रेलकथा २ - पासहोल्डर राण्या, रणरागिण्या वगैरे..
आज लांब पल्ल्याच्या गाड्यांमधल्या १८ पासहोल्डर महिलांवर बोईसर स्थानकात कारवाई केल्याची बातमी वाचली पेपरमधे. जागा धरणे, ठराविक जागांवर हक्क समजणे आणि त्यातून होणारी भांडणे, अरेरावी हे सगळं त्या कारवाईच्या मुळाशी होतं असं बातमीमधे आहे. हे वाचून अनेकांची प्रतिक्रिया ’बरी खोड मोडली!’ अशी असणार. आणि त्यात चुकीचे काही नाही. पासहोल्डर्सचा असा अनुभव आलेले खूप जण असणार. मी पण होते की एकेकाळी पासहोल्डर असूनही नवखी असल्याने कळपातली जागा निश्चित नव्हती. मग मलाही इकडून तिकडे हुसकले जात असेच बसायच्या जागेसाठी. मनापासून राग यायचा त्यांचा.
मग कधीतरी हा राग थोडासा निवळायला लागला. मुंबईकडे चाललेल्या गाडीत कुणीतरी कुणालातरी विचारलं ’तू आजच परत जाणारेस का संध्याकाळी?’ तिने उत्तर दिले ’नाही आज नाही. आता उद्या. दादरला चढेन. मला जागा ठेवा.’ दुसर्या दिवशी दादरला परतीची गाडी पकडणार्या ताई सायन हॉस्पिटलात नर्स होत्या. डेक्कन क्वीनने पुण्याहून निघून, हॉस्पिटलात पोचून, ड्युटीचे कपडे वगैरे घालून त्या दुपारी त्यांची शिफ्ट सुरू करत ती रात्रीपर्यंत. मग तिथेच कुठेतरी झोप काढून पहाटे दुसरी शिफ्ट सुरू करत ती दुपारी संपे. मग परत कपडे बदलून परतीची गाडी गाठत. रात्री १०:३० - ११:०० ला घरी पोचत. घरी दोन दिवसांच्या पोळ्या बडवणे, एक दिवसाची भाजी करणे, दुसर्या दिवशीच्या भाजीचे चिरणे/ निवडणे करून ठेवणे असं सगळं मॅनेज करून त्या परत दुसर्या दिवशी सकाळची डे क्वी पकडत. हे सगळं का? तर अर्थातच पोटासाठी. पुण्यातल्या हॉस्पिटलात बदली करून मिळत नव्हती काही कारणाने आणि नोकरी सोडणे परवडण्यासारखे नव्हते मग लटका.
एक मैत्रिण होती. तिची तिच्या बँकेच्या मुंबई ब्रांचला बदली झाली होती. मैत्रिणीचं माहेर पुण्यात. सासर नाशिकला. नवर्याची नोकरी बदली करून घेण्यासारखी नाही. बदली घेतली नाही तर नोकरी सोडायला लागायची परिस्थिती. ते शक्य नाही. नाशिकला मुलीला सांभाळणारे कोणी नाही. मग मैत्रिण मुलीला घेऊन चक्क माहेरी रहायला आली. आठवडाभर तिची आई सांभाळे मुलीला आणि ही रोज पु-मु अपडाऊन. शनिवारी नवरा पुण्यात येत असे या दोघींना भेटायला किंवा कधी ही जात असे. माहेरी रहायचं, मूल आईच्या भरवश्यावर सोडायचं या सगळ्याचं नाही म्हणलं तरी दडपण येतंच. मग ते कमी करायला माहेरी जेवढा वेळ घरात असे तेवढा वेळ जास्तीत जास्त घरातली कामं करायची. पैशाने मदत करायची वगैरे आलंच. ती सांगायची पासमुळे मिळेल ती गाडी, मिळेल तिथे बसून पुण्याला परत येता येते. बसायला नीट सीट मिळाली तर तेवढाच आराम मिळतो. नाहीतर मग दारात, कधी कुठल्या लांब पल्ल्याच्या तीन टियरवाल्या एक्स्प्रेसच्या वरच्या बर्थवर किंवा दोन सीटसच्या मधोमध जमिनीवर असं कुठेही बसून यावे लागते.
अशा हजारो कहाण्या. सगळ्या नोकरीपायी धावणार्या, घरातून बाहेर पडायची आणि पोचायची वेळ अशी की कुणाशी काही संवाद व्हायची सोय नाही पण घरच्या जबाबदार्या पार पाडल्या नाहीत तर टोमणे हाणायला सगळे तयार. बहुतेक सगळ्या जणी निम्नमध्यमवर्गीय ते मध्यममध्यमवर्गीय स्तरातल्या त्यामुळे घरातली कुठलीही जबाबदारी मोलाने देणं यासाठी मानसिकता व खिसा दोघांची परवानगी नाही. सुट्टीचा दिवस हा अपराधभावाने केवळ घरासाठी लिहून दिलेला. शरीराला विश्रांती, मनाला विश्रांती ही फक्त रेल्वेच्या प्रवासात.
बसायची जागा मिळणे आणि तिथे थोडावेळ शांतपणे बसता येणे, सगळं काही विसरता येणे, आपल्यासारख्याच बाकीच्या सगळ्यांबरोबर थोडेसे हास्यविनोद करता येणे हे एकमेव सुखनिधान आयुष्यातलं. ते कुणी काढून घेतंय म्हणल्यावर तडफड होणारच. कायदा, नियम माहिती असले तरी चिडचिड होणार. जी समोरच्याला समजणार नाहीच. मग यातून येत असेल ती बसायच्या जागेची अरेरावी वगैरे. खरंतर अर्ध्या अधिक जणी थोड्या थोड्या वेळाने जरा वेळ तू बस गं. मग अमुक स्टेशनला मी बसेन परत वगैरेही करतात एकदा तुम्ही त्यांच्या आतल्या ग्रुपच्या जवळपास पोचलात की.
शेवटी कधीतरी जाणार्याला एकदाच तीन चार तास बसायचे असते सीटवर आणि यांच्यासाठी रोजची लढाई. अरेरावी, इतरांना बसू न देणे वगैरे गोष्टी नियमबाह्य, समाजासाठी अयोग्य वगैरे ठिकच. त्याचे समर्थन नाही पण या सगळ्यांच्या आयुष्यातल्या एकमेव विश्रांतीचे काय? प्रश्न बाकी राहतोच...
- नी
मस्त लिहिलंयस नी...
मस्त लिहिलंयस नी...
छान लिहीलयं नी. पासहोल्डर
छान लिहीलयं नी. पासहोल्डर महिलांना हा रेल्वे प्रवास म्हणजेच विरंगुळा. त्यांमुळे त्रागा समजुन घेता येतो. बाकी उपस्थीत केलेल्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे सीट रीर्झवेशन. अनेक देशात तिकीट आणि सीट रीर्झवेशन वेगवेगळे ठेवतात/असतात. आपल्याकडेही असे झाले तर, रेल्वेला अधीकचे उत्पन्नही मिळेल व पासहोल्डर महिलांना 'हक्काची जागा'. (मा. वै. म.)
खतरनाक. कोडीच असतात काही
खतरनाक. कोडीच असतात काही काही.
छान लिहिलं आहेस. या
छान लिहिलं आहेस.
या पासधारकांच्या डब्यात पुरुष किती असतील असे रोज अपडाऊन करुन संसाराच्या खस्ता काढणारे याचं कुतूहल आहे. बहुतेक पुरुष बदलीच्या ठिकाणी आपला बाडबिस्तारा हलवतात आणि जमलं तर वीकेन्डला ये जा करतात आणि मग तरी सगळ्यांची सहानुभूती मिळवतात.
अशी रोजची कष्टाची चाकरी करणर्या स्त्रियांना घरुन बाकीच्यांची जाऊदे, नवर्याची सुद्धा मदत न मिळणे हे आकलनाच्या पलिकडचे आहे. जनरलीच बायका स्वतःचं एक्स्प्लॉयटेशन होऊ देणं थांबवायला आयुष्य गेलं तरी प्रयत्न करत नाहीत हेही आकलनाच्या पलीकडे आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल आता सहानुभूतीही वाटत नाही.
अनेक देशात तिकीट आणि सीट
अनेक देशात तिकीट आणि सीट रीर्झवेशन वेगवेगळे ठेवतात/असतात. आपल्याकडेही असे झाले तर, <<
असतेच की.
पु - मु वर धावणार्या सर्व गाड्यांमधे रिझर्वेशनवाले डबे वेगळे असतातच. एक डबा पासहोल्डर्सचा असतो जो स्त्री-पुरूष सर्वांसाठी असतो. एक डबा लेडीज असतो ज्यात जनरल (नुसते तिकीट व पासहोल्डर) अश्या बायका बसतात.
केवळ डेक्कन क्वीन अशी गाडी आहे जिथे पासहोल्डर बायकांसाठी वेगळा डबा आहे. तसेच फर्स्टक्लास पासहोल्डर डबाही आहे ज्यात १५ सीटस लेडीज आहेत.
शर्मिला, पासधारक पुरूषांचा
शर्मिला, पासधारक पुरूषांचा डबाही भरलेला असतो. अगदी फर्स्टक्लासवाला सुद्धा.
खूप सारे व्यापारी लोक सकाळी निघून मुंबईत कामे करून संध्याकाळी परत येतात. त्यांच्याबरोबर अर्थातच बायकोने भरून दिलेला डबा असतो चारी ठाव.
पण नोकरीसाठी धावणारेही आहेत. मात्र घरी पोचल्यावर स्वैपाकपाणी, मुलांचे अभ्यास याची उठाठेव करणारे किती हा प्रश्न आहे.
जनरलीच बायका स्वतःचं एक्स्प्लॉयटेशन होऊ देणं थांबवायला आयुष्य गेलं तरी प्रयत्न करत नाहीत हेही आकलनाच्या पलीकडे आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल आता सहानुभूतीही वाटत नाही. <<<
प्रयत्न करत नाहीत कारण हे चुकीचं आहे हेच त्यांना माहिती नसतं. आपल्याला सहानुभूती वाटली काय आणि नाही वाटली काय, त्या स्वतः जोवर हे दुष्टचक्र थांबवायला बघणार नाहीत तोवर काहीच फरक पडणार नाही.
त्या स्वतः हे प्रयत्न करत
त्या स्वतः हे प्रयत्न करत नाहीत म्हणूनच सहानुभूती नाही. अन्याय सातत्याने सहन करण्यामुळे आलेलं अॅग्रेशन अशा प्रकारे बाहेर पडतं मग. त्याचा इतरांना त्रास. लोकलमधे अशा असंख्य भयानक अॅग्रेसिवली बायका भांडतात त्यांच्याबद्दलही माझं हेच मत.
त्या अॅग्रेशनला सहानुभूती वा
त्या अॅग्रेशनला सहानुभूती वा समर्थन द्यायचा माझा उद्देश नाही अजिबातच.
या पासधारकांच्या डब्यात पुरुष
या पासधारकांच्या डब्यात पुरुष किती असतील असे रोज अपडाऊन करुन संसाराच्या खस्ता काढणारे याचं कुतूहल आहे.>> मुंबईहून पुणे/ नाशिक/ सूरत किंवा उलट असे अपडाऊन करणारे पुरुष आहेत. आमच्या ऑफिसातले एक काका पालघरहून रोज ये-जा करतात. त्यांचं घरही पालघर स्टेशनपासून दूर आहे. या काकांना मी एकदा विचारलंही, की मुंबईत स्थिरस्थावर होणं, किमान दहिसर बोरीवलीपर्यंत सहज शक्य झालं असतं तुम्हाला, कशी प्रवासाची इतकी दगदग झेपवता? त्यावर ते हसून म्हणाले की एकत्र कुटुंबाचं मोठं खटलं आहे, बर्याच जबाबदार्या आहेत त्यामुळे नाही शक्य होत. त्यांची बायको म.न.पा.त, व्हिटी ऑफीसला आहे, तीही त्यांच्याबरोबर गेल्या वर्षापर्यंत ये-जा करायची. पण आता मुलांसाठी उत्तम शाळा पाहिजे आणि स्वतःच्या वृद्ध आईवडिलांना आधार म्हणून माहिमला माहेरी राहते.
एका मित्राची बायको सध्या दोन वर्षांसाठी पुण्यात आहे, मित्र स्वतः सहा वर्षांच्या मुलाला घेऊन ठाण्यात राहतो, त्याचं आणि स्वतःचं सगळं रूटीन व्यवस्थित सांभाळतो.
त्यांच्याबरोबर अर्थातच बायकोने भरून दिलेला डबा असतो चारी ठाव.>>> भल्या पहाटे बाहेर पडणार्याला चारी ठाव डबा करून देण्यासाठी त्याच्या बायकोला किती लवकर उठावं लागत असेल? शिवाय तो परतणारही रात्री उशीरा, त्यामुळे त्याचं जेवणा बिवण आवरून झाकपाक करून झोपायलाही उशीर होत असणार. बाकी संवाद, सहवास वगैरे तर दूरच्या गोष्टी. खरंच कौतुक वाटतं अश्या कुटुंबांचं.
लोकलमधे अशा असंख्य भयानक
लोकलमधे अशा असंख्य भयानक अॅग्रेसिवली बायका भांडतात त्यांच्याबद्दलही माझं हेच मत.
>> खरे आहे. माझी मुलगी पहिल्या दिवशी प्लीज, एक्स्क्यूज मी वगिअरे म्हणली. आता नाही. सहन करते ह्या बायका अर्धा तास. कल्याण लोकल, लेडीज स्पेशल भयानक परिस्थिती आहे. ह्या डे.क्वीन मधल्या नर्स बाईंबद्दल आधी ऐकले आहे. ये जीना भी कोई जीना है? असा विचार करत असतील का त्या?
पण सर्व त्रासावर उतारा मेट्रो.
छान लेखमालिका.
आमच्या आॅफिसमध्ये ही रोज अ डा
आमच्या आॅफिसमध्ये ही रोज अ डा करणारे खुप होते. पुणावाला/ली असचं संबोधत त्याना.
आता टायमिंग बदलल्याने शक्य नाहीं होत अ डा.
बाकी जागेबद्दलची अरेरावी , गंडगिरी लोकल मध्ये ही असतेच. रादर ती आपल्या जीवनाचा एक भागच बनली आहे.
रस्त्यात कचरा टाकणार्या व्यक्तीला हटकले तर ती कुठे ऐकते? उलट आपल्यालाच ऐकवते .. तुला काय त्रास झाला रस्ता तुझा आहे का वगैरे.
घरात किती ही प्रेस्ड असाल तरी ही अनरिझर्वड डब्यात जो तुमच्या आधी येऊन बसलाय त्याला कसे उठवता?
पासवरच सीट नं टाकून
पासवरच सीट नं टाकून पासवाल्यांकरिता वेगळा डबा बनवायला हवा.
सगळेच सुखी.
ज्या गाडीचा पास त्या गाडीला.
ती गाडी गेली की पासवाल्यांनी पासच्याच पण अनारक्षित जागांवर बसायचं.
पहिल्या स्टेशननंतर पासवाला आला नाही की ती जागा अनारक्षित ठरणार. असे काहीतरी नियम घालून द्यायला हवेत.
ते सगळं मरूदे, पासवाल्यां साठी वेगळा डबा तरी हवाच.
बाकी संवाद, सहवास वगैरे तर
बाकी संवाद, सहवास वगैरे तर दूरच्या गोष्टी. खरंच कौतुक वाटतं अश्या कुटुंबांचं. << +१
पण सर्व त्रासावर उतारा मेट्रो. << मुंबई पुणे मेट्रो झाली? कधी?
ह्या डे.क्वीन मधल्या नर्स बाईंबद्दल आधी ऐकले आहे. <<< मीच लिहिले होते कधीतरी कुठल्यातरी चर्चेत संयुक्तामधे.
ममो, ते समर्थनीय आहे असे म्हणत नाही पण ही या सगळ्याची एक बाजू आहे हे ही नाकारता येत नाही इतकेच.
साती, कुठेही डब्यात जागांची संख्या जेवढी असते त्याच्या कैक पटीत पास दिलेले असतात. त्याला पर्याय नाही.
पासवाल्यांसाठी वेगळा डबा सगळ्याच मु-पु गाड्यांना आहे. पण आपण लोकलमधे लेडीज डब्यातच का चढतो १५-२० मिनिटांचाच प्रवास असला तरी? याचं जे उत्तर आहे तेच उत्तर त्या डब्यात न जाण्याचं आहे.
लेडीज पासधारकांसाठी वेगळा डबा फक्त डे क्वी ला आहे (किंवा २००८ पर्यंत तरी असेच होते. नंतरचे माहित नाही). बाकीच्या गाड्यांमधे (प्रगती, सिंहगड, डेक्कन एक्स्प्रेस वगैरे)
पासहोल्डर डबे हे फक्त मु-पु दरम्यानच धावणार्या गाड्यांना असतात. लांब पल्ल्याच्या गाड्या ज्या मुंबईहून निघून पुण्यातून मग पुढे जातात त्यांना एक जनरल लेडीज डबा असतो. त्यात क्वचित काही रिझर्वेशन्सही असतात. अश्या ठिकाणी प्रचंड मारामारी चालते. विशेषतः दुपारी १२ ते ४ दरम्यान मुंबईतून निघणार्या गाड्यांमधे. हाफडे वगैरे असला तर या गाड्या पकडणे बरे पडते अनेकांना.
मुंबई - नाशिक मार्गावरचे पासहोल्डर्स, त्यांच्या समस्या कदाचित अजून वेगळ्याही असतील, कदाचित सारख्याच असतील. मला माहित नाहीत त्या.
नीधप, हा भाग खूप आवडला.
नीधप, हा भाग खूप आवडला.
सगळ्या जणी निम्नमध्यमवर्गीय
सगळ्या जणी निम्नमध्यमवर्गीय ते मध्यममध्यमवर्गीय स्तरातल्या त्यामुळे घरातली कुठलीही जबाबदारी मोलाने देणं यासाठी मानसिकता व खिसा दोघांची परवानगी नाही. > ... थोडासा थबकलो ह्यावर. हे फार महत्वाचं आहे. खूप आवडला हा भाग.
प्लीज मुंबई पुणे वाद नका
प्लीज मुंबई पुणे वाद नका वाढवु पण तुम्ही क्वार्टर्स मध्ये का नाही येत रहायला अस अ डा करणार्याना विचारलं तर कोण रहाणार तुमच्या मुंबईत त्यापेक्षा प्रवास परवडला अशी उत्तर मिळायची.
सिरीयसली ममो? सगळ्या बायकांना
सिरीयसली ममो? सगळ्या बायकांना बदली झाली की जा तिथल्या क्वार्टर्समधे रहायला हा पर्याय असतो?
किती बायकांच्या बदल्या झाल्यावर त्यांच्यामागे त्यांचे नवरे, मुलं, घरदार सगळं येतं?
आणि काही विचार करूनच, पर्याय नाही म्हणूनच अ डा करण्याचा निर्णय घेतलेला असतो ना बायकांनी?
मुंबई आवडत नाही (एखाद्याला आवडू शकत नाही हे खरंतर खूप व्हॅलिड कारण आहे तरीही!) म्हणून मी तिथे रहायला जाणार नाही इतकं साधं कारण असेल का त्यांच्या या तडतड स्वीकारण्यामागे?
मला इथे मारामार्या, अरेरावी, अॅग्रेशन या कशाचंच समर्थन करायचं नाही की त्यांच्या हालाखीच्या कहाण्या उगाळायच्या नाहीत. मला त्यांचं अॅग्रेशन काही प्रमाणात समजून घेता आलं ते फक्त मी मांडलंय इतकंच.
नीधप; मस्त लिहिलंय.
नीधप;
मस्त लिहिलंय.
नीधप, सरकारी नर्स, शिक्षिका,
नीधप, सरकारी नर्स, शिक्षिका, अध्यापिका आणि ईतर कुठल्याही नोकरदारांना खरेतर हेडक्वर्टर्सच्या हद्दीच्या बाहेर रहाण्याची परवानगी नसते.
त्या एक चुकीचा/ खोटा लोकल अॅड्रेस दाखवून मग एवढा लांबचा प्रवास करतात.
नीधप, छान लिहीलंत. दोन्ही भाग
नीधप,
छान लिहीलंत. दोन्ही भाग वाचलेत. ट्रेनच्या प्रवासाचे किस्से ऐकायला मजा येतेय. मीदेखील असे बरेच अप-डाऊन केलेय (करतोय ) त्यामुळे रिलेट होता येतेय.
माझा हैद्राबाद-मुंबई असा महिन्यातुन एक-दोनदा वीकएन्ड्चा प्रवास होत असे. तेव्हा प्रवासात एक बाई भेटत असत. त्यांची ट्रान्सफर हैद्राबादला झाली होती आणि कुटुंब पुण्यात. मग दर शुक्रवारी हैद्राबाद-मुंबई एक्सप्रेसने पुणे आणि रविवारी संध्याकाळी पुण्याहुन कोणार्क एक्सप्रेसने सोमवारी सकाळी हैद्राबाद असे वीकएन्डचे अप-डाऊन त्या करत असत.
असे अनेक स्त्री-पुरुष होते जे दर वीक एन्डला हैद्राबाद-पुणे अप-डाऊन करत होते. (अर्थात स्त्रिया तश्या कमीच होत्या).
पासहोल्डर असे नव्हते पण दर शुक्रवार-रविवारचे बुकिंग केलेले असायचे. एखाद्याचे तिकीट वेटिंग असेल तर मग ग्रुपमध्ये बर्थ अॅडजस्ट केले जायचे. हैद्राबाद-पुणे हा प्रवास सुकर व्हायचा.
हा भाग आधीपेक्षा जास्त चांगला
हा भाग आधीपेक्षा जास्त चांगला झालाय.
किती बायकांच्या बदल्या झाल्यावर त्यांच्यामागे त्यांचे नवरे, मुलं, घरदार सगळं येतं?>>> या मुद्द्याशी सहमत.
हे झाले लांब पल्ल्याच्या प्रवासाबद्दल, पण लोकलमध्येही दाराला लटकून प्रवास करणार्या बायका पाहिल्या की या घरी सुखरूप पोहोचू दे अशी प्रार्थना करावीशी वाटते.
दोन्ही रेलकथा वाचल्या, छान
दोन्ही रेलकथा वाचल्या, छान आहेत
आजच्या काळातल्या या स्त्रीया जो संघर्ष करतात, मनापासून आदर वाटतो त्यांचा..
एकीकडे माहेर, एकीकडे सासर, नवरा, लहान मूले त्यात नोकऱ्या, अप डाउन, सुरक्षेचे प्रश्न आणि काय काय ... ग्रेट गोष्ट आहे अस करण.. हॅट्स ऑफ टू सच लेडीज..
यातला मला अचंबित करणारा घटक असा कि एवढं सगळ करताना त्यांच्या गावीपण नसत आपण कसे काय करतोय ते.. सिंपली चालू असत त्यांच आपापल काम ..
हाही भाग आवडला.
हाही भाग आवडला.
ओह.. हे माइती नव्ह्ते साती.
ओह.. हे माइती नव्ह्ते साती.
मुंबईसाठी खास पुणे व नाशिक
मुंबईसाठी खास पुणे व नाशिक इथे अपडाऊन करायला खास बाब म्हणून परवानगी आहे . डेक्कन व पण्चवटीसाठी . या गाड्या ऑफीस वेळेनन्तर येतात व ऑफीस वेळे आधी निघतात म्हणून थोडे उशीरा येण्याची व लवकर जाण्याची परवानगी ही असते. पण त्यासाठी काही रजा कापून घेतात . ही सोय सरकारात आहे. बाकी माहीत नाही. पण हे सगळे एका विशिष्ट स्तरापर्यन्तच प्रॅकेटिकल आहे. जरा अधिक वरिष्ठ अधिकार्याना हाय प्रोफाईल मीटिंगना मला सवलत आहे म्हणून मी उशीरा येईल अथवा लवकर जाईल असे सेवाशर्तीनुसार म्हनता येत नाहीत. सरकारी कर्मचारी हे २४ तास ड्युटीवर असतात.(खरे तर त्याना जेवायला आणि झोपायला शासन घरी जाऊ देते हेच उपकार आहेत.) शासनातले एक सचिव रात्री दोन दोन वाजेपर्यन्त मीटिंगा घेतात. दुर्दैवाने ते अजूनही 'आहेत '
छान. हाही भाग आवडला.
छान. हाही भाग आवडला.
हि बाजु कधी ध्यानातच आली
हि बाजु कधी ध्यानातच आली नाही..
कधी या डब्यातुन प्रवास करायची वेळही आली नाही म्हणा..तरीही जेवढा प्रवास रेल्वे ने केला त्यातही कधी हा विचार केला गेला नाही..
मस्त लिहितेय्स नी..पुभाप्र
दुर्दैवाने ते अजूनही 'आहेत
दुर्दैवाने ते अजूनही 'आहेत '
<<
कुणाच्या?
छान चालू आहे ही
छान चालू आहे ही लेखमाला!
बायकोच्या बदलीनंतर नोकरीच्या ठिकाणी कुटुंब हलवण्याबद्दल घरातलं उदाहरण आहे. माझ्या मावशीची नाशिकला बदली झाली तेव्हा त्यांनी नाशिकला बिऱ्हाड हलवलं. त्यानंतर माझे काका अनेक वर्षे मुंबई - नाशिक रोज अप डाऊन करत होते. तू लिहिल्याप्रमाणे सकाळी ५ ला घर सोडायचं ते रात्री ११ ला परत.
एकूणच शिक्षण/नोकरीसाठी रोजचा प्रवास करणाऱ्या लोकांबद्दल मला प्रचंड आदर आहे. कारण मी हे कधीही करू शकणार नाही (करण्याची इच्छा ही नाही)!
छान लिहीलयं नीधप हा भाग
छान लिहीलयं नीधप
हा भाग जास्त आवडला.
एकूणच शिक्षण/नोकरीसाठी रोजचा प्रवास करणाऱ्या लोकांबद्दल मला प्रचंड आदर आहे<<+१
घरात किती ही प्रेस्ड असाल तरी ही अनरिझर्वड डब्यात जो तुमच्या आधी येऊन बसलाय त्याला कसे उठवता? <<सहमत
Pages