स्विस चार्ड सॅलड

Submitted by धनि on 1 October, 2015 - 12:25
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

स्विस चार्ड (कोवळा) - ६-७ पानं - चिरून
काकडी - १ छोटी - बारीक चिरून / चोचून
ढोबळी / सिमला मिरची - १/२ - बारीक चिरून
कांदा - १/४ - बारीक चिरून
टोमॅटो - १ - छोटा बारीक चिरून

ड्रेसिंग
अ‍ॅवाकॅडो - १/२ - मॅश करून
लिंबाचा रस किंवा घट्ट दही - आंबटपणासाठी
मीठ, साखर, तिखट, मिरपूड - चविपूरती - तुमच्या आवडीने

ब्रेडचे क्रुटॉन्स

क्रमवार पाककृती: 

दर शनिवारी तुळसाक्कांच्या गावी आठवडे बाजार भरतो. आम्हाला लहानपणापासून शनिवारच्या बाजारात जायची सवय. पूर्वी पिताश्रींबरोबर जायचो आणि संगमनेरचा पूर्ण बाजार पालथा घालायचो. मग हट्टाने मटकी, गोडीशेव असे प्रकार घ्यायचो. आता आपणच आपले फिरायचे आणि मिळाले तर ब्रेकफास्ट टाको वगैरे खायचे इथे. तसे पिताश्री इकडे आले होते तेव्हा त्यांना घेऊन गेलो होतो तर त्यांना आमचा बाजार आवडला होता. बाजारात बर्‍याच ताज्या भाज्या येतात. जवळचे शेतकरी सकाळी सकाळी घेऊन येतात आणि सुंदर वाटे करून ठेवतात.

या शनिवारी निघालो बाजारात तर सुरवातीलाच एके ठिकाणी सुंदर कोवळा स्विस चार्ड दिसला. खुप मस्त वाटला म्हणून लगेच एक जुडी (मराठी जुडी, गोरी ज्युडी नाही Wink ) घेतली. लगे हाथों बाजारातून बाकीची भाजी पण घेतली. घरी आलो आणि त्या चार्डला साफ केले. पिठ पेरून भाजी करावी असा विचार आला मनात. पण कोवळी पानं पाहून वाटलं याचं सॅलड होतय का ते पाहू. जरा गुगल केल्यावर वेगवेगळ्या पाककृती आल्या. मग जरा हूरूप आला आणि आपणच सॅलड करावं असं ठरवलं.

स्विस चार्ड नीट धुवून पुसून घेतला. काकडीची साल काढून घेतली. मग सगळ्या भाज्या बारीक चिरून घेतल्या आणि एकत्र केल्या. तुम्हाला पाहिजेत तर लाल पिवळ्या रंगिबेरंगी मिरच्या पण वापरता येतील म्हणजे सॅलड मध्ये हिरव्या बरोबर इतरही रंग दिसतील.

या वेळेस नेहमीचे यशस्वी रँच वगैरे कलाकार न वापरता स्वतः ड्रेसिंग तयार करायचा प्रयत्न केला. त्यासाठी आर्धा अ‍ॅवाकॅडो मॅश करून घेतला. हे झाल्यावर आठवलं की घरात लिंबू नाही. मग काय आंबटपणासाठी थोडे घट्ट दही (फायेंचे ग्रीक योगर्ट) घातले. हे सॅलड मध्ये मस्त एकत्र केले. वरून चविपुरते मीठ, मिरपूड, साखर आणि लाल तिखट टाकले.

हे सर्व करत असताना तिकडे ओवन मध्ये दोन ब्रेड चे स्लाईस थोडे तेल फासून ठेवले होते. ३५० फॅ वर अंदाजे २० मिनीटे. ते स्लाईस बाहेर काढले. मस्त कुरकुरीत खरपूस झाले होते. ते हातांनी मोडून त्यांचे क्रुटॉन्स केले. आणि ते सुद्धा सॅलड बरोबर एकत्र केले.

इतके सगळे केल्यावर कुठला धीर राहतोय, घेतला एक फोर्क आणि सगळ्या सॅलडचा चट्टामट्टा केला. सगळे संपल्यावर अरे आधी फोटो काढायला पाहिजे होता असं वाटलं Lol करून पहा आणि आवडतंय का ते सांगा. चार्ड काही केल किंवा इतर भाज्यांसारखा थोडा कडू किंवा निबर नसतो त्यामुळे खाणे सोपे जाते असे मला तरी वाटले. आणि नेहमीच्या लेट्युस पासून काही तरी वेगळे हवे असल्यास हा चांगला पर्याय मिळाला.

वाढणी/प्रमाण: 
ज्याला जितके सॅलड आवडते तितके. (मला खुप आवडते म्हणून मी पूर्ण फस्त केले)
अधिक टिपा: 

ही काय प्रमाण घेऊन असेच करा सांगणारी पाककृती नाही त्यामुळे तुम्हाला वाटेल आणि आवडेल तसा बदल करा.

आवडत असल्यास थोडे चीज टाका.

ग्रील्ड चिकन वगैरे पण चालून जाईल यात.

आता पनीर शिवाय जेवण होत नसल्यास ते सुद्धा घालू शकता Proud

क्रुटॉन्स ऐवजी लसूण शेव घालून पण मस्त लागते सॅलड पण मग मीठ आणि तिखट जरा कमी टाका.

लागणारा वेळ हा भाज्या धुणे, चिरणे, एकत्र करणे यासाठीचा आहे. तुम्ही जर सुरीबहद्दर असाल तर तुम्हाला कमी वेळ लागू शकतो Wink

माहितीचा स्रोत: 
स्वतःचे प्रयोग
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ब** आपापल्या जवाबदारीवर घालावा, उगीच चव बदलली किंवा कॅलरीज वाढल्या म्हणून बडबड खपवून घेतली जाणार नाही नंतर Proud

अरे वा .. मला चार्डची भाजी आवडते पण नेहेमीच्या स्प्रिंग मिक्स करता आयडीया चांगले आहे .. कुठल्याही सॅलॅड मध्ये नट्स, बेदाणे, (ड्राइड) फ्रूट घातलं की सॅलॅड पटापटा संपतं असा अनुभव आहे तेव्हा ते घालेन आणखी ..

मला काही शंका वाटल्या ..

१. पालेभाजी धुवून कोरडी करण्याचा हमखास फॉर्म्युला काय? मला धुता येतात पण कोरड्या कशा करतात (२५ मिनीटांत) ते माहित नाही .. कळल्यास खूप उपयोगी पडेल ..
२. अव्हाकाडो आणो ग्रीक योगर्ट ह्यांचं मिश्रण पुरेसं पातळ (पळीवाढे) झालं का ड्रेसींग म्हणून वापरायला
३. ब** म्हणजे काय?

सॅलड-स्पिनर असेल गं त्याच्याकडे. नायतर शांताबाय - बेबी अरुगुलाचे पान-पान पदराने पुसून पुसून त्याला खाऊ घालायला Wink

ब** माहिती नाही म्हणजे तुला टाटाच करायला हवा Wink Happy

अरे वा! स्वीस चार्ड परतलेलाच आवडतो तेव्हा केल घालून करून बघणार.

वर्जिनल ड्रेसिंगमध्ये काय होतं? अ‍ॅवाकॅडो मॅश करून + लिंबाचा रस + ऑऑ + मिपु + मीठ?

सशल, सुर्यफुलाच्या बिया आवडत नाहीत का सॅलडमध्ये?

कोरडं करायला माझा फॉर्म्युला म्हणजे धुतलेली जुडी परत एकत्र करून फडक्यावर धोपटायची. केल, स्विस चार्डला तसं पण पाणी चिकटत नाही. घरी पोर असेल तर त्याला/ तिला हे काम सांगायचं (म्हणजे बघायला नको. सगळी पानं पण आपोआप सुट्टी होतात) मग १० मिनिट जरा टीव्ही बघायचा.
अरुगुला धुतलेलं होतं असा सोयीस्कर समज करता येऊ शकतो. Wink

>> सुर्यफुलाच्या बिया

मुद्दामहून आणून कधी घातल्या नाहीत घरच्या सॅलॅड मध्ये .. कधीतरी ट्राय करेन ..

मला चार्डच्या भाजी उग्र नसलेली चव आणि इन्हेरन्ट क्रन्च आवडतो .. मीही नेहेमीच्या फोडणीला घालूनच करते ..

मला चार्डाची भाजी करायला रेड स्वीस चार्ड(च) आवडतो. रेस्पी सिंडीने दिलीये तीच. काही मालमसाला लागत नाही.
सॅलड मस्तय. मलाही ड्रायफ्रूट्स आवडतील बहुतेक ह्यात.

वाळण्याचा वेळ यात धरलेला नाही पण किचन टॉवेल (बाऊंटी) नी नीट पुसून घेतले आणि जरा पंख्याखाली ठेवले तर मस्त कोरडा होतो चार्ड.

वर्जिनल ड्रेसिंगमध्ये काय होतं? >> असं काय वर्जिनल नव्हतंच ना. पण ऑऑ घालावे लागणार नाही अ‍ॅवाकॅडो भरपूर होते आणि लिंबाचा रस घातला की भरपूर पातळ होईल ते.

आवडली पाकृ. मला नुसते सॅलड खाववत नाही. त्यात काहीतरी क्रंची व भरीव लागते. क्रुटॉन्स आहेत पण आणखी काहीतरी हवे. पण त्याची भर घालता येइल.