डॉ. श्रीराम लागू हे तेंडुलकरांचे मित्र व त्यांच्या नाटकांतील अभिनेते. डॉ. लागूंनी नाटकात पदार्पण केलं ते तेंडुलकरांच्या नाटकातूनच. अभिव्यक्तीस्वातंत्र्य, सेन्सॉरशिप या मुद्द्यांवरून जेव्हा शासनाशी भांडण्याची वेळ आली, तेव्हा डॉ. लागू, तेंडुलकर, दुर्गाबाई, कमलाकर सारंग अग्रस्थानी होते. तेंडुलकरांच्या प्रथम स्मृतिदिनी त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या नाटकांबद्दल बोलत आहेत डॉ. श्रीराम लागू..
तेंडुलकर व माझा परिचय झाला तेव्हा मी नाटकांत स्थिरावण्याचा प्रयत्न करत होतो. तसं पाहिलं तर माझ्या व त्यांच्यात वयात फारसा फरक नाही. माझ्यापेक्षा एक-दोन महिन्यांनी लहानच होते ते. मी, विजयाबाई, किंवा तेंडुलकरांमुळे प्रभावित झालेल्या इतर काहींच्या वयात फारसा फरक नसला तरी विचार करण्याची पद्धत, वैचारिक परिपक्वता यांत फार अंतर होतं. तेंडुलकरांचा पत्रकारितेशी जो संबंध होता, त्यामुळे त्यांचा outlook असा wide होत गेला. जो आमचा नाही होऊ शकला. आपलं प्रत्येक मत स्पष्टपणे मांडायचंच, असं त्यांनी ठरवलंच होतं. आपल्या डोक्यात आलं आहे ना, ते मांडायचंच.. मग होऊन जाऊ द्या काय व्हायचं ते, असं म्हणूनच त्यांनी लिहायला सुरुवात केली. उदाहरणार्थ, 'गिधाडे' जेव्हा लिहिलं गेलं, तो काळ तेंडुलकरांचा अगदी सुरुवातीचा काळ होता. या नाटकानं जो हाहा:कार उडवला, तो सुरुवातीला केवळ काही वाचकांपर्यंत मर्यादित होता. पण नाटकाचे प्रयोग झाले, आणि मग स्फोटच झाला त्याचा. म्हणजे गिरीशने (कर्नाड) म्हटल्याप्रमाणे, एखाद्या शांतपणे चालू असलेल्या बाजारात एकदम बाँब पडल्यावर जे होईल, तसं झालं. नाटकात असं काही असू शकतं, होऊ शकतं, याची कोणी कल्पनाच केली नव्हती. मला वाटतं, 'गिधाडे'च्या निमित्ताने आम्ही जो सेन्सॉरशिपशी लढा दिला, त्यामुळे आमचाही विचार पक्का होत गेला. तोपर्यंत आम्ही 'असं काही असू शकतं', असा काही विचारच केला नव्हता. Politically blasphemous असं साहित्य ओळखीचं होतं. पण सामाजिकदृष्ट्या स्फोटक असं काही असतं, हे आमच्या लक्षातच आलं नव्हतं.
उदाहरणार्थ, गडकर्यांनी 'एकच प्याला' लिहिलं. विषय - दारूचे दुष्परिणाम. गडकर्यांनी कितीही कठोरपणे ते मांडलेलं असलं तरी समाजमान्य असा हा विषय होता. तशा अर्थाने 'गिधाडे'च्या विषयाला तोपर्यंत कोणी हातच लावला नव्हता. की माणसाच्या मनामध्ये हिंसा ही एक प्रेरक शक्ती आहे. त्या शक्तीनं माणसाचा बराचसा भाग व्यापलेला असल्याने माणसावर जी बंधनं आली आहेत, त्यांच्याकडे लक्ष वेधणं, हे कोणी केलं नव्हतं तोपर्यंत. आणि मला वाटतं तेंडुलकरांनी ज्या बेधडकपणे हे केलं, त्या बेधडकपणाला लोकांचा आक्षेप होता. हा विचार लोकांना काही फार नवीन नव्हता. पटतो की नाही, हा भाग वेगळा. पण विचार काही नवीन नव्हता. पण तो ज्या भाषेत मांडला गेला होता, ज्या पद्धतीनं मांडला गेला होता, त्यामुळे लोकांना धक्का बसला. समाज इतका मृतप्राय झाला होता, की गिरीशने म्हटल्याप्रमाणे बाँब टाकल्यावर होतो, तसा हलकल्लोळ माजला.
पुढे अनेकदा मी हे नाटक वाचलं. पण पहिल्यांदा नाटक वाचल्यानंतरचा जो impact होता, तो मी अजून विसरू शकत नाही. पुण्याला होतो मी त्यावेळी, आणि नाटकं करत होतो. तेंडुलकरांचा व माझा थोडा परिचयही झाला होता. तेंडुलकरांचंच एक नाटक मी विजयाबाईंकडे तेव्हा केलं होतं. 'मी जिकलो, मी हरलो'. 'गिधाडे' जेव्हा पहिल्यांदा माझ्या वाचनात आलं, तेव्हा मी इतका हललो होतो, की आता काय करावं, हे मला कळत नव्हतं. हे नाटक करता येणार नाही, हे समजत होतं. काही आवडलं की ते आपल्या लोकांना वाचून दाखवायचं, अशी मला सवय आहे. त्यावेळी PDA आणि 'रंगायन' अशा दोन संस्थांशी माझा संबंध होता तेव्हा. त्यांना मी ते वाचून दाखवायचा प्रयत्न केला, पण वाचन ऐकता ऐकता लोक उठून निघून जायचे. इतकं ते नाटक स्फोटक होतं त्यावेळेला. आणि माझ्या मनात हे नाटक काही मावत नव्हतं. मग मी एकट्याने बसून ते सबंध वाचून काढलं. आणि ते रेकॉर्ड करून ठेवलं. तेव्हा कुठे मला जरा हलकं वाटलं.
ती टेप सई (परांजपे) घेऊन गेली, आणि पुढे त्या टेपचं काय झालं कुणास ठाऊक. ते नाटक कोणी करेल, हे स्वप्नातही मला वाटलं नव्हतं. मी आपलं रेकॉर्डींग करून मोकळा झालो. पण तरी ते नाटक माझ्या डोक्यातून काही गेलं नव्हतं. ते आतमध्ये कुठेतरी वेटोळं घालून पडून राहिलं होतं. पुढे दुबेकडे काम करायला लागल्यावर मग मला ते नाटक करता आलं. पण आज हे नाटक वाचताना मला ते फार स्फोटक वगैरे वाटत नाही. नाटक काळाच्या फार पुढे होतं. 'माणसांचं गिधाडे असणं', हा विषय फार नाही नवीन नव्हता. ज्या भाषेत ते मांडलं गेलं होतं, ती भाषा मराठी रंगभूमीसाठी नवीन होती. मराठी रंगभूमी म्हणजे काहीतरी उच्च, पवित्र आहे, असा एक समज त्या वेळी रूढ होता. गडकरी, खाडीलकरांचं नाव घेतलं की लगेच हात जोडले जायचे. त्यामुळे लोकांना ते फार स्फोटक वाटलं. आता मात्र तसं काही वाटत नाही. माझ्यानंतर एकदोघांनी ते नाटक केलं. एक प्रयोग मी स्वतः पाहिला. PDAनंही प्रयोग केले. म्हणजे जिथे मी नाटक वाचत असताना लोक उठून गेले, त्यांनीच ते नाटक केलं. इतकं आता ते निरुपद्रवी झालं आहे.
आता वाटतं, हे नाटक स्फोटक हाताळणीमुळे प्रसिद्धीस आलं. नाटक फार ग्रेट, अशातला भाग नाही. पण पुढे तेंडुलकरांच्या प्रत्येक लिखाणात हा जो त्यांचा विचार करण्याचा वेगळा मार्ग होता, तो दिसत राहिला. त्यांची कुठलीही दोन नाटकं पाहिलीत तर ती एकसारखी वाटत नाहीत. किंवा एकच थीम आहे, आणि त्याभोवती नाटक रचलं आहे, असंही नाही. प्रत्येक नाटकामागचा विचार भिन्न आहे, आणि तो जसा मनात आला तसाच तेंडुलकरांनी लिहिला आहे.
तेंडुलकरांची चार नाटकं मी केली. विजयाबाईंबरोबर 'मादी', 'मी जिंकलो, मी हरलो', 'गिधाडे' आणि 'कमला'. 'कमला' बरंच वादग्रस्त ठरल होतं. आम्हाला अमेरिकेला नाटक घेऊन जायचं होतं, आणि त्या वेळी अडचण अशी होती की आम्ही चौघजणंच अमेरिकेला जाणार होतो. म्हणून मग चार पात्रांचं नाटक बसवायचं. 'कमला'मध्ये चारच पात्रं होती, म्हणून आम्ही ते बसवलं. मी, निळूभाऊ, रोहिणी (हट्टंगडी) आणि चारुशीला साबळे. हेही नाटक मला फारसं आवडलं नव्हतं. मात्र 'मादी' ही एकांकिका मला आणि विजयाबाईंना फार आवडली होती.
Tendulkar was never a completely satisfying playwright. But no doubt he was an explosive playwright. आणि मराठी नाटकांत तेंडुलकरांइतकं मोठं योगदान कोणाचंही नाही, हे अगदी स्पष्ट आहे. कारण आधी सांगितलं तसं फार वेगवेगळे विषय त्यांनी हाताळले. अनेक पात्रं रंगवली. आणि पार समाजाच्या तळागाळापर्यंत गेले पात्रं शोधत. नुसते मध्यमवर्गीयांमध्ये गुरफटले नाहीत. आणि त्यांना जे मांडायचं आहे ते त्यांनी त्यांच्या भाषेत, नाटकाला आवश्यक त्या भाषेत मांडलं. अनेक नाटकं लिहिणारे अनेक नाटककार होऊन गेले. पण असंख्य विषयांवर अनेक नाटकं लिहिणारे तेंडुलकर एकमेव असावेत. एखादा विचार मनात आला की तो त्यांचा संपूर्ण कब्जा घेई. त्या विषयासंबंधी अनेक धागे त्यांच्या डोक्यात थैमान घालत. तो विषय आपल्या systemमधून काढून टाकण्यासाठी मग ते त्या विषयावर नाटक लिहित.
त्यांची नाटकं, एकांकिका वाचताना कळायचं की हा एक फार मोठा नाटककार आपल्यात जन्माला आला आहे, आणि त्याला सोडता कामा नये. याच विचाराने आम्ही त्यांची नाटकं करायचो. 'रंगायन' आणि तेंडुलकर तर एकजीव झालेले होते अगदी. विजयाबाईंना तेंडुलकरांचं महत्त्व कळलं होतं. त्यामुळे तेंडुलकर 'रंगायन'चेच मानले जायचे अगदी. जे सांगायचं आहे ते ठाणकन सांगणारा हा नाटककार. त्यामुळे आम्ही त्याला analyze करत बसलोच नाही. नाटकाचा impact बघायचा आणि ते नाटक करायचं. It would hit us somewhere. पण तरीही तेंडुलकर आपल्या नाटकांतून फार काही मोठं सांगायचे असं आज विचार करता मला वाटत नाही.
मात्र केवळ स्फोटक लिहायचं म्हणून त्यांनी लिहिलेलं नाही. त्यांना ते खरंच तसं वाटत असे. म्हणजे काही वेळेला लोकांनी त्यांना विषय सुचवले. ते 'बघू' म्हणायचे. मात्र शेवटपर्यंत त्यांनी अशी न पटलेली नाटकं लिहिली नाहीत. तेंडुलकरांनी लिहिलं खूप. कैकवेळा घाईतही लिहिलंय. त्यामुळे त्यांचं काही आवडलं नाही की आम्हाला वाईट वाटायचं. त्यांच्या कादंबर्याही मला आवडल्या नव्हत्या. 'कादंबरी एक' आणि 'कादंबरी दोन' मला obnoxious वाटल्या होत्या. त्यांचा सारा दृष्टीकोनच त्यात अतिशय morbid होता. मी सांगितलं त्यांना हे तर म्हणाले, 'जरा थांबा. कादंबरी तीन अजून यायची आहे.'
तेंडुलकर ग्रेट का? तर तेंडुलकरांमध्ये माणसाच्या अंतरंगात शिरून त्याचा objectively वेध घेण्याची क्षमता होती. म्हणजे त्या पात्राच्या तोंडी आपले विचार, आपली भाषा न लादता त्या पात्राकडे तटस्थपणे बघणं, ही तेंडुलकरांची फार मोठी शक्ती आहे, आणि ती मला फार थोड्या लेखकांमध्ये दिसली आहे. आणि म्हणून तेंडुलकरांची कुठलीही दोन पात्रं सारखी नाहीत. त्यांनी एवढी नाटकं लिहिली, पण प्रत्येक नाटकातलं प्रत्येक पात्र काहीतरी वेगळा विचार करतं आहे, वेगळं बोलतं आहे. हे मला फार महत्त्वाचं वाटतं. आणि मला सुरुवातीपासून त्यांचं कौतुक वाटत आलं आहे कारण त्यांच्या नाटकांत नाटकीपणा अजिबात नाही. पूर्वीच्या नाटकांत, किंवा कथाकादंबर्यांत प्रचंड नाटकीपणा होता. तेंडुलकरांच्या नाटकांत तसं नाही. तेंडुलकरांपासून स्फूर्ती घेऊन लिहिणार्या एलकुंचवार, कर्नाड यांच्या नाटकांतूनही हा नाटकीपणा बाद झाला. आणि म्हणूनच तेंडुलकर हे या शतकातील सर्वोत्कृष्ट नाटककार आहेत, हे नक्की.
एका ग्रेट
एका ग्रेट माणसाचे, दुसर्या ग्रेट माणसाविषयी ग्रेट उद्गार!
शेवटचा परिच्छेद किती सहज सांगून जातो तेंडुलकरांच्या मोठेपणाविषयी!
धन्यवाद चिन्मय!
ग्रेट!
ग्रेट! स्तुत्य उपक्रम..
छान. वर
छान.
वर लिहिलेल्या 'कमला' नाटकाचा आणि 'कमला' पिक्चरचा काही संबंध तर नव्हता ना? हे वाचल्यावर तोच पिक्चर डोळ्यासमोर आला.
सायोनारा, '
सायोनारा,
'कमला' हा चित्रपट नाटकावरच बेतला होता. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद तेंडुलकरांचेच होते.
हे सारे
हे सारे परिश्रमपूर्वक आमच्यापर्यन्त आणल्याबद्दल धन्यवाद.
वा! अभ्यास
वा! अभ्यास करण्यासारखं बोललेत - नुसतं वाचून सोडून देण्यासारखं नाही हे.
मेजवानीच आहे ही. चिनूक्स, शतशः धन्यवाद.
थॅन्क्स
थॅन्क्स चिनूक्स. माझा आवडता पिक्चर आहे तो.
फारच छान
फारच छान उपक्रम - शतश: धन्यवाद!
तेंडुलकरा
तेंडुलकरांमध्ये माणसाच्या अंतरंगात शिरून त्याचा objectively वेध घेण्याची क्षमता होती. >>>
जे सांगायचं आहे ते ठाणकन सांगणारा हा नाटककार. >>>
अफाट !! गिधाडे मी मध्यंतरी बालगंधर्वला पाहिले होते आणि तेव्हा मला कळले नव्हते की या नाटकात गहजब माजवण्यासारखे काय आहे ? मला हे नंतर कळले की, आता मला असे वाटणे याला गिधाडेच कारणीभूत आहे. म्हणजे गिधाडे नंतर नाटके बदलली आणि त्याबरोबर प्रेक्षकांच्या जाणिवासुद्धा.
मग 'कापडावर पाळीनिदर्शक असा लाल रंगाचा ठिपका दाखवणे, लाल रंगाला आक्षेप घेतला गेल्यावर तो निळा दाखवायला सुरू करणे...' हे किस्से कळले आणि या लोकांनी कसला लढा दिला होता याचा अंदाज आला. मग हेही कळले की हा लढा अधिकृत सेन्सॉरशिपशी जितका होता त्यापेक्षाही कैक पटीने अधिक दांभिकतेतून निर्माण होणार्या सामाजिक सेन्सॉरशिपशी होता.
***
Finagle's Second Law : No matter what the anticipated result, there will always be someone eager to (a) misinterpret it, (b) fake it, or (c) believe it happened to his own pet theory.
चिनूक्स-
चिनूक्स- सर्वप्रथम लागूंचे विचार उपलब्ध करुन दिल्याबद्दल शतानेक आभार.
पुन्हा,पुन्हा वाचावे असेच आहेत हे विचार. परखड, परखड म्हणतात ते हेच.
पण सामाजिकदृष्ट्या स्फोटक असं काही असतं, हे आमच्या लक्षातच आलं नव्हतं. >>>>
तेव्हा मी इतका हललो होतो, की आता काय करावं, हे मला कळत नव्हतं>>>
पण तरीही तेंडुलकर आपल्या नाटकांतून फार काही मोठं सांगायचे असं आज विचार करता मला वाटत नाही. >>>
आणि मला सुरुवातीपासून त्यांचं कौतुक वाटत आलं आहे कारण त्यांच्या नाटकांत नाटकीपणा अजिबात नाही >>>
यावर बरंच काही विचारावसं वाटतं पण ते विचारायची आपली लायकी आहे का , असा विचार केल्यास , विचारु नये असंच वाटतं. तरी स्वतः तेंडुलकरांनी असलेच प्रश्न पडल्याशिवाय लेखन केले नसणार.
छान लिहीले
छान लिहीले आहे.. आवडले.. तेंडुलकरांचे कुठलेच नाटक पाहीले/वाचले नाही त्यामुळे नुसतंच अंधुक काहीतरी कळल्यासारखे वाटते आहे.. वाचलं/पाहीले पाहीजे..
playwright हा शब्द नव्यानेच कळला.. आधी टायपोच वाटली होती! पण तुझ्याकडून तसं होणार नाही वाटल्याने गुगल केले.. आणि अर्थ कळला..
www.bhagyashree.co.cc
मस्तच एकदम
मस्तच एकदम चिनूक्स!
त्या पात्राच्या तोंडी आपले विचार, आपली भाषा न लादता त्या पात्राकडे तटस्थपणे बघणं, ही तेंडुलकरांची फार मोठी शक्ती आहे, आणि ती मला फार थोड्या लेखकांमध्ये दिसली आहे. आणि म्हणून तेंडुलकरांची कुठलीही दोन पात्रं सारखी नाहीत. त्यांनी एवढी नाटकं लिहिली, पण प्रत्येक नाटकातलं प्रत्येक पात्र काहीतरी वेगळा विचार करतं आहे, वेगळं बोलतं आहे.>> हे फार महत्वाचं अन नेमकं निरिक्षण आहे.
कादंबरी तीन प्रसिद्ध झाली आहे का ?
अधाशीपणे
अधाशीपणे वाचून काढलं लागूंच हे मनोगत.
वरल्या फोटोतल्या प्रंसंगाचा मी साक्षीदार होतो (बालगंधर्व, पुणे), याचा नंतर काय अभिमान वाटत राहिला होता!
--
कसा चंद्र! कसं वय! कशी तुझी चांदणसय..!
कसा निघेल इथून पाय! वेड लागेल, नाहीतर काय!
सुरेख लेख..
सुरेख लेख.. तसेच असे लेख/रेकॉर्डींग उपलब्ध करुन दिल्याबद्दल चिनूक्सचे आभार.
सही! अगदी
सही! अगदी मनापासूनचे मनोगत खूप आवडलं. धन्यवाद चिनूक्स
------------------------------------------------------------------------------
It is absurd to divide people into good and bad. People are either charming or tedious.
सुरेख
सुरेख बोलले आहेत लागू.
धन्यवाद.
छान
छान मनोगत.
चिनूक्सचे आभार.
डॉ. श्रीराम लागूंनां "ते"
डॉ. श्रीराम लागूंनां "ते" बद्दल काय वाटत ह्याची उत्सुकता होती , वरील लेखातून खूप काही समजल,चिनूक्स धान्यवाद !!!!!
फोटोतील कार्यक्रम टीव्हीवर पाहिला होता, तेंडुलकर अन लागुंनी अनेक विषयावर मंथन केले होते.
प्रत्येक धागा उसवत नाही. पण
प्रत्येक धागा उसवत नाही. पण -
https://www.maayboli.com/tendulkar मेजवानी आहे. चिनूक्स यांचे खरोखर अनंत आभार!!
>>>>तेंडुलकर ग्रेट का? तर
>>>>तेंडुलकर ग्रेट का? तर तेंडुलकरांमध्ये माणसाच्या अंतरंगात शिरून त्याचा objectively वेध घेण्याची क्षमता होती. म्हणजे त्या पात्राच्या तोंडी आपले विचार, आपली भाषा न लादता त्या पात्राकडे तटस्थपणे बघणं, ही तेंडुलकरांची फार मोठी शक्ती आहे, आणि ती मला फार थोड्या लेखकांमध्ये दिसली आहे. >>>> वाह!!! सार आलय या वाक्यात.