आकांत ठेचा - निर्मीती, परिणाम, धोके व फायदे (छायाचित्रांसहित)

Submitted by बेफ़िकीर on 12 August, 2015 - 01:22

कमकुवत हृदयाच्या वाचकांनी पुढील काहीही वाचू नये.

हा एक जहाल ठेचा आहे. त्याला 'इट वन्स अ‍ॅन्ड एन्जॉय ट्वाईस' असेही म्हंटले जाते. 'ज्याचे जळते त्याला कळते' ही म्हण ह्या ठेच्यावरून निर्माण झालेली आहे.

ह्या ठेच्याला लाड चालत नाहीत. दाण्याचे कूट, लिंबू, तेल असले पुचाट पदार्थ हा ठेचा सामावून घेत नाही. कोथिंबीर ह्या पदार्थाने ह्या ठेच्याच्या आसपासही फिरकू नये.

हा ठेचा चढतो. अंमली पदार्थाप्रमाणे चढतो. जेवायला बसण्याचे एक कारण ठरू शकतो हा ठेचा! ह्या ठेच्याचा वास घेतल्यास मेंदूतून 'फील गूड हॉर्मोन्स' सिक्रेट होतात आणि माणूस अत्यानंदाने बागडू लागतो. हा ठेचा कणभर जिभेवर ठेवला तर तोच बागडणारा माणूस विजेचा शॉक बसावा तसा थिजतो. त्याच्या नाकातून पाणी येते. घसा आकांत करू लागतो. डोक्याला घाम येतो. पुढच्याच क्षणी माणूस नाचू लागतो. पाणी पिऊन ह्या ठेच्याने उभी केलेली चळवळ शमत नाही. हे आंदोलन शरीरातील सर्व कृमीकीटकांना, पापी विचारांना आणि चढलेल्या चरबीला नष्ट करून मगच शांत होते. माणूस संतपदाला पोचण्यासाठी चोवीस तासातून थोडा थोडा करून हा ठेचा चमचाभर तरी पोटात घालावा.

अत्याधुनिक तंत्रज्ञानातून तयार झालेला मिक्सर हा ह्या ठेच्याचा क्रमांक एकचा शत्रू आहे. हा ठेचा ठेचूनच तयार होऊ शकतो. तो जितका ठेचाल तितका चवताळत जातो. नक्षलवादी मारून नक्षलवाद संपत नाही तसे मिरच्या ठेचून तिखट कमी होत नाही, ते वाढतच जाते.

हा ठेचा खाल्ल्यास घसा साफ होऊन गायकांचे सूर चांगले लागू शकतात. घरी आलेल्या पाहुण्याला सहज म्हणून हा ठेचा चवीला दिला तर तो माणूस लवकर निघून जाण्याची शक्यता वाढते.

तर आता हा जालीम, भयकारी, विनाशकारी, गुणकारी असा ठेचा कसा करतात ते वाचा:

चित्रात दाखवल्याप्रमाणे लाल व हिरव्या मिर्च्या घ्या. अर्धी वाटी लसूण आणि पाव वाटी आले घ्या. चवीनुसार मीठ घ्या. मी चित्रात दाखवले आहे त्याच प्रमाणात आणि तेच सगळे हा ठेचा करताना वापरले. आत्ता हा ठेचा करूनच हे येथे लिहायला बसलेलो आहे.

मिर्च्यांची देठे काढून टाका.

मग ह्या सर्व गोष्टी एका खलबत्त्यात घ्या आणि त्या कुटा, ठेचा.

मनगटे दुखतील, बोटे आखडतील. खाली राहणारे वर येऊन विचारतील की आवाज कसला? घरातील लोक आपल्याला वेड्यात काढतील. पण चिकाटी सोडू नका. नंतर त्या सगळ्यांना समजणारच आहे की तुम्ही काय भयानक अस्त्र निर्माण केलेले आहेत.

ठेचा ठेचत असताना कंटाळा येऊ शकतो. कारण मिर्च्या पटापटा कुटल्या जात नाहीत. त्या बत्त्याखालून सटकतात. त्यामुळे बारीक लक्ष ठेवून कुटावे लागते. अधेमधे स्वतःच चव घेऊ नका. ठेचा करण्याची स्वतःलाच भीती वाटू शकेल. जेव्हा सर्व पदार्थांचे मूळ स्वरूप नष्ट होईल, जेव्हा ठेचलेल्या मिश्रणातून एक विशिष्ट रसायन बाहेर पडून त्या ठेच्याला ओल आणू लागेल, जेव्हा खलबत्त्याची कीव येईल तेव्हा ठेचणे थांबवा.

एकदा डोळे भरून त्या ठेच्याकडे पाहा. तो एका बाऊलमध्ये काढून ठेवा. खलबत्त्याचे मनात आभार माना. बत्त्यावरून जीभ फिरवायचा मोह आवरा. सरळ खलबत्ता धुवून टाका आणि पुसून ठेवा.

इकडे ठेचा पाहून घरातील लोकांमध्ये खळबळ माजलेली असेल. एक असंतोष पसरलेला असेल. त्यांच्यातील प्रत्येकाला कणकण ठेचा द्या. मग त्यांचे घसे खाकरणे ऐका. दोन, पाच मिनिटे नाके सूसू करणे ऐका. त्यांच्या कमेंट्स ऐका.

मग स्वतः तो ठेचा खाऊन पाहा. ह्याला म्हणतात आकांत ठेचा.

(आमचे मायबोलीवरील श्रेष्ठ मित्रवर्य श्री सोन्याबापू ह्यांनी ह्या ठेच्याला अग्नीसंदीपक मिश्रण किंवा जिव्हारस उद्दीपक ठेचा असे नांव दिलेले आहे)

IMG_1124.JPGIMG_1126.JPGIMG_1128.JPGIMG_1129.JPGIMG_1132.JPG

धन्यवाद!
=========

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

घरात बॉम्बस्फोट झाल्यासारखे वातावरण झाले पायजेल. >> लहान मुलांची नजर काढून तो ऐवज तव्यावर टाकला की असे वातावरण होते घरात .. मग बेडरूमचा दरवाजा लावून दहा मिनिटे मुकाट पडून राहायचे तिथेच.

@ डुचकाळून ..
बुचकळणे आणि डुचमळणे हे दोन शब्द बहुधा आहेत वाटते मराठी भाषेत. माझे मराठी चांगले नसल्याने मला पटकन काय सुचेल ते लिहितो. कारण त्या वाक्यातील आजूबाजूच्या शब्दांचा सहारा घेत समोरच्यापर्यंत नेमका अर्थ पोहोचेल याची खात्री असते.

ठेच्यापेक्षा वर्णन भयानक.
हे डुचकाळून,समोसापाव,गाठ्या-फरसाणवाले विरारचे आहेत का? ते विरारचे एक घरमालक टिव्हिवर किती डुरकाळ्या देत असतात पोट्ट्यांवर.
मागे वारकरी झाडाखाली तव्यात भाकरी केल्यावर त्यात मिरच्या परतून मीठ घालून दगडावर वाटून /खरडून खरडा करताना दाखवायचे तेव्हा तोंडाला पाणी सुटायचे.तेलावर परतल्याने मिरचीचा काटा मोडतो म्हणतात.
पोतृगिजांनी मिरची आणण्याअगोदर कशाला ठेचत असावेत?

>>आमचेक्डे कृती अशी. काळपट हिर्व्या ( हिरव्या नव्हेत स्मित ) मिरच्या घ्याव्यात. त्या तव्यावर थोड्या भाजणे आणि तळणे यांच्या सीमारेषेवर ठसका उधळेपर्यन्त फिरवून घ्याव्यात. बरोबर लसूण घ्यावा तव्यातच मीठ टाकावे आणि तवा खाली घेऊन हा ऐवज गाडग्याच्या बुडाने रगडावा<< रॉहू..
अगदी अगदी.. अस्सच! फक्त खडा-मिठ वापरायला हवे. त्याने त्या मिरच्या-लसुण अगदी व्यवस्थित भरडले- रगडले जातात. आणि त्याची चव...डोक्याला शॉट.. चुलीवरचं पिठलं भाकरी अन हा रगडा.....भन्नाट!!!

वॉव, सुपर तोंपासु..मस्तं रेसिपी
तो खलबत्ता भारीये.. पुण्याला कुठे मिळेल?? मला खूप म्हंजे खूप आवडलाय.. पितळी खलबत्त्यापेक्षाही..

बाकी कृतीत आणि लाल मिरच्यात मतभेद असले तरी बेफिंचा लेख अप्रतिमच .

सकच्छ की विकच्छ या स्वातंत्र्यपूर्व काळातील वादाप्रमाणे लाल मिरच्या की हिरव्या मिरच्या असा बीबी यायला काय हर्कत आहे मी म्हंटो?

( सकच्छ आणि विकच्छ काय भालगड हाय हे चिणुक्श आन टण्या भाव सांगतीलच. आणि लिम्ब्या त्यात घासलेटाचा डबा ओतेल . अपनी अपनी ड्युटी हय भाय::फिदी:

आपण आपलं ठेचा भाकरी हाणावी . क्वॉय ?)

जबरदस्त
मस्त आलेत फोटो
फोटोतूनही तिखटपणा जाणवतोय
ठासणीच्या बन्दुकीत भरला तर गनपावडरची गरजच नाही Wink

रश्मी.... लिन्क दिलिस ते छान केलेस.
आता रावणपिठल्यावर इकडची लिन्क दिली पाहिजे की हे पण बघा... पिठल्याबरोबरचे तोंडीलावणे !

छaन

Pages