मातृदिन : माझ्या आईच्या पध्दतीचा आंब्याचा शिरा

Submitted by दीपांजली on 10 May, 2010 - 02:58
shira

आंब्याचा शिरा:

लागणारा वेळ:
अर्धा तास

साहित्यः
१ वाटी जाड रवा
पाऊण वाटी सजुक तूप
१ वाटी साखर
२ वाटी हापुस अंब्याचा पल्प ( फ्रेश किंवा कॅन मधला)
दीड वाटी गरम दूध
काजु, भिजवलेले साल काढलेले बदामाचे काप, बेदाणे. (प्रमाण आवडी प्रमाणे)
सजावटः
ड्राय फ्रुट्स थोडे मिक्स करायला आणि थोडे सजावटीसाठी ठेवावे.
आंब्याचा सिझन असेल तर आंब्याच्या फोडी.

क्रमवार पाककृती:

१.अर्धी वाटी तूपावर रवा मंद आचेवर खमंग भाजून घ्या.
त्यात दीड वाटी गरम दूध घालून रवा छान फुलवून घ्यायचा.
२. फुललेल्या रव्यामधे एक वाटी साखर मिक्स करून रवा नीट हलवून घ्या.
३. साखर मिक्स झाल्यावर हापुस आम्ब्याचा आमरस घाला आणि मग उरलेलं तूप त्यात घालून रवा, आमरस सगळं नीट मिक्स करायचं, गॅस बारीक करून झाकण ठेवायचं.
४. दोन तीन मिनिटांनी वाफ आली कि त्यात काजु, बदाम तुकडे आणि बेदाणे घालून मिक्स करा.
शिरा तयार.
सर्व्ह करताना:
सजावट करताना छान अकाराच्या साच्यातून तूप लावून मुदी कराव्यात आणि फोटोत दाखवल्या सारख्या किंवा आवडी प्रमाणे काजु-बदाम-बेदाण्यांचं डिझाइन बनवून सजावट करावी.

वाढणी/प्रमाण:
खाणार्‍यावर अवलंबून
अधिक टिप्सः
* आंब्याच्या शिर्‍यामधे स्वाद फक्त हापुस आंब्याचाच ठेवावा.
वेलदोडा, केशर अशा गोष्टी अजिबात घालु नये.
* यु.एस मधल्या स्टोअर्स मधे मिळणारा केसर मँगो पल्प अजिबात वापरु नये, त्या पेक्षा रत्नागिरी हापुस, देसाईंचा पल्प मिळतो तो वापरावा.
* कॅलरी कॉन्शस लोकांने पोरशन कंट्रोल करावा पण कमी तूपात अजिबात करु नये, गचगचीत शिरा होईल !
माहितीचा स्त्रोतः
आई :)

हा आईने बनवलेल्या शिर्‍याचा फोटो :
shira2.jpg

Much requested video, finally on my channel ,
माझ्या चॅनलवर नवीन व्हिडिओ +grocery vlog : आंब्याचा शिरा ( आईची रेसिपी):

आवडला तर लाइक करा आणि शेअर करा :)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

४० लोकांसाठी शिरा करायचाय आणि म्हणे स्वयंपाकमठ्ठ! ये तो नाईन्साफी हय!

वरदा, ४० लोकांना किती शिरा द्यायचाय? प्रसादाची मूद की मसालेभाताची मूद?

प्र९, मी पण बिगरीतलीच आहे. पण अचानक उपटलेली महत्वाकांक्षा आहे, आणि माबोकरांच्या मदतीने नैय्या पार लागेल असा विश्वास आहे. जर ट्रायल यशस्वी झाली (वर दिलेल्या प्रमाणातली) तरच... Proud
मंजूडे, या दोन्हीच्या मधली मूद. स्वीट डिश म्हणून स्नॅक्स कम जेवण अशा ताटात.

आत्ता माझ्या डोक्यात मेन्यू आहे पण त्यावर एकदा इतरांची मतं यायला सुरुवात झाली की यथावकाश बेत काय करावा यावर पोस्टी येतीलच Wink

मला असे वाटतेय की एका वेळी २-अडीच वाट्यांचा शिरा करावा. प्रमाण वर दिलेल्या प्रमाणात नीट दुप्पट अथवा अडीच पट करून. असे ३ वेळा कर. तेवढा पुरेल असे मला वाटते आहे.तसेही २-३ बॅचमधे केल्याचे फायदे म्हणजे एकदम सगळेच बिघडत नाही, हलवत रहाणे, चवीचा अंदाज करणे सोपे जाते आणि एकेक बॅच झाली की अंदाज पण येत जातो अजून किती लागेल याचा. मागे मी मायबोली एवेएठि ला केला होता तेव्हा असेच प्रमाण दुप्पट घेतले आणि २-३ वेळा त्याच मापात शिरा बनवला हे आठवतेय.

धन्यवाद मंजूडे Happy तू अचूक प्रमाण सांगशील याची खात्री होतीच.

पण त्या रव्याबरोबर साखर, तूप, दूध आणी रसाचं प्रमाण पण सांग की. मी कंप्लीट अडाण्याचा गाडा आहे माहिताय ना?

अर्धा किलो?
मलाही मैत्रेयीसारखं साधारण ८ वाट्या घ्याव्यात असं वाटतंय. म्हणजे बहुधा किलो ते सव्वा किलो रवा व्हावा असा अंदाज. कोणी घरी असाल त्यांनी वजन करून बघा बरं. Happy

Lol

Lol

स्वाती, अर्धा किलो रव्याच्या मापाने दर वर्षी स.पुजेला शिरा करते, तो पाच किलोचं भांडं पाऊणच्या वर भरतो. तेवढा माझ्या मते चाळीस माणसान्ना पुरेल. एकेकदाच द्यायचाय (बहुतेक) आणि मूद छोटी आहे.
आणि थाम्बा जरा... घरी अर्धा किलो रव्याची पिशवी आहे, वाट्या मोजून सांगते :p

मग अगदी प्रसादाची मूद नसेल (स्वीट म्हणून ठेवणार ना?) तर किलोभर घ्यावा असं माझं मत. कुणाला सेकन्ड हेल्पिंग घ्यायचं झालं तरी पुरला पाहिजे. (मत दिल्याबद्दल थोडा शिरा इकडे पार्सल करण्याचे करावे. :P)

>>या दोन्हीच्या मधली मूद. स्वीट डिश म्हणून स्नॅक्स कम जेवण अशा ताटात.

आईचा अंदाजः वरणाच्या वाटीनं एक वाटी रव्याचा शिरा, साधारण ५ मोठ्या माणसांना, जेवणाबरोबर द्यायला व्यवस्थित पुरतो.

अरे वा!! वरती आला हा धागा.. मला हवीच होती ही रेसिपी .. या वेळेला गणपतीत प्रसादासाठी म्हणून करायचा आहे हा शिरा.. मी पण २० लोकांसाठी किती प्रमाण लागेल तेच विचारणार होती आणि वरदा ने विचारल्यामुळे माझ्याही शंकेच निरसन झालं आहे...
आधीच सगळ्यांना धन्यवाद देते .. फोटो टाकेनच इकडे

१ किलोचा तरी करच.
मी केला नाही पण फोटो आणि प्रतिक्रिया बघून तेवढा लागेलच अस वाटतंय.
आणि उरला तरी टिकणारी गोष्ट आहे.
उगाच कमी पडायला नको.

वरदा,
८ वाट्या रवा
५ वाट्या तूप रवा भाजायला, अर्धी पाऊण वाटी तूप वरून सोडायला
८ वाट्या साखर
१२ वाट्या दूध
१६ वाट्या आमरस
२-३ वाट्या ड्रायफ्रूट्स

शक्य झालं तर रवा कोरडाच आधी भाजून ठेव. म्हणजे तूप घालून भाजायला वेळ लागणार नाही.
तुझ्याकडे येणारे पाहुणे, त्यांची आवड, खाण्याची क्षमता, वाढणीचं प्रमाण आणि उरलेलं अन्न संपवण्याची आवड आणि क्षमता हे सगळं लक्षात घेऊन प्रमाण ठरव.
एक वाटी रव्याचा शिरा पाच जणान्ना एकदा वाढण्यापुरता हे प्रमाण बरोबर आहे. पण दहा जणान्ना पावणेदोन वाट्या रवाच लागतो. कारण रवा/ तांदूळ असे पदार्थ फुलतात त्यामुळे घटकांचे प्रमाण वाढवले तर तयार पदार्थ व्यस्त प्रमाणात होतो.

म्हणजे किती किलो? Proud

एकदम शिस्तशीर प्रमाण दिल्याबद्दल धन्यवाद परत एकदा. पण बाजारातून आणताना किलोच्या प्रमाणात आणावे लागेल ना....

वरदा, आता वरच्या चर्चेप्रमाणे रवा एक किलो लागेल. Wink तूप पाऊण किलोपेक्षा थोडं कमी लागेल. २०० ग्रॅमचे पॅक मिळतात ते आण म्हणजे फोडलेला पॅक संपवायचा कसा असा प्रश्न नको. साखर एक किलो. दूध दोनेक लिटर लागेल.

का आलो या धाग्यावर??? किती मस्त मस्त फोटू टाकलेत इथे..
लाळ गळायला लागली ना राव!

(देवा सत्यनारायणा...लोकांना तुझा प्रसाद असाच करायचा दृष्टांत दे बघू लवकर लवकर! Lol )

आज हा शीरा केला. एकदम हीट झाला, सगळ्यांना आवडला.
डोळे झाकून दिलेल्या प्रमाणात साखर आणि तूप ओतलं Proud
धन्यवाद Happy

मी काल केला होता हा शिरा अशक्य सुंदर टेस्ट ...
खूपच आवडला सगळ्यांना ...
खूप खूप आभार दीपांजली इतक्या सुंदर रेसिपी साठी
हा फोटो ....IMG-20150920-WA0031.jpg

हा शिरा पहिल्यांदा केल्यावर अध्येमध्ये बरेचदा केला होता पण आता या विंटर ब्रेक मध्ये अगदी आणीबाणीचा प्रसंग होत तेव्हाही घरात पल्प होता म्हणून अगदी आयत्या वेळी पण केला आणि सगळ्यांना फार आवडला. त्यातला पल्प उरला होता आणि आज स्नोडिले का होईना पण एकदाची शाळा सुरु होतेय म्हणून सकाळ सकाळी बच्चे कंपनीसाठी केला. काय म्हणतात ते आनंदाने त्यांना शाळेत सोडायच्या आधी. हा त्याचा एक फोटो.

ही कृती इथे दिल्याबद्द्ल पुन्हा एकदा माय-लेकींचे आभार्स Happy

sheera.jpg

आज मी केला. सकाळी उठून सगळे जिन्नस आणले. साखर विसरली पण घरात असलेली ब्राऊन शुगर ढकलली. गटग मध्ये सर्वांना चव आवडली असावी.

.

Pages