कमकुवत हृदयाच्या वाचकांनी पुढील काहीही वाचू नये.
हा एक जहाल ठेचा आहे. त्याला 'इट वन्स अॅन्ड एन्जॉय ट्वाईस' असेही म्हंटले जाते. 'ज्याचे जळते त्याला कळते' ही म्हण ह्या ठेच्यावरून निर्माण झालेली आहे.
ह्या ठेच्याला लाड चालत नाहीत. दाण्याचे कूट, लिंबू, तेल असले पुचाट पदार्थ हा ठेचा सामावून घेत नाही. कोथिंबीर ह्या पदार्थाने ह्या ठेच्याच्या आसपासही फिरकू नये.
हा ठेचा चढतो. अंमली पदार्थाप्रमाणे चढतो. जेवायला बसण्याचे एक कारण ठरू शकतो हा ठेचा! ह्या ठेच्याचा वास घेतल्यास मेंदूतून 'फील गूड हॉर्मोन्स' सिक्रेट होतात आणि माणूस अत्यानंदाने बागडू लागतो. हा ठेचा कणभर जिभेवर ठेवला तर तोच बागडणारा माणूस विजेचा शॉक बसावा तसा थिजतो. त्याच्या नाकातून पाणी येते. घसा आकांत करू लागतो. डोक्याला घाम येतो. पुढच्याच क्षणी माणूस नाचू लागतो. पाणी पिऊन ह्या ठेच्याने उभी केलेली चळवळ शमत नाही. हे आंदोलन शरीरातील सर्व कृमीकीटकांना, पापी विचारांना आणि चढलेल्या चरबीला नष्ट करून मगच शांत होते. माणूस संतपदाला पोचण्यासाठी चोवीस तासातून थोडा थोडा करून हा ठेचा चमचाभर तरी पोटात घालावा.
अत्याधुनिक तंत्रज्ञानातून तयार झालेला मिक्सर हा ह्या ठेच्याचा क्रमांक एकचा शत्रू आहे. हा ठेचा ठेचूनच तयार होऊ शकतो. तो जितका ठेचाल तितका चवताळत जातो. नक्षलवादी मारून नक्षलवाद संपत नाही तसे मिरच्या ठेचून तिखट कमी होत नाही, ते वाढतच जाते.
हा ठेचा खाल्ल्यास घसा साफ होऊन गायकांचे सूर चांगले लागू शकतात. घरी आलेल्या पाहुण्याला सहज म्हणून हा ठेचा चवीला दिला तर तो माणूस लवकर निघून जाण्याची शक्यता वाढते.
तर आता हा जालीम, भयकारी, विनाशकारी, गुणकारी असा ठेचा कसा करतात ते वाचा:
चित्रात दाखवल्याप्रमाणे लाल व हिरव्या मिर्च्या घ्या. अर्धी वाटी लसूण आणि पाव वाटी आले घ्या. चवीनुसार मीठ घ्या. मी चित्रात दाखवले आहे त्याच प्रमाणात आणि तेच सगळे हा ठेचा करताना वापरले. आत्ता हा ठेचा करूनच हे येथे लिहायला बसलेलो आहे.
मिर्च्यांची देठे काढून टाका.
मग ह्या सर्व गोष्टी एका खलबत्त्यात घ्या आणि त्या कुटा, ठेचा.
मनगटे दुखतील, बोटे आखडतील. खाली राहणारे वर येऊन विचारतील की आवाज कसला? घरातील लोक आपल्याला वेड्यात काढतील. पण चिकाटी सोडू नका. नंतर त्या सगळ्यांना समजणारच आहे की तुम्ही काय भयानक अस्त्र निर्माण केलेले आहेत.
ठेचा ठेचत असताना कंटाळा येऊ शकतो. कारण मिर्च्या पटापटा कुटल्या जात नाहीत. त्या बत्त्याखालून सटकतात. त्यामुळे बारीक लक्ष ठेवून कुटावे लागते. अधेमधे स्वतःच चव घेऊ नका. ठेचा करण्याची स्वतःलाच भीती वाटू शकेल. जेव्हा सर्व पदार्थांचे मूळ स्वरूप नष्ट होईल, जेव्हा ठेचलेल्या मिश्रणातून एक विशिष्ट रसायन बाहेर पडून त्या ठेच्याला ओल आणू लागेल, जेव्हा खलबत्त्याची कीव येईल तेव्हा ठेचणे थांबवा.
एकदा डोळे भरून त्या ठेच्याकडे पाहा. तो एका बाऊलमध्ये काढून ठेवा. खलबत्त्याचे मनात आभार माना. बत्त्यावरून जीभ फिरवायचा मोह आवरा. सरळ खलबत्ता धुवून टाका आणि पुसून ठेवा.
इकडे ठेचा पाहून घरातील लोकांमध्ये खळबळ माजलेली असेल. एक असंतोष पसरलेला असेल. त्यांच्यातील प्रत्येकाला कणकण ठेचा द्या. मग त्यांचे घसे खाकरणे ऐका. दोन, पाच मिनिटे नाके सूसू करणे ऐका. त्यांच्या कमेंट्स ऐका.
मग स्वतः तो ठेचा खाऊन पाहा. ह्याला म्हणतात आकांत ठेचा.
(आमचे मायबोलीवरील श्रेष्ठ मित्रवर्य श्री सोन्याबापू ह्यांनी ह्या ठेच्याला अग्नीसंदीपक मिश्रण किंवा जिव्हारस उद्दीपक ठेचा असे नांव दिलेले आहे)
धन्यवाद!
=========
-'बेफिकीर'!
वा वा आता खाशे पुणेकरही आकांत
वा वा आता खाशे पुणेकरही आकांत ठेचा रेसिपी देऊन खाऊ लागले तर मग वैदर्भियांनी काय करायचे. ही "त्यांच्या खादाडी" वरू लक्ष उडवण्याची पुणेरी चाल तर नाही.
ठेचा मस्त दिसतोय.
स्स्स्स्स्स्स्स! काय सही फोटो
स्स्स्स्स्स्स्स! काय सही फोटो रे बाबौ! तोपासू! शिळी भाकरी आणी तेल-लिम्बु घेऊन आत्ताच्या आत्ता हा ठेचा खायला बसावे असे वाटु लागले आहे. कुठे फेडाल हे पाप! जबरी दिसतोय.
बाकी वर्णन सहीये.:हाहा:
फोटो सुरेख आहेत!
फोटो सुरेख आहेत!
वर्णन भारी काय सही फोटो रे
वर्णन भारी काय सही फोटो रे बाबौ! तोपासू!
भाकरी आणि तेलाबरोबर
भाकरी आणि तेलाबरोबर यम(इंग्रजी आणी मराठी) लागेल.
मी लाल मिरच्या घातल्या नसत्या.
यावरुन आठवलं. एक फ्रेंच भारतात एक दोनदा आला होता तो इंडियन खाणे 'सहन' कसे करावे सांगत होता. "मी एक खूण चेक करतो: जे जे हिरवं दिसेल इंडियन फूड मध्ये ते खायचं आणि लाल तिखट असतं ते सोडून द्यायचं." बिचार्याने अजून हिरवागार लवंगी मिरच्यांचा ठेचा पाहिला नसावा!!
ही "त्यांच्या खादाडी" वरू
ही "त्यांच्या खादाडी" वरू लक्ष उडवण्याची पुणेरी चाल तर नाही. >> :p
'ज्याचे जळते त्याला कळते' ही म्हण ह्या ठेच्यावरून निर्माण झालेली आहे.
वर्णन भारीच..
सहि.. मस्त दिसतोय
सहि..
मस्त दिसतोय एकदम..
बघुनच भुक लागली
असला ठेचा मागील महिन्यातच
असला ठेचा मागील महिन्यातच करुन झालाय घरी.
त्यातला जहालपणा कमी करण्यासाठी बरेच यत्न केले गेले. शेवटी चिमुट चिमुट ठेचा आमट्या-भाज्यात घालुन विल्हेवाट लावली गेली.
फोटो जबरी आणि पाककृतीचे वर्णन
फोटो जबरी आणि पाककृतीचे वर्णन व खाल्यांनंतर परिणाम विषद करण्याची शैली खासच!!!
वाचून व बघून डोळ्यातून पाणी आणि नाकातोंडातून धूर आलाय.
हायला, मस्त फटू. भाकरी/पोळी,
हायला, मस्त फटू. भाकरी/पोळी, असा ठेचा, कच्चं तेल, हवा तर फोडून घेतलेला कांदा... ज ब री कॉंबो
छान पाकृ. लिहिलेय पण जबरी
छान पाकृ.
लिहिलेय पण जबरी
आमच्याकडे आजारपणं झाली की
आमच्याकडे आजारपणं झाली की जिभेला चव हवी म्हणून असा ठेचा करतो. तिखट्ट..
छान पाकृ. लिहिलेय पण
छान पाकृ.
लिहिलेय पण जबरी
<<
असेच म्हणतो.
तो खलबत्ता हा ठेचा बनवायलाच, नविन घेतालाय की काय....
बेफि ही कथा एकदम जमलीये
बेफि ही कथा एकदम जमलीये
यम्मी.... ठेचा मस्त दिसतोय.
यम्मी....
ठेचा मस्त दिसतोय.
मी एक एक बॅच बनवून ठेवते.
मी एक एक बॅच बनवून ठेवते. मग त्यातला चमचा भर घेउन दही घालते त्यात व वरून मोहरी हिंगाची फोडणी. आकांतचा रमाकांत करून खाते.
आकांतचा रमाकांत >>>
आकांतचा रमाकांत >>>
अमा सर्व प्रतिसाददात्यांचा
अमा
सर्व प्रतिसाददात्यांचा आभारी आहे.
झकास!!! आकांतचा रमाकांत >>
झकास!!!
आकांतचा रमाकांत
>>
१. मिरची खलबत्त्यात टाकायच्या
१. मिरची खलबत्त्यात टाकायच्या आधी चिरून घेतली, तर कुटायला कमी वेळ लागेल.
२. शेवटच्या फोटोत ज्या टचं-टचं बिया दिसताहेत, त्याही कमी होतील.
बाब्बो.... लय डेंजर्....आम्ही
बाब्बो....
लय डेंजर्....आम्ही नागपुरी असलो तरी अंमळ पुणेरी जेवण जेवणारे आहोत्...त्या मुळे आमच्या साठी हा ठेचा म्हणजे R. D. X. जणू !!!
वरिष्ठ मित्रवर्य बेफीक़ीर
वरिष्ठ मित्रवर्य बेफीक़ीर जी,
प्रस्तुत आकांत ठेच्याचं नाव हे "अग्निसंदीपक मिश्रण" किंवा "जिव्हारस उद्दीपक" असे ठेवण्यात यावे ही विनंती रुजू करीत आहे
(बालके) बापुसाहेब
श्रेष्ठ मित्रवर्य सोन्याबापू
श्रेष्ठ मित्रवर्य सोन्याबापू अवश्य!
लेखात तशी टीप घालतो.
आभार!!!
आभार!!!
वा मस्त फोटो पाहून तोंडाला
वा मस्त
फोटो पाहून तोंडाला पाणी सुटलंय...........
मस्त लिहिलायस रे बेफ्या
मस्त लिहिलायस रे बेफ्या
एव्हढं तिखट खाऊ नये
एव्हढं तिखट खाऊ नये (पुणेकरांनी) तब्बेतीला चांगलं नसतं (पुणेकरांच्या)
बेफ़ि घेतला असेलच!
वॉव सही आहे. जसे वडापाव मध्ये
वॉव सही आहे.
जसे वडापाव मध्ये लाल तिखट ठेचा असतो, तसे हा समोसापावात टाकून चांगला लागेल.
उकडलेल्या ढोकळ्याला मधून चिरून हा त्यात झेपेल तसा भरायचा आणि तो ढोकळा बेसणात डुचकाळून पकोडा तळायचा, हा माझा फेव्हरेट प्रकार. यातही हा मस्त चालून जाईल ..
अजून एक म्हणजे हा पावाला चोळायचा आणि त्यात भावनगरी गाठ्यांचे फरसाण भरून खायचे.. पाव-फरसाण बरोबर नुसते मिरच्या चावण्यापेक्षा याने चांगले पाणी सुटेल तोंडाला आणि कमी सुके वाटेल .. सोबत आले घातलेल्या गरमागरम चहाचे घोट मात्र हवेच.
बेसणात डुचकाळून >> ह्या:
बेसणात डुचकाळून
>>
ह्या: ह्या: मराठीत नवीन क्रियापद का? कृती लक्षात आली.
तुमचे कॉम्बो 'मला आवडणारे पदार्थ मी असे खातो 'या भयंकर चविष्ट बीबीवर पोस्ट करा.
लाल मिर्च्या ? ये बात कुछ
लाल मिर्च्या ? ये बात कुछ हजम नहीं हुई.
आमचेक्डे कृती अशी. काळपट हिर्व्या ( हिरव्या नव्हेत ) मिरच्या घ्याव्यात. त्या तव्यावर थोड्या भाजणे आणि तळणे यांच्या सीमारेषेवर ठसका उधळेपर्यन्त फिरवून घ्याव्यात. बरोबर लसूण घ्यावा तव्यातच मीठ टाकावे आणि तवा खाली घेऊन हा ऐवज गाडग्याच्या बुडाने रगडावा. घरात बॉम्बस्फोट झाल्यासारखे वातावरण झाले पायजेल. मंग ज्याची हिम्मत असेल त्याने कशाही बरोबर हाणावे. ( मंत्रीमंडळ गडगडणार नाही याची दक्षता घ्यावी ) ::फिदी:
Pages