सैनिकाच्या गोष्टी - भाग ३ [एन.डी.ए.च्या प्रशिक्षणाचे किस्से]

Submitted by शरद on 7 June, 2010 - 08:06

डिसेंबर १९७६ साली मी एन.डी.ए. मध्ये घाबरत घाबरत प्रवेश घेतला. घरातून पहिल्यांदाच बाहेर शिक्षणासाठी राहात होतो, त्यामुळे थोडे घाबरणे साहजिकच होते. शिवाय रॅगिंगबद्दल ऐकून होतो. अर्थात एन.डी.ए. हे पुण्याजवळ असल्याने थोडे मानसिक समाधान होते की महाराष्ट्रातच आहे. पण अर्थात ते फक्त मानसिक समाधानच होते; कारण एन.डी.ए. चे विश्वच वेगळे आहे. ढोबळ मानाने सांगायचे म्हणजे कॅडेटसाठी तरी तिथे आठवडेच जातात, दिवस नाही; कारण सोमवार ते शनिवार अगदी श्वास घ्यायलासुद्धा वेळ काढायला लागतो आणि तो उपलब्ध नसतो.

एन. डी. ए. ची जुजबी ओळख करून दिल्याखेरीज मला पुढे सरकताच येणार नाही. एन.डी.ए. ही एक आर्मी, नेव्ही आणि एयर फोर्स या भारतीय सैन्याच्या तिन्ही विंगच्या अधिकार्‍यांना एकत्रित पूर्वप्रशिक्षण देणारी संस्था आहे. http://nda.nic.in/ ही लिंक पहा. या संस्थेत एका वेळी साधारणत: १८०० कॅडेट पूर्वप्रशिक्षण घेतात. ते १५ स्क्वाड्रन मध्ये असतात. म्हणजे प्रत्येक स्क्वाड्रनमध्ये साधारणत: १२०-१२५-१३० कॅडेट्स असतात. प्रत्येक स्क्वाड्रनची स्वतंत्र तीन मजली बिल्डिंग आहे. एका मजल्यावर दोन टर्मचे कॅडेट राहतात. फर्स्ट व फोर्थ, सेकंड व फिफ्थ आणि थर्ड व सिक्स्थ. चार चार स्क्वाड्रनची एक बटालियन. शेवटच्या बटालियनमध्ये फक्त तीनच स्क्वाड्रन आहेत. http://nda.nic.in/html/nda-squadron-battalion.html प्रत्येक स्क्वाड्रन च्या कॅडेटसचा प्रमुख एक स्क्वाड्रन कॅडेट कॅप्टन असतो. प्रत्येक बटालियन च्या कॅडेटसचा प्रमुख एक बटालियन कॅडेट कॅप्टन असतो. चारपैकी एक बटालियन कॅडेट कॅप्टन (रोटेशनमध्ये) हा संपूर्ण अ‍ॅकेडमीचा कॅप्टन असतो. याशिवाय प्रत्येक स्क्वाड्रन च्या कॅडेटसची शिस्त सांभाळण्यासाठी एक कॅडेट सार्जन्ट मेजर असतो. बटालियनमध्ये बटालियन कॅडेट अ‍ॅडज्युटन्ट असतो. तसेच अ‍ॅकेडमी साठी अ‍ॅकेडमी कॅडेट अ‍ॅडज्युटन्ट असतो. हे सर्व सहाव्या टर्मचे कॅडेट निवडलेले असतात. या शिवाय प्रत्येक मजला सांभाळण्यासाठी एक सार्जंट असतो हा पाचव्या टर्मचा निवडलेला कॅडेट असतो. या सगळ्या निवडलेल्या कॅडेट्सना अपॉइंट्मेन्ट म्हणतात. आपल्यापैकी ज्यांनी होस्टेलमध्ये राहून शालेय शिक्षण घेतले असेल त्यांना या गोष्टींची साधारण कल्पना येईल.

मी जेव्हा जॉईन झालो तेव्हा एक गोष्ट झाली होती - त्यावेळी मला (माझ्या सर्व कोर्समेटस् ना) चांगली वाटली होती; आता कदाचित ती तितकी चांगली नव्हती असे वाटते. त्यावेळी रॅगिंग पूर्णपणे बंद केले होते. म्हणजे काय असतं, मिलिट्री आणि इतर प्रोफेशनमध्ये एक मूलभूत फरक आहे; मिलिट्रीमध्ये "आज्ञा पाळणे" - अगदी डोळे झाकून आज्ञा पाळणे - या गोष्टीला असामान्य महत्व आहे. आज्ञा कुणी कुणाची पाळायची? तर जवानाने अधिकार्‍याची, कनिष्ट अधिकार्‍याने वरिष्ठ (की अरिष्ट?) अधिकार्‍याची वगैरे. पण जेव्हा सगळेच कॅडेट्स असतील तेव्हा काय? तर जुनियर कॅडेटने सिनियर कॅडेटची आज्ञा पाळायची. थोड्याफार प्रमाणात रॅगिंग असेल तर त्यामुळे ज्युनियर कॅडेट 'आज्ञापालन' आपोआप शिकतात. आणि अगदीच नसेल तर सगळा आनंदी आनंदच आहे. आमच्या वेळी काय परिस्थिती होती ते सांगतो. या बाबतीत मी जे वर्णन करणार आहे ते पूर्णत: ऐकिव असून त्याचा स्रोत मला सांगता येणे शक्य नाही.

मी जॉईन होण्यापूर्वी एन्.डी.ए. मध्ये एक प्रथा होती. सगळीकडे सर्व सिनियर जुनियर लोकांना छळतात असा प्रवाद आहे. एन्.डी.ए. मध्येही तो आहे. मात्र शेवटच्या टर्मचा कॅडेट फायनली निघून जाण्यापूर्वी एक रात्र अशी असते ज्या रात्री सर्व ज्युनियर कॅडेट शेवटच्या टर्म च्या कॅडेटचे रॅगिंग करतात. इथे रॅगिंग म्हणजे काहीतरी फिजिकल पनिशमेंट म्हणजे शे-दीडशे दंड मारणे, पळणे, सायकल डोक्यावर घेऊन फेर्‍या मारणे, फ्रंट रोल, साईड रोल वगैरे अपेक्षित असावे. पण आम्ही जॉईन होण्यापूर्वी वर्ष-सहा महिने अगोदर एक घटना घडली होती ज्यामध्ये एका सिक्स्थ टर्म कॅडेटला पिलो कव्हरमध्ये नट बोल्ट वगैरे लोखंडी सामान ठेऊन मारहाण करण्यात आली होती आणि त्यात त्याचा मृत्यू झाला होता. आता हे का घडले ते मला ठाऊक नाही. कदाचित त्या कॅडेटने वर्ष दीड वर्ष आपल्या ज्युनियर कॅडेटना इतका त्रास दिला असेल की त्यांनी खुन्नस खाऊन हे कृत्य केले असेल. कदाचित ज्यांनी हे केले त्यांना आपल्या कृत्याची गंभीरता जाणवली नसेल. पण या गोष्टीचा आमच्या कोर्सवर परिणाम झाला. आमच्या वेळेस प्रत्येक बटालियनमधील (त्यावेळी तीनच बटालियन होत्या. चौथी म्हणजे माईक - नोव्हेंबर - ऑस्कर स्क्वाड्रन वाली, नंतर कधीतरी १९९० ते २००० या दशकात अस्तित्वात आली) सर्व फर्स्ट टर्म कॅडेटना एका स्क्वाड्रन मध्ये ठेवले होते. त्या स्क्वाड्रन मध्ये फक्त फर्स्ट टर्म कॅडेट आणि काही सिक्स्थ टर्म / फिफ्थ टर्म अपॉइंट्मेन्टस. त्या सर्व अपॉइंट्मेन्टसना स्पष्ट ताकीद देण्यात आली होती की ही आलेली 'बाळं' आहेत. त्यांना कसलाही त्रास होऊ द्यायचा नाही. माझ्यामते हे म्हणजे खूपच झाले; पण कदाचित अधिकार्‍यांचासुद्धा नाईलाज होता. रॅगिंगमध्ये एका कॅडेटचा मृत्यू होणे ही असामान्य घटनाच म्हणावी लागेल; मग तेवढ्या कडक स्टेपस् त्यांना उचलाव्या लागल्याच असतील. पण यामुळे आमची पहिली टर्म थोडी सुसह्य झाली. त्यामुळे झाले काय की आमच्यापेक्षा एक कोर्स सिनियर म्हणजे ५६ वा कोर्स आमच्यावर दात ठेऊन होता; कारण ते दोन टर्म ज्युनियरमोस्ट राहिले होते. आमच्या पुढच्या टर्मचे कॅडेट तर पहिल्या टर्म साठी एन्.डी.ए.मध्ये नव्हतेच. पुण्यातच घोरपडी इथे त्यांच्यासाठी स्वतंत्र एन्.डी.ए. विंग सुरू केले गेले. नंतर कित्येक वर्षांनी ते बंद केले गेले. असो.
................................................................................................................

पहिल्या टर्म मधील एक घटना सांगतो. आमच्या वर्गात एक कॅडेट होता. अगदीच भोळा - सांब. त्याला इंग्रजी अजिबात येत नव्हते. तर सिनियर जेव्हा काही पनिशमेन्ट द्यायचे तेव्हा इंग्रजी 'एफ वर्ड' वारंवार उच्चारायचे. त्याला त्याचा अर्थ माहित नव्हता. (मलासुद्धा अगोदर माहीत नव्हता; पण माझ्या बरोबर एक पुण्याचाच कॅडेट होता त्याने सांगितला होता.) त्याने त्या शब्दाचा अर्थ 'शिक्षा' असा लावला. एकदा क्लासला तो उशीरा आला. इंग्रजीचे सक्सेना सर म्हणून होते. त्यांचे आणि त्या कॅडेटचे संभाषण:

"व्हाय आर यू लेट ?"

"सर, आय वॉज अबाऊट टू स्टार्ट. देन माय सार्जन्ट कॉल्ड मी. देन ही फXX मी. ही फXX मी व्हेरी हार्ड सर. ही फXX मी बिकॉज आय डिड नॉट गेट हिम टी सर. बट दॅट वॉज नॉट माय फॉल्ट सर. द मेस बॉय हॅड गॉन. बट द सार्जन्ट डिड नॉट लिसन टू मी."

सगळा क्लास हास्यकल्लोळात डुंबून गेला. सक्सेना सर आधी लाल मग निळे मग हिरवे मग काळे पडले. मग परत लाल झाले. काय बोलावे ते त्यांना सुचेना. मग त्यांनी 'फोर लेटर' वर्ड म्हणजे काय व ते का वापरू नयेत ते समजावून सांगितले.
.................................................................................................................

माझं दुर्दैव असं की कर्मधर्मसंयोगाने माझ्या बटालियन मध्ये तीन ऑफिसर कोल्हापूरचे होते. एक तर माझ्या स्क्वाड्रन ( इंडिया स्क्वाड्रन) चा मुख्य अधिकारी होता - मेजर अविनाश वॉल्टर रणभिसे, (नंतर ते पुढे मेजर जनरल किंवा लेफ्टनंट जनरल होऊन रिटायर झाले) किलो स्क्वाड्रन मध्ये कॅप्टन पृथ्वीराज पाटील (ते ब्रिगेडियर होऊन रिटायर झाले. दोन वर्षांपूर्वी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातच त्यांचा मृत्यू झाला) आणि लिमा स्क्वाड्रन मध्ये स्क्वाड्रन लिडर विजय जाधव. त्यामुळे मला कुठलीही 'बेकायदेशीर' गोष्ट करता यायची नाही.. 'मजा' करता यायची नाही. अर्थात त्या काळात कॅडेटची मजा म्हणजे चोरून बीअर पिणे किंवा बाथरूममध्ये जाऊन सिगारेट पिणे. तंबाखूच्या वासाचा मला तीव्र तिटकारा होता (आणि आहे) आणि बीअर वगैरे विकत घेण्याची आपली ऐपत नव्हती. दुसरी 'बेकायदेशीर' गोष्ट म्हणजे परवानगी नसताना लिबर्टीवर जाणे. लिबर्टी म्हणजे रविवारी सुटी असते तेव्हा पुण्याला जाऊन भटकून येणे. एकदा काय झाले मी लिबर्टीसाठी कार्ड दिले होते. ते सही करून आले नाही. मला वाटले की चुकून अधिकार्‍याने सही करायचे राहून गेले असेल. मग मी माझ्या मित्राचे कार्ड घेऊन गेलो. परत यायला रात्र झाली. पौड फाट्याला एका घरी वाढदिवसाची पार्टी अटेंड करायल गेलो होतो. रात्री शेवटची बस साडेदहा वाजता येते. बसमध्ये जागा असूनही ड्रायव्हरने थांबवली नाही. मग मी त्या ड्रायव्हरला मनातल्या मनात चार कोल्हापुरी शिव्या हासडल्या आणि ठरवले की अकरा नंबरची गाडी करायची (चालत जायचे) आणि त्याप्रमाणे निघालो. अचानक पाठीमागून एक फियाट सुळ्ळ्कन येऊन थांबली. आत एक अधिकारी होता - कॅप्टन भूपाराय नावाचा खालसा. त्याने गाडीत बसायला सांगितले. दुसरा एक ऑफिसर गाडी चालवत होता.

कॅप्टन भूपारायने विचारले, "कॅडेट, व्हॉट इज यूर नेम."
मी - "कॅडेट एस्.एस. पाटील, सर"
तो-"व्हेयर इज यूर लिबर्टी कार्ड"
मी अगदी पूर्ण आत्मविश्वासाने ते लिबर्टी कार्ड दाखवले. त्याने नाव वगैरे काही तपासले नाही आणि माझा जीव भांड्यात पडला.
तो - "व्हाय आर यू लेट?"
मी त्याला शेवटची बस कशी चुकली त्याचे रसभरीत वर्णन केले. पुढे काही बोलणे नाही. आम्ही एन्.डी.ए.त पोहोचलो आणि मला सुटणूक झाल्यासारखे वाटले.

दुसर्‍या दिवशी रणभिसे सरांकडून बोलावणे आले. त्यांनी मला विचारले:-

"पाटील, यू हॅड गॉन ऑन लिबर्टी यस्टरडे, इज दॅट करेक्ट?"
"येस सर"
"यू हॅड यूर लिबर्टी कार्ड विद यू"
काही तरी चुकतंय याची मला जाणीव झाली.
मी थोडा विचार करून म्हणालो, "नो सर"
"देन हूज कार्ड डिड यू शो टू कॅप्टन भूपाराय?" खरे तर मेजर रणभिसेनेच माझे कार्ड काही कारणास्तव लिबर्टी न देता आपल्याजवळ ठेवले होते. मेसमध्ये कॅप्टन भूपारायने त्याला आपण कशी एका कॅडेटला लिफ्ट दिली ते सांगितले असणार.

मला त्या कॅडेटचे (संजीव सूद) नाव सांगावेच लागले. नंतर संजीवने मला उदार मनाने क्षमा केली ती गोष्ट निराळी; अर्थात हा प्रसंग कुणावरही येऊ शकला असता. संजीवला तीन एक्स्ट्रा ड्रिल आणि मला एक सिंहगड बक्षिस मिळाले.

एक्स्ट्रा ड्रिल आणि सिंहगड हे पनिशमेन्टचे प्रकार आहेत. एक्स्ट्रा ड्रिलमध्ये दुपारी जेवल्यानंतर अडिच ते साडेतीन या वेळात (बाकीच्या कॅडेट्ससाठी ती विश्रांती ची वेळ असते. विश्रांती कसली? ज्युनियर कॅडेट्सची ती एक्स्ट्रा पी.टी. (फिजिकल ट्रेनिंग) करायची वेळ!) http://nda.nic.in/html/nda-physical-training.html उन्हाचे चांदणे अंगावर मिरवत सगळ्या परेड ग्राऊंडला फेर्‍या माराव्या लागत. आणि सिंहगड ही तर भारीच पनिशमेन्ट! रविवारी सकाळी ‍अ‍ॅकॅडमीतून निघायचे - सर्व बॅटल ड्रेस घालून. मग संपूर्ण सिंहगड चढायचा. तिथे जो अधिकारी असेल त्याला रिपोर्ट करायचा, बरोबर नेलेले पॅक जेवण जेवायचे आणि चालत परत यायचे. १५ - २० किलोमीटरचा मस्त ट्रेक होतो. पण अख्खा रविवार वाया जातो. आणि आठवड्यातला तेवढा एकच विश्रांतीचा दिवस असतो. विश्रांती म्हणजे त्यादिवशी सकाळी फक्त क्रॉस कंट्री ची एक प्रॅक्टिस असते. बाकीचा दिवस रिकामा.
...............................................................................................................

http://nda.nic.in/html/life-at-nda.html एन्.डी.ए. मधील सगळ्यात उत्साहाचा दिवस म्हणजे क्रॉस कंट्री. संपूर्ण अ‍ॅकॅडमी - १८०० कॅडेट एकत्र धावत असतात. आठ-नऊ किलोमीटरचा क्रॉस कंट्रीचा मार्ग कॅडेट्सनी भरून गेलेला असतो. प्रत्येक स्क्वाड्रनची एकशे दहा जणांची टीम. उरतात फक्त तीन्-चार टाळकी - जे खरोखरच आजारी किंवा ज्यांना पळायला येतच नाही असे कॅडेट्स. इंटर स्क्वाड्रन कॉम्पिटिशन. नंतर जो स्क्वाड्रन पहिला - दुसरा येतो त्यांच्यात पुढील दोन महिने आपण कसे जिंकलो हीच चर्चा. माझ्या सुदैवाने मी प्रत्येक क्रॉस कंट्रीला भाग घेतला आणि एकदा आमचा इंडिया स्क्वाड्रन पहिलासुद्धा आला होता.

क्रॉस कंट्रीचा मार्ग ग्लायडर डोमपासून सुरू होतो. पहिला एक किलोमीटरपर्यंत मोकळे मैदान आहे. मग हळूहळू रस्ता चिंचोळा होऊ लागतो. पुढे पुढे टेकडीवरून जाताना फक्त पायवाटच उरते. नंतर परत आपण रस्त्यावर उतरतो आणि तिसर्‍या बटालियनला वळसा घालून रस्ता ग्लायडर डोमकडे जातो. शेवटचा किलोमीटर अगोदर आलेले कॅडेट चियरींग करत असतात. कुणी अगदी मरगळलेला असेल तरी त्याच्या पायात कुठून बळ येते कुणास ठाऊक? तो कॅडेट शेवटचे शंभर - दोनशे मीटर स्प्रिंट मारतोच मारतो. आणि मग फिनिश लाईन पार झाली की मेल्यासारखा खाली कोसळतो. मग थोड्या वेळाने लिंबू पाणी पिऊन फ्रेश होतो आणि इतर कॅडेट्सना प्रोत्साहन द्यायला पाठीमागे जातो.

नंतर स्क्वाड्रनमध्ये जाऊन मस्त कढत पाण्याने आंघोळ. 'मीठा मीठा दर्द' सगळा निघून जातो. मग चहाचे घोट घेऊन गप्पा आणि ब्रंचसाठी मेस. एन्.डी.ए. मध्ये 'खेळ' हा एक अत्यंत महत्वाचा आणि आनंदाचा भाग आहे. प्रत्येक कॅडेटला सर्व खेळ - कमीत कमी सर्व सांघिक खेळ - आलेच पाहिजेत याकडे जाणीवपूर्वक ध्यान दिले जाते. प्रत्येक स्क्वाड्रनच्या प्रत्येक खेळासाठी सहा टीम असतात. म्हणजे जवळ जवळ ८० टक्के कॅडेट असतात. प्रत्येक कॅडेट कमीत कमी दोन-तीन टीममध्ये असतोच असतो. शिवाय क्रॉस कंट्रीमध्ये जवळ जवळ ९०-९५ टक्के कॅडेटना भाग घ्यावा लागतो. याचे कारण म्हणजे खेळांमुळे सांघिक भावना निर्माण होते. संपूर्ण आर्मीमध्ये (नेव्ही - एयर फोर्स बद्दल मला ठाऊक नाही) खेळांना खूप प्राधान्य दिले जाते. आणि माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की जो जवान चांगला खेळाडू असतो; तो प्रत्यक्ष लढाईच्या वेळी कधीही मागे पडत नाही.

http://nda.nic.in/html/nda-games-training.html पाचव्या-सहाव्या टीमच्या (अ‍ॅकॅडमीमध्ये स्ट्रिंग म्हणतात) मॅचेस म्हणजे छोट्या युद्धाचाच प्रकार असतो. हॉकीला बॉल नाही सापडला तरी चालेल; पण प्रतिस्पर्ध्याचा पाय जरूर सापडला पाहिजे Wink

बॉक्सिंग हा प्रकार तर अत्यंत प्रिय! नवीन आलेल्या प्रत्येक कॅडेटला बॉक्सिंगची एक मॅच तरी जरूर खेळावी लागते. त्याला नॉविसेस बॉक्सिंग म्हणतात. पहिल्या टर्मच्या कॅडेट्सच्या वजनवार जोड्या बनवल्या जातात आणि त्यांची बॉक्सिंग मॅच होते. नॉविसेस बॉक्सिंगला धमाल येते. तारीख जाहीर केल्यापासून स्क्वाड्रनमध्ये प्रॅक्टिस सुरू होते. सगळ्यात ज्युनियर कॅडेट असल्याने बाकीचे सगळेच जे सांगतील ते ऐकावे लागते. मग स्क्वाड्रनचा जो बॉक्सिंग कॅप्टन असतो तो बाकीच्या कॅडेटना आवरतो. मग आपल्या स्क्वाड्रनमधील कॅडेटच्या जोड्या बनवून प्रॅक्टिस केली जाते. फर्स्ट टर्मर्सना वाटायला लागते की जितक्या लवकर हे बॉक्सिंग प्रकरण संपेल तितके बरे. नॉविसेस बॉक्सिंगशिवाय रेग्यूलर बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धा वर्षातून एकदा होते. मी अर्थातच आमच्या स्क्वाड्रनच्या बॉक्सिंग टीम मध्ये होतो आणि दोन मेडलसुद्धा मिळवली, शेवटच्या टर्ममध्ये बॉक्सिंग टीमचा कॅप्टनसुद्धा झालो.

बॉक्सिंगमध्ये एक खूप मजेशीर गोष्ट घडते. कॅडेट आपले वजन कमी अगर जास्त करू पाहतात. कारण त्यांना ठाऊक असते की कुठल्या स्क्वाड्रनचा कुठला कॅडेट बॉक्सिंगमध्ये चांगला आहे. मग आपला कॅडेट त्याच वजनगटात असेल तर त्याचे एक वजनगट कमी किंवा जास्त करवणे. आणि हे सहज शक्य असते कारण वजनगट तीन-तीन किलोचे असतात. मग ज्याचे वजन वाढवायचे त्याला जास्त आहार, वजन करायच्या आधी दोन तास जेवणे वगैरे प्रकार. आता बॉक्सिंगसाठी वजने त्या दिवशी सकाळीच घेतली जातात. नंतर तासाभरात लढत सुरू होते, आता नुकताच जेवलेला (तीन तास म्हणजे नुकतेच नाही का?) बॉक्सर काय लढणार? पण हे त्या धुंदीत कळत नाही. बरं. ज्याच्यासाठी हा सगळा उपद्व्याप केला तो डोळे झाकून थोडाच बसलेला असतो? त्यानेसुद्धा आपली काही गणिते केली असणारच!

वजन कमी करायचे असेल तर आणखीनच गंमत! त्या कॅडेटला पाच सहा ब्लँकेटमध्ये गुंडाळायचे आणि उशांनी त्याची चांगली तास दोन तास धुलाई करायची. चांगला घाम गळून किलोभर वजन कमी होते. ज्युनियर कॅडेट्सना तर हे करायला खूप मजा येते. सगळी खुन्नस काढतात.

http://nda.nic.in/html/nda-equitations-training.html घोडेस्वारी हा ट्रेनिंगचा एक मोठा भाग आहे. १५-२० दिवसांतून एकदा घोडेस्वारीचे ट्रेनिंग असते. मग ते अगदी बाळबोध ट्रेनिंग पासून सुरू होते. पहिले लेक्चर असते: "ये घोडा है| घोडेको चार पाँव होते है|" मग सॅडलची माहिती, घोड्याला खरारा कसा करायचा, घोडा पळवण्याचे प्रकार - ट्रॉट, कॅन्टर, गॅलॉप वगैरे. मग प्रॅक्टिस. घोडेस्वारी करून आले की काही नाजुक कॅडेट्सना मांड्यांना घासून घासून जखमा व्हायच्या. मी इक्वेस्ट्रियन क्लब जॉइन केला होता; त्यामुळे दर बुधवारी दुपारी जायला लागायचे. घोडेस्वारी ही एक कला आहे. काही लोकांना जमते; काहींना जमत नाही. पण अ‍ॅकॅडमीमध्ये ज्यांना जमत नाही ते कॅडेट खोगीर डोक्यावर घेऊन पळत जाताना दिसतील.
............................................................................................................

अ‍ॅकॅडमीचा आणखी एक आठवण्याजोगा भाग म्हणजे ट्रेनिंग कॅम्प्स. दुसर्‍या टर्ममध्ये 'कॅम्प ग्रीन हॉर्न'
चौथ्या टर्ममध्ये 'कॅम्प रोव्हर' आणि सहाव्या टर्ममध्ये कॅम्प त्रिशुल असायचा. http://nda.nic.in/html/nda-army-training.html

ग्रीन हॉर्न मध्ये तुम्ही खरोखरच अगदीच नवशिके असता. त्यामुळे ट्रेनिंगसुद्धा मर्यादितच असते. टेन्ट आणि बिवेक बनवणे यापुरतेच ते मर्यादित असते. पण त्यात सुद्धा मजा यायची. दुसर्‍या दिवशी कॅम्प फायर. त्यात कॅडेट्सनीच तयार केलेला मनोरंजनाचा कार्यक्रम असायचा. सर्वात मुख्य अ‍ॅट्रक्शन म्हणजे 'टिप्सी पुडिंग' Happy अगदी पोटाला तडस लागे पर्यंत पुडिंग खायचे. ते सुद्धा सिनियर आणून द्यायचे; म्हणून तर त्याची मजा काही औरच असायची.

कॅम्प रोव्हरमध्ये मॅप रिडींग आणि नकाशाच्या आधारे मार्ग शोधून त्या मार्गाने जायचे. (पुढे आयुष्यभर आम्ही तेच केले पण पहिल्यांदा रोव्हरमध्ये.) आमच्या स्क्वाड्रनची गंमत झाली. कुठलातरी पॉईंट शोधायचा होता. तो तसा जवळच एका डोंगरावर असायला हवा होता. आमच्यातल्या एका 'एक्स्पर्ट' मॅप रीडर ने आम्हाला चालवत चालवत पुढे नेले. पुढे एक डोंगर आला. तरी तो पॉईंट मिळेना. मग एक गाव आले तिथे चौकशी केली तर समजले की ते ठिकाण साधारणत: चार-पाच किलोमीटर पाठीमागे राहिले होते. दुपारचे दोन वाजले होते. पोटात कावळे कोकलत होते. शेवटी आमचा एक्सरसाईज मध्यातच सोडून आम्हाला परत बोलावले गेले. तरी पोचायला रात्र झाली. कॅम्पवर पोचल्यावर आमच्या अधिकार्‍यांनी चंपी केली ती वेगळीच.

अ‍ॅकॅडमीच्या वेबसाईटवर सहाव्या टर्मच्या कॅम्पला कॅम्प तोरणा म्हटले आहे. आमच्या वेळेला सर्व कॅडेट (आर्मी, नेव्ही, एयर फोर्स - सर्वांचा मिळून कॅम्प त्रिशुल करावा अशी संकल्पना अंमलात आणली गेली. नंतर परत वेगवेगळे कॅम्प सुरू केले असावेत. आमच्या टर्मच्या आधी कॅम्प तोरणा होता.) त्रिशुलमध्ये खूप मजा आली. पहिला दिवस एयर फोर्सचा. लोहगाव विमानतळावर वेगवेगळ्या विमानांची प्रात्यक्षिके. आवाजाच्या वेगाची सीमा पार करून विमाने उडतात तेव्हा कानठळ्या बसवणारा भयंकर आवाज येतो. सुळक्या, सरळ उभे उडणे, डॉगफाईट (दोन विमानांची लढाई), टेहळणी करणे, स्ट्राफिंग (विमानातून मशिनगनचा मारा), बॉम्बिंग वगैरे प्रात्यक्षिके पाहून मस्त वाटते.

दुसरा दिवस नेव्हीचा. आय्.एन्.एस. विक्रांत दाखवली गेली. बापरे बाप! ती म्हणजे शहरातली एक पेठच म्हणावी इतकी मोठी. आता मला डिटेल्स फार आठवत नाहीत; पण भारावून गेलो होतो एवढे नक्की.

तिसर्‍या दिवसापासून आपआपल्या विंगचा वेगळा कॅम्प! नेव्हीवाले मुंबईलाच थांबले, एयर फोर्सवाले परत पुण्याला (लोहगावला) आले. आणि आम्ही आर्मीवाले मळवली स्टेशनवर उतरलो. तिथून लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना हे गड पार करून आमच्या कॅम्प साईटवर पोचलो. पोचेस्तोवर दुपार झाली होती. जेवून लगेच आमचा इलाखा सांगितला गेला तिथे खंदक खोदून डिफेन्ससाठी मोर्चाबांधणी करायची होती. आम्ही आमचे खंदक आखून घेतले. काहींनी काम सुरू केले. मी आणि राकेशकुमार म्हणून माझा एक मित्र आहे आम्ही दुसर्‍या शिफ्टमध्ये खुदाई करायचे ठरवले. झाडाखाली बसलो होतो, तेव्हड्यात कॅप्टन पृथ्वीराज पाटील आला. विचारले, "व्हॉट आर यू डुईंग?". आम्ही बावळटासारखे उत्तर दिले, "वी हॅव डिसायडेड टू वर्क इन शिफ्टस सर. सो वी आर रेस्टिंग नाऊ." त्याने आम्हा दोघांना सांगितले, "ओके. आइ शाल रिटर्न बाय सेव्हन टूमॉरो मॉर्निंग. आय वॉन्ट यू टू डिग अ ट्रेंच ऑफ फोर फीट इन लेन्थ इन सच अ मॅनर दॅट व्हेन आय गेट इनसाईड, ओन्ली टॉप ऑफ माय हेड शुड बी व्हिजिबल" कॅप्टन पाटील हा सहा फूट उंच होता आणि त्याची ख्याती सगळ्या अ‍ॅकॅडमीत 'अत्यंत खडूस माणूस' म्हणून पसरली होती. मी आणि राकेश कामाला लागलो. एक क्षणही झोपलो नाही. रात्र कधी संपली आणि पहाट झाली ते आम्हाला समजलेसुद्धा नाही. पण ते काम आम्ही पुरे केले. पनिशमेन्ट असली तरी असे राबून जे काम पूर्ण होते त्याचे समाधान काही आगळेच असते. पहाटे आम्हाला अजिबात थकवा जाणवला नाही. कॅप्टन पाटील खरोखर येऊन ट्रेन्चमध्ये उतरून खात्री करून गेला. दुसर्‍या दिवशी युद्धशात्राचा अभ्यास आणि कॅम्प फायर. तिसर्‍या दिवशी पहाटे आम्हाला लोणावळा आणि देहू रोड यांच्या दरम्यान कुठेतरी सोडले आणि इथून रूट मार्च (नकाशाच्या आधारे). संध्याकाळी पोचलो तेव्हा सगळे अंग चिंबून गेले होते. रात्री आंघोळ करून १२ तास मुडद्यासारखे झोपलो.
....................................................................................................................
http://nda.nic.in/html/nda-passing-out-parade.html पासिंग आऊट परेड चे वर्णन केल्याशिवाय एन्.डी.ए.चे ट्रेनिंग पुरे होतच नाही. पासिंग आऊट परेड हा एक मोठा सोहळाच असतो. कॅडेटसना तर पासिंग आऊट परेड चे वेध मिड-टर्म पासूनच लागतात. मग डी.एल्.टी.जी.एच. (डेज लेफ्ट टो गो होम) ची उलटी गिनती सुरू होते. शेवटचा एक महिना तर अत्यंत उत्साहाचा असतो. सगळ्या टेस्ट्स त्याच काळात असतात. शिवाय पी.ओ.पी.ची प्रॅक्टिस, त्याबरोबरच्या इतर सोहळ्यांची प्रॅक्टिस या सर्व गोष्टी आल्याच; त्यामुळे अक्षरश: श्वास घ्यायला फुरसत नसते. http://nda.nic.in/html/nda-pop-photo-gallery.html

पासिंग आऊट परेड चे खरोखर अगदी विहंगम दृष्य असते. आमच्या वेळेला बारा स्क्वाड्रन होते त्यांचे बारा स्क्वॉड आणि सहाव्या टर्मचे चार स्क्वॉड असे सोळा स्क्वॉड असायचे. पहिले सहा ज्युनियर कॅडेट्सचे नंतर चे दोन अधिक दोन (चार) सहाव्या टर्मचे आणि नंतरचे सहा परत ज्युनियर कॅडेट्सचे. परेड ग्राऊंड आयता़कृती असून एका लांब बाजूच्या मध्यावर क्वार्टर मास्टर फोर्ट आहे तर दुसर्‍या लांब बाजूच्या मध्यावर क्वार्टर डेक आहे. त्यावर फ्लॅग मास्ट आहे त्यावर भारताचा झेंडा आणि एन्.डी.ए.चा झेंडा दिमाखात फडकत असतात. बरोबर आठ वाजता क्यू.एम. फोर्टमधून स्क्वाड बाहेर पडायला सुरवात होते. पहिला आणि शेवटचा, दुसरा आणि शेवटून दुसरा, तिसरा आणि शेवटून तिसरा असे स्क्वॉड बाहेर पडतात. परेड ग्राऊंड्च्या मध्यावर आल्यानंतर ते डावीकडे आणि उजवीकडे (पहिला उजवीकडे आणि शेवटचा डावीकडे, दुसरा उजवीकडे आणि शेवटून दुसरा डावीकडे) असे वळतात; म्हणजे वर सांगितल्याप्रमाणे (सहा अधिक दोन अधिक दोन अधिक सहा) परेडसाठी उभे राहतात. मग एकामागून एक सर्व अतिथी दोन दोन मिनिटांच्या अंतराने येतात. त्यांना सॅल्यूट दिला जातो. सर्वात शेवटी मुख्य अतिथी येतात. त्यांना राष्ट्रीय सॅल्यूट (बॅण्डवर राष्ट्रगीत वाजवून) दिला जातो. मुख्य अतिथी संपूर्ण परेडचे निरिक्षण करतात. मग संचलन होते. सर्वात शेवटी परेड दोन भागात विसर्जन होते. सहाव्या टर्मचे कॅडेटसचे दोन स्कॉड क्वार्टर डेकच्या डावीकडून आणि दोन उजवीकडून स्लो मार्च करत जातात. ज्युनियर कॅडेट्च्या सहा आणि सहा स्क्वाड डावीउजवीकडून ४५ अंशाच्या कोनात सरळ क्यू.एम. फोर्टकडे स्लो मार्च करत जातात. अशा रीतीने बरोबर बाणाची आकृती तयार होते. त्याच वेळी आकाशातून विमानांचे फ्लाय पास्ट होते. सहाव्या टर्मच्या कॅडेट्स चे स्कॉड क्वार्टर डेक पार करताना अगदी डोळे भरून येतात; कारण परत कधी ते तिथे परेड करायला येणार नसतात. पण शेवटी प्रत्येक गोष्टीचा अंत होतोच होतो; हे त्रिकालाबाधित सत्य आहे. नंतर आयुष्यभर ते कॅडेट एन्.डी.ए.च्या आठवणींवर जगत असतात.
http://nda.nic.in/html/nda-movie-clips.html
.....................................................................................................................

शेवटी रॉय किणीकरांच्या ओळी म्हणून हा भाग संपवतो:

"पण लिहावयाचे लिहून झाले नाही,
पण सांगायाचे सांगून झाले नाही,
संपली कथा जी कुणी ऐकली नाही,
संपली रात्र, वेदना संपली नाही!!"
-/-/-/-/-/-/-/-/-/-/-/-/-/-/-/-/-/-/-/-/-/-/-/-/-/-/-/-/-/-/-/-/-/-/-/

गुलमोहर: 

छान आहे.. जरा इतर पुढच्या मागच्या लिंक द्या ना.. म्हणजे खूप दिवसांनी आल्यावर काही मिस होणार नाही.

एक कठोर आर्मीमॅन आणि एक हळवा गझलकार.... खरेच अतिशय अजब कॉम्बिनेशन आहात दादा तुम्ही. मस्तच लिहीताय. वाचतोय आणखी येवू द्या. Happy