गेल्या आठवड्यात आमच्याकडे नेहमी येणारी मांजरी बाळंतीण झाली. तिच्या नेहमीच्या जिन्याखालच्या जागी. आणि पिल्लेही गोंडस. पण एकदा असेच लक्षात आले की मांजरी हालचाल करत नाहीये. हलवून पाहिले तरी काहीच नाही. मग कळले की तिच्या तीन पिल्लांना आमच्या हवाली करून ती निघून गेलीये कायमची.
बापरे, हा अगदीच अवघड प्रकार होता. कारण पिल्ले अगदीच लहान होती. अंगावरच पिणारी. आता आईपाठोपाठ ती पण दगावण्याची शक्यता होती.
पोराने तर रडून धुमाकुळ घातला पिल्ले पण मरणार म्हणून. मग मात्र पटापटा निर्णय घेतले.
पहिले मांजरीला दूर नेऊन खड्ड्यात पुरून तिची विल्हेवाट लावली. मग पिल्लांना घरी आणले, एका मऊ गोधडीवर त्यांची सोय लावली. प्रश्न होता त्यांना दुध पाजण्याचा. व्हॉट्सअपवर सगळ्या ग्रुपवर विचारणा सुरु केली, इंटरनेट धुंडाळले आणि मग कापसाच्या बोळ्याने दुध पाजायचे ठरले. पिल्ले इतकी भेदरली होती की कपाटाखाली अंधाऱ्या कोपर्यात जाऊन बसलेली एकमेकांना बिलगून. कसेबसे त्यांना बाहेर काढले आणि एकेकाला पाजण्याचा कार्यक्रम सुरु केला.
पोरकेपणाची भावना किंवा नैसर्गिकरित्या येणारे शहाणपण म्हणा पण पिल्लांनाही चांगले सामंजस्य दाखवले आणि थोडे थोडे का होईना दुध पिऊन पुन्हा एकमेकांना चिकटून जाऊन बसले. म्हणलं ठीकाय, आता किमान ते मरणार तरी नाहीत.
मग एक मस्त खोका शोधला, त्यात मऊ मऊ गादी तयार केली. थोडे अंधारे वातावरण केले. थोडे आईसारखे वाटावे म्हणून पोराच्या खेळण्यातला एक वाघ पण दिला. ही ट्रीक भारी जमली. तिन्ही पिल्ले त्या खोट्या वाघाच्या अंगावर डोके ठेऊन झोपली.
संध्याकाळी पोरगे घरी आल्यावर त्याने पिल्लांचा ताबा घेतला. आणि त्याच्याच सल्ल्याने ताटलीत दुध देऊन पाहिले. काय आश्चर्य, गडबडगुंडा करत का होईना जिभेने लपालपा प्यायली. म्हणलं, फारच लवकर शिकतायत.
आणि मग तेव्हापासून सुरु झाले आमचे औट घटकेचे पालकत्व. पिल्लांनाही लवकरच ही अशी दाढी मिशीवाली आई मानवली आणि मी घरी आलो रे आलो की दुडुदुड धावत, पायाशी घोटाळत, अगदी आर्जवी स्वरात म्याऊ म्याऊ करत दुधाची मागणी सुरु व्हायची. आणि पिऊन झाले की मग छानपैकी अंगाच्या उबेत येऊन झोप काढायची. इतकी गोड झोपलेली असताना त्यांची झोपमोड करायची पण इच्छा व्हायची नाही.
फोन आला तरी दबक्या आवाजात बोलायचे आणि उठायचे तर मुळीच नाही. मस्त वाटायचे.
आधी एकतर घरभर शू आणि शी करत फिरायची. पण मग लवकरच त्यांना एका जागीच जाऊन करायची सवय लागली. त्याचा वास फारच तीव्र असायचा, मग घरच्यांचा ओरडा पडू नये म्हणून फिनाईलने फरशी पुसुन घेणे, आणि खोक्यातली पांघरूणे मशीनला लाऊन धुउन घेणे, वास जावा म्हणून कडक उन्हात वाळवून घालणे सगळे कौतुक सोहळे.
मग वाटले की ताटलीत नीट जमत नाहीये, मग मेडीकल मधून बाटली आणली. सुरुवातीला त्यांना प्रकार जमलाच नाही. मग दुधात बोट बुडवून ते चोखायला द्यायचे आणि मग पटकन बाटली पुढे करायची. या प्रकारात अगणीत वेळेला चाऊन घेतले. छानपैकी दात यायला लागले होते पोरांना आणि मग काय कचाकच चावायची.
पण तोही त्रास मजेमजेचा होता, आणि तो प्रकार मग तिघांनाही इतका आवडला की बास. नुसत्या मारामाऱ्या व्हायच्या. मग शेवटी अजून एक बाटली आणावी लागली आणि आळीपाळीने दुध द्यावे लागायचे. एकाचे काढून घेतले की ते गुरगुरत पुन्हा झडप घालायचे. त्यात दोन जास्त आक्रमक होते, त्यामुळे तिसऱ्याला वेगळ्या खोलीत नेऊन, दार लाऊन गुपचुप पाजावे लागायचे.
आणि या सगळ्यात माझा भाऊ, पोरगा तितक्यात कौतुकानी सगळे करायचे. त्यांची नावे पण ठेवली होती इन्ना, मिन्ना आणि डिक्का. ही पण ज्युनिअर चॅँपची आयडीया.
एकंदरीतच सगळ्या घरादाराला या लोकरीच्या गुंड्यांनी लळा लावला होता. पण त्यांना कायमस्वरूपी सांभाळणे शक्यच नव्हते. एकतर आता त्यांना सोफ्यावर आणि कॉटवर चढायचा छंद लागला होता, त्यातून दरवाजा उघडा दिसला की बाहेर पळायचे. मग त्यांना पकडून आणता आणता दमछाक व्हायची. घरभर, बेडरूम, किचन, देवघर कुठेही पळापळ चालायची, चालता चालता पायात यायची, चादरीच्या गुंडाळीत, उशीजवळ कुठेही सापडायची अचानक.
त्यामुळे शोध सुरु झाला नवीन घराचा. अनेकांना विचारल्यावर शेवटी एक कुटुंब तयार झाले तिघांनाही घेऊन जायला. त्याप्रमाणे गाडी घेऊन आले देखील.
अशी जीवापाड सांभाळलेली पोरे दुसऱ्याच्या ताब्यात देताना अक्षरश काळजावर दगड ठेवावा लागला. कितीतरी वेळेला त्यांना असे जवळ घेऊन माया केली, म्हणलं त्रास देऊ नका. काय माहीती त्यांच्या टपोऱ्या डोळ्यात काय भाव होते. आणखी काही दिवसांनी विसरून पण जातील. पण ती मात्र माझ्या मनात कायमच राहतील आणि हे औट घटकेचे पालकपण देखील.
मस्त!
मस्त!
क्या बात है! प्रचि सुंदर..
क्या बात है!
प्रचि सुंदर.. पहिला प्रचि तर खासच
धन्यवाद सर्वांना.... ती
धन्यवाद सर्वांना....
ती विसरणार नाहीत तुमचा स्पर्श, तुमचा गंध. त्यांना पुन्हा भेट द्याल तेंव्हा तुमचा स्पर्श लगेच ओळखतील.
>>>>>>
हो माझीही इच्छा आहे...काही दिवसांनी त्यांना जाऊन भेटून यायची. बघुया.
आमची 'काळू' तर ईतकी सोकावली होती की पिल्लं घातली की तीन-चार दिवसांनी त्यांना आमच्या हवाली करुन खुश्शाल फिरायला जायची. >>>>
या पिल्लांची आई पण तशीच. याचे कारण पिढीजात असावे. ती आई आमच्याच घरी जन्माला आली होती. पिल्लांची आज्जी फारच मायाळू होती.
तुम्ही पिल्ले परत का केली? मोठी झाली की मग आपोआप जातातच की ती.
>>>>>
बी, घरी ठेवणे शक्य नव्हते. सगळेच आम्ही दिवसभर बाहेर असतो कामानिमित्त. मग आईवर एकटीवर सगळा भार. त्यातून तिला अॅलर्जीचा त्रास आहे, त्यामुळे कितीही इच्छा असली तरी सांभाळू शकत नाही.
बागुलबुवा - घड्याळाची आयडीया भन्नाट आहे. कधी पुन्हा प्रसंग आला तर करून पाहीन. बाकी शू शीचा केला होता. ओल्या फडक्याने त्यांची शूशीची जागा पुसायचो. सुरुवातीला दुदु पितानाच हातावर करायची. मग एका कोपऱ्यात जाऊन करायला लागली आपोआप.
आणि चाटून घेता येत नव्हते म्हणून किंचित कोमट पाण्यात फडके बुडवून पुसुन काढायचो दोन दिवसातून एकदा. सुदैवाने बाहेर फिरत नव्हती त्यामुळे मळायची नाहीत जास्त. पण दुधात लीडबिड करायची आणि मग ओशटपणामुळे मुंग्या लागतील अशी भिती होती.
त्या माउ मम्मी ला खाणे मिळाले नसल्याने मेली असेल बिचारी.
>>>>>>
मामी - हो तोच अंदाज आहे. पण ती बाळंतीण असल्यापासून तिला जिन्याखाली आम्ही दुधाची ताटली ठेवत होतो.
आणि चाटून घेता येत नव्हते
आणि चाटून घेता येत नव्हते म्हणून किंचित कोमट पाण्यात फडके बुडवून पुसुन काढायचो दोन दिवसातून एकदा.
कसली गोड इवलाली पिल्लं आहेत.
कसली गोड इवलाली पिल्लं आहेत. फोटोही सुंदर आलेत.
हे बघुन आत्ताच्या आत्ता एक पिल्लु घरी आणावं पाळायला असं वाटतय. पण नंतर त्याचं सगळं कोण करणार त्यामुळे इथे नुसतं बघुन घेते.
प्रकाश आमटेंचे प्राणि मित्र
प्रकाश आमटेंचे प्राणि मित्र पुस्तक नक्की वाचा. त्यांनी असेच प्राण्यांना वाढवले आहे. खूपच स्फूर्तिदायक पुस्तक आहे. मोठे लोक. दिलदार लोक.
प्राणी मित्र नाही वाचले पण
प्राणी मित्र नाही वाचले पण नेगल भाग १ आणि भाग २ वाचलेत अनेकदा. त्यामुळेच तर करू शकलो. म्हणलं ते लोक वाघ, सिंह, अस्वले आणि काय काय प्राणी इतक्या मायेने सांभाळू शकतात तर आपण मांजराची पिल्ले का नाही.....
सगळे स्फूर्तीस्थान तेच
स्पॉक -
स्पॉक -
आशू, औट्घटकेच पालकत्व पण किती
आशू, औट्घटकेच पालकत्व पण किती प्रेमाने केलस सर्व. तुझ्या लेकालाही शाब्बासकी दे.
तुमच्या धडपडीचे व आस्थेचे
तुमच्या धडपडीचे व आस्थेचे कौतुक! फार प्रेमाने सांभाळलंत पोरांना.
अरे किती गोड, आशुचँप.. किती
अरे किती गोड, आशुचँप.. किती प्रेमाने देखभाल केलीत.. त्या पिलांना ही तुमचा लळा लागला असणार
किती गोडुली आहेत सगळी, इनोसंट , खोडकर , उत्सुकता सगळे भाव आहेत चेहर्यावर
किती छान मनापासून काळजी
किती छान मनापासून काळजी घेतलीत! फोटोही सुंदर!
एकदम गोड आहेत पिल्लं. माझ्या
एकदम गोड आहेत पिल्लं.
माझ्या सासरी पण सेम केस घडली. तिथे मांजरांचा सुकाळ आहे.
मांजर आईने पिल्लांना घरात आणलं आणि दुसर्यादिवशी बळी पडली बहुदा बोक्याच्या हल्ल्यात.
सासरेबुआंनी त्या ४ दिवसांच्या पिल्लांना ३ महिने पोटच्या पोरापेक्षा जास्त प्रेमाने वाढवलं. एक लाल, एक लाल-पांढरं आणि एक काळं-पांढरं! पिल्लं नंतर हक्काने आरडा ओरडा करून दूध मागणार! अंगा खांद्यावर खेळणार.
नंतर नाईलाजास्तव काही कारणांमुळे द्यावी लागली पिल्लं ती, तेव्हा अतिशय जीवावर आलं होतं त्यांच्या आणि माझ्या पत्नीच्या.
-------------------
Really touching.
Really touching.
मस्त लिहिलंय, फोटोही छान.
मस्त लिहिलंय, फोटोही छान.
काय गोड अनुभव. माऊंचे फोटो
काय गोड अनुभव. माऊंचे फोटो तर पुन्हा पुन्हा बघतेय. त्यांना काही दिवसांसाठी का होइना पण इतकं प्रेमळ घर दिल्याबद्दल तुमचे अभिनंदन. लेख खूप खूप आवडला.
आशुचॅम्प मस्त काम केलत.
आशुचॅम्प मस्त काम केलत. पिल्ल प्रचन्ड गोडुली आहेत. आमच्या घरामागे रहाणार्या मुलाकडली माऊ पण अशीच आमच्या कडे एकदा पिल्ल घालुन गेली. ती यायची आणी रहायची पण पिल्लान्सोबत. पण एका बोक्याने एका नर पिल्लाला मारल्याने मला जाम त्रास झाला. तेव्हापासुन मान्जर घरात आणलेच नाही.
मात्र हे फोटो पाहुन मुलगी मागे लागली मान्जर पाळु म्हणून.:स्मित: कसेतरी समजूत घातलीय. कारण मुलगी लेडी डु लिटील होऊ पहातीय.:फिदी:
रन्गासेठ तुमच्याकडली पिल्ल पण
रन्गासेठ तुमच्याकडली पिल्ल पण जाम क्युट आहेत.
मस्त रे मित्रा .. धाग्याचे
मस्त रे मित्रा ..
धाग्याचे नाव तर अगदी समर्पक .. त्याला जागलास आणि तसाच वागलास
ही औट घटकेची पिल्लावळ जाम गोड
ही औट घटकेची पिल्लावळ जाम गोड आहे. मस्त फोटो.
किती सुंदर फोटो आणी तुमचे
किती सुंदर फोटो आणी तुमचे लिखाणही...पिल्लं फारच गोड आहेत..:)
तुम्ही खूप छान काळजी घेतलीत त्यांची..
सुंदर बाळं, सुंदर फोटो आणि
सुंदर बाळं, सुंदर फोटो आणि लेख सुद्धा. थँक्स फॉर शेयरिंग
क्या बात है आशु!!! एक नंबर!!!
क्या बात है आशु!!!
एक नंबर!!!
व्वा खुपच सुंदर....
व्वा खुपच सुंदर....
मस्त लेख आणि फोटो.
मस्त लेख आणि फोटो.
खूपच सुंदर छायाचित्रे!!!
खूपच सुंदर छायाचित्रे!!!
आणखी काही दिवसांनी विसरून पण जातील. पण ती मात्र माझ्या मनात कायमच राहतील आणि हे औट घटकेचे पालकपण देखील. >>>अगदी अगदी. माझ्या लहानपणीच्या अश्याचकाही सुंदर आठवणी आहेत
पिलांची आई गेली हे ऐकून वाईट
पिलांची आई गेली हे ऐकून वाईट वाटलं.तुमचं कौतुक आहे की तुम्ही पिलांना इतकं चांगलं सांभाळलं. लहान पिलांची सुरुवातीची शी शू काढणे हा प्रकार फार कोणी आनंदाने करु शकलं नसतं.
गोड आहेत पिल्ल आशुचैंप , तुमच
गोड आहेत पिल्ल
आशुचैंप , तुमच कौतुक इतक्या निगुतीने पिल्ल सांभाळलित
सुंदर पिल्ले आणि तुमचे
सुंदर पिल्ले आणि तुमचे लिखाणही! खरोखरच कौतुक वाटते तुमचे , तुमच्या मुलाचे आणि ईतर कुटुम्बियांचे.
ती वाघाचं खेळणं ठेवण्याची
ती वाघाचं खेळणं ठेवण्याची कल्पना लय भारी आहे! त्या वाघाच्या गळ्यात wrist watch बांधलं की झालं!
Pages