पावसाचे रंग

Submitted by vt220 on 7 June, 2015 - 10:31

पावसाचे रंग तरी किती वेगळे! बर्यापैकी प्रकाश होता. अचानक खिडकीबाहेर लक्ष गेलं तर बाहेर मुळूमुळू पाउस पडत होता. शांत, बिलकुल चाहूल न देता बरसत होता. झाडावरची पानं गलितगात्र भिजत होती. कावळे भिजून जड झालेल्या पंखांनी कसेबसे झाडाच्या शेंड्यावर बसून होते. कबुतरं बिल्डींगच्या वळचणीला शक्य तितके भिंतीला चिकटून पावसात न भिजण्याचा प्रयत्न करत होते. बाकीचे पक्षी गायबच होते. सगळं शांत शांत होतं आणि पाउस झिरझिरत होता.

मग आठवला मृगाचा पाउस! अक्खा मे, जूनचे दोन तीन आठवडे उन्ह मी म्हणत असते. वैशाख वणवा हि अगदी समर्पक शब्दयोजना आहे. सगळीकडे नुसता रखरखाट! सूर्य निसर्गातल्या प्रत्येक घटकातली आर्द्रता शोषून घेत असतो. शुष्क माती हवेच्या छोट्याशा झुळुकेने सुद्धा दाहीदिशा उधळते. वसंतातली लुसलुशीत कोवळी हिरवाई धुळीने फिकट पडून जाते. पाणी न मिळाल्याने झाडांमधला जीवच गेल्यासारखा वाटत असतो. पांगारा किवा गुलमोहर आपल्या जर्द लाल फुलोर्याने निसर्गाला आग लावत असतो. सुंदर निरभ्र निळे आकाश! पण तेही बघवत नाही. पांढरे ढगांचे पुंजके उन्हाची तीव्रता अजून वाढवत राहतात. मुंबई, कोकणात घामाने जीव कासावीस, तर देशावर शुष्क, तप्त उन्हाने अंगाची लाहीलाही होते. वारा जणू थांबल्यासारखा झालेला असतो. एक विचित्र कोंडवाडा होतो. एखादे दिवशी बे-मोसम वारे वाहतात आणि एकदोन सरी कोसळतात पण त्याने आर्द्रता आणि गदगद आणखीनच वाढते.

मग एखाद्या रात्री बेडकांचे डराव डरावणे ऐकू येते. रात्रीमागून रात्री त्यांचा आवाज वाढत जातो. पांढरे पुंजके हळूहळू करडे, अजून दाट करडे व्हायला लागतात. पावसाची आस लागते पण प्यास अजून बुझतच नसते. आणि मग अचानक एक थंडशी झुळूक येते. त्या झुळुकेने सुखावून जायला होतं. कधीतरी झुळूक एक मंद सुवास घेऊन येते. कुठेतरी पाउस पडतोय ह्या विचाराने मन आनंदित होतं. एका झुळूकेचा मग सोसाट्याचा वारा होतो. आभाळ गच्च भरून येतं. वार्याच्या दिशेने पाहिले तर सरसर पाउस येताना दिसतो आणि ऐकूही येतो. ते सरसर येणे, जसा काही सृष्टीचा जीवच परत येत असतो. झाडे शहारून जातात. नदी, तलावांच्या पाण्यात पावसाचे थेंब नाचून सुंदर रांगोळी तयार होते. लहान मुले गलका करत पावसात भिजत राहतात. संपूर्ण वातावरण सुखद, जिवंत होऊन जाते.

पाउस येत राहतो, येत राहतो, येतच राहतो. संततधार. एक दिवस, दोन दिवस, आठवडा, दोन आठवडे. सतत बरसत राहतो. पाणीपुरवठा तलावांच्या क्षेत्रात पाउस पडल्याने ते आता बर्यापैकी भरलेले असतात. उन्हाची, घामाची गदगद आता पावसाची चिरचिर होते. सगळीकडे ओलसरपणा, दमटपणा राहतो. अंधार दाटून येतो. भर दिवसा कधी दिवे लावावे लागतात. कपडे पूर्ण सुकत नाहीत. जमीन थंड, ओली वाटते. रस्त्यावर चिखल वाढत जातो आणि चपलांमध्ये पाय ठेववत नाही. ऑफिसमध्ये ओल्या कपड्यांनी बसवत नाही. ओली छत्री ओझं बनून राहते. लोकलचा गोंधळ, बसमधली ओली गर्दी आणि घाण, रिक्षावाल्यांची मुजोरी! कधी लोकल बंद म्हणून ऑफिसला खाडा! कामावर जाणे म्हणजे नुसता कंटाळा! नाही म्हणायला घरात बसून वाफाळता चहा आणि गरमागरम भज्या खात बाहेरचा पाउस बघण्यात अजूनही आनंद असतो पण आता त्याची तीव्रता कमी झालेली असते. आग ओकणाऱ्या सूर्याला नामोहरम करत आलेल्या पावसावर खुश झालेली तमाम जनता आता "उघड पावसा उन पडू दे" आळवायला लागते. काही माणसे जन्मजात रडवी असतात. पावसाचा "त्रास" सहन होत नाही तसे थोड्याफार शिव्याही द्यायला लागतात.

आता पावसाला पण थोडा कंटाळा आलेला असतो. उन्हाळाभर महासागरात जमा केलेलं बाष्प धरतीवर ओतून थोडा रिता झालेला असतो. मग सुरु होतो उनपावसाचा खेळ! सकाळी सकाळी पावसाच्या सरी पाहून छत्री न्यावी तर पुरा दिवस उगीचच वागवावी लागते. आणि दोन दिवस छत्रीचे ओझे सहन केले म्हणून एखादे दिवशी न घ्यावी तर संध्याकाळी हजर. कधी कोवळ्या उन्हात पक्षांची किलबिल ऐकत चालताना अचानक सर सर सर धाऊन येते. जणू काही मागून अचानक येऊन आपल्याला भ्भो करून घाबरवायचं असतं त्याला! पण घाई करत येताना त्याचा पायरव आपल्याला ऐकू येतोच! क्वचित एखाद्या दुपारी थकून भागून सुरवातीला सांगितला तसा उगीचच गळत राहतो.

सृष्टीची हिरवाई अनुभवावी तर ह्याच काळात. उन्हाळ्यात धुरळा उडून निस्तेज झालेली झाडं ७-८ महिन्यांचा मळ धुऊन मस्त हिरवीगार होऊन जातात. कोकणातल्या उघड्या बोडक्या कातळावर हिरवी मखमल पसरते. देशावर शेते बहरून येतात. हिरव्या रंगाच्या तरी किती छटा! लुसलुशीत पोपटी हिरवा ते गर्द हिरवा ह्याच्यामध्ये जितक्या छटा शक्य तितक्या सगळ्या पाहायला मिळतील. आणि हि सृष्टीची अंघोळ फक्त गावाकडेच दिसेल असे नाही! अहो शहरात सुद्धा इमारतींचा रंग ह्या दिवसात जास्तच खुलून येतो. आणि मग शिशुवर्गात मुलांनी सुंदर चित्र काढल्यावर बाई जसे "स्टार" देऊन मुलांना खुश करतात तसा पाउस आपल्याला इंद्रधनुष्याची भेट देतो. अगदीच खुश झाला तर दुहेरी इंद्रधनुष्यसुद्धा पाहायला मिळते. कोवळ्या उन्हाची तिरीप आणि हिरवागार मखमली गालीचा आणि पल्याड इंद्रधनुष्य! अहाहा काय बहारदार दृश्य! विलियम वर्डस्वर्थला जसे त्याच्या अंतर्मनात डॅफोडील्सचा ताटवा दिसतो तसे मला इगतपुरीच्या कसारा घाटाच्या सुरुवातीला चहावाल्याच्या टपरीवर बसून पाहिलेले हे दृश्य दिसते. आताही मन कसे शहारून तरारून गेले! ह्या अश्याच वेळी विलियम वर्डस्वर्थची डॅफोडील्स किवा बालकवींची "श्रावणमासी हर्षमानसी" बरोबर कळते आणि मनाला भिडते.

उनपावसाच्या पाठशिवणीत जेव्हा उन्हाची पाळी जास्त आणि पावसाची कमी असे सुरु होते मग आणखी एक खेळ माळावर सुरु होतो. तेरडा, कारवी, नभाळी, आभाळी, नीलिमा, चिरायत, कवळा, सोनकी, सोनसळी अश्या असंख्य रंगबिरंगी फुलांचा गालिचा पसरला जातो. आणि त्यांना भेटायला अनेक कीटक आणि पक्षी येतात. गेल्या काही वर्षात सातार्याला कास पठाराला जाणार्या लोकांची संख्या वाढलीय. पण दसर्याला कोकणात आमच्या गावाच्या कातळावर पण मी त्यातली बरीच फुले बघितली आहेत. निसर्ग हजार करांनी असे सुख आपल्यावर उधळत असतो. देवांना पण अश्या स्वर्गसुंदर पृथ्वीला मग भेट द्यावीशी वाटत असावी. श्रावणात श्रीकृष्ण, भाद्रपदात गणपती आणि दसर्याला महालक्ष्मी येतात. आपण भले त्यांना दही, मोदक, पक्वानांचा नैवेद्य देत असू, पण मला वाटते ते मात्र ह्या फुलांच्या उधळणीनेच जास्त खुश होत असावेत.

हळूहळू पृथ्वीचा निरोप घ्यायची पावसाची वेळ जवळ येते. आता तो जवळपास पुरता रिता झालेला असतो. पण आपल्या भगिनीला सोडून जायला बहुतेक त्याला आवडत नसावे. आपले रितेपण त्याला बोचत असावे. तो आदळआपट करायला लागतो. दिवसभर कुठेतरी तोंड लपवून बसतो आणि तरी आपल्याला त्याची आठवण नाही झाली तर मग संध्याकाळी त्याला राग येतो. वार्याच्या साथीने ढगांना बडवत सुटतो. ढग बिचारे सैरावैरा धावताना एकमेकावर आपटतात, गडगडतात. त्यांच्यावर सपासप चाबूक ओढतो, विजेचे लोळ सोडतो. थोडीफार बरसात करत राहतो. हळू हळू त्याची ताकद अगदी क्षीण होत जाते आणि त्याची जागा शुष्क वैराण ऑक्टोबर हीट घेते. जेव्हा ऑक्टोबरच्या शुष्क गरम झळा आपल्याला चटके द्यायला लागतात तेव्हा आपल्याला त्याची आठवण होते पण तोवर तो निघून गेलेला असतो... पुढल्या वर्षी नवा खजिना घेऊन परतण्यासाठी...

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद मानसी, शशांक!
काल मुंबईत छान दाटून आलेलं आणि आज कडक उन!
आशोबा (अरबी समुद्रात आलेले चक्रीवादळ) रागावलेत. बहुतेक पाउस आणखी १-२ दिवस लांबणार. Sad

सुंदर लेख. शेवटचा पॅरा विशेष आवडला.

टीना, सुंदर , अप्रतिम !!! पावसाळ्याची आठवण यायला लागली.

छान लेख.. आवडला Happy

आणि काय हो, मुंबई कुठे सुकी आहे.. रविवारी कोसळला की.. माझी संध्याकाळ मस्त न्हाऊन निघाली त्यात..

आणि आता ही पोस्ट लिहितानाही पडत आहे.. मुसळधार.. मध्यरात्रीचा पाऊस.. स्थळ दक्षिण-मध्य मुंबई..
पण येस्स नवी मुंबईत नाहीये असे आताच व्हॉटसपवरील चर्चेत समजले, इतर भागांचे माहीत नाही, तेथील पोरे झोपलीत.

टीना सुरेख फोटो! मस्त वाटतंय!
मनीमोहोर, ऋन्मेष, दाद धन्यवाद.

ऋन्मेष मी दहिसरला राहते. रविवारी मस्त वातावरण झालेले, पाउस पडला पण अगदीच नुसता रस्ते ओले करून आणि झाडांची पाने धुवून गेला. मुलं धावत भिजायला पण गेली नाहीत खाली!!
तेव्हापासून दिवसा जाम उकाडा असतो, टकटकीत उन असते. काल रात्री पडला तो सुद्धा फक्त रस्ता ओला करण्याइतपत ५-१० मिनिटेच! Sad नाही म्हणायला थोडासा गारवा होता पण आज दिवसभर परत उन आणि गर्मी!