मिश्र डाळींची भजी

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 8 December, 2015 - 04:57
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

प्रत्येकी पाव वाटी मुगडाळ, चणाडाळ, मसुर डाळ, उडीदडाळ किंवा आपल्याला आवडतील व उपलब्ध असतील त्या डाळी. (मी हिरव्या सालीची मुगडाळ घेतली आहे).
२ कांदे चिरून
थोडे हिंग
१ चमचा हळद
२-३ मिरच्या
मुठभर चिरलेली कोथिंबीर
चविनुसार मिठ
२ चमचे लिंबाचा रस
तळण्यासाठी तेल

क्रमवार पाककृती: 

सगळ्या डाळी एकत्र करून ५ ते ६ तास भिजवून घ्या.

ह्या डाळी व मिरच्या एकत्र मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या. जास्त पाणी घालू नये.

ह्या मिश्रणात हिंग, हळद, मिठ, लिंबाचा रस, कोथिंबीर घालून एकजीव करा.

कढईत तेल गरम करा व त्यात चमच्याने भजी सोडा. मिडीयम गॅसवर सोनेरी रंगाच्या होईपर्यंत तळा.

सॉस किंवा चटणी बरोबर गरमागरम वाढा.

वाढणी/प्रमाण: 
४ ते ५ जणांसाठी
अधिक टिपा: 

लिंबाचा रस घातल्याने चवही येते व डाळींचा वास मोडला जातो. पण तो प्रमाणात घालावा मिश्रण आंबट होई पर्यंत घालू नये.
ह्या भज्या लहान मुलांना खुप आवडतात.

माहितीचा स्रोत: 
स्वतःचे प्रयोग.
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच.

मी करते पण मी मुगडाळ जास्त त्यापेक्षा कमी उडीदडाळ मग चणाडाळ मग इतर डाळी अजून कमी असे प्रमाण घेते. कांदा आणि लिंबूरस नाही टाकत, आले लसूण मिरची टाकते आणि मिरपूड मस्ट. जिरं आणि ओवाही टाकते.

मिश्रण दळल्यानंतर साधारण दोन तासांनी भजी करते.

छान आहेत वडे मी मुग डाळ व थोडी चना डाळ घेते कडिपत्त्याची पाने पण छान लागतात.
मिश्र डाळीचे पण करुन बघते.

हा तर दालवडा जागु Happy दालवड्यात कांदा आत न घालता वरून कांदा नि मिरची खावयास घेतात .

डाळवडा करताना फक्त चणाडाळ घेते मी आणि कांदा त्यातच टाकते. एका डाळवडावाल्यानेच ही रेसिपी सांगितली. इथे डाळवडा मिळतो त्यात कांदा आतच घालतात.

अंजू मी गुजराती दालवड्याबदल लिहील आहे. ते ना सालीमुगदाल, चना अन उडीद दाल असे घेतात. खूपच फेमस आहे इथे ही डिश. खीरू (अर्थात ओले पीठ) ही सर्रास मिळते. पिठात ते मिरच्या, आलेलसूण, को. घालतात आणि बरोबर कांदा उभा कापलेला अन तळलेली मिरची. भन्नाट लागते.

ओके ओके अनघा Happy . इथे मद्रासी दालवडा मिळतो ना.

असं पण गुजराथमध्ये सालवाली मुगडाळ फेमस आहे, आई गुजराथची असल्याने बरेचदा खिचडी तशीच मुगडाळ घालून करते.

ती सालवाली मुगडाळ मी नेहमी आणते. चविष्ट असते ती.

रश्मी, अंकु, बी धन्यवाद.

अन्जू मुगडाळ जास्त घेतलेलीच चांगली त्यामुळे वडे थोडे पचण्यास हलके होतात.

सकुरा हो कढीपत्याची पानेही छान लागतील. पण आमच्या बच्चे कंपनीला आवडत नाहीत म्हणून नाही घातली.

अरे वा गुजराती डाळवडा असा असतो का छान. इथे डाळवडा मिळतो तो फक्त चणाडाळीचा असतो.

वाह!! मूगवड्याचं एक्स्टेंशन मस्तंय..

मी थोडं आलं,हिरवी मिरची वाटून घालते, थोडी मूग डाळ भरड, ऑलमोस्ट अक्खी च घालते , खडबडित टेक्श्चर करता, बाकी कृती तुझ्यासारखीच.. फक्त वाटलेल्या डा ळींचे मिक्शचर दोनेक तास तसेच राहू देते.

नुसत्या चण्याच्या डाळीचे वडे गरम गरम खाल्ले तर छान लागतात, नाहीतर फारच कोरडे होतात आतून..

लई तोंपासु दिसिंग.

तेल कमी खायचं असल्याने याच पिठाची थालिपिठं/धिरडी/डोसे करण्यात येतील.

जागू, भजी सॉल्लिड दिसतायत!

दीमा, नविन प्रथेप्रमाणे आप्पेपात्रात करा. कमी तेलात होतील. करुन पहा, चांगली लागली तर इथे सांगा. मग मी पण करीन Wink

जागूताई, छानच पा.कृ. आहे, हे वेगळं लिहायची गरज नाही. पण हा फाऊल आहे. ईतक्या दिवसांनी तुम्ही पा.कृ. पोस्ट केलीत आणी ती परमेश्वराच्या प्रथमावताराची नव्हती. Wink

दीमा, नविन प्रथेप्रमाणे आप्पेपात्रात करा. कमी तेलात होतील. करुन पहा, चांगली लागली तर इथे सांगा. मग मी पण करीन>> >अवो ताई इथे पहा - http://www.maayboli.com/node/42022

Pages