटी स्टूले होती. प्रज्ञाला कायमच खुर्च्यांपेक्षा स्टूल बसायला अधिक आवडे. ती एका स्टूलावर जाऊन बसली. समोर एक टीव्ही होता त्यावर निश्चितानंदाच्या श्रुगालमेध यज्ञाच्या ज्या क्षणी काळ थांबला ते चित्र दिसत होते. प्रज्ञाने त्यातला कोल्हा नोटिस केला. हा कोल्हा.....?
"कॉफी?" तिने आवाजाच्या दिशेने पाहिले. एक पाठमोरी व्यक्ति कॉफी बनवत होती. त्या व्यक्तिने प्रज्ञाकडे असलेल्या एका टीशर्टसारखाच टीशर्ट घातला होता, इन फॅक्ट तो टीशर्ट प्रज्ञाचा खूप आवडता होता.
"नेहमीप्रमाणे २ चमचे साखर, दूध घालून आणि स्ट्राँग, फिल्टर कॉफी!"
माझ्याविषयी एवढी माहिती? पुस्तकाने माझी अख्खी कुंडली काढली कि काय?
ती व्यक्ति हातात कॉफीचे दोन कप घेऊन पुढे आली. त्या २ स्टूलांच्या मध्ये एक छोटेसे टेबल आले. तिने ते दोन्ही कप तिथे ठेवले आणि दुसर्या स्टूलावर बसली.
"सो नाईस टू मीट यू प्रज्ञा"
प्रज्ञाला आता त्या व्यक्तिचा चेहरा नीट पाहायला मिळाला. तिच्या चेहर्यावर असलेल्या शांतपणाची जागा आश्चर्याने घेतली.
"तू, तू म्हणजे....... म्हणजे मी....... म्हणजे कसं शक्य आहे? तू कोण आहेस?"
त्या व्यक्तिच्या चेहर्यावर एक मंद स्मित होते. काही क्षण आपल्या पावलांकडे नजर फिरवून तिने जणू त्या परिस्थितीची मजा घेतली.
"सॉरी माझी ओळख नाहीच करून दिली मी. मी रुट, वन्स अगेन नाईस टू मीट यू प्रज्ञा!"
~*~*~*~*~*~
(पुढील भागात समाप्त)
अंतिम भाग येथे वाचू शकता - http://www.maayboli.com/node/57229
अरे वा आला नविन भाग
अरे वा
आला नविन भाग
अप्रतिम!
अप्रतिम!
रूट कोण असेल ह्याचा या अंदाज
रूट कोण असेल ह्याचा या अंदाज बांधला आहे! पुभाप्र प्र..
जबरी... सगळीच गंम्मत....
जबरी... सगळीच गंम्मत....
मॅट्रीक्स टाईप झालय काही तरी.. नीट बांधेसूद पटकथा झाली तर जबरी सायफाय पिक्चर होईल..
जबरदस्त.... आता शेवटचा भाग
जबरदस्त.... आता शेवटचा भाग लवकर येऊ दे.
नीट बांधेसूद पटकथा झाली तर
नीट बांधेसूद पटकथा झाली तर जबरी सायफाय पिक्चर होईल..>>> +१००
मस्त! आता अंतिम भाग लवकर
मस्त! आता अंतिम भाग लवकर पोस्ट करा.
शप्पथ भुंगा लागला ह्या
शप्पथ भुंगा लागला ह्या भागात!
पण मज्ज आली!
पायस, तुझ्या सगळ्या गडबडीत सुद्धा कथेची गुढता कुठेही लोपू दिली नाहीस ह्याबद्दल कौतुक आणि आभार!
अनिरूद्ध
अनिरूद्ध
सर्वांना धन्यवाद अखेरचा भाग
सर्वांना धन्यवाद अखेरचा भाग या विकांतापर्यंत येईल (आणि मग मी आणि तुम्ही सर्व 'संपलं एकदाचं' म्हणायला मोकळे :फिदी:)
मस्त
मस्त
नवा भाग १० जानेवारी ला ताकनार
नवा भाग १० जानेवारी ला ताकनार होतात ना???? काय झाल???
१० january २०१७
१० january २०१७
पायस! काय रे !!!
पायस!
काय रे !!!