गुजर

Submitted by बेफ़िकीर on 21 May, 2012 - 04:28

दोन ते तीन अपघात वाचवत आणि दहा ते बारा वाहनचालकांचे हॉर्न्स आणि शिव्या दुर्लक्षित करत हेमा ऑफीसच्या पार्किंगला पोचली तेव्हा हाफ इयर एन्डिंगसाठी वेळेत पोचण्याची सर्व इच्छा संपून त्या जागी मनात कमालीचे भय साठलेले होते. स्कूटी कशीबशी स्टॅन्डला लावत एरवी कार्ड पंचिंगसाठी धावत सुटणारी हेमा स्कूटीवरच बसली आणि पर्समधील पाण्याची लहान बाटली काढून तिने ती तोंडाला लावली. घरून निघताना केलेला सर्व मेक अप आता जणू चेहर्‍यावरून आणि मानेवरून भयाच्या रुपाने ओघळत होता.

स्वतःचे श्वास नियंत्रीत करणे तिला अशक्य होते. किंचित उशीर झालेला स्टाफ तिच्याकडे विचित्र नजरेने बघत ऑफीसकडे धावत होता. लहानश्या आरश्यात तिने स्वतःचा चेहरामोहरा पाहिला आणि तो पाहताना तिला रडूच कोसळले.

आपल्या सर्व शरीराचे भीतीमुळे विरघळून पाणी होत आहे आणि आपण पाण्याच्या साचलेल्या आकारहीन अस्तित्वाप्रमाणे लवकरच या पार्किंगमध्ये मुरून जाऊ असे तिला वाटू लागले. घडलेली बाब अविश्वसनीय होती.

धीर धरून ऑफीसला जायला तर हवेच होते. हाफ इयर एन्डिंगचे शेवटचे तीन दिवस राहिलेले असताना आजही आपण लेट झालो हे पाहून नातू सरकणार हे तिला लक्षात आले होते. पण प्राधान्य त्या बाबीला नव्हतेच आत्ता.

स्वतःचे पाऊल उचलताना स्वतःलाच इतके कष्ट पडतात हे तिला आजच समजले. आपण ठीक आहोत असे दाखवण्याचा असफल प्रयत्न करत ती एलेव्हेटरपाशी आली आणि नेहमीच्या लिफ्टमनने दिलेली नेहमीचीच सलामीही तिला भीतीदायक वाटली. तिसरा फ्लोअर येईपर्यंत कशीबशी त्या लिफ्टमनच्या हालचालींकडे तिरकी नजर ठेवत ती धपापत राहिली आणि लिफ्टचे दार उघडताच तीरासारखी बाहेर पडली.

आजही लेट झाल्याबद्दल हेमाला झाप पडणार अशी भावना असलेल्या तमाम नजरांकडे दुर्लक्ष करत हेमा कामिनीच्या टेबलपाशी आली आणि बघतच बसलेल्या कामिनीचा हात धरून म्हणाली...

"नातू सरांकडे चल माझ्याबरोबर... एक प्रॉब्लेम झालाय..."

अक्षरही न बोलता केवळ हेमाचा चेहरा पाहून कामिनी तिच्यामागोमाग नातू सरांच्या केबीनमध्ये शिरली. तिथे आधीच असलेल्या नातूंच्या सेक्रटरी राव बाई आणि नातूंचे जुने लेफ्टनंट हेबाळकर या दोघींकडे पाहात बसले. आत येऊ का आणी समोर बसू का यातील एक प्रश्नही न विचारता दोघी सरळ समोर बसल्या आणि हेमाने नातूंच्याच ग्लासमधील पाणी पिऊन टाकले. नातूंच्या चेहर्‍यावर दोन भावनांची सरमिसळ होती. एक तर हेमा पार्थसारथी आजही लेट आली आणि ती का कुणास ठाऊक पण घाबरलेली आहे. नातू आधीच वैतागलेले होते कारण डिपार्टमेन्टची सर्व कामे करू शकणारा आणि हेबाळकरांना एकच पोस्ट ज्युनियर असलेला व नातूंचा दुसरा जुना लेफ्टनंट गुजर आज आलाच नव्हता.

"व्हॉट्स राँग हेमा?"

"सर... देअर इज अ बिग प्रॉब्लेम..."

"काय झालं काय?"

सगळ्यांचाच संवाद संपलेला होता. हेमाचे काजळ गालावर आलेले होते, हात थरथरत होते...

हेमाने पर्समधून एक चिठ्ठी काढून नातूंना दिली...

"हे काय आहे?... लीव्ह अ‍ॅप्लिकेशन???.. गुजरचे???.. गुजर येणार नाहीये??? तीन दिवस??? पण का? कसले पर्सनल कारण????.... धिस इज हाफ इयर एन्डिंग.....हे तुला दिले त्याने???"

हेमाने नुसतीच होनारार्थी मान डोलावली...

"पण.. तुला काय झालंय????"

"सर... गुजरने मला... चहा प्यायला म्हणून घरात येण्याचा आग्रह केला.. तो रस्त्यावरच उभा राहून माझी वाट पाहात होता हे लेटर देण्यासाठी... मी लेटर घेतले आणि साहेबांना देते म्हणून निघाले तर म्हणाला चहा घेऊन जा.. मी नाही नाही म्हणत होते पण खूपच आग्रह केला म्हणून त्याच्या घरी गेले... "

"हं... आणि चहा घेण्यात वेळ गेला... आणि त्यामुळे लेट झाला.."

"नो सर... प्रॉब्लेम वेगळाच आहे.. गुजर चहा करत होता.. आणि... त्याने अचानक आतल्या खोलीकडे बघून हाक मारली... "

"कोणाला?????"

"सर... गुजरने... त्याच्या आईला हाक मारली..."

"आईला म्हणजे???"

"त्याच्या स्वतःच्या आईला..."

खोली सुन्न झाली... अक्षरशः सुन्न ... हेमा का हादरलेली होती हे आत्ता सगळ्यांच्या डोक्यात घुसले..

"हेमा... गुजरच्या आईला हाक मारली म्हणजे काय??? मला समजले नाही..."

नातू उगाचच काहीतरी बोलायचे म्हणून बोलले.. पण त्यांचा स्वतःच्या त्या प्रश्नावर तसुभरही विश्वास नव्हता.. निरर्थक वाटत होता त्यांना तो प्रश्न...

"आणि सर... गुजरची... गुजरची आई बाहेर आली...."

खाड!

कामिनी होतील तितके डोळे मोठे करून हेमाकडे बघत होती... राव बाई स्तब्ध झाल्या होत्या... आणि हेबाळकर मती कुंठित झाल्यासारखे बघत होते तिच्याकडे...

नातू उभे राहिले होते... आणि पुन्हा खाली बसले होते...

"काय बो...काय बोलतीयस तू???? तुझं तुला समजतंय का???"

"सर... गुजरची आई... माझ्याशी बोलली... म्हणाली किती... किती दिवसांनी आलीस... "

कामिनीच्या घशातून हेमाचे हे वाक्य ऐकून विचित्र उद्गार उमटले... आता मात्र राव बाईही एका खुर्चीवर बसल्या...

"हेमा.. आर यू इन यूअर सेन्सेस???"

"अ‍ॅबसोल्यूटली सर... गुजर चहा करत होता... काहीतरी आणायला तो आतल्या खोलीत गेला आणि... आणि त्याच्या आईकडे ... एकदाही न बघता मी... तिथून धावत सुटले... "

पुन्हा एकदा खोलीत नि:शब्द शांतता पसरली... एकटी हेमा टेबलवर डोके ठेवून स्फुंदून रडत होती... कामिनी तिच्या पाठीवरून हात फिरवत तिला धीर देण्याच्या प्रयत्नात असताना स्वतःच गर्भगळीत होऊन सगळ्यांकडे पाहात होती...

नातू हेबाळकरांकडे बघत म्हणाले...

"हेबा...गुजरची आई तर गेली ना गेल्या वर्षी???"

"हो सर... आपण सगळे गेलोवतो की स्मशानात...एक वर्ष होऊन गेले..."

"मग... हेमा.. या कोणी वेगळ्या बाई असाव्यात..."

"सर... त्या कोणी वेगळ्या बाई असत्या तर...मी अशी का पळाले हे विचारायला गुजरचा डिपार्टमेन्टला कोणालातरी फोन आला असता ना??? आलाय का कोणाला??? मला माहीत नाही..."

"नाही आला".... कामिनी घाईघाईत म्हणाली...

"आणि सर... वेगळी बाई काय??? मी गुजरच्या आईला कित्येकदा भेटलेलीय... "... हेमाने पुढचे सांगितले..

कितीतरी क्षण सगळे नुसतेच एकमेकांकडे बघत बसले होते... अचानक हेबाळकरांना सुचले...

"सर... वैद्य आहे ना... त्याला ह्यातले थोडे कळते... "

"बोलव त्याला..."

वैद्य कामात विशेष नव्हता... पण त्याला आत्ता या क्षणी महत्व प्राप्त झालेले होते..

तो आत आला आणि त्याने सगळे ऐकून तर घेतले... पण त्याचा चेहरा असा झाला जणू काहीतरी भयंकर त्याला समजले असावे... हतबुद्ध होऊन तो टेबलकडे पाहातच बसला..

"काय झालं वैद्य ???"

"सर... हे... हे कोणालाच पटणार नाही... पण... मला माहीत आहे की... की... असे... म्हणजे .. घडू शकते सर असे .."

"क्काय??????"

"येस सर...आपल्याला... तिथे जायला हवे...."

"तिथे??? "

"हो सर.. पण सर... गुजर???? गुजर असा असेल.... कधीच... कधीच नाही वाटले सर..."

"असा म्हणजे????"

"सर... आय थिंक... गुजर... पोचलेला आहे... त्याला हे सगळे जमते..."

"काय बडबडतोयस वैद्य...???"

"सर... आपण सगळे जाऊ तिथे..."

"एक मिनिट... माझ्या मैत्रिणीच्या दिराचा मुलगा त्याच वाड्यात राहतो... पप्पू... त्याला फोन करू आपण आधी..."

राव बाईंनी ही माहिती सांगितली. तसे नातू त्यांच्याकडे बघत म्हणाले...

"पप्पू???? ... केवढाय तो ???"

"सर... वाड्यात त्याला सगळे पप्पू म्हणतात इतकेच... तो चांगला तिशीचाय...."

"कॉल हिम???"

राव बाईंनी डायरीतून पप्पूचा नंबर लावला... पप्पूने काही रिंग्जनंतर उचलला...

"पप्पू... मी राव काकू बोलतीय... आरती काकूची मैत्रिण... ओळखलंस का???"

"अरे??? काकू?? तुम्ही कसा काय फोन केलात???"

"पप्पू...तू कुठे आहेस??"

"का??? घरीच आहे???"

"अरे.. ते गुजर राहतात ना तुमच्याइथे???"

"हो... ते तुमच्या ऑफीसला आहेत.. मला माहितीय...."

"ते.. ते कुठे आहेत आत्ता???"

"काहीतरी तीन दिवस गावाला जाणार होते मगाशीच... काही पूजा की काय आहे म्हणाले...का???"

"त्यांच्या घरी कोण कोण असते???"

"एकटे असतात ते??? का?"

"पण..स्वयंपाक वगैरे??? बाईमाणूस???"

"छे छे... ते स्वतःच्या हाताने करून हातात सगळे.. ओठा धार्मिक माणूस आहे.. का हो???"

"अरे... त्यांच्या आई कुठे आहेत??"

"गुजर आजी गेल्या मागच्या वर्षी... "

"गेल्या???"

"हो... का???"

"नाही काही नाही.... "

राव बाईंनी फोन ठेवला आणि पप्पूने काय सांगितले ते सगळ्यांना ऐकवले..

आता सगळ्यांनी पुन्हा हेमाकडे पाहिले... आता खरे तर कामिनीलाही हेमाच्या सांगण्याबद्दल काहीतरीच वाटू लागले होते... हेमाला भ्रम झाला असावा असे तिलाही वाटू लागले..

हेमाने नि:संदिग्ध शब्दात पुन्हा सांगितले...

"माझ्याकडे असे पाहू नका प्लीज... गुजरच्या आईला आत्ता... केवळ अर्ध्या तासापूर्वी भेटून आलीय मी.. मी कशाला असले काहीतरी खोटेनाटे सांगेन सर????... अहो माझे आणि गुजरचे किती व्यवस्थित आहेत संबंध... "

हे मात्र सगळ्यांना पटले... असल्या बाबतीत उगाच खोटे बोलेल अशी व्यक्ती नव्हतीच हेमा...

आता नातूंनी स्वतःच गुजरच्या घरातील फोनवर कॉल केला... तीन वेळा कॉल करूनही कोणीही रिसपॉन्स दिला नाही... त्यामुळे सगळे पुन्हा चक्रावले..

"सर... मी पुन्हा सांगतोय... आपल्याला तिथे जायलाच हवे..."

वैद्यने पुन्हा तीच सूचना केली... तसे नातू बोलले...

"वैद्य... आपण जाणे चूक ठरेल... एक तर या बायकांना नेणे योग्य नाही... आणि... अरे खरंच असलं काही असलं तर... आपण तरी काय करणार आहोत???"

"सर... मला यातले समजते... बायकांना तर न्यायलाच हवे... गुजरची आई असलीच तर आपल्या पुरुषांना पाहून दिसायची नाही ती... बायकांना बघून बाहेर तरी येईल... आणि.. वाड्यातले लोक आहेत की सगळे... "

"वैद्य... किती सहज बोलतोस तू... गुजरची आई असलीच तर वगैरे... अरे आपल्यादेखत त्यांचा अंत्यविधी झाला होता..."

"हो पण सर... तुमच्या लक्षात आहे का बघा.. अंत्यविधीच्या वेळी गुजर एकदाही रडला नाही... उलट मंद हासत होता तो...."

आता हेबाळकर आणि नातूही उडाले. हे मात्र खरे होते. तेव्हाही ही बोलणी झालेली होती गुजरला दु:ख तरी झाले की नाही याची..

नातूंनी सर्व बायकांना विचारले... आधी तयार नव्हत्या... नंतर कामिनीने आणि वैद्यने सर्वांना धीर दिला.. हेमाला मात्र कुतुहल होते की हा प्रकार काय असावा??? त्यामुळे तीही जायला तयार झाली...

एका ट्रॅक्समधून सगळे निघाले.. ऑफीसमधील बाकीच्या कोणालाही कसलाही सुगावा लागू न देता...

गुजरच्या वाड्यापाशी ट्रॅक्स थांबली आणि प्रवेशद्वारातून एक अंधारा बोळ पार करून सगळे उजवीकडे वळले... हेमा सगळ्यात मागे होती आणि वैद्य सगळ्यात पुढे...

आणि जे दृष्य दिसले ते विचित्र होते... गुजरच्या घराचे दार उघडेच होते..

मग फोन का उचलला नाही???

वैद्य दारापाशी गेला आणि पहिली पायरी चढून त्याने आत पाहिले.. ती बाहेरची खोली होती... मगाशी हेमा याच खोलीत बसलेली होती... तेथे कोणीच नसल्याने वैद्यने दार जोरजोरात वाजवतानाच आपले जानवे बाहेर काढून धरले..

वैद्यच्या मागे हे सगळेजण धीर धरून उभे होते... तेवढ्यात मागच्या बाजूला असलेल्या जुनाट खोलीच्या स्वयंपाकघराच्या एका खिडकीचा कसासाच आवाज आला आणि त्यात एका म्हातारीचा चेहरा उगवला.. तिचे भलेमोठे कुंकू, डोळ्यातील विचित्र भाव आणि ओठांवरचे त्याहून विचित्र स्मितहास्य पाहून एक तर सगळे शहारलेच... त्यातच ती खर्जातल्या आवाजत म्हणाली...

"अप्पा गुजर नाहीये... गेला गावाला...."

"मग दार??? दार का उघडंय???"

वैद्यने गुजरच्या दारातूनच विचारले त्या बाईला... हा प्रश्न सगळ्यांच्याच मनातला होता... ती बाई तो प्रश्न ऐकून विचित्र हासली आणि प्रत्येकाला स्वतःची आई आठवावी असे वाक्य बोलली...

"गुजरची आई असेल आत... "

खरोखर राव बाई आणि कामिनीच्या पायातले बळ गेले... मात्र हेमा आता ताठ मानेने नातूंकडे पाहू लागली.. वैद्य, हेबाळकर आणि नातू... हे तिघेही हादरलेलेच होते... एक तर ती बाई स्वतःच दिसायला विचित्र होती... आणि तिने ही अशी बातमी सांगितली होती.. आणि त्यात तिने अचानक ती खिडकी आपटून बंद केली आणि ती दिसेनाशी झाली..

"चला सर... आपण जाऊयात ...."

कामिनीने सरळ पलायनाचा प्रस्ताव मांडला.. पण वैद्य हे ऐकणार नव्हता... चारचौघांसमोर आपण साहसी आहोत हे सिद्ध करायचे होते त्याला.. तो सरळ गुजर, गुजर अशा हाका मारत बाहेरच्या खोलीतून आत प्रवेशला...

मात्र ह्या बाकीच्यांशी अवस्था खरोखर दयनीय झालेली होती... नातू स्वतःच सटकू पाहात होते...

नातूंच्या मनातील ते विचार हेरून कामिनी पहिली मागे सरकली... आणि गुजरच्या खोलीकडे पाठ करून धावत सुटली.. ते पाहून राव बाई आणि हेमा मागून धावल्या आणि शेवटी वैद्यची काळजी मनातून बाजूला सारून हेबाळकर आणि नातू एकमेकांचा हात धरून पाय लावून पळू लागले... वैद्य बाहेर येईल की नाही आणि आला तर कोणत्या परिस्थितीत असेल ही शंका कोणी बोलतही नव्हते.. .पण प्रत्येकालाच पडली होती...

... आणि.. प्रवेशद्वारासमोरच्या अंधार्‍या बोळाच्या तोंडाशी येताच कामिनी मटकन खाली बसली... मागोमाग आलेला प्रत्येकजण... अगदी तसाच खाली बसला... कारण प्रवेशद्वारापाशी ते दार आतून बंद करून एका खुर्चीवर गुजरची आई बसलेली होती... एखादा विनोद व्हावा तशी या सगळ्यांकडे पाहून हासत होती... विधवेसारखी पांढरी साडी.. आणि पूर्ण बाहेर आलेले डोळे.. अंधारा बोळ.... बोबडी वळलेली होती सगळ्यांची... तेवढ्यात बोळात उघडत असलेल्या एका खिडकीतून मगाचचीच ती विचित्र म्हातारी आपले तोंड बाहेर काढून खदाखदा हासत गुजरच्या आईला म्हणाली..

"आले बघ... सगळे आले... "

ते ऐकून गुजरची आई भयंकर आवाजात हासली... त्या हास्याचे प्रतिध्वनी विरतायत तोवर बोळातल्याच पण वरच्या मजल्यावरच्या एका खिडकीतून एक चेहरा उगवला आणि राव बाईंकडे बघत म्हणाला...

" ही मला विचारते कशी... पप्पू... गुजरांच्या घरात कोण कोण असतं रे???"

पप्पू, ती विचित्र म्हातारी आणि गुजरची आई... सगळेच हासले.. कामिनी बेशुद्ध पडायची वेळ आलेली होती... नातू अक्षरशः रडत रडत हेमाकडे पाहात म्हणाले...

"वैद्यला सांगत होतो की इथे नको यायला..."

हेमा डोळे फाडून सगळ्या प्रकाराकडे पाहात होती... तेवढ्यात मागून वैद्य आला... प्रसन्न चेहर्‍याने सगळ्यांना म्हणाला..

"या आत.. गुजर बोलावतोय... "

मंत्रावल्यासारखे सगळे जण हळूहळू चालत गुजरच्या घरात शिरले... गुजर आणि त्याच्या आईचे प्रेत असे शेजारी शेजारी बसलेले होते... प्रेतही उठून बसवलेले होते आणि तेच बाहेर आलेले डोळे या सर्वांकडे खिन्नपणे पाहात होते...

गुजरने सगळ्यांना "बसा' म्हणून सांगितले आणि हेमा खदखदून हासली...

सगळे हेमाकडे बघत असतानाच गुजर हेमाला म्हणाला..

"थॅन्क्स हेमा.."

दुसर्‍या दिवशी पेपरमध्ये बातमी आली

'ट्रॅक्स भिंतीवर धडकून सहाजण मृत्यूमुखी'

=============================================================

-'बेफिकीर'!

गुलमोहर: 

:$

मला आधी या सगळ्या प्रकाराला शेवटी काहीतरी एक्स्प्लनेशन असेल असं वाटत होतं. पण तसं झालंच नाही की. कथा चांगली रंगवलेय पण हे सगळं मुळात का? हे कळलं नाही.

बाप रे....हा काय प्रकार आहे.....म्हणजे हेमाला पहिले मारले मग ती भूत बनून ऑफीस मधे आली होती....तो पप्पू पण तसाच?
भयानक आहे... जबरदस्त भयकथा आहे..