श्री. सुनील बर्वे यांचा अभिनयक्षेत्रातला प्रवेश रंगभूमीवरून झाला. 'अफलातून', 'चारचौघी', 'श्री तशी सौ', 'वन रूम किचन', 'मोरूची मावशी', 'लग्नाची बेडी', 'हीच तर प्रेमाची गंमत आहे' अशा अनेक गाजलेल्या नाटकांमध्ये त्यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. अभिनयातील कारकिर्दीला पंचवीस वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्तानं श्री. सुनील बर्वे यांनी आपल्या 'सुबक' या संस्थेद्वारे 'हर्बेरियम' हा नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला. मराठी रंगभूमी गाजवलेल्या पाच नाटकांचं पुनरुज्जीवन त्यांनी केलं. प्रेक्षकांचा जबरदस्त पाठिंबा या नाटकांना मिळाला.
२०११ साली श्री. सुनील बर्वे यांनी या उपक्रमाबद्दल एक लेख लिहिला होता. २४ जुलै, २०१५ रोजी 'हायवे' प्रदर्शित होण्याच्या निमित्ताने हा लेख मायबोली.कॉमवर पुनर्मुद्रित करत आहोत.
१९ डिसेंबर १९८५ची रात्र. वेळ ८.३० वाजताची. स्थळ, दादरचं शिवाजी मंदिर. इथे ‘भद्रकाली’निर्मित विनय आपटे दिग्दर्शित, विक्रम भागवत लिखित ‘अफलातून’ या नाटकाचा पहिला म्हणजेच शुभारंभाचा प्रयोग झाला. हे माझं पहिलं व्यावसायिक नाटक. दिलीप कुलकर्णी, विनय आपटे, चंदू पारखी, किशोर भट यांसारख्या मुरलेल्या रंगकर्मींबरोबर या नाटकात काम करण्याची संधी मिळाली. या नाटकातला माझा रोल तसा महत्त्वाचा नव्हता. कॉलेज ग्रूपपैकी एक, पण नाटकात गाणी असल्यामुळे आणि त्यातल्या त्यात मी बरा गात असेन कदाचित म्हणून मुख्य गायकाची जबाबदारी माझ्यावर होती. माझं वय एकोणीस वर्षं. घरातून नाट्यक्षेत्राशी दुरान्वयेही तसा कोणाचा संबंध नाही. म्हणजे भक्ती बर्वे ही तशी माझी चुलत बहीण, पण आमच्या घरात तसं कोणालाच नाटकाचं वेड वगैरे नाही. उन्हाळ्याच्या सुट्टीत ‘लिट्ल थिएटर’चं एक- दोन महिन्यांचं शिबिर केलं, त्यातून एक मित्र म्हणाला, 'व्यावसायिक नाटक करणार का?' व्यावसायिक ,‘प्रायोगिक’, समांतर, यांतलं मला काही कळत नव्हतं. फक्त गाणी म्हणायची आणि जमतील तसे प्रयोग करायचे. परीक्षा वगैरे सगळं अॅडजस्ट होईल, या तत्त्वावर मी ‘हो’ म्हटलं. १० ऑक्टोबरला पहिल्यांदा तालमीसाठी लोअर परळच्या रेल्वेच्या वर्कशॉपमधल्या एका हॉलमध्ये तो शोधत शोधत पोचलो, संध्याकाळी सहा वाजता. साडेसहा वाजता तालीम सुरू होणार होती. माझ्यासारखी माझ्या वयाची बरीच मुलं तिथे होती. बरोबर साडेसहाच्या सुमारास दिलीप कुलकर्णी आले. मग एकापाठोपाठ एक सगळी मोठी माणसं आली. मग विनय आपटे, आनंद मोडक, विक्रम भागवत, चंद्रकांत मेहेंदळे, उद्धव देसाई अशी सगळी मंडळी समोर बसली आणि माझी ऑडिशन सुरू झाली. गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा दिल्या असल्यामुळे शिकलेलं एक गाणं म्हटलं. अगदी अंतरा अस्ताई वगैरे अगदी शिकल्याप्रमाणे. मग आनंद मोडक म्हणाला, 'आपण नाटक करणार आहोत, त्यामुळे एखादा भाव व्यक्त होईल असं गाणं गा'. मग ‘दयाघना’ जमतील तेवढे भाव ओतून म्हटलं आणि माझी निवड झाली.
पहिल्या प्रयोगाच्या दिवशी सगळं आठवत होतं. आनंदानं सांगितलं होतं, 'ह्या नाटकात वेस्टर्न स्टाईलची गाणी आहेत. मुरक्या, ताना नकोत. वेस्टर्न स्टाईलमध्ये जीव ओतून आणि थेट सूर लावून गा. नाट्यसंगीतातल्यासारखा गळा आणि आवाज किती हलतो त्याचं प्रात्यक्षिक नको दाखवूस.' हे सगळं लक्षात ठेवून प्रयोग चेपायचा असं मनाशी ठरवलं आणि तिसर्या बेलनंतर माझं गाणं म्हणत एन्ट्री झाली. तुडुंब भरलेलं प्रेक्षागृह, पण अजिबात डगमगलो नाही. प्रयोग उत्तम झाला. खूप कौतुकही झालं. माझ्या गाण्याचंही लोकांनी कौतुक केलं. खूप आनंद झाला.
तिथून हा प्रवास सुरू झाला तो आजतागायत. त्यानंतर ‘मोरूची मावशी’ या नाटकात ‘मोरू’ची म्हणजे प्रशांत दामलेच्या रोलची रिप्लेसमेंट करायला सुरुवात केली. या नाटकाचे प्रयोग करत असतानाच बी. एस्सी.चं शिक्षणही चालू होतं. गटांगळ्या खात का होईना, पण एकदाचा बी. एस्सीपण झालो. त्यानंतर मात्र निर्णय घेण्याची वेळ आली. नाटकातून, सिनेमातून अभिनय करत राहायचं की एखादी नोकरी धरून अत्यंत ठरलेलं असं आयुष्य जगायचं? ‘मोरूची मावशी’ करत असतानाच ‘चाळ नावाची वाचाळ वस्ती’, ‘अधांतरी’, ‘गजरा’ इत्यादी दूरदर्शन मालिकांमध्ये मी कामं केली होती. दिग्दर्शक सचिन यांचा ‘आत्मविश्वास’ हा चित्रपटही केला होता. त्यामुळे या काही वर्षांत अभिनयाची गोडी लागली होती. माझ्या कामात निश्चितच सुधारणाही होत होती. लोक मला आवर्जून बोलावत होते, त्यामुळे अर्थातच मी नोकरी न करता अभिनयच करत राहायचा निर्णय घेतला. तशी मी एक महिना ‘मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह’ म्हणून नोकरी केली पण, अं... हं... मजा येईना म्हणून दिली खुशाल नोकरी सोडून.
आता हे लिहिताना माझ्या या निर्णयाचं मला आश्चर्य वाटतं. कारण नोकरी लागल्या लागल्या काही वर्षं जिच्या प्रेमात पडलो होतो, तिच्याशी साखरपुडादेखील करून बसलो होतो मी. बरं, तेव्हा इतकी कामही नव्हतं माझ्याकडे. त्यावेळी सगळे चित्रपट मोठ्या स्टार्सना घेऊन होत. दूरदर्शन हे एकमेव चॅनल, ज्यावर मालिका आली तर तीसुद्धा फक्त तेरा भागांची. नाटक मिळालं तर ते चालेल न चालेल, कुणी सांगावं? त्यामुळे आत्तासुद्धा या वेळेच्या या निर्णयानं छाती धडधडते. नशिबानं पुढे चांगली नाटकं आणि सिनेमे मिळाले म्हणून, नाहीतर काय झालं असतंच देवालाच ठाऊक.
पण माझ्या निर्णयाला आश्चर्यकारक प्रतिसाद मिळाला तो माझ्या घरच्यांकडून. वडील म्हणाले, ‘‘काही वर्षं बघ प्रयत्न करून. नाहीतरी ग्रॅज्युएट आहेस, नोकरी मिळेल कुठेतरी.’’ आणि माझ्या सासर्यांनी तर मला धक्काच दिला. ते म्हणाले, ‘‘आता तू काहीतरी नक्की करून दाखवशील. धंद्यात वरखाली होतच असतं.‘‘ हे ऐकून खूप हुरुप आला आणि उत्तमच काम करायचं, सचोटीनं करायचं, पाट्या टाकायच्या नाहीत असं ठरवून जोमानं कामाला लागलो.
आज इतक्या वर्षांनी हे सगळं आठवताना खूप मस्त वाटतं. तसे हे दिवस मी इतक्या वर्षांत विसरलो होतो असं काही नाही. कारण माझं कधीही कौतुक झालं की, मी त्या दिवसांची आठवण काढतो. माझ्याकडे काय होतं, मी काय घेऊन आलो होत, आणि आज हे माझं इतकं कौतुक करतायत? गंमत वाटते. आणि म्हणूनच कदाचित लोक मला जे म्हणतात की, ‘अजूनही तो जमिनीवर आहे बरं का,’ ते त्याचमुळे असेल कदाचित. असो.
सध्या मी एका वेगळ्या भूमिकेत लोकांना दिसतोय. तो म्हणजे एका नाट्यनिर्मात्याच्या भूमिकेत. ‘सुबक’ ही माझी संस्था. सुबक म्हणजे नेटकं आणि सुबक म्हणजे सुनील बर्वे कलाकृती. मी अभिनेता होण्याचा निर्णय घेतल्यानंतर वेगवेगळे प्रोजेक्ट करण्याची स्वप्नं पाहिली, पण निर्माता होईन असं कधीच माझं स्वप्न नव्हतं.
या माझ्या संस्थेतर्फे मी एका वर्षाचा प्रकल्प करायचं ठरवलं. माझ्या २५ वर्षांच्या कारकिर्दीत मी अनेक नाटकांतून कामं केली. पण नेहमी जुन्या नाटकांचा विषय निघाला की सगळे त्या नाटकांविषयी अगदी भरभरून बोलायचे. पद्मा चव्हाणांच्या रश्मीविषयी (लग्नाची बेडी), डॉ. लागूंच्या आणि दत्ता भटांच्या ‘नटसम्राट’विषयी, भक्ती बर्वेंच्या ‘फुलराणी’, ‘अजब न्याय वर्तुळा’विषयी, काशीनाथ घाणेकरांच्या ‘लाल्या’विषयी (अश्रूंची झाली फुले), त्यांच्या ‘गारंबीच्या बापू’विषयी, आणि वाटायचं ही नाटकं आपल्याला कधी पाहायला मिळणार... मिळाली तरी त्यांची कामं कशी काय पाहता येणार? पण जर हीच नाटकं पुन्हा आली तर किती मजा येईल, एवढंच वाटून विषय थांबायचा. पण कोणीही ती नाटकं पुन्हा करायला धजावत नव्हतं. तरी त्यातल्या त्यात ‘लग्नाची बेडी‘, ‘नटसम्राट’, ‘फुलराणी’ ही नाटकं रंगभूमीवर वेगळ्या संचात पाहायला मिळाली. पण ‘गारंबीचा बापू’, ‘काळं बेट लाल बत्ती’, ‘गुंतता हृदय हे’, ‘वाहतो ही दुर्वांची जोडी’ यांसारखी अनेक नाटकं काही पाहता आली नाहीत. म्हणजे माझ्या अख्ख्या पिढीला ती पाहण्याचा योग आला नाही, किंवा माझ्यासारख्या नटांना अशा नाटकांत काम करता आलेलं नाही. मग वाटलं, का करून पाहू नयेत ही नाटकं? आणि म्हणून मी ही नाटकं पुन्हा करायचं ठरवलं. पण भांडवल कुठे होतं? ही गोष्ट साधारण २००७ सालची. अनेक निर्मात्यांना मी याबद्दल सुचवलं, पण कोणीही त्यात हात घालायला तयार होईना. म्हणजे मी काय करायचो, मुद्दाम जुन्या एखाद्या लोकप्रिय नाटकाचं नाव काढायचो आणि मग त्या नाटकाच्या आठवणीत सगळे रमले, म्हणजे ‘ओ हो हो काय काम करायचे घाणेकर! आधी त्यांचा आवाज ऐकू यायचा, की लोक टाळ्या वाजवायचे. मग विंगेत थोडे गाल आणि नाक चोळायचे, की ते लालबुंद व्हायचे. आणि मग टाळ्या थोड्या कमी झाल्या की एन्ट्री घ्यायचे, की पुन्हा टाळ्या. इमोशनल सीनला जर धक्का बसलाय असं दाखवायचं असलं, की बरोबर वरच्या स्पॉट लाइटकडे बघायचं आणि ओरडायचे, ‘म्हागोऽऽऽ’ की प्रेक्षक स्तब्ध. फँटॅस्टिक, जस्ट फँटॅस्टिक’, अशा गप्पा सुरू व्हायच्या. किंवा ‘सूर राहू दे’, ‘फुलराणी’तल्या मास्तरांच्या म्हणजे सतीश दुभाषींच्या कामाविषयी इतकं बोलायचे. त्यांतल्या गप्पिष्टांपैकी काही तर नक्कलसुद्धा करून दाखवायचे. जरा भट्टी गरम झाली असं दिसलं की, मी म्हणायचो, 'मग करूया ना ते नाटक? त्या तोडीचे नट नसतील कदाचित आमच्या पिढीत, पण करून बघायला काय हरकत आहे?' की सगळे लगेच बॅकफूटवर. झालं, थांबला विषय.
पण माझ्या मनातून काही केल्या तो विषय जात नव्हता. मग मीच ठरवलं, की आपणच का प्रोड्यूस करू नये एखादं नाटक? निर्मितीप्रक्रिया मी बर्यापैकी जवळून पाहिली होती. पण खरंच माझ्याकडे तितके पैसे नव्हते. कर्जाचं म्हणाल, तर घर घेतानासुद्धा कर्ज घ्यावं लागेल म्हणून मी सात-आठ वर्षं टाळत होतो. व्यवसायासाठी कर्ज घेणं अशक्य होतं. मग ठरवलं, जसं आपण स्वत:च्या म्हातारपणासाठी पैसे साठवतो, तसे या व्यवसायासाठी का साठवू नयेत? मग मात्र दोन वर्षं अगदी कंबर कसून कामाला लागलो आणि ठरवलं, की माझ्या कारकिर्दीच्या पंचविसाव्या वर्षात मी माझ्याकडून माझ्या प्रेक्षकांना; ज्यांनी मला या पंचवीस वर्षांत माझं कौतुक करून मला हुरूप दिला, वेळप्रसंगी माझा सत्कार केला, भेटवस्तू दिल्या, आवर्जून घरी नेलं, आशीर्वाद दिले, त्यांना आणि माझ्या पिढीतल्या नाट्यरसिकांना, ज्यांना ही नाटकं पाहायला मिळाली नाहीत, त्यांना ही नाटकं दाखवणार.
त्यावेळी मी ‘कळत नकळत’ आणि ‘असंभव’ या दोन मालिकांमध्ये काम करत होतो आणि वर्ल्डस्पेस सॅटेलाईट रेडिओच्या मराठी चॅनेलवर रेडिओ जॉकी म्हणून काम करत होतो. त्या चॅनेलचं नाव होतं ‘सुरभि.’ प्रत्येक आरजेला (रेडिओ जॉकी) त्याचा महिन्याभराचा प्लॅन आखावा लागायचा. महिन्यातून एखादीतरी मुलाखत मला करायची खूप इच्छा होती, पण दिवसरात्र चित्रीकरणात गुरफटलो असल्यामुळे दर महिन्याला ते जमायचंच असं नाही. त्या वर्ल्डस्पेसच्या ऑफिसला लागून एक मोठ्ठी गच्ची होती, जिथे बसून आम्ही क्रिएटिव्ह, कौटुंबिक, वायफळ अशा बर्याच गप्पा मारायचो. त्या गच्चीवर गप्पांच्या नादात मी बर्याच योजना आखल्या, पण वेळेअभावी सगळ्यांच पूर्णत्वास नाही नेऊ शकलो. त्या वर्षीच्या दिवाळीच्या विशेष भागांसाठी मी ठरवलं की, मी स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांची मुलाखत घेणार आणि हेही ठरवलं की, इथून पुढे जे जे योजेन, त्याचा पाठपुरावा करून करून ते पूर्ण करीन. त्या वर्षी खरंच माझ्या नशिबानं आणि मी निश्चय केल्यामुळे लताबाईंची मुलाखत मी घेऊ शकलो आणि मला खूप आनंद झाला. मी तेव्हाच ठरवलं की, आता नाटकांच्या या प्रोजेक्टच्या मागे लागायचं आणि म्हणूनच मी मागे लागून इतक्या नेटानं ‘हर्बेरियम’ हा माझा स्वप्नातला प्रोजेक्ट प्रत्यक्षात आणू शकलो.
थोडक्यात त्या प्रोजेक्टविषयी सांगतो. मी असं ठरवलं की, गेल्या २५ वर्षांत जी नाटकं रंगभूमीवर आली, तसलीच आणि माझ्या आणि माझ्यापुढच्या पिढ्यांनी त्यांविषयी फक्त ऐकलं असेल, अशीच नाटकं आपण करायची. पण अशातसुद्धा जी नाटकं पुन्हापुन्हा होऊ शकतात, उदाहरणार्थ, ‘ती फुलराणी’, ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘नटसम्राट’, ‘लग्नाची बेडी’ इत्यादी, ती नाटकं टाळावी (कारण ती होत राहतील). या नाटकांचं दिग्दर्शन आत्ताचे मराठी रंगभूमीवरील नावाजलेले दिग्दर्शक करतील, म्हणजे साधारण ज्यांची या क्षेत्रातली कारकीर्द माझ्याबरोबर सुरू झाली असेल. हेतू इतकाच, की त्यांनीसुद्धा ती नाटकं पाहिली नसतील किंवा जर पाहिली असली, तरी त्यांना ती परत त्यांच्या पद्धतीनं बसवता येतील. आणि म्हणून मी चंद्रकांत कुलकर्णी, विजय केंकरे, प्रतिमा कुलकर्णी, मंगेश कदम, गिरीश जोशी या दिग्दर्शकांना विचारायचं ठरवलं.
ही सगळीच नाटकं थोडी काळाच्या पडद्याआड गेलेली आणि जुन्या संदर्भांबद्दल असल्यामुळे कालबाह्य वाटण्याची एक भीती होती आणि सर्रास एखाद्या व्यावसायिक नाटकासारखे खूप प्रयोग होऊ शकणार नाहीत, म्हणून मी मोजकेच प्रयोग करायचे ठरवले.
कलाकार निवडीबद्दल मी असं ठरवलं होतं की, आताच्या परिचित चेहर्यांना घेऊनच ही नाटकं करायची. कारण गेली अनेक वर्षं नाटकांतून कामं करून मग वाहिन्यांच्या आगमनानंतर सर्व कलाकार मंडळी मालिकांमध्ये काम करण्यात व्यग्र झालीयेत, पण त्यांची मूळ आवड नाटकात काम करणं हीच आहे. मोजकेच प्रयोग असल्यामुळे वेळ काढणंही त्यांच्यासाठी सोपं होईल. कलाकारांना नाटकात काम करण्याचा आनंदही मिळेल आणि अशा कदाचित कधीही न होऊ शकणार्या नाटकांत जुन्या जमान्यातल्या एखाद्या मोठ्या कलाकारानं काम केलेली भूमिका करण्याचा आनंदही मिळेल.
खरंतर एकच नाटक करून मी थांबू शकलो असतो. पण दीडशे वर्षांच्या रंगभूमीच्या इतिहासातून एकच नाटक निवडणं कठीण झालं असतं, आणि त्यानं माझा हेतूही साध्य झाला नसता. शिवाय पु. ल. देशपांडे, आचार्य अत्रे, विजय तेंडुलकर, जयवंत दळवी वगैरे लेखकांप्रमाणेच इतर लेखकांना अभिवादन करण्याची आणि त्यांचं स्मरण करण्याची माझी इच्छा होती. पण मग तरीही अनेक वर्षं हा प्रकल्प सुरूच राहिला असता. मग ठरवलं की, एक वर्षभर हा प्रकल्प राबवायचा. प्रत्येक दिग्दर्शकाला एक नाटक करायला सांगायचं आणि त्याला ज्या लेखकाचं नाटक करावंसं वाटेल ते नाटक त्यानं करावं. पण त्याबरोबरच मी दिग्दर्शकांना हेही सांगितलं की, ते नाटक त्या काळाचं नावाजलेलं नाटक असावं. जेणेकरून आताच्या पिढीनं आपल्या वडीलधार्यांकडून त्याविषयी काहीतरी ऐकलं असेल व या पिढीला ते न पाहिलेलं, पाहण्याची उत्सुकता वाढेल.
मग मी सगळ्या दिग्दर्शकांना भेटून माझी ही कल्पना सांगितली आणि सगळ्यांनीच ती उचलून धरली. तरी त्या सगळ्यांना ही खात्री नव्हती की, मी हा प्रकल्प करू शकेन. आम्हा सगळ्यांची एक बैठक झाली. त्या बैठकीला चंद्रकांत कुलकर्णी, विजय केंकरे आणि गिरीश जोशी हे उपस्थित होते. प्रतिमा आणि मंगेश येऊ शकले नाहीत. त्या दिवशी मी सगळ्यांना त्यांच्या आवडीचं नाटक निवडायला सांगितलं. ही गोष्ट सप्टेंबर २००९ची. मला हा प्रकल्प जानेवारी २०१०मध्ये सुरू करायचा होता. जानेवारी महिन्याच्या तारखांची जमवाजमव सुरू झाली, पण कुठल्याच दिग्दर्शकाचा मला काही फोन आला नाही. त्यांना नाटक निवडायला खूप कठीण जात होतं.
बघता बघता जानेवारी उजाडला. मग मी त्यांना मार्चपासून आपण प्रकल्पाची सुरुवात करूया, असं सांगितलं. म्हणजे, नाटकाचा पहिला प्रयोग मार्चमध्ये होणार. ‘घाई करा’ असा निरोप दिला, तरीही काही होईना. पण मी त्यांच्या खूपच मागे लागलो, तेव्हा बहुधा त्यांना असं वाटलं असावं, का ही म्हणतोय तसं याला खरोखरच करायचंय आणि मग प्रतिमा म्हणाली, की पहिलं नाटक मी करणार. ‘गारंबीचा बापू’ हे तिचंही आवडतं नाटक होतं म्हणून त्या नाटकाची संहिता मिळवण्याच्या मागे लागलो. या जुन्या नाटकांचा हा एक प्रॉब्लेम माझ्या लक्षात आला की, बर्याचशा नाटकांची पुस्तकंच उपलब्ध नव्हती. पण शेवटी एक प्रत मिळाली. ते नाटक वाचलं. ते पाच अंकी होतं. आताच्या काळानुसार ते तीन अंकी करूया, अशी आमची चर्चाही झाली. पण मग एके दिवशी प्रतिमानं मला सांगितलं की, तिला वसंत कानेटकरांचं ‘सूर्याची पिल्ले‘ हे नाटक करायचं होतं. मी या नाटकाबद्दल फक्त ऐकलं होतं, पण मी ठरवलं, दिग्दर्शकाच्या आवडीचं नाटक करायचं आणि या दिग्दर्शकांपैकी कुणीही, ‘कुठलंतरी’ नाटक निवडणारच नाही, ही खात्री होतीच. म्हणून मी ‘हो’ म्हटलं आणि अशा रीतीनं ‘सूर्याची पिल्ले’ या नाटकावर शिक्कामोर्तब झालं. पात्रांची निवड झाली. तालमी सुरू झाल्या. पत्रकार परिषद घ्यायची तारीख ठरली. सगळं व्यवस्थित चाललं होतं. एका मित्रानं आर्थिक मदत केली, एका मित्रानं तालमीसाठी त्याची जागा उपलब्ध करून दिली. मग अचानक दोन कलाकारांनी त्यांना जमत नसल्याचं सांगितलं... हा पहिला धक्का होता. पण ‘जो होता है अच्छे के लिए होता है’ असं म्हणून नवे कलाकार निवडले. पत्रकार परिषद उत्तम झाली. चंद्रकांत कुलकर्णी, मंगेश कदम, प्रतिमा कुलकर्णी, विजय केंकरे हे माझे दिग्दर्शक होते, बर्यापैकी पत्रकार मंडळी, चॅनेलवाले मित्र जमले होते. सचिन पिळगावकर स्वत: माझं कौतुक करायला आले होते, याचा मला विशेष आनंद वाटला. इथपर्यंत सगळं तसं छान चाललं होतं. म्हणजे अडचणी येत होत्या, पण गंभीर अशा नाहीत. १० जुलै, २०१० शुभारंभाची तारीख ठरली. जाहिरातीची संकल्पना व्यवस्थित राबवली जात होती, ज्यात मला (माझी बायको) अपर्णाचं खूप मोलाचं सहकार्य लाभलं. अक्षर शेडगे आणि बी. वाय. पाध्ये पब्लिसिटीचे विजय पाध्ये यांनी जाहिरात कशी असावी, सबसिडी रेट्स किती साइजच्या जाहिरातींना असतात, मोठ्यांत मोठी अशी अॅड किती आकाराची असू शकते या सगळ्या बाबतीत मार्गदर्शन केलं. आणि बघता बघता तो आठवडा, ज्या आठवड्यातल्या शनिवारी शुभारंभ होणार होता, तो उजाडला. जाहिरातीत मी तिकिटांचे दर ३००, २५०, २००, १५०, १००, ५० असे टाकले, आणि प्रतिकूल काळाची सुरुवात झाली.
ही जाहिरात रविवारी आली. सोमवार, मंगळवार ठीक गेले. खूप ताण होता, काय होईल? लोक येतील की नाही? एरवीच्या नाटकांचे दर १०० रुपयांपासून सुरू होत होते. पण माझ्या नाटकाचे दर ३०० रुपयांपासून सुरू होत होते. पण माझाही नाइलाज होता. एका नाटकाचा निर्मितीखर्च, प्रयोगांचा खर्च, जाहिरातीचा खर्च, प्रवासखर्च असे कितीतरी खर्च होते आणि ते मला पंचवीस प्रयोगांतूनच मिळवायचे होते. बरं, प्रत्येक प्रयोग हाऊसफुल्ल होईल अशी खात्री नव्हती. ती कुणालाच नसते. निर्मितिमूल्यांमध्ये कुठेही तडजोड करायची नाही, असं मी ठरवलं होतं. कलाकारांना अपमान वाटणार नाही, किमान इतकंतरी मानधन द्यायचं ठरवलं होतं. त्याच्या बरोबरीनंच असंही ठरलं होतं की, नागपूर-औरंगाबाद वगैरे ठिकाणी कलाकार विमानानंच प्रवास करतील (लाड करायचे म्हणून नाही, तर काळाची गरज म्हणून). विमानप्रवासात कलाकारांसाठी ब्लेझर्स म्हणजे कोट शिवणार असं ठरवलं. म्हणजे क्रिकेटची टीम जसे दौर्यावर जाताना दिसते, तशीच 'सुबक'ची नाटकाची टीम दिसावी. (ही मात्र माझी हौस). कलाकारांना भत्ता म्हणून ५० रुपये वगैरे द्यायचे नाही. त्यांची बडदास्त चांगली ठेवायची. बॅकस्टेज कलाकारांनासुद्धा चांगलं मानधन द्यायचं. प्रत्येकाला 'सुबक'चे टी-शर्टस् द्यायचे, अशा अनेक गोष्टी करायचं ठरवलं. परदेशात नाटकाविषयीचं माहितीपत्रक देतात, तसंच माहितीपत्रकही द्यायचं ठरवलं, ज्यात या नाटकातल्या अगदी पहिल्या प्रयोगात सहभागी झालेल्यांची नावं, आताच्या प्रयोगातल्या लोकांची नावं आणि कलाकारांच्या स्वाक्षर्या, नाटकाचं थोडक्यात कथानक आणि 'हर्बेरियम' संकल्पनेविषयी थोडं, असा मजकूर छापायचं ठरवलं. प्रेक्षकांचं स्वागत करण्यासाठी मी काही मुलांची मदत घेतली, जी प्रेक्षकांचं हसतमुखानं स्वागत करतील आणि एक गुलाबाचं फूल तसंच माहितीपत्रक देतील. या सगळ्या गोष्टी मी केल्या होत्या. एवढं सगळं अर्थातच नेहमीच्या तिकिटदरात करणं शक्यच नव्हतं.
बुधवारी म्हणजे ७ जुलैला माझ्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात होणार होती. सकाळी साडेआठ वाजता मी जाहिरातीत असं म्हटलं होतं की, ‘राखीव जागा नाहीत. सर्व प्लॅन प्रेक्षकांसाठी खुला’ म्हणून सर्व कलाकारांना त्यांची त्यांची तिकिटं काढायला सांगितली. माझ्या मुलीला सकाळी प्लॅनची पूजा करायला आणि तिकिटं काढायला पाठवलं, माझं ‘कुंकू’ मालिकेचं चित्रीकरण सुरू होतं म्हणून. चित्रीकरणात जीवाची घालमेल चालली होती. चार दिवस बुकिंग आहे, प्रयोगाच्या दिवसापर्यंत किमान ५०% तरी बुकिंग व्हावं, अशी परमेश्वराकडे प्रार्थना करत होतो. साडेनऊच्या सुमारास मुलीला फोन केला, तर ती म्हणाली, ‘‘काढली तिकिटं. जरा मन खट्टू झालं.’’ म्हणजे लोक आले नाहीत काय, म्हणून घाबरत घाबरत विचारलं, ‘‘कुठल्या ओळीची मिळाली?’’ ती म्हणाली, ‘‘एम रोची.’’ माझा विश्वासच बसला नाही. ‘‘म्हणजे बुकिंगवर लाईन होती?’’ माझा पुढचा प्रश्न. ती म्हणाली, ‘‘हो.’’ लगेच मी आकडेमोड केली. एम रो म्हणजे तेरावी रांग. अगदी मधलीच तिकिटं गेली असली तरी ३०% थिएटर भरलं की. थोडा जिवात जीव आला. आणि मग ११ वाजता बुकिंग बंद करायच्या वेळी - नितीन नाईक - माझा मॅनेजर, त्यानं सांगितलं की, ३००ची आणि २५०ची सगळी तिकिटं संपली. त्याच दिवशी संध्याकाळी १० तारखेच्या दुपारी ४ वाजताचा यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा इथला प्रयोग ‘हाऊसफुल्ल’ झाला. काही सिंगल तिकिटं, काही कोपर्यातली तिकिटं राहिली. माझ्या आनंदाला पारावार उरला नाही.
पण तो आनंद फार काळ टिकला नाही. ११ तारखेला रात्रीच्या गडकरी रंगायतन (ठाणे) इथे प्रयोग आणि त्याचं बुकिंग ८ तारखेपासून सुरू होणार होतं आणि ७ तारखेलाच संध्याकाळी मला गडकरी रंगायतनमधून फोन आला, की ‘‘तुम्ही तुमचा ११ तारखेचा शो करू शकत नाही. कारण ठाणे महानगरपालिकेच्या नियमाप्रमाणे नाटकाचं तिकीट ९० रुपयांपेक्षा जास्त असू शकत नाही.’’ एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या अचानक जाण्याच्या बातमीनं जसं डोकं बधीर होतं, तसं झालं. एखाद्या दरीत कोणीतरी भिरकावून दिल्यासारखं वाटलं. मला या नियमाची अजिबात कल्पना नव्हती. मी खूप विनवण्या केल्या. 'एकच शो होऊ द्या’ असं सांगितलं. तर त्यांनी पर्याय सुचवला की, इथला शो ऐंशी रुपये दरानं करा. त्यावर मी त्यांना म्हटलं, ‘‘माटुंग्याचा आणि ठाण्याचा प्रेक्षक माझ्यासाठी वेगळा नाही. मी ते करू शकत नाही.’’ मग दिलीप जाधव नावाच्या आमच्या निर्मात्याला मी फोन केला. त्याला घडलेला किस्सा सांगितला. त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून मला एक प्रयोग करण्याची परवानगी मिळवून दिली. त्यानं एवढंच सांगितलं, ‘कुणाचेही शुभारंभाचे प्रयोग रद्द होता कामा नयेत.’ आणि दुसर्या दिवशी सुरू होणार्या माझ्या बुकिंगला परवानगी मिळाली. तिथेही सकाळच्या बुकिंगच्या सत्रात ६०% तिकीट विक्री झाली आणि संध्याकाळी शो हाऊसफुल्ल. बरं, सगळ्यांत गमतीची गोष्ट म्हणजे तिकीट घ्यायला आलेल्या एकाही प्रेक्षकानं दराविषयी कटकट केली नाही. वर मला सांगितलं की, ‘अहो, तुम्ही तुमचे दर जाहिरातीतून आम्हाला सांगितले होेते. बर्याच वेळा आम्हांला ते बुकिंग करायला आल्यावर कळतात.’
दुसर्याच दिवशी म्हणजे ९ तारखेला मी ठाणे महानगरपालिकेत जाऊन सर्वांचे आभार मानले. तिथे मला कळलं की, माझ्या एका मित्रानंच या दराबाबतीत हरकत घेतली होती व असंही म्हटलं होतं की, ‘जर तुम्ही त्याला परवानगी दिली, तर आम्ही सर्व निर्माते गडकरीला प्रयोग करणं बंद करू.’ ते ऐकून मी थक्क झालो. एखाद्या वाटाड्यावर विश्वास ठेवावा आणि त्यानं जंगलात नेऊन आपल्याला सोडून निघून जावं, तशी भीती वाटली. आजपर्यंत अशा गोष्टी ऐकल्या होत्या. आज अनुभव घेत होतो. थोडा वेळ गेला. पण सावरलो... मला अशावेळी चीड नाही, कीव येते... कदाचित मी ज्याला ‘कीव’ म्हणतोय तीच माझ्या पद्धतीची चीड असेल, कुणास ठाऊक? त्याच दिवशी मी माननीय आयुक्त साहेबांना भेटून माझ्या उपक्रमाबद्दल माहिती देणारं एक पत्र व सव्वा वर्षांत गडकरीला होणार्या फक्त दहा प्रयोगांसाठी, माझे दर लावण्याच्या परवानगीसाठीचा अर्ज दिला आणि पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानून तिथून निघालो.
दुर्दैवानं त्याच दिवशी मी एका समारंभाला जात असताना त्या निर्मातामित्राचा फोन आला आणि मग काही माझा स्वत:वर ताबा राहिला नाही. मी त्याला खूप बोललो, मनात काही ठेवलं नाही. मागेपुढे पाहिलं नाही. अत्यंत... अत्यंत... मोकळेपणानं बोललो... जिथे एखादी शिवी आली, तिथेही स्वत:ला आवरलं नाही. तो त्याच्या परीनं त्याची बाजू समजावण्याचा प्रयत्न करत होता, पण मला ते पटूच शकत नव्हतं. खूप वेळ हे संभाषण चाललं. शेवटी ‘राग मानू नकोस’ असं त्यानं आणि म्हणूनच मीही, तसंच बोलून फोन कट केला. खरं सांगतो, इतकं हलकं वाटलं मला, खूप मोकळं. थोड्या वेळानं माझा ड्रायव्हर हळूच म्हणाला, ‘‘साहेब, आता तुम्ही ज्या व्यक्तीला इतकं बोललात मला त्या व्यक्तीला पाहायचंय.’’ आधीच मोकळेपणामुळे रिलॅक्स झालेलो मी, त्याच्या या कुतूहलामुळे हसू आवरू शकलो नाही.
जेव्हा मी ‘ताज’मधल्या समारंभात निवेदन करत होतो, तेव्हा शिवाजी मंदिरात ‘सूर्याची पिल्ले’ची रंगीत तालीम चालू होती. मी समारंभ संपवून तिथे पोहोचेपर्यंत नाटक संपलं होतं आणि सगळे मला भेटून नाटकाची आणि कलाकार-दिग्दर्शकाची- निर्मितिमूल्यांची तोंड फाटेस्तोवर स्तुती करत होते. मी हे नाटक रंगभूमीवर आणल्याबद्दल लोक मला खूप खूप दुवा देतील, असंही सांगत होते. पण खरं सांगू, मी अजून त्या फोन संभाषणाच्या हँगओव्हरमध्येच होतो.
झालं... एकदाचा तो दिवस उजाडला. १० जुलै २०१०. दुपारी माझ्या ‘सुबक’ या संस्थेचा ‘हर्बेरियम’ या उपक्रमातील पहिल्या नाटकाचा शुभारंभ... वसंत कानेटकरलिखित या नाटकाच्या अगदी पहिल्या प्रयोगात मोठ्या मोठ्या लोकांचा सहभाग होता. आजचा माझा प्रयोग कसा होणार, या काळजीत होतो. प्रयोगाची वेळ आणि मी प्रेक्षकांचं स्वागत करायला बाहेरच उभा होतो. काही कलाकारांनी त्यांच्या नातेवाइकांसाठीची काढलेली तिकिटं माझ्याकडे देऊन ठेवली होती. तितक्यात एक ज्येष्ठ पत्रकारबाई माझ्यापाशी येऊन म्हणाल्या, ‘‘मी पत्रकार आहे. आमच्यासाठी काय व्यवस्था केलीय? प्रेसचे पासेस कोणाकडून घेऊ?’’ पुन्हा एकदा स्तब्ध झालो. आजूबाजूला इतकी गर्दी असूनही सगळे एकदम गायब झाल्यासारखे वाटले. मी त्यांना समजावलं की, ‘‘एकही पास कोणासाठीही ठेवलेला नाही व संपूर्ण तिकीटविक्री झालीय. मी पहिल्यांदाच निर्माता झालोय आणि माझ्या हातून ही चूक झाल्याबद्दल मला क्षमा करा.’’ ती बाई एक अक्षर न बोलता चिडून तिथून निघून गेली आणि मी फक्त पाहत राहिलो.
इतक्यात कोणीतरी मला स्टेजची पूजा करायला बोलवतायत, असं सांगितलं. मी वर गेलो. पूजा केली. नारळ वाढवला व सगळ्यांना शुभेच्छा दिल्या. दुसरी बेल दिली. प्रतिमानं शेवटच्या सूचना दिल्या. शुभाशीर्वाद दिले. मग सर्व कलाकारांनी एक रिंगण तयार केलं आणि ओंकार आळवला. वातावरण बदलून गेलं. सगळा तणाव, इतक्या दिवसांच्या तालमीचा शीण निघून गेला आणि तिसरी घंटा झाली.
प्रयोगाचा सूर अगदी करेक्ट लागला होता. पहिला हशा येईपर्यंत हृदयाची धडपड होत होती. पण तो हशा आल्यावर मात्र हायसं वाटलं आणि नंतर तर काही विचारू नका. प्रयोग इतका सुंदर चालला होता की, बोलायची सोय नाही. कानेटकरांची वाक्यं आणि कलाकारांचं टायमिंग इतकं अफलातून जमलं होतं, की प्रेक्षक हसून हसून आता बाल्कनी कोसळेल की काय असं वाटत होतं. आमच्या भाषेत ‘छप्परतोड’ प्रयोग चालला होता. या नाटकासाठी आम्ही कर्टन कॉल डिझाइन केला होता. म्हणजे नाटक संपल्यावर सर्व कलाकारांना एकापाठोपाठ एक असं रंगमंचावर आणलं जातं. त्यांच्यासोबत दिग्दर्शक, निर्माताही रंगमंचावर येतात आणि प्रेक्षकांना अभिवादन करतात. हा माझ्यासाठी आणि आम्हा सगळ्यांसाठी एक अविस्मरणीय क्षण होता.
नाटक संपलं आणि कर्टन कॉलचं संगीत वाजलं. एकेका कलाकाराचं नाव पुकारलं गेलं. तो तो कलाकार प्रेक्षकांना अभिवादन करत होता. सर्व कलाकारांची ओळख आणि अभिवादन झाल्यावर प्रतिमा आणि मी स्टेजवर गेलो. ते दृश्य अचंबिक करणारं होतं. संपूर्ण प्रेक्षागृहातील प्रेक्षक उभे राहून संगीताच्या तालावर टाळ्या वाजवत होते. एरवी प्रेक्षागृहाबाहेर पडण्यासाठी धडपड चाललेली असते. पण त्या दिवशी तसं काही झालं नाही. बाल्कनीतल्या शेवटच्या प्रेक्षकापर्यंत सगळे उभं राहून टाळ्या वाजवत होते. आधी सगळे प्रेक्षक मला दिसत होते. पण हळूहळू सगळं धुरकट दिसू लागलं. डोळे पाण्यानं डबडबले होते. ते प्रेक्षक मला दिसत नव्हते, एकाचाही चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. पण मला उचलून पैसे देणारे माझे मित्र गिरीश, मेधा, स्वत:ची जागा विनामूल्य उपलब्ध करून देणारे सामंत कुटुंबीय, माझे मॅनेजर, श्रीपाद पद्माकर, प्रकाश सावंत, नितीन नाईक, तालमीत मदत करणारी पोरं, नेपथ्यकार प्रसाद वालावलकर, कॉस्च्यूम करणार्या दीपा-अनिता, अपर्णा, आईवडील आणि असे अनेक... हे समोर नसतानाही त्यांचे आनंदी चेहरे मला स्पष्ट दिसत होते. केवळ ‘सुनील काहीतरी खूप छान करतोय, आपण त्याला मदत केली पाहिजे’ या निस्वार्थ, निरपेक्ष, निर्व्याज भावनेतून ते माझ्या पाठीशी उभे राहिले. त्यांच्या कृतज्ञतेनं मन भरून आलं होतं. संपूर्ण पडदा पडेपर्यंत प्रेक्षक उभं राहून दाद देत होते आणि पडदा पडल्यावर एकच जल्लोष झाला आणि इतके दिवस ज्यासाठी मेहनत चालली होती, त्या प्रवासाची धूमधडाक्यात सुरुवात झाली.
‘२५ प्रयोगानंतर तुम्हाला थांबता येणार नाही. किमान २५० प्रयोग तरी करा. तुमचं पुढचं नाटक कुठलंही असेल याची उत्सुकता वाढलीये. तुमच्या सगळ्या नाटकांचे आगाऊ पासेस आम्ही द्यायला तयार आहोत.’ वगैरे वगैरे अशा अनेक शुभेच्छा आणि अभिप्राय मिळत होते. ‘तुम्ही इतकं छान सादरीकरण केलंत. तीनशेच काय, पाचशे रुपये देऊनही प्रेक्षक हाऊसफुल्ल गर्दी करतील.’ असंही लोक म्हणत होते. मला माझ्या मेहनतीचं चीज झाल्यासारखं वाटलं.
हा लेख लिहित असताना मी तीन नाटकं म्हातारा झालोय. 'सूर्याची पिल्ले', मंगेश कदम दिग्दर्शित आणि बाळ कोल्हटकर लिखित ‘लहानपण देगा देवा’, चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित, अनिल बर्वे लिखित ‘हमीदाबाईची कोठी’ आणि चौथ्या नाटकाची तयारी सुरू आहे. अडचणींची मालिका पहिल्या नाटकानंतरही सुरू राहिली. म्हणजे, कमी वेळ मिळाल्यामुळे लहानपण...’ या नाटकाचा घोषित शुभारंभाचा प्रयोग पुढे ढकलावा लागला किंवा ‘हमीदाबाई...’च्या प्रयोग करण्याच्या परवानगीवरून उठलेलं वादळ, यांसारख्या गर्तेत ढकलणार्या, हे मला जमेल ना, असं वाटायला लावणार्या अनेक अडचणी आल्या, पण परमेश्वर कृपेनं आणि प्रेक्षकांच्या सकारात्मक पाठिंब्यामुळे निभावून गेलं.
चौथी कलाकृती असणार होती वसंत कानेटकरलिखित ‘विषवृक्षाची छाया’, ज्याचं दिग्दर्शन गिरीश जोशी करणार होता. सचिन खेडेकर आणि गिरीजा ओक हे त्या नाटकात भूमिका करणार होते. तसं मी 'हमीदाबाई'च्या
पंचविसाव्या प्रयोगाच्या वेळी षण्मुखानंद सभागृहात जाहीरसुद्धा केलं होतं. गिरीशची बायको आणि आम्हां सर्वांची अत्यंत जवळची मैत्रीण असलेल्या रसिका जोशीनं माझी सगळी नाटकं पाहिली होती व त्यांवर तिच्या स्वभावानुसार प्रतिक्रियाही दिली होती. गेली अनेक वर्षं ती कर्करोगानं आजारी होती. पण जीवनाविषयी ती खूप सकारात्मक होती. नाटकावर तिचं अतोनात प्रेम होतं. रडवेला चेहरा घेऊन ती कधी वावरली नाही की स्वत:च्या आजारपणाविषयी कधी अवाक्षर बोलली नाही. तिचं काम मनापासून करत राहिली. ‘विषवृक्षाची छाया’च्या पुस्तकाची पूजा करून मुहूर्त केला. तालमीला आम्ही सुरुवात केली, आणि रसिकाचा एक रिपोर्ट आला, ज्यामुळे गिरीश खूप अस्वस्थ झाला. पण फार काही आम्हांला न सांगता 'काही दिवस तालमी करूया', असं म्हणाला. मग काही दिवसांनी त्यानं त्यामागचं कारण सांगितलं. ‘‘रसिकाचा आजार फारच बळावला आहे आणि डॉक्टरांनी मला तिच्याबरोबरच राहायला सांगितलंय. हे सगळं किती दिवस चालेल, ती किती दिवसांत बरी होईल, हे कुणीच सांगू शकत नाहीये. त्यामुळे मी हे नाटक नाही करू शकत,’’ असं अत्यंत जड स्वरात त्यानं मला सांगितलं आणि पुन्हा एकदा मी हबकलो. पण हे हबकणं ‘माझं नाटक होणार नाही, आता काय?’ या भावनेनं नाही, तर फक्त, रसिका आणि गिरीश यांच्यावर कोसळलेल्या संकटानं. मी लगेचच त्याला नाटकाच्या जबाबदारीतून मोकळं केलं. ‘‘नाही झालं माझं एखादं नाटक तरी काही फरक पडत नाही. पण तू काळजी घे,’’ एवढंच, खूप धीर एकवटून त्याला सांगितलं. पण काही दिवसांतच जे होऊ नये अशी प्रार्थना सगळे करत होते, ते अटळ, झालंच. आमची नाट्यवेडी, स्पष्टवक्ती (म्हणजे आमच्याशी तरी), सदैव उत्साही, हसतमुख अशी रसिका आम्हांला सोडून कायमची निघून गेली. तिला रडलेलं कधी पाहिलं नव्हतं आणि आम्हांलाही तिनं तसं पाहिलं नाही, कारण ती नव्हतीच.
दरम्यानच्या काळात ‘मी शाहीर साबळेंचं ‘आंधळं दळतंय’ हे नाटक करू इच्छितो. एखादा दिग्दर्शक वाढवलास तर बघ’, असं कधीतरी केदार शिंदे मला म्हणाल्याचं आठवलं. मी त्याला फोन केला. ज्या परिस्थितीत मी त्याला हे नाटक करायचं विचारत होतो, त्याचं वाईटच वाटलं. पण त्याच्या आजोबांचं नाटक करायला मिळणार या विचारानं त्यानं वेळ न दवडता संमती दर्शवली. हे नाटक आपण रसिकाच्या स्मृत्यर्थ करायचं असं ठरवलं आणि लागलो कामाला.
या संपूर्ण प्रवासात मला अनेकांची मदत झाली. काहींच्या नावांचा उल्लेख केला असेल, काहींचा राहिला असेल. पण अजून माझा उपक्रम संपला नाहीये. त्यामुळे मी इतक्यातच कोणाचेही आभार मानणार नाहीये. पण... ‘गेल्या पंचवीस वर्षांत ज्या प्रेक्षकांनी मला इतकं भरभरून प्रेम दिलं, त्यांच्यासाठी मी ‘हर्बेरियम’ हा प्रकल्प केला. पण ज्यांनी ह्या ‘हर्बेरियम’वर प्रेम केलं, तीनही नाटकांच्या तिकिटांसाठी पहाटेपासून रांगा लावल्या, काहींना ती नाटकं पाहता आली नाहीत, मला भरभरून आशीर्वाद दिले... त्यांच्यासाठी आता मी काय करू?’ हा माझ्यापुढचा यक्षप्रश्न आहे.
परमेश्वरावर आणि रसिक प्रेक्षकांवर माझी श्रद्धा आहे. तेच काहीतरी मार्ग सुचवतील. तोपर्यंत रामराम.
पूर्वप्रसिद्धी - 'माहेर' (दिवाळी - २०११)
हा लेख मायबोली.कॉमवर पुनर्प्रकाशित करण्यास परवानगी दिल्याबद्दल श्रीमती सुजाता देशमुख व श्री. सुनील बर्वे यांचे मनःपूर्वक आभार.
सुरेख मस्त आणि सुरेखच
सुरेख मस्त आणि सुरेखच
छान मनमोकळं लिहीले आहे.
छान मनमोकळं लिहीले आहे.
समहाऊ, सुनील बर्वे कोणाला शिव्या घालून झापतोय हे इमॅजिन करता आले नाही..
चिरतरुण सुनील बर्वे बद्दल आहे
चिरतरुण सुनील बर्वे बद्दल आहे हे पाहताच लगेच वाचयला घेतलं.
सलग वाचून काढलं. मस्त लिहिलंय.
सुनिल बर्वे आमच्या गोरेगावचा
सुनिल बर्वे आमच्या गोरेगावचा अणि पाटकराईट सुद्धा. त्यामुळे त्याच्याबद्दल एक वेगळा अभिमान आहेच.
मस्त लेख ..
मस्त लेख ..
अतिशय सुंदर मनोगत. अनेक
अतिशय सुंदर मनोगत. अनेक शुभेच्छा
वाह लेख आवडलाच पण नंतर झालेली
वाह लेख आवडलाच पण नंतर झालेली नाटकांबाबतच्या आठवणींचे शेपूट पण ह्याला जोडून यायला हवे होते असे वाटतेय....
मस्त लेख.... हर्बेरियम चं "
मस्त लेख....
हर्बेरियम चं " झोपी गेलेला जागा झाला" पाहिलंय...पुण्यातला शेवटचा प्रयोग आवर्जुन पाहिला होता....खरच मस्त अनुभव
नाटकाविषयीचं माहितीपत्रक ही संकल्पना खुप आवडली होती...अजुनही आहे माझ्याकडे ते पत्रक
भ्रमर +1 छान झालिये मुलाखत
भ्रमर +1
छान झालिये मुलाखत
खूप आवडला लेख
खूप आवडला लेख
अतिशय सुरेख लेख इथे
अतिशय सुरेख लेख
इथे पुनर्मुद्रण केल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
खूपच छान जमलाय लेख,
खूपच छान जमलाय लेख, हर्बेरियमच्या नाटकांबद्दल कायमच उत्सुकता असते. हमिदाबाईची कोठी नाटकासाठी तिकिटाच्या रांगेत उभं राहुनही तिकीट न मिळाल्याच दु:ख आजही आहे.
मनोगत आवडल. लेख इथे प्रकाशित केल्याबद्दल माध्यम प्रायोजकांचे आभार.
छान लेख. हा माझ्याहून एक
छान लेख. हा माझ्याहून एक वर्श लहान. रसिकाची परवा आ ठवण झाली होती. चार वर्शे झाली.
सुरेख मनोगत!
सुरेख मनोगत!
मस्त. हर्बेरियमचं नीना
मस्त. हर्बेरियमचं नीना कुलकर्णी अभिनीत हमीदाबाईची कोठी पाहिलं होतं. अविस्मरणीय अनुभव.
हा लेख इथे दिल्याबद्दल आभार.
मस्त ! मागे दिवाळी अंकात
मस्त ! मागे दिवाळी अंकात वाचला होता. परत वाचायलाही छान वाटला.
अत्यंत सुंदर व मनमोकळा लेख!!
अत्यंत सुंदर व मनमोकळा लेख!!
सुंदर लेख. पुनःप्रकाशित
सुंदर लेख. पुनःप्रकाशित केल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.