मढे घाट, उपांड्या घाट आणि रायलिंग पठार

Submitted by योगेश आहिरराव on 20 November, 2015 - 01:04

मढे घाट, उपांड्या घाट आणि रायलिंग पठार

गेल्या महिन्यात शिवथरघळला गेलो असताना, या भागातल्या घाटवाटा खुणावत होत्या. शेवत्या, मढे, उपांड्या, आंबेनळी, गोप्या, खुट्टे हे सर्व या भागातील पूर्वीपासून देशावरून कोकणात उतरण्यासाठी प्रचलित घाटमार्ग. अर्थात अजुनही स्थानिक गावकरी आणि डोंगरभटके इथून ये जा करतातच.
या पैकी दिवाळीच्या सुट्टीत मढे व उपांड्या या दोन सुंदर घाटवाटा आणि रायलिंग पठार जाण्याचा योग जुळून आला.
शुक्रवारी भल्या पहाटे’ मी’ आणि ‘ई.एन.नारायण ’(अंकल) कल्याणहून निघालो, वाटेत डोंबिवलीस्थित आमचा मित्र ‘सौरभ आपटे’ याला गाडीत घेऊन, द्रुतगती महामार्गावरून सकाळी आठ वाजताच पुण्यात दाखल झालो. पुढे अर्ध्या पाऊण तासात ‘खेड शिवापूरचा’ टोल नाका ओलांडून नसरापूरफाट्यापासून उजवीकडे ‘वेल्हा’ या तालुकाच्या गावाचा रस्ता पकडला.
थोडे अंतर गेल्यावर डावीकडे राजगडाच्या दर्शनाने मन प्रसन्न झाले. बारा वर्षांपूर्वी सौरभ आणि आम्ही केलेल्या ‘राजगड – तोरणा’ ट्रेकच्या आठवणी जाग्या झाल्या. मार्गासनी, विंझर अशी गावे मागे टाकत ‘वेल्हा’ येथे पोहचलो. समोरच ऊंच तोरण्याची तटबंदी खुणावत होती, मनात आले जाऊ या का ? नक्कीच परत पुन्हा येणारच. खऱच या सह्याद्रीत काही जागा अशा असतात की त्या आपल्यासारख्या भटक्यांना पुन्हा पुन्हा साद घालतात. कितीही वेळा गेलो तरी मन भरतच नाही, असेच हे बुलंद दुर्ग’ राजगड - तोरणा’ व इथला परिसर.
एका छोट्या हॉटेलात चहा नाश्ता करून दुपारचे जेवण पार्सल घेतले. आता ‘केळदचा’ रस्ता धरला, गुजंवणे धरणाचे काम चालु असल्याने, डावीकडच्या रस्त्याने वळसा घालून ‘भट्टी’ गावाच्या मुख्य रस्त्याला लागलो. भट्टी घाटातून जाताना कानंद खिंडीतून डावीकडे तोरणाचे विशाळा टेपाड आणि चिलखती बुरूजांची तटबंदी खास उठून दिसत होती.

पुढे बहूतेक जाधववाडी? नामक छोट्या पठारवजा गावाहून जाताना बर्याच ठिक ठिकाणी, गुंठेवारीच्या नावाखाली जमिनीचे तुकडे पाडून कुंपन घातलेले दिसले. हे सर्व पाहून आम्हाला वेल्हा गावात एकाने ' जमिन - प्लॉट पहायला जाताय का ?' हे का विचारले ,तर याचा उलगडा आता आम्हाला झाला. थोडक्यात सह्याद्रीच्या विद्रुपीकरणाला सुरूवात झालीय.
पुढे केळदचा घाट पार करून साधारण अकराच्या सुमारास ‘केळद’ गावात दाखल झालो. वेल्हा तालुक्यात पश्चिमेला सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर वसलेले टूमदार गाव. याच गावातून ‘मढे’ आणि ‘उपांड्या’ या घाटवाटा खाली उतरतात. साधारणपणे निम्यापेक्षा थोडे अधिक उतरल्यावर दोन्ही वाटा मधल्या पठारावरच्या ‘कर्णवडी’ गावात जातात, पुढे एकत्रित रानवडी गावात उतरतात तिथूनच पुढे शिवथरघळीत जाता येते.
गावात ‘लक्ष्मण शिंदे’ यांच्या घराजवळ गाडी उभी करून, प्रथम मढे घाटाकडे निघालो.

वाटेतली छोटी नदी ओलांडून थोडे अंतर गेल्यावर सरळ उपांड्या घाटाकडे जाणारी वाट दिसली. आम्हाला मात्र मढे घाट उतरून उपांड्या घाटाने वर यायचे होते. उजवीकडची मढे घाट व लक्ष्मी धबधब्याची रूळलेली वाट पकडली. दहा पंधरा मिनिटातच घाटाच्या मुख्य कड्यावर आलो.

डावीकडे लक्ष्मी धबधब्याची बारीक धार सुरू होती, पावसाळ्यात मात्र हेच रूप प्रचंड महाकाय असणार यात शंकाच नाही.
ऐन दुपारी बारा वाजता सुध्दा घाटमाथ्यावर गार वारा लागत होता.

उजवीकडे गाढवकड्याचे टोक, खाली दूरवर नाणेमाची शेवत्याची बाजू व खाली समोर कर्णवडीचे पठार. धबधबा डावीकडे ठेवून थोडं पठारावर उजवीकडे गेल्यावर वाट व्यवस्थित खाली उतरू लागली.

मढे घाटाची ही अगदी मळलेली वाट, काही ठिकाणी जुन्या पायर्या आहेत. वाटेत दिसला हाच तो वरून येणारा लक्ष्मी धबधबा.

नागमोडी वळणे घेत वाट खाली उतरते तसेच वाटेत बर्यापैकी सावली देणारे जंगल आहे.

‘सिंहगडावर बलिदान दिलेल्या सरदार ‘तानाजी मालुसरे’ यांचे शव याच घाटाने खाली ‘बिरवाडी’ मार्गे त्यांच्या ‘उमरठ’ या गावी नेले. म्हणूनच केळद घाटाचे नाव मढे घाट प्रचलित झाले असे ऐकिवात आहे.’ रमत गमत पाऊण एक तासात मधल्या पठारावर आलो, डावीकडची ‘कर्णवडी’ या छोटेखानी गावाची वाट धरली. वाटेत ऐके ठिकाणी उजवीकडे हा ‘गाढवकडा’ भारीच दिसत होता.

थोडे अंतर गेल्यावर त्याच लक्ष्मी धबधब्याचा येणारा छोटा ओढा पार करून,इथेच दुपारचे जेवण केले.

दहा मिनिटात या विहीरीपाशी आलो.

इथूनच डावीकडच्या एका घळीतून उपांड्या घाटाची वाट वर चढते.

गावात गावकर्यांची शेतीची कामे सुरू होती. आणखी थोडे पुढे गेलो एका घरासमोरून एक वाट पिण्याच्या पाण्याच्या टाक्याकडे जाते.

तिथूनच उपांड्या घाटाची चढाई सुरू झाली. याच वाटेवर वरून केळदहून आलेला पाण्याचा पाईप.

वाट हळूहळू तिरक्या चालीने चढू लागली. मढे घाटाच्या तुलनेत या वाटेवर झाडी मात्र कमीच.

छोट्या छोट्या कातळटप्यावरून न चुकता घाटमाथ्यावर सहज घेऊन जाते.

सायंकाळच्या प्रकाशात वाळलेले गवत बाकी पिवळे धमक चमकत होते.

वर आल्यावर पुन्हा गार वारा अंगावर घेत विसावलो.

खाली दुरवर शिवथर घळीचा रस्ता, सायंकाळच्या सुर्यप्रकाशात चमकणारे शिवथर नदीचे पात्र. पलीकडे रामदास पठार, डाव्या हाथाला कावळ्या किल्ला, वरंधघाटाची डोंगररांग, दुरवर पश्चिमेला कांगोरी आणि त्यामागे प्रतापगड व मकरंदगड धुसर दर्शन देत उभे होते.

सायंकाळी साडेपाचच्या सुमारास गावात परतलो.

मग अंघोळीसाठी नदीवर गेलो. दिवसभराचा प्रवास आणि छोटी घाटयात्रा करून दमलेल्या शरीरात अंघोळी नंतर चांगलीच तरतरी आली. गावात घराच्या अंगणात रांगोळ्या व दिवे लागण झाली, कुठे ही सह्याद्रीत विना गोंगाट, प्रदुषणमुक्त दिवाळी शांतपणे साजरी होत होती.

शहरी फटाकडी कोलाहाटापेक्षा हे वातावरण खुपच चांगले होते. रात्रीचा मुक्काम ‘लक्ष्मण शिंदे’ यांच्याकडेच केला.
दुसर्या दिवशी सकाळी चहा नाश्ता करून केळदहून निघालो. पाच ते दहा मिनिटात केळदघाटाचा चढ चढून छोट्या खिंडीत आलो, इथूनच डाव्या हाथाला कच्चा मातीचा रस्ता सिंगापूर, मोहरी या गावात जातो.

ठरल्याप्रमाणे बरोब्बर साडेनऊ वाजता पुण्याहून बाईकवरून आमचा दुर्ग मित्र ‘ओंकार ओक’ याचे आगमन झाले. इथून आम्ही चौघे एकत्र रायलिंग पठारावर जाण्यासाठी मोहरी गावासाठी त्या लाल मातीच्या कच्चा रस्त्यावरून निघालो. या वाटेवर गाडी पुर्ण लाल धुरळा उडवत चालली होती. आणि काही मिनिटातच पूर्ण गाडी लाल मातीच्या धुळीने माखली.
इथे सुध्दा वाटेतल्या पठारावर रिसॉर्ट- बंगला इ. बांधकाम चालू दिसले. थोडे वर आल्यावर ‘राजगड- तोरणा’ यांना जोडणारी पुर्ण डोंगररांग दिसली. पुढे काही अंतरावर एका वळणावर येताना पहिल्यांदा ‘रायगड’ व लिंगाण्याची झलक.

हळूहळू मातीचा घाटरस्ता पार करत चाळीस मिनिटात ‘मोहरी’ गावात आलो. मोहरी गावाच्या डावीकडे थोडे खाली सिंगापूर गाव आहे, तिथपर्यंत माती रस्त्याचे काम करनारे डंपर व जेसीबी यांची ये जा सुरू होती.
ओंकारने आधी गावात जाऊन एका ओळखीच्या घरात आमच्या दुपारच्या जेवणाची सोय केली. आम्ही चौघेही तडक निघालो ते पठाराकडे, कधी एकदा जवळून तो ‘लिंगाणा’ आणि ‘रायगड’ पहातोय असे झाले होते. गावाजवळच्या विहिरीतून पिण्याचे पाणी बाटलीत भरून घेतले.

पाऊण तासात एका छोट्या टेकडीला वळसा घालून थोडे खाली उतरून पठारावर पोहचलो.

वाटेत सिंगापूर नाळेत उतरणारी वाट दिसली, इथून खाली कोकणात उतरून रायगडावर जाता येते.
आत्तापर्यंत फोटो मध्ये अनेक वेळा पाहिलेले दृश्य डोळ्यासमोर आले. सुंदर आणि अप्रतिम नजारा. समोरच्या दरीतून जवळच उठावलेला’ लिंगाणा’ साक्षात शिवलिंगासारखा भासत होता त्याच्या मागे स्वराज्याची राजधानी ‘किल्ले रायगड’.

खऱच ‘लिंगाणा’ पहावा तर तो रायलिंग पठारावरूनच, त्याची ऊंची, भव्यता पहाताक्षणीच धडकी भरवते.

दुरवर किल्ले रायगडावर जगदिश्वर मंदिर सहज ओळखु येत होते. उजवीकडे दिसतो तो कोकणदिवा, खानुचा डिगा, कणा डोंगर तर डावीकडे बोराट्याची नाळ, सिंगापूरची नाळ व अवघड अशी भिकनाळ. या सर्व घाटावाटांनी खाली कोकणात उतरून काळ नदीचे खोर ओलांडून रायगडावर जाता येते. अर्थातच हा कसलेल्या डोंगरभटक्यांचा मार्ग. भरपूर वेळ पठारावर रेंगाळलो,इथून पाय काही निघेनात.

दुपार झाली ते सर्व दृश्य मनात साठवून, परत माघारी ‘मोहरी’ गावात आलो. दुपारचे जेवण करून निघेपर्यंत चार वाजले. पुन्हा त्या मातीच्या घाटरस्त्यावरून जाताना नजर सारखी लिंगाण्याकडेच जात होती. आल्यामार्गे खिंडीतून,वेल्हा गावात सायंकाळचा चहा घेतला. पुढे नसरापूर फाट्याला ओंकारला निरोप देऊन. पुणे द्रुतगती महामार्गावरून रात्री साडेनऊच्या सुमारास कल्याणात परतलो. दोन्ही दिवस मस्तपैकी सह्यभटकंतीत सत्कारणी लावून आम्हा भटक्यांची चांगलीच दिवाळी साजरी झाली.

योगेश चंद्रकांत आहिरे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मढे घाट, उपांड्या घाट आणि रायलिंग पठार....एक मोठा उसासा..... मला केव्हाचं जायचंय इथे

पण तोवर असे लेख वाचून स्वतः तिकडे जाऊन आल्याच्या थाटात मित्रांशी बोलता येते हा एक मोठाच फायदा Proud

अनेकानेक धन्यवाद Happy

योगेश मस्तच … !!!

बाकी प्रजा दिवाळीला घरी किल्ले बनवते तुम्ही किल्याच्या अंगणात दिवाळी साजरी केली.

रायलिंग वरून लिंगाणा खूपच अप्रतिम दिसतो

रायगडची जीवनकथा ह्या शांताराम अवळूस्कर च्या पुस्तकामध्ये लिंगाणा वर्णन
Optimized-lingana_info (1)_0.png

पुढील भटकंतीस शुभेच्छा

मस्त, खूपच छान!!

२ वर्षांआधी मढे घाट पावसाळ्यात बघितला होता. त्यावेळी लक्ष्मी धबधब्याचे दर्शन मस्त झाले होते.
आठवणी जाग्या झाल्यात! परत एकदा जायचय Happy

मस्त वर्णन!

लिंगाणा किल्ल्यावर पूर्वी कैदी ठेवायचे असं ऐकून आहे. पण किल्ल्याचा माथा तर अगदीच छोटा आहे ना? का पूर्वी तेथे इमारत होती? तसंच पूर्वीच्या काळी माथ्यावर जायला रस्ता होता का?

मस्तच रे योगेश. मस्त भटकंती आणी फोटो.
केळद, मढे आणी उपांड्या हा भागच अप्रतीम आहे आणी खास करून पावसाळ्यात तर हा भाग भन्नाट असतो.

(मी तुला सांगीतले होते की ह्या भागात पावसाळ्यात जा अजून मस्त वाटेल, तरी तु आत्ताच जाऊन आलास तर Wink )

@ तोफखाना. दिवाळी किल्ल्यांच्या अंगणात हि बातच काही और.
'रायगडची जीवनकथा' हे शांताराम आवळस्करांचे पुस्तक माझ्या संग्रही आहे.
'रायगड' व त्या भोवतालच्या सर्व भौगोलिक आणि ऐतिहासिक गोष्टी त्यात सामावल्या आहेत.

@ चीकू. लिंगाणा बद्दल थोडेफार ऐकले व वाचले आहे. आता 'तोफखाना' यांनी जे पुस्तकातील वर्णन दिले आहे. जसे कि बुरूज, हौद, कोठार, पहार्याची जागा, सदर एवढे अवशेष आज तरी खासा दिसत नाहित. यातील काही महत्वाचे बांधकाम कदाचित त्यावेळी लिंगाणा माचीत असु शकते. किल्ल्याचा मध्यभागी गुहा व टाके मात्र आहे.तिथे जाण्या इतपत त्यावेळी पायर्या असू शकतील. पण ती शक्यता सुध्दा कमी कारण त्या गुहेत कैदी व गुन्हेगार डांबले जायचे. एकदा का दोर व शिडीच्या सहाय्याने त्यांना तिथे सोडले की परतीचा मार्ग बंद. हे वर्णन प्र. के. घाणेकरांच्या पुस्तकात आहे.

@ स्वच्छंदी साहेब, तुम्ही सांगतिल्याप्रमाणे पावसाळ्यात हा भाग अतिशय सुंदर असणार यात शंकाच नाही.
त्याचा अंदाज मला आत्ता आलाच. पण या वातावरणात ही, काही कमी नाहीच.
राहिले तर पावसाळ्यात या भागातला 'शेवत्या घाट' करूया की.

लिंगाण्याची नेमकी रचना कशी असावी ते कळत नाही. वर आपण म्हणालात की बुरूज, हौद, कोठार, पहार्याची जागा, सदर एवढे दिसत नाही. पण एकंदरीत ह्या गोष्टींसाठी तटबंदी / बांधकामासाठी जागा तरी आहे का तिथे?

शिवाय त्या गुहेत ठेवल्या जाणार्या कैद्यांबद्दल, त्यांना दोरीनी नेमके कुठून गुहेत सोडले जायचे? गुहेचे स्थान येथे लक्षात येईल.

लिंक: http://indiahikes.in/lingana-raigad/

लिंगाण्याची नेमकी रचना कशी असावी ते कळत नाही. वर आपण म्हणालात की बुरूज, हौद, कोठार, पहार्याची जागा, सदर एवढे दिसत नाही. पण एकंदरीत ह्या गोष्टींसाठी तटबंदी / बांधकामासाठी जागा तरी आहे का तिथे? >>>>

मला वाटतं हे सगळं बांधकाम लिंगाणा माचीवर असावं, गडावर नाही तिथे तर अगदी कमी जागा आहे. माचीवर काही अवशेष आहेत का ते माहीत नाही.