भाग १- पुर्व तयारी, प्रस्थान
कधी कधी अचानक ठरवलेली मोहिम पण खुप काही मिळवुन देते, सगळ्याच गोष्टी मनासारख्या घडतात. कागदावरचे नियोजन तंतोतंत अंमलात येते, सरतेशेवटी गोड आठवणी आणि चांगला सुखद अनुभव देऊन जाते.
असेच काही आमच्या बाबतीत घडले. बुधवारी दुपारी अचानक मनात आले, या शनिवार रविवार एखादा चांगला ट्रेक करूया. लगेच माझे स्नेही ज्येष्ठ गिर्यारोहक श्री.ई.एन.नारायण (अंकल) यांना फोन लावला. त्यांनी होकार दिला, मला म्हणाले "आप बोलो किधर जाने का" माझ्या मनात प्लान तयार होता, भीमाशंकर कर्जत या भागातल्या घाटवाटा. जसे की वांजत्री, फेण्यादेवी, कुसुर अशा अल्प परिचित घाटवाटा,या बाबतीत माझे 'डिस्कवर सह्याद्रीकार साईदा' बरोबर बोलणे झाले. पण सध्याची पावसाची स्थिती व अंदाज पाहून आमचे काही नक्की होत नव्हते. हो-ना करत तो दिवस तसाच गेला. गुरूवारी सकाळी माझ्या मनात आणखी एक वेगळा प्लान तयार झाला तो म्हणजे 'खान्देश दुर्गवारी'. मी असा अंदाज बांधला की आपल्या भागात(कोकण पट्टा) पाऊस जास्त असेल तर खान्देश परगण्यात जाऊ, आणि जर कमी झाला तर मग वरिल पैकी भीमाशंकर भागातली एखादी घाटवाट करू.
सायंकाळी परत नारायण अंकलचा फोन "योगेश, क्या करने का बोलो ? घाटवाट करने का क्या ?"
मी: "अंकल बारीश कम हुआ तो ठिक नही तो कुछ और"
अंकल: "अच्छा तो ठिक है, जैसे आप बोलो."
मी: "और मतलब, धुळे नाशिक साईड चलते है, ये मौसम मे वहा जाना ठिक रहेगा."
अंकल: " वो तो मालुम है, एकदम बढिया बोलो फिर ?"
मी: "लळींग, सोनगीर, गाळणा, कंक्राळा, डेरमाळ और पिसोळ"
( नाशिक- मालेगाव-धुळे खान्देश भागातले हे नितांत सुंदर किल्ले )
अंकल: "अरे वाह! क्या बात है, चलो फिर. लेकिन दो दिन मे बहोत घाई होगा."
मी: "चलो फिर तीन दिन शनि, रवि, सोम.
गुरूवार रात्री पासून माझे मन त्या भागात फिरू लागले, डोळ्यासमोर ते सुंदर किल्ले व तो मुलुख तरळु लागला. शुक्रवारी सकाळीच मोहिमेचा फायनल प्लान तयार केला.
शनि. दिवस १ला : कल्याणहून भल्या पहाटे निघून झोडगे शिवमंदिर-लळींग-सोनगीर- मुक्कामी गाळणा.
अंदाजे अंतर ४०० किमी.
रवि. दिवस २ रा : गाळणा - कंक्राळा- मुक्कामी डेरमाळ.
अंदाजे अंतर ८० किमी.
सोम. दिवस ३ रा : डेरमाळ - पिसोळ - ताराहाबाद सटाणा मार्गे कल्याण परत.
अंदाजे अंतर ३०० किमी.
हाच प्लान आमच्या नाशिकच्या अनुभवी गिर्यारोहक मित्र श्री. हेमंत पोखरणकर यांना दाखविला. त्यांचा लागलीच प्रतिसाद, 'परफेक्ट प्लान आहे, यात डेरमाळलाच थोडा वेळ लागतो तोही परफेक्ट घेतलाय तुम्ही.'
मग काय त्यांचे आभार मानून, लगेचच प्लानवर शिक्कामोर्तब करून टाकले. सामानाची तयारी व आवराआवरी करून डोंगर पिशवी तयार ठेवली. पण खऱे सांगु तर शुक्रवारी रात्री काही केल्या झोपच लागेना, आत्ता पर्यंत बरेच ट्रेक करून झालेत, सहसा मला असे कधी होत नाही पण या वेळेस मात्र मी भलताच एक्साईट झालो होतो.
पहाटे चार वाजता गजर वाजला, उठून तयारी करून पाच वाजता गाडी घेऊन अंकलच्या घरी पोहचलो.
ई.एन.नारायण (अंकल), विवेक नारायण ही बाप-लेकाची जोडी, मिलिंद कोचरेकर आणि मी. असे आम्ही चौघे जण गाडीच्या डिकीत सामान व्यवस्थित भरून निघालो. आता सुरू झाली होती आमची 'खान्देश दुर्गवारी'.- किल्ले "लळींग, सोनगीर, गाळणा, कंक्राळा, डेरमाळ आणि पिसोळ" आग्रा रोड वर आल्यावर गाडीत डिझेल पूर्ण भरून घेतले. पुढे शहापूर खर्डी कसारा ते थेट ईगतपुरी घोटी पर्यंत मस्त पाऊस लागला, रस्ता पण रहादारी मुक्त होता. आठ वाजता नाशकात दाखल झालो, तर चक्क ऊन पडले होते.
पुढे दिड तासात चांदवडला आधिशक्ती रेणुकामाता मंदिरात दर्शनासाठी थांबलो, इथे पण पाऊस नव्हता, पण वातावरण एकदम छान. निवांतपणे दर्शन करून, बाहेरच चहा नाश्ता घेऊन पुढील प्रवासाला लागलो. मालेगाव नंतर साधारणपणे अर्ध्या तासाच्या अंतरावरच्या 'झोडगे' येथील प्राचीन हजार बाराशे वर्षापूर्वीच्या शिवमंदिरापाशी थांबलो. अंबरनाथ व रतनवाडी येथील मंदिराशी साधर्म्य असलेल्या ह्या मंदिरावर बर्यापैकी कोरीव शिल्पकाम केलेले आहे. याच आवारात बाजूला आणखी एक छोटे पडझड झालेले मंदिर आहे.
सध्या मंदिरात पुरातत्व खात्याचे डागडुजीचे काम चालु आहे. महादेवाला नमन करून, मोहिमेतल्या पहिला किल्ला लळींगला रवाना झालो.
तीस ते चाळीस मिनिटात लळिंग गावी पोहचलो. महामार्गाच्या डाव्या हाथाला, माथ्यावर तटबंदी धारण केलेला लळिंग किल्ला दिसला.
गावातल्या जुन्या दगडी इच्छापुर्ती महादेव मंदिराजवळ गाडी लावली.
मंदिराच्या डाव्या बाजूच्या ठळक पायवाटेने किल्ला चढायला सुरूवात केली. वाट डाव्या बाजूने वर चढते, थोडे अंतर गेल्यावर एक पीराचे थडगे दिसते. तसेच आणखी पुढे चढून गेल्यावर वाट तटबंदी जवळ येऊन उजवीकडे वळते. पुढे कातळात काही गुहा दिसतात.
मग पडझड झालेल्या दरवाजातून गडमाथा गाठला. माथ्यावर उजव्या बाजूची तटबंदी पहात उत्तर टोकाला पोहचलो.
इथुन समोर धुळे शहर खाली माचीवर कोरडा तलाव व गोल घुमटी दिसते. मागे फिरून एक ऊंचवटा चढून, पलिकडे एक मंदिर व दारूकोठार दिसले.
त्याच्या जवळच्या कातळात भुमीगत पाण्याचे टाके आहे.
समोरच तट आहे.
त्याच्या अलीकडून चोर दरवाजाने खाली उतरलो,
इथेही उजव्या हाथाला पाण्याचे टाके आढळले. खाली उतरून वळसा मारून त्या कोरड्या तलावापाशी आलो. वाटेत पलिकडे दिवाणमळा गाव दिसते. तलावाजवळची घुमटी बर्यापैकी चांगल्या स्थितीत आहे.
किल्यावर एकंदरीत गुरांचा वावर बराच आहे. त्यात सावली देणारी मोठी झाडे पण नाहीत, निवडुंग व काटेरी झुडुपांचे प्रमाण जास्त आहे. दोन अडीच तासात गड दर्शन करून गावात आलो. महामार्गावर धुळे शहराच्या पुढे दुपारचे जेवण करून, तीन साडेतीनच्या सुमारास सोनगीर गावात पोहचलो.
गावात शिरल्यावर डाव्या हाथाला सोनगीर किल्ला दिसतो.
गावात नव्याने बांधलेल्या कमानीतूनच वाट वर चढायला लागते, पण सुरूवातीला मात्र नाक पकडून जावे लागले एवढी भयाण दुर्गंधी त्या वाटेवर होती. वाट मोठी क्रॉंक्रिटची आहे व जोडीला लाईटाचे खांब हि आहेत. दहा ते पंधरा मिनिटात पडक्या दरवाज्यात पोहचलो.
पुढे काही कातळकोरीव पायरा चढून गडमाथा गाठला.
माथा बर्यापैकी सपाट आहे, वरती फारशी झाडी नाहीत.
दक्शिनेला निमुळत्या बाजूला तटबंदीचे अवशेष आहेत. मागे फिरल्यावर वाटेत नाणेघाटाच्या दगडी रांजणाची आठवण येणारे छोटेखानी गोलाकार बांधकाम दिसले.
पुढे गेल्यावर दिसली ती या किल्यावर असलेली भली मोठी, खुप खोल असणारी आयताकृती विहीर.
बघितल्यावर किती खोल आहे याचा अंदाज येत नाही. तळाला पाणी होते पण पोर्या शिवाय काढता येणे कठिण. त्याच एका बाजूला कोरडी पुष्करणी दिसली, चार पडक्या भिंतीत प्रत्येकी पाच कोनाडे आहेत. समोरच उत्तर टोकाचा छोटेखानी बुरूज दिसला.
इथुन मात्र चांगला नजारा मिळाला. दुरवर पुर्वेला डोंगरगाव धरण, खाली मुंबई आग्रा व मागच्या बाजूला धुळे शहादा महामार्ग नजरेस पडतात. गडफेरी आटपून आम्ही दीड तासात खाली आलो.
नियोजनानुसार आम्हाला आजच गाळणा किल्यावर जायचे होते. सोनगीरहून परत धुळ्याला येऊन उजवी मारून पारोळा- साक्री रोड पकडला तो थेट नेर कुसुंबे पर्यंत. पाऊस तर या भागात नव्हताच पण तरी रस्त्याच्या दोन्ही बाजूला बाजरीची शेती मोठी मोहक वाटत होती. एकंदरीत बरीच हिरवळ त्या सांयकाळच्या वातावरणात एक तेज आणत होती. थोडक्यात काय तर असा रस्ता असेल तर गाडी चालवायला अजुनच मजा येते. पुढे कुसुंबे हून डावीकडे वळून डोंगराळे आणि मग पुढे जवळच असलेल्या गाळणा गावात पोहचलो तेव्हा सांयकाळच्या सुर्य प्रकाशात गाळणा किल्ला खासच उठून दिसत होता. गाडी, खाली असलेल्या गोरखनाथाच्या मठात व्यवस्थित पार्क केली. पहाटे कल्याण सोडल्यापासून आत्तापर्यंतचा ३८५ किमी प्रवास झाला होता.
वाचतोय, चांगली सुरवात. सर्व
वाचतोय,
चांगली सुरवात. सर्व फोटोही छान,
छान वृत्तांत! आमचे कधी जाणे
छान वृत्तांत!
आमचे कधी जाणे होईल तेव्हा होईल... वर दिलेल्या नकाशा बद्दल धन्यवाद.
खूप छान सुरुवात. वाचतेय.
खूप छान सुरुवात. वाचतेय.
Chhaan photos aaNi varNan.
Chhaan photos aaNi varNan.
मस्तच!
मस्तच!
धन्यवाद. मित्रानो. खरय
धन्यवाद. मित्रानो.
खरय इंद्रा, नकाशा बाबतीत म्हणशील तर फायदा होणारच. बरेच बदल, मी तिथल्या स्थानिक गावकर्यांनी सांगितल्या प्रमाणे केले आहेत. शॉर्टकट मिळाले, अंतर कमी होऊन वेळ ही वाचला. ऑफरोड ड्राईव्ह पण चांगलीच झाली. पुढच्या भागात त्याचा उल्लेख येईलच.
छान सुरुवात योगेश! फोटोच
छान सुरुवात योगेश! फोटोच सांगतायत वारी चांगलीच झालेली दिसतेय.
योगेश, कट्टी मला आणी आका ला
योगेश,
कट्टी मला आणी आका ला सांगितले नाही म्हणून
असो, मस्त झालाय तुमचा ट्रे़क एकंदरीत.. आणी वृत्तांत पण छान आहे.. पुभाप्र..
मस्त वृत्तांत योगेश.... पुढील
मस्त वृत्तांत योगेश.... पुढील भागाच्या प्रतिक्षेत..
झकास झालाय ट्रेक!
झकास झालाय ट्रेक!
" तुझे आहे तुजपाशी, परि तु
" तुझे आहे तुजपाशी, परि तु जागा विसरलाशी " मी मुळचा धुळे येथील आहे. लळिंगच्या किल्ल्यावर लहानपणी एकदाच सहावीत असतांना गेलो होतो. त्यानंतर पुन्हा कधी जाण्याचा योग आला नव्हता. त्यावेळी एव्हढे पहावयास मिळाले नव्हते वा कोणी दाखविले नव्हते.
आता मात्र तुम्ही लिहिल्याप्रमाणे व फोटो पाहून , पुन्हा एकदा तेथे जाण्याची ईच्छा निर्माण झाली आहे. सुन्दर फोटो व माहिती सुद्धा. त्याबद्दल आभारी आहे.सोनगीर चा किल्ला मात्र अजुन पाहिलाच नाही.
@ जयंत शिंपी, आमचे पण मुळ गाव
@ जयंत शिंपी, आमचे पण मुळ गाव धुळे जिल्ह्यातच आहे. लेख वाचुन तुम्हाला या दुर्गांवर जाण्याची इच्छा निर्माण झाली आहे. या परि तो आनंद कोणता.
धन्यवाद.
रमेश सुरेश
रमेश सुरेश
मस्तच रे योगेश.. कधी जाणे
मस्तच रे योगेश.. कधी जाणे होणार ह्या किल्ल्यांवर देव जाणे.. तो पर्यन्त तुझ्या लेखावरून समाधान मानून घेतो..
पुढचा भाग लवकर टाक.
सोनगीर गावातली जुनी ७
सोनगीर गावातली जुनी ७ रहाटांची व पायर्या असलेली विहीर पाहिलीत का? अहिल्याबाई होळकरांनी बांधवून घेतल्याचे वाचले आहे.
योग्या मस्त लिखाण चालु आहे...
योग्या मस्त लिखाण चालु आहे... फोटो पण छान
@ दिड मायबोलीकर, खरच
@ दिड मायबोलीकर, खरच त्याबद्द्ल काही माहिती नव्ह्ती. पुन्हा कधी त्या भागात जाणे झाले, तर नक्की पहाणार.
असही योगेश, आपण एव्हढ्या जवळ
असही योगेश, आपण एव्हढ्या जवळ जाउन सुद्धा त्या 'देवळाणा' इथल्या पुरातन मंदिराबद्दल आपल्याला कुठे माहिती होती. नशीब ते दुर्गवीर वाले भेटले, त्या निमित्ताने एव्हढ सुंदर मंदिर पाहण्याचा योग आला.
सुनटुन्या,.. देवळाण्याचं
सुनटुन्या,.. देवळाण्याचं मंदीर आपल्या ऑप्शनमध्ये होतंच.. चौलेरला सीएम ने अजमेरा ऑप्शन ड्रॉप केल्यावर दुसरा ऑप्शन देवळाण्याचा निवडला त्याला दुर्गवीरांनी भरपूर मदत केली अभ्यासू व्यक्ती बरोबर देऊन..
लेख सुरेखच... नकाशाही मस्त!
लेख सुरेखच... नकाशाही मस्त! सिक्स पॅक प्रोग्रॅम भारीच सहा दुर्गांचा..
सोनगीरच्या बावेबाबत पांडुरंग पाटणकरांच्या पुस्तकांत उल्लेख आहे बहुधा..!
योगेश झकास लिहीले आहेस. प्रचि
योगेश झकास लिहीले आहेस. प्रचि सुद्धा मस्तच.
वाह, छान वाटतं नेहमीच असं
वाह, छान वाटतं नेहमीच असं ट्रेकिंग बद्दल वाचायला.. आणी तुम्हा सर्वांचं कौतुक ही..
प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद
प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद मित्रानो.