रात्रीचा एक वाजला होता. सुमी आपल्या दुखर्या अंगावरील प्रत्येक वेदनेला तात्पुरते मनातून दूर सारत विजू या आपल्या ३ वर्षांच्या, मोठ्या मुलाला भज्यांच्या चुर्याचा घास अन पाण्याचा घोट एका आड एक देत होती. तो बावरून बाबांकडे, म्हणजे राशिदकडे बघत होता. राशिदने या हिंदू स्त्रीवर प्रेम बसल्यामुळे व तिच्या पतीचे निधन झाल्यानंतर तिच्या या मुलासकट बायको म्हणून स्वीकारले होते व सुमीलाही राशिद आवडला होता. पण हलाखीच्या परिस्थितीमुळे तिघेही यु.पी.मधून मुंबईला आले होते आणि गेल्या दोन वर्षात त्या दोघांना एक मुलगी झाली होती जिला आत्ता सुमीने पदराआड दडवून ठेवले होते. सुलताना! मात्र येथेही रोजंदारी धड नसल्यामुळे मुंबई पुणे एशियाड व शिवनेरी जेथून सुटतात तेथे मिळेल ते हमालीचे किंवा काही ना काही काम करून फूटपाथवरच चौघेही राहात होते. पण सुलताना लहान असल्यामुळे सुमीला जास्त काम करणे शक्य नव्हते. आता सुमी, तिचा आधीचा मुलगा विनू अन स्वतःची मुलगी सुलताना हे तिघेही राशिदला लोढणे वाटू लागले होते. कारण त्याला जे काही उत्पन्न मिळत होते ते त्याच्या व्यसनांपुरतेच कसेबसे होते आणि सुमीने 'निदान मुलासाठी तरी काहीतरी आणा' असे लकडे लावले की तिला मारहाण करून तो एखादी प्लेट भजी आणायचा. त्यात असलेल्या आठ भज्यांपैकी सहा स्वतः खायचा कारण उद्या पुन्हा काम शोधण्यासाठी अंगात ताकद हवी. सुमी उरलेल्या दोन भज्यांमधले एक स्वत: खाऊन दुसरे विजूला द्यायची. अन मग राहिलेला चुरा विजूला देऊन टाकायची. केवळ अन्न मागणे या गुन्ह्यासाठी होणार्या रोजच्या मारहाणीचा परिणाम तिच्या प्रकृतीवर व मनस्थितीवर झालेला होता. कित्येक दिवसांमधे कुणालाच आंघोळही करता येत नव्हती की मनासारखे खाता येत नव्हते. जवळपास दररोज अर्धपोटीच! काही वेळा उपाशी! दिवसभरात विजू तोंड वेडेवाकडे करून बसच्या क्यू मधून फिरायचा. काहीवेळा सुलतानाला हातात घेऊन सुमी स्वतः फिरायची. यातून जवळपास वीस रुपये मिळायचे. वीस रुपयांचे अन्नपदार्थ आणले की राशिद स्वतःही येऊन ताव मारायचा. मग ते पुरायचे नाहीत.
आजही तेच झाले होते. आज भीक म्हणून मिळालेले अठरा रुपये कधीच संपले होते अन पोटात अन्नाचा कण नसलेला विजू आईच्या जवळ बसून वडिलांना घाबरत आईला हळूच कुजबुजून सांगत होता.
"मा.. खानेको दे ना.. भूख लगी है"
आज मात्र हद्द झालेल्या सुमीने राशिदला सांगीतले.
"बच्चा भूखा है.. रोटी नही तो वडापाव तो दो लाके?"
आणि वैतागलेल्या आणि पिऊन तर्र झालेल्या राशिदने उभे राहून एक सणसणीत लाथ तिच्या पोटात मारली होती. ती कशीबशी हुकवली तरी जोरात लागली होतीच! हुकवलीच नसती तर आपण मेलोही असतो आत्ता असे सुमीला वाटले. विजू थरथरून बाजूला उभा होता. एक आवाजही आला नाही सुमीच्या तोंडातून!
"हराम... मेरी बच्चीको पिलानेके वास्ते दूध नही आता तुझपर.. और तेरे बच्चेको मै खाना खिलाऊ?"
बाजूला पडलेल्या सुलतानाला पटकन उचलून मांडीवर घेतले सुमीने! निदान सुलताना आपल्या मांडीवर असताना तो आपल्याला मारणार तरी नाही अशी तिची कल्पना! पण त्याने तिच्या पाठीत रट्टे मारले अन एक प्लेट भजी आणायला गेला. भज्यांचा चुराही संपल्यानंतर विजूने तो तेलकट कागद एकदा चाटून पाहिला. काहीच उपयोग नव्हता, कागदात मुरलेल्या तेलाशिवाय आता एक कणही राहिलेला नव्हता. राशिद पिऊन जास्त झाल्यामुळे बाजूलाच उताणा पडला होता. सुलताना ही त्याची मुलगी असली तरीही आपल्याच पोटचा गोळा असल्यामुळे सुमी अत्यंत प्रेमाने तिचे करायची. आता विजू अन सुलताना सुमीला बिलगून झोपायचा प्रयत्न करू लागले. सुमीच्या मनात येत होते. पुर्वीचे प्रेम वगैरे सगळे खोटे होते. याला आपण नको आहोत. अमानुष मारतो आपल्याला हा! आत्ता झोपलाय पिऊन! आपणच डोक्यात दगड घालून याला मारलं तर?
==============================================
"सच अ बॅस्टर्ड ही इज...'
भल्याभल्यां विश्वामित्रांच्या तपश्चर्येत विघ्न आणणार्या अन काय घातले की आपण अधिक आकर्षक दिसतो याचे संपूर्ण भान असलेल्या आपल्या पत्नीला, रोझालीला, भल्ला या 'भल्ला ग्रूप ऑफ इंडस्ट्रीज'च्या चेअरमनच्या मुलाशी, उमेश भल्लाशी तोंडाजवळ तोंड नेऊन चारचौघात लाडिकपणे कानात कुजबुजताना पाहून उमेशला रोझालीच्या पतीने, सोमाई केवलरामानी याने 'बॅस्टर्ड' अशी शिवी दिली होती.
ओबेरॉयच्या आलिशान हॉलमधे भल्लांनी दिलेली वार्षिक पार्टी ही अनेक उद्योजकांसाठी नवीन कंत्राटे मिळवण्याच्या दृष्टीने पर्वणी ठरायची. सगळेच तिथे धावायचे. मग मंद संगीताच्या तालावर नृत्य. मद्याचे धबधबे आणि ओळखीच ओळखी! मग एखाद्या पोटेन्शिअल बिझिनेस प्रॉस्पेक्टशी उद्या परवा भेटण्याचे नक्की करून पहाटे चार, पाचला आपल्या पाली हिल किंवा मालाबार हिल च्या बंगल्यावर निघून जायचं!
सोमाई रोझालीला घेऊन यायचा. मग रोझालीच्या प्रभावी व्यक्तीमत्वाने आकर्षित होऊन अनेक चेहरे आसपास घुटमळू लागायचे. रोझाली अगदी बिनदिक्कत ओळख करून दिली की हसत हसत आपला हात शेक हॅन्डसाठी पुढे करायची. मग अशा स्त्रीशी वारंवार भेटी व्हायला हव्या असतील तर आपल्याला सोमाई केवलरामानीशी काही ना काही अन्डरस्टॅन्डिन्ग करायला लागेल हे समजून मग बिझिनेसच्या गप्पांना ऊत यायचा. मग सोमाई, तो माणूस यांच्या अगदी निकट रोझालीही उभी राहायची. हसून दाद द्यायची, माना डोलवायची! तो माणूस पाघळायचाच! शेवटी 'परवा ऑफीसमधे भेटू' वगैरे निरोपानिरोपी झाली की तो माणूस बाजूला होताना अगदी कळवळून रोझालीकडे पाहायचा. त्या क्षणी रोझाली पुन्हा शेकहॅन्ड करायची अन 'नाऊ वी विल कीप मीटिंग.... हे ना? आय होप सो.. डू कम टू अवर हाऊस अल्सो हं?' असे म्हणाली की 'निदान घरी जायचा ग्रीन सिग्नल आहे' या फायद्यावर माणूस हसून बाजूला व्हायचा. आजवर रोझालीने सोमाईकडे कधीही अशी तक्रार केली नव्हती की मला असल्या पार्टींना कशाला घेऊन जाता? मात्र, ती स्वतःहून कुणाशीही उगाचच सलगी दाखवायचीही नाही किंवा इतर बायकांमधे बसून उगाच फालतू बडबडही करायची नाही. सतत सोमाईबरोबर उभी राहायची.
पण आज? आज चक्र उलटी फिरलेली होती. पार्टीच्या सुरुवातीलाच सिनियर भल्लांनी 'हा माझा मुलगा यु.एस. हून कोर्स करून आला आहे आणि त्याला मी सी.ई.ओ म्हणून नियुक्त करत आहे' ही घोषणा हवेत विरेपर्यंतच ओबेरॉय टाळ्यांनी दणाणून गेले होते. आणि मग उमेशच्या राजबिंड्या, घरंदाज, हसतमुख व्यक्तीमत्वाचा प्रभाव सर्वत्र पडू लागला होता. सर्वजण त्याचे अभिनंदन करत होते. त्याच गर्दीत, उमेशकडे पाहून, कसल्याश्या हेतूने प्रेरित झाल्याप्रमाणे, सोमाईचा हात सोडून रोझाली उमेशपर्यंत पोचली होती. वयाने किमान दहा वर्षांनी लहान असलेल्या मोस्ट एलिजिबल बॅचलरला तिने सरळ हग केले आणि त्याच्या कानांना तिच्या किसचा 'च्युईक' असा आवाज स्पष्टपणे ऐकू येईल याची तिने खात्री केली. क्षणभर उमेशचेही चित्त विचलीत झाले. आता या गर्दीतून बाहेर पडून एकेक कॉन्टॅक्टशी बाबांबरोबर ओळख करून घेऊ या विचारात असलेल्या उमेशचा हात रोझालीने धरला. जणू ती त्याच्याचबरोबर आलेली असावी अशी त्याच्याबरोबर राहून इकडे तिकडे फिरू लागली. सिनियर भल्लांना आता उगाचच तिचीही ओळख काहीजणांना करून द्यावी लागली. आणि त्यामुळे उमेशचा असा समज झाला की ही बाई कुणीतरी महत्वाची आहे. एकदा तर अशी परिस्थिती उद्भवली की सोमाईशीच उमेशची ओळख भल्ला करून द्यायला सुरुवात करणार तोवर रोझाली म्हणाली 'ही एज माय हसबंड, मिस्टर केवलरामानी' !
त्यामुळे इतक्या महत्वाच्या बाईच्या नवर्याशी आपले संबंध चांगले असावेत या हेतूने उमेशने फारच प्रभावीत झाल्यासारखा वगैरे शेक हॅन्ड केला. सोमाई बघतच बसला. सोमाईला तिथेच सोडून तिघे पुढे गेले. आपल्या बायकोला हाक मारून 'त्यांच्याबरोबर काय फिरतेस' असे म्हणायचेही सोमाईला सुचले नाही. मधेच फिरता फिरता रोझाली काहीतरी बोलून उमेशला हसवत होती, गुंतवुन ठेवत होती. ती एक बाई असल्यामुळे व आपणच निमंत्रण दिलेले असल्यामुळे सिनियर भल्ला त्या प्रकारावर विशेष काहीही प्रतिक्रिया व्यक्त करत नव्हते. घरी गेल्यावर उमेशला सांगूयात की केवलरामानी या एका सामान्य उद्योजकाची ती पत्नी आहे अन उगाच अवतीभवती फिरणार्यांपासून, विशेषतः बायका पोरींपासून लांब राहात जा!
मात्र! ते सगळे घरी गेल्यानंतर समजणार होते. आत्ता सोमाईने चवथा पेग संपवून पाचवा भरून घेतला अन मागे पाहिले तर..
रोझाली उमेशला डान्ससाठी विचारत होती. स्त्री असल्याने 'नाही म्हणाल्यास' तिचा अपमान होईल या प्रेशरमुळे सुरुवातीला उमेश 'हो' म्हणून तिच्याबरोबर गेला. फ्री वातावरण असल्यामुळे भल्ला सिनियर व ज्युनियर दोघेही 'घेत' होते. उमेशने हातातला ग्लास तसाच हातात ठेवत तिच्यापासून एक फुटभर अंतरावर नृत्य करायला सुरुवात केली. रोझाली हळूहळू जवळ यायचा प्रयत्न करत आहे हे त्याला समजत होते, पण आता दोन गोष्टी झालेल्या होत्या. एक तर बरेच जण डान्स करत होते आणि डान्स करताना माणसे थोडी जवळ येणारच हे उमेशला ठाऊक होते. त्यामुळे त्याला गैर वाटले नाही.
मात्र हे पाहून खवळलेल्या सोमाईने पाचवा पेग दोनच घोटांमधे संपवून ग्लास सहाव्या पेगसाठी काउंटरवर आपटला तेव्हा वेटरही हादरून त्याच्याकडे पाहात होता. त्यातच जडेजा आला, आपला पेग भरण्यासाठी! जडेजा हा एक प्रकारचा बिझिनेस पार्टनर - कम - स्पर्धकही होता. बोलायला अत्यंत बोचरा! सोमाई अन जडेजा यांचे कुटुंबीयही एकमेकांच्या चांगल्या परिचयाचे होते.
जडेजा - हाय सोम...
सोमाई - .. हाय
सोमाईची नजर रोझालीकडे लागली होती. रोझालीने आता उमेशच्या हातातील ग्लास बाजूल ठेवून त्याचे दोन्ही हात आपल्या खांद्यांवर घेतलेले होते. वातावरण अत्यंत नशीले होते, पण ते सोमाईसाठी नव्हते. रोझाली उमेशच्या डो़ळ्यात डोळे मिसळून जगाला विसरून नृत्य करत होती. तिच्या हालचाली पाहून, लयबद्ध नृत्य पाहून खरे तर इतरही नृत्य करणारी जोडपी असूयेने त्या जोडप्याकडे बघत होती. कित्येक नृत्य न करणारे बाजूला उभे राहून रोझालीच्या आकर्षक हालचालींकडे पाहात होते.
जडेजा - रोझ इज अ रिअल रोझ सोम... इझन्ट इट?
सोम - ... याह.. शी इज.. शी इज अ रोझ..
जडेजा - अॅन्ड.. यू आर द लकी गाय... अं?
सोम - यप... आय अॅम..
जडेजा - आय मीन... यू वेअर..
अत्यंत कडवट नजरेने सोमाईने जडेजाकडे पाहिले. जडेजा रोझाली अन उमेशच्या थिरकण्याकडे बघत होता. उमेश इतका चांगला डान्स करू शकतो हे सगळ्यांना आजच समजल्यामुळे व उद्यापासूनचा सी.ई.ओ नाचताना बघायला मिळत असल्यामुळे बरेच जण त्यांच्याकडे बघत होते अन त्यामुळे आपोआपच रोझालीही बघितली जात होती. नंतर लोक हळूच वळून सोमाईकडे बघत होते.
सोम - .. व्हॉट .. डू यू मीन.. 'यू वेअर'..?
जडेजा - लूक अॅट देम सोम... रोझ इज ... रोझ इज लव्हिंग हिम..
सोम - व्हॉट द हेल आर यू टॉकिंग... ही इज सो यन्गर टू हर..
जडेजा - ओ रिअली? आय थॉट रोझ इज... शी लूक्स एव्हर यंग...
जडेजा नेहमीप्रमाणे आग लावून निघून गेला.
सहावाही पेग संपला! सातवा पेग स्मॉल घ्यावा असामनात विचार होता सोमाईच्या. आपण इतकी कधी घेत नाही. अगदीच डोक्यावरून पाणी म्हणजे साडे पाच पेग्ज! पण आज त्याने लार्जच घेतला.. सातवाही!
आणि वळून पाहिले तर ... रोझालीने उमेशचे खांद्यांवरचे हात हातात घेऊन स्वतःच्या कंबरेवर ठेवून घेतले होते. ती आता त्य्च्या अगदिच निकट होती. उमेशला या निकटतेचा अर्थ त्या संस्कृतीत राहून व्यवस्थित माहीत होता. पण तिला झिडकारणे सभ्यतेला धरून नव्हते. हळूहळू तिच्यापासून अलग व्हायचे प्रयत्न करायला हवे होते. पण रोझाली अधिकच चिकटत होती. आणि शेवटी तिने सरळ आपली मान उमेशच्या छातीवर टेकवली त्या क्षणी...
स्फोट झाल्याप्रमाणे घशाच्या नसा ताणून हातातला ग्लास फेकून देत सोमाई ओरडला..
"हे यू.. शी इज माय वाईफ.. हाऊ द हेल कॅन यू डान्स विथ हर.. यू ब्लडी..."
जडेजाला जे पाहिजे ते झालेले होते. भल्ला ग्रूपचे यापुढील कोणतेही कॉन्ट्रॅक्ट आयुष्यात सोमाईला मिळणार नव्हते. आणि नेमके तेच मिळावे, प्रत्येक कॉन्ट्रॅक्ट मिळावे यासाठी रोझाली उमेशवर बरसत होती.
भल्लांनी नुसते सोमकडे पाहिले अन त्याचा धीर सुटला. उमेशने रोझालीला केव्हाच सोडले होते. रोझाली धावत, तोंड दाबून धरत, हुंदके आवरत सोमाईचा पाठलाग करण्यासाठी बाहेर पळाली होती. मात्र रागावलेला सोमाई झपाझप निघूनही गेलेला होता.
आता रोझालीवर जबाबदारी होती! एक नाही! कित्येक! उमेशचे अन सिनियर भल्लांचे मन पुन्हा जिंकणे! सोमचा बिझिनेस व्यवस्थित चालेल यासाठी त्यांना कॉन्ट्रॅक्ट मागणे! यापुढे असे कधीही होणार नाही याचे वचन देणे... काय करावे अन कसे करावे या विचारात खिळलेली असतानाच मागून जडेजा आला..
जडेजा - इट हॅपन्स रोझा... लीव्ह इट... इट हॅपन्स...
त्याच्याकडे तीव्र नजरेने पाहून सिनियर भल्लांना भेटण्यासाठी रोझाली तीरासारखी पुन्हा वर धावली. तिच्या धावणार्या पाठमोर्या आकर्षक आकृतीकडे लालसेने पाहणार्या जडेजाच्या मनात त्यावेळी....
फार वेगळे विचार चाललेले होते...
===========================================
आज कामवाली दिवसभर न आल्याने सत्तरीच्या पटवर्धन काकू दोन वेळचा स्वयंपाक करून भयंकर दमल्या होत्या. काका त्यांना जमेल ती मदत करत होते. त्यातल्यात्यात एकच बरं होतं! शेखरचा अमेरिकेहून फोन आला होता अन त्यावर तो, सुप्रिया अन अनिकेत, म्हणजे नातू, हे तिघेही कधी नव्हे ते चक्क एक तासभर बोलत बसले होते..
काका - दमलीस नं?
काकू - काय करणार.. मुलांना जन्म द्यायचा, वाढवायचं... अन मग... हे असं एकटं राहायचं..
काका - एकटी आहेस तू?
काकू - नाही हो.. का असं बोलता? आपण दोघेही एकटे असं म्हणतीय..
काका - हा हा! दोघे एकटे कसे असतील..
काकू - इतक्या रात्रीही तुम्हाला विनोदच सुचतात...
काका - खरच सांग... थोडे.. हात दाबून देऊ का..
काकू - नाही.. एक झोप झाली की बर वाटेल..
काका - आज बरं वाटतंय नाही? अनिकेत किती वेळ बोलला..
काकू - दोन वर्षं झाली सगळ्यांना पाहून..
काका - असुदेत... मी आता ते चॅटिंग का काय ते शिकणार आहे..
काकू - म्हणजे?
काका - म्हणजे फोन न करताही गप्पा मारता येतात.. पण लिहावं लागतं...ते कॉम्प्युटरवर दिसतं..
काकू - बाईगं! काय काय निघालंय... महाग असेल ते...
काका - फोनहून स्वस्त! तासाला पंधरा रुपये..
काकू - कुठे असतं ते?
काका - ती हे नसतात का? सायबर सारबर लिहिलेली दुकानं.. त्यात.. इंटरनेटवाली..
काकू - त कसलं तुम्हाला जमतंय..
काका - नुसतं शिकण्याबद्दल म्हणतोय मी... नाही जमलं तर नाही जमलं ... त्यात काय? नाही का?
गप्पा मारत मारत झोप केव्हा लागली दोघांनाही समजलं नाही. मध्यरात्री कधी तरी काकू 'आईगं' करत उठल्या. संधिवाताचा त्रास होता. मूव्ह लावायलाच हवं होतं! काकांनी काकूंना थोपटत थोपटत थोडं मूव्ह लावून दिलं. पण पेन्स कमी होईनात! पेनकीलर आणायलाच हवी होती संध्याकाळी...
नको नको म्हणूनही २४ तास उघडा असलेल्या केमिस्टकडे जायला काका उठले अन बाहेर गेले..
तेवढ्यात...
फोन वाजला..
शेखर - आई..
आई - काय रे?
शेखर - अनिकेतला अॅडमीट केलंय...
आई - 'काय'???? (पटवर्धन काकू अक्षरशः किंचाळल्या) .... अरे काय झालं?
शेखर - अॅक्सीडेन्ट झालाय.. गाडीचा धक्का बसला..
आई - शेखर... अरे.. कसाय तो आता..
शेखर - पायाला फ्रॅक्चर आहे आई... आम्ही बहुतेक..
आई - काय???
शेखर - आम्ही बहुतेक माझी ही टर्म संपली की फॉर गूड तिकडेच येऊ... इथे फार एकटे पडतो..
आई - पण अनिकेत कसा आहे..??
शेखर - तो शुद्धीत आहे.. दोन महिन्यांनी बरा होईल..
अनिकेतची ही वाईट बातमी ऐकून प्रचंड धक्का बसलेला असतानाच...
सगळे कायमचे इकडे येणार... हा एक सुखद धक्काही बसला होता... संधिवाताच्या वेदना.. आता अजिबात जाणवत नव्हत्या...
=============================================
फ्रॅन्क परेरा! शेअर मार्केटमधलं एक दादा नाव! त्याच्या नुसत्या निश्वासावर कोट्यावधींची उलाढाल व्हायची! पण आज... पुण्याहून मुंबईला येताना लोणावळ्यात बी.एम.डब्ल्यु. बंद पडल्यामुळे ती ड्रायव्हरवर सोपवून तो चक्क हिरव्या एशियाडने मुंबईला निघाला होता. बी. एम. डब्ल्यु. बंद पडते? बी.एम.डब्ल्यू?
६३ लाखांची गाडी जर बंद पडत असेल तर आता काय हेलिकॉप्टर घ्यायचं का?
त्यात एक वेगळाच प्रॉब्लेम झाला होता. त्याच्या शेजारच्या सीटवर एक कुठलातरी किरकोळ राजकीय नेता, नेता म्हणण्यापेक्षा गुंड कार्यकर्ता बसला होता. फ्रॅन्क परेराला अविरत फोन येत होते. आणि प्रत्येक फोनवर त्याच्या तोंडातून बाहेर पडणारे शब्द ऐकून तो सावंत नावाचा गुंड पुढारी हादरत होता. पंजाब ट्रॅक्टर्समे तीस लाख... इधरसे निकालो.. विमल अभी नही.. दो करोड का घाटा होगया पीछली बार! वगैरे वगैरे! बरं! हे बोलण्यात कुठेही 'चारजणांना आकडे ऐकवायचे आहेत' असा गर्व नाही. शांत स्वर! खणखणीत आत्मविश्वासयुक्त बोलणे! त्यामुळे सावंतने ठरवले होते. खंडणीसाठी बेस्ट बकरा मिळालेला आहे.. याला उतरला की धुवायचा, धमकवायचा.. अन उद्या याच्या ऑफीसमधे जायचं! माणूस घाबरटच दिसतोय! सावंतने मोबाईलवरून पाच, सहा जणांना दादरला आधीच येऊन थांबायला सांगीतलं होतं!
फ्रॅन्क परेराला यातील कशाशीही देणं घेणं नव्हतं! मनात आणलं असतं तर त्याने चुटकीसरशी शेजारच्या पुढार्याला नेस्तनाबूत केलं असतं! पण त्याला कशाची कल्पनाच नव्हती. कधी एकदा दादर येतंय अन आपण या घामट वातावरणातून उतरतोय एवढाच विचार तो 'फोनवर बोलत नसेल' तेव्हा करत होता.
===============================================
किंग फिशरची 'डेल्ही-मुंभाय' फ्लाईट रात्री ११.५५ ला लॅन्ड झाली अन लाल लाल स्कर्टमधून दिसणारे हवाईसुंदरींचे गोरे गोरे पान पाय आता पुढच्या ट्रीपपर्यंत दिसणार नाहीत म्हणून वैतागलेले पंचावन्न वर्षांचे तबलावादक निषाद हरी सांताक्रूझच्या बाहेर आले अन भायखळ्याकडे असलेल्या आपल्या घरी जाण्यासाठी टॅक्सीत बसले.
दिल्लीच्या कार्यक्रमातली बिदागी खरे तर दोन महिने पुरली असती, अगदी निषाद हरी राहायचे त्या स्टॅन्डर्डनेही! महान प्रतिभावान तबलावादक! पण एका सामान्य शेजारणीने ब्लॅक मेल केल्यामुळे तिला जे दोन लाख देऊन कायमचे 'बाय बाय' करायचे होते त्यातील केवळ पंचाहत्तर हजार देऊन झालेले होते. या दिली ट्रीपमधे मिळालेले साठ हजार त्यामुळे पुरणार नव्हते. यातले किमान तीस हजार तरी तिला देऊन टाकायला हवे होते. त्यामुळे बायकोला त्यांनी आधीच 'तीस हजार अन येणे जाणे फ्लाईटने' असे मानधन सांगून ठेवले होते. ती एकदम खुष! तीन दिवस तबला वादनाचे एवढे पैसे? पाकिस्तानातून आलेल्या अनेक कलाकारांच्या मोठ्या ग्रूपसमोर हा परफॉर्मन्स असल्यामुळे एवढे मानधन मान्य झालेले होते. शासनाचे आलेले 'साठ हजार रुपये' वाले पत्र मात्र निषाद हरींनी बायकोपासून लपवून ठेवलेले होते.
प्रेमा कतलानी! आपल्या शेजारणीची त्यांना आठवण झाली. आपल्याला दुसरी कुणी आवडूच नये हा तिचा विचार चुकीचा आहे हे त्यांना आत्ताही वाटत होते. पण मुळात प्रेमाच आपल्याला किंवा आपण प्रेमाला आवडू नये असे आपल्याच बायकोला वाटत असेल किंवा वाटेल हे मात्र त्यांना वाटत नव्हते.
रात्रीचा भन्नाट वारा अंगावर घेत त्यांनी फोर स्क्वेअर पेटवली आणि...
==============================================
दुसर्या दिवशीच्या पेपरमधील बातमी.... !!
सोमाई केवलरामानी या मद्यधुंद अवस्थेतील गाडीचालकाने कित्येकांना चिरडले..
शेअर मार्केटचे सम्राट फ्रॅन्क परेरा, श्री. पटवर्धन नावाचे एक प्रौढ गृहस्थ, राजकीय नेते सावंत व त्यांचे दोन सहकारी, राशिद, सुमी, हे भिकारी जोडपे व त्यांची विजय व सुलताना ही अपत्ये.. हे सर्व या अपघातात ठार झाले.
केवलरामानींची गाडी पुढे जाऊन ज्या टॅक्सीला धडकली त्यात महान प्रतिभावान तबलावादक निषाद हरी होते व ते गंभीर जखमी झाल्यामुळे अत्यवस्थ आहेत...
सोमाई केवलरामानी हे स्वतःही या अपघातात ठार झाले.
===========================================
सारत विजू या आपल्या ३
सारत विजू या आपल्या ३ वर्षांच्या, मोठ्या मुलाला
तिचा आधीचा मुलगा विनू
छान. आवड्ली.
छान. आवड्ली.
खरोखर दुर्दैवी घटनाचक्र!!!
खरोखर दुर्दैवी घटनाचक्र!!! शेअर मार्केटचे सम्राट फ्रॅन्क परेरा.राजकीय नेते सावंत व त्यांचे दोन सहकारी दादर ला उतरून कोणत्या दिशेने पायी निघाले होते ?? माझं नॅव्हीगेशन वाईट आहे म्हनून हा प्रश्न विचारलाय..
.
.
मस्तच्....
मस्तच्....
नेहमी प्रमाणे छान.
नेहमी प्रमाणे छान.
छान! आवडलं.
छान! आवडलं.
नाही आवडली
नाही आवडली
सर्व मित्रांचे मनःपुर्वक
सर्व मित्रांचे मनःपुर्वक आभार! प्रतिसादांमुळे हुरूप आला.
-'बेफिकीर'!
आवडली.
आवडली.
शेवट झटका देणारा, आवडले
शेवट झटका देणारा, आवडले
जोर का झटका...... मस्त
जोर का झटका......
मस्त कथाबीज....
खूप चांगल्या रित्या फुलवलेलं...
कथा आवडली...
क्या बात है.
क्या बात है.
बापरे! चांगलं गुंफलं आहे.
बापरे! चांगलं गुंफलं आहे.
सुरेख.......मस्त ओघ आहे
सुरेख.......मस्त ओघ आहे तुमच्या लिखाणाला. आवडेश
येकदम फास्ट लिखाण, आवडल!!!
येकदम फास्ट लिखाण, आवडल!!!
सर्व प्रेमळ प्रतिसादकांचे
सर्व प्रेमळ प्रतिसादकांचे मनःपुर्वक आभार त्यांच्या प्रोत्साहनासाठी!
-'बेफिकीर'!
भुषण जी मस्तंच...त्या परेरा
भुषण जी मस्तंच...त्या परेरा ला ठार न करता वाचवला असता तर सावंत आणि त्याची मस्त कथा झाली असती.
मस्त.. सुरवातीला वाचताना
मस्त.. सुरवातीला वाचताना सगळ्यांना एकत्र बांधणारा धागा काय असेल हे लक्षातच येईना.. मग अचानक शेवटी धक्का...
आय अॅम _ १ जून व साधना, आपले
आय अॅम _ १ जून व साधना,
आपले मनापासून आभार! परेरा व सावंतची कथा खरच चांगली झाली असती. आपण एक चांगला विषय दिलात मला! धन्यवाद!
-'बेफिकीर'!
एक फिल्म बनु शकते यावर....
एक फिल्म बनु शकते यावर....
बाप रे काही क्लुच लागत नव्हता
बाप रे काही क्लुच लागत नव्हता आधी वाचताना....भन्नाट कथा...
मस्तच....सर्व वेगवेगळी पात्रे
मस्तच....सर्व वेगवेगळी पात्रे आणि कथानके शेवटी एकत्र करुन एक जबरदस्त झटका दिलाय.
मस्तच. आधी सगळ्यात एक कोण्ता
मस्तच. आधी सगळ्यात एक कोण्ता समान दुवा असेल काही कळतच नव्हतं. शेवटी धक्का बसला.
रोझालीला चं काय झालं? ???
रोझालीला चं काय झालं? ???