२०१४ च्या सप्टेंबरमध्ये जम्मू- कश्मीरमध्ये आलेल्या महापूरानंतर तिथे मदतकार्यात घेतलेल्या सहभागाच्या आठवणी माबोकरांसोबत शेअर करत आहे. सर्वांना अभिवादन! (अवांतर- हे काम उदात्त/ ग्रेट इत्यादी नसून उत्स्फूर्त केलेलं सामान्य कामच आहे. आपण प्रत्येक जण असं काम कुठे ना कुठे करतंच असतो. ज्यांच्याकडे तशी पॅशन असते, तसे लोक ते काम जास्त काळ करतात. तेव्हा उदात्त/ ग्रेट असं काही मानू नये. धन्यवाद!)
जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- १
जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- २
मदतकार्याचे आकलन
६ ऑक्टोबरची पहाट! श्रीनगरमध्ये सुखद थंडी आहे. आज श्रीनगरमध्ये ईद साजरी होणार आणि इथले सेवा भारतीचे सर्व कार्यकर्ते आपल्या घरी ईद साजरी करतील. एका अर्थाने हा त्यांच्यासाठी सुट्टीचा दिवस आहे. अर्थात् ते दुपारी सेवा भारतीच्या कार्यालयात येऊन परत कामाला लागतील. पण दुपारपर्यंत ते तिकडेच असल्याने आज गावांमध्ये आरोग्य शिबिर होणार नाहीत. देशभरातून आलेले डॉक्टरसुद्धा आज एका अर्थाने थोडा आराम करतील आणि औषधे ठीक लावून ठेवतील. आज मला सगळं काम समजून घ्यायचं आहे; सगळ्यांशी झालेला परिचय आणखी वाढवायचा आहे आणि रिपोर्ट बनवायचा आहे. रिपोर्टचे मुख्य मुद्दे दादाजींनी सांगितले आहेत. आता मला ते लिहून काढायचे आहेत. ह्यासाठी संस्थेच्या लॅपटॉपवर काही दैनिक अहवाल, फोटोज आणि व्हिडिओज अशी माहिती उपलब्ध आहे.
पहाटेपासूनच जवळून अजानचा ध्वनी निनादत आहे. जवळच मशीद आहे. ह्या आवाजामुळे वातावरणात एक प्रकारची क्रियाशीलता येते आहे. काल रात्री दोन खोल्यांमध्ये जवळपास पंचवीस कार्यकर्ते थांबले होते. आपापल्या वेळेनुसार ते तयार झाले. ज्यांच्याकडे स्वयंपाकाचे कौशल्य आहे, ते चहा- नाश्ता बनवत आहेत. आता हळुहळु प्रत्येकाची ओळख होते आहे. आजवरच्या मदतकार्याचा आढावा घेता घेता गप्पा होत आहेत.
सकाळी दादाजींसोबत बोलणं झालं तेव्हा त्यांनी थोडं वेगळंच सांगितलं. काही गोष्टी स्पष्ट केल्या. ते म्हणाले, 'प्रत्यक्षात रिलिफ काम केलं जाऊच शकत नाही. जर इतका मोठा विनाश झाला असेल, तर आपण त्यासाठी काय करू शकतो? पाण्याने सर्व धुवून नेलं. आता ते आपण कसे भरून काढू शकतो? हां, आपण आपल्याला शक्य तितकी मदत करू शकतो; जितक्या वेदना वाटून घेता येऊ शकतात, तितक्या वाटून घेऊ शकतो. ते आपण नक्कीच करतोय.' हे थोडं विसंगत वाटलं. इथे येईपर्यंत असं वाटलं होतं की, रिलिफमध्ये अशा वेगवेगळ्या बाजूंनी काम करावं लागेल- दरी- खो-यातून दुर्गम गावी जाणे, रेशन वाटणे, तात्पुरत्या निवा-यांसाठी मदत करणे, टर्पोलिन देणे, सरकारी लोकांसोबत समन्वयन करून गरजूंची मदत होते आहे हे बघणे, गावोगावी जाऊन हानीची मोजदाद करणे, मदत सामुग्रीची आवश्यकता जाणून ती देत असलेल्या यंत्रणेला ती कळवणे, मिलिटरीसोबत तंबू बांधणे, कचरा स्वच्छ करणे इत्यादी. पण इथे थोडं वेगळंच दिसत आहे. दादाजींनी थेट सांगून टाकलं- 'तुला ज्या प्रकारचं रिलिफ काम माहिती आहे, ते आम्ही करत नाही आहोत. आम्ही आमच्या परिस्थितीत जे शक्य आहे, ते करत आहोत. आणि नुकसान प्रचंड मोठं आहे. जर काही मदत सामुग्री वाटायची म्हंटली तरी जमणार नाही. कारण एका गावामध्ये जर ३०० कुटुंबांकडे हानी झाली असेल तर फक्त १०० ब्लँकेट वाटून काय होणार? म्हणून आम्ही जास्त लक्ष आरोग्य शिबिरांवर देत आहोत. थोडी सामुग्री वाटतोय, पण ती लोकांनी स्वत:च पाठवलेली आहे.'
सेवा भारतीच्या मदतकार्याचे फोटो बघताना स्पष्ट दिसत होतं की, ते पहिल्या दिवसापासून सक्रिय आहेत. जेव्हा नैकपूराजवळचं- श्रीनगरपासून सुमारे वीस किलोमीटर अंतरावरचं जेलम नदीवरचं धरण कोसळलं तेव्हा म्हणजे ७ सप्टेंबरला श्रीनगरमध्ये पुराच्या पाण्याचं थैमान सुरू झालं. तेव्हा पूर्ण शहर जलमय झालं. सेवा भारतीचे कार्यकर्ते पहिल्या दिवसापासून सक्रिय होते. त्या वेळी जे जे केलं जाऊ शकत होतं ते त्यांनी केलं. जवळच्या घरातले काही जणांनी संस्थेच्या कार्यालयातील दुस-या मजल्यावर सुरक्षित आसरा घेतला. जिथपर्यंत कार्यकर्ते जाऊ शकत होते, तिथे ते गेले आणि जवळ असलेलं रेशन त्यांनी दिलं. जेव्हा सेवा भारती कार्यालयातला एक दरवाजा तुटला, तेव्हा त्यांनी त्यापासून नाव केली आणि त्याद्वारे जलमय भागांमध्ये सेवा भारतीचे कार्यकर्ते जाऊ लागले. जिथे नाव नव्हती, तिथेसुद्धा त्यांनी पाण्यात जाऊन लोकांना मदत केली आणि लोकांना खांद्यांवर उचलून सुरक्षित जागी आणलं. कश्मीरमध्ये तीन हजारपेक्षा जास्त लोकांना सेवा भारतीने रिस्क्यू केलं.
आपत्तीच्या पहिल्या टप्प्यात जम्मू विभागातही भीषण स्थिती होती. तवी नदीच्या तांडवामध्ये संस्थेने जम्मू बस स्टँडवर भोजन सेवा दिली. अडकलेल्या लोकांची माहिती देण्यासाठी हेल्पलाईन चालवली. श्रीनगर शहरात अनेक ठिकाणी क्लोरिनची फवारणीसुद्धा करण्यात आली. पाणी कमी झाल्यानंतर आरोग्य शिबिर सुरू झाले. आजपर्यंत (६ ऑक्टोबर) शंभरपेक्षा अधिक शिबिर झाले आहेत आणि पंधरा हजारांहून अधिक रुग्णांवर इलाज केला गेला आहे. अजूनही सर्वाधिक भर आरोग्य शिबिरांवरच देण्यात येत आहे. आज आपत्तीला एक महिना पूर्ण होत आहे. अजूनही कोणताही साथीचा रोग पसरलेला नाही. त्याला प्रतिबंध करण्यात सेवा भारतीच्या डॉक्टरांचासुद्धा वाटा आहे.
सेवा भारतीच्या कार्यालयात गेल्या एक वर्षापासून कार्यरत असलेला महाराष्ट्रातला एक कार्यकर्ता- मयूर पाटील ह्याने ह्याची डोळा बघितलेले अनुभव सांगितले- “६ सप्टेंबरपासून आम्ही अडकलो होतो. सेवा भारती कार्यालयाचा खालचा मजला पूर्ण पाण्याखाली गेला. आमच्यासोबत दोन शेजारी मुलांसह थांबायला आले. योगायोगाने संस्थेच्या कार्यालयात सिलेंडर होता आणि भातसुद्धा होता. त्यामुळे आम्हाला अन्न मिळालं. आम्ही पाणी गरम करून प्यायचो. आमचे कार्यकर्ते समोर दिसणा-या जागी नावेतून जायचे. एक दिवस मिलिटरीवालेसुद्धा आले होते. आम्ही त्यांच्याकडून फक्त पाणी घेतलं. जगापासून आमचा संपर्क तुटला होता. वीज नव्हती; मोबाईलसुद्धा बंद होते. चालू असते तरी फरक पडला नसता म्हणा. तळमजला पाण्याखाली असल्यामुळे सांगता येणार नाही इतकी अवस्था वाईट होती. वरच्या टॉयलेटमध्ये पूर्ण पाणी जमलेलं असायचं. कसेबसे आम्ही ते दिवस काढले. काही जण हिंमत हरण्याच्या मार्गावर होते. रात्रीची झोपही येईनाशी झाली होती. बाजूला रेंटने राहणा-या काकांनी आम्हांला सावरलं. त्यांच्यासोबत मिळून आम्ही जेवण बनवायचो. १८ ला पाणी कमी झाल्यानंतर मी खाली जाऊ शकलो. तेव्हा घरच्यांशी बोलणं झालं.”
हा युवा कार्यकर्ता एकुलता एक असूनही गेल्या एक वर्षांपेक्षा अधिक काळापासून इथे कार्यकर्ता म्हणून कार्यरत आहे. सर्व प्रकारच्या कामांमध्ये तो प्रवीण आहे. ऑफिसची देखभाल, पाणी भरून ठेवणे, चहा- जेवण बनवणे (तेही वीस- पंचवीस लोकांचं), रिलिफच्या कामाचं समन्वयन करणे, औषधे लावण्यासाठी डॉक्टरांची मदत करणे इ. . . असे कित्येक कार्यकर्ते इथे आहेत. कोणी दहा दिवसांसाठी आलेले आहेत. कोणी पंधरा दिवसांपासून आलेले आहेत. इंदौरच्या विदुषी दिदीसुद्धा अशाच एक जिद्दी कार्यकर्त्या आहेत. एकट्याच त्या इंदौरहून इथे आल्या. त्यांना सेवा भारतीबद्दल फार माहितीसुद्धा नव्हती. आता त्या रिलिफ कामामध्ये पूर्ण अकाउंटसचं काम बघत आहेत. आणि तेही इतकं जीव ओतून की कित्येक तास एकाच जागी बसून काम संपवत आहेत.
जसा दिवस पुढे गेला, तशा अनेक कार्यकर्त्यांसोबत गप्पा झाल्या. रिपोर्ट लेखनसुद्धा चालू आहे. दादाजींनी आणखीन एक विचित्र गोष्ट सांगितली- 'तुझं रिपोर्टिंग आणि डॉक्युमेंटेशन इथे उपयोगी नाही पडणार. तुझी तिथली पद्धत इथे योग्य ठरणार नाही. इथे तुला आमच्या पद्धतीने काम करावं लागेल.' मग त्यांनी समजावलं की, रिपोर्ट लिहायचा तर तो अगदी रुक्ष आणि फक्त माहितीवजा लिहायचा नाही. त्यात जीवंतपणा असला पाहिजे आणि जमिनीवरील सर्व कार्याला त्याने रिफ्लेक्ट केलं पाहिजे. तसं तर उपलब्ध असलेल्या माहितीवरून रिपोर्ट लिहिणं हे निव्वळ दोन तासांचं काम होतं; पण ते यांत्रिक झालं असतं. त्यातून ह्या कामाची खोली कळाली नसती. म्हणून ते सतत रिपोर्टमध्ये बदल सांगत होते आणि काम चालू राहिलं.
ही त्यांची एक विशेष शैलीसुद्धा आहे! त्यांच्याजवळ येणा-या प्रत्येक व्यक्तीला पहिल्यांदा ते किंचित विचित्र पद्धतीने बोलतात. एखाद्याला सहजपणे म्हणतात, तू अगदीच मूर्ख आहेस! अनेक लोकांना त्यांचा रागही येतो. पण दादाजी म्हणतात की, ही लोकांना निवडण्याची त्यांची पद्धतच आहे. एकदा जे लोक अशी वरवर बघता निगेटिव्ह वाटणारी गोष्ट ऐकून व तिचा अनुभव येऊनही दादाजींच्या जवळ राहतात, ते नंतर चांगलं काम करतात, असं दादाजी म्हणतात. एका अर्थाने येणा-या लोकांसाठी हा इंडक्शन करण्याचा छोटा एक्सरसाईझच आहे! दादाजींचं बोलणं एकदम मजेदार आहे. बंगाली वळणाची हिंदी (ऑनुभव, इसके ऑनुसार कॉरना असे प्रयोग) आणि थोडा पंजाबी तडका! त्यांचं वय नवख्या कार्यकर्त्यांच्या वयापेक्षा तिप्पट असलं आणि त्यांचा अनुभव प्रदीर्घ असला तरी ते मित्राप्रमाणेच दिलखुलास बोलतात. चेष्टा मस्करी आणि भांडणही करतात. त्यांनी एखाद्याला रागावणं बघण्यासारखं आहे! मित्राप्रमाणे वाद घालतात. आणि हे करतानाच सर्व कामाचं नियोजन आणि समन्वयनसुद्धा करतात. त्यामुळेच त्यांनी कोणाला कठोर शब्द जरी वापरले, तरी त्यामुळे समोरच्याला ते लागत नाही.
दिवसभर असंच चालू राहिलं. काही कार्यकर्त्यांसोबत बसून रिपोर्ट लिहित गेलो. फोटो निवडण्याचंही काम होतं. दुपारनंतर स्थानिक कार्यकर्ते ईद साजरी करून परत कार्यालयात आले. अनेकांनी मिठाई आणली आणि ईदच्या शुभेच्छा दिल्या. संध्याकाळी एका कार्यकर्त्याने व्हिडिओ रिपोर्टसाठी स्थानिक कार्यकर्त्यांच्या काही मुलाखती घेतल्या. त्यातही काही गोष्टी समजल्या. कश्मिरी बोली ऐकताना मजा वाटली! आता थोडा परिचय होऊनही काही स्थानिक कार्यकर्ते अद्याप नजरेला नजर देऊन बोलत नाही आहेत.
रात्रीच्या जेवण्यासाठी रेसिडन्सी रोडवरच्या आश्रमात गेलो. रात्रीच्या अंधारात श्रीनगरमध्ये पायी पायी जाताना जेलम नदी दिसली (स्थानिक भाषेत दरिया ए जैलम). काही रस्त्यांच्या फूटपाथवर कचरा आणि स्लरीसारखा मलबा पडलेला आहे. आतमधल्या रस्त्यांवर पुराच्या खुणा दिसत आहेत. अर्थात् वरवर बघणा-याला वाटू शकेल की श्रीनगर परत सामान्य स्थितीकडे येत आहे. रात्रीच्या अंधारात शंकराचार्य मंदीर उजळलेलं दिसत आहे. त्याच वेळी समजलं की, आज ईदचा जश्न असल्यामुळे काही लोकांनी जुलूस काढला होता. इथे श्रीनगरमध्ये जुलूस, नारेबाजी आणि रॅलीज रोजच्या गोष्टी आहेत. ऐकण्यात आलं की लोकांनी पाकिस्तानचा झेंडा फडकावला आणि मग सुरक्षा दळांनी अश्रू धुराचा वापर केला. लाठी चार्जसुद्धा केला. नुकताच श्रीनगरमध्ये इसिसचा झेंडाही फडकवण्यात आला होता. स्थानिक लोक म्हणतात की अशा बातम्या इथे नेहमीच्याच आहेत.
तसं पाहिलं तर आजच्या दिवसात काही विशेष काम झालं नाही. पण अनेक कार्यकर्त्यांसोबत भेटी झाल्या. त्यांचे अनुभव ऐकायला मिळाले. काही जणांसोबत मैत्रीही झाली. अनेक वेळेस आपण अशा लोकांना भेटतो ज्यांना भेटल्या भेटल्या एका अंतराची जाणीव होते आणि कधी कधी मैत्रीचीही जाणीव होते. देशभरातून आलेले युवा कार्यकर्ते नक्कीच महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. “थेंबे थेंबे तळे साचे" प्रमाणे.
मला पुढचं कामसुद्धा सांगितलं आहे. आजपर्यंत झालेल्या मदतकार्याचा रिपोर्ट आणि पाम्पलेट बनवायचं आहे. त्यासाठी दादाजी मला त्यांच्यासोबत जम्मूला ये म्हणत आहेत. तिथे उद्या एक मीटिंगही आहे. काही दिवस जम्मूला जायचं आहे. त्यानंतर पुढचा कार्यक्रम ठरेल. रिलिफ कामात हेच असतं ना- Everything can happen and anything also can happen. मनात अजूनही काही प्रश्न आहेत. बघूया काय काय होतं. आज रात्री लवकर झोपावं लागेल कारण उद्या पहाटे तीनला श्रीनगरला जायला निघायचं आहे. कारण जम्मूमध्ये संध्याकाळी मीटिंग आहे. आणि बनिहालचा रोड अजूनही जाम असल्यामुळे मुघल रोडनेच जायचं आहे. . .
व्हिडिओज-
जावेद भाई मदतकार्याची माहिती देताना
फयाज भाईंचं निवेदन
पुढील भाग: जम्मू कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- ४
मूळ हिंदी ब्लॉग:
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव १
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव २
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव ३
हा भाग सुद्धा छान आहे
हा भाग सुद्धा छान आहे
.... दादाजी दी ग्रेट ....
.... दादाजी दी ग्रेट .... यांची प्रत्यक्ष गाठ घ्यायला फार आवडेल खरं तर ....
बाकी सर्व लेखन सुंदर ......