तिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी)
तमाम हिंदूचे श्रद्धास्थान म्हणजे तिरुपती बालाजी. अनेक वर्षांपासून तिरुपती बालाजीचे दर्शन घेण्याची इच्छा होती. पुण्याजवळील कापूरहोळ येथील प्रतिबालाजीला अनेकवेळा गेलो. मात्र, तिरुपतीला प्रथमच जाण्याचा योग जुळून आला. या प्रवासाविषयी...
भारतातील तीर्थक्षेत्रांमध्ये प्रसिद्ध असे हे तिरुपती क्षेत्र आहे. देशातील सर्वाधिक श्रीमंत देवस्थान म्हणूनही ओळखले जाते. आंध्रप्रदेश राज्याच्या दक्षिण टोकावरील चित्तूर जिल्ह्यात तिरुपती हे शहर. याच शहराच्या जवळ असलेल्या डोंगरावर बालाजीचे हे मंदिर आहे. याच डोंगराला ‘तिरुमला’ असे म्हणतात. तिरुमला डोंगर रांगेत एकूण 7 डोंगर आहेत. त्याला सात फण्यांचा आदिशेष असे म्हणतात. हे देवस्थान अगदी शेवटच्या डोंगरावर वसले आहे. म्हणून या परिसराला सप्तगिरी असेही म्हणतात. संपूर्ण डोंगर हा लाल दगडाचा आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे 853 मीटर उंचीवर असलेल्या या ठिकाणी उन्हाळ्यातही थंडावा असतो. भगवान वेंकटेशाचे मंदिर असलेल्या पर्वताला ‘वेंकटाचल’ असेही म्हटले जाते. या डोंगरावर ‘कपिलितीर्थ’ नावाचे सरोवर आहे.
‘तिरु’ म्हणजे ‘लक्ष्मी’ लक्ष्मीचा पती म्हणजे ‘तिरु पती’ (विष्णू). तेलुगू व तमिळ भाषेत ‘मला/मलई’ म्हणजे ‘डोंगर/पर्वत’. बालाजी हा विष्णूचा अवतार मानला जातो. तिरुपती राजधानी हैदराबादपासून 740 किलोमीटरवर आहे. तर शहरापासून सुमारे 20 किलोमीटरवर असलेल्या डोंगरावर हे मंदिर आहे. बरेचसे भाविक हे अंतर अनवाणी पार करतात. वैकुंठ एकादशीला येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात. असे मानले जाते कि या दिवशी बालाजीचे दर्शन घेतल्यास सर्व पापातून मुक्ती होऊन त्याला मुक्ती मिळते. दररोज सुमारे ५० हजारांहून भाविक या ठिकाणी दर्शनास येत असतात. आॅक्टोबर महिन्यात या ठिकाणी ब्राह्मोत्सव साजरा केला जातो. सुमारे ९ दिवस हा उत्सव असतो.
तिरुपती मंदिराविषयी :
मंदिराची उभारणी ही दाक्षिणात्य गोपुर शैलीपद्धतीची आहे. बालाजीची मूर्ती सोने व इतर अनेक दागिन्यांनी मढलेली असते. मूर्तीची उंची 2 मीटर आहे. मंदिराच्या स्थापनेचा अचूक काळ अज्ञात आहे. मूर्ती स्वयंभू मानली जाते. लोककथेनुसार तिरुपती डोंगरावर मोठे वारुळ होते. एका शेतकºयास आकाशवाणीद्वारे वारु ळातील मुंग्यांना खायला घालण्याची आज्ञा झाली. तेथील राजाला ही आकाशवाणी समजल्यावर त्याने त्या वारु ळास दूध पुरवू लागला. त्याच्या भक्तीमुळे बालाजी अवतीर्ण झाले.
बालाजीच्या मंदिराचा संपूर्ण कलश सोन्याचा आहे. ऐतिहासिक पुराव्यानुसार मंदिर किमान 2000 वर्षे जुने आहे. चौल व पल्लव साम्राज्यांनी या मंदिराला भरभराटीस आणले. 1517 मध्ये कृष्णदेवराय राजाने गर्भगृहाच्या शिखराला सोन्याचा थर दिला. पुढे मराठा सेनापती रघुजी भोसले यांनी देखभालीची व्यवस्था केली. म्हैसूर व गदवल संस्थानाद्वारेही या मोठ्या देणग्या मिळाल्या. ब्रिटिश काळात मंदिराचे प्रशासन येथिल हाथिरामजी मठाला सोपवण्यात आले. ही व्यवस्था 1933 पर्यंत सुरु होती. 1933 मध्ये मद्रास विधानसभेच्या विशेष कायद्याअन्वये ‘तिरुमला तिरु पती देवस्थानम’ समितीची स्थापना करण्यात आली. यालाच तिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) असे म्हणतात.
हे पुरातन मंदिर ज्या डोंगरावर आहे त्या डोंगराची माती ढासळत असल्याचा दावा मध्यंतरी पुरातत्व विभागाने केला. ही माती अशीच ढासळत गेली तर हे मंदिर एक दिवस खाली येईल असा इशारा देणारे निवेदन पुरातत्त्व खात्याने तिरु मला तिरु पती देवस्थान समितीला दिल्याचे वृत्तपत्रातून वाचण्यात आले होते. या मंदिराची तात्पुरती डागडुजी किंवा त्याच्या बाह्यरूपात काही बदल केले आहेत. मूळ शिल्पाला धक्का न लावता ही डागडुजी केली जाते. सध्या मुख्य मंदिरात डागडुजीचे काम सुरू आहे.
कल्याण कट्टा / केसांचे दान :
तिरुपती बालाजीच्या चरणी डोक्याचे केस दान केल्याने मनातील इच्छा पूर्ण होते, अशी भक्तांची धारणा असल्याने येथे स्त्री, पुरुष, सर्वजण केसदान करतात. रोज हजारो किलो केसांचे दान या ठिकाणी होत असते. या केसांचा वापर विग तयार करण्यासाठी केला जातो. यासाठी देवस्थान त्याचा लिलाव करते. मागे वृत्तपत्रात देवस्थानला ७४ कोटीं या केसव्रिकीतून मिळाल्याचे वाचण्यात आले होते. इंटरनेटद्वारे आॅनलाईन प्रक्रियेद्वारे ही विक्री झाली होती. या लिलावात सुमारे 1 लाख 40 हजार 499 किलो केस विकले गेलेत. केसांच्या लांबीनुसार त्याचे विभाजन करु न ते विकले गेले.
मंदिराच्या बाहेरील बाजूस एका मोठ्या इमारतीत कल्याण कट्टा असून, या ठिकाणी भाविक लोक आपले केस दान करतात. येणाºया भाविकांना एक कुपून व नवीन ब्लेड देण्यात येते. असे कुपून घेऊन संबंधित नंबरवर केस कापणाºया पुढे जाऊन उभे राहावे लागते. प्रथम पाण्याने डोके भिजवून केस मऊ करण्या संदर्भात सांगितले जाते. दोन ते चार मिनिटातच मुंडन केले जाते.
येथील व्यवस्थाही पाहण्या जोगी आहे. केस काढणाºयाला पैसे द्यायची गरज नाही. पैसे दिल्यास ते लोक पैसे स्वीकारत नाही. देवस्थान त्यांना प्रत्येक कुपूनामागे पैसे मोजत असतात. सर्वत्र केस कापून उभे असलेले पुरुष व स्त्री दिसतात. साफसफाई कर्मचारी सर्वत्र केस गोळा करत असल्याचे दिसून येते. याच ठिकाणी स्नान करण्याचीही सोय उपलब्ध करून दिली असते. याच बरोबर कौस्तुभ व सप्तगिरी रेस्ट भवनातही ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.
हुंडी / दान :
अलीकडे विविध धार्मिक संस्थानांच्या वाढत्या श्रीमंतीबद्दल जोरदार चर्चा होत असते. मध्ये केरळमधील पद्मनाभ मंदिराच्या संपत्तीचे आकडे डोळे विस्फरणारे ठरले. अजुनही या मंदिराचे काही दरवाजे उघडायचे बाकी आहेत. या ऐतिहासिक मंदिरात सापडलेला खजिना तर दहा लाख कोटींचा असल्याचा प्राथमिक निष्कर्ष सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीने दिला. या श्रीमंतीबाबत विचार करायचा तर बालाजी देवस्थानचा क्रमांक वरचा लागतो. या देवस्थानचे उत्पन्न काही अब्जात जाणारे आहे. मंदिराला एवढे दान मिळते की मंदिराच्या काही भिंती सोन्याच्या पत्र्याने मढवल्या गेल्या आहेत. तिरूपतीला रोख स्वरूपातील रकमेबरोबरच सोने, चांदी, हिरे यांचे दागिने अर्पण केले जातात. भक्तांनी केलेले पैशाचे हे दान मोजण्यासाठी चाळणीतून हे पैसे चाळून वेगळे केले जातात. आपापल्या ऐपतीनुसार प्रत्येक भाविक हे दान करत असतो. अंगठ्या, सोन्याची चैन, सोने असे दान करण्याची येथे प्रथा आहे.
खरा भक्त आणि देवातलं अंतर हळूहळू दूर होत चालल्याचे दिसून येते. पैसे देऊन व्हीआयपी रांग आणि सोन्याचे दान करणारे नवस भाव खाऊन जातात. कधी काळी शांततेची स्थाने असणारी मंदिरे आता मात्र, प्रचंड गजबजाट आणि कोलाहल बनू लागली आहे. त्याला धार्मिक स्वरुप येऊ लागले आहे. हिंदू धर्मातील प्रत्येक पंथाचे देव वेगळे बनले आहेत. देशातल्या प्रत्येक मंदिरातील दानपेटीत दान वाढतच जाते. शिर्डीत एका भक्तानं साईच्यां चरणी 32 लाख रु पये किंमत असणारा सोन्याचा कलश अर्पण केलाय. मंदिरातील भाविकांना रांगेत थंडावा मिळावा यासाठी एसीची व्यवस्था केली. रोज दान देणाºयांच्या संख्येत वाढ होताना दिसते. हे दान गुप्त स्वरुपात होते. पद्मनाभस्वामी मंदिराचा सुमारे एक लाख कोटीचा खजिना आहे. तर तिरु पती बालाजी मंदिराचा 50 हजार कोटीचा खजिना आहे. वैष्णोदेवी वार्षिक दान 500 कोटी तर शिर्डीचे साईबाबा संस्थान वार्षिक दान 200 कोटींच्या वर आहे. हे आकडे ऐकले तर आपला भारत गरीब म्हणावा का? हा प्रश्न उपस्थित होतो. आपण केलेला नवस पूर्ण झाल्यास हा नवस देणगी स्वरुपात, सोन्याच्या स्वरुपात देण्याची प्रथा अलिकडे सुरू झाली आहे. खरेतर गोरगरीबांसाठी अन्नछत्रालय, शैक्षणिक संस्था, रस्ते, सोई सुविधा, हॉस्पिटल, पाणीप्रश्न या सारख्या प्रश्नांकरिता हे दिलेले गुप्त दान वापरण्याची खरी गरज आहे. काही देवस्थान संस्था हे उपक्रम राबवित असतील ही तरीही मोठ्या प्रमाणावर हे दान वापरले गेले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदींजींनी काही महिन्यांपूर्वी या मंदिराकडील सोने बाजारात आणण्याची कल्पना मांडली. त्यावरून वाद घालण्या पलिकडे आपण काहीही करत नाही. पंतप्रधानांची ही योजना खरच स्वागतार्ह्य म्हणावी लागेल.
सुरक्षा व्यवस्था
लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या या देवस्थानची सुरक्षाही तितकीच कडक आहे. डोंगर चढण्यापूर्वी वाहनातून तसेच पायी चालत जाणाºया भाविकांची तपासणी केली जाते. यासाठी बॅग स्कॅन करण्याची यंत्रणा उपलब्ध आहे. जवळपास अमली पदार्थ बाळगणे हा गुन्हा आहे. सिगरेट, तंबाखू, गुटका, दारू यासारखे व्यसने तिरुपती देवस्थानावर करणे गुन्हा आहे व अर्थात हे पदार्थ वरती मिळत ही नाहीत. मुख्य मंदिर प्रवेशद्वारावरही सर्वत्र कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. मंदिरात प्रवेश करतानाच पुन्हा स्कॅनर मशीन लावण्यात आलेले आहे. जागो जागी कॅमेरा लावण्यात आले आहेत. एकूणच येथील सुरक्षा व्यवस्था कडक आहे. मात्र, भाविकांना याचा त्रास होताना दिसत नाही.
बाजारपेठ
मंदिर परिसरात मोठी बाजारपेठ आहे. यासाठी संपूर्ण इमारत तसेच रस्त्याच्या कडेला ही बाजारपेठ आहे. तिरुपती बालाजीचे, लक्ष्मीचे विविध रुपातील फोटो, किचेन, लायटिंगचे फोटो, फुलमाळा येथे उपलब्ध होतात. 10 रुपयांपासून ते 3500 रुपयांपेक्षा जास्त हे बालाजीचे फोटो उपलब्ध आहेत. याचबरोबर महिलांचे आकर्षण म्हणजे दागिने, बांगड्या, गळ्यातील, कानातील, श्रृंगाराचे साहित्यही येथे विक्रीस आहेत. लहान मुलांची खेळणी, गृहपयोगी वस्तू, विविध प्रकारच्या पर्स, बॅगा, कपडे, चादरी, साड्या, धार्मिक साहित्य, कॅसेटी, विविध प्रकारच्या टोप्या अशा विविध वस्तू पाहताना वेळ सहजच निघून जातो. विशेष म्हणजे येथील दुकानदार आपल्याशी हिंदीतून बोलताना दिसतात. दुकानदारांशिवाय अन्य व्यक्तीशी आपण हिंदीतून अथवा इंग्रजीतून संभाषण केल्यास आपल्याला प्रतिसाद दिला जात नाही. संपूर्ण बाजारपेठेत विविध ठिकाणी एटीएमची सुविधा असल्या कारणाने जवळ पैसे बाळगायची गरज नाही. जवळच तिरुमला तिरुपती देवस्थानचे ग्रंथालय असून, तमिळ, हिंदी, इंग्रजी भाषेतील साहित्य उपलब्ध आहे.
आदर्श घ्यावा
तिरुपतीप्रमाणे आपल्याकडे ही अशा देवस्थानचा विकास होण्याची गरज आहे. तिरु पती मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान हे केंद्रस्थानी मानून सभोवतालचा परिसर सुशोभीत केलेला आहे. देशभरातून येणारा पर्यटक निदान चार दिवस तरी येथे मुक्कामी राहिला पाहिजे. अशी यंत्रणा केलेली आहे. परिसरातील अनेक ठिकाणे पर्यटन स्थळे म्हणून घोषित केलेली आहेत. यासाठी अशी प्रेक्षणीय स्थळे विकिसत केली. तिरु पतीचे महत्व, माहात्म्य सांगणारी माहिती केंद्रे देशभरात उभी केली. येणाºया लाखो पर्यटकांसाठी निवास व्यवस्था, भक्तांसाठी सोयी-सुविधा, पाणीपुरवठा, वाहतूक व्यवस्था, शिक्षण, संशोधन केंद्र, धर्मादाय संस्था, हॉस्पिटल्स हे सर्व आपल्याकडेही होणे सहज शक्य आहे. संपूर्ण डोंगरावर जाताना व येताना एकेरी मार्ग, संपूर्ण रस्ता डांबरी (खड्डे नाहीत), संपूर्ण डोंगरावर हिरवळ, स्वच्छता हे पाहून नक्कीच आपल्याकडेही असे देवस्थान होण्याची गरज आहे.
स्वच्छतेबाबत
एकूणच धार्मिक पर्यटन म्हटले की, घाण, सडलेली फुले, नारळ, करवंट्या, लोकांनी खाऊन टाकलेले उष्टान्न, टाकाऊ पदार्थ, राडा असे चित्र आपल्याकडे काही ठिकाणी सर्रास पाहायला मिळते. मात्र, तिरुपती स्टेशन असो वा तिरुमला डोंगरावरील मंदिरे असो, तेथील हॉटेल परिसरा भोवती सुद्धा कमालीची स्वच्छता पाळण्यात येते. जागोजागी प्लॅस्टिकच्या कचराकुंड्या ठेवल्यामुळे पर्यटक कचरा कचराकुंडीतच टाकतात. जागोजागी झाडू घेऊन स्वच्छता करणारे कर्मचारी दिसून येतात. यामुळे एवढी गर्दी होऊन सुद्धा स्वच्छता असल्याचे पाहून आश्चर्य वाटते. पुणे स्टेशनावर गाडीची वाट पाहत असताना नाकाला रुमाल बांधल्याखेरीज बसणे मुश्किल जाते. मात्र, तिरुपती स्टेशनवर गाडी गेल्यावर रेल्वे ट्रॅक पाण्याने स्वच्छ धुतला जातो. हे पाणी तेथील गटारातून वाहून जाण्याची सुविधाही उत्तम केलेली दिसून येते. तिरुमला डोंगरावर अनेक ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहे बांधण्यात आलेली आहे.
आमचा प्रवास :
तिरुपतीला जाण्याची सर्व तयारी जय्यत झाली होती. ट्रेनमध्ये खाण्यासाठी बिस्कीटे, चिवडा, लाडू, फुटाणे, वेफर्स, एकवेळचे जेवण, घेऊन सॅक चांगली जड झाली होती. पुणे स्टेशनात 6 ला पोहचलो. गाडी संध्याकाळी 7.15 ला होती. गाडी नक्की कुठल्या प्लॅटफॉर्मवर येणार याची चिंता लागून राहिली होती. अखेर प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर कन्याकुमारी जयंती एक्सप्रेस येणार असल्याची घोषणता होताच प्लॅटफॉर्मवर येऊन बसलो. तेथील अस्वच्छता पाहून नकळत हात नाकाला गेला. असो. त्यात आमचे तिकीट कन्फर्म झालेले नव्हते. जागा मिळेल का नाही? याची चिंता लागून राहिली होती. अखेर गाडी आली. डब्यात चढून प्रथम टिसीला शोधण्याची मोहीम सुरू झाली. अखेर पाच सहा डबे शोधल्यावर एकदाचा टिसी सापडला. पण आत्ताच काही सांगता येणार नाही. आहे तेथे जाऊन बसा असे सांगताच आम्ही परत डब्यात येऊन बसलो. दौंडला अखेर 3 बर्थ प्लेस देतो असे सांगताच आनंद झाला. तब्बल 18 तासांनंतर दुपारी 3 वाजता एकदाचे तिरुपती स्टेशनात पोहोचलो. स्टेशनाबाहेर येताच तिरुमलावर जाण्यासाठी प्रायव्हेट टुरिस्टवाले जमा झाले. शासकीय दरात घेऊन जातो. थेट हॉटेलवर सोडतो असे सांगून झाल्यावर आम्ही सर्व सुमोत बसलो. काही वेळातच तिरुमला डोंगरावर जाण्याच्या वाटेवर लागलो. घाटाखाली प्रथमत: सर्व बॅगांची तपासणी झाल्यावर पाऊणतासातच तिरुमलावरील कौस्तुभ हॉटेलमध्ये पोहचलो. मात्र, तेथे रुम शिल्लक नसल्याने रुम खाली होण्याची वाट पाहत बसावे लागले. अखेर संध्याकाळी 8 ला सप्तगिरी रेस्ट हाऊसमध्ये रुम मिळाली. फ्रेश होऊन कल्याण कट्ट्यावर जाऊन केसदान करून आलो. डोके हलके झाल्याने कसे तरी वाटत होते. रात्री 11 वाजता मुख्य मंदिरातील मोफत दर्शन रांगेत जायला निघालो. वाटेत एका ठिकाणी मोबाईल व चपला जमा करून पावती घेऊन दर्शन रांगेला लागलो. लांबच लांब चालायच्या प्रतीक्षा रांगा होत्या. अर्ध्या तासातच एका मोठ्या हुंडीत येऊन बसलो. तेथे गरमागरम भाताची खिचडी तयार होती. तेथील पायºयांवर मस्तपैकी पसरलो. पहाटे 3 वाजता एकदम गडबड झाली, सर्वच भाविक सावरून दर्शनासाठी तयार झाले होते. बालाजीच्या या हुंडीमध्ये एकवेळी किमान 500 भाविक सहज बसतात. अशा 50 हुंड्या आहेत. आम्ही गेलो तेव्हा नशिबाने गर्दी कमी होती. मुख्य मंदिरात पोहचण्यास पहाटेचे साडेचार वाजले. मात्र, दर्शनाची आस लागल्याने वेळ कसा गेला ते कळलेच नाही. वाटेत वीस रुपयांना दोन लाडूची कुपने घेतली. अखेर ज्यासाठी येथे पर्यंत आलो ती वेळ आली. बालाजीचे मंदिर जुने असल्याने आतील सजावट, दगडी बांधकाम पाहत चांगला वेळ गेला. पहाटे 5 वाजता बालाजीचे दर्शन घेऊन मन एकदम प्रसन्न झाले. गाभाºयात तुपाचे दिवे जळत होते. कुठलाही कृत्रिम प्रकाश त्या ठिकाणी नव्हता. दर्शन घेऊन मंदिराबाहेर आलो. एकदाचे दर्शन घडले. एवढ्या सकाळी दर्शन घेण्याची वेळ पाहिल्यांदाच. आता झोप डोळ्यावर चांगलीच येऊ लागली होती. मंदिराबाहेरील लाडू वाटप केंद्रात लाडू घेऊन पुन्हा सप्तगिरी हॉटेल आलो. मस्तपैकी 11 पर्यंत ताणून दिली. पुन्हा फ्रेश होऊन तिरुमलावरील पाच ठिकाणे पाहिली. संध्याकाळी बाजारपेठ हिंडून बाजारातील वस्तूंचे दर्शन घेतले. दुसºया दिवशी तिरुपतीला गाडी ठरवून तिरुपतीतील ठिकाणे पाहून रात्री 9 च्या हरिप्रिया एक्सप्रेस गाडीत बसलो. जातानाचे तिकीट कन्फर्म असल्याने चिंता नव्हती. तिरुपतीतील प्रचंड गरमीमुळे हैराण झालो होतो. गाडी सुरू झाल्यावर पहाटे गारवा आल्यावर बाकीच्यांना झोप लागली. प्रवास म्हटला की मला झोप अशी कमीच लागते. वाटेतील ठिकाणे पाहत पहाटे 5 ला थोडी झोप घेऊन सकाळी 8 ला उठलो. अजून मिरज बरेच अंतरावर होते. तेव्हा रेल्वेत फेरफटका मारायला सुरूवात केली. रेल्वेत टाईमपास करायचा असेल तर सर्व रेल्वे डब्यात हिंडून यायला पाहिजे. नानाविध लोक त्यांचे पेहराव, वागण्याच्या तºहा समजतात व आपला वेळही चांगला जातो. रेल्वेत विक्रेतेही किती प्रकारचे येतात. भेळ, चणे फुटाणे, कैरी, थंड पाण्याची बाटली, कटलेटवाले, कलाकंद विकणारे, वेगवेगळ्या माळा, चहा, कॉफीवाले असे एक ना अनेक विक्रेतेही टाईमपास करतात. दुपारी 3 वाजता मिरजेला उतरलो. तेथून 4.45 ची महाराष्ट्र एक्सप्रेसने पुण्याचा प्रवास सुरू झाला. रात्री 10.45 ला पुण्यात दाखल झाला.
काही टिप्स :
- तिरुपतीला दर्शनासाठी तसेच राहण्यासाठी आॅनलाईन बुकिंग करता येते.
- विमान प्रवास केलास 2 दिवसांची ही ट्रिप होते.
- शक्यतो रात्री दर्शन घेण्यास गेल्यास लवकर दर्शन होते.
- कुठल्याही मंदिर परिसरात मोबाईल, कॅमेरा न्याण्याची परवानगी नाही त्यामुळे शक्यतो या गोष्टी टाळा. आणल्यास त्या मंदिराबाहेरील काउंटरजवळ जमा करण्यासाठी परत रांग लावावी लागते.
- तिरुमला व तिरुपतीवरील प्रेक्षणीय स्थळे पाहायची असल्यास प्रायव्हेट गाडी ठरवा. स्वत:ची ठिकाणे पाहण्याचा आग्रह धरा. त्यासाठी आधी प्लॅनिंग करा.
जायचे कसे :
तिरुपती हे ठिकाण लोह
- मार्ग (रेल्वे) व द्रुतगती (रस्ता) मार्गाने पुणे, चेन्नई व बंगळूर या शहरांशी जोडलेले आहे.
- जवळचे रेल्वेस्टेशन: तिरुपती, रेणीगुंठा. येथे उतरून मोटारीने डोंगरावर जाता येते.
- पुण्याहून संध्याकाळी 7.15ला सुटणाºया छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कन्याकुमारी जयंती एक्सप्रेस गाडीने सुमारे 18 तासांचा प्रवास करावा लागतो. या शिवाय दादर ते चेन्नई एक्सप्रेस, मुंबई सीएसटी ते चेन्नई मेल आहेत.
अधिक माहिती व फोटोसाठी......
मी दरवर्षी किमान ८ दिवस
मी दरवर्षी
किमान ८ दिवस रहायला जातो…. माझे सर्वांत आवडीचे ठिकाण
Mast.
Mast.
ferfatka, माझ्या आवडत्या
ferfatka, माझ्या आवडत्या ठीकाणाबद्दल खूप छान माहिती लिहिली आहे पण अन्न प्रसादम शिवाय हा लेख अपूर्ण आहे. प्रसादालयात तुम्ही जेवला नाही का?
मोफत दर्शनमध्ये चहा, कॉफी, दूध, सुन्दल, बिसीबेली भात. कर्ड राईस हे सर्व दिवसभर मोफत दर्शनच्या लाईनमध्ये बसलेल्या भक्तांसाठी ठराविक वेळेनुसार चालू असत.
वैकुंठ एकादशीला येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात. <<<< वैकुंठ दरवाजा हा फक्त वैकुंठ एकादशीलाच उघडला जातो आणि भाविकांना त्या दरवाजातून आत सोडतात. खूप सुंदर सजावट असते. आम्ही ह्या दिवशी अलीपिरीवरून तिरूमाला चालत गेलो होतो.
अंगठ्या, सोन्याची चैन, सोने असे दान करण्याची येथे प्रथा आहे. <<<<< येथील हुंडीची एक कथा आहे. बालाजीच्या मुर्तीकडे लक्षपूर्वक पाहिल्यास एक हात स्वतःकडे वळलेला असतो आणि एक हात आपल्याकडे असतो. एका हाताने बालाजी आपल्याकडे मागतो आणि दुसर्या हाताने आपल्याला देतो.
आदर्श घ्यावा <<<<< खरच मनापासून वाटत शिर्डीने टीटीडीकडून शिकण्यासारख खूप आहे.
छान माहिती.
छान माहिती.
सुंदर लेख आणि माहिती. प्रवास
सुंदर लेख आणि माहिती. प्रवास आणि टीप्स लिहिल्याने इच्छुकांसाठी अजून माहितीपूर्ण झाला आहे लेख.
३ वर्षांपूर्वी भारतवारीत तिरुपतीला गेलो होतो...ते ही पहिल्यांदाच. लेखात उल्लेख केल्याप्रमाणे विमान प्रवासात २ दिवसांत ट्रीप होते.
छान माहिती.... जाण्याचा योग
छान माहिती.... जाण्याचा योग कधी येईल तेव्हा येइल.
मी एकदाच गेलो आहे तिरूपतीला
मी एकदाच गेलो आहे तिरूपतीला स्वच्छता आणि इतर सुविधा खरंच उत्तम आहेत. पण दर्शनासाठी इथेही पैशाचा बाजार चालतो जो मला कधीच रुचत नाही त्यामुळे पुन्हा गेलो नाही.
कल्याण कट्टा : आपले डोके
कल्याण कट्टा : आपले डोके भादरणार्याला सुरू करण्याअगोदर हळूच १० - २० रू. द्या . ते घेतात . मग ते प्रेमाने तुमचे केस भादरतात नाहीतर तुमच्या डोक्याचा बाजी प्रभू होतो.
आणि त्या जखमा नंतर फार त्रास देतात.
आपले डोके भादरणार्याला सुरू
आपले डोके भादरणार्याला सुरू करण्याअगोदर हळूच १० - २० रू. द्या .<<<< शाहिर तसेही ते लोक पैसे मागतात केस भादरून झाल्यावर. मीसुद्धा १० रु. दिले होते. तिथे बोर्ड लावला आहे कि त्यांना पैसे देऊ नका म्हणून.
छान माहिती दिलीय. तिरुपती
छान माहिती दिलीय.
तिरुपती बालाजी म्हटले की "गोविंदा गोविंदा" जयघोष आठवतो.
एका शेतकºयास आकाशवाणीद्वारे वारु ळातील मुंग्यांना खायला घालण्याची आज्ञा झाली. तेथील राजाला ही आकाशवाणी समजल्यावर त्याने त्या वारु ळास दूध पुरवू लागला. त्याच्या भक्तीमुळे बालाजी अवतीर्ण झाले.
>>
त्या वारुळात श्रीविष्णू वास्तव्यास होते.
भृगु ऋषींनी विष्णूंच्या छातीवर लाथ मारली आणि तरीही विष्णूंनी त्यांचे पाय चेपुन क्षमा मागितली, या रागाने लक्ष्मी वैकुंठ सोडुन निघुन गेली. लक्ष्मी सोडुन गेल्याने वैकुंठाची शोभा निघुन गेली आणि विष्णूही निर्धन झाले. तेव्हा लक्ष्मीस शोधण्यासाठी विष्णू भुलोकी मनुष्यरुपात वास्तव्यास आले. त्यांनी शेषाद्री पर्वतावर वारुळात मुक्काम केला होता आणि तिथल्या राजाची एक गाय त्या वारुळावर जाऊन दुध सोडायची. अशी कथा आहे.
तिरूपतीला रोख स्वरूपातील रकमेबरोबरच सोने, चांदी, हिरे यांचे दागिने अर्पण केले जातात
>>
लग्नासाठी बालाजीने कुबेराकडुन कर्ज घेतले होते, तेव्हा त्याने कुबेराला सांगितले की कलियुगात माझे भक्त मला सोने चांदी वाहतील, त्यातुन मी तुझे कर्ज फेडीन.
विष्णूंच्या अनेक अवतार, रुपातली फक्त बालाजीची मुर्ती अशी आहे, जिचा वरदहस्त खाली झुकलेला आहे, जणू तो भक्तांना लक्ष्मीप्रमाणे धन देत आहे.
तिरुपती स्टेशनवरच बालाजीच्या
तिरुपती स्टेशनवरच बालाजीच्या दर्शनाचे बुकिंग करता येते ना?
बाकी आपल्या खंडोबासारख्या बालाजीच्या दोन बायका आहेत, एक लक्ष्मी आणि दुसरी पद्मावती. यातली पद्मावती बानाई सारखी खाली तिरुपती शहरात राहते.तिच्या दर्शनाशिवाय यात्रा पुर्ण होत नाही असे म्हणतात.
तुम्ही लिहिता मस्त.तिथे कधी
तुम्ही लिहिता मस्त.तिथे कधी जाणार नाहियै परंतू एक पर्वासवर्णन म्हणून आवर्जून वाचले.तिथली सर्व माहितीपत्रकेही आहेत त्यात आणखी बरीच ठिकाणे दिली आहेत. श्रद्धेचा भाग आहे त्यामुळे इतरांची मतेही वाचली. हे देऊळ ( आणि इतर तामिळनाडुतली ) सहज बघता येण्यासारखे असते तर नक्की गेलो असतो.
अतिशय सुरेख, मुद्देसुद
अतिशय सुरेख, मुद्देसुद लेख.
या वर्षी इथे जायचे हे मनात होतेच. तुमच्या टिप्स फार उपयोगी पडणार आहेत. धन्यवाद.
कल्याण कट्टा : आपले डोके
कल्याण कट्टा : आपले डोके भादरणार्याला सुरू करण्याअगोदर हळूच १० - २० रू. द्या . ते घेतात . मग ते प्रेमाने तुमचे केस भादरतात नाहीतर तुमच्या डोक्याचा बाजी प्रभू होतो.
आणि त्या जखमा नंतर फार त्रास देतात.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------०
ह ल्ली ५० घेतात
तिरुपती स्टेशनवरच बालाजीच्या
तिरुपती स्टेशनवरच बालाजीच्या दर्शनाचे बुकिंग करता येते ना?
-----------------------------------------------------------------------------------------------
पुण्या & मुंब ई त होते
हे देऊळ ( आणि इतर
हे देऊळ ( आणि इतर तामिळनाडुतली ) सहज बघता येण्यासारखे असते तर नक्की गेलो असतो. <<<<< Srd, नक्की जाण्याचा प्लान करा. सहज बघ्ता येतील. काही मदत लागली तर आम्ही आहोत. तिरूपतीला आता पावसाळ्यात गर्दी कमी असते. तामिळनाडूत मराठी मंडळ आहे तिथेही मदत मिळते. तिरुपतीवरून चेन्नई शताब्दीने तीन / साडे तीन तासात चेन्नईला पोहचता येते. बेंगलोर, हैद्राबादवरुन एक रात्रीचा प्रवास आहे.
सिनिअर सिटीझन / अपंग / हार्ट पेशंट / कॅन्सर पेशंट साठी सकाळी ९, दुपारी ३ आणि रात्री १० अशा तीन वेळा आहेते. . एका सि.सि. / अपंग / हार्ट पेशंट / कॅन्सर पेशंट बरोबर एका व्य्क्तीला जाता येते. अजिबात धक्काबुक्की न होता छान दर्शन होत. ईतर रांगा तेव्हा दर्शनासाठी बंद करतात.
तिरुपती स्टेशनवरच बालाजीच्या दर्शनाचे बुकिंग करता येते ना? <<<< हो. सुदर्शन तिकीट काउंटर स्टेशनच्या दोन्ही बाजूला आहेत. सकाळी ५ ते ८ वेळ आहे. अलीपरीला एक आहे तिथे गर्दी कमी असते. अजून एक काऊंटर श्रीनिवास कॉम्लेक्समध्ये आहे. येथे सर्व ठीकाणी आदल्या रात्रीपासून रांगा लागलेल्या असतात. तिथेच फुटपाथवर लाईनमध्ये लोक झोपतात. तो अनुभवही खूप छान असतो. मजा येते.
धन्यवाद आरती.कला बघण्यासाठी
धन्यवाद आरती.कला बघण्यासाठी जायचे आहे तर दर्शनाच्या वेळा वगैरे नको वाटते.हंपि ,बदामिसारखे मुक्त फिरता आले पाहिजे.
Srd, जुलै महिन्यात शक्य असेल
Srd, जुलै महिन्यात शक्य असेल तर जा. अजिबात गर्दी नसते. शक्य असेल तर विक डे च प्लान करा. खूप व्यवस्थित सर्व बघता येईल. १ दिवस तिरुमाला येथे राहण्यासाठी अगोदर बुकिंग करा आणि २ दिवस तिरूपती येथे राहा. व्यवस्थित फिरता येईल. तिरुपती येथून गोविंदराज टेंम्पल, पद्मावती मंदिर आणि कालहस्तीला जायला सोपे होईल.