शापित गड भाग ५

Submitted by श्रीमत् on 5 December, 2015 - 06:51

शापित गड भाग १ http://www.maayboli.com/node/49017
शापित गड भाग २ http://www.maayboli.com/node/51000
शापित गड भाग ३ http://www.maayboli.com/node/51077
शापित गड भाग ४ http://www.maayboli.com/node/52056

पंडीत ने घोड्याला टाच मारली तसा घोडा संथ चालीत वाड्याच्या उजव्या बाजुच्या वाटेने पुढे जाऊ लागला. घोडा जस जसा पुढे जात होता. तस तश्या बाजुच्या जीर्ण झालेल्या भिंती आत्ताच रंगरंगोटी केल्या प्रमाणे ऊजळुन निघत होत्या. तटबंदी व त्यावर जाणारया वाटाही आता पुर्ववत झाल्या होत्या. ठिकठिकाणी जळक्या मशाली प्रज्वलीत झाल्यामुळे वातावरणात हलकासा मंद प्रकाश सर्वदुर पसरला होता. पंडीतची घोड्यावर बसलेली आक्रुती हळु हळु आमच्या नजरेआड जाऊन दिसेनाशी झाली. त्या रुबाबदार पांढर्या पांढरया घोड्यामुळे व त्याला मॅचींग तश्याच वेषामुळे एक मोठा पांढरा ठिपका बारीक होत-होत नाहिसा झाल्याचा भास झाला. वातावरणात अचानक एक प्रकाराचा उत्साह संचारला होता. पण अर्थात तो मानवीय नव्हता. समोरील वाडा आतमध्ये दरबार भरल्याप्रमाणे एकदम उजळुन निघाला होता. तळ्यातही मधोमध मस्त कारंजे ऊडत होते. वातावरणात एक हलकासा सुगंध पसरला होता. तर वाड्याच्या दिशेने एक हलकस मंद संगीत ऐकायला येत होतं. सार वातावरण एकदम गुढ आणि विलक्षण वाटत होतं. काही वेळेसाठी हे स्वप्न तर नाही ना म्हणुन भिवाला हळुच चिमटा घ्यायला सांगितला. "ऑऊच अरे हळु रे", मी भिवाला ओरडलो. म्हणजे हे सर्व खरोखर घडत होतं. बस आत्ताच्या आत्ता जाऊन या प्रकरणाचा छडा लावूया असा विचार मनात आला. पण जशी वाड्याबाहेरील हालचालींवर नजर गेली तसं त्या ढोलीत शांत बसण्यातच शहाणपणा आहे याची जाणीव झाली. कारण त्या वाड्यासमोरच दोन काळे धिप्पाड सैनिक भाला घेऊन खुनशी नजरेणे पाहात ऊभे होते. लागोलाग भिवाने माझं लक्ष बाहेरील तटबंदीवर वेधले. "साहेब ते बघा वर पण असेच काळे टेणे गस्त घालतायतात. आता इथुन बाहेर पडलो किंवा त्यांना आपण इथे असल्याचा सुगावा लागला तर देव पण आपल्याला आज वाचवु शकणार नाही." म्हणजे आता आम्ही खर्या अर्थाने "त्यांच्या" तावडीत सापडलो होतो.

इतक्यात भिवा काकुळतीच्या स्वरात बोलला, "साहेब आपल्याला काही होणार तर नाही ना?" "माझी कारभारीन पोटुशी हाय." "ती काळजी करत आसलं." "माझ काय बर वाईट झाल तर?". भिती आमच्या दोघांच्याही चेहरयावर स्पष्ट दिसत होती. मी त्याला उसना धीर द्यायचा प्रयत्न केला. मलाही आता आई आणि अण्णांची तीव्र आठवण येत होती. मला माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता; तर बुद्धी हे सर्व मानण्यास तयार होत नव्हती. एक दोन मिनिटात माझ्या नजरेसमोरुन सकाळपासुनचा सर्व घटनाक्रम सरकून गेला. आमच हरवल गावापर्यंत येणं, रस्त्यात भेटलेला दादोसा, भिवाच्या घरी त्याचा विक्षिप्त बाप, आम्हाला झालेले भास, फोटोतल्या त्या आक्रुती, भितीदायक आणि तितकाच गुढ वाडा, त्याच्यासमोरच तळ, आम्ही आता ज्या ढोलीत बसलोय ते झाड, आधी भिवा व नंतर पंडीतच गायब होणं. त्यात हा भिवा बिचारा परत आला तरी पण हा पंडीत सरळ सरळ त्या राजाच्या वेषात तिथपर्यंत पोहचण हे आमच्यासाठी एक कोडच होतं. गडावरील वातावरण तर एखाद्या हॉरर मुव्हीच्या सेटप्रमाणे बदलत होतं.

पंडीतला तिथुन जाऊन दहा एक मिनिटे झाली होती, पण तिथुन बाहेर निघण्याच धाडस काही होईना. तेवढ्यात दुरवरुन कसलेसे अस्पष्ट आवाज येऊ लागले. अस वाटत होतं जणू कोणीतरी मंद लयीत नगारा बडवत एखाद्या सांकेतिक भाषेत कोणाला तरी साद घालत असावं. इतक्यात हुंकारे भरत पळण्याचा आवाज आमच्या कानावर पडला. नीट लक्ष देऊन ऐकल्यावर तो आवाज आमच्या दिशेनेच येत असल्याच आम्हाला जाणवलं. बस आता इथे थांबनं म्ह्णणजे साक्षात म्रुत्यूलाच निमंत्रण देण्यासारख होतं. "भिवा चल ऊठ इथुन! आत्ताच्या आत्ता आपल्याला ही जागा सोडायला हवी". आता तो आवाज हळु हळु मोठा होत असल्याचा आम्हाला जाणवलं म्हणजे कोणीतरी याच दिशेने येतयं. नुसत्या कल्पणेनेच पोटात भितीचा गोळा आला. मी आणि भिवा घाबरत घाबरत दबक्या पावलांनी त्या ढोलीच्या बाहेर आलो. कारण वाड्याबाहेरच्या किंवा माचीवरच्या त्या अमानवीय सैतांनाच जरा जरी लक्ष गेल तरी खेळ खल्लास. वाड्यासमोरचा परिसर जरी उजळला असला तरी या भागात अजुन अंधारच होता. अंधारात समोरील प्रत्येक आकार अंगावर येत होता. चारी बाजुंनी कस-कसले भीतीदायक आवाज आमचा पाठलाग करतायत अस वाटत होतं आणि सभोवतालचा परीसर ही जुना पडीक सकाळी होता तसाच दिसत होता. आता यामागे काय गौडबंगाल आहे हे मात्र कळायला मार्ग नव्हता. भितीने भिवाने त्याच्या हातातील कोयता अजुन घट्ट पकडला होता आम्ही दोघेही समोरच्या गवतात शिरणार इतक्यात सहा-सात काळे कुळकुळीत माजलेले भोई खांद्यावर पालखी घेऊन हुंकारे भरत आमच्या दिशेने पळत येेताना आम्हाला दिसले. बस्स आम्ही जीव घेऊन तिथुन पळु लागलो. भिवा पुढे, मी मधे आणि काही अंतरावर ते दैत्य आणि त्यांच्या खांद्यावर "ती" पालखी. आता काही करुन यांच्या तावडीत सापडायचं नाही. पुरुषभर वाढलेल्या त्या गवतातून धावताना आमची चांगलीच दमछाक होत होती.
अंधारामुळे आम्ही नक्की कोणत्या दिशेला चाललोय काहीच कळत नव्हत. जस जसा आमचा वेग वाढत होता तस तसे तेही आणखीन जोरात हुंकारे भरत आमच्या मागे येऊ लागले. आता माझा श्वास चांगलाच फुलला होता. पायातल त्राणही संपत आलं होतं परंतु मन हार मारायला तयार नव्हत. अखेर पळता पळता भिवा अचानक एके ठिकाणी थांबला. तसा हातानेच मी त्याला पुढे जायला सांगु लागलो. पण तो जागचा हालला नाही. त्याच्या चेहर्यावरचे भाव एकदम बदलले होते. जसा मी त्याच्याजवळ पोहचलो तस मलाही सर्व संपल असच वाटल. समोर एका ऊंच कड्याच्या टोकाशी आम्ही उभे होतो. खाली खोल दरी आणि समोर ते अमानवीय भोई.
भरपुर धावल्यामुळे आमच संपुर्ण शरीर ओलचिंब झाल होतं. थोड्याच वेळात ते भोई आमच्या समोर येऊन उभे राहीले. मी मनातल्या मनात भीमरुपी बोलायला सुरवात केली. तर भिवाची पण परिस्तिथी काही वेगळी नव्हती. आमच्यात आणि त्यांच्यात आता फक्त काही फुटांच अंतर उरल होतं. माझ्या मनात नाना विचार येऊ लागले. एका क्षणात आयुष्याचा कोलाज माझ्या डोळ्यासमोरुन ओझरत निघुन गेला. दुरुन येणारे नगार्यांचे आवाज आता अजुन स्पष्ट एकायला येऊ लागले. इतक्यात समोरच्या पालखीतुन एक नाजुक हात बाहेर आला. व त्याने खुनेनेच पालखी खाली ठेवायला सांगितली. हळुच पालखीचा मखमली पडदा बाजूला झाला. आणि एक सौंदर्यवती त्यातुन बाहेर पडली. तिच्या बाहेर येताच त्या सर्वांनी आपल्या माना खाली वाकवल्या आणि सर्वजन यंत्र मानवाप्रमाने स्तब्ध झाले. साडे पाच फुटा पेक्षा जास्त उंची, कमनीय बांधा आणि एखाद्या राजकन्येला शोभतील असे राजेशाही कपडे. चेहरा तर असा गोंडस की कतरीना, करीनाला ओवाळुन टाकावं. आईशप्पथ लाईफध्ये पहिली वेळ एवढ सुंदर भुत बघत होतो. साला लोक उगाचच भुताच्या स्टोर्या बनवुन सांगतात. भिवा माझ्या मागच्या बाजुला मान खाली घालुन कान्या डोळ्याने तिला बघण्याचा प्रयत्न करत होता. पण भिती मुळे त्याच धाडस काही होईना. त्या आरसपाणी सौंदर्यासमोर खरच मन घायाळ झाल. पहिल्या नजरेतील प्रेम काय असत याची अनुभुती आली.
समोरुन मंजुळ आवाज कानावर आला. "घाबरु नका, तुम्ही मला ओळखत नसाल पण मी तुम्हाला ओळखते आणि मी तुम्हाला वाचवायलाच इथे आले आहे. तूमचा भाऊ पंडीत आता कुठे असेल हेही मला माहित आहे. पण मला तुमची मदत हवी आहे. या गडाला शाप मुक्त करण्यासाठी कारण आज जर का "तो" त्याच्या मनसुब्यांमध्ये यशस्वी झाला तर कदाचित तो एका नवीन पर्वाचा उदय असेल."

"आपण......कोणाविषयी बोलताय? आणि कशावरुन तुम्ही बोलताय त्यात तथ्य आहे. आम्ही का म्हणुन तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा". मी धीर एकवटुन बोललो. "हे बघा! आपल्याकडे फार कमी वेळ आहे. जर का तो त्या वेताळाच्या मंदिरापर्यंत पोहचला तर तुमच्या पैकी कोणीच वाचणार नाही. आणि मलाही त्याच गुलाम बनुन राहाव लागेल. तो सांगेल ते ऐकाव लागेल. आज एवढी वर्ष तो याच क्षणाची वाट पाहात होता. सर्व योग त्याच्या मनाप्रमाने जुळुन आलेत. त्याला हवा तसा नरदेह मिळालाय. नाही-नाही आपल्याला त्याच्या सिध्द्दी मध्ये विघ्न आणलंच पाहिजे".
"पण तुम्ही स्वत कोण आहात? आणि तो म्हणजे? तुम्ही राजा भ्रमर वर्मा बद्दल बोलताय का?". "ना..ही.......! ते माझे वडील नाहीत" ती जवळ जवळ ओरडलीच.

"म्हणजे....तुत... तुम्ही राजा भ्रमर वर्मा च्या कन्या आहात?"
"हो.. मी त्यांचीच ज्येष्ठ कन्या राजकुमारी आरोही आहे. आणि ज्यांना तुम्ही भ्रमर वर्मा समजताय ते माझे वडील नसुन त्यांचाच जुळा भाऊ आणि माझा काका समर वर्मा आहे. माझ्या वडीलांनी कठोर मेहनत आणि तपश्चर्येने वेताळाला प्रसन्न केल होतं आणि त्याच्या मुळे ते आपल्या प्रजेच शत्रु राज्यांपासुन संरक्षण करु शकत. ते कलासक्त होते. कित्येक कलाकारांना राजदरबारी त्यांनी अभय दिल होतं. व्यापार उदीमही त्यांच्या काळात भरभराटीस आला होता. प्रजेच्या सुखासाठी वाट्टेल ते करायची त्यांची तयारी होती आणि वेताळाच्या सिद्धी मुळे त्यांना ते सहज शक्यही होते. परंतु याच्या अगदी उलट माझा काका होता. त्याला त्याच वेताळाच्या मदतीने सर्व साम्राज्य हस्तगत करायच होतं. त्याला सर्व प्रदेशावर त्याची दहशत आणि अंकुश ठेवायचा होता. त्याचे हे मनसुबे ज्याक्षणी वडीलांच्या लक्षात आले त्याचक्षणी त्यांनी एक राजपत्रक काढुन राज्यातुन त्याची हकालपट्टी केली.

सर्व जनतेसमोर झालेल्या हकालपट्टीमुळे तो सुडाग्नीने पेटला होता. त्याचाच बदला म्हणुन अशाच एका स्रर्वपित्री अमावस्येला जेव्हा बाबा वेताळाची उपासना करत होते. तेव्हा याने त्यांचा पाठलाग करुन तो मंत्र मिळवला. या मंत्राची खासियत अशी आही की संपूर्ण विवस्त्र होऊन १०८ वेळा तो अखंड बोलावा लागतो आणि एकदा का शेवटचं उ्च्चारण झाल की मंत्र म्हणणारयाने स्वताला त्या अग्नी कुंडात झोकुन द्यायच. यामुळे वेताळाला नरबळी पण मिळायचा आणि वडीलांच्या उपासनेवर खुश होऊन त्यांना आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला अभय मिळायच. त्यानंतर जेव्हा जेव्हा गरज लागेल तेव्हा तेव्हा हा मंत्र बोलला की सर्व पित्र तुमच्या कामास हजर मग अगदी काही असुदे. पण सत्तेच्या हव्यासापायी त्याने मंत्रोच्चारण चालु असतानाच होमकुंडात जनावराची चरबी ओतली. ज्यामुळे ज्वालाग्नी भडकाला. आणि दचकल्यामुळे वडिलांच्या नामस्मरणात खंड पडला. बस्स त्याच क्षणी वेताळाचा कोप झाल्यामुळे वडिलांना त्यांचे प्राण गमवावे लागले. त्यानंतर आम्हा सर्वांना वाड्यातच नजर कैदेत ठेवण्यात आलं आणि हा स्वताः त्या गादीवर बसला. त्याने मंत्र तर मिळवला पण तो जरा किचकट असल्यामुळे त्यालाच समजेल अशा सांकेतिक भाषेत वाड्यासमोरील शिळेवर तो कोरुन घेतला. त्यानंतर सुरु झाल अत्याचाराच पर्व. त्याने सर्व प्रदेश काबीज करायला सुरवात केली. जनतेचे अतोनात हाल होऊ लागले. सर्व कलाकारांचा राजआश्रय काढुन घेण्यात आला. पुर्वी जी जनता आपलं आयुष्य सुद्धा आपल्या राजाला मिळो अशी प्रार्थना देवाजवळ करायची तीच जनता आता त्याच्या मरणाची वाट पाहु लागली. आम्ही नजर कैदेत असलो तरी लोकांना संशय येऊ नये म्हणुन राजदरबारात सर्वांसमोर आम्हाला नेहमीसारखीच वागणुक मिळत असे. फक्त कोणाला भेटण्याची परवानगी अजिबात नव्हती. त्याच कारणही त्याने तितक्याच हुशारीने राज्यात पसरवलं कि आपल्या राजमाता म्हणजे आमच्या आऊसाहेबांची तब्येत ठिक नसल्यामुळे त्यांना अविरत विश्रांतीची गरज आहे. तो सर्वांच्या डोळ्यात धुळ फेकत असला तरी आमच्या प्रधानांच्या डोळ्यातुन यासर्व गोष्टी बरोबर टिपल्या होत्या कारण तेच आमच्या गुप्तचर विभागाचे प्रमुख होते आणि आमच्या वडिलांनंतर राज्यातील जनता त्यांचाच शब्द वंद्य मानत असे. त्यांनीच आपल्या गुप्तहेरांमार्फत सर्व गोष्टींचा व्यवस्थित पाठपुरवठा करुन सर्व गोष्टी आमच्या पर्यंत नीट पोहचतील याची काळजी घेतली. आणि मग प्रधानांच्या मदतीने त्याचाच डाव मी त्याच्यावर उलटवला. ज्या पध्दतीने त्याने बाबांच्या पुजेत विघ्न आणलं त्याच मार्गाने आम्हीही त्याला जायबंदी केलं. परंतु मरता-मरता आक्रोशाने त्याने शाप दिला, "हे सर्व साम्राज्य मी मरताक्षणी नाश पावेल, राजकुमारी आरोही. माझ्याबरोबर तुही यापुढे या गडावर शापित बनुन राहशील आणि ज्या सर्वपित्री अमावस्येला मला एखादा नरदेह पुन्हा प्राप्त होईल त्या दिवशी मी वेताळाला परत प्रसन्न करुन या संपुर्ण साम्राज्यावर माझ राज्य आणेन. आणि पुढचा इतिहास सर्वश्रुत आहे".

मी जितक्या आर्ततेने कानात प्राण आणुन तिची गोष्ट ऐकली होती. तितक्याच घायाळ नजरेने तिला न्याहाळत होतो. पण क्षणात स्वताला सावरुन मी तिला विचारले, "पण मी तर वाचल होत की राजा भ्रमर वर्माच्या तीस राण्या होत्या आणि त्यातल्या आठव्या राणीने सत्तेच्या हव्यासापायी राजाचा घात केला". मी माझ विकी पिडीयाच तुनतुन वाजवल.
"हो होत्या ना! पण त्या माझ्या वडिलांच्या नसुन माझ्या काकाच्या होत्या. त्यानेच आजुबाजुच्या राज्यातुन त्या हस्तगत केल्या होत्या. बाकी हे आठव्या राणीने घात केला वैगरे मीही पहिल्यांदाच ऐकतेय". आता माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडु लागला. म्हणजे मगाशी घोड्यावर पंडीत नसुन त्याच्या शरीरावर ताबा घेतलेला समर वर्मा होता. आणि तो आता नरबळी द्यायला चालला होता. माझी दातखिळिच बसली........मी डोक्याला हात लावुन खाली बसलो.
"तुम्ही काळजी करु नका! आज काही करुन आपण त्याला त्याच्या मनसुब्यांमध्ये यशस्वी होऊन द्यायच नाही". तिने मला तिच्या नाजुक हातांनी हळुच वर ऊठवल. असं वाटत होतं जणु सर्व विश्व थांबलय आणि आम्ही दोघेच या प्लॅनेटवर जिवंत आहोत.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बादशहा आणि अनघा प्रतिसादाबद्दल धन्यवाद, काही कारणास्तव हा भाग टाकायला ऊशीर झाला. परंतु पुढील भाग लवकरच वाचायला मिळतील. (बोले तो कमिटमेंन्ट आदरमोद)

वा! भारी उत्कंठावर्धक झालाय हा भाग.

मी पुढच्या भागाची आशा सोडूनच दिली होती त्यामुळे आश्चर्याचा जोरदार धक्का बसला. Happy

पेरु
"तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल क्षमस्व, माझी लहानगी दोन वर्षांची असल्यामुळे लिहायला सद्द्या वेळ मिळत नाहीये. त्यात लॅपटॉप ओपन केला कि तिला तो हवा असतो." "तरीही हि कथा संपुर्ण करुन, भागांमध्ये टाकत आहे."

"जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही, "नाहीतर समर वर्मा पण रागावेल!"

Bw

पौराणिक कथेचे संदर्भ देताना जर English References टाळता आले तर बघा. जसे "मॅचींग", "हॉरर मुव्हीच्या सेटप्रमाणे", " स्टोर्या", "विकी पिडीयाच"
सुग्रास जेवण करतांना मध्येच खडा लागल्यावर जसे वाटते तसेच कादंबरी वाचतांना जाणवतेय. रसभंग होतोय.

बाकी रंग मस्त भरलाय.

पु. ले.शू