गणित कसे शिकवावे ह्यावर बोलण्याची माझी काही फार पात्रता नाही. मी शिक्षणतज्ज्ञ आहे अशातला भाग नाही. परंतु एक गणितज्ञ ह्या नात्याने मुलांना त्यांच्या शालेय वयातील शिक्षणातून कोणते ज्ञान मिळावे जेणेकरून त्यांची गणितातील प्रतिभा वाढीस लागेल, ह्याचे काही आडाखे माझ्या मनात आहेत. तसेच माझे स्वतःचे काही अनुभवसुद्धा आहेत. ह्या सर्वांची सरमिसळ म्हणजे हा लेख.
उपयोग काय?
गणित शिकण्याचा उपयोग काय, हा प्रश्न आजकाल बरीच लहान मुले विचारतात, असे मला वाटते. भरीस भर म्हणून त्यांचे पालकसुद्धा कधीकधी हा प्रश्न विचारून मला अडचणीत आणतात. मला ह्या प्रश्नाचा अर्थच कळत नाही. कारण विद्यार्थ्याने विद्येचे अर्जन काही उपयोगासाठी करायचे असते, हा मुद्दाच मला पटत नाही. विशेषत: गणित शिकायचा माझा उद्देश शाळेत तरी 'प्रश्नांचा हा भुंगा माझी पाठ काही सोडत नाही' असाच होता. लहान मुलांची आकलनबुद्धी उपजत तशी उत्साही असते. मोठे झाल्यावर दिव्यावर काजळी जशी चढत जाते तशी ती हळूहळू मंदावत जाण्याकडे तिचा कल असतो. परंतु तिला लहान वयातच अशा प्रश्नांच्या मार्याने गुदमरवून टाकू नये. मी असेही किस्से पाहिले आहेत, जेथे पालकांना शालेय वयापासून गणिताचा काही कारणाने तिटकारा असल्याने त्याचा परिणाम पाल्य गणितापासून दूर जाण्यात होतो. आपले असे अगदी प्रत्यक्ष नाही तरी नकळत तर होत नाही ना, ह्याचा प्रत्येकाने स्वतःशी विचार करावा. गणिताला अगदी काही नाही तर बुद्धीला धार लावण्याचा दगड समजा. ही धार लावता आली, तर अशी बुद्धी बर्याच क्षेत्रांमध्ये भेदक कामगिरी करू शकते.
गणित येतच नाही
वरील अनुषंगाने एक सूर असाही उमटतो, की आम्हांला त्यात काही गम्यच नाही. आमची बुद्धी त्यात चालतच नाही, तर धार कशी लावणार? ह्यावर मला एवढेच म्हणावेसे वाटते, की गणित अगदी खूप सुंदर नाही आले तरी चालू शकेल. गणिताला स्पर्धात्मकरीत्या बघू नका. आपले प्रत्येक उत्तर बरोबरच असले पाहिजे, आपण चुकलो, तर फार काही बिघडेल, ह्या समजाने खूप मुलांचा बीमोड होतो. लहान मुले चित्रकलेच्या कागदावर पहिल्या रेघोट्या मारतात, तेव्हा त्या कशाही वेड्यावाकड्या आल्या तरी आपण त्यांचे कौतुकच करतो. त्याचप्रमाणे मुलांच्या गणितातल्या प्रयत्नांना समजून घेऊन त्यांना प्रोत्साहन देण्याची वृत्ती ठेवा. जसा प्रत्येक रेघोट्या ओढणारा पिकासो होऊ शकत नाही, त्याचप्रमाणे प्रत्येक गणित शिकणारी व्यक्ती गणितज्ञ होत नाही. परंतु प्रयत्नांती एक चांगली पातळी बहुधा नेहमीच गाठता येते. हा शिकवण्यातून आलेला स्वानुभव आहे. (लर्निंग डिसऑर्डर इत्यादी वगळून) त्यामुळे मनातून गणिताची आणि अपयशाची भीती काढून टाका. हा सल्ला मुलांइतकाच पालकांना आणि त्यांच्या शिक्षकांनासुद्धा लागू होतो. मॅथमॅटिकली लिटरेट असलेल्यांचे प्रमाण समाजात वाढीस लागावे, ही एक महत्त्वाची बाब आहे.
स्वतः गणित करा
गणिते सोडवायला मुले टंगळमंगळ करतात, हा तुमचा नेहमीचा अनुभव असेल. उदाहरणार्थ, पाढे वगैरे पाठ करायला मुलांना कंटाळा येतो. ह्याच्यावर एक अक्सीर म्हणता येईल असा उपाय म्हणजे, स्वतः ती गोष्ट करायला घेऊन मुलांना आपल्याबरोबर घेऊन जाणे. ह्यात मेख अशी आहे की, सुरुवातीला आपण उत्साहात असे बसतोदेखील, पण तरीसुद्धा मुले पटकन तयार होत नाहीत. मग आपलाही उत्साह मावळतो. पण लहान मुले वृत्तीने चंचल असतात, हे लक्षात घ्यायला हवे. थोडा संयम गरजेचा आहे. जवळपास महिनाभर तुम्ही रोज स्वतः त्यांच्याबरोबर बसून गणितातल्या खुब्यांची मजा घेऊन बघा. 'हे सगळे शाळेत केलेय, आता कोण करेल' असा दृष्टिकोन सोडा. मुलांनीच ते शिकावे अशी अपेक्षा कशाला? तुम्ही स्वतःसुद्धा ती मजा शोधायचा प्रयत्न करा. तुम्हांला ती दिसली, की मुलांना ती दाखवून द्यायचे जास्त मार्ग तुम्हांला दिसतील. मुलांना खांद्यावर बसवून त्यांना सूर्योदय दाखवण्यासारखेच हे आहे, असे म्हणायला हरकत नाही.
संकल्पनांवर भर
गणित / विज्ञान आणि इतर विषय यांत मोठा फरक म्हणजे संकल्पनांचा शालेय वयात वापर. अगदी प्राथमिक वयात गणितामध्ये अनेक संकल्पना वापरल्या जातात. साधी संख्या (number) म्हटली, तरी ती गणितज्ञांसाठी खूप मोठी संकल्पना आहे. ती शालेय वयात आपण तशी समजून घेणे अपेक्षित नाही. परंतु अशा संकल्पनांबरोबर तुम्ही जितक्या लवकर परिचित व्हाल, त्यांची ओळख करून घ्याल, त्यांची आणि तुमची शिष्टाचाराची घडी मोडेपर्यंत बैठक जमेल, तितक्या लवकर तुम्हाला त्यांचे सौंदर्य कळेल. गाण्यामध्ये 'सा', 'रे' इत्यादी स्वरओळख ही गाणे शिकण्याची पहिली पायरी वगैरे असेल, पण ते शिकून आपण पुढे गेलो, तरी ह्या स्वरांची ओळख निरनिराळ्या तर्हेने आयुष्यभर होत राहते. वेगवेगळ्या तर्हेने ते वेगवेगळ्या गायकांना वेगवेगळ्या ठिकाणी भेटतात. तसेच गणिताचे आहे. गणितातल्या संकल्पनांच्या व्याख्या योग्य रीतीने करणे, हा मानवी बुद्धीचा सुंदर आविष्कार आहे. त्या आविष्काराची मजा लुटायला आली, तर आयुष्यभर तुम्हांला ती साथसोबत करेल.
उपोद्घात
वर म्हटल्याप्रमाणे मी काही कोणी फार मोठा शिक्षक नाही. जे सुचले, वाटले, ते लिहिले. सर्वांनी असेच करावे असा आग्रह अर्थातच नाही. परंतु काही पॉईंटर्स म्हणून ह्यातल्या काही गोष्टी योग्य वाटल्यास वापरून बघा. प्रतिसादांमध्ये जास्त गोष्टी चर्चिल्या गेल्यास उत्तमच. लिहायला बरेच काही आहे. बुद्धीची आदिदेवता असलेल्या श्रीगणरायाला ह्यानिमित्ताने वंदन करून ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरांमध्ये संपवतो.
गणपती बाप्पा मोरया !!!!
गणपती बाप्पा मोरया !!!!
आणखी सविस्तर लिहायला हवे
आणखी सविस्तर लिहायला हवे होते.. सुदैवाने मला उत्तम शिक्षक लाभले त्यामूळे गणित कधी नावडते ठरले नाही.
त्या काळात अवांतर वाचन नव्हते तरी शिक्षकांनी दिलेली व्यवहारातली उदाहरणे, न कंटाळता केलेले शंकासमाधान, यामूळे गणितातला रस टिकून राहिला. सध्या बाजारात अनेक पुस्तके उपलब्ध असावीत यासाठी.
आणखी सविस्तर लिहायला हवे होते
आणखी सविस्तर लिहायला हवे होते >>> +१११
छान लिहीलंय. 'स्वतः गणित करा'
छान लिहीलंय.
'स्वतः गणित करा' हे विशेष आवडलं.
मस्त लिहिलेले! नशिबानी
मस्त लिहिलेले! नशिबानी गणिताचे सगळेच शिक्षक चांगले मिळाल्याने विषयाची भीती कधी वाटलीच नाही. उत्तरोत्तर आवड निर्माण झाली आणि बीजगणीत, भूमिती सोबत त्रिकोणमिती आणि कॅल्क्युलसही आवडीचे झाले!
पण बाकी सांखीय्की आणि आकडेमोड जास्त कधीच आवडली नाही.
अवांतर, इंजीनारिंग नंतर गणिताशी संबंध फार न राहिल्याची हूरहूर वाटते. काही चांगली पुस्तके सुचवू शकाल का कॅल्क्युलसबाबत?
मस्त लिहिलंय 'ग्यानोम' वर
मस्त लिहिलंय
'ग्यानोम' वर कधी लिहिणार भास्कराचार्य
लहान मुले चित्रकलेच्या
लहान मुले चित्रकलेच्या कागदावर पहिल्या रेघोट्या मारतात, तेव्हा त्या कशाही वेड्यावाकड्या आल्या तरी आपण त्यांचे कौतुकच करतो. त्याचप्रमाणे मुलांच्या गणितातल्या प्रयत्नांना समजून घेऊन त्यांना प्रोत्साहन देण्याची वृत्ती ठेवा. जसा प्रत्येक रेघोट्या ओढणारा पिकासो होऊ शकत नाही, त्याचप्रमाणे प्रत्येक गणित शिकणारी व्यक्ती गणितज्ञ होत नाही.
>>>>>> खूप छान.
आवडला लेख 'ग्यानोम' वर कधी
आवडला लेख
'ग्यानोम' वर कधी लिहिणार भास्कराचार्य >> + १
लेख खूप आवडला.
लेख खूप आवडला.
सुंदर लिहिलेत. वाचण्यात
सुंदर लिहिलेत. वाचण्यात गुंगलो होतो तोच उपोद्घात आला. आता प्रतिसादांत तुम्ही अपेक्षिलेल्या चर्चेच्या प्रतीक्षेत.
छान
छान
छान लेख आहे गणिताचा उपयोग
छान लेख आहे
गणिताचा उपयोग काय म्हणणार्यांना तर माझा कोपराढोपरापासून साष्टांग नमस्कार.
माझ्यामते ज्याचे गणित चांगले आहे तो आयुष्यात कधी उपाशी मरत नाही.
लेख मात्र फारच थोडक्यात आटपला, अजून मोठा हवा होता याला प्लस वन !
लेख आवडला. संकल्पनांवर भर
लेख आवडला. संकल्पनांवर भर द्या, हे तर सगळ्यात जास्त. शाळेत गणित हे गम्मत आहे सांगणारं कुणीही भेटलं नाही, पण घरी भरपूर गणितातील कोडी, जादूची पुस्तकं होती. ११-१२ला एक जादूगार भेटले जे गणितात भारी जादूचे प्रयोग दाखवायचे. गम्मत गणित, कंप्युटर (गेम्स आणि कोडींग) आणि वस्तूंची मोडतोड ह्याची अगदी लहान वयापासून मला मुलाला ओळख करून द्यायची आहे.:)
खूप छान लिहीलयं पण खरचं अजून
खूप छान लिहीलयं पण खरचं अजून सविस्तर हव होतं.
लहान मुले चित्रकलेच्या
लहान मुले चित्रकलेच्या कागदावर पहिल्या रेघोट्या मारतात, तेव्हा त्या कशाही वेड्यावाकड्या आल्या तरी आपण त्यांचे कौतुकच करतो. त्याचप्रमाणे मुलांच्या गणितातल्या प्रयत्नांना समजून घेऊन त्यांना प्रोत्साहन देण्याची वृत्ती ठेवा. जसा प्रत्येक रेघोट्या ओढणारा पिकासो होऊ शकत नाही, त्याचप्रमाणे प्रत्येक गणित शिकणारी व्यक्ती गणितज्ञ होत नाही.>>>> हे खूप आवडलं.
लेख अजून मोठा असता तर आवडलं असतं.
खूप छान लेख.. मला नेहमी गणित
खूप छान लेख.. मला नेहमी गणित अतिशय कंटाळवाणे करून शिकवणारे शिक्षकच मिळाले. त्यामुळे गणिताबद्दल प्रचंड अढी बसली आणि कंटाळा करू लागले पण मुलांच्या वेळी लक्षात ठेवीन..
अल्पना, >> लेख अजून मोठा असता
अल्पना,
>> लेख अजून मोठा असता तर आवडलं असतं.
हाहाहा ! शांतम पापम !! अहो, गणितात सगळ्यांचं संक्षिप्तीकरण करतात.
आ.न.,
-गा.पै.
अरे मस्त लिहिता लिहिता अचानक
अरे मस्त लिहिता लिहिता अचानक उत्तरावर घेऊन आलास अन मधल्या स्टेप्स गायब केल्यास.
लेख आवडला. अजून लिही ह्या विषयावर.
लेख आवडला.
लेख आवडला.
लेख आवडला हे सांगणार्या
लेख आवडला हे सांगणार्या सर्वांना मनापासून धन्यवाद! कार्यबाहुल्यामुळे आजपर्यंत इकडे फिरकायला झाले नाही, त्याबद्दल क्षमस्व!
लेख थोडासा छोटा झाला आहे हे खरे. त्यालाही तेच कारण आहे. मी म्हटल्याप्रमाणे काही मुद्दे डोक्यात घोळत होते, ते फक्त लिहीले. त्यावर जास्त मनन करण्यास वेळ झाला नाही. पण लोकांना आपण लिहीतो आहोत, ते आवडते आहे, अजून वाचायला आवडेल, हे ह्यानिमित्ताने जाणवले हेसुद्धा खूप आहे.
वर सगळ्यांनीच शिक्षकांबद्दल लिहीले आहे. या निमित्ताने मी वर लेखात संक्षिप्तपणे लिहीले आहे तोच मुद्दा परत सांगावासा वाटतो. आपल्या देशात असा एक (गैर)समज आहे, की आपण गणितात इतरांच्या फार पुढे आहोत, इ. इ. वृत्तपत्रांमधून हा समज वारंवार अधोरेखित केला जातो. परंतु हे तितकेसे खरे नाही. खरे हे आहे, की 'जुगाड' करण्यात आणि स्पर्धात्मक वातावरणात आपल्याकडची मुले जास्त पुढे आहेत. (लोकसंख्या इ. कारणामुळे) त्यामुळे ती शाळा-कॉलेजच्या गणितामध्ये इतर देशांतील शाळकरी मुलांपेक्षा पुढे असतीलही, परंतु ह्याचा अर्थ एवढाच होतो, की मुले जास्त 'स्मार्ट' आहेत. पण हा 'स्मार्ट'पणा कंटेंटमध्ये ट्रान्सलेट होऊ शकत नाही. "मॅथमॅटिकली लिटरेट" असणे आणि "संकल्पनांवर भर" हे दोन्ही मुद्दे ह्या अनुभवाशी निगडीत आहेत.
जास्त स्पष्ट लिहायचे तर, बॅचलर्सपर्यंत भारतातला अभ्यासक्रम हा बर्यापैकी स्टँडर्ड आहे असे दिसते. परंतु गणितात मास्टर्स केलेला अमेरिकन विद्यार्थी आणि गणितात मास्टर्स केलेला भारतीय विद्यार्थी ह्यांच्यामध्ये खूप तफावत आहे. अमेरिकन समाजातील बरेचसे लोक गणितात इतके प्रगल्भ नसतीलही, परंतु त्या समाजाची गणित शिकवण्याची संकल्पना ही जास्त प्रगल्भ आहे. ही प्रगल्भता म्हणजेच ते लिटरेट असणे.
एखाद्या गणितज्ञाला पूर्णतः सामान्यांच्या पातळीस जाऊन लिहीता येईलच असे नाही, परंतु मास्टर्स लेव्हलला असलेले लोक मधला 'बफर झोन' म्हणून असले, तर ज्ञानाचा प्रवाह जास्त सुलभतेने वाहू शकतो, असा एक 'मेटा' अनुभव आहे. परंतु आपल्याकडे गणितज्ञ चांगले असले, तरी मास्टर्स आणि गणितज्ञांमधील दरी खूपच जास्त आहे, असे वाटते. भारतात टॉप लेयर ऑफ मॅथमॅटिशिअन्स बराच चांगला आहे, आणि तो अजून चांगला होतो आहे, ही माझ्या दृष्टीने समाधानाची बाब आहे, परंतु ते एफर्ट्स खालपर्यंत पोचायला हवेत. (म्हणूनच मी मायबोलीवर काहीबाही लिहीण्याचा प्रयत्न करत असतो.
)
हर्पेन, लीलावती, लवकरच.
हर्पेन, लीलावती, लवकरच.
संयोजकांना हा उपक्रम हाती
संयोजकांना हा उपक्रम हाती घेतल्याबद्दल मनापासून धन्यवाद!