गुरुपौर्णिमा

Submitted by सुपरमॉम on 31 July, 2015 - 10:51

एम. एस. सीचं शेवटचं वर्ष. सायन्स कॉलेजच्या पायर्‍यांवर बसून मैत्रिणींशी दिलखुलास गप्पा चालल्या होत्या. पुढचा तास सुरू व्हायला अजून वेळ होता. तेवढ्यात कोणीतरी सांगत आलं, 'डॉ. भालचंद्र बोलावताहेत.'

कशासाठी बरं बोलावलं असेल सरांनी?'

मनाशी विचार करतच आम्ही सर्वजणी सरांच्या केबिनकडे चालू लागलो. मी दारावर टकटक केल्याक्षणीच 'कम इन' असा सरांचा भारदस्त आवाज कानी आला. तिघीचौघी आत शिरलो.

डॉ. भालचंद्र हे अत्यंत भारदस्त व्यक्तिमत्व. मध्यम उंची, भरदार मिशा नि उतारवयातही दुसर्‍यावर छाप पाडणारा आवाज. त्यांच्याकडे बघून 'सर आर्मीत जास्त शोभले असते...' असं आम्ही कौतुकानं आपापसात कुजबुजत असू.

'हे घ्या. साईन धिस...' म्हणत सरांनी एक कागद पुढे केला.

क्षणाचाही विचार न करता मी तिथलंच पेन उचललं.... नि माझ्यामते एकदम लफ्फेदार सही ठोकली. हो, त्या वयात स्वतःच्या सहीचंही अप्रूप असतं Happy

माझ्या बाजूच्या मुलीनं ते पेन माझ्या हातातून काढून घेतलं. पण तिनं सही करण्याआधीच सरांचा आवाज घुमला.

'हे काय? सही कशी केलीस तू एकदम?'

'म्हणजे?...'

मी बावचळून सरांकडे बघितलं. त्यांच्या चेहर्‍यावर तीव्र नापसंती उमटली होती.नजरेत विलक्षण धार आली होती. आपलं काय चुकलं हेच मला कळेना. सरांनीच तर सही करायला सांगितली होती आपल्याला.

'न वाचताच? शिकल्यासवरलेल्या मुली तुम्ही. हाऊ कॅन यू साईन समथिंग विदाऊट इव्हन रीडींग इट?'

'पण सर, तुम्ही....तुम्ही सांगितलं होतं आम्हाला सही करायला. त्यात काय वाचायचं? तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आमचा...' माझ्या मैत्रिणीनं सावरून घ्यायचा प्रयत्न केला.

'विश्वास? नाही. या बाबतीत कुणावरही विश्वासाचा प्रश्नच येत नाही. लक्षात ठेवा. आयुष्यात कुठलाही कागद पूर्ण वाचल्याशिवाय त्याच्यावर कध्धीच सही करायची नाही. रिमेंबर धिस. ऑलवेज...'

सरांचा स्वर ठाम आणि निर्णायक होता.

मनापासून 'सॉरी....' म्हणून आणि कागद वाचून त्यावर सह्या करून आम्ही सर्वजणी केबिनच्या बाहेर पडलो. कागद होता साधाच.. कॉलेजच्या स्टडी टूरबद्दलचा.

केवढा मोठा धडा सरांनी एका छोट्याशा प्रसंगातून घालून दिला होता. आयुष्यात अगदी जवळची माणसंही कधीकधी उलटतात, मोठ्ठी फसवणूक करू शकतात ह्या वस्तुस्थितीचं भान यायला त्यानंतर खूप वर्ष जावी लागली.

पण आज इतक्या वर्षांनंतरही सही करायच्या आधी कागद वाचल्या जातोच. समोरचा माणूस कुणीही असो. ती आता सवयच पडून गेली आहे.

इंग्रजीत ज्याला 'लाईफ स्किल्स' म्हणतात त्या या अशा अनेक मोलाच्या गोष्टी आईवडिलांसारख्याच ममत्वाने शिकवणारे भालचंद्र सरांसारखे गुरुजन मिळायला भाग्य लागतं.

आज गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी माझ्या आईवडिलांना नि सगळ्या गुरुजनांना त्रिवार अभिवादन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त