आज सखीला तिच्या दोन तायांनी चक्क भर दुपारी बाहेर खेळायला नेले, सखीला खूपच आश्चर्य वाटले, कारण त्या दोघीही तिच्यापेक्षा ५-६ वर्षांनी मोठ्या होत्या आणि कधीच एकत्र खेळत नसत. पण सखीला खूप छान वाटलं, थोडा वेळ खेळून झाल्यावर बहुतेक कोणीतरी घरातून बोलवायला आले तशा या सार्या घरी गेल्या,
माजघरात मधेच एक गादी घातली होती आणि त्यावर कोणीतरी झोपले होते, सखीला मनात वाटले आता कोणाची तरी फजिती होणार, काकू ओरडणार कोण मध्ये झोपलय ते पण तसे काहीच झाले नाही आणि घराचे वातावरण सुद्धा एकदम कुंद, विचित्र होते,
तिच्या तायांनी गादीवर झोपलेल्या व्यक्तीला नमस्कार केला मग सखीची पाळी होती ती पुढे गेली आणि कसाबसा वाकून नमस्कार केला आणि त्या व्यक्तीकडे पहिले तर तिला कुठेतरी खोल मनात ओळख लागली, आणि पुढच्याच सेकंदाला लक्षात आले हि आपली आई आहे, मग तिने इकडे तिकडे पहिले तर तिचे मामा, मामी सारे खोलीत गोल कडेने बसले होते आणि सार्यांचे डोळे पाणावले होते ,
काय चाललय हे सारे छे काही कळत नाहीये, आईला असे का झोपवले आहे? किती अवतार झालाय तिचा, केस पिंजारले आहेत … कपडे विस्कटले आहेत, नाही तर आई कीती स्वच्छ आणि सुंदर दिसते. खर तर आईला उठून सांगायला पाहिजे, आई तू अशी नाही ग छान दिसत, मला कसं पकडून अंघोळ घालतेस आणि स्वच्छ चकचकीत करतेस, मग तुला काय झालेय तू अशी कशी तरीच दिसते आहेस उठ ना ग….
आज असे काय झालेय? काहीही कळत नाहीये,
ती तशीच चक्राऊन चालत मागे आली आणि घराताल्या एका भान्डी घासणार्या बाईला काकूने सखीला अंघोळ घालायला सांगितली, मग काकुच्या लक्षात आले कि हिच्याकडे कोरडे कपडे नसतील थोडेसे चिडचीडतच तिने तिच्या ७ वर्षाने मोठ्या असलेल्या मुलीचे जुने कपडे सखीला दिले, सखीची अंघोळ झाली, मनात प्रचंड गोंधळ काय चालले आहे काही काळात नव्हते,
राग, चिडचिड , रडू सगळेच येत होते पण का काही कळत नाहीये,
ताईने परत खेळायला नेला पण सखीच मन बिलकुल लागत नव्हते, तिला आईकडे जावेसे वाटू लागले. रडू येत होते पण रडायचे कारण काय ? काय सांगायचे कुणी विचारले तर … म्हणून तिने आपले डोळे मिचकावून पाणी घालवले डोळ्यातले…
सखी वयवर्ष ६.५ -७ एक मस्त गोड मुलगी, शांत, आनंदी, दोन मोठ्या वेण्या घालणारी, मोठे सुंदर डोळे असलेली, जात्याच शहाणी, समंजस आणि प्रचंड चिकित्सक. आज तिची आई ४ वर्षाच्या भांडणाला कंटाळून हे जग सोडून तिच्या छोट्या छकुलीला सोडून खूप लांब निघून गेली होती, भांडण नशिबाशी, आईला कॅन्सर झाला होता सखीच्या बाबांनी शक्य तेवढे प्रयत्न केले पण कसाबसा ८ वर्षाचा संसार करून त्यांची सहचारिणी निघून गेली, त्यांच्या पदरात तिची आठवण टाकून…
आई..ग्ग...अशी वेळ खरच
आई..ग्ग...अशी वेळ खरच कुठल्याही मुलांवर कधीही येऊ नये.