समोर आलेल्या कलाकृतीतील रस चाखून पाहिला. 'रस प्राप्त झाल्याचा' मर्यादीत आनंद उपभोगून झाला. ही कलाकृती दररोज किंवा सातत्याने समोर येऊन पुढे सरकत राहते, विकसित होत राहते ह्यामुळे काही रसिकांनी जालीय व्यासपीठावर त्या कलाकृतीसंदर्भात धागा निर्माण केला. त्या कलाकृतीचे सच्चे चाहते, अनियमीत प्रेक्षक, त्या कलाकृतीचे सच्चे टीकाकार, खिल्ली उडवणारे, वेळ आहे म्हणून गप्पांत सहभागी होणारे, कलाकृतीच्या विकसित (/अविकसित) होण्याबरोबरच स्वतःचे मतपरिवर्तन करत राहणारे, मते लादणारे, मतांनी प्रभावित होणारे, निव्वळ हसू पाहणारे, कलाकृती पाहता न आल्याने 'अपडेट्स' वाचण्यास येणारे, ह्या धाग्यामार्फत स्वतःचे मनोरंजन करून घेणारे! असे सगळेजण त्या धाग्यावर येऊन झाले. चर्चेचा सुरुवातीला असलेला 'मूड' पार बदलला. धागा चालूच राहिला, कारण कलाकृती, म्हणजे येथे उपग्रह वाहिनीवरून प्रकाशित होणारी मालिका, चालूच राहिली.
हे सदर 'उपग्रह वाहिनी - मराठी' असे आहे, ह्याचे भान आहे. पण तरी ह्या मर्यादेबाहेर जाऊन काही इतर भाषिक मालिकांचे तपशीलही नोंदवत आहे व तसे करण्यास कृपया परवानगी असावी अशी विनंती करत आहे.
========================
प्रथम काही मालिकांची शीर्षके निव्वळ आपल्या नव्याजुन्या स्मृती जागृत करण्यासाठी नोंदवत आहे.
काही गाजलेल्या मालिका :-
होणार सून मी या घरची
जुळून येती रेशीमगाठी
कॉमेडी नाईट्स विथ कपिल
अदालत
एन्काऊंटर
सी आय डी
खतरोंके खिलाडी
क्राईम पॅट्रोल
सावधान इंडिया
बडे अच्छे लगते है
तुम्हारी पाखि
देशकी बेटी नंदिनी
कौन बनेगा करोडपती
खानदान
सत्यमेव जयते
होम मिनिस्टर
महाभारत (नवीन)
महाभारत (जुनी मालिका)
रामायण
हमलोग
बुनियाद
यह जो है जिंदगी
नुक्कड
गजरा
श्वेतांबरा
मालगुडी डेज
लाईफ लाईन
========================
विषयाची व्याप्ती : -
१. कालावधी - साधारण १९८५ ते २०१४
२. भाषा - मराठी व हिंदी
३. प्रकार - सलग कथानक, प्रत्येक भागात वेगळे कथानक, कथानकच नसणे तर काही कलाप्रकार असणे (जसे विनोद, संगीत, साहसी खेळ वगैरे)
४. मालिकेची लांबी - ठराविक आठवडे ते दोन दोन वर्षे (वगैरे)
५. टारगेटेड ऑडियन्स - कुटुंबकबिले, महिला, निव्वळ मनोरंजन म्हणून मालिका बघणारे कोणीही एकटेदुकटेही!
६. मालिकांचे मूळ हेतू (डिसेंडिंग ऑर्डरनुसार) - मनोरंजन / वास्तव चित्रण व सतर्क करणे / इतर काही
(ह्यापैकी मनोरंजन हा मूळ हेतू असण्याची टक्केवारी 'नक्की किती' असा काही आकडा मिळवणे शक्य नसले तरीही इतके नक्की की 'मनोरंजन' हा मूळ हेतू असलेल्या मालिकांनी आजवर सर्वाधिक 'एअर टाईम' व्यापलेला आहे).
(ज्ञानवर्धन करणार्या काही मालिका वरील यादीत असल्या / नसल्या तरी त्या प्रदर्शीत झाल्या ह्याची जाणीव आहे, पण संख्या व प्रमाण नगण्य म्हणावे लागेल.)
(बातम्या किंवा इतर काही प्रकारच्या सातत्यपूर्ण कार्यक्रमांना मालिका असे म्हणण्यात न येण्याचे कारण ते 'मुद्दाम निर्माण केलेले' शो नसतात.)
========================
काही आकडेवारी (जालावरून साभार) : -
भारताची लोकसंख्या :-
१९८० - ६८ कोटी
२०१४ - १२४ कोटी (३४ वर्षात सुमारे ८३ टक्के वाढ)
टीव्ही कार्यक्रम अनेक चॅनेल्ससकट भारताच्या 'सुमारे' किती लोकसंख्येपर्यंत पोचलेले होते / आहेत?
१९८५ - १४ कोटी
२०१४ - ८४ कोटी (२९ वर्षात 'सुमारे' सहापट, म्हणजे सुमारे 'पाचशे' टक्के वाढ)
========================
भारतीय माणसाच्या जीवनात ह्या कालावधीत झालेले तीन महत्वाच्या निकषांनुसारचे बदल :-
राहणीमान विकास - टीव्ही, लुना येथे सुरुवात झाल्यापासून संगणक, मोबाईल, अधिक दर्जेदार प्रवास हे दैनंदिन जीवनात येणे. उत्तम दर्जाची वाहने, माध्यमे, आंतरजाल, माहिती आदानप्रदान, ह्या सर्वांद्वारे झालेली ज्ञानवृद्धी, आयुर्मर्यादा वाढणे, वैद्यकीय क्षेत्रातील विकास, बाहेरील जगाशी अधिक जवळून परिचय होणे, इंग्लिश बोलू शकणार्यांची संख्या अनेक पटींनी वाढणे, गृहसंकुले व त्यातील सोयीसुविधा, मॉल्स, हॉटेल्सचा दर्जा, हॉस्पीटल्सचा दर्जा ह्यातील वृद्धी, रस्ते, पूल, धरणे ह्यांची अधिक निर्मीती, स्वच्छतेबाबतची जागरुकता वाढणे, अनेक व्यवहारांमध्ये अधिक पारदर्शकता येणे इत्यादी!
सांस्कृतीक विकास (/बदल) - अंधश्रद्धा विरोध अधिक प्रभावी होणे, स्त्रीने शिकणे, नोकरी करणे, व्यवसाय करणे, एकत्र कुटुंबव्यवस्था कमी होऊन लहान कुटुंबे अस्तित्वात येणे, इंग्लिश माध्यमातील शिक्षणाचे प्रमाण वाढणे, पेहरावातील बदल, पेहरावाबाबत / सौंदर्याबाबत / व्यक्तिमत्वाबाबत अधिक जागरुकता येणे, जातीधर्मांमधील भिंती काही प्रमाणात ढासळणे, व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढणे, जाहिरातींचा मारा आयुष्याचा एक भाग बनणे, घटस्फोटांचे प्रमाण वाढणे, विवाहाशिवाय एकत्र राहणे शक्य होणे, अनेक धार्मिक विधींचे स्वरूप बदलणे, अन्नसेवनाच्या सवयी बदलणे, दैववाद व व्यवहारवाद ह्यांचे प्रमाण बदलणे वगैरे! (हे बदल समाजाच्या काही स्तरांमध्ये झाले तर काही स्तरांमध्ये होत आहेत किंवा होऊ शकत नाही आहेत).
अभिरुचीविषयक बदल - पौराणिक कथांपासून निर्माण झालेल्या सांस्कृतीक मूल्यांऐवजी वास्तववादी, आधुनिक जगाशी निगडीत असलेल्या कलाकृतींना अधिक रसिकाश्रय मिळणे, कलाकृतींच्या निर्मीतीत तांत्रिक विकासाला वाढते स्थान मिळणे हे पसंतीस उतरणे, एका कलाकृतीच्या आस्वादाच्या प्रक्रियेचा कालावधी लांबण्याऐवजी नवनवीन कलाकृतींचा वेगवान आस्वाद घेण्यास उद्युक्त होणे, आंतरराष्ट्रीय कलाकृतींना मिळणार्या पसंतीचे प्रमाण वाढणे, शालीनता / आदर्शवाद / सत्यवाद / अहिंसा / प्रेमातून दुष्टांचे परिवर्तन ह्या सर्वांच्याऐवजी धमक / जशास तसे वागण्याची वृत्ती / विनाश / भडकपणा ह्या सर्वांना वाढती पसंती मिळणे, वगैरे! (मात्र, 'सद्प्रवृत्तींनी दुष्प्रवृत्तींवर मिळवलेला विजय' हा धागा मात्र अनेक कलाकृतींच्या मुळाशी असलेला समान धागा राहिला. म्हणजे असे, की एखाद्या कवितेत 'दुष्प्रवृत्तीच जिंकतात' असे म्हंटले गेलेले असले तरी 'तसे होऊ नये / व्हायला नको होते' हा त्या कवितेचा 'मूळ सूर' असतो / असल्याचे निदान गृहीत तरी धरले जातेच).
(टीप - अभिरुचीविषयक बदल हे कलाकृतीच्या अभिरुचीबाबतचे आहेत, खाद्यसंस्कृती, पोषाख संस्कृती व तत्सम इतर बाबी ह्यात समाविष्ट नाहीत).
========================
मालिकांबाबत अपेक्षा व्यक्त करणार्या प्रेक्षकांचे प्रकार :-
१. मालिका बघण्यात जराही रस नाही. माहीतही नाही की कोणती मालिका सुरू आहे. प्रत्येक मालिका अतिशय सुमार वाटते. वेळ वाया जातो असे वाटते. मालिका बघणे हे मागासलेपणाचे लक्षण वाटते. मालिकांकडून काहीही अपेक्षा नाहीत. किंबहुना मालिका नसाव्यातच अशी एकमेव अपेक्षा आहे.
२. मालिका अत्यंत रटाळ असतात असे वाटणारा दुसरा वर्ग! ह्या मालिकांमुळे असंख्यजण वेळ वाया घालवत आहेत असे वाटते. बघायचेच असले तर बातम्या, स्पोर्ट्स चॅनेल्स किंवा मूव्ही चॅनेल्स बघावेत. मालिका सुधारायच्या असतील तर 'रिलेट होता येईल' अश्या मालिका काढाव्यात.
३. फॅमिली ड्रामा असलेल्या मालिकांचे अजीर्ण झालेले आहे. तेही फार पूर्वीच! बघितले तर सत्यमेव जयते, कौन बनेगा करोडपती, क्राईम पॅट्रोल असे काही बघतो. बाकीच्या मालिका पुढे हालतच नाहीत आणि सादरीकरण अत्यंत जुनाट आणि सुमार थाटाचे असते.
४. घरात मालिका लागलेल्या असतात आणि पाच सात मिनिटे टीव्हीसमोर बसलो तरीही त्या दिवशीच्या एपिसोडमधील कथानक साधारण लक्षात येऊ शकते. ते आवडते असे मुळीच नाही, पण सगळे बघत असतील तर एक दहा मिनिटे तिथे बसायला आम्हाला काही फरक पडत नाही. बघितलीच पाहिजे असे तर मुळीच नाही, पण समोर बसलेलो असलो तरी मोबाईलमध्ये वगैरे गर्क असतो, चुकून जे काय कानावर पडते तेवढेच लक्षात राहते, बाकी काही नाही.
५. घरातले कोणीतरी बघते किंवा त्यावेळी करण्यासारखे / बघण्यासारखे दुसरे काहीच नसते म्हणून मालिका बघतो. इतर काही महत्वाचे असले तर मालिका मिस झाल्याचे वाईट वगैरे वाटत नाही. मालिका फार आवडते असे नाही, पण चालू शकते.
६. मालिका आवडतात पण वेळच मिळत नाही. त्यामुळे वैताग येतो.
७. मालिका प्रचंड आवडतात. मिस करत नाही. वेळात वेळ काढून बघतो. इतकेच काय, एपिसोड मिस झाला तर मित्र / मैत्रिणीला फोन करून विचारतो की आज काय झाले. अनेकदा रिपीट टेलिकास्टसुद्धा पाहतो इतक्या मालिका आवडतात.
८. (विश्वास ठेवा, हा प्रकार मी स्वतः पाहिलेला आहे). चारचौघात विषय निघाल्यावर आपल्याला बोलता येत नाही म्हणून एक दोन विशिष्ट मालिका पाहतो. फार काही आवडत नाही, पण निदान दुसर्या दिवशी गप्पांमध्ये वेळ मस्त जातो आणि आपल्यालाही काही मते आहेत हे इतरांच्या मनावर ठसवायची संधीही मिळते.
========================
मालिकांचे प्रकार, प्रदर्शीत होण्याचा सुमारे काळः -
हमलोग - १९८४ - कौटुंबिक कथानक, पारंपारीक पंजाबी संस्कृतीत फुललेली कथा! मालिका हा प्रकारच नवा असल्याने आणि तत्कालीन भारतीय प्रेक्षकाच्या मानसिकतेला साजेसे कथानक असल्याने तुफान गाजली.
बुनियाद - १९८५ - हमलोगच्या जातकुळीची मालिका पण हमलोगपेक्षाही अधिक गाजली. अत्युत्तम अभिनय, उत्सुकता कायम राखण्याचे विलक्षण कसब पाहायला मिळाले.
रामायण व जुने महाभारत - १९८७ ते १९९० च्या दरम्यान - अत्यंत सशक्त मूळ कथानक असलेल्या पौराणिक कथा! ही कथानके जवळपास प्रत्येक भारतीयाला तोंडपाठच असतात. प्रथमच ही कथानके दृष्य स्वरुपात बघायला मिळाल्याने लोकप्रियतेचा जागतिक विक्रम प्रस्थापित करणार्या मालिका!
नुक्कड - १९९० च्या सुमारास कधीतरी - अनेकविध प्रकारची पात्रे, अत्यंत आम माणसाच्या व्यक्तिरेखांमधून फुलवलेली छोटी छोटी कथानके, गुरू, खोपडी ही विशेष गाजलेली पात्रे! भूमिकांच्या साधेपणावर भाळून भारतीयांनी पसंत केलेली हिंदी मालिका!
श्वेतांबरा - (काळ १९९० च्या आधीचा) - गूढ विषयावरील मराठी मालिका! तुफान गाजली.
यह जो है जिंदगी - साधारण बुनियाद / रामायण ह्याच काळातील! हिंदी विनोदी मालिका! प्रत्येक एपिसोडमध्ये भिन्न भिन्न कथानक! सतीश शहांची भूमिका विशेष गाजली
रजनी - प्रिया तेंडुलकरांची भूमिका असलेली ही मालिका रविवारी प्रदर्शीत व्हायची व 'समाज प्रबोधन' हा मूळ हेतू होता.
गजरा - गीत, संगीत, विनोद, मुलाखत अश्या अनेकविध प्रकारांनी नटलेली मराठी मालिका! सलग कथानक नव्हते. मात्र मनोरंजन मूल्य प्रचंड!
खानदान - सुमारे १९९० च्या आसपासची पहिली अशी कौटुंबिक हिंदी मालिका जिच्यात डोळे दिपवणारी गर्भश्रीमंती केंद्रस्थानी होती. ही गर्भश्रीमंती नंतर कौटुंबिक मालिकांमधून जवळपास कधीच हद्दपार झाली नाही. अगदी बडे अच्छे लगते है, नंदिनी आणि कित्येक मालिकांमध्ये ही श्रीमंती अशीच राहिली.
मालगुडी डेज - सुमारे १९९५ की २००० च्या आसपास! उत्तम कथांवरच आधारीत असल्याने आपोआपच उत्तम मालिका ठरली, पण बरेचसे श्रेय द्यावे लागणार मूळ कथांना!
सावधान इंडिया, क्राईम पॅट्रोल, सत्यमेव जयते - २०११ नंतरआलेल्या हिंदी मालिका! समाजातील भीषण वास्तव दर्शवणे, नागरिकांना सतर्क करणे, अधिकारांची जाणीव करून देणे, समाज प्रबोधनात्मक कार्य करणे हे मूळ हेतू! सत्यमेव जयते तुफान गाजली, क्राईम पॅट्रोलही भरपूर गाजत आहे.
कौन बनेगा करोडपती - ह्या मालिकेचे वैशिष्ट्य असे की कोणतेही कथानक नसलेली ही मालिका काही प्रमाणात ज्ञानवर्धक असली तरी त्यातील प्रमुख आकर्षण अमिताभ बच्चन आणि मिळू शकणार्या रकमा ही होती.
अदालत, एन्काऊंटर व सी आय डी - सी आय डी ही प्रदीर्घकाळ चाललेली गुन्हेगारी विश्वावरील मालिका! मात्र अनेक वर्षांपासून अपरिपक्वपणे रचलेल्या कथानकांमुळे हास्यास्पद झाली आहे. एन्काऊंटर अतिशय फिल्मी बाजाची ठरत आहे तर अदालतचा आरंभ चांगला होऊनही नंतर भूत वगैरे दाखवून तिचाही 'बल्ल्या' करण्यात आला. मात्र सी आय डी चा टी आर पी अजूनही शाबूत असावा.
खतरोंके खिलाडी - साहसी खेळांची मालिका! मनोरंजन हाच मूळ हेतू, पण जे दाखवतात ते वास्तव असते.
होम मिनिस्टर - मराठीतील गाजलेली अशी मालिका जिच्यात आम माणसाला आपल्या कुटुंबियांसकट सहभागी होता येते. स्पर्धांनी युक्त असे मजेशीर स्क्रिप्ट असते.
कॉमेडी नाईट्स विथ कपिल आणि तत्सम - विनोदामार्फत मनोरंजन हा मूळ हेतू! कमीअधिक प्रमाणात सगळ्याच लोकप्रिय ठरतात. मात्र आजकाल विनोदांचा दर्जा तर घसरत आहेच पण त्यात पुन्हा पुरुषाने सातत्याने स्त्री वेष धारण करणे, लाऊड आरडाओरडी, बीभत्स अंगविक्षेप, काही प्रमाणात कंबरेखालचे विनोद आणि प्रमोशन अॅक्टिव्हिटीजनी प्रभावित होणे ह्या सर्वांमुळे लोकप्रियता घसरत आहे. (गंमत म्हणजे स्त्रीने पुरुषवेष धारण करणे हा कधीच विनोदाचा विषय ठरू शकत नाही, पुरुषाने स्त्रीवेश धारण करणे मात्र हास्योत्पादक असावे असा ठाम समज दिसतो, प्रत्यक्षात ते अनेकदा बीभत्स दिसते).
========================
जे गाजले ते का आणि जे नाही ते का नाही? -
वर लिहिलेल्या 'मालिकांच्या प्रकारांच्या' नोंदीत होसूमीयाघ किंवा जुयेरेसारख्या मालिका मुद्दाम घेतलेल्या नाहीत.
विचार केला तर असे जाणवू शकेल की आजवर ज्या मालिका गाजल्या त्या गाजण्यामागे प्रामुख्याने खालील कारणे होती:
१. मुळात टीव्हीवर असे काहीतरी नव्यानेच पाहायला मिळणे, पहिल्यांदाच मालिका दिसणे
२. 'रिलेट होता येईल' असे कथानक, कौटुंबिक पार्श्वभूमी असलेले पण रिलेट होता येईल असे!
३. विनोदातून मनोरंजन करणारे
४. गुन्हेगारी विश्वाशी संबंधीत असणारे
५. स्पर्धात्मक रचना असलेले, बक्षीसे असलेले व सेलिब्रिटी आणि आम माणसाचा संबंध आणणारे
६. मुळातच शक्तीशाली कथानक असलेल्या पौराणिक / ऐतिहासिक कथांवर बेतलेल्या मालिका
थोडा आणखीन विचार केला तर कदाचित असेही जाणवू शकेल, की:
१. काळानुसार अभिरुची बदललेल्या प्रेक्षकाला
२. नावीन्ययुक्त काहीतरी मिळाल्यामुळे...... किंवा
३. निव्वळ हलकेफुलके मनोरंजन किंवा निव्वळ वास्तव बघायला मिळाल्यामुळे
काही मालिका गाजल्या.
कदाचित ह्याचा अर्थ असा लावता येईल की आज जमाना कोठे चाललेला आहे ह्याचे भान ज्या ज्या मालिका निर्मात्यांनी ठेवले त्यांना त्यांना (त्या त्या मालिकेच्या दर्जाच्या प्रमाणात) लोकप्रियता मिळत राहिली.
मात्र महत्वाचा भाग हा की वरील तीनही मुद्दे सापेक्ष आहेत. एखाद्याची अभिरुची बदलून ती आत्ता कुठे होसूमीयाघ आवडण्याच्या पातळीला आलेली असेल. कोणालातरी जुयेरे नावीन्ययुक्त कथानक आहे हे आत्ता कुठे वाटू लागलेले असेल. कोणालातरी पुरुषाने स्त्रीवेश धारण करणे ही विनोदाची कमाल मर्यादा वाटत असेल तर कोणालातरी अदालतमध्ये भूत असणे हे बर्यापैकी वास्तववादी वाटू शकत असेल.
एखाद्या विशिष्ट व्यासपीठावरील व्यक्तींच्या सरासरी बुद्ध्यांकाला भावतील अश्याच मालिका प्रदर्शीत केल्या जात नाहीतच आणि जाणार नाहीतच हे वास्तव आहे.
पण तरीसुद्धा घाऊक प्रमाणावर काही मालिकांना रसिकांनी आश्रय नाकारल्यामुळे आटोपते घ्यावे लागले असेल तर असे का झाले? तेथे हीच सापेक्षता का लागू झाली नाही? जे नाही गाजले ते का नाही गाजले?
त्याची कारणे अशी असावीतः
१. अवास्तव श्रीमंती, अवास्तव मेक अप, अवास्तव पेहराव, अवास्तव घरगुती राजकारणे ह्यांचा उबग!
२. चांगला तो फारच चांगला आणि वाईट तो पूर्णपणे वाईटच अश्या प्रकारच्या व्यक्तिरेखांचा उबग
३. साध्यासाध्या व लहान मुलांनाही सुचतील अश्या गोष्टी ही पात्रे करताना दाखवली न जाणे ह्या मूर्खपणाचा उबग!
४. अत्यंत तकलादू कथानकावर एपिसोडच्या एपिसोड्स खर्च केले जाण्याचा उबग
५. आश्चर्य वाटणे, आनंद वाटणे, धक्का बसणे अश्याप्रकारच्या प्रत्येकाच्या भावना प्रत्येकाच्या चेहर्यावर कॅमेरा नेऊन दाखवत बसण्यासारख्या सुमार 'टेकिंग'चा उबग
६. संवाद, कथानक, पार्श्वसंगीत, वेग, वास्तवता ह्या सर्वांमधील दर्जाहीनतेचा उबग
७. समकालीनत्वाची दखल न घेतली जाणे, बाळबोधपणा ह्याचा उबग!
होसूमीयाघ, जुयेरे आणि अश्या कित्येक मराठी, हिंदी मालिकांनी रसिकांना निव्वळ उबग आणला. पण प्रत्येकवेळी ह्या रसिकांना दुसरा अधिक चांगला पर्याय (म्हणजे मालिकेच्या जागी मालिका असा पर्याय, मालिकेऐवजी बातम्या बघा वगैरे नव्हे) उपलब्धच नसल्याने रसिकांनी 'दाखवा काय दाखवायचे ते' अशी भूमिका घेतली. ह्याचा परिणाम लोकप्रियतेवर झाल्यासारखे भासून मालिकावाले अजूनच बथ्थड मालिका आणत राहिले.
म्हणायला असे म्हणता येईल की सगळे सापेक्षच आहे तर समजा होसूमीयाघ बघणारे चार कोटी प्रेक्षक असले तर त्यातले निदान दिड कोटी तरी खरेखुरे फॅन्स असतीलच की! पण त्याच होसूमीयाघच्या जागी काहीतरी खूप नावीन्ययुक्त, वास्तव किंवा दर्जेदार विनोदी बघायला मिळाले तर? तेही त्याच वाहिनीवर?
असे कोणते विषय आहेत जे खरे तर मालिकांमध्ये यायला हवे होते?
१. प्रत्यक्ष राजकारण
२. ऑफीसमधील राजकारण
३. बिझिनेस हँडलिंग
४. रेसिडेन्शियल सोसायटीतील कथानक
५. फिल्म मेकिंगवरील कथानक
६. फिल्म इंडस्ट्र्टील वास्तव
७. क्रिकेट / मॅच फिक्सिंगवरील कथानक
८. हॉस्पीटलमधील घटनाचक्रे
९. विविध व्यक्तिरेखांवरील वेगवेगळी कथानके (कंडक्टर / रिक्षावाला / भाजीवाला इत्यादी)
१०. परदेशस्थ भारतीयांची जीवनशैली, त्यांचे विचार
११. काही सुप्रसिद्ध व्यक्तींचे जीवनपट! (बाळासाहेब ठाकरे, भीमसेन जोशी असे)
प्रामुख्याने अश्या विषयांवर मालिका न बनता तद्दन किरकोळ व तकलादू अश्या कौटुंबिक नाट्यावर मालिका बनत राहिल्या. ह्याला कारणीभूत रसिकांच्या अभिरुचीतील सापेक्षता (च) आहे असे मानून गप्प बसणे योग्य होणार नाही.
आजचा काळ, आजची जीवनशैली, वास्तवाच्या अधिकाधिक जवळ जाणे ह्या सर्वांपासून अनेक मालिकांनी सहेतूक फारकत घेतलेली दिसते, जणू की लोकांना हे पाहायचेच नसावे. खरे तर आजच्या एखाद्या तरुणाला हे बघायला आवडेल की चित्रपट क्षेत्रात प्रत्यक्षात काय काय चालते. एखाद्या कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्हला ऑफीस पॉलिटिक्सवर असलेली सिरियल खिळवून ठेवू शकेल. पण इतपत विचार करण्याची ह्या मालिका निर्मात्यांची, कथालेखकांची हिम्मत होताना दिसत नाही.
आपल्याच अवतीभवती आपल्याच कुटुंबातील काही व्यक्ती ह्या नीरस मालिका बघताना बघून त्यांना हासणे किंवा त्यांची अभिरुची सामान्य समजणे योग्य नाही. त्यांच्यासाठी अधिक चांगले पर्याय उपलब्ध केलेले नाही आहेत, ज्यांनी ते करायला हवे आहेत. आपण अनेकजण येऊन मायबोलीच्या धाग्यांवर अश्या काही मालिकांना नियमीतपणे नांवे ठेवून जातो, पण जे ह्या मालिका आवडीने बघतात असे आपल्याला वाटते तेही मनात म्हणत असतील की 'काय हा बावळटपणा चालला आहे'. ह्या मालिकांमधील पात्रांनुसार स्वतःचे वर्तन बदलणारेही काहीजण असतील, पण कित्येकजण असे असतील जे म्हणतील की ;हिच्या सासूच्याजागी मी असते तर दिली असती एक ठेवून'!
सगळ्या जगभरातून आपल्या व्यक्तिमत्व विकासाच्या वेगाला मिळणारी जबरदस्त चालना पूर्णपणे दुर्लक्षित करून बाबा आदमच्या जमान्यातील कथानकांचा रतीब घालणारे हे मालिका निर्माते २०१४ मध्ये रुपये १४०००.०० कोटीच्या साधारण वीस टक्के उत्पन्न निव्वळ 'मालिकांना मिळणार्या जाहिरातींमधून' निर्माण करत आहेत. आणि आम प्रेक्षक पाच मिनिटाचा भाग बघण्यासाठी साडे तीन मिनिटांचा 'कमर्शिअल ब्रेक' सहन करत आहे. अर्थातच, ह्याबाबत करण्यासारखे फारसे काही आपल्या हातात नाही. अॅज यूझ्वल, ह्या सगळ्याचे उत्तर एकच आहे की 'रिमोट तर आपल्याच हातात आहे'.
एक व्यक्ती म्हणून माझ्या मनात येणारा विचार रोखठोकपणे इतकाच की एखादी मालिका आवडत नसेल तर व्यासपीठ मिळाल्यावर त्या मालिकेवर जबाबदारीने पण खणखणीत टीका करायला हवी. शक्य नसेल तर खिल्ली तरी उडवायलाच हवी.
'मनोरंजनच होत नाही ह्या वस्तूस्थितीलाच जर मनोरंजक बनवले' तर काय चुकले?
========================
-'बेफिकीर'!
मुग्धटली,
मुग्धटली, +१११११११११.....
ए.ल.दु.गो. मी अजूनही पाहते. मी डाउनलोड करून ठेवलेत एपिसोड्स.
हेवा वाटावा इतका वेळ दिलाय
हेवा वाटावा इतका वेळ दिलाय या विषयाला....
Pages