आतापर्यंत आपण काय काय वाचलेत? (रिकॅप)
अनेक वर्षांपूर्वी डोगोन जमातीच्या एका कबिल्याचा राजकुमार इलेगुआ अनवधानाने प्रतिबंधित असलेल्या युरुगु नावाच्या शक्तिची उपासना करतो आणि कबिल्यातून हाकलला जातो. त्याची भेट गेनासेयरा नावाच्या रहस्यमय व्यक्तिशी होते आणि तो युरुगुचे पुस्तक नावाच्या एका अत्यंत रहस्यमय दुनियेत प्रवेश करतो.
वर्तमानात या इलेगुआने बनवलेले पुस्तकरुपी प्रवेशद्वार चुकीच्या हातात (ला आणि नोम्मो) पडल्यामुळे ते मुंबईत येते आणि त्याच्यामागोमाग त्याचा या पिढीतील संरक्षक बुसुली देखील मुंबईत येऊन थडकतो. अनिरुद्ध नावाचा तरुण या शक्तिचा पहिला बळी ठरतो आणि त्याच्या खूनाचे रहस्य उलगडण्याच्या नादात त्याच्या बहिणीची मैत्रिण, एक हौशी गुप्तहेर प्रज्ञा या प्रकरणाशी जोडली जाते. त्याच बरोबर इन्स्पेक्टर महेश जाधव आणि इन्स्पेक्टर शिंदे देखील या खूनाच्या तपास करता करता या शक्तिच्या संपर्कात येतात. अनेक वर्षांपूर्वी या शक्तिचा प्रताप अनुभवलेले डॉ. गंगाधर नाडकर्णी आणि त्यांचा विद्यार्थी कुणाल, प्रज्ञाचा एक मित्र, देखील जोडले जातात. या शक्तिच्या चमत्कारांच्या बातम्यांचा फायदा उठवून याच सुमारास निश्चितानंद नावाचा भोंदू साधू आपली पोळी भाजू बघत आहे. पण याखेरीज दोन महत्त्वाचे खेळाडू या खेळात आहेत. किलर, रसूल नावाच्या गँगस्टरचा उजवा हात हे शोधून काढतो कि जॉनी नावाचा जुगारी काहीतरी चमत्कारिक शक्ति बाळगून आहे. जॉनीलाही अजून नीट ठाऊक नाही कि तो युरुगुच्या पुस्तकाचा नवा मालक म्हणून निवडला गेला आहे. किलर व रसूल जॉनीला वापरत आहेत पण जॉनीकडून पुस्तक परत मिळवण्यासाठी लाने एक चाल खेळली आहे. आणि या सर्वांपासून आतापर्यंत अज्ञात होता तो सायरस! डॉ. सायरस नामांकित शल्यविशारद असला तरी आतून विकृत प्रवृत्तीचा मनुष्य आहे. याला त्याचे विचित्र परिस्थितीत गेलेले बालपण कारणीभूत आहे. मुंबईला सतावणारा नरभक्षक खूनी तोच आहे. ला आणि नोम्मोने सायरसशी हातमिळवणी केल्यामुळे आता सायरसलादेखील या पुस्तकाविषयी माहिती झाली आहे. सायरसला आता जॉनीकडून पुस्तकाची मालकी मिळवायची आहे. या सर्वांना आपली नायिका प्रज्ञा व तिचे मित्र रोखू शकतील का?
पूर्वसूत्र इथे वाचू शकता - http://www.maayboli.com/node/55257
रेश्मा आणि अल्बर्ट अॅम्ब्युलन्स घेऊन बाहेर पडले. आज त्यांना जॉनीला घेऊन त्यांच्या ठिकाणी हलवायचे होते. सायरसने त्यांना स्पष्ट शब्दात सूचना दिल्या होत्या कि काहीही झाले तरी आता जॉनी आपल्या ताब्यात आलाच पाहिजे. किलरने जॉनीला हॉस्पिटलमध्ये हलवण्यास स्पष्ट नकार दिला होता. रसूल किलरच्या शब्दाबाहेर नसल्याचे अल्बर्टच्या नजरेतून सुटले नाही. त्यामुळे त्याने रेश्माला वाद घालण्याची संधी न देता आपण गरज पडल्यास रोज येऊ असे वचन दिले होते. त्यावेळी रसूलने त्यांना जाऊ दिले असले तरी तो डॉक्टर बदलणारच नाही याची खात्री नव्हती. त्यामुळे अल्बर्टने आज काहीही झाले तरी जॉनीला उचलायचेच असा निर्धार केला होता. रेश्मा दातकोरणीने मांसाचे अडकलेले बारीक तुकडे काढण्याचा प्रयत्न करीत होती. अल्बर्टने मनातल्या मनात म्हटले कि बाई तू जरा निवांत घे. दोघांमध्ये रेश्मा अधिक खूनशी दिसत असली तरी प्रत्यक्षात अल्बर्ट अधिक क्रूर होता. फक्त तो पटकन चिडत नसे. त्यामुळे सायरसच्या योजनांना थंड डोक्याने पार पाडण्याची जबाबदारी अप्रत्यक्षपणे त्याच्यावरच येई ज्यात रेश्माच्या रागाला आवर घालणे हाही एक भाग असे. दोघेही कदाचित आपापल्या स्वभावाचा भाग म्हणून किंवा कामाचे स्वरुप बघता इतर गोष्टींचा विचार करत नव्हते अन्यथा त्यांना हे समजल्याशिवाय राहिले नसते कि एक अॅक्टिव्हा आणि एक पल्सार त्यांच्या मागावर आहेत.
******
"काहीही!!" जाधव उद्गारले.
काल रात्रीची मीटिंग स्पेशल होती. इन्स्पेक्टर शिंदे या मीटिंगला हजर राहू शकले नव्हते कारण निश्चितानंदाच्या लीला सुरु झाल्या होत्या. त्या कोल्ह्यावर कसले कसले उपचार तो करत होता. मध्येच जमलेल्या गर्दीबरोबर नाचत काय होता, त्या कोल्ह्याला चाबकाने फटकारेच मारत होता. पण तो कोल्हा जणू ट्रान्स मध्ये गेला होता. त्याच्यावर या सर्वाचा काहीच परिणाम होत नव्हता. निश्चितानंदला कोल्ह्याला नुसते मारायचे नव्हते. तो कोल्हा निश्चितानंदला घाबरला पाहिजे तर तो सैतानी आणि निश्चितानंद दैवी हे सिद्ध होणार. जसे दुष्ट शक्ति दैवी चिन्हांना हात देखील लावू शकत नाही तसे काहीसे! यामुळे एक्स्ट्रॉ फोर्स वगैरे नाटके होती आणि जाधवांना केस सोडून इथे लक्ष घालण्यात अजिबात रस नव्हता. शेवटी शिंदेंनी यावर एक तोडगा काढला. जाधवांनी पूर्ण लक्ष केस वर द्यावे त्या बदल्यात जाधवांच्या फोर्सने शिंदेंचे ड्युटीच्या ठिकाणी ऐकावे. याने कामाचा व्याप वाढणार असला तरी इथे समजूतीने घेणे गरजेचे होते. जेव्हा प्रज्ञाने काढलेले निष्कर्ष त्यांनी ऐकले तेव्हा त्यांचा विश्वासच बसला नाही. तिथे आलोक उपस्थित राहिला नसता तर कदाचित बसलाही नसता. आलोकलाही पहिल्यांदा हे युरुगुपुराण ऐकल्यावर धक्काच बसला होता. पण दुसर्यांदा शांतपणे विचार केल्यावर त्यालाही असं काहीतरी घडतंय याची खात्री पटली. अजूनही सामान्य माणूस याच्यापासून दूर राहिला आहे हे मुंबईचे नशीब होते पण आता निर्णायक क्षण आला होता. जॉनी एक जुगारी होता तो पुस्तकाचा धड उपयोगही करत नव्हता. रसूलभाई फक्त आपली अंडरवर्ल्डवर मक्तेदारी प्रस्थापित करण्यासाठी याचा वापर करत होता आणि त्यालाही तो नीट करता येत नव्हता. सायरसची गोष्ट निराळी होती. सायरस या सर्वांशी जोडलेला होता म्हणजे काहीतरी गडबड होती. अजूनही या सर्वांना ही कल्पना आली नव्हती कि ला आणि नोम्मो सायरस बरोबर आहेत. पण तरीही एक अस्वस्थता सर्वांच्याच मनात होती.
"तुमच्या लक्षात येतंय का तुम्ही कोणावर आरोप लावताय?" जाधवांचा प्रश्न वैध होता.
"पण सर दुसरे काही स्पष्टीकरण असूच शकत नाही. आणि आपण हे अगदी सहज तपासू शकतो."
प्रज्ञा आणि आलोक तिच्या अॅक्टिव्हावर तर कुणाल व जाधव त्याच्या पल्सारवर आज हेच तपासायला निघाले होते. अखेर का? का डॉ. सायरसना रसूलची मदत करावीशी वाटली? जर त्यांना रसूलने धमकावले असेल तर त्यांची मदत करता येईल हाही एक विचार जाधवांच्या मनात होता. अॅम्ब्युलन्स आणि या दोन दुचाकी झपाझप मुख्य ट्रॅफिकमधून बाहेर पडल्या आणि इथून पुढचा पाठलागाचा टप्पा खडतर आहे हे त्या चौघांनाही लक्षात आले म्हणून त्यांनी आपला वेग वाढवला आणि गाड्या थोड्या आडबाजूने अॅम्ब्युलन्सच्या बाजूने घालून एका समांतर गल्लीत दामटल्या. त्या गल्लीत चालणार्या एका माणसाला चुकवताना त्यांची तशी कसोटीच लागली. त्या माणसाने आपल्याला कट मारून गेलेल्या त्या दोन दुचाक्यांकडे पाहिले आणि तो दोन सेकंद ट्रान्स मध्ये गेल्यासारखा झाला
"इलेगुआ लवकर आवर. ते कदाचित आजच तुझ्या क्षेत्रात प्रवेश करतील."
गेनासेयराने इलेगुआशी संपर्क साधला होता. तो मनात मात्र बेहद्द खूश होता. त्याच्या कल्पनेपेक्षाही हा प्रयोग यशस्वी होता.
*****
"काय झाले?" गोरोने विचारले. इलेगुआने हसून मान हलविली आणि आपली कथा पुढे सुरु ठेवली.
----------
"तो येत आहे" - गेनासेयरा.
इलेगुआने क्षणभर डोळे मिटले. आठवणीतला गोरो त्याने मनात आणला. गोरोने लहानपणी जरी अवहेलना सहन केली असली तरी त्याच्या शारीरिक क्षमतेबद्दल कधीच कोणाला शंका नव्हती. पण केवळ ताकद इथे पुरेशी ठरेल? नाही म्हटले तरी तो त्याच्याही नकळत अशा जगात प्रवेश करणार आहे जिथे त्याच्या आकलनापलीकडच्या गोष्टी आहेत. अशा वेळी काय करेल तो? आर्रर्रघ...
"आपण हे युद्ध का नाही तू आधी केले होतेस तसे.. ते काय म्हणाला होतास?"
"सिम्युलेट."
"हा सिम्युलेट का करू शकत नाही?"
गेनासेयराचे ओठ हसण्यापुरते विलग झाले. इलेगुआ समजायचे ते समजला, याला आपल्याला याबाबतीत मदत नाही करायची.
खरे म्हटले तर, गेनासेयराचे कारण इलेगुआच्या समजेच्या पलीकडचे होते. युरुगुचे पुस्तक एका मोठ्या संगणकाप्रमाणे काम करत होते. आता जर त्यातला सिम्युलेटर रन करायचा झाला तर गोरोचा डेटा पाहिजे. तो इलेगुआच्या स्मरणातून पुरेसा मिळत नव्हता. राजाच्या क्षमता वयाने कमजोर होणार होत्या त्यामुळे थोडा चुकीचा डेटा चालला असता. गोरोची ताकद उलट वाढली असती आणि गेनासेयराला चुकीचं सिम्युलेशन रन करायचे नव्हते.
"मग आता काय करणार आहेस?"
"सुरुवातीला तरी या युरुगुच्या नावाखाली गोळा झालेल्या मूर्खांना गोरोवर पाठवतो. गोरो कितीही ताकदवान असला तरी एकावेळीस किती जणांशी लढेल? २.... ३......५.....१०? अखेरीस तोही एक माणूस आहे. कधी ना कधी तो देखील मोडेलच. जर या क्रियेमुळे पुस्तक आणि डोगोन जंगले जोडली गेली नसती तर त्याच्याशी लढायची गरजही पडली नसती."
गेनासेयरा इलेगुआचे बारकाईने निरीक्षण करत होता. लहानपणी इलेगुआने गोरोबरोबर कोणता तरी असा प्रसंग अनुभवला असला पाहिजे ज्याचा त्याच्यावर इतका खोल परिणाम झाला आहे. इलेगुआ आपल्या माणसांना सूचना देत होता आणि गेनासेयरा गालातल्या गालात हसत होता. यावेळेस प्रयोग यशस्वी होणारच!
इकडे इलेगुआ सूचना देऊन त्या खास खोलीकडे बघत होता. त्या खोलीत एक पलंग होता आणि त्याच्या इलेलगी झोपलेली होती.
---------------
कोल्ह्याची कातडी पांघरून १० जण उभे होते. प्रत्येकजण भाल्यासारखे एक शस्त्र आणि जाड लाकडी ढाल घेऊन अगदी सुसज्ज होता. ही इलेगुआची पहिली संरक्षण फळी होती. त्याला काहीही करून त्याची क्रिया पूर्ण होईपर्यंत गोरोला रोखून धरायचे होते. त्यांना पूर्ण कल्पना होती कि ते यातून जख्मी न होता बाहेर येऊ शकणार नव्हते. पण त्यांना अजून कल्पना नव्हती कि पुढे काय होणार आहे. समोरच्या झाडीत हालचाल जाणवली.
माणसाची नजर एक गंमतीशीर गोष्ट असते. आपल्याला वाटते त्याच्यापेक्षा आपला नजरेचा टप्पा खूप वाईट असतो. अगदी साधे उदाहरण म्हणजे तुम्ही आरशापासून जसे जसे लांब जाता तसे तसे तुम्हाला वाटते कि तुमची प्रतिमा छोटी होत चालली आहे प्रत्यक्षात तिचा आकार तेवढाच राहिलेला असतो. लांबून एखादी व्यक्ती किती धिप्पाड आहे याचा अचूक अंदाज अनेकदा म्हणूनच लावता येत नाही. आणि जेव्हा एखादी धिप्पाड व्यक्ति तुमच्या पुढ्यात अचानक उडी मारून उभी राहते.......
................तेव्हा एलिमेंट ऑफ सरप्राईजची जोड मिळते आणि तुम्ही गडबडता.
मानवी सहज प्रवृत्तीने तुम्ही तुमचे बचावाचे हत्यार पुढे करता आणि भाल्याने त्या व्यक्तीला ढकलू बघता, जमल्यास भाला तिच्या अंगात घुसवू बघता. पण तुमच्या नजरेपुढे शेवटचे दृश्य राहते ते एक वीज चमकल्यासारखा भास!
.......................
गोरोचे मक्रक पूर्ण वक्राकार फिरून त्याच्या डाव्या खांद्यापेक्षा इंचभर अंतरावर थबकले. त्याच्या हातांची पकड मजबूत होती. त्याच्या चेहर्यावर ढालींतून उडालेल्या काही गवताच्या काड्या लागल्या होत्या आणि ठिकठिकाणी रक्ततुषार होते. प्रत्येकाच्या उंचीनुसार छाती ते गळा या भागात वेगवेगळ्या ठिकाणी एक सलग छेद होता. १० देह जमिनीवर काही क्षण उभे राहणार होते. भाल्यांचे तुकडे सर्व दिशांना फेकले गेले होते आणि १० शरीरांचे हिस्से हवेत त्यांच्या ढालींच्या तुकड्यांसकट काही क्षण तरंगणार होते. काळही जणू या शक्तिप्रदर्शनामुळे थबकला. पहिल्या फळीची वासलात लागली होती.
तो आला होता!!
~*~*~*~*~*~
किलर आणि रसूल समोर बसवलेल्या त्या चार जणांकडे बघत होते. त्या चौघांचे हात-पाय बांधलेले नव्हते कारण रसूलला तशी आवश्यकता वाटली नव्हती. नाही म्हणायला जाधवांचे सर्व्हिस रिव्हॉल्वर आणि प्रज्ञाच्या पर्समधली स्विस नाईफ तसेच तिखटाचा स्प्रे काढून घेतला होता, पण त्यापेक्षा देखील रसूलचा स्वतःच्या माणसांच्या क्षमतेवर असलेला विश्वास याच्यामागे होता. अर्थातच त्या चौघांपैकी फक्त जाधव शांत होते व इतर तिघे नाही म्हटले तरी थोडे नर्व्हस होते. किलर मात्र त्याने नुकतेच जे काही ऐकले आणि अनुभवले ते तर्काशी ताडून पाहत होता. नाही म्हटले तरी या लोकांमुळेच जॉनी पळवला गेला हे लवकर लक्षात आले होते.
"तर तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही जॉनीला शोधत होते आणि तुम्ही हे शोधून काढले कि डॉ. अल्बर्ट जॉनीवर उपचार करत आहेत. आणि आता तुमचे म्हणणे आहे कि जॉनीला पळवायचा डॉ. अल्बर्टचा आधीपासून इरादा होता." किलरने एक एक शब्द विचारपूर्वक उच्चारला. प्रज्ञाने हीच संधी साधली. तिने किलरला पूर्वी पाहिले होते. रसूल या सर्व गोष्टींकडे कसा रिअॅक्ट होईल हे कोणाला माहित नव्हते पण किलर कमीत कमी आपले म्हणणे ऐकून घेईल असे तिला वाटले. म्हणूनच कि काय थोड्यावेळापूर्वी घडलेल्या घटनांनंतरही ते अजून जिवंत होते.
******
अल्बर्ट आणि रेश्मा आल्या आल्या जॉनीची तपासणी करायला त्याच्या खोलीत शिरले. या चौघांची मात्र अशी सरळ आत शिरायची सोय नव्हती. ते कसे आत घुसता येईल याचा विचार करू लागले. काहीही करून जॉनीच्या खोलीत प्रवेश करायला हवा होता. शेवटी प्रज्ञा आणि आलोकने बाहेरच्या गुंडांचे लक्ष वेधून घ्यायचे ठरवले. ते दोघे अर्थातच फार अडथळा न येता पकडले गेले पण जाधव कुणालच्या मदतीने जॉनीच्या खोलीच्या दारापर्यंत पोचले. पण तिथे किलर त्यांची वाटच पाहत होता. तो या डिस्ट्रॅक्शनच्या सापळ्यात अडकला नव्हता. अर्थात त्या सर्वांना धक्का तेव्हा बसला जेव्हा किलरने दार उघडून आत डोकावले तर जॉनी, रेश्मा व अल्बर्ट गायब होते. या डॉक्टरांवर नजर ठेवायला आत असलेला माणूस मरून पडला होता. यानंतर प्रज्ञाने सुचवल्याप्रमाणे किमान या चौघांचे म्हणणे ऐकून घेणे फायदेशीर होते.
******
"ओके. आम्ही मुंबईतल्या गँग्स्टर्सचे एक एक करून पडत असलेल्या खूनांशी एका दुसर्या मार्गाने जोडले गेलो. आम्हाला हेही समजले कि रसूल गँगचा याच्याशी जवळचा संबंध आहे आणि सर्वात महत्त्वाचे आमच्या लक्षात जॉनीचे अस्तित्व आले. कसे ते सांगायची आत्ता जरुरी नाही. जॉनीला काहीतरी झालंय हे देखील आम्हाला समजले. मग आम्ही जॉनीवर उपचार करणार्या डॉक्टरचा माग घेतला. पहिल्यांदा आम्हाला वाटले कि तुम्ही डॉ. सायरस आणि त्यांच्या हाताखाली काम करणार्या डॉक्टर्सना धमकावत आहात. पण इथे येऊन बघतो तर काहीतरी वेगळंच घडतंय. डॉ. सायरस या सर्वांशी जोडलेले आहेत हे नक्की! पण मग कसे?"
रसूलने रागात आपल्या हातातला ग्लास भिंतीवर फेकला. त्या डॉक्टरने आपल्याला फसवावे!! त्याच्या अस्मितेला हा मोठा धक्का होता. किलरच्या कपाळावर आठ्यांचे जाळे होते. काही सेकंद कोणीच काही बोलले नाही. अखेर किलरने कोंडी फोडली. तो बोलत होता आणि बाकी सर्व ऐकत होते.
"..... आणि दॅट विल बी इट, अवर बेस्ट बेट इन करंट सिचुएशन! व्हॉट से जेन्टलमेन.... अॅन्ड लेडी" किलरने प्रज्ञाकडे बघत विचारले.
प्रज्ञाने नर्व्हसली जाधवांकडे पाहिले. कितीही म्हटले तरी त्यांच्या बाजूच्या सर्व बार्गनेनिंग चिप्स जाधवांच्याच हातात होत्या. जाधवांनी एक उसासा सोडला.
"आय हेट टू अॅडमिट इट. पण हो आम्हाला मान्य आहे."
रसूलचा किलरच्या डोक्यावर पूर्ण विश्वास होता. त्याने लगेच आपल्या माणसांना इशारा केला. किलरने एक सिगारेट पेटवली. त्यांच्याकडे आता काथ्याकूट करायला वेळ नव्हता. इट वॉज टाईम फॉर सम सीरियस अॅक्शन!
~*~*~*~*~*~
गोरो झाडी बाजूला सारत त्या मोकळ्या जागेत आला. एक छोटीशी झोपडी त्याच्यासमोर होती. आतून कसले कसले आवाज येत होते. इलेगुआ इथेच असला पाहिजे. तो पाऊल पुढे टाकणार इतक्यात त्याच्या सहाव्या इंद्रियाने त्याला इशारा केला. तो हलकेच आपल्या उजव्या बाजूला कलला, खरेतर मुद्दामून पडला. पण पडता पडता त्याने आपल्या उजव्या हातातले मक्रक वक्राकार फिरवले. उत्तम योद्धे काय, आजचे क्रिकेटर्स काय क्लिन स्विंग महत्त्वाचा का असतो तर तो सर्वाधिक परिणामकारक असतो....... जेव्हा तो कनेक्ट होतो. गोरो बघतच राहिला. हे काय चालू आहे? इथे नक्की कोणीतरी होतं, मला इतके स्पर्शज्ञान निश्चित आहे कि कोणता वार लागला आणि कोणता हुकला. पण मग इथे कोणीच कसे दिसत नाही? कोणीतरी नक्की असले पाहिजे. त्याने पुन्हा एकदा चोहीकडे पाहिले. त्याने सावकाश काही पावले पुढे टाकली.
"कोण आहे? समोर ये" आपल्या आवाजात शक्य तितकी जरब आणत गोरोने साद घातली.
गोरोला मागून पावले वाजल्याचा आवाज आला तसे त्याने पुन्हा मक्रक फिरवले. निसटता वार! एखादा काटा टोचल्यावर जशी जखम होते तशी का होईना जखम झाली असली पाहिजे. पण मग कोणीच का दिसत नाही?
"स्स्स्स्स.... बाकी काही असो तुझ्या अंगात ताकद खूप आहे. अगदी निसटता वार सुद्धा सामान्य माणसाला आडवा करायाला पुरेसा आहे."
गोरो चमकून झोपडीकडे बघू लागला. एक मध्यमवयीन पुरुष आपल्या गालावरुन अंगठा फिरवत होता. त्याच्या पोटाच्या इथेही चांगली खोल जखम दिसत होती. हा कोण?
"छ्या. फारच कमी लेखलं तुला. महत्त्वाकांक्षा किंवा तुझा उपयोग वगैरे जाऊ दे पण निव्वळ शारिरिक ताकदीच्या बाबतीत तुझा हात फारसा कोणी धरणार नाही. असो माझं नाव गेनासेयरा."
त्याने अगदी सहज नाव सांगितले जसे काही झालेच नव्हते. गोरोने आपला पवित्रा न सोडता अजून काही पावले पुढ टाकली.
"अरे तुझे वार लागले रे, अगदी तुला अपेक्षित तसेच आणि तेवढ्याच जोराने!" गेनासेयराने सहज गोरोच्या गळ्यात हात टाकत त्याला जणू धीरच दिला. हे बोलता बोलता तो त्याला तसेच ढकलत झोपडीच्या अजून जवळ घेऊन गेला.
"थांबा. तु कोण आहेस? कोणाच्या बाजूने आहेस? इलेगुआचा माणूस आहेस तर मला रोखत का नाहीस?"
"आणि त्यापेक्षाही तुझा महत्त्वाचा प्रश्न हा आहे ना कि - मी या जखमांनंतरही इतक्या सहजपणे कसा काय वावरतोय? काय बरोबर ना?"
गोरोने मान डोलाविली. त्याचे कुतुहल जागृत झाले होते हे खरेच पण नकळत एक सावधपणा देखील आला होता. अनुभवी योद्धे आपल्या प्रतिस्पर्ध्याची ताकद जोखू शकतात आणि जर जोखता येत नसेल तर शक्यतो फु़कटची हाणामारी टाळतात. गोरोसुद्धा हेच करण्याचा प्रयत्न करत होता. गेनासेयराचे आकलन त्याला करता येत नव्हते.
"अरे माझ्या जवळ आहे रे या डेटाचा बॅकअप."
काय??? गोरो दचकला. हे कोणते शब्द? हा काय प्रकार आहे? अज्ञाताची भीति भल्याभल्यांना चुकली नाही गोरोला कशी बरे चुकेल?
"अरे घाबरू नको रे. हे बघ माझ्या गालावर " त्याने जिथे अंगठा फिरवला होता तिथे जखमेच्या काहीच खुणा दिसत नव्हत्या.
" आणि आता हे ..... " त्याने पोटावरून हात फिरवला. तत्क्षणी ती जखम नाहीशी झाली.
गोरो चकित होऊन त्याच्याकडे बघू लागला. हा जर इलेगुआच्या बाजूने आहे तर एवढे लोक बोलवायची इलेगुआला गरजच का पडावी?गे
"तू खूप चिंता करतो रे. मी कुणाच्या बाजूने नाही आणि मी सर्वांच्या बाजूने आहे."
"तुला मी मनात बोललेलं कसं काय कळलं?"
"हे बघ तुझी इलेलगी आत्ता आहे आतमध्ये एकटी. इलेगुआ सोडून तिकडे कोणी नाही आणि ती नशेच्या अवस्थेत आहे तिला काय चालू आहे याची काही शुद्ध नाही आहे. तुला काय महत्त्वाचं वाटतं? मी कोण आहे आणि इतर नस्त्या चौकशा कि मी जे बोलणार आहे ते भरभर ऐकून आत जाणं आणि मग इलेगुआला थांबवणं?"
गोरोसाठी या घटना इतक्या भराभर घडत होत्या कि त्याची मति काही क्षण गुंग झाली. त्याला आत्ता एवढेच कळत होते कि तो गेनासेयराबरोबर जिंकू शकत नव्हता आणि हा मनुष्यवजा राक्षस जे काही म्हणेल ते ऐकून घेणे भाग होते. त्याने नुसतीच मान डोलावली.
"हाहाहा. म्हणजे इतकाही मूर्ख नाहीस तू. बरं मग ऐक आता. आता दुर्दैवाने तुला मी सांगत असलेल्या अनेक गोष्टी, शब्द कळणार नाहीत. पण तरी ऐकून घे, शक्य तितकं त्यातलं लक्षात ठेव. हे बघ तू तसेही इलेगुआला थांबवू शकणार नाहीस कारण आत्ता तो तुझ्या अवकाशात नाही. थांब, फक्त ऐक. असं समज जसे तुझे माझ्यावर केलेले वार फुकट गेले तसेच इलेगुआसोबत लढताना होईल. त्यामुळे तू उगाच घाई करू नकोस."
"ते ठीक आहे. पण तू माझी मदत का करत आहेस? मी तुझ्यासारखा युरुगुचा उपासक नाहीये."
गेनासेयरा खोखो करून हसला.
"तुम्हाला कोणालाच माहित नाही रे कि तुम्ही किती अज्ञानी आहात. तुला जे समजायचंय ते समज पण माझ्यासाठी तू आत जाणे महत्त्वाचे आहे. आपल्याकडे वेळ फार थोडा आहे त्यामुळे मी सांगेन ते आता मुकाट्याने ऐक."
...........................
...........................
...........................
"कळलं?"
गोरोने मान हलवली. एखादा विद्यार्थी जसे औपचारिक मान हलवतो अगदी तशी. गेनासेयराचे तेवढ्याने समाधान होण्यासारखे नव्हते.
"हे बघ, बाकी तू सगळं विसरलास तरी चालेल पण जेव्हा तू इलेगुआसोबत पुस्तकात जाशील आणि तुम्हाला विचारले जाईल कि कोण आहेस तेव्हा किमान तू तरी स्वतःचे नाव सांगू नकोस. 'मी विसरलो' किंवा 'मला माहित नाही' किंवा तत्सम उत्तरच दे. आता जा."
गोरोने साशंक मनानेच झोपडीकडे चालायला सुरुवात केली. तो मधून मधून मागे वळून बघत होता. गेनासेयरा त्याला आत जाण्यास प्रोत्साहन देत होता. यात काहीतरी मेख आहे एवढे त्यालाही लक्षात आले होते पण इलेलगीला वाचवण्यासाठी आत प्रवेश करणे भाग होते. अखेरीस त्याने झोपडीत प्रवेश केला. समोरच इलेलगी गवताच्या चटईवर झोपलेली, का झोपवलेली, होती. इलेगुआ एका धगधगत्या कुंडासमोर बसून काहीतरी पुटपुटत होता. गोरोने त्याला सांगितल्याप्रमाणे आपले मक्रक त्या आगीत टाकले आणि ती आग विझली. इलेगुआची समाधि भंगली. त्याने सैरभैर होत इकडेतिकडे नजर फिरवली आणि त्याला गोरो दिसला. इलेगुआच्या नजरेत भयमिश्रित क्रुद्ध भाव तरळले.
"तरी मी म्हटलं होतं गेनासेयराला कि याचे युद्धकौशल अचाट आहे. याला कमी लेखू नकोस. भोगत असेल आता आपल्या चुकीची शिक्षा! पण मी तुला कमी लेखणार नाही गोरो. आता जर क्रिया इथे पूर्ण होऊ शकणार नसेल तर पुस्तकातच होईल. चल!"
गोरो आधीच भांबावून गेला होता त्यात इलेगुआ चल म्हणता क्षणी गोरोला स्वतःचा कणन् कण त्या इतक्या वेळ त्याचे लक्ष न गेलेल्या करड्या कातडी बांधणीच्या पुस्तकाकडे खेचताना जाणवला. काही वेळातच त्या झोपडीत कोणी उरले नाही. सर्वकाही त्या पुस्तकाने गिळंकृत केले. गोरोला राहून राहून आश्चर्य याचे वाटत होते - त्या राक्षसाला हे असेच घडेल हे कसे सांगता आले?
तिकडे बाहेर गेनासेयरा स्वतःशीच पुटपुटत होता - हा प्रयोग ...... कदाचित यशस्वी. किमान यावेळी शक्यता जास्त वाटत आहे. बघुया काय घडतंय.
~*~*~*~*~*~
"मग पुढे काय झाले?"
"अरे गोरो, काय झाले हे आता मीच सांगायचे का? मी इतका मूर्ख नाही राहिलो रे! तुझी मेमरी परत आली आहे काय मला माहित नाही असं वाटतं तुला? इतक्या वेगवेगळ्या अँगल्स ने, वेगवेगळ्या कट्सने तुला तीच तीच कहाणी शतकानुशतके दाखवून मला कंटाळा आला आहे. तू देखील मी कधी बेसावध होतोय ती संधी शोधत बसू नकोस."
गोरोने भुवया उंचावल्या. आपले मक्रक त्याने बाजूला ठेवले.
"पण का?"
"कारण आता तो हिस्सा आला आहे जेव्हा सर्वच्या सर्व अतिशय उत्साही, अलर्ट, एक्साईटेड अन् काय काय असतात. प्रेक्षकही, दिग्दर्शकही आणि नाट्य रंगवणारे खेळिये सुद्धा!"
"क्लायमॅक्स?"
"होय. आता आपल्या हातात फक्त काय होत आहे ते बघणे मात्र आहे."
गोरोने मूक संमती दर्शवली. आता नाट्याचा शेवटचा अंक सुरु झाला होता.
~*~*~*~*~*~
आज मुंबईतला निश्चितानंदांचा भव्य आश्रम भरून गेला होता. त्याच्या चहूबाजूने कडक पोलिस बंदोबस्त होता. आज म्हणे निश्चितानंद त्या कोल्ह्याचा कायमचा नायनाट करणार होते. ते यज्ञस्थळ, तो आश्रम लोकांनी भरून गेला होता. प्राणीवादी संघटनांनी प्रयत्न करून पाहिले पण समुदायाची ताकद अफाट असते. तरी पोलिसांनी शक्य तितके सामोपचाराने घेतले होते. एकाही प्राणीमित्राला भक्तांनी त्या स्थळाच्या १ किलोमीटर मध्ये पण फिरकू दिले नव्हते. आजची रात्र निभावणे त्यामुळे आता पोलिसांसाठी सर्वात महत्त्वाचे बनले होते आणि एकंदरीत प्रचंड दडपणाचे वातावरण होते. इन्स्पेक्टर शिंदेंना या ड्यूटीचे दडपण येण्यापेक्षा त्रास अधिक वाटत होता. पण करणार काय? पार वरपासून प्रेशर आले होते. इतर वेळी कदाचित हा तमाशा कोणी घडूच दिला नसता, कदाचित निश्चितानंदांना एक दिवसापुरती अटक केली असती, अश्रूधूराचा मारा काय काय येत होते शिंदेच्या मनात. हं... त्यांनी एक उसासा सोडला. मुंबई आता पूर्णपणे त्या पुस्तकाच्या प्रभावक्षेत्राखाली होती, अन्यथा अशी वेळच आली नसती. त्यांनी वॉकीटॉकीवर भराभर काही रूटीन हुकूम सोडले. "ओव्हर अॅन्ड आऊट" असे म्हणता म्हणता त्यांचे लक्ष एका भव्य पोस्टरकडे गेले. अत्यंत प्रसन्न चेहेर्याने निश्चितानंद दोन्ही हात उंचावून आशीर्वादाची पोज घेऊन ते पोस्टर भूषवित होते आणि त्यांची टॅगलाईनही होती - सब निश्चित है. शिंदे नकळत पुटपुटले - तुझं स्वतःचं भवितव्य किती अनिश्चित आहे हे तुला माहित नाही माणसा. माझा हात फार म्हणजे फार शिवशिवतोय तुझं फेंदारलेलं नाक फोडायला पण गरज नाही. तुझ्या या तमाशाने काही होणार नाहीये. तुला माहित नाही तू कशाशी खेळतोय. या अशा खोट्या कोल्ह्याने काही होणार नाही. देव करो आणि हा कोल्हा खरा न निघो. काय सांगा चुकून हा तोच कोल्हा निघायचा. तसं असेल ना तर मग खरंच काही गरज नाही. ते पुस्तक तुला पण बुडवेल!
........
"काय झालं स्वामी?"
"पाणी दे बरं जरा. उचकी लागली आम्हास. कोणीतरी भक्त आठवण काढत असावा."
*****
इकडे ला, नोम्मो, सायरस, रेश्मा व अल्बर्ट त्या तळघरात क्रियेस सुरुवात करत होते. लाने एक वर्तुळाकृति रेखाटली. त्याच्यात एक पंचकोन काढला. त्या पंचकोनाचे आंतरवर्तुळ काढले. त्या आंतरवर्तुळात एक पंचकोनी तारा रेखाटला. त्या तार्याच्या मधोमध एक त्रिकोण काढला. त्या त्रिकोणात जॉनीला मार्जारासनात बसवले होते. नोम्मो ला सांगेल तसे त्या आकृतित इतर बारकावे भरत होता. लाचे अखंड मंत्रोच्चारण चालू होते. तिच्या समोर एक छोटी वेदी होती. त्यात तिने इंधन म्हणून नाना प्रकारची द्रव्ये मिसळली होती. त्याचा एक विचित्र गंध त्या संपूर्ण खोलीत भरून राहिला होता. नेहमी रक्तमांसाचा आणि ते साठवण्यासाठी वापरल्या जाणार्या बर्फाचा असा एक विचित्र खारट दर्प जो भरलेला असे तो कुठल्या कुठे पळून गेला होता. हा गंध नक्कीच वाईट नव्हता, उग्रही नव्हता पण तरी नकोसा करणारा होता. गुलाबाचा सुवास हवाहवासा असला तरी तुम्हाला जर गुलाबाने भरलेल्या खोलीत जर कोंडून ठेवले तर त्या वासानेही डोके उठू शकते तसाच काहीसा परिणाम या गंधाचा होता. सायरस, रेश्मा आणि अल्बर्ट हे सगळे शांतपणे बघत होते. रेश्माने तिच्या मनाला डसणारी शंका हलकेच सायरसला बोलून दाखविली.
"पण बॉस, ही आता इतकी आरामात क्रिया करत आहे. जर ही म्हणते त्या बुसुलीने हिला ट्रॅक केले तर?"
सायरसला फिस्सकन हसू फुटले. "आता त्याने ट्रॅक केले तरी काय फायदा? बसेल तो बोंबलत. तो इथे पोचला तरी आपण तिघे त्याला काही काळ तरी रोखूच शकतो. तोवर क्रिया पूर्ण होईल. फक्त लक्षात ठेवा आपल्याला पुस्तकात गेल्यावर काय करायचंय ते."
येस बॉस, दोघेही एकदम म्हणाले.
लाची क्रिया इकडे संपत आली होती. ती जागेवरून उठली. तिने चालत चालत वर्तुळात प्रवेश केला. नोम्मोच्या समोर ती उभी राहिली. नोम्मोने स्मित केले. त्याला जणू कळले होते कि आता अखेर तो क्षण आला.
"अखेर आपण एकत्र येणार. हो ना ला? म्हणून तर तू मला जो यासिगीचा उपासक असलेल्या कबिल्यातून आला आहे, त्या या नोम्मोला निवडले. हो ना ला?"
ला ने उत्तरादाखल पुन्हा एकदा स्मित केले. तिच्या अंगावर करड्या रंगाचा पायघोळ झगा होता. त्याच्या आतून तिने ते पुस्तक बाहेर काढले. मार्जारासनात असलेल्या जॉनीच्या पाठीवर ते पुस्तक तिने ठेवले. मग काहीतरी पुटपुटत तिने त्या पुस्तकातले एक विशिष्ट पान उघडले.
"नोम्मो. तू आता तात्पुरता वर्तुळाच्या बाहेर जा."
"ला?"
"तू ऐकलं नाहीस का नीट? वर्तुळाच्या बाहेर जा."
"पण का ला? अजून तो क्षण आला नाही का? तो क्षण आणि मग आपण जगावर राज्य करण्याइतके शक्तिशाली बनू. एखाद्या कबिल्याच्या सरदाराप्रमाणे राहू शकू. मग आपल्याला कोणाचीच गरज राहणार नाही." नोम्मो आता बांध फोडून बोलत होता. तो विसरला कि इतर लोकही तिथे उपस्थित होते. चिडलेल्या रेश्माचा हात अल्बर्टने हलकेच दाबला. सायरसने डोळ्याने तिला खुणावले, ही वेळ नाही.
ला मागे वळली. तिच्या चेहर्यावर एक गूढ हसू खेळत होते. तिने हलकेच नोम्मोला आपल्या कवेत घेतले. जणू ती नजरेने त्याला सांगत होती कि हो राजा आता तो क्षण आला आहे. नोम्मोनेही तिला अनुकूल प्रतिसाद दिला. त्या दोघांनी एकमेकांना एक दीर्घ चुंबन दिले. नोम्मोच्या डोक्यात काय विचार चालू असतील देव जाणे पण लाची नजर फसवी असू शकते हा त्यापैकी एक नक्कीच नव्हता. तो अचानक कण्हला. स्वतःला लाच्या मिठीतून सोडवत त्याने डाव्या हाताने आपल्या मानेचा भाग दाबून धरला. जेमतेम थेंबभरच रक्त आले असेल तिथून पण त्याला कळले होते कि लाच्या हातातील सुई विषारी आहे.
"ला?"
लाने उत्तरादाखल त्याच्या छाताडावर जोरदार लाथ हाणली. तो हेलपाडत त्या आकृतिक्षेत्राच्या बाहेर जाऊन आदळला.
"मूर्खांचा सम्राट कोणी असेल तर हा माणूस आहे. टाळ्या वाजवा रे याच्यासाठी. म्हणा तुला का दोष द्या, सगळेच चुकले होते युरुगुच्या क्रिया वाचताना, समजून घेताना. एक यासिगीचा उपासक हवा कारण क्रिया करणार युरुगुचा उपासक असेल हे गृहीत धरलेले आहे. पण यासिगी स्त्रीत्वाचे प्रतीक आहे. थोडक्यात क्रिया करणार्या भिन्न लिंगी व्यक्ति पाहिजेत, पुस्तकाच्या मालकाच्या विरुद्ध लिंगी व्यक्ति पाहिजे. केवळ एवढ्यासाठी तुला अडकवून, गोड बोलून इथे आणले. पण या जॉनी का जो कोण आहे हा, याच्यामुळे घोळ झाला. पुस्तकाचा मालक तो बनला. मग आता तुझे इथे काय काम उरले? तरी तुला जिवंत सोडणार होते मी पण तुझं कर्म!"
अल्बर्ट हळूच चालत चालत नोम्मोपाशी गेला. "बॉस नाही मेला अजून."
सायरस खांदे उडवले. "ती अजून तितकी क्रूर नाही बहुतेक. आणि तसेही हे मेडिकल नॉलेज तिला का असेल ना? मानेखालच्या शिरेत जर जखम केली तर तात्काळ मृत्यु येतो. असो आपणही क्रूर नाही. आपली दया करण्याची पद्धत दाखव त्याला अल्बर्ट."
"तूच त्या दिवशी मला बेशुद्ध केले होते ना. मग माझ्याकरवी तुम्ही इथे पोचलात. त्यामुळे आज आमचा एवढा फायदा होतोय. त्यामुळे मी तुला फार त्रास होऊ नाही देणार."
कट्! नोम्मोची मान फटदिशी १८० अंशात फिरली.
लाने आळीपाळीने त्या तिघांकडे पाहिले. ती खदखदून हसली. सायरसनेही तिला हसून कंटिन्यु चा इशारा केला.
...................
...................
"अशीच. त्या दिवशीही अशीच हसली होतीस तू."
सर्वजण चमकून त्या आवाजाच्या दिशेने बघू लागले. तळघराच्या प्रवेशद्वाराच्या इथल्या जिन्यांवर पावले वाजत होती.
"त्या दिवशीही जेव्हा तू आणि नोम्मो पुस्तक घेऊन पळत होतात तेव्हा तू माझ्याकडे बघत अशीच हसली होतीस ला. तेव्हा मी हताशपणे बघण्याशिवाय काही करू शकत नव्हतो. आता मात्र परिस्थिती बदलली आहे ला."
तो बुसुली होता. बुसुली, प्रज्ञा, आलोक, कुणाल, जाधव, किलर, रसूल आणि रिपोर्टर! एकापाठोपाठ सर्वजण त्या तळघरात प्रवेश करते झाले.
ला बुसुलीला, सायरस आलोकला तर अल्बर्ट व रेश्मा किलरला पाहिल्यावर भूत पाहिल्यासारखे दचकले.
किलरने हलकेच २ पावले पुढे होत हसत हसत विचारले
"हॅलो फेलाज, माईंड इफ वी जॉईन द पार्टी?"
..............
..............
त्या व्यक्तिने अखेर वैतागून तो कंप्यूटर बंद केला. कितीही वेगवेगळ्या प्रकारे कॅलक्युलेशन्स करून पाहिले तरी पुस्तक बंद राहण्याची शक्यता ० होत नव्हती. त्यात पासवर्ड रिसेट होण्याची शक्यता नेहमीप्रमाणे ० न दिसता ५०% दिसू लागली होती. फिल्टर कॉफी इतकी कडू जहर लागू शकते यावर तिचा कधी विश्वास बसला नसता पण सध्याच्या मूडमध्ये तिला साखरेचा पाकही कदाचित कडू लागला असता.
छे, इथे बसून काही होणार नाही. मला देखील युरुगुच्या पुस्तकात गेलेच पाहिजे. अजून काही अनर्थ घडण्याआधी ती खोली गाठली पाहिजे आणि आशा करुयात कि धिस ब्रांच कंडिशन विल बी इव्हॅल्युएटेड!
त्या व्यक्तीने आपले करडे पुस्तक उघडले आणि युरुगुच्या जगात प्रवेश केला. तो कंप्युटर एक ओळ हायलाईटेड दाखवत होता.
if sysadmin_access_req( __name__ == "प्रज्ञा ")
~*~*~*~*~*~
"हे जग एक माया आहे. त्या सर्वश्रेष्ठ रचयित्याने रचलेली माया. पृथ्वीरुपी चेंडूवर जणू हा खेळ त्याने मांडला आहे. आपण मात्र या मायेतल्या कळसूत्री बाहुल्या! तो जसा नाचवेल तसे आपण नाचलेच पाहिजे. त्याने कोण, कधी, कसा वागेल हे सर्व आधीच ठरवले आहे. आपल्या वाटची वाक्ये बोलायची वेळ येईपर्यंत वाट पाहणे, वेळ आल्यानंतर ती बोलणे आणि मग तो देईल तसा या रंगमंचाचा निरोप घेणे एवढेच आपले काम! हे सर्व एकदा उमजले कि जीवनात कधीच कसली अडचण, पीडा होत नाही. म्हणून आम्ही कायम सांगतो ........"
"सब निश्चित है!!!" तो भक्तांचा प्रचंड समुदाय एकासुरात ओरडला.
"च्यायला, याच्याकडे काही नाहीतर मॉब मॅनेजमेंट स्किल्स नक्की आहेत." शिंदेना दाद दिल्याशिवाय राहवले नाही.
ते वातावरण भारावून गेले होते. मधोमध एक वेदी तयार केली गेली होती. त्या वेदीवर एक चौरसाकृति कुंड होते आणि त्यात अग्नि प्रज्वलित केलेला होता. त्या वेदीला एका चबुतर्यावर स्थापित केले होते. त्या चबुतर्याला बर्याच पायर्या होत्या आणि सर्व पायर्यांवर निश्चितानंदांचे शिष्य घेराव घालून उभे होते. वेदीवर फक्त निश्चितानंद व त्यांचे दोन सर्वात जवळचे शिष्य आनंद व साधना होते. त्या कोल्ह्याला एका मजबूत पोलादी साखळीने कुंडाजवळ सर्व प्रकारच्या 'मेध' यज्ञात असतो तसा यूप होता त्याला बांधून ठेवले होते. समोर बसलेले भक्तरुपी प्रेक्षक 'अग्गोबाई हा कोल्हाच आहे ना? स्वामी आहेत म्हणून नाहीतर कसं झालं असतं गं' पासून 'काही नाही हो, आमच्या यांनाच हौस. कुठून तरी आणला असेल कोल्हा." पर्यंत कुजबुज चालू होती. त्यातले दुसर्या प्रकारचे प्रेक्षक जरा विरळ होते, पण टीव्ही कव्हरेज बघत असलेल्यांमध्ये मात्र ही प्रतिक्रिया थोडी अधिक कॉमन होती. म्हणा ती काही अगदीच चुकीची नव्हती. हा खरेच खेळच चालला होता. फक्त एकच होते, इथे सर्व निश्चित नव्हते.
निश्चितानंद आपली बडबड करत येरझार्या घालत होते. त्यांनी या सगळ्या प्रकाराला नावही मोठे झकास दिले होते - श्रुगालमेध!! आनंदला ते नाव ऐकून हसु आवरले नाही. त्याने ते मोठ्या मुश्किलीने दाबले. साधनाने त्याला हलकेच ढोसले.
"काय गं?"
"तू म्हणाला तसे त्याला भरपूर शांभवी ढोसायला लावली आहे."
"गुड!"
"पण त्या कोल्ह्याला का गुंगीचे औषध दिले आहेस? तो बघ कसा शांत बसला आहे. अशाने आपला प्लॅन कसा सफल होणार?"
"अगं पहिल्यांदा काही पार्श्वभूमि नको का तयार व्हायला? घाबरू नकोस अर्धाच डोस दिला आहे. आणि ट्रेन तर केलेच नाही त्याला नीट! म्हातारा नक्की मरेल बघ. मग तू या सगळ्यांची आई,"
"आणि तू बाप!"
दोघांनी स्मित केले. या भयंकर योजनेपासून अजाण असलेले निश्चितानंद मात्र विविध आहुत्या, मंत्रोच्चारण, शब्दबंबाळ भाषण चालूच ठेवत होते. त्यांचे डोके जड झाले होते. त्यांना स्वतःलाच कळत नव्हते कि काय चालू आहे. इतक्या वर्षांच्या सवयीने ते हालचाली करत होते. त्यांचे लक्ष अचानक आनंद व साधनाकडे गेले. त्यांना आता पुढच्या स्टेजला जाण्याचा इशारा देण्यात आला. देवा, बरे झाले नाहीतर इथेच वांती व्हायची आम्हास आता. त्यांनी यूपाला बांधलेली कषा उचलली.
"या श्रुगालरुपी चांडाळाने हा निश्चिततेचा नियम मोडला आहे. त्या रचयित्याच्या आदेशावरून आज आम्ही या जगातून त्याला हाकलून देऊ. पण तत्पूर्वी त्याला शासन करणे आवश्यक आहे जेणेकरून तो पुन्हा इथे येण्याची हिंमत करणार नाही. या कषेचे फटके तुझ्या आत्म्याला अशा यातना देतील कि माझा हा आवाज तुझ्या मनात कायमचा कोरला जाईल."
त्या चाबकाचा एक जोरदार फटका कोल्ह्याच्या पाठीवर बसला. त्या शांततेत तो आवाज प्रचंड वाटेल असाच होता. जी काही थोडी कुजबुज अजून सुरु होती ती देखील बंद झाली. निश्चितानंद दुसरा आसूड ओढणार इतक्यात...........
त्याने भेसूर रडायला सुरुवात केली. त्या सुदनाला कारुण्याची झालर होती. त्याला खूप त्रास होत होता हे सांगायची कोणाला गरज नव्हती. जेव्हा नाळ कापतात तेव्हा अर्भक जसे रडते तसेच तो रडत होता. कारण जॉनीशी, त्याच्या मालकाशी असलेली नाळ लाच्या क्रियेने कापली गेली होती. तो फटका त्याची गुंगी तोडायला केवळ निमित्तमात्र झाला होता. तो उठला, त्याला मालकापर्यंत पोचायचे होते. मालक पुस्तकात आणि तो या जगात असे चालणे शक्य नव्हते त्याला उशीर करून चालणार नव्हता. त्याला मानेला बांधलेले ते जोखड जाणवले. इकडे सावरलेल्या निश्चितानंदांनी पुन्हा एकदा चाबूक चालवला. आता तो चिडला. तिसरा फटका मात्र त्याने तोंडाने पकडला आणि एका झटक्यात निश्चितानंदाला जमिनीवर आदळवले. दुसर्या हिसड्यात तो यूप उखडून आला. आता मात्र सगळे गोंधळले. एकच घबराट माजली. पोलिस बंदोबस्ताचा खरा उपयोग होत होता. शिंदेंना मात्र यामागे काय गडबड होत असेल हे जाणवले. अशी ताकद एका सामान्य कोल्ह्याकडे असू शकत नाही. निश्चितानंदाचे दुर्दैव!! पण आपण स्वस्थ बसू शकत नाही. त्यांनी वेदीकडे धाव घेतली.
ते शिष्यांचे कडे कधीच विखुरले होते; आखिर जान है तो जहान है! आनंद व साधना थरथरत २ पायर्या खाली उतरून ते दृश्य पाहत होते. तो कोल्हा साखळीचे चावे घेत होता. निश्चितानंदाची नशा मात्र अजूनही पूर्ण उतरली नव्हती. ते झुलत झुलत मेध करण्यासाठी आणलेले हत्यार, खड्ग शोधत होते. त्यांना धोका जाणवला होता कि नाही हे कळत नव्हते.
"हा वेडा झाला आहे आनंद, चल इथून."
"एक मिनिट साधना. काहीतरी जबरदस्त चुकते आहे. माझ्या अंतर्मनावर तुझा विश्वास आहे का नाही? हो ना? मग अजून काही वेळ थांबूयात आणि बघूयात काय घडते."
त्याने अखेरचे चावे घेत घेत ती साखळी तोडली. पण तेवढ्यात त्याला जाणवले कि आपल्याला खूप उशीर झाला आहे. एव्हाना सर्वजण पांगले होते. काही निस्सीम भक्त, आनंद, साधना, शिंदे, निश्चितानंद व काही पत्रकार इतकेच उरले होते. न्यूज चॅनेल्सना इतका टीआरपी कधी मिळाला नसेल. कसेबसे शिंदे वेदीपाशी पोहोचले. तेव्हा त्यांना आधीपेक्षाही भेसूर आवाज ऐकू आले. ते आनंद व साधना पाशी पोचले आणि जणू काळ थिजला. सर्वजण अनंत काळ त्या दृश्याकडे जणू आता टक लावून बघणार होते जोवर पुस्तकात गेलेले ती गडबड दुरुस्त करत नाहीत.
निश्चितानंदांच्या हातातील खड्ग कधीच गळून पडले होते. ते व तो कोल्हा एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून काही संवाद साधत होते. तो कोल्हा निश्चितानंदाला एक वेगळेच जग बघण्याचे माध्यम बनला होता. तो क्षण तिथेच थांबला होता. जगाच्या रिमोट कंट्रोलवरचे पॉज बटन दाबले गेले होते. काही निवडक जण सोडले तर कोणी विचारही करण्याच्या अवस्थेत नव्हते तर अजून कमीजण हालचाल करू शकत होते.
............
थोड्या दुरून हे सर्व बघत असलेला गेनासेयरा नाराज दिसत होता.
"सगळं सगळं चुकतंय. प्रयोग फसला नाहीये पण अपेक्षित पद्धतीनेही गेला नाहीये. आता इथे थांबण्यात काही अर्थ नाही. या सर्वाचा अंत झालाच तर पुस्तकातच होईल. मला तिथे गेलेच पाहिजे."
त्याने पुस्तक हवेत भिरकावले, पाने फडफडली आणि तो त्या पानांमध्ये कुठेतरी नाहीसा झाला तर ते पुस्तक जणू हवेत विरले.
क्रमशः
टीपा, नोंदी इ.
यूप - खांब, कषा - चाबूक
__मेध - असा यज्ञ ज्याच्यात कोणाचातरी बळी दिला जातो. उदा. अश्वमेध - घोड्याचा बळी. श्रुगाल - कोल्हा.
ती व्यक्ती - हे नवीन पात्र नाही. अधिक गोंधळ होऊ नये म्हणून हा रेफरन्स. भाग ० मध्ये आपण या पात्राला भेटलो होतो. ती व्यक्ति असा उल्लेख का झाला हे आता पुढील भागात स्पष्ट होईल.
सर्वात महत्त्वाचे - आणखी जास्तीत जास्त २ भागात या कथेचा समारोप होईल. पुढील भाग नवीन वर्षाच्या आधी येईल. १० जानेवारीपर्यंत ही कथा निश्चितपणे संपवण्यात येईल. शक्य झाल्यास सर्व एकाच भागात बसवण्यात येईल - त्यामुळे पुढचा भाग == (उपांत्य) ^^ (अंतिम) याचे उत्तर १/बरोबर असे आहे. (हे काय आहे जर तुम्हाला कळत असेल तर तुम्हाला अंताविषयी थोडे अंदाज बांधता येतील.) इतके दिवस धीर धरल्याबद्द्ल, भयंकर किचकट कथानक असूनही आवर्जून वाचून उत्साहवर्धक प्रतिसाद दिल्याबद्द्ल सर्व वाचकांचे आभार व माझ्यातर्फे झालेल्या उशीराबद्द्ल दिलगिरी! आशा आहे आत्तापर्यंतचे कथानक आवडले असेल आणि हा भाग व कथेचा शेवटही आवडेल. धन्यवाद
पुढील कथासूत्र येथे वाचू शकता - http://www.maayboli.com/node/57041
ऑस्सम! पुढचा भाग आला तर!!
ऑस्सम! पुढचा भाग आला तर!!
ग्रेट! आता शेवटचा भाग येऊ दे!
ग्रेट! आता शेवटचा भाग येऊ दे! मग मी पहिल्यापासून वाचून काढणार आहे!
सही..
सही..
किती तो माझ्या डोक्याचा गोंधळ
किती तो माझ्या डोक्याचा गोंधळ सुरुवातीला वाचताना..नंतर जशी जशी पुढे वाचत गेले तेव्हा टोटल लागत गेली.
हा ही भाग छान
ग्रेट! आता शेवटचा भाग येऊ दे!
ग्रेट! आता शेवटचा भाग येऊ दे! मग मी पहिल्यापासून वाचून काढणार आहे! >>> अगदी
पु.ले.शु
माझ्या डोक्याचा भुगा होत
माझ्या डोक्याचा भुगा होत चाल्लाय..
आता शेवट आला कि एकसाथ सगळ वाचणार.. पुलेशु पायस..
आता सगळे भाग परत वाचावे
आता सगळे भाग परत वाचावे लागणार
फार दिवसांनी पण बराच मोठा भाग
फार दिवसांनी पण बराच मोठा भाग टाकल्याबद्दल धन्यवाद.
सगळे भाग सलग वाचल्याशिवाय माझ्या डोक्यातला गोंधळ दूर होणार नाही.
पायसशेट, कथानक लैच मस्त
पायसशेट,
कथानक लैच मस्त सुरुये. पण आता सलगच परत वाचावे लागणार!
तेव्हा, पुढील भागाच्या प्रतीक्षेत
जब्बरदस्त
जब्बरदस्त
लय भारी
लय भारी
आताच सुरुवातीपासुनचे सगळे भाग
आताच सुरुवातीपासुनचे सगळे भाग वाचुन काढले. लवकरात लवकर पुढचे भाग येऊ द्यात.