फाटक - ५

Submitted by घायल on 6 December, 2015 - 06:50

मागील भागासाठी येथे क्लिक करा

"गायकवाड "
,
,

कागलकरांची हाक ऐकताच हेड कॉन्स्टेबल गायकवाडने त्यांच्यापुढे नोटपॅड ठेवली.
कागलकर बारकाईने पाहू लागले.
मग अचानक स्मित करत गायकवाड कडे पाहू लागले

" मिसेस कागाळेंकडून त्यांच्या मामेभावाचा पत्ता नि फोन नंबर घ्यायला तुला कुणी सांगितलं ?"

उत्तरादाखल गायकवाड चक्क लाजून हसला.

साहेबाच्या बोलण्य़ात आलेले उल्लेख ऐकून काय काय नोंदवून घ्याय़चंय हे त्याला आता चांगलंच ठाऊक होतं. मिसेस कागाळेंना थांबवून त्याने रीतसर सर्व काही लिहून घेतलं होतं. या नोंदी साहेबांना खूष करतील हे त्याला ठाऊक होतं

खूप जुनी घटना असल्याने तिची नोंद करताना कागलकर काळजी घेत होते.वरीष्ठांशी बोलून घ्यायचं राहीलं होतं.
तेच काम त्यांना फारसं आवडत नव्हतं. खात्याकडून काही मदत होईल अशी अपेक्षा नव्हती. तसंच मुद्दामहून कुणी अडथळा आणेल असंही नव्हतं. खरं म्हणजे त्यांची दखलच घेतली जाणार नाही याची त्यांना खात्री होती.
पण बोलणं गरजेचं होतं. पुन्हा काही झालं तर इतकी जुनी केस उकरून काढायची काय गरज होती म्हणून फायरिंग होण्यापेक्षा हे परवडलं.

अपेक्षेप्रमाणे वरीष्ठांनी त्यांच्या म्हणण्याला वाटाण्याच्या अक्षता लावल्या. पुरावा नसताना जुन्या केससंदर्भात विनाकारण काम वाढवून ठेवू नका असं त्यांनी बजावलं. शिवाय त्या वृद्धाकडे पुन्हा जाऊ नका असा सज्जड दमही भरला. केस डिसमिस झाल्यातच जमा होती.

अशा वेळी काय करायचं हे कागलकरांना चांगलंच माहीत होतं. सर्वांनाच माहीत असतं. फक्त कागलकरांसारखा मनुष्य ते प्रत्यक्षात आणू शकतो.

त्यांनी वरीष्ठांना या केससंदर्भात लेखी कळवलं. शिवाय डायरीतल्या नोंदींचा उल्लेख करण्यास ते अजिबात विसरले नाहीत. संशयास्पद वाटणा-या या वृद्धाच्या बाबतीत काय करावे अशी पृच्छा त्यांनी त्या पत्रात केली होती. फोनवर मनाई केल्यानंतरही या त्यांच्या उद्योगामुळे वरीष्ठ चांगलेच चिडणार याची त्यांना पुरेशी कल्पना होती.

गायकवाडशी बोलत असताना त्यांच्या डोक्यात अनेक विचार होते.

"गायकवाड , तुला काय वाटतं या केसबद्दल ?"
" मला काय वाटायचं साहेब ?"
" आत्तापर्यंत जी माहीती आलीय, त्यावरून काहीतरी मत झालं असेल ना तुझं ? बोल की लेका मग "
" सर, मला काय वाटतं माहीत्ये का ? म्हाता-याकडं पैसा असल दाबून. पोराबाळांना दिला नसल. कंजूष दिसतंय. याच्याशी कुणी संबंध ठेवत नसतील. म्हणून मग गुपचूप कायतरी लफडं केलं असल, त्या बाईनं पैसा मागितला, मग यानं काटा काडला, नाहीतर आपसूकच अ‍ॅक्षीडेंट मधी गेली बाई. कोण येत नाही अन जात नाही. मिटलं गुपचूप "
" पन मग बॉडीची विल्हेवाट लावायला कुणाला तरी बोलवलं असेल ना ? मर्डर असो नाहीतर अ‍ॅक्सीडेंट, नाहीतर नॅचरल डेथ. या म्हाता-याला पुढचे सोपस्कार झेपतील का ?
" हा प्वॉईण्ट बरोबर साहेब. "
" याला मदत कोण करेल ?"
" काय सांगता येत नाही साहेब "
" अरे, म्हणजे माणूस कुणाकडून मदत घेतो अशा वेळी ?"
" ओळखीपाळखीचा, त्यातून तोंड बंद ठेवणारा माणूस बघून मदत मागल. "
" असा माणूस कोण ?"
" काय साहेब, निकालच लावला कि केसचा !"
" नाही. बाईचा मृत्यू झाला अशी शक्यता गृहीत धरली तर हे ध्यानात घ्यायला लागेल "
" साहेब, पाण्याच्य़ा टाकीजवळचा राम "
" आणि ?"
" अजून कोण नाही "
" त्यांची मुलगी, जावई आणि आता... मुलीचा मामेभाऊ. म्हणजे यांच्या पहिल्या बायकोचा भाचा "
" तो पण ?"
" नाही. इतक्या लोकांवर विश्वास टाकून मदत घेता येईल "
" पण मुलीशी जमत नाही तर पहिल्या बायकोच्या माहेरची मंडळी कशाला भानगडीत पडतील "
" माहीत नाही. पण आणखी कुणी आहेत का याची माहीती काढ. अगदी फालतू वाटलेला माणूस असेल, यांच्याशी एकदाच बोलला असेल तरी माहीती घे "
" पण साहेब, मग आपल्या रेकॉर्डला काहीच नाही त्याचं काय "
" इथे त्या वेळी फौजदार गोडबोले होते".
" एक नंबर करप्ट माणूस, साहेब. किती खावं याला लिमीटच नाही".
" तू उत्तर पण दिलंस की, आता कामाला लाग. संध्याकाळी रिपोर्ट करायला तेशील तेव्हां चांगली माहीती घेऊनच ये. जाताना रामेश्वरकडे चहा सांग दोन "
" दोन ? कोण येणारे आज ?"
" माझ्यासाठीच दोन कप "

गायकवाड गेल्यानंतर कागलकरांनी टाचणवही काढली आणि त्यात नोंदी करू लागले.
.......................................................................................................................................................

गायकवाड पाण्याच्या टाकीजवळ पोहोचला तेव्हां राम घरात नव्हता. त्याची बायकोच होती.
एक तर एकटी, त्यातून हवालदाराला बघून ती जास्तच घाबरली.
कुत्र्याला आणि पोलिसाला माणसाच्या घाबरण्याचा वास येतो बहुतेक.

तिला जरा बोलतं करावं म्हणून गायकवाडने हवापाण्याच्या गप्पा केल्या. डोंगरावरचा पाऊस, टाकी भरायच्या वेळा, पाणी सोडण्याच्या वेळा याबद्दल उगीचच चौकशी केली. मग जरा घरगुती प्रश्न विचारून झाल्यावर मुद्याला हात घातला.

पण जसा त्याने म्हाता-याच्या घराकडे मोर्चा वळवला तसं ती गप्प झाली.
हवालदार पण चिकाटीचा होता. त्याने सर्व मार्ग वापरायचे ठरवले होते. हळू हळू रामची बायको बोलू लागली.
तिच्या बोलण्यात व्यत्यय न आणता गायकवाड सगळं फक्त ऐकत होता. मध्येच एखादा प्रश्न विचारत तिची गाडी नेमक्या ठिकाणी आणत होता.
दीड तास गेल्यावर आता आणखी प्रश्न विचारण्यात अर्थ नाही हे त्याच्या लक्षात आलं. तरी ठेवणीतला दम भरूनच तो निघाला.
कडकडून भूक लागली होती. आत शिजणा-या मटणाच्या रश्शाच्या वासाने त्याला आता वशाटाशिवाय घास खाली जाणार नव्हता. घरी जेवायला जाण्यापेक्षा मनोहर मिलजवळच्या भोलेनाथ शाकाहारी मांसाहारी जेवण तयार आहे या पाटीशी येऊन तो थांबला.

जेवण पण होणार होतं आणि दुसरंही एक काम झालं असतं.

संध्याकाळी कॉ. गायकवाड रिपोर्टींगसाठी आला तेव्हां नेमके साहेब जागेवर नव्हते. कदमला सांगितलं होतं की जरा पेपरवाल्याकडे जाऊन येतो.

पेपरवाल्याकडं आवर्जून का गेले बरं साहेब ?
गायकवाड बुचकळ्यात पडला होता.

(क्रमशः)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बापरे सगळे भाग आल्यावर गोष्ट परत एकदा वाचावी लागणार आहे. कापोचे साहेब कडकडून भूक लागलेल्या पुढे एका वेळी ५ चुरमुरे टाकावे तसे करतायत Happy

कापोचे साहेब कडकडून भूक लागलेल्या पुढे एका वेळी ५ चुरमुरे टाकावे तसे करतायत >>> अगदी अगदी अगदी .
मोठ्या उत्साहाने बाफ उघडावा आणि वाचून पूर्ण करायला ३ मि. ही लागू नये . Sad .
नॉट फेअर !!!!!!!!

कापोचे साहेब कडकडून भूक लागलेल्या पुढे एका वेळी ५ चुरमुरे टाकावे तसे करतायत >>> अगदी अगदी अगदी .
मोठ्या उत्साहाने बाफ उघडावा आणि वाचून पूर्ण करायला ३ मि. ही लागू नये >>>>>>> +१

कापोचे साहेब कडकडून भूक लागलेल्या पुढे एका वेळी ५ चुरमुरे टाकावे तसे करतायत >>>> Lol

मस्त चाललीय गोष्ट, अजुन काहीच क्लु लागत नाहीये. कल्पनेतल्या गोष्टी डायरीत लिहिल्या आणि त्या डायरीच्या सुतावरुन पोलिस स्वर्ग गाठताहेत की खरेच फाटकाआड काहीतरी गुढ आहे ....... पुढचे भाग पटापट आले तर बरे नाहीतर आधी काय झाले होते ते विसरायला होते.

एक नंबर झालेत सगळे भाग !!
पटापट टाका हो राव भाग Happy
आम्ही वाट पहतोय

-प्रसन्न

प्रतिसाद वाचून उत्सुक्ता चळावतेय.
नवा भाग आला की उघडून बघतेय क्रमशः आहे की समाप्त ते.
समाप्त आल्यावर वाचायला घेणार

मला लिहीताना " बापरे ! केव्हढ लिखाण झालं नाही आज आपल्याकडून ?" असं होतंय आणि माबोकर अक्षरशः तीन मिनिटात चट्टामट्टा करतात हे पाहून धडकीच भरलीय.

सत्तरीतला स्टॅमिना एव्हढाच असणार रे बाळांनो !
तरी प्रयत्न करतो.

Pages