"एकांत" ह्या एपिक चॅनेल वर दर गुरुवारी रात्री १०:३० वाजता (रिपिट टेलिकास्ट - शुक्रवार रात्रौ ८:३०) लागणार्या कार्यक्रमामध्ये भारतातल्या एके काळच्या गजबजलेल्या पण आता ओसाड झालेल्या जागांबद्दल माहिती देतात. हा कार्यक्रम बहुतेक नोव्हेंबर २०१४ पासून सुरु झाला असावा कारण हे चॅनेलच मुळी तेव्हा सुरु झालं. माझे सुरुवातीचे काही भाग चुकले असावेत. राजस्थानमधलं भानगढ, त्रिपुरातलं उनाकोटी आणि गुजरातमधलं लखपत ह्यावरील भाग मी पाहिले. आणि त्यावरची माहिती 'संथ चालती ह्या मालिका' इथे पोस्ट केली. ती कायमस्वरुपी साठवून ठेवावी अशी सूचना झाली म्हणून हा धागा काढला.
हे चॅनेल इथे उपलब्ध आहे - https://docs.google.com/spreadsheets/d/19tI8WWcHdygXnFWpwtOwRrco61eS-1GhemitlPpLVWo/pubhtml?gid=0&single=true
कार्यक्रमांचं वेळापत्रक - http://www.epicchannel.com/schedule
ह्या बीबीवर पुढील एपिसोडस ची माहिती आहे:
एकांतः
१. लखपत, २. उनाकोटी ३. कित्तूर किल्ला ४. न्यारमा ५. अंदमान सेल्युलर जेल ६. विलासगढ ७. हळेबिडू
८. शेखावतीमधलं रामगढ ९. काश्मीरमधलं मार्तंड मंदिर १०. शिवसागर - अहोम साम्राज्याची राजधानी ११..गुजरातचं चंपानेर १२. श्रीनगरच्या हरीपर्बत वरचा किल्ला १३. लडाखचा 'चिकटन' किल्ला
१४. अंदमान निकोबारचं रॉस आयर्लंड १५. जंजिरा किल्ला १६. लखनौ रेसिडेन्सी १७. विष्णुपुर १८. विजयदुर्ग
१९. बटेश्वर २०. हंपी २१. कुलधरा २२. कुंभालगढ २३. असिरगड २४. बिजापूर २५. कांगडा फोर्ट (हिमाचल प्रदेश)
२६. जागेश्वर २७. रामनगर २८. लेह पेलेस २९. किल्ला मुबारक ३०. मेहरोली आर्किओलॉजिकल पार्क
३१. तलक्कड, मालंगी आणि वोडीयार राजे
देवलोक - सीझन १:
१. रंग २. जीवजंतू ३. स्वर्ग नरक ४. शक्ती ५. गणपतीबाप्पा ६. देवदेवतांची शस्त्रं ७. देवतांची वाहनं ८. गंगा ९.तीर्थ १०.युग ११. देवांचं अन्न १२. सृष्टीची रचना १३. दिशा १४. देवी-देवतांचे विवाह १५. देवी-देवतांचे रूप बदलणं
१६. विष्णूचे अवतार, १७. ग्रह-नक्षत्र १८. पुराण, वेद ह्यातील वनस्पती १९. पूजा आणि विधी
देवलोक चा सीझन २ सुरु होणार आहे. त्याचा वेगळा धागा काढून इथे लिंक देईन.
मस्त माहिती, स्वप्ना!
मस्त माहिती, स्वप्ना!
मस्त माहिती!
मस्त माहिती!
जागेश्वर, एकांत (२७ ऑगस्ट,
जागेश्वर, एकांत (२७ ऑगस्ट, २०१५)
उत्तराखंड राज्यातल्या कुमाऊ क्षेत्रात अल्मोडा पासून ३६ किमी दूर देवदार वृक्षांच्या राईत वसलंय जागेश्वर धाम. बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री ही चारधामं सर्वांना माहीत आहेत.पण कुमाऊ परिसरात लोकांची अशी समजूत आहे की ही धामं एके काळी चार नसून पाच होती. पाचवं धाम जागेश्वर होतं.
जागेश्वरजवळच जटागंगा नदी वहाते. हा एकूण छोट्यामोठ्या १२४ मंदिरांचा समूह आहे. प्रत्येक मंदिरात एक शिवलिंग आहे. आज पूजा प्रार्थना फक्त ४-५ मंदिरांत होते. बाकीची मंदिरं शिल्पकृतीसारखी आहेत. देशातल्या १२ ज्योतिर्लिंगापैकी आठवं इथल्या एका मंदिरात आहे. काही मंदिरांची तोंडं पश्चिमेला, काहींची उत्तरेला, तर काहींची पूर्वेला आहेत. ह्याचं कारण असं की १०८ मंदिरं शंकराची आहेत. बाकीची अन्य देवतांची आहेत. त्यांच्या दिशानुसार मंदिरांची तोंडं त्या त्या दिशेला आहेत. इथल्या जागनाथ मंदिरात ज्योतिर्लिंगाची स्थापना आहे त्यामुळे ते इथलं सर्वात महत्त्वाचं मंदिर आहे. इथे आजही विधीवत पूजा होते.
असं म्हणतात की ही ती जागा आहे जिथे भारतात सर्वप्रथम लिंगपूजेची सुरुवात झाली. ह्यामागची कथा मोठी रोचक आहे, सत्ययुगातली. सतीच्या निधनानंतर ह्या भागात शंकर तपश्चर्या करायला आले. काही ऋषी तेव्हा इथे एका यज्ञाचे आयोजन करायला आले होते. त्यांच्या बायका इथे हवनसामग्री गोळा करायला येत असत. तप करणाऱ्या शिवाला पाहून त्या मंत्रमुग्ध झाल्या आणि मूर्च्छित झाल्या (हिंदी शब्द अचेत). ऋषींनी जेव्हा येऊन हे पाहिलं तेव्हा शंकराला न ओळखून रागावून त्याला शाप दिला की तुझं लिंगपतन होईल. तसं झाल्यावर विष्णूने आपल्या चक्राने त्या लिंगाचे १२ भाग केले. जे पृथ्वीवर वेगवेगळ्या ठिकाणी पडले त्यांना ज्योतिर्लिंग म्हणतात. त्या दिवसापासून शंकराची लिंगरूपात पूजा होते.
स्कंदपुराणातील मानसखंडात १२ ज्योतिर्लिंगाचं वर्णन विस्तृत वर्णन केलं गेलं आहे. ह्यात त्यांचं भौगोलिक वर्णनसुध्दा आहे. ह्यात 'नागेशं दारुकावने' म्हणजे देवदार वृक्षांच्या राईत वसलेलं जागेश्वर असा उल्लेख आहे. मात्र काहींच्या मते द्वारकेपासून १३ किमी दूर नागेश्वर ज्योतिर्लिंगाबद्दलचं हे वर्णन आहे. आदिगुरु शंकराचार्य ह्यांचं द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र विकीकृपेने:
सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनम् ।
उज्जयिन्यां महाकालमोकांरममलेश्वरम् ।
परल्यां वैद्यनाथं च डाकिन्यां भीमशंकरम् ।
सेतुबंधे तु रामेशं नागेशं दारूकावने ।
वाराणस्यां तु विश्वेशं त्रयंम्बकं गौतमीतटे ।
हिमालये तु केदारं घुश्मेशं च शिवालये ।
ऐतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातः पठेन्नरः ।
सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति ।
जागेश्वरपासून थोडं दूर आहे दंडेश्वर मंदिर आहे जिथे ऋषींनी शंकराला तो शाप दिला. काही कथांनुसार जागेश्वरला 'बालजागेश्वर' असंही म्हणतात. ह्यामागेही एक कथा आहे. शिव इथे तप करत असताना ह्या गावातल्या स्त्रिया त्यांच्यावर मोहित झाल्या. आणि त्याला रिझवायचा प्रयत्न करू लागल्या. त्यामुळे इथल्या पुरुषांना संकोच वाटायला लागला. तेव्हा शंकरांनी त्यांना आश्वासन दिलं की ते इथे बालरुपात तप करतील. म्हणून हे स्थळ 'बालजागेश्वर'.
काही लोक असंही मानतात की ह्या मंदिराची रचना पांडवांनी केली - द्वापारयुगात स्वर्गारोहणाच्या वेळी. स्वत:चा अंत्यसंस्कार स्वत: करून मग सदेह स्वर्गारोहण करता येत असे. असं म्हणतात की जटागंगा नदीत स्वत:चा अंत्यसंस्कार करून पांडव सदेह स्वर्गात गेले. म्हणून हे स्थान महत्त्वाचं.
इतिहास असं सांगतो की ८ ते १० व्या शतकात कत्युरी राजवंशाने ह्या मंदिराची बांधणी केली. ह्या लोकांआधी इथे लाकडाची मंदिरं बांधत असतं. पण ह्या लोकांनी इथे दगडी मंदिर बांधायला सुरूवात केली. जोवर त्यांची सत्ता होती तोवर ते मंदिरं बांधत राहिले. म्हणून इथे एव्हढी मंदिरं आहेत. इथलं पहिलं आणि महत्त्वाचं मंदिर महामृत्युंजयाचं. इथून मंदिर बांधणीला सुरुवात झाली असं म्हणतात. हे मंदिर १२०० वर्षं जुनं आहे.
असं म्हणतात की त्या काळी कैलास मानसरोवरला जायचा रस्ता जागेश्वरवरून जात असे. तीर्थयात्री आधी इथे येत आणि मग मानसरोवरला जात. हे एव्हढं जागृत मानत की इथे केलेली कोणतीही इच्छा पूर्ण होत असे. आदिगुरु शंकराचार्य स्वत: इथे आले होते. ह्यांचा जन्म ८ व्या शतकात झाला होता. महामृत्युंजयाच्या मंदिराची स्थापना त्यांनी केली. पण इथे जे मागेल ती इच्छा पूर्ण होते तर पुढील काळात लोक नाही नाही त्या गोष्टी मागतील आणि अधर्म माजेल म्हणून मंत्र म्हणून त्यांनी ही शक्ती सीमित केली असं म्हणतात.
पण ही मंदिरं ओसाड का झाली? इथे काही तोडफोड, नासधूस झाल्याची खुण नाही. ११ व्या शतकापर्यंत कत्युरी वंशाचं राज्य होतं. मग त्यांच्यात मारामाऱ्या झाल्या. पुढे आलं चंद वंशीयाचं राज्य. ह्यांनीसुध्दा मंदिर बांधली, देखरेख केली, जमिनी दान दिल्या, पूजेची व्यवस्था केली. १७४५ च्या आसपास रोहिल्याचं आक्रमण झालं. त्यात चंद वंशाचे राजे हरले. रोहील्यानी जागेश्वरची नासधूस करायचा प्रयत्न केला असं म्हणतात. पण ह्याबाबत निश्चित माहिती मिळत नाही.ह्या पराभवानंतर चंद वंशीय कमजोर झाले. ह्याचा परिणाम जागेश्वर वर झाला. त्यांच्याकडून मिळणारं सहाय्य कमी झाल. १७९० च्या आसपास गोरखा सत्ता आली. ती पुढे २५ वर्षं टिकली. खूप अराजक माजलं, लोकांवर अत्याचार झाले. त्यांना कंटाळून कुमाऊ लोकांनी इंग्रजांना इथे राज्य करायची सन्धी दिली. इंग्रज येताच गोरखाना बाहेर पडावं लागलं. पण ह्या सगळ्या धामधुमीत जागेश्वर यात्रेकरुंच्या विस्मरणात गेलं. इथे लोकांचा राबता कमी झाला.
२० व्या शतकात जेव्हा भारतीय पुरातत्त्वखात्याकडे ह्या मंदिराची जबाबदारी आली तेव्हा इथल्या अनेक मंदिरांतून मूर्ती चोरीला गेल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. बाकी मूर्ती सुरक्षित रहाव्यात म्हणून त्यांनी इथून जवळच एका संग्रहालयात हलवल्या आहेत. ज्या देवाकडे लोक संरक्षण मागतात त्यालाच सुरक्षित ठेवायला काचेमागे ठेवायची वेळ आली हे कलियुग.
ही मंदिरं ओसाड व्हायची कारणं इतिहास काहीही सांगो. पण इथे असलेल्या एका पुजाऱ्याच्या मते मात्र इथे असेच लोक येतात ज्यांचं पूर्वजन्मीचं संचित असलं पाहिजे आणि ज्यांना भगवान शंकरांकडून बोलावणं येतं. हे ऐकून माझी मात्र इथे जायची प्रबळ इच्छा झाली आहे.
मस्त लिहीतेस स्वप्ना !
मस्त लिहीतेस स्वप्ना ! मिसलेले भाग इथे वाचून काढले.ऐकून माझी मात्र इथे जायची प्रबळ इच्छा झाली आहे. स्मित>>>. माझीपण
मित,rmd, देवकी मंजूताई,
मित,rmd, देवकी
मंजूताई, आजकाल एकांतचं ऑडिओ रेकॉर्डिंग करून ते ऐकून इथे लिहिते. जी आहे ती माहिती त्यांच्याच शब्दांत आहे. माझं त्यात काही नाही
रामनगर, एकांत (३ सप्टेंबर,
रामनगर, एकांत (३ सप्टेंबर, २०१५)
जम्मूपासून १०० किमी जम्मू-काश्मीरच्या उध्धमपूर जिल्ह्यात रामनगर आहे. ह्या नावाचं भारतातल्या प्रत्येक राज्यात निदान एक तरी ठिकाण असेल. इंटरनेट वर रामनगर टाईप केलं तर अख्खी लिस्ट मिळते. आणि कुठलंही रामनगर, मग ते गाव असो, खेडं किंवा शहर, त्याला स्वत:चा एक मनोरंजक इतिहास आहे. तसंच ह्या रामनगरचंही आहे. पण ह्याबद्दलही माहिती सहजपणे मिळत नाही.
हे एक प्राचीन ऐतिहासिक शहर आहे. ह्यात ३ महत्त्वाच्या इमारती, खरं तर महाल, बाकी आहेत - पुराना महल, नया महल आणि शीश महल. एक किल्ला आहे - डोगरा घराण्याच्या राजांनी बांधलेला. हे घराणे जम्मूचं आणि हे राजे स्वत:ला प्रभु रामचंद्राचे वंशज मानतात.
पुराना महल - ही सर्वात जुनी इमारत. ह्याला महल म्हणतात खरं पण हा किल्ल्यासारखा जास्त दिसतो. ह्यातल्या मुख्य अंगणाच्या दोन्ही बाजूला खोल्या आहेत. पूर्वीच्या काळी इथे चारी बाजूंना खोल्या असाव्यात. वर जायला जिने असतील. ही इमारत ३ मजल्यांची आहे. कदाचित राजपरिवार इथे रहात असावा. आज ह्याची बाहेरून बरीच पडझड झाली आहे. मात्र इथे अजूनही पहाडी चित्रकलेचे अवशेष दिसतात. इथल्या भित्तीचित्रांबद्दल इंटरनेटवर माहिती आहे. आज ही चित्रं कालानुरूप थोडी फिकी झाली आहेत. भिंतीवर आणि लाकडी छतावर सुध्दा चित्रं आहेत. एके काळी ती फार सुरेख दिसत असावीत. सर्वात वरच्या मजल्यावरून पूर्ण रामनगर दिसतं. हा महल राजा सुचेतसिंगाने बनवला असं म्हणतात.
१८ व्या शतकात जम्मू भाग २२ संस्थानात विभागला गेला होता. राजा रणजितदेव, जो त्याच्या काळातला इथला सर्वात सामर्थ्यवान राजा मानला जातो, त्याने ही सर्व एकत्र आणली. ह्याचे गुलाबसिंग, ध्यानसिंग आणि सुचेतसिंग त्याचे नातू होत. १७९८ महाराज रणजितसिंगने लाहोर जिंकलं तेव्हा पूर्ण डोगरा कुटुंब १८१०-१२ च्या दरम्यान लाहोर दरबार मध्ये काम करू लागलं. १८१५ मध्ये महाराज रणजितसिंगने जम्मू वर ताबा मिळवला तेव्हा त्याने तिन्ही भावांना जम्मू भागात जहागीर दिली. महाराज रणजितसिंगच्या मृत्यूनंतर (जुन, १८३९) सुचेत सिंगाचे शिखांशी मतभेद झाले. त्यानंतर अशी स्थिती आली की सकाळी एक राजा असेल तर रात्री दुसराच. त्यानंतर रणजितसिंगच्या मुलाचा, खरकसिंगचा, मृत्यू झाला. मग ध्यानसिंगची (जो प्रधानमंत्री होता) हत्या झाली. त्याचा मुलगा प्रधानमंत्री झाला, त्याचा मृत्यू झाला. शिखांशी झालेल्या लढाईत सुचेत सिंगाचा १८४४ मध्ये मृत्यू झाला. त्याचा वारस नव्हता. त्याच्या मोठ्या भावाचा मुलगा, रणबीर सिंग, जम्मू काश्मीरचा राजा झाला. त्याच्यानंतर त्याचा धाकटा मुलगा रामसिंग गादीवर आला. सुचेत सिंगानंतर रामसिंग इथला महत्त्वाचा राजा मानला जातो. नया महल (पुराना महलच्या मागे) ह्यानेच उभारला. इथेही भिंतीवर तशीच भित्तीचित्र आहेत पण त्यांचे रंग जास्त टिकलेत.
पण सर्वात सुरेख चित्रकारी आहे ती शीश महलमध्ये. हाही राजा रामसिंगनेच बांधला. ह्याचे तीन भाग आहेत - दरबार किंवा दिवान-ए-खास, रंगमहाल आणि शीश महल. असं म्हणतात की इथली चित्रं एव्हढी सुरेख आहेत की जगातल्या कुठल्याही आर्ट गेलरी पेक्षा तसूभरही कमी पडणार नाहीत. पण इथे केमेरे न्यायला परवानगी नाही कारण पुरातत्त्वखात्याने चित्रांना बाधा येऊ नये म्हणून इथे फोटो काढण्यास किंवा व्हिडीओ शुटींग करण्यास मनाई केली आहे. त्यामुळे ह्या कार्यक्रमात ती चित्रं दाखवली नाहीत. पण एन्करने म्हटलं की भिंतीवर एकही इंच जागा नाही जिथे चित्रं नाहीत. बऱ्याच चित्रांत सोनेरी रंगांचा समावेश आहे. हे एव्हढंच बघायला यावं एव्हढ हे सुरेख आहे. रामनगरमधल्या ह्या चित्रांच्या निर्मितीला राजा सुचेत सिंग आणि रामसिंगने प्रोत्साहन दिलं.
इथून ८०० मीटर दूर राजा सुचेत सिंगने एक किल्ला बनवला. ह्याला रामनगरचा किल्ला म्हणतात. किल्ला छोटासाच आहे. कदाचित तो बनवण्यामागे हा हेतू असावा की आक्रमण झालंच तर रामनगरचं रक्षण करणारया सेनेला थोडा फायदा मिळावा. ह्या प्रदेशात अशी पध्दतच होती की प्रत्येक राजाचा एक किल्ला असायचा. इथे लहानमोठे असे जवळपास १०० किल्ले आहेत. म्हणून दुर्ग ह्या शब्दाच्या अपभ्रंशाने 'डोगरा' हे नाव घराण्याला मिळालं. राजा सुचेत सिंग बहुतकरून लाहोर किंवा पेशावर ला रहात असे. आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी सुध्दा कदाचित त्याने हा किल्ला बनवला असावा. आज ह्याची देखरेख व्यवस्थित होते आहे. मग इथले लोक कुठे गेले?
१८९९ मध्ये रामसिंग चं निधन झालं. त्यानंतर इथे लक्ष देणारं कोणी उरले नाही. १९४७ मध्ये जम्मू-काश्मीर भारतात विलीन झालं. मगही इथे कोणाचं लक्ष गेलं नाही. त्यामुळे हा भाग ओसाड झाला. सुचेत सिंगच्या मृत्यूपर्यंत सती परंपरा संपली होती. पण लोकांनी समजावून सांगूनही त्याची पत्नी सती गेली. तिची समाधी इथून जवळच आहे.
रामनगरचा भाग अर्धाच पाहिला.
रामनगरचा भाग अर्धाच पाहिला. मस्त होता. एकांतच्या ट्रेलर मध्ये रायगडाचे शॉट्स जबरी घेतलेत.
गेल्या वेळच्या संरचनामध्ये कान्हेरी गुंफांवर कार्यक्रम होता तो पण मस्त होता.
मगाशी एपिक के १० मधे इंडियाज
मगाशी एपिक के १० मधे इंडियाज टॉप १० ब्रॅण्डस् हा विषय होता. स्वातंत्र्यपूर्व काळापासून चालू असलेल्या भारतीय ब्रॅण्डस् ची माहिती सांगितली. ऍड गुरु प्रल्हाद कक्कर आणि भरत दाभोळकर माहिती सांगत होते. अमूल, अंबासडर कार, डाबर, ताज ग्रुप, रेमंडस, पारलेजी, खादी, विको, नल्ली आणि टाईम्स ऑफ़ इंडिया
१० मधली विको आणि पारले जी ही २ मराठी नावं ऐकून फार अभिमान वाटला.
लेह पेलेस, एकांत (१० सप्टेंबर
लेह पेलेस, एकांत (१० सप्टेंबर २०१५)
लडाख ह्या शब्दाचा लडाखी भाषेत अर्थ आहे उंच पर्वतराजीचा प्रदेश. इथं यायचा रस्ता एव्हढा दुर्गम आहे की लडाखी भाषेत एक म्हण आहे - खास मित्र किंवा कट्टर शत्रूच इथं यायची तसदी घेतील. लडाखच्या इतिहासात हेच तर झालंय. पण त्याबद्दल पुढे येईलच. तर इथे आहे जगातल्या सगळ्यात जुन्या गगनचुंबी इमारतीपैकी एक आणि भारतातली सर्वात जुनी शाबूत असलेली गगनचुंबी इमारत - नऊ मजली लेह पेलेस.
लडाखची राजधानी लेह श्रीनगरपासून जवळपास ४३० किमी दूर आहे. इथली ओळखायला सर्वात सोपी इमारत म्हणजे हा लेहचा राजमहाल. आजच्या काळात गगनचुंबी इमारत म्हणजे काही नाविन्य नाही. पण तेव्हाच्या काळात ७ मजले जमिनीवर आणि २ जमिनीखाली असलेली इमारत नाविन्यच असणार. आता ही जागा एकदम ओसाड झालेय.
इथलं राजघराणं नामग्याल - ह्या शब्दाचा अर्थ 'विजयी'. ह्या वंशाची स्थापना ताशी नामग्यालने केली १४ व्या शतकात. त्याचा नातू सेन्गे नामग्याल. त्याने हा महाल बांधला. ह्या महालाच्या बांधकामात अनेक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आहेत. हा उभारला आहे तो पर्वताच्या ग्रेनाईट दगडाचा पाया धरून. भिंतीचा खालचा भाग दगडांचा आहे तर वरचा भाग भाजलेल्या मातीचा आहे. त्यामुळे इमारत वरून हलकी राहते आणि भारामुळे पडायचा धोका रहात नाही. दगडांना व्यवस्थित कापून भिंती उभारल्या आहेत. त्यात अंतराअंतराने लाकडी ओंडके घातलेत. त्यामुळे पूर्ण बांधकामाला मजबुती आली आहे. हिमालयाच्या पर्वतीय प्रदेशात नेहमी होणार्या भूकंपापासून रक्षण व्हावं हा हेतू. असं म्हणतात की महाल बांधून पूर्ण झाल्यावर मुख्य कारागिरांचे हात छाटण्यात आले जेणेकरून त्यांनी पुन्हा अशी इमारत बांधू नये. इतिहासकार म्हणतात की महाल बांधून व्हायला जवळपास ४ वर्षं लागली.
४ ते ६ मजले दरबारी कामासाठी वापरत असत. वरच्या मजल्यावर राजपरिवार राही. इथे आज काही चित्रं दिसतात. पण ती त्या काळातली आहेतच असं खात्रीपूर्वक सांगता येत नाही. ५ व्या मजल्यावर राजघराण्याचं खाजगी मंदिर होतं जे अजून वापरात आहे. तिथे पूजासुध्दा होते. चौथ्या मजल्याच्या छतावर सार्वजनिक समारंभ होत.
एकेकाळी लेह एका सामर्थ्यवान साम्राज्याची राजधानी होती. आणि हा महल त्या सामर्थ्याचं प्रतिक होता. हिमाचलच्या कुलू-मनाली पर्यंत त्यांचं राज्यशासन चालत होतं. तिबेटच्या ल्हासा मधला दलाई लामांचा पोटाला पेलेस हा लेह पेलेस वरून प्रेरणा घेऊन बनवला आहे. पण विश्वप्रसिद्ध झाला पोटाला पेलेस, लेह पेलेस नव्हे. लडाखी राजांच्या मुघलांशी काश्मीर मध्ये अनेक लढाया झाल्या असल्या तरी मुघल राज्य किंवा धर्मप्रसार करायला इथे कधीच आले नाहीत. लेह पेलेसच्या दुर्दशेला सुध्दा ते जबाबदार नाहीत.
लडाखच्या इतिहासात भारताच्या कुठल्याही भागातून कधीही आक्रमण झालं नाही. फक्त एक अपवाद सोडून. इथे स्वारी झाली ती जम्मू आणि काश्मीर च्या राजा राजसिंहच्या डोगरा जनरल जोरावर सिंगची - १८३४ मध्ये. इथे हिवाळ्यात तापमान -४२ पर्यंत उतरतं. पण असलं तापमान सहन करत झांस्कार च्या पर्वतराजीतून सेना घेऊन तो तेव्हा आला होता. तेही एव्हढ्या वेगाने की लडाखचा राजा बेसावध होता. नामग्याल युद्ध हरले. ही स्वारी झाली तरी का? तर जम्मूच्या राजाने काश्मीर आणि त्याच्या आजूबाजूचा प्रदेश ७५ लाखाला घेतला होता. ती किंमत त्याला भरून हवी होती. तेव्हाच्या लडाखी राजाने काही पैसे दिले असते तर जोरावरसिंग निघून गेला असता. पण इथल्या महाराणीने नकार दिला. युध्दात ह्या महालाची बरीच हानी झाली. राजपरिवाराला इथून काही अंतरावर असलेल्या स्तोक च्या राजमहालात नेयात आलं. लेहवर नियंत्रण ठेवायला जोरावरसिंगने लेह पेलेसपासून थोड्या अंतरावर एका किल्ल्याची बांधणी केली. मातीपासून बनवलेला हा किल्ला एव्हढा मजबूत की आधुनिक काळातही त्याचा उपयोग केला गेला. ह्याला 'जोरावर फोर्ट' म्हणतात. आज ह्या किल्ल्याचं नियंत्रण भारतीय सेनेकडे आहे. त्यांचा घोड्याचा तबेला त्याच जागेवर आहे जिथे एके काळी जोरावर सिंगचा घोड्यांचा तबेला होता. तेव्हाच्या काळातली एक विहीर सुध्दा इथे अजून आहे.
लेहचा पाडाव केल्यावर जोरावर सिंगने तिबेट जिंकण्याचा विचार केला. आपल्या राजाच्या, राजसिंहच्या, सल्ल्यावरून त्याने ल्हासा वर हल्ला केला. तिथे ब्रिटिशांनी आधीच धोक्याची सूचना दिली कारण तेव्हा ल्हासा आणि तिबेटमध्ये त्यांचे हितसंबंध होते. युध्दासाठी तिबेटी लोकांना त्यांनी शस्त्रं आणि युद्धसामुग्री पुरवली. जोरावर सिंग युध्दात मरण पावला.
१९४७ मध्ये लडाख भारतात विलीन झालं. त्यानंतर हा किल्ला ओसाड झाला.
१७ सप्टेंबरला बटेश्वर वर
१७ सप्टेंबरला बटेश्वर वर रिपीट एपिसोड होता. बटेश्वर वर इथं आधीच लिहिलं आहे.
थँक्यू गं , स्वप्ना!
थँक्यू गं , स्वप्ना!
अय्यो, अम्मा, थॅन्क्यू किस
अय्यो, अम्मा, थॅन्क्यू किस बात का जी?
किल्ला मुबारक, एकांत (२४
किल्ला मुबारक, एकांत (२४ सप्टेंबर २०१५)
भारतात एखादा वाळवंटी प्रदेश पाहिला तर तो राजस्थानातला आहे अशीच तुमची समजूत होईल. पण हा भाग पंजाबमध्ये येतो असं म्हटलं तर तुमचा विश्वास बसेल का? कारण पंजाब म्हणजे हिरवीगार शेतं असंच समीकरण आहे. पण एके काळी पश्चिम पंजाब एका मोठ्या वाळवंटाची हद्द होता. त्याचं नाव चोलीस्तान. तुर्की भाषेत ह्याचा अर्थ होतो नापीक जमीन. अमृतसरपासून२०० किमी दूर आहे भटिंडा जे ह्या चोलीस्तान ची पूर्वेची हद्द होती. इथे २००० वर्षांपुर्वीचा एक किल्ला एकांतात हळूहळू नष्ट होतोय. हाच तो किल्ला मुबारक.
एके काळी वाळवंटातली रेती इथपर्यंत यायची. असं म्हणतात की तेव्हा हा किल्ला दुरून एखाद्या जहाजासारखा दिसायचा. हा बनवण्याचं श्रेय काही लोक राजा कनिष्कला देतात. हा राजा दुसऱ्या शतकात होऊन गेला. काही जण राजा भट्टीरावचा ह्याच्याशी सम्बंध जोडतात. हा तिसऱ्या शतकात होऊन गेला. हा किल्ला जेव्हा पतियाला घराण्याच्या ताब्यात गेला तेव्हा ह्याचं नाव 'किल्ला मुबारक' पडलं. आधी ह्याला भटिंडा चा किल्ला म्हणत. 'मुबारक' म्हणजे शुभ. विचार केला तर लक्षात येतं की हा किल्ला ज्या काळी जेरुसलेम मध्ये भगवान येशू होते तेव्हाच्या कालापासून इथे उभा आहे. पण आज ह्याची एव्हढी पडझड झाली आहे की काही भागात जाणंही सुरक्षित नाही. ह्या किल्ल्याचं वैशिट्य हे की हा पूर्णपणे विटांचा बनलेला आहे. अश्या प्रकारे विटांचा बनलेला भारतातल सगळ्यात प्राचीन आणि मोठा किल्ला आहे. ह्या विटासुध्दा थोड्या वेगळ्या आहेत. थोड्या छोट्या आणि पातळ आहेत. ह्या आजकालच्या विटांपेक्षा आकाराने पावपट असतात. ह्यांना ह्या भागात नानकशाही विटा म्हणतात. ह्या किल्ल्याचा बराचसा भाग पतीयालाचा पहिला राजा आलासिंग ह्याने उभारला. आकाराने थोड्या मोठ्या विटा दिसतात त्या ह्याची दुरुस्ती करताना वापरल्या गेल्या.
साधारणत: किल्ला म्हटला की तिथे दिवान-ए-आम, दिवान-ए-खास, खूप महाल असावेत अशी लोकांची समजूत असते. पण भटिंडा किल्ल्यात असं काहीही नाही कारण हा एक मिलिटरी फोर्ट होता. इथे फक्त सैनिकी कारवाया होत. ह्या किल्ल्याचं एक खास आकर्षण म्हणजे इथला राणीमहाल. ही एकमेव ऐतिहासिक इमारत किल्ल्याच्या आत पहायला मिळते. आज इथे चाललं तर पूर्ण इमारत हलते. म्हणून असेल कदाचित पण पर्यटकांना इथे यायला मज्जाव आहे. इथे पूर्वीच्या काळी खूप छान चित्रं होती म्हणतात. एके काळी ह्या किल्ल्यात ३२ लहानमोठे बुरुज होते. आज त्यांची खूप पडझड झाली आहे. काही पूर्णपणे उध्वस्त झालेत तर काही ठिकाणी दुरुस्तीचं काम चालू आहे. मध्ययुगात हा किल्ला म्हणजे हिंदुस्थान मध्ये प्रवेश करायचा दरवाजा मानला जाई. भटिंडा मुलतान आणि दिल्ली मधल्या व्यापारी मार्गावर होतं. जेव्हढी आक्रमणे झाली ती उत्तर-पश्चिम दिशेने ह्याच मार्गाने झाली. म्हणून सुरक्षिततेच्या दृष्टीने इथे अनेक किल्ले बनवले गेले पण त्यातला फक्त हा किल्ला आज शिल्लक राहिलाय.
भटिंडा दिल्लीपासून फक्त ३०० किमी दूर आहे. त्यामुळे दिल्लीवर ज्याची सत्ता त्याच्याच ताब्यात हा किल्ला असे. ह्या किल्ल्याचं नाव महम्मद घोरी, महमूद गझनी, पृथ्वीराज चौहान अश्या अनेक लोकांशी जोडलं गेलंय. पण सर्वात महत्त्वाचं नाव आहे ते रजिया सुलतानचं. बाकीचे इथे मालक म्हणून आले. पण रजिया सुलताना ह्या किल्ल्यात एक कैदी म्हणून आली. तिचा गुन्हा काय? तर तिने एका हबशी गुलामावर प्रेम केलं. हिने दिल्लीवर १२३६-१२४० असं चार वर्षं राज्य केलं. हिचं घराणं तुर्कांच. त्यांच्या अमीर-उमराव लोकांना एक स्त्री आपल्यावर राज्य करते ही गोष्ट सहन होत नव्हती. त्यातून ती तर स्त्रीवेश परिधान न् करता पुरुष सुलतानाचा वेश घाली. पडद्यात रहायचं सोडून हत्तीवर बसून युद्धावर जात असे. लोकांनी आपल्याला सुलताना म्हणावं हे तिला आवडत नसे. ती स्वत:ला 'सुलतान रजिया' म्हणे. मग तिचं प्रेम जडलं एका गुलामावर - याकूत वर. आधी हा मुदपाकखान्यात नोकरीला होता. पण तो रजियाला एव्हढा आवडला की तिने त्याला स्वत:च्या चाकरीत घेतलं. दोघांचं एकमेकावर प्रेम बसलं. आणि लवकरच ही गोष्ट जगजाहीर झाली. झालं! तिची खोड मोडायची आयटी संधी तुर्की अमीर-उमराव लोकांना मिळाली. तेव्हढ्यात पंजाबात मलिक अल्तुनिया ने बंड केलं. ते मोडून काढायला रजिया दिल्लीहून निघाली. रस्त्यात अमीर-उमरावांनी बंड केलं, याकुताला ठार केलं आणि रजियाला कैद केलं. तिला मग त्यानी अल्तुनियाच्या हवाली केलं. मग तिला भटिंडाच्या किल्ला मुबारक मध्ये ठेवण्यात आलं.
असं म्हणतात की तिला फक्त शुक्रवारच्या दिवशी जवळच्या मशिदीत प्रार्थना करायला जायची परवानगी दिली होती आणि त्यासाठी तिला पालखीतून नेण्यात येत असे. काही लोक असंही म्हणतात की हा मलिक अल्तुनिया रजियाच्या प्रेमात पडला होता. आणि तिच्याशी निकाह करायची त्याची इच्छा होती. काही काल कैदेत राहिल्यावर रजिया सुध्दा ह्या निकाहाला तयार झाली. दोघांचं लग्न झालं. काही असंही म्हणतात की ते दोघांची लहानपणापासून मैत्री होती पण ह्याला काही ऐतिहासिक प्रमाण नाही. रजिया ने त्याच्याशी का लग्न केलं? तिला दिल्लीचं सिंहासन हस्तगत करायचं होतं म्हणून? का त्याच्या मदतीने इथून निसटायचं होतं म्हणून? हे नक्की सांगता येत नाही.
तेव्हाच रजीयाच्या एका भावाने दिल्लीचा कब्जा घेतला. रजिया आपला हक्क परत मिळवण्या साठी हल्ला केला. पण लढाईत मलिक अल्तुनिया आणि रजिया हरले. त्याम्च सैन्य त्यांना सोडून पळाल. ते दोघे शत्रूच्या कचाट्यात सापडले. आणि त्यांनी दोघांचा वध केला. १३-१४ ऑक्टोबर १२४० च्या आसपास हा हल्ला झाला असावा. तिची कबर कुठे आहे ह्याबाबत इतिहासकारांमध्ये वाद आहेत. कैसर, दिल्ली आणि टोंक तिन्ही ठिकाणी कबरी आहेत आणि प्रत्येक कबर तिचीच आहे असं ठासून सांगितलं जातं. पण काही पुरावा नसल्याने निश्चित सांगता येत नाही. फक्त ती ह्या किल्ल्यात राहिली होती एव्हढंच इतिहास ठामपणे सांगू शकतो.
असा इतिहास असताना आज हा किल्ला दुर्लक्षित का आहे? ह्याची ३ कारणं सांगता येतात. भटिंडा राजस्थानच्या वाळवंटाच्या सीमेवर आहे. हे वाळवंट पसरू लागल्याने हा मार्ग सुरु ठेवणं मुश्कील झालं. दुसरं म्हणजे १४ व्या शतकाच्या शेवटी तैमुरलंगचा हल्ला झाला. मुलतान ते दिल्ली मधली सगळी महत्त्वाची शहरं त्याने उध्वस्त केली. बाबरच्या काळी मुघल आहे तेव्हा त्यांनी आपली सीमा भटिंडा वरून हलवली. त्यामुळे शहराचं राजनैतिक महत्त्व कमी झालं. मुघलांच्या इतिहासत त्याचा फारसा उल्लेख नाही. १८ व्या शतकात शीख काळात पतियाला घराण्याकडे ह्याची मालकी आली. मग ह्याच नाव किल्ला मुबारक पडलं. आणि त्याला पुन्हा महत्त्व प्राप्त झालं. शीख धर्माचे ३ गुरु आहेत - गुरु नानक, गुरु तेगबहादूर आणि गुरु गोविंदसिंग. हे तिथे इथे येऊन गेले. गुरु गोविंदसिंग इथे आले त्याप्रित्यर्थ इथे एक गुरुद्वारा उभारण्यात आलं. इथे आजही लोक श्रद्धेने येतात.
इंग्रज जेव्हा राज्य करायला लागले तेव्हा किल्ल्याचं महत्त्व परत कमी झालं. मग लोकांचं सुध्दा दुर्लक्ष होऊ लागलं. त्याची देखभाल होईना. आणि पडझड सुरु झाली.
१ ऑक्टोबरचा एपिसोड मेहरोली
१ ऑक्टोबरचा एपिसोड मेहरोली आर्किओलॉजिकल पार्क वर होता. त्यावर नंतर लिहेन.
यहा इतना सन्नाटा क्यों है भई?
यहा इतना सन्नाटा क्यों है भई?
थॅन्क्स स्वप्ना आम्ही वाचत
थॅन्क्स स्वप्ना
आम्ही वाचत असतो तुझे भाग. उत्तम आहे. सन्नाटा एकान्ताचा असावा
सन्नाटा क्यों है भई>>> कारण
सन्नाटा क्यों है भई>>> कारण एपिक फक्त इकडे वाचायलाच मिळतंय... एरवी रिमोट च मिळत नाही
आम्ही वाचत असतो तुझे भाग. उत्तम आहे>>> +१
एपिक आता एच डी झालाय ... टाटा
एपिक आता एच डी झालाय ... टाटा स्काय वर तरी..
थॅन्क्स स्वप्ना आम्ही वाचत
थॅन्क्स स्वप्ना
आम्ही वाचत असतो तुझे भाग. उत्तम आहे. >>१
तुमच्यामुळे एपिक पाहू लागलो
मिसलेले इथे वाचते.... सध्या
मिसलेले इथे वाचते.... सध्या उतसुकता आहे देवदत्त पटनाईकच्या सिरीयलची ... जाहीरात येतेय ..।।
एपिक वरचे चांगले (must watch
एपिक वरचे चांगले (must watch ) shows आणि त्यांचे timings कोणी सांगू शकेल का please …?
श्रीमयी माझ्यामते अख्ख एपिक
श्रीमयी माझ्यामते अख्ख एपिक चॅनलच मस्ट वॉच आहे..
ह्म्म्म ... मी पण ऐकलय …. पण
ह्म्म्म ... मी पण ऐकलय …. पण तरीही …
महेश भटचा एक शो सुरु
महेश भटचा एक शो सुरु होतोय....जुन्या स्टुडियोजवर
नेहमी वाचतो.धन्यवाद.कित्येक
नेहमी वाचतो.धन्यवाद.कित्येक ठिकाणं पाहण्याचं सोडाच ऐकली सुद्धा नाहीत.आणि हो असा इतिहास शिकवला तर कंटाळवाणा कसा होईल?
मित, मला वाटतं एकांत
मित, मला वाटतं एकांत शुक्रवारी रात्री ८:३० आणि रविवारी सकाळी ९:३० ला रिपिट असतं.
>>श्रीमयी माझ्यामते अख्ख एपिक चॅनलच मस्ट वॉच आहे..
अगदी अगदी. श्रीमयी, तुम्हाला कार्यक्रमांचं वेळापत्रक - http://www.epicchannel.com/schedule वर मिळेल. रबिन्द्रनाथ टागोरांच्या कथा मस्ट सी असणार (मला एकही पहाता आली नाही). इतिहासाची आवड असल्यास लुटेरे, एकांत, एपिक के दस, रक्त, अदृश्य पाहू शकता. फूडी असाल तर 'राजा, रसोई और अन्य कहानिया', लॉस्ट रेसिपिज नक्की पहा. डिटेक्टिव्ह सिरियल पहायची असल्यास दरिबा डायरीज पहा. क्रिकेटची आवड असल्यास 'मिडविकेट टेल्स'.
>>तुमच्यामुळे एपिक पाहू
>>तुमच्यामुळे एपिक पाहू लागलो
वाचून खूप छान वाटलं
लोक्स, पोस्टींबद्दल कृपया धन्यवाद म्हणू नका. फक्त मधून मधून इथे वाचताय एव्हढं पोस्टलंत तरी एकांतवर लिहिताना जो वेळ लागतो तो सत्कारणी लागल्याचं समाधान मिळेल.
मेहरोली आर्किओलॉजिकल पार्क
मेहरोली आर्किओलॉजिकल पार्क (एकांत, एपिक चेनेल, ऑक्टोबर १ २०१५)
ह्या एपिसोडचा सुरुवातीचा काही भाग चुकला. उरलेला पोस्ट करत आहे. ह्या कार्यक्रमाच्या सूत्रधाराला निधी म्हणून एका महिलेने मार्गदर्शन केलं. ती इथे हेरिटेज वॉक्स करते.
कुतुबमिनारला दरवर्षी अनेक पर्यटक भेट देतात. पण त्याच्यासमोर असलेल्या ह्या पार्क मधल्या इमारती मात्र अज्ञातवासात आहेत असंच म्हणायला हवं. पार्कात सर्वात प्राचीन इमारत आहे ती म्हणजे बल्बन नावाच्या महत्त्वाकांक्षी तुर्की सुलतानाचा (१२४६ मध्ये हा दिल्लीचा सुलतान झाला) मकबरा. हा १२७० च्या आसपास बनवला गेला. पण इथे sarcophagus नाहीये. तो कुठे गेला कोणाला माहीत नाही. ह्या मकबर्यावर इस्लामी वास्तुकलेच एक खास चिन्ह आहे (मला काही तो शब्द कळला नाही). पण जे काही आहे ते भारतातलं सर्वात प्राचीन आहे म्हणे. जवळच त्याच्या मुलाची, महमद खानची, कबर आहे. हां मंगोल्सशी लढताना लाहोरजवळ मरण पावला.त्याच्या मृत्यूने बल्बनला खूप धक्का बसला आणि तोही लवकर मरण पावला असं म्हणतात. इब्न-ए-बतुता च्या लिखाणात असा उल्लेख आढळतो की तेव्हाचा सुलतान नसिरुद्दीन महमूद ह्याचा तो डेप्युटी होता आणि त्याने सुलतानाला विष देऊन मारलं. आणि स्वत: गादी बळकावली. मात्र तारीख-ए-फिरोजशाही, ज्याला जास्त विश्वासार्ह इतिहास मानलं जातं, त्यात असा उल्लेख आहे की तो महत्त्वाकांक्षी नक्कीच होता, त्याने आपल्या सर्व विरोधकांना मार्गातून बाजूला केलं पण सुलतानाच्या हत्येत त्याचा हात नव्हता. बल्बनने सुलतान झाल्यावर अनेक कडक नियम केले. दरबारात कोणी हसायचं नाही, मोठ्या आवाजात बोलायचं नाही, दरबारी रितीरिवाज पाळायचे. त्याने एक मोठा मुकुट बनवून घेतला होता जो एखाद्या chandelier सारखा त्याच्या डोक्यावर लटकत राही. दोन मुख्य दरबारी रिवाज त्याने आणले ते हे की दरबारात येनार्याला बादशाहाला सजदा करावा लागे आणि त्याच्या पायाचं चुंबन घ्यावं लागे.
निधीला सूत्रधाराने विचारलं की इथे सुवास कसला येतोय तर ती म्हणाली अत्तराचा. असं म्हणतात की इथे 'जिन्न' रहातात. लोक इथे अगरबत्ती आणि अत्तर लावून आपले नवस बोलतात. तिचा एक अनुभव तिने सांगितला. एके दिवशी ती आणि तिचा मित्र भल्या पहाटे आले होते. रस्त्यात त्यांना पांढरे कपडे घातलेला एक माणूस भेटला. त्याचा चेहरा तेज:पुंज होता आणि त्याच्या कपड्यातून सुवास येत होता (मुंबईत असे लोक फिरतील तर आम्हाला नाकाला रुमाल लावून फिरावं लागणार नाही. आणि एक्स वगैरे कंपन्या आणि त्यांच्या बेकार जाहिराती दोन्ही बंद पडतील!). त्याने तिला सांगितलं की तुझा नवस नक्की पुरा होईल. तिने जो नवस मागितला तो पुरा झाला म्हणे (चलो मेहरोली!).
इथे आणखी एक महत्त्वाची इमारत आहे - जमाली कमाली (रॉकी आणि मयूर काही वर्षांपूर्वी इंडीयाज मोस्ट हॉन्टेड नावाचा कार्यक्रम सादर करायचे त्यात ह्या परिसरावर एक एपिसोड होता). इथे एक मकबरा आणि एक मशीद आहे. ही दोन्ही दोन लोकांची नावं आहेत. जमाली ह्या शब्दाचा उर्दूत अर्थ आहे सुंदर दिसणारा पुरुष. १६ व्या शतकात दिल्लीत एक व्यापारी होता (नाव नीट ऐकायला आलं नाही). तो सुफी संत आणि शायर होता. त्याने आपलं टोपणनाव घेतलं जमाली. हा कबिर, सुरदास आणि तुलसीदास ह्यांचा जवळपास समकालीन. असं असूनही त्याचं लिखाण एव्हढं सुरेख होतं की तो प्रसिद्ध झाला. हा असा काल होता जेव्हा लोधी साम्राज्य लयास जात होतं आणि मुघल उदयास येत होते. हुमायून गुजरातच्या दौऱ्यावर असताना जमालीचा मृत्यू झाला. काही लोक असं मानतात की हा मकबरा हुमायूनने बांधवला. पण इथे आता कुलूप आहे, आत जाता येत नाही. बाहेरून हा मकबरा साधा वाटतो. पण आतून सुरेख आहे. सगळीकडे नक्षीकाम आहे, विशेषत: छतावर. छत म्हणजे एक सुंदर इराणी गालीचाच वाटतं. चारी बाजूने जमालीचे १६ शेर लिहिले आहेत. हे सर्व ईश्वराला उद्देशून आहेत - आमच्या चुका माफ कर अश्या आशयाचे. इथे आत २ कबरी आहेत - एक जमालीची आणि दुसरी कमालीची. हा कमाली स्त्री का पुरुष ते कोणालाच माहीत नाही. कदाचित दोघांचं नातं गुरु-अनुयायाच असावं कारण जमाली हा सुफी संत होता. किंवा दोघांची खास मैत्री असावी. काही लोक ह्याला होमोसेक्स्युअल रिलेशनसुध्दा मानतात.
ह्या मकबरयाच्या दक्षिणेला एक आलिशान मशीद आहे. जी जमालीच्या काळातली आहे आणि कदाचित त्यानेच बनवली असावी. ह्या परिसराला जमली-कमाली म्हणतात ह्याचा पहिला पुरावा १९ व्या शतकात मिळतो. ही नावं एकत्र कशी जोडली गेली आणि प्रचलित झाली ते कोणालाच माहित नाही.
इथे एक स्टेप वेल आहे. पण फार थोड्या लोकांना त्याविषयी माहिती आहे. ती कोणी कधी का बांधली ते कोणाला माहीत नाही. ह्याला 'राजोंकी बावली' किंवा "रज्जोकी बावली' म्हणतात. ह्यात 'राज' म्हणजे मराठीतला गवंडी. इथे काम करणारे गवंडी इथे रहात, खाणंपिणं इथे करत, गप्पा मारत. एक प्रकारचं सोशल नेटवर्किंग. स्त्रियांसाठी वेगळी वेळ असे, पुरूषांसाठी वेगळी. बाजूला खोल्या आहेत.
इथे आणखी एक इमारत आहे - कुलीखानाचा मकबरा. हा बादशहा अकबराच्या दाईचा, महामंगेचा, मुलगा. तेव्हाच्या काळात असं नातं भावाचंच मानलं जाई. कुलीखान मुघल सेनेत सेनापती होता. ही इमारत दोन वेगळ्या काळाचं प्रतिनिधीत्व करते आणि कदाचित १७ व्या शतकात बनवली गेली असावी. २० व्या शतकात मुघल बादशाह बहादूरशाह द्वितीय ह्याने मेहरौलीत आपला एक महाल बांधला होता. थॉमस मेटकाफ हा ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीचा एजंट होता. ह्याला मुघल सत्तेवर लक्ष ठेवायला नियुक्त केलं होतं. जेव्हा मुघल शहजादे मेहरौलीला आले तेव्हा ह्या मेटकाफने आपली रहाण्याची व्यवस्था मेहरौलीत केली आणि कुलीखांच्या मकबर्याला आपलं Leisure House बनवलं (ह्याला आयत्या बिळात नागोबा अशी सार्थ म्हण आहे!). ह्याच्या चारी बाजूला बागा, महाल बांधले. इथे तो स्वत: ही राही आणि हनिमूनवर येणाऱ्या जोडप्यांना भाड्याने देई.
१८५७ च्या बंडानंतर इंग्रजांनी भारतात नवी शासनपध्दती आणली होतीच. पुढे २० व्या शतकात नवी दिल्ली उदयास आली. सगळी वस्ती तिथे होऊ लागली आणि हा भाग दुर्लक्षित झाला.
स्वप्ना_राज thank you … list
स्वप्ना_राज thank you … list आणि schedule साठी ….
मला इतिहास प्रचंड आवडतो , मी प्रचंड फूडी आहे , बाकी डिटेक्टिव्ह सिरियल पण आवडतात आणि क्रिकेट ही … सो माझ्यासाठी एपिक म्हणजे खजिना आहे तर … वेळ काढायलाच हवा …
मी ऐकून होते एपिक बद्धल पण लक्षात नाही राहायचे पण आता लक्षात ठेऊन बघेन …
BTW काल मी रबिन्द्रनाथ टागोरांच्या कथा पाहिल .. आवडल ..
स्वप्ना, मी (आम्ही) सुध्दा
स्वप्ना, मी (आम्ही) सुध्दा तुझ्यामुळेच एपिक पहायला लागलो, त्यात मी आवर्जून रबिन्द्रनाथ टागोरांच्या कथा,
एकांत, एपिक के दस, 'राजा, रसोई और अन्य कहानिया' आणि लॉस्ट रेसिपिज पाहाते आणि नवरा मिडविकेट पाहातो. रबिन्द्रनाथ टागोरांच्या कथा मस्ट सी आहेतच.
त्यात अधुनमधुन लागणारी गाणी (रागदारी) आणि चित्र माध्यमातून दाखवतात त्या गोष्टी माझ्या लेकीला फार आवडतात
Pages