दोन-पायी पाहुणे (हादगा २)

Submitted by Arnika on 1 December, 2015 - 09:18

पहिला भागः http://www.maayboli.com/node/56604
------------------------------------------------------------
उरला सुरला ११.१०.२०१५ चा दिवस:

ट्रकपासून सावलीतल्या एका फडताळापर्यंत आम्ही रांगेने उभे राहिलो. गडी झपाझप कलिंगडं उचलून पुढे टाकत होता. त्याच्यासाठी हे रोजचंच असलं तरी आम्ही नवीन कामगार मंडळी जरा हाताला चिखल लागला की कौतुकाने फोटो काढायला थांबत होतो. शहरातली खुळी हत्ती बघायला म्हणून येतात आणि “how authentic”, “how exciting” म्हणत फोटो काढत रहातात, त्यामुळे आठवड्याच्या सुरुवातीला कामाचा उरक तितकासा नसतो याची कल्पना होतीच रोजच्या गड्यांना. दोन तासात आम्ही सगळी कलिंगडं उतरवून फडताळात लावली. इतक्यातच हात भरून आले होते आणि दिवस धड सुरूही झाला नव्हता!

हात धुवून बाहेर आल्यावर पहिल्यांदा अवतीभोवती बघायला मिळालं. “हे कोकण आहे” असं पुन्हा म्हणायचं नाही असा काल निश्चय केला होता, तेवढ्यात एकीने झाडावरच्या “purple thing” कडे बोट दाखवलं. दुसरा मुलगा पलिकडून “what’s that smell?” म्हणत फळांच्या टोपल्या हुंगायला लागला. झाडावर केळफूल होतं आणि तो वास फणसाचा होता. माझा दृढनिश्चय संपलाच! प्रवासात ही काय गंमत असते काय माहिती? जिथे जाऊ तिथे सगळं नवीन, वेगळं बघायला मिळावं असं वाटतं, आणि तरी भोवताल ओळखीचा वाटल्यावरही जीव भांड्यात पडतो...

१५.१०.२०१५
गेले चार दिवस नुसते उन्हात फिरतोय! आज जेवणानंतर लिहायला पहिल्यांदा वेळ मिळालाय. खूप नवीन ओळखी, भरपूर काम, त्यामुळे सपाटून भूक आणि अंग टेकल्या टेकल्या (पहाटे तीनला हत्ती उठेपर्यंत) स्वकमाईची शांत झोप असं रोज चालू आहे.

पहिल्या रात्री झोपेचं काही जमलं नाही. पहाटे तीनला पाच हत्तिणींची झोप झाली. सोंडेत सोंड घालून त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. बायकाबायकांच्या गोंधळाने कुत्र्यांना जाग आली. त्यांच्या कचकचाटाने मांजरी उठल्या. रात्री खोलीबाहेरच्या बाथरूमकडे जायला नको म्हणून मी दिवसा पाणी कमी प्यायले होते. तरी जावं लागणार की काय अशा भीतीने मी पायावर पाय घेऊन मुटकुळं करून झोपले होते. आता जमलं! आवाजांची सवय तरी झाल्ये, किंवा दमायलाच इतकं होतंय की बाकी कशाने फरक पडत नाही.

या जागेबद्दल काही लिहिलंच नाही ना? डोळ्यांना सगळीकडे हिरवं लागतंय, कानाला खूप प्राण्याची गडबड दिसत्ये, आणि नाकाला चुलीवर भात खदखदत असल्याचा आवाज येतोय. कुठेही पाऊल टाकताना आधी पायाखाली आणि मग डोळ्यासमोर बघावं लागतंय. आज सकाळी चुकून एका कुत्र्याच्या शेपटीवर पाय देणार होते. मग त्या पिल्लाला कडेवर घेऊन जाताना खांद्यावर एका बोक्याने उडी मारली! तेवढ्यात पाण्यावरचे हत्ती जेवायला गोठ्यापाशी यायला लागले (हत्तींचा गोठा नव्हे, पीलखाना असतो, पण पीलखाना म्हंटल्यावर मला अभयारण्याऐवजी सैन्यात आल्यासारखं वाटतं. गोठा जरा घरगुती वाटतो). हत्ती परत आल्यावर चाळीसेक म्हशी पाण्यावर गेल्या. डोक्यावर चतुर घोंगावत होते. पार्काच्या फाटकापाशी घोडे चरत उभे होते. तिथून पुढे आले तेव्हा एक ऐदी डुक्कर मगरीसारखं शांत बसून होतं. बाथरूममधे पाली आणि रातकिडे हुंदडत होते. कुठलंही दार उघडल्यावर कुठे काही तरंगणारं, उडणारं, सरपटणारं नाही ना ते बघून आत जायची सवय पहिल्या दिवशीच लागली!

त्या अर्ध्या दिवसात एक कायमचं समजलं. या सगळ्यांचं रूटीन लागलेलं आहे. त्यांचं साटंलोटं, भांडणं, जेवणखाणाच्या वेळा, आपापसात आणि निसर्गाशी पक्क्या झालेल्या आहेत. आम्ही दोन पायाच्या व्हीसावर आलेल्यांनी फक्त थोड्या दिवसांसाठी पाहुणे म्हणून नांदून जायचंय...

सकाळी सात वाजता आम्ही साठ जण (माणसं) आवारात एकत्र खातो; मग आपापल्या गटात वेगवेगळ्या कामाला जातो. कसले ते विटके टी-शर्ट आणि हाताला येतील ते लेंगे आणि बूट घालून फिरतोय सगळे! आल्या दिवसापासून साध्या काजळाच्या डबीलाही बोट लावलं नाहीये. बाथरुमात पाल नसेल त्यादिवशी अंघोळ करून येते मी, नाही असं नव्हे, पण तेवढाच काय तो मेक-अप!

चार दिवसात दोनदा गोठा आणि आवार स्वच्छ करून झालं. पाचशे किलो चिंचा, ट्रकभर भोपळे, खोलीभर केळी आणि कलिंगडं उतरवून, धुवून आणि निवडून झाली. एका सहनशील हत्तिणीला अंघोळ घातली; बाकी जणींना खाऊ घातलं. रानात जाऊन गवत कापलं. खांद्यावरून भारे वाहून ट्रकमधे भरले, आणि मग त्याच ट्रकमधे गवतावर बसून पार्कात परत आलो. गवताच्या पात्यांनी हातावर लाल लाल ओरखडे उठलेत, ते कडकडीत उन्हात अजूनच झोंबायला लागले. फार हाय-हुय होतंय म्हंटल्यावर रानातल्या बायकांनी हातावर लावायला बर्फ दिला. आम्ही घायाळ झालेल्या आपापल्या हातापायाचे फोटो काढून घेतलेत! मग नवीन हत्तींच्या चाऱ्याची सोय व्हावी म्हणून नांगरलेल्या उतारांवर गवत पेरून आलो. काल गेरूच्या रंगात आवाराचं कुंपण रंगवलं आणि हत्तींच्या अंघोळीच्या वेळा चुकवून खूपदा नदीत डुंबलो.

या चार दिवसात एक कुत्रा माझा राखणा झालाय. सारखा मागे मागे येतो. परवा हत्तींच्या कळपापाशी गेले तिथेही आला आणि हत्तीचं पिल्लू त्याचा पाठलाग करायला म्हणून माझ्या दिशेने धावायला लागलं. हत्ती पाठलाग करतोय म्हणून कुत्रं अजूनच रंगात आलं. एकीकडे तीनशे किलोचं धूड आपल्या दिशेने दुडदुडत येतंय आणि दुसरीकडे कुत्रं पायाशी घोटाळतंय म्हंटल्यावर मी हातातलं गवत टाकून एका लोखंडी फाटकामागे गेले. त्याचा काहीच उपयोग झाला नसता, कारण रोज तेच फाटक ओलांडायचं ट्रेनिंग देतात हत्तींना! नशिबाने वाटेत केळी दिसल्यावर हत्तीचा धावायचा मूड गेला.

“Oh, you meet Navann!” एक माहुत म्हणाला. नवान (म्हणजे सोनेरी). पार्कातच जन्माला आलेलं स्रीप्रे आणि होप चं तीन वर्षांचं बाळ! स्रीप्रे गाभण होती, वीस महिने नवान पोटात होता, हे कोणाला कळलंच नव्हतं. बरं या बायका बायका कळपाने वेगळ्या रहातात आणि पुरुष लांब एकेकटे रहातात. अगदीच इच्छा झाली तर ‘कामा’पुरता ड्रामा म्हणून ते बायकांच्या कळपाकडे फिरकतात. नवानचा जन्म होण्याच्या दोन वर्ष आधी होप ची या कळपात ये-जा असायची, त्या गणितावरून त्याचं बाबापण नक्की झालं. शिवाय लेक म्हणते की नवान अगदी होप सारखा दिसतो. पहिल्यांदा ऐकलं तेव्हा मी खूप हसले. कान, सोंड, पाठ, डोळे, सुळे... तसेच तर आहेत सगळे. यातलं कोण कोणासारखं दिसतं हे कसं कळणार? पण लेक या सगळ्या हत्तींचा फक्त एक डोळा बघूनही त्यांची नावं सांगू शकते!

२०१२ साली एका पहाटे चार वाजता खूप हत्तिणी एकत्र आरडाओरडा करायला लागल्या. पार्कातले कामगार आणि माहुत उठून बघतात तर स्रीप्रेला बाळ झालं होतं! ते गडगडत गोठ्याच्या दुसऱ्या टोकाला गेलं, आणि मधली दारं बंद असल्याने स्रीप्रेला बाळापाशी जाता येईना. आजुबाजूच्या सगळ्या यशोदा पिल्लाभोवती गोळा झाल्या. तेव्हापासूनच नवानला भरपूर आत्या, मावश्या, माम्या, काकवा आणि आज्या आहेत. त्याच्या आईचा एक पाय मोडका आहे, वयही जास्त आहे, त्यामुळे तिला तो आवरत नाही. तो जरासा पुढे गेला की स्रीप्रे बाकीच्यांना आवाज देते, आणि एका वेळी पाच जणी नवानच्या मागे धावायला लागतात. सुक्साइ नावाची एक रागीट हत्तीण आहे इथे. तिचं कुण्णाशी पटत नाही म्हणून एकटी फिरते, पण नवान आणि तिचं चांगलं गुळपीठ होऊ घातलं होतं. या बाकीच्या बायकांनी काय केलं माहित्ये? कडं केलं त्याच्याभोवती. “या वाह्यात बाईची सावलीही नको मुलावर” अशी आपापसात चर्चा झाली असावी!

डाम नावाचा नवानचा माहुत पूर्वी त्याच्या बाबांना सांभाळत असे; आता त्याने नवानला वाहून घेतलंय. जेवण-खाण सोडून मी डाम-नवानची जोडी बघायला येत्ये चार दिवस. डाम गाणी म्हणतो, नवानला जवळ घेतो, त्याच्याशी खेळतो, त्याचे डोळे स्वच्छ करतो... नवानच्या जन्मापासून हे दोघं एकत्रच असतात. रोज सकाळी डाम स्वत:च्या टोपीवर भोपळे ठेवून नदीकाठी जातो; मागे नवान धावत! खाऊन झालं की नवान डामला जवळ घ्यायला जातो आणि धाड्दिशी पाडतो. अत्ता त्यांच्याकडेच बघत बसल्ये... Happiness की काय म्हणतात ते हेच असावं.

नवानला आता सुळे फुटायला लागलेत आणि त्याची ताकद भलतीच वाढायला लागल्ये. दोन-तीन वर्षात त्याला त्याच्या बाबांबरोबर रहायला जाऊ द्यावं लागेल. त्याला नवीन, जास्त ताकदीचा माहुत लागेल. कळपातल्या योशोदांचं सबंध आयुष्य त्याच्याभोवती फिरत असतं. तो कळप सोडून गेला की त्या सगळ्या काय करतील? डाम लगेच दुसऱ्या हत्तीची देखभाल करू शकेल? आज पाच दिवसातच मला असं वाटतंय; दहा दिवसांनी हे सगळे मला दिसणार नाहीत तेव्हा मी काय करेन?

यांच्या जिवात जीव किती भराभर गुंतत जातोय ना?
---------------

क्रमशः
पुढील भागः http://www.maayboli.com/node/56642

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त मस्त...

प्रवासात ही काय गंमत असते काय माहिती? जिथे जाऊ तिथे सगळं नवीन, वेगळं बघायला मिळावं असं वाटतं, आणि तरी भोवताल ओळखीचा वाटल्यावरही जीव भांड्यात पडतो... <<<
क्या बात! जामच पटलं...

अगं बाई पुस्तक कर ना या सगळ्या अनुभवांचे...

किती गोड! ब्लॉगवरचे फोटोही पाहिले. किती क्यूट आहेत हत्ती. आणि ते पिल्लू तर क्यूटेस्ट्ट्ट्ट्ट्ट!
आपल्या (भारतीय) हत्तींपेक्षा दिसायला हे हत्ती जरासे वेगळे आहेत ना? अधिक गोलगरगरीत वाटले.

अगो +१
प्राण्यांच्या खूप जवळ जायला आवडत नाही, त्यामुळे 'इथे आपण जाऊन राहू शकणार नाही' हे मनात आलंच, पण त्यामुळेच वाचायला अधिक मजा येते आहे. Happy

प्राण्यांच्या खूप जवळ जायला आवडत नाही, त्यामुळे 'इथे आपण जाऊन राहू शकणार नाही' हे मनात आलंच, पण त्यामुळेच वाचायला अधिक मजा येते आहे. स्मित > +१

Thank you Happy सगळे भाग लिहून झाले की मी फोटो देईन नक्की. सध्या ते गोळा करून नीट लावण्याचं चाललंय! प्राणीप्रेमी आणि दुरून प्राणीप्रेमी सगळ्यांचा response वाचून छान वाटतंय!

कुठे होतीस इतके दिवस?>> पेनातली शाई संपल्यासारखं का झालं होतं इतके दिवस कुणास ठाऊक! पण परत आल्याचं खूप बरं वाटतंय...
आणि ए मिर्चे, अत्ताच तर टाकला पुढचा भाग, थांब ना गं जरा त्यापुढचा जमेपर्यंत! Wink नीधप, खरंच पुस्तक करू??

अप्रतिम लेखन.... फार सुरेख आहे हे सर्व.
लेखमाला संपताना या ठिकाणाची माहिती आणि संपर्क देता आला पाहा जायला खूप आवडेल.

हत्ती हा माझ्याही जिव्हाळ्याचा विषय आहे.

मी फक्त प्लस वन टाकते.

वर्षू नील प्लस वन
धनवन्ती प्लस वन.

आणि हो तुझ्य त्या सगळ्या हत्ती आणी हत्तिणी मित्र मैत्रिणींना आणि नवानला माझ्याकडून उम्म्म्मा

Pages