'हायवे' हा उमेश कुलकर्णी दिग्दर्शित व गिरीश कुलकर्णी लिखित मराठी चित्रपट येत्या २४ जुलै रोजी प्रदर्शित होत आहे. श्री. सुनील बर्वे यांची या चित्रपटात एक महत्त्वाची भूमिका आहे. 'आत्मविश्वास', 'लपंडाव', 'अस्तित्व', 'आई', 'आनंदाचं झाड', 'तू तिथं मी', 'निदान' अशा गाजलेल्या चित्रपटांमधून, अनेक टीव्हा मालिकांमधून आणि नाटकांमधून गेली पंचवीस वर्षं त्यांचा अभिनय वाखाणला गेला आहे.
'हायवे'च्या प्रदर्शनानिमित्त श्री. सुनील बर्वे यांच्याशी साधलेला संवाद -
’हायवे’मधल्या तुमच्या भूमिकेबद्दल सांगाल का?
’हायबे’मध्ये माझी भूमिका आयटी-क्षेत्रात खूप वरच्या पदावर काम करणार्या एका व्यक्तीची आहे. या चित्रपटात अनेक महत्त्वाच्या व्यक्तिरेखा आहेत आणि त्यांचा एकमेकांशी संबंध आहेच असं नाही. हे सगळे एका प्रवासाला निघाले आहेत. त्यांच्यातला प्रत्येकजण त्यांच्या त्यांच्या दैनंदिन आयुष्याच्या रहाटगाडग्यात अडकलेला आहे. त्यांना स्वत:कडे पाहण्यास वेळच नाहीये. माझी जी व्यक्तिरेखा आहे, तिलाही स्वत:च्या आत डोकावून पाहायला सवड नाही. त्याच्या कामाचे रोजचे आठ-दहा तास हे फक्त कागदावर आहेत. पण प्रत्यक्षात मात्र चोवीस तास तो ऑफिसच्या कामात किंवा कामाच्या विचारांत गढलेला आहे. आपल्या पदाबद्दल, ऑफिसमधल्या कामगिरीबद्दल तो सतत धास्तावलेला आहे. आयुष्यातला शांतपणा तो पूर्ण गमावून बसला आहे. त्याच्या या व्यग्रतेमुळे अवतीभवती असलेल्या सुंदर गोष्टी त्याला दिसतच नाहीत. तर अशी ही माझी व्यक्तिरेखा ’हायवे’वर प्रवासाला निघाली आहे.
हल्ली शहरी जगणं फार धकाधकीचं, कर्णकटु असं झालं आहे. कर्कश आवाज, जगण्यासाठीची स्पर्धा आणि धावपळ यांचा ताण असह्य असतो. ’हायवे’मधली भूमिका साकारताना काही ओळखीच्या जागा सापडल्या का?
माझा आयटी-क्षेत्राशी संबंध नाही. मी कधी नोकरी केली नाही. नोकरीतल्या ताणाचा, स्पर्धेचा मला काहीच अनुभव नाही. त्यामुळे दिग्दर्शक, लेखक यांच्या सांगण्यानुसार आणि माझं निरीक्षण आणि वाचन यांच्यावर विसंबून मी अभिनय केला. पण मी त्या भूमिकेशी समरस होऊ शकलो, मलाही जाणवतं की, आपण खूप कर्णकटु असं आयुष्य जगत आहोत. मी ज्या अभिनयक्षेत्रात आहे, त्या व्यवसायातही ताणतणाव आहेत. मी काम संपवून घरी जातो, तेव्हा काम बाजूला ठेवून मी पूर्णपणे स्वत:बरोबर, घरच्यांबरोबर कधी असतो, हे आता मलाही शोधावं लागेल. एकही निवांत क्षण मला मिळत नाही आणि याबाबतीत मी निश्चितपणे त्या व्यक्तिरेखेला समजून घेऊ शकतो.
१९८९ साली ’आत्मविश्वास’ हा तुमचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला. गेल्या वर्षी चित्रपटक्षेत्रातल्या तुमच्या कारकिर्दीला पंचवीस वर्षं पूर्ण झाली. या काळात ’लपंडाव’, ’आनंदाचं झाड’, ’तू तिथं मी’, ’दिवसेंदिवस’, ’आई’ अशा अनेक दर्जेदार चित्रपटांमध्ये तुमच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. त्यावेळी प्रेक्षकांना काहीतरी वेगळं आणि उत्तम देणारे हे चित्रपट होते. गेल्या काही वर्षांत मराठीत तरुण दिग्दर्शकांनी पुन्हा एकदा वेगळी वाट चोखाळण्याचा प्रयत्न केला आहे. या नव्या लाटेतल्या चित्रपटांमध्ये आणि तुम्ही यापूर्वी भूमिका केलेल्या चित्रपटांमध्ये तुम्हांला काही फरक जाणवतो का?
तू ज्या चित्रपटांचा उल्लेख केलास, ते तयार होत असताना जागतिकीकरणाला नुकतीच सुरुवात होत होती. परदेशी चित्रपट आपल्यापर्यंत अगदी मर्यादित स्वरूपात पोहोचला होता आणि म्हणून या चित्रपटाचा आपल्यावर फारसा प्रभाव नव्हता. त्यामुळे झालं काय की, आपण अनेक वर्षं चित्रपटाची भाषाच बदलली नाही. अगदी मोजके अपवाद वगळता आहे त्याच पद्धतीनं मराठी चित्रपट बनत राहिले. अगदी अभिनयसुद्धा ठरावीक साच्यातला असायचा. नवनवे दिग्दर्शक पुढे येत होते, पण तेसुद्धा ’मेनस्ट्रीम’ चित्रपटातच गुरफटत होते. १९९५ सालानंतर मात्र मराठी चित्रपटांमध्ये खूप मोठा बदल झालेला मला दिसतो. हे मराठीतच झालं असं नाही, हिंदी चित्रपटांमध्येही मोठा बदल घडून आला. अगोदर केवळ फॅंटसीवर विसंबणारे खोटे चित्रपट निघत होते, ते आता वास्तववादाकडे झुकू लागले. गोष्ट सांगण्याची पद्धत बदलली. ती अधिक खरी झाली. गेल्या दहा वर्षांत तर हा फरक मराठीमध्ये खूपच दिसून येतो. अतिशय आशयगर्भ आणि तांत्रिकदृष्ट्या सकस असे चित्रपट मराठी भाषेत तयार झाले आहेत, होत आहेत.
तांत्रिक फरकांबद्दल बोलायचं झालं तर, हिंदीत आणि मराठीत अनेक चित्रपट आता डिजिटल कॅमेर्याने चित्रित केले जात आहेत. ’वळू’, ’विहीर’, ’देऊळ’ हे उमेश कुलकर्णी यांचे चित्रपट ३५ मिमीवर चित्रित केले होते, ’हायवे’ डिजिटल कॅमेर्यानं चित्रित केला आहे. तुम्हांला दोन्ही प्रकारच्या चित्रीकरणांचा अनुभव आहे. दोन्ही माध्यमांचे फायदे-तोटे आहेत. या दोन वेगवेगळ्या माध्यमांबद्दल तुम्हांला काय वाटतं?
दोन्ही माध्यमांचे आपापले फायदे आणि तोटे आहेतच. फायद्यांबद्दल बोलायचं झालं तर, पूर्वी रीटेक करताना फिल्म 'एक्स्पोज' होते आहे, याचं मोठं ओझं दिग्दर्शक, छायालेखक, कलाकार अशा सगळ्यांच्याच मनावर असायचं. आता हे ओझं कमी झालं आहे. पूर्वी एका दृश्याचे चार रीटेक झाले, तर त्यातून मिळेल तेवढं घ्या आणि उरलेलं क्लोज-अपमधून मिळवा, असा प्रकार असायचा, कारण फिल्म मोजकी उपलब्ध असायची. आता जर तीन वेगवेगळ्या कोनांतून मास्टरशॉट घ्यायचे असतील किंवा तीन वेगवेगळ्या कोनांतून क्लोज-अप घ्यायचे असतील, तर खर्च वाढण्याचा ताण दिग्दर्शकाच्या मनावर नसतो.
डिजिटल तंत्रज्ञान उपलब्ध झाल्यामुळे अजून एक गोष्ट चांगली झाली, ती म्हणजे कलर करेक्शनसारख्या तांत्रिक बाबतींतही चांगला फरक पडला. पूर्वी ही खूप खर्चिक बाब होती. मराठी निर्मात्यांना हा खर्च परवडत नसे. पण आता अनेक तांत्रिक गोष्टी सुकर, सोप्या झाल्या आहेत आणि दिग्दर्शकाला, निर्मात्याला याची मदतच होते. पण असंही होतं की, सोपं झालं आहे म्हणून अनेक क्लोज-अप, मास्टरशॉट घेतले जातात. संकलक मग ठरवतो चित्रपटात त्यांतलं काय ठेवायचं ते. पण असंही होतं की, पहिल्या ’टेक’ला एखादं दृश्य जितक्या उत्कटतेनं साकारलं होतं, तितकी उत्कटता क्लोज-अपच्या पाचव्या ’टेक’ला नसू शकते. मग असा फरक असलेले शॉट एकत्र जोडले गेले की डबिंग करताना कलाकाराला आणि दिग्दर्शकाला जास्त काळजी घ्यावी लागते, डबिंग करताना अशा काही गोष्टी सुधाराव्या लागतात.
’हायवे’ हा चित्रपट बराचसा गाड्यांमध्ये चित्रित केला गेला आहे आणि त्यामुळे त्यात समीपदृश्यंच अधिक आहेत. त्यामुळे अभिनय करताना तुम्हांला काही काळजी घ्यावी लागली का?
सतर्कता पाळावीच लागली, कारण गाडीत सतत दोन कॅमेरे असत. मला गाडीत फक्त बसून राहायचं नव्हतं, गाडी चालवायचीही होती. त्यामुळे समोर खड्डा आला, तर तो चुकवून जाणं मला शक्य नव्हतं. खड्ड्यामुळे, स्पीडब्रेकरमुळे कॅमेरा हलला, तर ते संपूर्ण दृश्य मला पुन्हा करावं लागायचं. त्यामुळे अगदी सपाट रस्त्यावर चित्रीकरण करण्याचा आमचा सारखा प्रयत्न असे. चित्रीकरण करताना अनेक गोष्टींकडे लक्ष द्यावं लागे. प्रकाशाची दिशा, ट्रॅफिक हेतर होतंच. पण कॅमेरा अशा जागी असावा की जेणेकरून मला गाडी चालवताना अडथळा येऊ नये, रेअर-व्ह्यू आरशात मागच्या गाड्या स्पष्ट दिसाव्यात, याकडेही लक्ष द्यावं लागे. शिवाय नुसतं वाक्य बोलून चालत नव्हतं, कारण उमेशची ती पद्धत नाही. संवादांमधून ती व्यक्तिरेखा उभी राहणं हे उमेशला फार महत्त्वाचं वाटतं. गिरीशने लिहिलेले संवादही खूप अर्थवाही असल्यानं त्यांचा योग्य तो परिणाम प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं, ही जबाबदारी होती. गाडी चालवताना मला असा अभिनय करायचा होता, जो अभिनय आहे, असं वाटता कामा नये. एकंदर जरा अवघड पण मजेदार असा हा अनुभव होता.
उमेश कुलकर्णी व गिरीश कुलकर्णी यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता?
उमेश हा आताच्या पिढीतला अतिशय हुशार आणि तंत्रज्ञानाचा यथायोग्य वापर करणारा असा दिग्दर्शक आहे. चित्रपटाची गोष्ट कशी सांगायची, याचं त्याला जबरदस्त भान आहे. गोष्ट सांगण्याची त्याची पद्धत खूपच रंजक आणि मस्त आहे. उमेश खूप बुद्धिमान आहे, पण महत्त्वाचं म्हणजे त्याची टीमसुद्धा तेवढीच हुशार आहे. गिरीश कुलकर्णी हा उत्तम लेखक त्याचा सहकारी आहे. गिरीशची संवादांची, पटकथेची जाण खूप प्रगल्भ आहे. ’विहीर’मध्ये हे खूप प्रकर्षाने जाणवतं. काय सुरेख चित्रपट आहे तो! ’देऊळ’, ’मसाला’, ’वळू’ हे चित्रपटही उत्कृष्ट लेखनाची उदाहरणं आहेत. 'मसाला' हा गिरीशने लिहिलेला चित्रपटही मला खूप आवडला होता. खूपच मस्त टीम आहे उमेश आणि गिरीश यांची आणि त्यांच्याबरोबर काम करण्याची मला अनेक दिवसांपासून इच्छा आणि उत्सुकता होती. ही उत्सुकता काही पूर्ण झाली नाही, कारण चार दिवसच मी त्यांच्याबरोबर चित्रीकरण केलं. त्यामुळे त्यांच्या पुढच्या चित्रपटातही काम करण्याची मला इच्छा आहे.
तुमच्या बाबतीत अनेकांचं असं म्हणणं आहे की, तुमच्या कामातला ताजेपणा, प्रामाणिकपणा सतत जाणवत राहतो, तुमचा अभिनय कायम उत्स्फूर्त असतो.
लेखकानं मला दिलेली वाक्यं मी मनापासून म्हणतो. एखाद्या दृश्यांचं चित्रीकरण करताना ’या सीनमध्ये मला तोडून टाकायचं आहे’ असा विचार मी चुकूनसुद्धा कधी करत नाही. अभिनय करताना मला कोणावर कुरघोडी करायची नसते. भूमिकेचा, व्यक्तिरेखेचा विचार करून माझा अभिनय मी प्रामाणिकपणे करतो.
'हायवे' येत्या २४ तारखेला प्रदर्शित होत आहे. त्यासाठी आपल्याला शुभेच्छा
हा संवाद अर्धवट पोस्ट झाला
हा संवाद अर्धवट पोस्ट झाला आहे का?
गप्पा छान आहेत. पण अचानक
गप्पा छान आहेत. पण अचानक संपल्या त्यामुळे बस्के म्हणत्ये तसं अर्धवट पोस्ट झालय की काय असं वाटलं.