वाहतूक दिवे आणि पुणे ! का ?

Submitted by किंकर on 5 August, 2015 - 09:41

वाहतूक दिवे आणि पुणे. ! का ? (उद्गार चिन्ह का प्रश्न चिन्ह )
आज डेली टेलिग्राफ मध्ये एक बातमी आली आहे . स्वयंचलित दिवे कार्य पद्धत कार्यान्वित होवून १०१ वर्षे पूर्ण झाली म्हणून गुगल डूडल ने आज त्याची दखल घेतली आहे . खरतर इतिहासातील एक महत्वपूर्ण घटना.

दिनांक ५ ऑगस्ट १९१४ या दिवशी क्लीव्हलंड ओहियो येथे पहिला स्वयंचलित वाहतूक नियंत्रण दिवा कार्यान्वित झाला .
आज १०१ वर्षांनंतर जगभरात हि कार्य पद्धती स्वीकारली गेली आहे . अद्दीस आबाबा ( Addis Ababa)या इथिओपिया च्या राजधानीत आज १०० वर्षानंतर आजही वाहतूक नियंत्रण दिवे नाहीत . आणि त्यांची वाहतूक देखील सुरूच आहे , जणू काही सर्व आबादी आबाद आहे . पण त्या बातमीने मला एकदम भलतीकडेच नेले .

अहो म्हणजे आपल्या पुण्याला !
पुण्याला जाणे हे काय भलतीकडे जाणे आहे का ? तर मी म्हणेन नक्कीच. कारण वाहतूक दिवे आणि पुणे यांचे यांचे नाते संबंध . त्यामुळे पुण्यात जाणे हे भलतीकडे जाणे नसले तरी,वाहतुकीचे नियम पाळत पुण्यातल्या पुण्यात जाणे म्हणजे भलतीकडेच जाणे .

आपण हिरवा दिवा अजून सुरु आहे म्हणून शेवटी शेवटी पुढे गेलात तर, हे काय इतक्यात आम्हाला हिरवा दिवा मिळणारच आहे,म्हणून पुढे सरकलेली वाहतूक तुम्हाला वळवून बरोबर घेवून जाईल. आता मला लाल दिवा होणार म्हणून थांबायची तयारी केलीत तर ' थांबला तो संपला ' याचे प्रत्यंतर तुम्ही 'याची देही याची डोळा' अनुभवले नाही तर नाव सांगणार नाही .

पुणे म्हटले कि प्रत्येकाचे स्वतंत्र मत . मग ते या दिव्यांच्या बाबत नको का ?

पुणेकरांच्या मते ते वाहतूक नियंत्रक दिवे नसून वाहतूक मार्गदर्शक दिवे आहेत . त्यामुळे त्यातील पिवळा दिवा म्हणजे जर तो दिसला तर, थांबायच्या तयारीला लागा असा अर्थ काढणे म्हणजे तद्दन मूर्ख पणा . पिवळा दिवा म्हणजे हळू काय होताय घुसा . हा खरा अर्थ .

पुल जसे म्हणतात, पुण्यात दुकानात सर्वात दुर्लक्ष करायची गोष्ट म्हणजे गिऱ्हाईक. तसे रस्त्यावर सर्वात दुर्लक्ष करायची गोष्ट म्हणजे ट्राफिक सिग्नल .

आणि पूर्वीच कोणीतरी म्हणून ठेवलाय कि ,पुणे तिथे काय उणे. या उक्तीस स्मरून वाहतूक नियंत्रण दिवे आणि पुणे यांचे नाते खूपच जुने आहे . दिवे आणि वाहतूक वळवणे यांचा इतिहास तपासला तर तो शिव कालीन इतिहासा पर्यंत मागे जातो . शिवाजी महाराजांनी शत्रूला कात्रज च्या घाटात बैलांच्या शिंगांना पलिते बांधून सोडले आणि शत्रूची दिशाभूल करीत आपले सैन्य अन्य मार्गाने नेले .

हे कात्रज च्या घाटाचे तत्व पुणे कर रोजच्या जीवनात आजही पाळतात .त्यामुळे सिग्नल नसलेले रस्ते ( गल्ली बोळ ) शोधत मार्ग काढताना कधी कधी मुख्य रस्त्याहून जास्त वाहतूक गल्ली बोळातूनच होते .

आता भारतात हि परिस्थिती फक्त पुण्यात आहे का ? तर नक्कीच तसे नाही . कारण इंदोर , हैदराबाद या शहरांच्या बाबत त्या ठिकाणचे स्थानिक ' जो बंदा यहां गाडी चलायेगा ,वह बंदा दुनियामे कही भी गाडी चलायेगा । असे म्हणताना प्रत्यक्ष ऐकले आहे . दिल्ली आणि तत्सम मोठी शहरे थोड्या फार फरकाने अशीच आहेत. पण कोणतही गोष्ट पुण्याच्या तुलनेत मोजल्या शिवाय त्याचे योग्य मुल्यांकन होत नाही हेच खरे
.
तर मग सांगताय ना १०१ वर्षाच्या इतिहासाचे आपले अनुभव ! ज्यातून आपले जीवन बहुमुल्य आहे आणि त्याची सुरक्षितता आपल्याच हाती आहे हा संदेश सर्वाधिक लोकांच्या पर्यंत पोहचेल .

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मामा असले कि सिग्नल पाळायचा , अन ज्यांना ग्रीन मिळालाय ते चुकल्या चुकल्या सारखे करेस्तोवर गाड्या त्यान्च्या समोरुन दामटायच्या हे रोजच चालु असत Sad रेड ला थांबल तर काय येडायेका हा आसा चेहरा मागुन येणारा पि एम टी वाला जोर जोरात रेस करुन दावनार , आता एकटा नाय्तर मित्रांबरोबर अस्ताना काही वाटायचनाय पण कुटुंब बरोबर, मग जाम भ्या वाटते ह्या म्होट्या पि एम टी ची Happy ( कहानी सिंव्हगड रस्ता / सिंहगडाला ऱोड नाय म्हणवत )

त्याचे काय आहे की हे सिग्नल वगैरे कमी बुद्धि असलेल्या लोकांसाठी आहेत.
पुण्यातले लोक अत्यंत बुद्धिमान! म्हणजे त्यांच्याहून बुद्धिमान जगात कुठेहि नाहीत.
तर आता बघा - रस्ते हे इकडून तिकडे जाण्यासाठी केले आहेत, वाटेत थांबून आपले सृष्टिसौंदर्य बघण्यासाठी नाहीत. हे सत्य आहे. कायदे वगैरे माणसांनी केलेले. ते जर सत्य असलेल्या कल्पनेच्या विरुद्ध असेल तर माणूस मोठा की सत्य?
त्यातून पुण्यात गर्दी फार. असे मधे मधे थांबले तर काही लोकांना त्यांच्या घरातून बाहेरच पडता येणार नाही!
आता पुण्यातल्या रस्त्यांवर अनेक खड्डे. त्यामुळे फार जोरात गाडी चालवणे शक्य नाही. त्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे असे खुद्द पुणे महानगरपालिकेच्या प्रतिनिधींनी सांगितले आहेच.
सगळ्यात उत्तम म्हणजे जमेल तितक्या लवकर रस्त्यावरून आपल्या मुक्कामाला पोचावे, लाल दिवा, रस्ता क्रॉस करणारी माणसे इ. कडे लक्ष देऊ नये. म्हणजे मागून येणार्‍यांना लवकर मार्ग मोकळा होतो.

हा माझा अनुभव. मी अमेरिकेत गेली चाळीस वर्षे रहातो. इथले मूर्ख लोक, रस्त्याच्या फक्त एकाच बाजूने गाडी चालवतात, दुसरी बाजू रिकामी असली तरी! त्यामुळे सकाळी नि संध्याकाळी रस्ते एका बाजूला गाड्यांने तुफान भरलेले नि दुसरी बाजू रिकामी!!! त्यातून डावीकडे, उजवीकडे वळताना मधे कुणि चालत असेल तर गाडी थांबवा, मग मागचे वळणारे लोकहि थांबणार!

काय हा वेळ व जागेचा अपव्यय!!!

पिंपरी-चिंचवड एरियातसुद्धा सिग्नल हे न पाळण्यासाठी असतात हा ठाम समज आहे. पण बऱ्याचदा आपण थांबलो की कमीत कमी २-३ जण तरी थांबतात.
२-३ दिवसापूर्वीचीच गोष्ट. सिग्नल ग्रीन व्हायला २० सेकंद असताना बाकी गाड्या निघून गेल्या. मी एकटीच थांबले होते तर मागून येणारा रिक्षावाला जोरात हॉर्न वाजवून "ओ ताई, सगळ जग चाल्लय पुढं , तुम्ही काय थांबलात" असा उपदेश करून निघून गेला.

मी अस्सल पुणेकर आहे व मी सिग्नल पाळतो.
पुण्याबाहेरुन पुण्यात आलेले लोक सिग्नल पाळत नाहीत, बेशिस्त वागतात. पूर्वी त्यास काय रे "पौडाहून आलास का" असे विचारायचे. हल्ली विचारण्याची सोय उरली नाहीये. अगदी अमेरिकेत राहुन आलेले लोकही पुण्यात आले की मात्र सिग्नलबिग्नल किस झाडकी पत्ती म्हणुन झिडकारुन टाकतात. असो Proud

>>>> पण कोणतही गोष्ट पुण्याच्या तुलनेत मोजल्या शिवाय त्याचे योग्य मुल्यांकन होत नाही हेच खरे <<<
अस्सल पुणेकर असला कसलाच आग्रह धरीत नाहीत, मुल्यांकनाचा असला विचार हा पुण्याबाहेरील लोकांचा सार्वत्रिक न्यूनगंड आहे. त्याला पुणेकर काहि करु शकत नाहीत. असो.
पुण्यातील पहिला सिग्नल सोन्यामारुती चौकात बसवला गेला होता. मला वाटते की वीसेक वर्षापूर्वीपर्यंत तोच सिग्नल तिथे होता. सध्याचे माहित नाही.

>>> "ओ ताई, सगळ जग चाल्लय पुढं , तुम्ही काय थांबलात" असा उपदेश करून निघून गेला. <<<<
मी तिथे अस्तो तर तत्काळ सांगितले अस्ते, की सगळे जग सिग्नल तोडून शेण खात पुढे चाल्लय, मला तसे जायचे नाहीये.
अर्थात शब्दांनी सुधारतील तर ते इंडियन/भारतीय कसले?

पटणारा लेख. मी पण पुणेकरच. वर्षातून जेव्हा जेव्हा पुण्याला जातो तेव्हा, मुद्दाम प्रवाहाच्या विरुद्ध पोहतो.... म्हणजे, सिग्नल+वाहतूकीचे नियम कटाक्षाने पाळतो! इतरांच्या नाकावर टीच्चून! वर पीएमटीचा दादाश्रींनी लिहिलेला अनुभव दरवेळी येतो. शक्य त्या वेळी पीएमटीला जागा करुन देतो.. पीएमटीच का कोणीही असो.... जागा करुन देतो.. जा बाबा! तू प्रचंड घाईत असशील.. जा असं हातवार्‍यांनी त्याला सांगतो (कारण डोकं हेलमेटात असतं). हा मनुष्य मंगळावरुन आला की काय असा तु.क. मिळतो, पण मी ही पुणेकर.. त्यांच्या इतकाच हट्टी ! थोडक्यात काय.. आता पुण्यात गाडी चालवायला अगदी नालायक झालोय मी !

रक्षक चौक पासून जगताप डेअरी ला वळणारा आणि रक्षक सोसायटी रस्ता ते पिंपळे सौदागर सरळ जाणारा रस्ता हा सिग्नल फक्त पंधरा सेकंदाचा आहे.एखाद्याला जीवावर उदार होऊन रक्षक चौकावरुन हिंजवडीला जायचे असेल तर कृती याप्रमाणे:
काहीही करुन सर्वात पुढे येऊन थांबणे आणि समोरुन जाणार्‍या दोन सिग्नलची दिड मिनीटे संपली की जीवाच्या आकांताने हॉर्न वाजवत मुसंडी मारणे. जगताप डेअरी कडून औंध कडे येणारे थांबत नाहीत पण आपण ठोकरले गेल्यास किंवा जखमी झाल्यास समोर उभ्या ट्रॅफिक पोलीसाची आणि जनतेची सहानूभूती मिळू शकते सिग्नल पंधरा सेकंदाचा असल्याने.

हाच तो क्लीव्हलंड ओहियो मधला E105 रोड वरील चौक जिथे पहिला स्वयंचलित वाहतूक नियंत्रण दिवा कार्यान्वित झाला . आज योगायोगाने १०१ वर्ष आणि १ दिवसानी सिग्नल बरोबर पोलिस पण ट्रफिक कंट्रोल करत आहे.

IMG_0740.JPG