गेल्या आठवड्यात आमच्याकडे नेहमी येणारी मांजरी बाळंतीण झाली. तिच्या नेहमीच्या जिन्याखालच्या जागी. आणि पिल्लेही गोंडस. पण एकदा असेच लक्षात आले की मांजरी हालचाल करत नाहीये. हलवून पाहिले तरी काहीच नाही. मग कळले की तिच्या तीन पिल्लांना आमच्या हवाली करून ती निघून गेलीये कायमची.
बापरे, हा अगदीच अवघड प्रकार होता. कारण पिल्ले अगदीच लहान होती. अंगावरच पिणारी. आता आईपाठोपाठ ती पण दगावण्याची शक्यता होती.
पोराने तर रडून धुमाकुळ घातला पिल्ले पण मरणार म्हणून. मग मात्र पटापटा निर्णय घेतले.
पहिले मांजरीला दूर नेऊन खड्ड्यात पुरून तिची विल्हेवाट लावली. मग पिल्लांना घरी आणले, एका मऊ गोधडीवर त्यांची सोय लावली. प्रश्न होता त्यांना दुध पाजण्याचा. व्हॉट्सअपवर सगळ्या ग्रुपवर विचारणा सुरु केली, इंटरनेट धुंडाळले आणि मग कापसाच्या बोळ्याने दुध पाजायचे ठरले. पिल्ले इतकी भेदरली होती की कपाटाखाली अंधाऱ्या कोपर्यात जाऊन बसलेली एकमेकांना बिलगून. कसेबसे त्यांना बाहेर काढले आणि एकेकाला पाजण्याचा कार्यक्रम सुरु केला.
पोरकेपणाची भावना किंवा नैसर्गिकरित्या येणारे शहाणपण म्हणा पण पिल्लांनाही चांगले सामंजस्य दाखवले आणि थोडे थोडे का होईना दुध पिऊन पुन्हा एकमेकांना चिकटून जाऊन बसले. म्हणलं ठीकाय, आता किमान ते मरणार तरी नाहीत.
मग एक मस्त खोका शोधला, त्यात मऊ मऊ गादी तयार केली. थोडे अंधारे वातावरण केले. थोडे आईसारखे वाटावे म्हणून पोराच्या खेळण्यातला एक वाघ पण दिला. ही ट्रीक भारी जमली. तिन्ही पिल्ले त्या खोट्या वाघाच्या अंगावर डोके ठेऊन झोपली.
संध्याकाळी पोरगे घरी आल्यावर त्याने पिल्लांचा ताबा घेतला. आणि त्याच्याच सल्ल्याने ताटलीत दुध देऊन पाहिले. काय आश्चर्य, गडबडगुंडा करत का होईना जिभेने लपालपा प्यायली. म्हणलं, फारच लवकर शिकतायत.
आणि मग तेव्हापासून सुरु झाले आमचे औट घटकेचे पालकत्व. पिल्लांनाही लवकरच ही अशी दाढी मिशीवाली आई मानवली आणि मी घरी आलो रे आलो की दुडुदुड धावत, पायाशी घोटाळत, अगदी आर्जवी स्वरात म्याऊ म्याऊ करत दुधाची मागणी सुरु व्हायची. आणि पिऊन झाले की मग छानपैकी अंगाच्या उबेत येऊन झोप काढायची. इतकी गोड झोपलेली असताना त्यांची झोपमोड करायची पण इच्छा व्हायची नाही.
फोन आला तरी दबक्या आवाजात बोलायचे आणि उठायचे तर मुळीच नाही. मस्त वाटायचे.
आधी एकतर घरभर शू आणि शी करत फिरायची. पण मग लवकरच त्यांना एका जागीच जाऊन करायची सवय लागली. त्याचा वास फारच तीव्र असायचा, मग घरच्यांचा ओरडा पडू नये म्हणून फिनाईलने फरशी पुसुन घेणे, आणि खोक्यातली पांघरूणे मशीनला लाऊन धुउन घेणे, वास जावा म्हणून कडक उन्हात वाळवून घालणे सगळे कौतुक सोहळे.
मग वाटले की ताटलीत नीट जमत नाहीये, मग मेडीकल मधून बाटली आणली. सुरुवातीला त्यांना प्रकार जमलाच नाही. मग दुधात बोट बुडवून ते चोखायला द्यायचे आणि मग पटकन बाटली पुढे करायची. या प्रकारात अगणीत वेळेला चाऊन घेतले. छानपैकी दात यायला लागले होते पोरांना आणि मग काय कचाकच चावायची.
पण तोही त्रास मजेमजेचा होता, आणि तो प्रकार मग तिघांनाही इतका आवडला की बास. नुसत्या मारामाऱ्या व्हायच्या. मग शेवटी अजून एक बाटली आणावी लागली आणि आळीपाळीने दुध द्यावे लागायचे. एकाचे काढून घेतले की ते गुरगुरत पुन्हा झडप घालायचे. त्यात दोन जास्त आक्रमक होते, त्यामुळे तिसऱ्याला वेगळ्या खोलीत नेऊन, दार लाऊन गुपचुप पाजावे लागायचे.
आणि या सगळ्यात माझा भाऊ, पोरगा तितक्यात कौतुकानी सगळे करायचे. त्यांची नावे पण ठेवली होती इन्ना, मिन्ना आणि डिक्का. ही पण ज्युनिअर चॅँपची आयडीया.
एकंदरीतच सगळ्या घरादाराला या लोकरीच्या गुंड्यांनी लळा लावला होता. पण त्यांना कायमस्वरूपी सांभाळणे शक्यच नव्हते. एकतर आता त्यांना सोफ्यावर आणि कॉटवर चढायचा छंद लागला होता, त्यातून दरवाजा उघडा दिसला की बाहेर पळायचे. मग त्यांना पकडून आणता आणता दमछाक व्हायची. घरभर, बेडरूम, किचन, देवघर कुठेही पळापळ चालायची, चालता चालता पायात यायची, चादरीच्या गुंडाळीत, उशीजवळ कुठेही सापडायची अचानक.
त्यामुळे शोध सुरु झाला नवीन घराचा. अनेकांना विचारल्यावर शेवटी एक कुटुंब तयार झाले तिघांनाही घेऊन जायला. त्याप्रमाणे गाडी घेऊन आले देखील.
अशी जीवापाड सांभाळलेली पोरे दुसऱ्याच्या ताब्यात देताना अक्षरश काळजावर दगड ठेवावा लागला. कितीतरी वेळेला त्यांना असे जवळ घेऊन माया केली, म्हणलं त्रास देऊ नका. काय माहीती त्यांच्या टपोऱ्या डोळ्यात काय भाव होते. आणखी काही दिवसांनी विसरून पण जातील. पण ती मात्र माझ्या मनात कायमच राहतील आणि हे औट घटकेचे पालकपण देखील.
वाघाच्या गळ्यात रिस्ट वॉच कोण
वाघाच्या गळ्यात रिस्ट वॉच कोण बांधणार!!!
किती गोड. आणि किती कठिण.
किती गोड. आणि किती कठिण. बापरे!
अमितव
कमाल फोटो नि स्तुत्य काम..
कमाल फोटो नि स्तुत्य काम.. सगल्यांनाच् जमत नाही हे..
ग्रेट काम तुमच्या सर्वांचं.
ग्रेट काम तुमच्या सर्वांचं. फोटोही सुंदर.
मस्त मस्त.. फोटो आणि तुमची
मस्त मस्त..
फोटो आणि तुमची माया दोन्ही..
मला स्वतःला आवडत नै मांजरी (मी श्वानप्रेमी) पण दुरुन दोंगर साजर कारभार आहे..
काल एक मांजर खुप केवीलवाणी ओरडत होती रात्री..घरात यायला पाहत होती.. काय माहिती काय बिनसल होत तिच तर..पण त्यांना घरी घेण जिवावर येत मला..
पुण्यात आल्यावर सपेत जिथ पीजी म्हणुन राहत होती तिथ शेजारी एक आजी आजोबा राहत होते..खुप खवचट होते म्हणा स्वभावान पन असो आमच बोलण फार कमी असायच त्यांच्याकडे..तिथं त्या आज्जीची एक मांजर होती .. नावं तिच छबी.. सतत त्या छबु च्या माग असायच्या त्या.. सुंदर होती छबू दिसायला.. तिचं ऑपरेशन करुन आणल होत तरी तिला पिल्ल झाली..मग त्यांची सरबराई पण झाली काही दिवस पण महिन्या दोन महिन्याने त्यांना सोडून दिल त्या लोकांनी..कुणी घेतल नै त्यामुळे असचं कुठतरी सोडून दिल त्यांनी त्या पिल्लांना .. एकदोनदा मंडईत सोडल्यावरही ती परत आली माग काढत पण मग कुठ सोडल नै माहिती.. अस्सा राग आला त्यांचा.. जाऊ दे..
तर त्यांना घालवण्यापूर्वी त्यांचे फोटोसेशन (?) केलेल मी त्यातले काही प्रचि देते इथं :
हि छबु / छबी
ते चौघ होते .. अंगतपंगत :
किती गोड आहेत पिल्लं...
किती गोड आहेत पिल्लं... फोटुही मस्तंच !
शीर्षक,लेख, प्रचि सर्वच आवडले...
खूपच सुंदर लेख आणि फोटोज!
खूपच सुंदर लेख आणि फोटोज! मस्तच!!
वा!! पिल्ले खुपच गोड आहेत!
वा!! पिल्ले खुपच गोड आहेत!
वेल डन!!
मस्तच! फोटो फार गोड आहेत.
मस्तच! फोटो फार गोड आहेत.
टीना, छबी आणी तिची छबुकली पण
टीना, छबी आणी तिची छबुकली पण गोड आहेत.
तुमच्या धडपडीचे व आस्थेचे
तुमच्या धडपडीचे व आस्थेचे कौतुक! फार प्रेमाने सांभाळलंत पोरांना. >>>+१११११११११११
आशुचँप, पिल्लं, पिल्लांचे
आशुचँप,
पिल्लं, पिल्लांचे फोटो, आणि त्यांचे पालक खरोखरीच सुंदर आहेत.
खोक्यात ठेवलेल्या पिल्लांचं प्रचि फारंच गोंडस आलंय. पिल्लं भिंतीवरचा मजकूर वाचताहेत जणू. डावीकडे Do not step on अशी सूचना लिहिलीये तिचं पालन करताहेत की काय! पण उजव्या भिंतीवरचा मजकूर तर उलटा आहे !
आ.न.,
-गा.पै.
मस्त
मस्त
मस्त. खूप छान वाटलं
मस्त. खूप छान वाटलं वाचताना. पिल्लांचे फोटो ही गोड आहेत अगदी.
खुपच छान...
खुपच छान...
मस्त.
मस्त.
तुमचे फोटोज आणि वर्णन वाचताना
तुमचे फोटोज आणि वर्णन वाचताना औट घटकेचे पालकत्व आम्ही पण अनुभवले
धन्यवाद सर्वांना.... वाह इथे
धन्यवाद सर्वांना....
वाह इथे तर माऊ प्रेमींची मांदियाळीच जमलीये की...काय एकसे एक पिल्ले आहेत...सगळीच क्युट....
वा, वा, फारच छान!
वा, वा, फारच छान!
हटवादी पणाचा कहर
हटवादी पणाचा कहर
आमच्या शेजारच्या घरी एक मांजरीने 4 पिल्ले दिली, ती पण गादीवर. त्या काकूंनी माणसाला बोलावून ती बाहेर नेऊन ठेवली आणि तेव्हापासून त्या मांजरीने जे काही सगळ्यांचे डोके उठवले की बस.
आधी ती त्यांच्या हॉल मध्ये ठिय्या आंदोलनाला बसली. त्यांनी मग मला बोलावून घेतले. मी त्यातल्या त्यात तोडगा म्हणून ती पिल्ले त्यांच्या बागेतून उचलून पार्किंग मध्ये एक चादर अंथरून त्यावर दुधाची ताटली ठेऊन व्यवस्था केली आणि मांजरीला बाहेर काढले.
ती पिल्लांकडे ढुंकून बघायला तयार नाही. आणि सारखी आपली त्या खोलीच्या खिडकीत जाऊन आर्त स्वरात विव्हळू लागली. मग मी पिल्लांना उचलले अशी शंका आली असावी म्हणून का काय रात्रभर माझ्या खोलीच्या (वरच्या मजल्यावर) येऊन विनवण्या करत बसली.
तिला दूध दिले आणि थोडे पिऊन झाले की ताटली उचलून पूढे न्यावी असे करत करत पिल्लापाशी नेली तरी मॅडम ऐकेना.
पिल्ले इतकी लहान की जेमतेम पोटावर सरकत होती. असला व्याप झाला डोक्याला.
रात्रभर काही झोपू दिले नाही. शेवटी पहाटे असह्य झाले, त्या काकू पण उठून आल्या बाहेर.
मांजर आमच्या दारात विव्हळत होते म्हणून एक पिल्लू उचलून आमच्या दारात आणून ठेवले तरी बघेना. तिचीच पिल्ले आहेत का नाहीत अशी शंका यायला लागली किंवा हिने आता माणसाचा हात लागला म्हणून त्यांचा त्याग केला हेही कळेना.
मंडई झाली पार डोक्याची आणि मग शेवटचा तोडगा म्हणून पिल्ले होती तशी गादीवर ठेवू असे ठरले इतका आवाजाने वैताग आला. कहर म्हणजे एक पिल्लू ठेऊन दुसरी आणायला जाईपर्यंत खिडकीतून आली आणि पिल्लू घेऊन पसार झाली.
एकापाठोपाठ एक सगळी पिल्ले आधी होती त्याच जागेवरून नेली.
म्हणलं काय तो हटवादीपणा
Pages