टर्की चिली

Submitted by स्वाती२ on 5 October, 2015 - 11:44
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

१ पाउंड टर्की खीमा
३/४ कप राजमा रात्रभर पाण्यात भिजवून कुकरमधे शिजवून घेतलेला ( साधारण १५ औस कॅन्ड किडनी बिन्स )
१ मोठा कांदा बारीक चिरुन
१ मोठी बेलपेपर बारीक चिरुन
५-६ पाकळ्या लसूण बारीक चिरुन
१ १/२ टे स्पून तेल
डाईस्ड टोमॅटोचे दोन कॅन,१४.५ औस वाले ( साधारण ३ कप बारीक चिरलेले टोमॅटो )
१/२ टी स्पून मीठ
तिखट चवी नुसार
चेडर चीज वरुन भुरभुरवण्यासाठी ( वापरले नाही तरी चालेल)
मसाला:
१ हलापिनो पेपर बीया काढून चिरुन (नसल्यास तिखट्/कायान पेपर १ टीस्पून)
१ टे स्पून वुस्टरशायर सॉस
१ टी स्पून पाप्रिका
१ टेस्पून ड्राइड ओरॅगानो
१ टे स्पून जीरे पावडर
१/२ टी स्पून पोल्ट्री सिझनिंग (नसले तरी चालेल)
१/२ टी स्पून भरड मिरे पावडर
१/२ टी स्पून कोको पावडर(नसल्यास चालेल )
IMG_5386 (400x300).jpg

क्रमवार पाककृती: 

मोठ्या जाड बुडाच्या पातेल्यात मध्यम आचेवर तेल तापत ठेवा. तेल तापले की बारीक चिरलेला कांदा घालून परतायला लागा. दोन मिनीटे परतून मीठ घाला आणि अजून २-३ मिनिटे परता. कांद्याचा रंग थोडा बदलू लागला की त्यात चिरलेली बेलपेपर आणि लसूण घालून परता. लसूण करपू नये म्हणून सतत ढवळत रहा. २-३ मिनीटे परतून मिश्रण पातेल्यातच एका बाजूला सारून त्यात टर्कीचा खीमा घाला. टर्कीचा रंग लगेच बदलायला लागेल. खीमा साधारण ३-४ मिनीटे मोडून परता आणि कांद्याचे मिश्रण त्यात नीट मिसळून घ्या. आता त्यात मसाल्याचे सर्व घटक घालून परता. कॅन्ड टोमॅटो घाला. ताजे टोमॅटो घालणार असाल तर जोडीला साधारण १ कप पाणी घाला. नीट ढवळून आच वाढवा. मिश्रणाला उकळी आली की त्यात शिजवलेला राजमा घालून ढवळा. झाकण ठेवून ३०-४० मिनीटे मंद आचेवर ठेवा. झाकण उघडून ढवळा आणि चव बघा. आता त्यात चवीप्रमाणे तिखट घाला आणि गरज वाटल्यास अजून थोडे मीठ घाला. झाकण लावून अजून ५ मिनीटे स्वाद मुरला की आच बंद करा.
बोलमधे गरम गरम चिली वाढून त्यावर आवडत असल्यास वरुन चमचाभर चीज घाला. सोबत कॉर्नब्रेड. यम्मी!
IMG_5393 (400x300).jpg

वाढणी/प्रमाण: 
३-४ जणांसाठी लंच किंवा डिनर
अधिक टिपा: 

गेल्या आठवड्यात लेकाच्या हाऊसमेटने बनवलेली चिली लेकाला फार आवडली. लेकाने चिली हाणली कळल्यापासून नवर्‍याची भुणभुण सुरु होती, आपण पण करुया म्हणून. तेव्हा या विकेंडला चिली आणि कॉर्नब्रेड असा बेत केला. आमच्याकडे नेहमी व्हाईट चिकन चिली केली जाते. हाऊसमेटची रेसीपी बीफवाली आणि बेताच्या मसाल्याची. तेव्हा त्यात आमच्या चवीला रुचणारे बदल करुन टर्की चिली बनवली.

माहितीचा स्रोत: 
लेकाचा हाउसमेट आणि माझे प्रयोग
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त दिसत्येय. बरोब्बर आमच्या thanksgivingच्या आधी आली रेसिपी. नोट करून ठेवतो, टर्कीचा तुकडा मिळतो का माहित नाही, चिकन बरोबर करून पाहीन. धन्यवाद.

धन्यवाद अमितव, वर्षू आणि राधिका.

>>टर्कीचा तुकडा मिळतो का माहित नाही,>>
अमितव,
लीन ग्राउंड टर्की मिळते. किंवा टर्की ब्रेस्ट मिळते ते आणून फु. प्रो. मधून काढायचे. ( मी तसे करते आणि फ्रीजरला टाकते.)

राधीका,
याच पाकृत चिकन वापरणार असाल तर बोनलेस, स्किनलेस चिकनचे तुकडे राजमा घालतो त्या स्टेजला घालायचे. किंवा बोनइन, स्किनवाले चिकन ब्रेस्ट अर्धा तास ओवनमधे बेक करुन मग त्याचे बोस, स्किन काढून तुकडे राजमा बरोबर घालायचे. ग्राउंड चिकन वापरणार असाल तर नुसत्या बोनलेस ब्रेस्टचे नको. खूप ड्राय होते. मला चिकनची व्हाईट चिली जास्त आवडते.