|| ॐ गं गणपतये नम: ||

Submitted by पल्ली on 21 August, 2009 - 17:41

ganesh22_0.jpg

श्री गणपती ही शैव परिवारातील एक प्रमुख देवता आहे. मानवाचे धड आणि हत्तीचे शीर असा हा वैशिष्ट्यपूर्ण देव आहे. प्रथम त्याची गणना शंकराच्या गणांत झाली व पुढे तो शिवगणांचा अधिपती झाला. पुराणात त्याला सुखकर्ता, दु:खहर्ता म्हटले आहे. आद्य शंकराचार्यांनी गणपतीला देव पंचायतनात स्थान दिले. शिव, विष्णु, देवी, सूर्य व गणपती असे पंचायतन बनले. 'कलौ चंडी विनायकौ' म्हणजे, कलीयुगांत चंडी म्हणजे दुर्गा व गणपती या दोनच देवता भक्तांना पावतात. संकट निवारणासाठी भाविक गणपतीची व्रते, पूजा करतात. त्याच उद्देशाने आपणही आज अष्टविनायकांच्या यात्रेला निघालो आहोत. ही यात्रा सर्व भाविकांना गणपतीचा कृपाप्रसाद मिळवून देवो, सर्वांचे जीवन मंगलमय करो ही आमची श्री गजानन चरणी प्रार्थना.

स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिध्दीदम
बल्लाळं मुरुडं विनायकं महडम
चिंतामणी स्थेवरम |
लेण्याद्रीं गिरीजात्मकं सुवरदम
विघ्नेश्वरं ओझरम
ग्रामो रांजण संस्थितो गणपति:
कुर्यात सदा मंगलम् ||

ganesh5_1.jpgगणेशमंत्र

अथर्वशीर्षात गणेशाचा मंत्र दिला आहे. "गं" असा तो एकाक्षरी मंत्र आहे. त्याला "बीजमंत्र" म्हणतात. याला "गणपतये नम:" असा नमस्कार जोडून त्याचा जप करतात. अथर्वशीर्षाची एकवीस किंवा सहस्त्र आवर्तने केल्यास संकटनाश होउन कर्त्याला यश व सुख लाभते. चतुर्थी गणपतीला अत्यंत प्रिय आहे. शुक्लपक्षातल्या चतुर्थीला 'विनायकी' आणि कृष्णपक्षातल्या चतुर्थीला 'संकष्टी' म्हणतात. मंगळवारी जी चतुर्थी येते तिला 'अंगारकी' म्हणतात. विनायकीला संपूर्ण रात्र उपवास असतो तर संकष्टीला रात्री चंद्रोदय झाल्यानंतर भोजन करतात. यात भाद्रपद शुद्ध चतुर्थी ही प्रमुख तिथी आहे.
गाणपत्य संप्रदाय-गणपती हा ज्यांचा सर्वश्रेष्ठ उपास्य देव आहे असे काही पंथ भारतात निर्माण झाले. असे एकूण सहा संप्रदाय आहेत. महागणाधिपतीचा संप्रदाय, हरिद्रा, उच्छिष्ट, नवनीत, स्वर्ण, संतान ई.

ganesh1_0.jpgगणेशतत्व

गणपती अथर्वशीर्षात श्री गणेशाला नमस्कार केल्यावर पुढची वाक्ये अशी आहेत, "तू तत्त्व आहेस, तू प्रत्यक्ष ब्रह्म आहेस. तू आत्मा आहेस. तू ज्ञानमय आहेस. विज्ञानमय आहेस. तू सर्वकाही आहेस."
ही वाक्ये त्याला ब्रह्मपदी नेऊन बसवतात. गणपती सर्व वाङमयाच्या तळाशी असून नादाच्या मुळाशी आहे. तो मूलाधारचक्रावर अधिष्ठित आहे. वाग्विद्येत तो ओंकाररूप आहे. यावरुन प्रणव उपासना ही गणेशोपासनाच आहे हे ठरते. गणपतीच्या अनेक नावात वक्रतुंड हे एक नाव आहे. वक्र ती माया व तुंड ते ब्रह्म. गणपती हा मायेचा अधिष्ठाता साक्षात परम ईश्वर होय.

ganesh3_0.jpgश्री गणेशाचे स्वरूप

शिवपुत्र गणेशाला आठ नावे आहेत. प्रत्येक नावाने त्याने दुष्ट दैत्यांचा संहार केला आहे. अथर्वशीर्षात वर्णन केलेले श्री गणेशाचे स्वरूप -

एकदंत चतुर्हस्तं पाशांकुश धारिणम |
रदं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषक ध्वजम ||
रक्तं लंबोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं |
रक्तगंधानुलिप्तागं रक्तपुष्पैही सुपूजीतम ||

अर्थ- गणपती एकदंत आहे. त्याला चार हात आहेत. वरच्या दोन हातात पाश व अंकुश आहेत. खालच्या डाव्या हातात मोडका दात धरलेला असून उजवा हात वरदमुद्रेत आहे. त्याचा ध्वज मूषक चिन्हांकित आहे. तो रक्तवर्ण आहे. तो लंबोदर व शूर्प (सूप) कर्ण आहे. तो रक्तवस्त्र परिधान करतो. त्याच्या अंगाला रक्तचंदनाची उटी आहे. रक्तपुष्पांनी त्याची पूजा होते. रक्तवर्ण अर्थातच लाल रंग.

|| श्रीगणेशार्पणमस्तु ||

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पल्ले, गणपती बाप्पा मोरया!
उत्कृष्टं चित्रं आणि माहितीही. तुझ्यावर वरदहस्तं आहेच त्याचा... असाच निरंतर राहो!

पल्लि,
चित्र छान आलीयेत (नेहमीप्रमाणे.) रंग कोणते वापरले आहेत? म्हणजे माध्यम काय आहे?
गणपतीची माहीती पण छान.
धनु.

प्रसन्न वदने प्रसन्न होशी......
सगळेच वाट पहात असलेला पाऊस व मा.बो.वरचं आपलं दर्जेदार सादरीकरण यंदा श्री गणेशाच्या आगमनाचा मुहूर्त
साधून आलीत म्हणायचं !
सुन्दर व औचित्यपूर्ण !!
- भाऊ

सुंदर चित्रे. किती प्रसन्न वाटतंय पाहून.
रंग कुठले, चित्राचा आकार काय ही सगळी माहिती वाचायला आवडेल.

Pages