शीर्षक वाचून संध्यानंद मधील बातमी तर वाचत नाही ना, असा फील आला ना.
पण बातमी खरी आहे, पक्की आहे. जवळच्याच एकाच्या अनुभवातील आहे.
माझ्या घराजवळच राहणारा, माझा ऑफिसमधील मित्र. गेल्या शनिवारच्या रात्री अचानक घरी आला आणि म्हणाला, "रुनम्या एका दिवसासाठी तुझा फोन मिळेल का?"
फोन ??? मी किंचाळलोच !!
ते सीआयडी मालिकेत नाही का साध्या गणवेषातील दया, अभिजीत, एसीपी प्रद्युमन वगैरे आपली ओळख उघड करतात तेव्हा समोरचे लोक "सीआयडी!!" करत दचकतात. बस्स सेम त्याच टाईपमध्ये.
आणि साहजिकच आहे म्हणा, एकवेळ एखाद्याला आपल्या बॅंक अकाऊंटचे डिटेल आपण सहज सांगून जाऊ, पण फोन कोणाच्या हातात देताना मात्र शंभर वेळा विचार करू.. तो जेव्हा हरवतो तेव्हा किती हजारांचा फटका बसला हा विचार नंतर मनात येतो, त्या आधी फोनसोबत काय काय गेले आणि ते आता कोणाच्या हातात पडेल, त्याचा तो दुरुपयोग कसा करेल याचीच चिंता जास्त सतावते.. जणू फोन नव्हे आपला जीव अडकलेला जादूचा पोपटच असतो तो.
"दे ना यार, फक्त एका दिवसासाठीच हवाय.. तू तोपर्यंत माझा वापर.." माझी मनस्थिती ओळखून मित्र म्हणाला.
तसेही त्याला आपला फोन मला द्यायला काय हरकत होती म्हणा!.. ईसवीसन स्मार्टफोनपुर्व ६ वर्षे काळातील कसलासा दगडी मोबाईल तो वापरत होता. त्याचा मी काही दुरुपयोग करायचा ठरवलेच तरी रिंगटोन बदलणे वा चुकीचा अलार्म सेट करणे यापलीकडे फारसा खोडसाळपणा करणे शक्य नव्हते.
गेले दीड ते दोन वर्षे एकाच तालासुरात वाजणारी त्याची रिंगटोन पुर्ण ऑफिसात चर्चेचा विषय होती. ना कॅमेरा, ना म्युजिक प्लेअर, ना ईंटरनेट, ना व्हॉटसप., बोलण्याव्यतिरीक्त वापरशून्य असलेली ती वस्तू मोबाईल फोनच्या गोंडस नावाखाली वापरून तो आपल्या दैनंदिन जीवनातल्या भौतिक आणि सामाजिक गरजा कश्या पुर्ण करतो हे अख्या ऑफिसला पडलेले एक कोडे होते !.
तसे नाही म्हणायला त्याच्या ईतिहासात डोकावले असता, कॉलेजात असताना, त्याने आपला पहिला फोन म्हणून नोकिया एन-७३ तब्बल २५ हजारांना खरेदी केल्याच्या आठवणी सापडतात. पण तो फोन घेतल्यानंतर अल्पावधीतच त्या फोनचे ७-८ हजारांनी उतरलेले खरेदीमूल्य, हा धक्का त्याला सहन झाला नव्हता. आज एखाद्या फोनची किंमत पंचवीस हजार आहे, तर उद्या वीस हजार, तर परवा पंधरा हजार, यालाच एकमेव शाश्वत सत्य तो समजू लागला होता. त्यामुळे कुठल्याही महागड्या फोनमध्ये पैसे आणि मन न गुंतवता, ‘जुनं फोन तेच सोनं’ म्हणत स्मार्ट फोन पासून नेहमी दूर राहत होता.
पण .. मग .. आज.. अचानक.. त्याला स्मार्टफोनची काय गरज पडली असावी?
तर,
उद्याच्या दिवशी, म्हणजे रविवारी, त्याला एका मुलीला लग्नासाठी म्हणून भेटायला जायचे होते. भेट घराबाहेरच कुठल्याश्या मॉलमध्ये होणार होती आणि त्याला सोबत शायनिंग मारायला म्हणून माझा स्मार्टफोन हवा होता.
आता माझा फोन देखील फार काही महागडा आणि अत्याधुनिक होता अश्यातला भाग नाही, पण त्याच्या दोनचार हजाराच्या स्मार्टलेस दगडी फोन पेक्षा कित्येक पटींनी सरस होता. स्मार्ट होता. म्हणून त्याला तो सोबत हवा होता, ज्यामागे कारणही तसेच होते.
तर झाले असे होते, आदल्या रविवारी देखील तो असाच विवाहेच्छुक बनून एका मुलीची भेट घ्यायला गेला होता. आलिशान हॉटेल, भारीतले कपडे, गळ्यात हलकासा टाय, त्यावर शिंपडलेले ऊंची अत्तर, हातापायात गोळे यावेत ईतक्या वजनाचे ब्रांडेड घड्याळ आणि पादत्राणे.. सारे काही समोरच्याला, स्सॉरी समोरचीला, ईम्प्रेस करण्यासाठी सेट होते.. पण काहीही एक्स्प्रेस करायच्या आधीच, अचानक त्याचा फोन वाजला आणि क्षणार्धात सारे फुस्स. जणू काही आतापर्यंत जे काही ऊंची ऊंची होते तो सारा दिखावा होता आणि त्याची खरी लायकी त्याच्या फोनने दाखवली होती.
दुसर्याच दिवशी त्या मुलीने आपली नापसंती कळवली आणि खोदून खोदून कारण विचारण्यात आल्यावर आज अखेर तिने स्पष्टच सांगितले होते की, "नो स्मार्ट फोन मीन्स नो स्मार्ट पर्सन !" खेळ खल्लास!!
या आधी आमच्या ऑफिसात कैकवेळा दोन्ही बाजूने ही चर्चा झाली होती.
* पहिली बाजू - जे स्मार्टफोन वापरतात ते स्मार्ट असतात ‘किंवा’ जे स्मार्ट असतात ते स्मार्टफोन वापरतात.
* दुसरी बाजू - जे स्वत: स्मार्ट असतात त्यांना स्मार्टफोन वापरायची गरज नसते ‘किंवा’ जे स्वत: स्मार्ट नसतात त्यांना स्मार्टनेससाठी फोन स्मार्ट वापरावे लागतात.
मी नेहमी या चर्चेत तटस्थ राहायचो आणि हा मित्र अर्थातच दुसर्या बाजूने एकटाच लढायचा.
तो एकटा लढू शकायचा कारण ऑफिसच्या ईतर कामात तो दाखवत असलेल्या स्मार्टनेसबद्दल कोणालाही शंका घ्यायचे कारण नव्हते ईतका तो चोख होता. ईतका तो स्मार्ट होता.
पण आज मात्र कुरुक्षेत्रावरच्या लढाईत हेच युद्ध तो स्वत:चा बचाव करायची संधीही न मिळता हरला होता.
फक्त फोन स्मार्ट वापरत नसल्याने ईतर सर्व गोष्टी नजरेआड करत त्याच्यातील स्मार्टनेसवर शंका घेत नाकारला गेला होता.
आणि म्हणूनच त्याने ठरवले होते की उद्याच्या पहिल्या भेटीत मुलीला आपला खरा फोन न दाखवता त्या आधी तिला आपले खरे रूप, जे पुरेसे स्मार्ट आहे, ते दाखवावे आणि त्यानंतरच आपण कोणता फोन वापरतो हे उघड करावे.
अर्थात, यात तो त्या मुलीची कुठलीही फसवणूक करत नसल्याने मी त्याला माझा फोन द्यायचे कबूल केले आणि त्यानुसार त्यांची ती भेट सुखरूप पार पडली.
आता माझ्या त्या फोनच्या पायगुणाने त्याचे लग्न जमले की नाही हा या धाग्याचा विषय नाहीये, म्हणून ते तुर्तास गुलदस्त्यात.
तसेच, असे मित्राचा फोन वापरून पहिल्या भेटीत मुलीपासून आपल्याबद्दलची एखादी गोष्ट लपवणे ही फसवणूक तर नाही ना, या प्रकारची चर्चा देखील इथे शक्य असल्यास टाळा..
आणि एवढेच सांगा, विवाहेच्छुक मुलगा वा मुलगी फोन कोणता वापरतो / वापरते यावरून त्यांच्या विषयी अंदाज बांधणे हे कितपत योग्य आहे? तीस-पस्तीस हजाराचा फोन घेऊन त्यावर दिवसातले अडीज तास कॅन्डी क्रश व व्हॉटसप व्हॉटसप खेळत बसणारे, आणि त्यातील हाय मेगापिक्सल कॅमेरा वापरत तासाला चार सेल्फी काढणारे, यांचा स्मार्टनेसचा दर्जा तो असा काय असतो?
- टिंब टिंब ऋन्म्या
>>हातापायात गोळे यावेत ईतक्या
>>हातापायात गोळे यावेत ईतक्या वजनाचे ब्रांडेड घड्याळ>> ते घड्याळ विकून त्याबदल्यात स्मार्टफोन घ्यायची आयडिया मित्राला दिली नाहीत? काय उपयोग असतो हल्ली घड्याळाचा? फोनमध्येच सगळं काही असतं.
सभोवतालच्या परिस्थितीवर
सभोवतालच्या परिस्थितीवर खुसखुशीत आणि नर्मविनोदी भाषेत टीका टिप्पणी करण्याची तुमची शैली छान आहे.
वाचायला मजा येते. लिहित राहा.
सायो, घड्याळ हे खालील दोन
सायो,
घड्याळ हे खालील दोन गोष्टींसाठी घातले जाते.
१) वेळ बघणे
२) शायनिंग मारणे
आता,
१ अ) मोबाईल सुद्धा वेळ दाखवतो हे कबूल, पण त्यासाठी तो खिशातून काढावा लागतो, घड्याळातली वेळ बघण्यासाठी हातावर एक तुच्छ कटाक्ष टाकणेही पुरेसे असते.
१ ब) जर आपली वेळ खराब असेल तर मोबाईलची बॅटरी संपली असण्याची शक्यता असते, जे घड्याळाच्या बाबतीत सेल संपलाय असे सहसा होत नाही.
२ अ) मोबाईल सुद्धा शायनिंग मारायच्या उपकरणांमध्ये येतो पण ते घड्याळाला रिप्लेस करू शकत नाही. त्यांच्या जागा ठरलेल्या आहेत.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
२ ब) शौक बडी चीज है.! माझ्या एका मित्राला गॉगलची आवड आहे, तर तो बरेचदा ऑफिसमध्येही गॉगल लावून वावरतो.
असो, माझे स्वतःचेच वैयक्तिक मत हे असे असल्याने मी मित्राला आपण म्हणता तसा सल्ला नाही दिला.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
असुफ, शुक्रिया![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान लेख
छान लेख
ऋन्मेऽऽष, च्यायला, स्मार्टफोन
ऋन्मेऽऽष, च्यायला, स्मार्टफोन नाही तर मग तो नवरा म्हणून कटाप ...? मित्राला सांगा बालंबाल बचावला आहेस. पार्टी घ्या त्याच्याकडून उकळून चांगली.
आ.न.,
-गा.पै.
अगदी बरोबर आहे त्या मुलीच,
अगदी बरोबर आहे त्या मुलीच, जो स्मार्ट फोन नाही वापरु शकत तो काय खाक त्या मुलीची काळजी घेऊ शकेल?
ऋन्मेऽऽष, च्यायला, स्मार्टफोन
ऋन्मेऽऽष, च्यायला, स्मार्टफोन नाही तर मग तो नवरा म्हणून कटाप ...? मित्राला सांगा बालंबाल बचावला आहेस.
:खिखी:
अगदी खरे.
माझे तर स्मार्ट फोन वापरणार्यांबद्दलचे अनुभव फारसे चांगले नाहीत. ९८ टक्के लोक आपले सतत आपल्या स्मार्ट फोनकडे बघत असतात, आजूबाजूच्या लोकांकडे लक्षच नसते!
जो स्मार्ट फोन नाही वापरु शकत तो काय खाक त्या मुलीची काळजी घेऊ शकेल?
जास्त शक्यता अशी आहे की तो स्मार्ट फोन वापरत बसेल नि बायकोकडे लक्षपण देणार नाही. फार तर फार व्हाट्स अॅप करेल तिच्याशी!
फाटा क्र. १ ते फ़ोनचं असू
फाटा क्र. १
ते फ़ोनचं असू दे.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
त्या असुफ उर्फ़ अमितला थ्यानकू ऐवजी शु क्रिया का म्हटल आहे?
दीड मायबोलीकर फाटा क्रमांक 1
दीड मायबोलीकर फाटा क्रमांक 1 ची नोंद घेण्यात आली आहे. स्वतंत्र धाग्यात त्याचे स्पष्टीकरण देण्यात येईल. सोबत तो धागा सुचवल्याचे श्रेयही तुम्हाला देण्यात येईल.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
.... फाटा क्रमांक 2 च्या प्रतीक्षेत दोन टक्क्यांचा ऋन्मेष
- टिंब टिंब ऋन्म्या च्या ऐवजी
- टिंब टिंब ऋन्म्या
च्या ऐवजी तु खुसखुशीत खसखस पिकवणारा ऋन्म्या असे लिहीत जा....
तुझे असे काही लेखन मस्त असते !
लेख आवडला. छान आहे.. स्मार्ट
लेख आवडला. छान आहे.. स्मार्ट फोन च्या काळात मुली,मुलगा स्मार्ट फोन वापरत नाही (? )म्हणून नकार द्यायला लागल्या!!!
केवळ ह्याच कारणाने नकार देणे म्हणजे आश्चर्यच आहे!
गा. पै... प्रतिसाद आवडला. अगदी सहमत.
अवांतर : मुलीच्या नकाराचे कारण समजल्यावर,मुलीचे पालकही काहीच म्हटले नसतील? !
लेख आवडला. छान आहे.. स्मार्ट
लेख आवडला. छान आहे.. स्मार्ट फोन च्या काळात मुली,मुलगा स्मार्ट फोन वापरत नाही (? )म्हणून नकार द्यायला लागल्या!!!
केवळ ह्याच कारणाने नकार देणे म्हणजे आश्चर्यच आहे!
गा. पै... प्रतिसाद आवडला. अगदी सहमत.
अवांतर : मुलीच्या नकाराचे कारण समजल्यावर पालकही काहीच म्हटले नसतील? !
नकार वगैरे नाही पण जरा
नकार वगैरे नाही पण जरा विचीत्र नक्कीच वाटेल. एक दोन भेटीत नीट निरीक्षण करुन याची कारणे शोधण्याचा प्रयत्न केला जाईल. (स्वतः नॉकीया ३३१० वापर आणि त्यावर काळा पांढरा 'स्नेक' गेम खेळ रे बाबा, पण उद्या बायकोला 'काही नकोय तुझी ती स्मार्ट्फोन आणि व्हॉटसअॅप थेरं' म्हणालास तर काय करायचे?
)
किति चन्गल मनुस!
किति चन्गल मनुस!
बाबा रे. लग्न होण्याआधी लेख
बाबा रे.
लग्न होण्याआधी लेख पाडला असतास तर..
उगाच २ आयफोन ३ अँड्रोईडफोन घेण्याचा खर्च वाचला असता. वर जीवन सुखी झाले असते ते वेगळे.
दुरुस्त आये पर देर से आये
भविष्यवाणी : एका मुलाला
भविष्यवाणी : एका मुलाला माबोवर शेकड्यांनी धागे काढतो म्हणून नकार आला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ऋ, हे खरं असेल तर खरच विचित्र
ऋ, हे खरं असेल तर खरच विचित्र आहे.
(असला फोन वापरणारा तो मुलगा आणि म्हणुन त्याला लग्नाला नकार देणारी मुलगीही :-P)
भविष्यवाणी : एका मुलाला
भविष्यवाणी : एका मुलाला माबोवर शेकड्यांनी धागे काढतो म्हणून नकार आला +१११११११
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
:
शाहिर
शाहिर![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
या धाग्याच्या विषयात खूप सारे
या धाग्याच्या विषयात खूप सारे सूप्त पोटेन्शियल आहे....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पण मी गप्प बसणारे.
आपले काय? आता वय झालय... तिकडे कुणाचे काही का होईना... नकार मिळूदे नैतर होकार मिळूदे...!
ऋन्मेऽऽष छान लिहिलयस..
ऋन्मेऽऽष छान लिहिलयस..
मुलीचा निर्णय विचित्र आहे खरा. पण तुझा मित्र पण विचित्रच म्हणायला पाहिजे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आपले काय? आता वय झालय...
आपले काय? आता वय झालय... तिकडे कुणाचे काही का होईना... नकार मिळूदे नैतर होकार मिळूदे...! >> limbutimbu
![00020468.gif](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u31605/00020468.gif)
अस झालं असेल- त्या मुलीच्या
अस झालं असेल- त्या मुलीच्या मनातील विचार-
"कपडे, घड्याळ आणि ओव्हर ऑल तरी बरा दिसतोय. पण मग स्मार्ट फोन नाही हे कसे काय? की मग आहे पण इथे आणला नहिये. तर मग का आणला नाहीये? अशी लपवा लपवी का? का वापरता येत नाही? पण मग सांगितलेली डिग्री तरी खरी आहे का?
परवा त्या अमुक तमुक मैत्रिणीच्या मैत्रिणीच्या भावाला जॉब इन्टरविव्ह मधे तुमच्या कडे स्मार्ट फोन नाही तर तुम्ही सॉ.टेस्टर साठी अपात्र आहात अस सांगुन नाकारण्यात आल. तो हाच तर नसेल? कारण आजच्या जमान्यात २-३ हजारात मिळणारा स्मार्ट फोन नाही यावर विश्वास नाही बसत. जावुदे सगळच संशयास्पद आहे. सरळ नकार द्यावा."
निरा: एक्दम सहमत विचार फ्लो
निरा: एक्दम सहमत विचार फ्लो शी.
Nira
Nira![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
>>विवाहेच्छुक मुलगा वा मुलगी
>>विवाहेच्छुक मुलगा वा मुलगी फोन कोणता वापरतो / वापरते यावरून त्यांच्या विषयी अंदाज बांधणे हे कितपत योग्य आहे? >>
यात योग्य अयोग्य असे काही नाही. मुळात केमिस्ट्री जमली नाही. फोनच्या चॉइसवरुन लाइफस्टाइल बाबतच्या अपेक्षा जुळत नाही हे ही जाणवले असेल. बस्स! नकार दिला इतकेच. केमिस्ट्री जुळतेय असे वाटले असते तर कदाचित स्मार्ट फोन का वापरत नाही हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला गेला असता. अर्थात तरीही नकार आलाच नसता असे नाही.
अहो रुंन्मेश भाई, मुलीला
अहो रुंन्मेश भाई, मुलीला मुलगा आवडला नव्हता म्हणुन तिने नकार दिला इतकी सरळ गोष्ट आहे.
पण पुर्वी जसे पत्रिका जमत नाही हे खोटे कारण सांगुन नकार कळवला जायचा तसा इथे त्या मुलीने तुमच्या मित्राच्या मन दुखवले जाणार नाही असे काहीतरी चमत्कारीक कारण दिले.
मलातर त्या मुलाच्या
मलातर त्या मुलाच्या स्मार्टफोन न वापरण्यात काहीच गैर वाटत नाही. एखादी गोष्ट वापरायची कि नाही हे त्या गोष्टीची गरज आहे कि नाही त्यावर अवलंबून आहे; न कि ती गोष्ट परवडते किंवा किती लोक ती गोष्ट वापरतात.
स्मार्टफोन वापरण्याचा स्मार्टनेस शी दुरान्वयेही संबंध नसतो, (माझे मत.) तसेही तो वापरणे अजिबात अवघड नसते. फक्त थोड्या सरावाची गरज आहे.
प्रथम त्या मुलीचे आश्चर्य
प्रथम त्या मुलीचे आश्चर्य वाटले. सहानुभुती पुर्णपणे मुलाला मिळेल असे लिखाण आहे (ते मित्र म्हणुन अगदि सहज आहे) पण कदाचीत अजुन ही काही कारणे असतील असा विचार करुन बघा.
जे वाटले तेच कारण सांगुन लग्नाला नकार दिलाय त्या मुलीने... विचार आणि आचार यात तफ़ावत नाही जाणवत. जर हेच आणि हेच एकमेव कारण असेल तर तुमच्या मित्राला मुलीशी परत संपर्क करायला सांगा. स्मार्ट फोन का नाही वापरत याचा खर कारण सांगायला सांगा. अर्थात बाकिचे सगळे जुळत असेल तर.
अरे लोकहो, ही बातमी काही
अरे लोकहो,
ही बातमी काही दिवसांपूर्वी पेपर मध्ये आली होती. की स्मार्टफोन वापरत नसल्यामुळे मुलीने नकार दिला. ( टाईम्स ऑफ इंडिया किंवा एनडीटिव्ही वर मी ही बातमी वाचली आहे.) आणि ती मुंबईतली नव्हती हे मला आठवत आहे.
ऋन्मेशने ती बातमी उचलून त्यात स्वतःचा मित्र आणून त्याला कथेची फोडणी देऊन ही चर्चा चालवली आहे. तुम्ही पण ...
असो!
Pages