भाग एक - http://www.maayboli.com/node/54368
भाग दोन - http://www.maayboli.com/node/54425
भाग तीन - http://www.maayboli.com/node/54450
भाग चार - http://www.maayboli.com/node/54489
भाग पाच - http://www.maayboli.com/node/54490
भाग सहा - http://www.maayboli.com/node/54566
भाग सात - http://www.maayboli.com/node/54601
भाग आठ - http://www.maayboli.com/node/54666
भाग नऊ - http://www.maayboli.com/node/54711
भाग दहा - http://www.maayboli.com/node/54797
भाग अकरा - अंतिम
डायरीतील नोंद-- असलेली-
तसं बघितले तर कलकत्त्यात आता काही उरले नव्हते कालीचा हुकुम about turn. तथापि विवेकानंदांच्या जन्म ठिकाणाचे दर्शन व राम कृष्णांना मी पुनश्च येईन(३.५ वर्षांची कालमर्यादा) असे सांगून कलकत्याहून निघावे असा आग्रह काळ बदलता आहे. ३.५ वर्षांनंतर कोणती परिस्थिती असेल हे आत्ताच सांगता येणार नाहीं. तथापि शेवटी पुन्हा एकदा दक्षिणेश्वरी जाण्याचे ठरवून रेल्वे स्टेशन वर आलो.
लोकल दक्षिणे श्वर नजीकच्या स्टेशन वर थांबत नाहीं. बाहेर जावे तर T.C.चा अडसर अखेर एकदा उलटा कौल लागल्यावर इथूनच निरोप घ्यावयची तयारी होती.व जसा कौल लागला तसे मन त्या दिशेने ओढ घेऊ लागले व मुंबई गाडीत बसलो.
परंतु मध्ये सारडीहा स्टेशन वर मिलिटरी पोलिसांनी उतरवले. बंगाली येत नाहीं वगैरे कल्पना दिल्यावर थोड्या वेळाने मुक्तता. दुसरा एक असा W.T.त्याचे उत्तर I have no aim to travel त्याला स्टेशन मास्तर कडून हरकत.मी कल्याणला जाण्याची भूमिका स्पष्ट केली व ती त्याने (appreciated ) मान्य केली.
खेडे गावात तलाव अशी सोय नाहीं आडावर जावून स्नान कपडे धुतले. भगवानके लिये घर छोडा है असे म्हणून जवळ शिदोरी असता मागावेसे वाटेना. हॉकर्सचा फ्लश पत्यांचा खेळ. आडाण्याशी( संग) खेळ नको. बिनसले कि सुऱ्याशी गाठ असे त्यांच्या बोलण्यात आले. जुगाऱ्याकडील अन्न घ्यावे काय? ते उदारही असतात हा विचार प्रत्यक्ष मागणी नाहीं.
छोट्या स्टेशन वर मेल थांबत नाहीं. टाटानगरला जावयास पाहिजे . म्हणून गाडीत बसलो. पुनश्च रात्रीचे गाडीत T.C. भेट No Money म्हटल्यावर मध्येच उतरून घ्या म्हणाला. बर म्हणालो. उतरू लागताच डब्यातील बहुतेक मुसलमान प्रवाश्यांनी हुं ! म्हणावयाचे व प्रवास चालू ठेवावयाचा सल्ला दिला.
साऱ्यांनी "भाजा बदाम" शेंगा खावयास घेतल्या Except me तेंव्हा एका व्यापाऱ्याने ५ पैशाच्या अयाचित शेंगा घेऊन दिल्या टाटा नगर ८-८.५ ला व रात्री २.५-३ तासांनी मुंबई गाडी.
------------------ x ----------------
टाटा नगरहून पुढे प्रवास चालू. जागा मिळणे मुश्कील ३.५ ते ४ तास उभ्याने. पुन्हा T.C. बंगाली वाघाची गाठ. परंतु गर्दी मुळे माझ्या पर्यंत पोहोचू शकला नाहीं.विलासपूर मार्गे पुढे मुंबई दिशेने रवाना.
संत्रा फोडी,पोहे, शेंगदाणे गुळ हि शिदोरी एकाने पुरी भाजी घेतली होती परंतु ती त्याला नको होती ती disopse off करण्या अगोदर तुम्हास नको असेल तर मी वापरू शकेन असे म्हणावे वाटते न वाटते तो खिडकीतून त्याने टाकून दिली.मनात विचार आला न जाणो त्यात दुसऱ्याचा शेर असेल.
त्याने जागा सोडण्यापूर्वी एक चिवडा पुडी गाडीत मिळून आली व त्याचा उपयोग. त्याची पुडी राहिली का? हे confirm केले जावयास हवे होते काय? एक ठिकाणी गोंदिया पुढे एक पोलीस ड्रेस घालून जागेकरिता दमात घेऊ पाहत होता.परंतु प्रवाशाने मी उठून बसतो परंतु तुला जागा मिळणार नाहीं असा पवित्रा घेतल्यावर तो गप्प.पोलीस म्हणून नव्हे तर माणूस म्हणून शेजारी जागा दिली. शासनाचा बोज राहील तर बरे हा हेतू.
कल्याणवरून शिवाजीनगर oppsite बाजू कडे उतरून,पुण्यात आल्यावर प्रेस्टीजच्या कल्पनेने कपडे बदलून सौ अक्काच्या घराकडे वाटेत विठ्ठल वाडीला जाऊन या प्रवासाची सांगता करावी हा विचार परंतु ज्ञानेश्वर पादुका दर्शनाने समाप्ती.
सौ. अक्का, तिला कलकत्त्याहून लिहिलेले पत्र मी येण्या अगोदर मिळाले होते. प्रमिला येण्याचा आज संभव.किल्ली असेल तर तिकडेच कोथरूडला जातो. जेवून जा म्हणाल्यावर जेवण.
तुला सांगायला काही हरकत नाहीं तुझी बायको, अशी धीराची खऱ्या संस्कृतीची, तुझ भाग्य थोर म्हणून तुला मिळाली असे सौ. बद्दल गौरवोदगार व ती ऐकायला इथ नाहीं असे म्हणत असतानाच ती वाट चालत होती. मला पाहिल्यावर प्रथम अश्रूंना वाट.
आज राजारामबापू पिंपरीला त्या दिवशी उभयता तिथेच थांबलो. गेल्या नंतर कांता व पंडित यांनी शोध शोधी चे जे परिश्रम त्याची हकीगत कानठळ्या बसवणारा आवाज. भूकंप अशी प्रतिक्रिया .तुझ्या भरवशावर कलकत्ता गाठले तसेच (T.C. ना तोंड देत ) पुणे हि गाठीन व हा प्रवास सुखरूप पार पाडण्याची जबाबदारी त्याने (भगवंताने) पार पाडली
…(समाप्त)
डायरीतील नोंद-मला समजलेली -
गेल्या दहा भागात मला गवसलेली माझ्या वडिलांची रोजनिशी जशीच्या तशी तुमच्या समोर मांडली. आम्ही तीन भावंडे आणि माझी आई यांना एकटे सोडून अचानक सर्व संग त्याग करून विरक्तीच्या मार्गाने जाण्याचा निर्णय घेत वडिलांनी घर सोडले होते.
त्यावेळी नातेवाईकांनी त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या सुरवातीच्या प्रवासातील तीन ते चार ठिकाणी ते ठिकाण वडिलांनी सोडले आणि मग त्यांना शोधत माग काढणारे माझे काका तिथे पोहचले असे झाले. पुढे मग त्यांच्या घर सोडून जाण्याच्या प्रश्नाची तीव्रता जगाच्या दृष्टीने कमी होत गेली.
आता मुलांकडे बघून तुलाच घर चालवले पाहिजे असे सांगत, बहुतेक नातेवाईक आपापल्या संसारात रममाण झाले.आज त्याकाळी मी स्वतः आजोळी असल्याने आईचे रोजचे भावनिक हाल पाहण्यास मी नव्हतो. पण आज त्या दिवसातील आठवणी मन सुन्न करतात.
आज अखेरचा रोजनिशीचा भाग मी आपणासमोर ठेवला आहे. वडिलांना घरी परतण्याचा कौल मिळाला. ते कलकत्ता पुणे प्रवास विनातिकीट करताना पकडले गेले नाहीत.
सुमारे दोन महिन्याचा कालावधी त्यांनी, समाज माझी काळजी घेईल. सर्व व्यवस्थित पार पडण्यासाठी भगवंत आहे, या श्रद्धेवर काढला. आज चाळीस वर्षांनतर या घटना क्रमाकडे पहिले कि, खरोखर श्रद्धा माणसाला किती बळ देते याची प्रचीती येते.
पुण्यात परत आल्यावर देखील माझ्या वडिलांची पाऊले प्रथम माझ्या आत्याच्या घराकडेच वळली. आई माघारी वडिलांना आईच्या प्रेमाने तिनेच लहानाचे मोठे केले होते. त्यामुळे त्यांनी ज्ञानेश्वर पादुकांच्या दर्शना नंतर माझ्या आत्याचे घर जवळ केले.
या प्रवासानंतर पुढे दोन वर्षांनी किरकोळ आजारपणाचे कारण होवून जुलै १९७३ मध्ये माझ्या वडिलांचा मृत्यू झाला. आईस तरुण पाणीच वैधव्य आले. पण अखेरच्या दिवसात त्यांची काळजी घेता आली या समाधानावर आईने आम्हा सर्व भावंडांना लहानाचे मोठे केले.
आता एकूण घटना क्रम पाहता या सर्व प्रवासाने त्यांनी नक्की काय साधले असेल . फक्त काली मातेचे दर्शन घेण्यासाठी केलेला खटाटोप म्हटले तर देव दर्शन काय अनेक जण करतात . पण पायी चालत , मिळले ते वाहन, उपलब्ध होईल ते अन्न, या सारखे व्रतस्थ राहत त्यांनी घेतलेले रामकृष्ण मिशन येथील व कालीमातेचे दर्शन या गोष्टी त्यांना आत्मिक समाधन नक्कीच देवून गेल्या असतील .
त्यांच्या या कृतीचा समाजाला काही उपयोग झाला का ? कदाचित त्याकडे पण दोन अर्थाने बघितले जाईल . संसारिक जबाबदाऱ्या टाळून केलेली भटकंती असे काहीना वाटेल . पण प्रवास करताना आजारी लोकांना मदत , गरिबांच्या विषयी प्रामाणिक कळकळ ,माणसाने धर्मांध होवू नये अशी भावना कृतीत आणणे ,या कृतीतून त्यांनी त्यांच्या परीने एक वेगळा आदर्श इतरांच्या समोर नक्कीच ठेवला
पण या रोजनिशीच्या वाचनातून,भले लौकिक दृष्ट्या माझे वडील संसारात यशस्वी नसतील, पण पारलौकिक अर्थाने ते सरळ मार्गी आणि त्यांचा अभिमान बाळगावा असे आदर्श पिता होते हे मात्र अंतिम सत्य मला समजले...
आणि हे सत्य मी माझ्या शब्दात तुमच्या समोर ठेवीत वडिलांची डायरी बंद करतो....
संमिश्र भावना आहेत मनात.
संमिश्र भावना आहेत मनात. परिस्थिती माणसाला घडवते. कमकुवत मन होते की शरिर?.,.नाउमेद का वाटले असेल त्यांना की त्यांनी घर सोडुन जायचे ठरवले? तुमच्या आईला माहेरचा आधार आहे हे त्यांना त्यातल्या त्यात समाधान वाटले असण्याची शक्यता आहे. तुमच्या आईबद्दल जास्त सहानुभुती वाटते. काही का असेना, तुम्हाला या डायरीच्या निमित्ताने वडीलांचा सहवास घडला ह्याबद्द्ल खुप बरे वाटले. धन्यवाद आम्हाला यात सामील केल्याबद्दल.
मनातील वेदना अशा सहज शब्दात
मनातील वेदना अशा सहज शब्दात मान्डुन आम्हाला या प्रवासात सामिल केल्याबद्दल धन्यवाद.
प्रत्येक भाग सुरवाती पासून
प्रत्येक भाग सुरवाती पासून वाचत होते. चांगले लेखन आहे. पुढील लेखनासाठी शुभेच्छा. तुमच्या आई बद्दल त्या माउली बद्दल मला फार सहानुभूती वाटते. त्यांच्या प्रेमाचा असा अपमान नको व्हावयास हवा होता.
माणसाच्या मनाचा ठाव कोणाला
माणसाच्या मनाचा ठाव कोणाला घेता आलाय.
डायरीच्या निमित्ताने तुम्ही प्रयत्न केलात.
तत्कालीन समाजनियम, त्यांच अध्यात्माकडे ओढा घेणारं मन, त्यासाठी त्याग करण्याची भावना ह्यांना मी आताच्या प्रचंड वेगळ्या परिस्थितीत जोखणं चुकीचच.
मला तरी लेखमाला आवडली.
मनातील वेदना अशा सहज शब्दात
मनातील वेदना अशा सहज शब्दात मान्डुन आम्हाला या प्रवासात सामिल केल्याबद्दल धन्यवाद. >>>+१००
तुमच्या मातोश्रींची मात्र कमाल वाटते - पतिनिधनानंतर त्यांनी एकटीने तुम्हा सर्वांचे पालनपोषण केले ...
तुमच्या आई-वडिलांना सादर प्रणाम ....
>>मनातील वेदना अशा सहज शब्दात
>>मनातील वेदना अशा सहज शब्दात मान्डुन आम्हाला या प्रवासात सामिल केल्याबद्दल धन्यवाद. >>>+१००
राया, नीलिमा,अनन्या वर्तक
राया, नीलिमा,अनन्या वर्तक ,झकासराव,पुरंदरे शशांक ,स्वाती २- आपले मनपूर्वक धन्यवाद !
आताचा अखेरचा भाग व यापूर्वीचे दहा भाग वाचून त्यावर प्रतिसाद देणारे व फक्त वाचन केलेल्या
सर्वांचे आभार .
चाळीस वर्षे मागे जात त्या काळातील अनुभवलेली परिस्थिती , त्याच्या आठवणी आणि वडिलांची डायरी हातात आल्यावर त्या आठवणी, व डायरीतील नोंद यांची सांगड घालण्याचा केलेला प्रयत्न म्हणजे डायरी वाचून मला काय समजले हे लिखाण अशी हि लेखमाला होती .
आपण सर्वांनी हि दीर्घ मालिका सुरु ठेवण्यासाठी जो धीर दिलात त्या बद्दल परत एकदा सर्व प्रतिसाद कर्ते व वाचक यांचे आभार मानतो .
>>>>>>>मनातील वेदना अशा सहज
>>>>>>>मनातील वेदना अशा सहज शब्दात मान्डुन आम्हाला या प्रवासात सामिल केल्याबद्दल धन्यवाद.
अगदी खरे. उचित प्रतिसाद.
पहील्या भागात आपण लिहीलेले आहे - "नाते तोडू म्हटले तरी तुटत नाही." ते बरोबर लिहीले आहे. आई-वडीलांशी जे नाते असते ते कर्माच्या साखळीने अतिघट्ट विणले गेलेले असते पूर्वसंचितच असते याविषयी मनात किल्मिषही नको.
सर्व भाग आवडलेच.
सामो - धन्यवाद आपल्या छानश्या
सामो - धन्यवाद आपल्या छानश्या प्रतिसादासाठी . नीलिमा यांचा प्रतिसाद आणि त्यावरील अनुमोदन जितके मनापासून आहे तितकेच आपण नमूद केलेला -"नाते तोडू म्हटले तरी तुटत नाही." ते बरोबर लिहीले आहे. हा आपला प्रतिसाद पुन्हा गतकाळात घेऊन गेला . बालपणीच्या अनेक आठवणींनी पुन्हा एकदा त्या दिवसांना उजाळा दिला . पुनःश्च आभार . आणि हो जवळ जवळ साडेसात वर्षांच्या नंतर धागा पुन्हा वर आणलात . त्यासाठी विशेष आभार