एपिक चॅनेल

Submitted by स्वप्ना_राज on 22 January, 2015 - 09:50

"एकांत" ह्या एपिक चॅनेल वर दर गुरुवारी रात्री १०:३० वाजता (रिपिट टेलिकास्ट - शुक्रवार रात्रौ ८:३०) लागणार्‍या कार्यक्रमामध्ये भारतातल्या एके काळच्या गजबजलेल्या पण आता ओसाड झालेल्या जागांबद्दल माहिती देतात. हा कार्यक्रम बहुतेक नोव्हेंबर २०१४ पासून सुरु झाला असावा कारण हे चॅनेलच मुळी तेव्हा सुरु झालं. माझे सुरुवातीचे काही भाग चुकले असावेत. राजस्थानमधलं भानगढ, त्रिपुरातलं उनाकोटी आणि गुजरातमधलं लखपत ह्यावरील भाग मी पाहिले. आणि त्यावरची माहिती 'संथ चालती ह्या मालिका' इथे पोस्ट केली. ती कायमस्वरुपी साठवून ठेवावी अशी सूचना झाली म्हणून हा धागा काढला.

हे चॅनेल इथे उपलब्ध आहे - https://docs.google.com/spreadsheets/d/19tI8WWcHdygXnFWpwtOwRrco61eS-1GhemitlPpLVWo/pubhtml?gid=0&single=true

कार्यक्रमांचं वेळापत्रक - http://www.epicchannel.com/schedule

ह्या बीबीवर पुढील एपिसोडस ची माहिती आहे:

एकांतः
१. लखपत, २. उनाकोटी ३. कित्तूर किल्ला ४. न्यारमा ५. अंदमान सेल्युलर जेल ६. विलासगढ ७. हळेबिडू
८. शेखावतीमधलं रामगढ ९. काश्मीरमधलं मार्तंड मंदिर १०. शिवसागर - अहोम साम्राज्याची राजधानी ११..गुजरातचं चंपानेर १२. श्रीनगरच्या हरीपर्बत वरचा किल्ला १३. लडाखचा 'चिकटन' किल्ला
१४. अंदमान निकोबारचं रॉस आयर्लंड १५. जंजिरा किल्ला १६. लखनौ रेसिडेन्सी १७. विष्णुपुर १८. विजयदुर्ग
१९. बटेश्वर २०. हंपी २१. कुलधरा २२. कुंभालगढ २३. असिरगड २४. बिजापूर २५. कांगडा फोर्ट (हिमाचल प्रदेश)
२६. जागेश्वर २७. रामनगर २८. लेह पेलेस २९. किल्ला मुबारक ३०. मेहरोली आर्किओलॉजिकल पार्क
३१. तलक्कड, मालंगी आणि वोडीयार राजे

देवलोक - सीझन १:
१. रंग २. जीवजंतू ३. स्वर्ग नरक ४. शक्ती ५. गणपतीबाप्पा ६. देवदेवतांची शस्त्रं ७. देवतांची वाहनं ८. गंगा ९.तीर्थ १०.युग ११. देवांचं अन्न १२. सृष्टीची रचना १३. दिशा १४. देवी-देवतांचे विवाह १५. देवी-देवतांचे रूप बदलणं
१६. विष्णूचे अवतार, १७. ग्रह-नक्षत्र १८. पुराण, वेद ह्यातील वनस्पती १९. पूजा आणि विधी

देवलोक चा सीझन २ सुरु होणार आहे. त्याचा वेगळा धागा काढून इथे लिंक देईन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

६ तारखेपासुन नविन कार्यक्रम चालु होत आहेत

एक रविद्रनात टागोरानच्या कथानवर आधारित आहे

सगळ्यानि नक्कि बघा
( sorry for spelling mistakes )

...

गूड न्यूज...काल चॅनल सर्फिंग करताना डिश टीव्ही वर एपिक चॅनल सापडलं!
आता कार्टून चॅनल्समधून सुटका होऊन रिमोट हातात पडल्यास पहावं म्हणतो Happy

हा धागा सुरु करुन आणि सातत्याने एकांत बद्दल लिहून आमच्यासारख्यांच्या मनात उत्कंठा वाढवण्या बद्दल स्वप्ना_राज यांचे परत आभार Happy
कालच्या सुट्टीच्या दिवसातला भरपूर वेळ एपिक पाहण्याच्या सद्कार्यात घालवला. सकाळी ७:३० ते ११:०० फक्त एपिक !
सुरुवातीला एक कार्यक्रम होता त्यात, जम्मू-काश्मीर मधे आतापर्यंतच्या वेगवेगळ्या शासकांच्या राज्यात वापरात आलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या (दगड, धातू वगैरे) नाण्यांचा सचित्र आढावा घेतला होता.
नंतर एपिक्स टॉप टेन नावाची एक मालिका आहे, त्यात काल भारतातले १० उत्तम शासक असा विषय होता.
या मालिकेतला पुढचा एपिसोड भारतातले १० conspirators असा आहे असं दिसलं.
त्या नंतर जावेद अख्तरांचा हिंदी सिनेमांवर आधारित एक कार्यक्रम लागला होता. कालचा विषय होता काळानुरुप बदलणारे सिनेमातले 'विलन'. हा कार्यक्रम मला फारसा नाही आवडला. कदाचित जावेद अख्तर यांची सादर करायची पद्धत आवडली नाही.
एकांत (बहुतेक सिझन २ सुरु झालाय) मधे काल 'रायगड' होता. रायगड आणि त्या अनुषंगाने शिवाजी महाराज आणि मराठी साम्राज्याचा उदय ते अस्त असा थोडक्यात आढावा घेतला. रायगडाचे दाखवलेले एरियल व्ह्यू भन्नाट सुंदर होते. शिवाजी महाराजांचा या गडाचा आणि त्याच्या मजबूत बांधणीचा हेतु असा होता की मित्रांसाठी हा गड सोपा, पण शत्रूसाठी अत्यंत कठीण असा असावा. टकमक टोक, हिरकणीचा बुरुज आणि त्या मागची आख्यायिका, अफझलखानाचा वध, महाराजांची समाधी, जिजाऊंची समाधी यांची माहिती सांगितली. या गडाची आजची ही अवस्था का झाली यामागे सांगितलेली कारणं अशी: शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या नंतर काही वर्षांतच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर वारस कोण यावर मतभेद झाले. सरतेशेवटी संभाजी राजांचीच निवड उत्तराधिकारी म्हणून झाली (रच्याकने-संभाजी राजांचा फोटो म्हणून डॉ.अमोल कोल्हे दिसले इकडे Happy ). संभाजी राजांना नंतर औरंगजेबाने पकडून हालहाल करुन त्यांची हत्या केली. नंतर पेशवे आले. सरतेशेवटी इंग्रजांकडे सत्ता आल्यावर त्यांनी या किल्याला तोफांचा मारा करुन त्याची वाताहत केली. इंग्रजांच्या काळात लोकमान्य टिळकांनी महाराजांच्या समाधीची डागडूजी करण्याची विनंती इंग्रजांना केली होती. त्यावर मोठ्या नाईलाजाने इंग्रजांनी वार्षिक रु.५/- यासाठी मंजूर केले! (अर्थात जाणूनबुजून). टिळकांनी जनतेच्या मदतीने अखेर समाधी बांधून घेतली. ही माहिती माझ्या साठी नवीन होती. आजच्या घडीला शिवजयंतीला (तारखेबाबत गोंधळ असल्याचेही सांगितले Happy ) राज्याभिषेकाचा कार्यक्रम रायगडावर होतो, आणि त्या निमित्ताने राजांच्या दरबाराला पुन्हा जाग येते. एकच गोष्ट खटकली. कार्यक्रमात मधे मधे 'जय भवानी, जय शिवाजी' च्या घोषणा होत्या. त्यात 'भवानी' चा उच्चार कानाला 'भ्वानी' असा वाटत राहिला.
संध्याकाळी अदृश्य मधे 'बहिर्जी नाईक' यांच्यावर एपिसोड होता. त्याबद्दल मागे लिहिलं गेलं आहेच. सुरतेची लूट बद्दल जास्त दाखवलं होतं.
कालपासून रात्री १० वाजता नसिरुद्दीन शहा चा 'मिडविकेट' नावाचा भारतीय ओपनर्स या विषयावर कार्यक्रम सुरु होणार होता. काल पाहता आला नाही. जाहिरातीत तरी 'विजय मर्चंट' पासून 'विरेन्द्र सेहवाग' पर्यंतच्या ओपनर्सच्या कारकिर्दीवर कार्यक्रम असणार आहे असं सांगितलं.
रच्याकने, डिश टिव्ही वर चॅनल नं १२१ वर 'एपिक' दिसायला लागलंय. स्नॅपडिलची आणि कोटक महिन्द्रा बॅंकेची जाहिरात पण दिसली. या दोनच फक्त आणि त्याही एकदाच.

हा धागा सुरु करुन आणि सातत्याने एकांत बद्दल लिहून आमच्यासारख्यांच्या मनात उत्कंठा वाढवण्या बद्दल स्वप्ना_राज यांचे परत आभार >> +१
तुम्हा सगळ्यांमुळेच खास हा धागा वाचुन पॅकेज अपग्रेड करुन हे चॅनेल घेतले आहे.
धन्यवाद.

मित, स्पॉक Happy

मी इथे हेच लिहायला आले होते की एकांत कदाचित परत सुरु झालंय. काल रात्री सर्फिंग करताना अचानक ८:३० वाजता दिसलं. काल रात्री ९ ते १० 'लूटेरे' हा इंग्रजांच्या काळातील भारतातल्या लुटारू लोकांबद्दलचा कार्यक्रम होता. कोणी पाहिला का? आमच्या सेट टॉप बॉक्समध्ये काहीतरी गडबड झालेय त्यामुळे मध्येमध्ये बंद पडतो. म्हणून कार्यक्रम बघायचा उत्साह राहिला नाही. पूर्ण प्रोग्राम्सचं लिस्टिंग http://www.epicchannel.com/ वर पहा.

जावेद अख्तर ह्यांचा प्रोग्राम पहायची खूप इच्छा होती पण आमच्या घरात १० ला टीव्ही मिळणं कठिण. Sad

मित, मी जावेद अख्तर ह्यांचा कार्यक्रम थोडा वेळ पाहिला. पण मलाही तो भाग काही खास वाटला नाही. कदाचित पुढचे भाग एक थीम घेऊन असतील तर किस्से ऐकायला मजा येईल.

टागोरांची कुठली कथा सध्या चालू आहे? तिचा बहुतेक मंगळवारच्या एपिसोडचा रिपिट टेलिकास्ट मी पाहिला. आवडला. बॅकग्राऊन्डचं बंगाली गाणं सुध्दा मस्त वाटलं. पण सोम-मंगळ १०:३० ला कोड रेड लावतात आमच्याकडे. त्यामुळे रिपिट टेलिकास्टच पहावा लागेल.

नसिरुद्दीन शाह ह्यांच्या क्रिकेटवरच्या कार्यक्रमाचा थोडा भाग काल दुपारी पाहिला. तो मात्र मस्त वाटला. हा कार्यक्रम पूर्ण पहायचा प्रयत्न करेन.

तसंच २ कार्यक्रमात फीलर म्हणून छोटे छोटे तुकडे दाखवतात त्यात काल सकाळी गोहरजान ह्या गायिकेवर छान माहिती दिली.

एपिक के दस मध्ये भारतातले दहा कॉन्स्पिरेटर्स मधे नारायणरावाला मारणारे राघोबा आणि आनंदी (खरं तर हा कट आनंदीबाईंचाच ना?) आणि अलेक्झांडरला मदत करणारा अंभी राजा ह्यांच्यावर एपिसोडस आहेत म्हणे.

बॅकग्राऊन्डचं बंगाली गाणं सुध्दा मस्त वाटलं>>> +१ एक भाग पाहिला. राधिका आपटेला तिची ती शेजारीण मैत्रीण घरी बोलावून पियानो वाजवायला सांगते तो. राधिका आपटेचे छोटे छोटे एक्सप्रेशन्स कमाल होते. बहुतेक ही कथा 'चोखेर बाली' वर आधारित आहे आणि अनुराग बसुचे दिग्दर्शन आहे.

तसंच २ कार्यक्रमात फीलर म्हणून छोटे छोटे तुकडे दाखवतात त्यात काल सकाळी गोहरजान ह्या गायिकेवर छान माहिती दिली.>>> +१
फीलर म्हणून शास्त्रीय रागांवर आधारित काही ओळी पण असतात मधे मधे. छान असतात त्या ही.

एक कार्यक्रम बनारस मधील मनिकर्निका घाट जिथे २४ तास ३६५ दिवस सतत एक ना एक चिता जळत असते त्याबद्दल दाखविला होता तो कुणी पाहिला का? मी शेवटची ५ मिनि पाहिला. कोणत्या कार्य्क्रमात दाखविला होता त्याची माहिती मिळेल का?

चैत्राली जी शेवटी राधिका आपटे विधवा आश्रमात जाते व नायक तिची खुप निर्भर्त्सना करतो असे दाखवले आहे

रविन्द्रनाथ टागोर की कहानियॉ एकदम चांगली सीरियल आहे .एकदम ९०' च्या दशकातील दूरदर्शन मालिका पाहिल्याचा "फील" येतो.थॅन्क्स टू अनुराग बसु !

एपिक चॅनेल माझाही फेव्हरीट आहे... फक्त त्याचे आर्थिक गणित कसे चालते हा प्रश्न पडतो, कारण इतके दर्जेदार व वेगळे कार्यक्रम देणारे चॅनेल चालवणे फारच खर्चिक काम आहे, आणि एपिक वर जाहिराती फारश्या दिसत नाहीत !

चोखेर बाली स्टोरी संपली..५ किंवा ६ एपिसोड्स मध्ये झाली. आता अतिथी म्हणून सुरु आहे.

सहज म्हणून सर्फ केलं नेटवर तर इंटरेस्टिंग फॅक्ट कळली. मुकेश अंबानी मालक आहेत चॅनेलचे. म्हणजे...चौघांपैकी एक.

एपिक चॅनेल

Owned by:

  • Mukesh Ambani
  • Rohit Khattar
  • Anand Mahindra
  • Mahesh Samat
  • तरीच गुजरात, राजस्थान साईडच्या गोष्टी जास्त असतात एपिकवर..

    येवढ्या सुंदर चॅनलवर शास्त्रीय संगीतावर आधारीत एखादा कार्यक्रम असायला हवा.. एपिकच्या आत्तापर्यंतच्या मालिकांचा दर्जा बघता सुंदर होईल हा कार्यक्रम.

    अर्रर्र, संपली का ती कथा? Sad आता विकांताला रिपिट पण नाही बघायला मिळणार म्हणजे.

    काल एपिक के दस मध्ये भारतातल्या १० दगाबाज लोकांबद्दल माहिती होती. त्यात अलेक्झांडरला मदत करणारा अंभी, राघोबादादा, चन्द्रशेखर आझाद ह्यांचा घात करणारा त्यांचा सहकारी वगैरे अनेकांबद्दल माहिती सांगितली.

    एकांत - कुंभालगढ

    उदयपूरपासून ८० किमी वर असलेला हा किल्ला. १४३३ मध्ये बांधायला सुरुवात झाली आणि १४४८ मध्ये बांधून पूर्ण झाला. ह्या किल्ल्याभोवती ३६ किमी लांब, २४ फुट रुंद भिंत आहे. एक क्षण असं वाटेल की चीनची भिंतच आहे. चीनच्या भिंतीनंतर दुसर्या क्रमांकावर ही भिंतच येते. हा किल्ला राजस्थानमधल्या सर्वात उंच पर्वतावर बांधलाय. ही भिंत भारतातली सर्वात लांब भिंत आहे.

    असं म्हणतात की ही भिंत बांधायला घेतली तेव्हा सारखी कोसळत होती.राणा कुंभा (१४४३-१४६८) हैराण झाला. तिथून एक साधू जात होता त्याने सांगितलं की देवीचा प्रकोप झाल्याने असं होतंय. तिला शांत करायला नरबळी द्यायला हवा. पण तो स्वेच्छेने असेल तरच उपयोग होईल. पण कोणी पुढे येईना तेव्हा साधू स्वत:च नरबळी जायला तयार झाला. त्याने सांगितलं की जिथे माझं मस्तक पडेल तिथून भिंत बांधायला सुरुवात करा. तसंच झालं आणि ही भिंत उभी राहिली. आजही त्या ठिकाणी ह्या साधूची समाधी आहे.

    ही भिंत १३ पर्वतांना शिवून जाते. पूर्वीच्या काळी इथे मशाली पेटवत तेव्हा ५० किलो तूप वापरत म्हणे. ह्या किल्ल्यात आत ३०० हून अधिक मंदिरं आहेत. राजा कुम्भाचा महाल आहे. ह्या राजाच्या काळातमेवाडची खूप प्रगती झाली. त्याने ३२ किल्ले बांधले. अल्लाउद्दीन खिलजीचा राजस्थानवरचा प्रभाव कमी करायचं काम राणा कुम्भाने केलं. पण दुर्देवाची गोष्ट अशी की त्याचा खुण त्याच्या स्वत:च्या मोठ्या मुलाने कट्यार भोसकून केला. तो गादीवर बसला खरा पण जनता त्याच्या विरोधात गेली. त्यामुळे त्याला पळून जाऊन माळव्यात आश्रय घ्यावा लागला. पण तिथेही तो फार काल जिवंत राहू शकला नाही. वीज कोसळून त्याचा मृत्यू झाला असं म्हणतात.

    पुढे इथे एक घटना घडली ती भारतातल्या शेंबड्या पोराना सुध्दा ठाऊक आहे. ह्या घटनेत एक व्यक्ती होती बनबीर नावाची. ह्या बनबिरला राज्यावर बसायचं होतं. पण त्यासाठी राजपुत्राचा काटा काढणं आवश्यक होती. राजपुत्राची हत्या करायच्या उद्देशाने खोलीत आलेल्या बनबिरने त्याच्या दाईला बाळ कुठे आहे म्हणून विचारलं. राजपुत्राच्या दाईने एका बाळाकडे बोट दाखवलं आणि क्षणाचाही विलंब न करता बनबीरने त्या बाळाची हत्या केली. पण ते बाळ त्या दाईचं होतं. खरा राजपुत्र सुरक्षित होता. ती दाई होती पन्नादाई आणि तो राजपुत्र होता उदयसिंग. वयाच्या १५ व्या वर्षी तो मेवाडला आला. आणि १५४० मध्ये त्याच्या अभिषेक झाला. ह्या किल्ल्यातच त्याच्या मुलाचा, राणा प्रतापचा, जन्म झाला.

    मेवाडला मुघल सल्तनतीचा भाग बनवायचं अकबराचं स्वप्न राणा प्रतापने धुळीस मिळवलं. १५७६ मध्ये मानसिंगच्या नेतृत्वाखाली अकबराने मोठी फौज मेवाडवर पाठवली. हळदीघाटचं युद्ध झालं. पुढे १५७८ मध्ये शहाबाज खानच्या नेतृत्वाखाली आलेल्या फौजेने मात्र हा गड जिंकला. ह्याची दोन कारणं. एक तर त्यांनी इथले जलस्त्रोत दुषित करून मेवाडच्या सेनेला जेरीस आणलं. आणि दुसरं हे की मेवाडच्या सेनेने जॉ दारुगोळा साठवून ठेवला होता त्याचा अचानक स्फोट झाला. सेनेची पळापळ झाली आणि राणा प्रतापलाही निघून सुरक्षित स्थळी जावं लागलं कारण लढाई जारी ठेवणं गरजेचं होतं.

    १५९७ मध्ये प्रतापचा मृत्यू झाला. असं म्हणतात की ही वार्ता ऐकून अकबर मूक झाला. तिथे असलेल्या एका राजस्थानी गवय्याने राणा प्रतापच्या बाबत गौरवशाली पंक्ती म्हटल्या की तो कधीच दिल्लीच्या सत्तेपुढे झुकला नाही. हे ऐकून अकबराच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले.

    राणा प्रतापनंतर त्याचा मुलगा अमरसिंग गादीवर बसला. १६०५ मध्ये अकबराचा मृत्यू झाल्यावर त्याचा मुलगा जहांगीर स्वत: मेवाड जिंकायला आला. १६१५ मध्ये मेवाडने मोगली सत्तेशी तह केला. नंतर मेवाडमध्ये शांती नांदली. स्वातंत्र्य मिळाल्यावर मेवाड भारतात विलीन झालं आणि हा किल्ला ओसाड झाला.

    हा धागा सुरु करुन आणि सातत्याने एकांत बद्दल लिहून आमच्यासारख्यांच्या मनात उत्कंठा वाढवण्या बद्दल स्वप्ना_राज यांचे परत आभार >> +१
    रविन्द्रनाथ टागोर की कहानियॉ चालू केली. अतिथी पासूनच सुरवात केली. छान वाटतीये बघायला. मस्तच .
    राधिका आपटे ची कथा संपली का? पण अतिथी च्या मध्ये मध्ये ती दाखवत होते
    अशा कार्यक्रमाना रीमोट मिळताच नाही म्हणून मी रिपीट शो रेकॉर्ड करून बघते

    धागा अगोदरपासूनच असला तरी दुर्लक्ष केलं,करावं लागलं कारण डिशटिव्हीवर चॅनेल नव्हता.आता थोड्याच दिवसांपुर्वी सुरू झाल्यावर वरच्या नोंदी वाचून अर्धा दिवस हळहळ व्यक्त करण्यात घालवला.सर्वात प्रथम कुंभालगड पाहिला मि ळाला आणि हळहळ नि वली कारण तो सहलीत राहिला होता.आता रेकॅार्डही केलंय. फक्त आवाजही mp3मध्ये रेकॅार्ड केलाय जो तिकडे गेल्यावर ऐकता येईल. वीस मिनीटांचं आहे.(३७एमबी) एकंदर ही टीम फार उत्तम प्रकारे काम करत आहे.

    एकांत - असिरगड (२३ जुलै, २०१५)

    ३ वेळा जिंकला जाऊनही 'अजिंक्य' अशी ओळख असलेला किल्ला तुम्हाला माहीत आहे? तो आहे भोपाळपासून ३२० किमी अंतरावर असलेला असिरगड. मध्यकालीन युगात सगळ्यांनाच हा आपल्या ताब्यात असावा असं वाटे. १४ व्या शतकाच्या अखेरीस 'असा अहिर' ह्या व्यक्तीने हा किल्ला बांधला म्हणून ह्याचं नाव 'असिरगड' असं म्हणतात. 'असिर' ह्या फारसी शब्दाचा अर्थ 'किल्ला' असा आहे त्यावरूनही कदाचित हे नाव आलं असावं. इथला पहिला शासक म्हणजे मलिक फारुकी. ह्याचा मुलगा फार महत्त्वाकांक्षी होता. त्याला येनकेनप्रकारेण हा किल्ला काबीज करायचा होता. त्याने 'असा अहिर' असा संदेश पाठवला की आमच्या कुटुंबावर संकट आहे आणि घरातल्या महिलांना सुरक्षित ठेवायचं आहे. 'असा अहिर' ने त्यांना किल्ल्यात ठेवायची परवानगी दिली. पालखीतून आले ते नसीर खानाचे सशस्त्र सैनिक. किल्ल्यात पोचताच सैनिक बाहेर पडले आणि त्यांनी 'असा अहिर' सकट त्याच्या सैनिकांचा खातमा केला. असिरगड नसीर खानच्या ताब्यात आला. अगदी Troy ची कहाणी वाटते ना ही?

    नासिर खानने लोकांना आणि सैनिकांना किल्ल्यात राहायला घरं बांधली. ह्या किल्ल्याची खासियत अशी की ह्याच्या जमिनीच्या आतसुध्दा एक मजला आहे. त्यामुळे किल्ल्याच्या जमिनीवर जे मधूनमधून खड्डे दिसतात (मुंबईकरांना इथे नक्की होमसिक वाटेल!) ते खरं तर ह्या जमिनीखाली असलेल्या मजल्याला प्रकाशाची सोय म्हणून ठेवले आहेत. आता अर्थातच तिथे जाता येत नाही. खरं तर सुमारे ६० एकरात वसलेला हा किल्ला म्हणजे ३ वेगवेगळया पातळ्यांवर असलेले ३ किल्लेच आहेत. त्यांना नावंही वेगवगळी आहेत पण मला नीट ऐकु आली नाहीत. ह्याचा मुख्य फायदा म्हणजे किल्ल्यावर चढाई करणाऱ्या सैन्याला ३ ठिकाणी असलेल्या सैन्याशी दोन हात करताच वर जावं लागेल. ह्या किल्ल्यात एक मशीद पण आहे. ३ तळी आहेत आणि तिथे पावसाचं पाणी साठवायची सोय आहे.

    इथे एक भाग असाही आहे की तिथे गुन्हेगारांना आत उभ्या सळ्या असलेल्या खोल खड्ड्यात फेकलं जाई. तो माणूस लगेच मेला तर नशीबवान. नाहीतर सळ्यात अडकून त्याचं शरीर फाटे आणि वेदनांनी तडफडत मृत्यूची वाट पहाणं त्याच्या नशिबी येई. इथे असलेलं एक भुयार पुढे गडाच्या इतिहासात महत्त्वाची भूमिका बजावून गेलं.

    ह्या किल्ल्यात एक महादेवाचं मंदिरसुध्दा आहे. तुम्हा सगळ्यांना महाभारतातील अश्वत्थाम्याची गोष्ट माहीतच असेल. पांडवांच्या मुलांना कपटाने ठार केलं म्हणून त्याच्या कपाळावरचा मणी काढून घेण्यात आला. आणि कलियुग असेल तोवर ती भळभळती जखम घेऊन पृथ्वीवर भटकत रहायचा शाप त्याला खुद्द कृष्णाने दिला असं म्हणतात. तोच अश्वत्थामा रोज पहाटे येऊन ह्या असिरेश्वराच्या मंदिरात पांढर्या फुलांचा अभिषेक करून आपल्या पापाचं परिमार्जन करायचा प्रयत्न करतो असं म्हणतात. मागे एकदा कुतूहलापोटी मी 'अश्वत्थामा अजून दिसतो' ह्या गोष्टीवर नेटवर सर्च केला होता तेव्हा असिरेश्वराच्या मंदिराचा उल्लेख वाचला होता.

    ह्या किल्ल्यावर फारुकी वंशाने २०० वर्षं राज्य केलं. हा किल्ला जिंकायला अकबर स्वत: आला. ह्या किल्ल्यावर डेरा टाकून इथून दक्षिण काबीज करायचा त्याचा बेत होता पण इथे तेव्हा राज्य करत असलेल्या बहादूर खानाने त्याला मदत करायला नकार दिला. तेव्हा अकबराने त्याला धडा शिकवायचं ठरवलं. पण किल्ला सरळ लढाई करून जिंकता येणार नाही हे अकबराला माहीत होतं. त्याला गडावर असलेल्या भूयाराची माहिती मिळाली आणि घोरपडीचा वापर करून त्याचे सैनिक भुयारातून वर चढून गेले आणि त्यांनी किल्ला काबीज केला.

    ह्याच घटनेचं दुसरं व्हर्जन असं की अकबराने बहादूरखानला बोलणी करायला बोलावलं आणि कैद केलं. बहादूरखानच्या सेनापतीला, याकुब खानला हे कळलं आणि त्याने आपला मुलगा मुकर्रब ह्याला अकबराकडे बोलणी करायला पाठवलं पण अकबराने मुकर्रबला मारून टाकल,. हे कळलं तेव्हा याकुब म्हणाला की हा किल्ला असा सहजासहजी कोणाच्या हाती कधीच येणार नाही. एक तर तो जिंकायला स्वत: देवाला यावं लागेल नाहीतर फितुरी झाली तरच किल्ला पडेल. त्याचे बॉल खरे झाले. ह्यानंतर असिरगडावर युद्ध झालं नाही. किल्ला पुढे निजामाच्या ताब्यात गेला तोही त्याने सैनिकांचा २ वर्षांचा पगार द्यायचं कबुल केलं आणि बाकीच्या अधिकार्यांना पैसे चारले तेव्हाच. पुढे इंग्रज-मराठे युध्द झालं आणि १८१८ मध्ये किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. अजूनही किल्ल्यावर इथे मरण पावलेल्या इंग्रजांच्या कबरी आहेत.

    इंग्रजांनी हा किल्ला प्रशासानाचं मुख्य केंद्र बनवलं. इथे कोर्ट हाऊस, जेल वगैरे बांधलं. ह्या कारागृहात क्रांतिकारकांना ठेवलं जात असे. त्यांनी हा किल्ला भारतातल सर्वात बलशाली आहे असं त्याचं वर्णन केलं होतं. पण आपल्या स्वभावधर्माला अनुसरून त्यांनी हा किल्ला पुढे आपल्यालाच त्रासदायक होऊ नये म्हणून त्यातल्या बऱ्याच सुरक्षा व्यवस्था निकामी करून टाकल्या हेही खरंच (हरामखोर लेकाचे!). असो. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर इंग्रजांची शेवटची तुकडी इथून निघून गेली आणि किल्ला निर्जन झाला.

    हे भाग बघताना मला नेहमी असं वाटतं की हे किल्ले ओसाड आहेत तेच बरं आहे. उद्या उगाच जतन वगैरे करून पर्यटनस्थळ झाले तर जागोजाग गुटका आणि चिप्सची पाकिटं आणि 'अमुक लव्हज तमुक' वगैरे संदेश दिसतील. आपल्या इतिहासाबद्दल प्रेम आणि सार्वजनिक ठिकाणी कसं वागायचं असतं ह्याची अक्कल हे दोन्ही नसलेल्या ह्या देशात हा 'एकांत' म्हणजे एक इष्टापत्ती आहे.

    Pages