भाग २ - http://www.maayboli.com/node/54109
एखादी भारदस्त मध्यमवयीन स्त्री जर तोकडे कपडे घालून आपल्या समोर उभी राहिली तर आपल्याला जसे विचित्र वाटेल तसे प्राग ला आल्यावर माझे झाले.
पूर्वी झेकोस्लोव्हाकियाचा भाग असणार्या प्राग ( मूळ उच्चार ‘प्राहा’) मध्ये आम्ही आलो तेंव्हा भूर भूर पाउस पडत होता. वातावरण सगळे झाकोळून गेले होते. थंडी पण होती. आता प्राग झेक मध्ये आहे. ह्याला गरीबांचे Paris म्हणतात. कारण Paris पेक्षा इकडे भयानक स्वस्ताई आहे. इमारती तशाच आहेत. आर्थात हे म्हणजे उगाचच लावलेली उपाधी वाटली.
एकेकाळी प्राग ही बोहेमियन साम्राज्याची राजधानी होती. खूप पूर्वी पासून झेक आणि स्लोव्हाकिया हे प्रांत एकमेकांशी पटवून घ्यायच्या मनस्थितीत नव्हते. झेक नेहेमी स्लोवाकीयांना कमी समाजात, आळशी समजत. त्याचं मुळे रशियन जोखडातून बाहेर आल्यावर पहिले ते वेगळे झाले. परत तोच प्रकार, अनेक मिश्र विवाहांची पंचाईत झाली. आमची गाईड जी एक शिक्षिका होती, तिची आई झेक व वडील स्लोवाकीयन. जेंव्हा वाटण्या झाल्या त्या बरोबर ह्यांच कुटुंब पण तुटल. वडील स्लोव्हाकीयात गेले. रशियन राजावातीबद्दल ती खूपच पोट तिडकीने बोलत होती. त्यावेळेस त्यांची लोकल भाषा बदलायचा राशीयंस नी खूप प्रयत्न केला. पूर्ण शिक्षण रशियन मध्ये घ्यायला लावले. सरकारी भाषा बदलण्याचे अनेक पातळीवर प्रयत्न झाले. लोक चोरून आपली भाषा शिकायचे. ती म्हणाली तिची आई तर नोकरी सोडून घरी बसली कारण तिला ह्या प्रकाराशी मानसिकरीत्या जुळवून घेणे कठीण पडले. झेक आणि पोलिश माणूस सगळ्यात कुठे वैतागत असेल तर ते लाईन लावायला. क्रिसमस च्या दिवशी एक तुकडा केक साठी त्यांना ४-५ तास लाईनीत उभे रहायला लागे. असे दिवस त्या लोकांनी काढले आहेत. प्रत्येक गोष्टीचे रेशनिंग होत असे. आपल्या गरीबीत आणि त्यांच्या गरीबीत फरक वाटला. त्यावेळेची त्यांची सक्तीची टंचाई होती. आपल्याकडे संख्येचा प्रश्न आहे. तिकडे मुद्दामून तयार झालेल्या कमतरतेचा प्रश्न होता.
प्राग एक सुरेख शहर आहे. मी तिकडे गेले ते documentry मध्ये पाहिलेले प्राग शोधायला. पण माझा भ्रमनिरास झाला. ते एक नंबर चे नखरेल शहर निघाले. सवंग शहर. गरीबांचे Paris व्हायच्या नादाने सगळा मी पणा हरवून बसलेले. सगळे विकायला काढलेले. कचर्याचा डबा शोधणारे भिकारी तर जागोजागी दिसले. रस्त्यातही भिक मागणारे भरपूर. इकडे स्वस्ताई म्हणजे किती असावी!!!! एका लोकल पेपर मध्ये पहिले तर नॉर्वे च्या ओस्लो ते प्राग वन नाईट स्टे जेवणा सहित फक्त २० युरो, ते ही विमान खर्चा सहित!!! गाईड ही म्हणाली की असली पेकजेस खूप असतात इकडे. आमचं हॉटेल अप्रतिम होत. एकदम सिटी सेंटर ला लागून, तेही तासांवर बुक करता येत होत. एका रात्रीचे डबल रूम चे चार्जेस फक्त ३० युरो होते. ब्रेकफास्ट घेतला तर ४० युरो. !!!!. अनेक लोक मुख्यत्वे नॉर्वे , (जे प्रचंड महाग आहे) फिनलंड हून इकडे वीक एंड साठी येतात. भयानक दारू पितात. खातात, इतरही सगळी ‘सुखं’ आहेतच हात जोडून. मजा करून जातात. देशाची इकोनोमी ७०% फक्त पर्यटनावर आहे. खरेदी तर इतकी भरमसाठ होती की किमती पाहून पाय तिकडे वळलेच पाहिजेत. खाणे सुध्धा बरेच स्वस्त. दारू तर विचारू नका.... दारु पिणार्यांसाठी स्वर्ग आहे हा. जिकडे तिकडे लोकच लोक. खात पीत फिरताहेत नुसते. एकंदर स्वरूप खूप सवंग वाटले.
दुसऱ्या महायुद्धा आधी इकडे ज्यू लोकांची व्यापारावर खूपच पकड होती. खुद्द प्राग मध्ये त्यांचे गेट्टो होते. जशी जर्मनीची पकड प्राग वर बसली तशी ह्या ज्यू लोकांची रवानगी जवळच्या ऑश्विझ कॅम्प मध्ये व्हायला लागली. आपण नेहेमी क्रेको च्या शिंडलर चे नाव ज्यू मित्र म्हणून ऐकतो पण असे अनेक ज्यू मित्र त्या वेळेस अस्तित्वात होते. त्या पैकी एक म्हणजे मायकेल (मी त्याचं आडनाव विसरले...पण आडनाव ब्रिटीश होत. ) हा एक ज्यू जो सुरुवातीच्या धामधुमीत ब्रिटन ला पळाला. आणि क्रिश्चन धर्म घेवून आडनाव बदलून राहू लागला. पुढे जेंव्हा ज्युची कत्तल सुरु झाली तेंव्हा याने प्राग व जवळच्या भागातून जवळ जवळ 600 अनाथ ज्यू बालके ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, अमेरिका ह्या देशात दत्तक दिली. त्यांची आयुष्य एका परीने मार्गाला लावली. पण त्याच्या ह्या कृत्याची दाखल इस्रायल घेत नाही कारण त्याने स्वत:चा व त्या मुलांचा धर्म बदलला ना !!!!
प्राग चा चार्ल्स ब्रिज मात्र पहाण्या सारखा आहे. चौदाव्या शतकातला हा ब्रिज एकदम सुरेख बांधणीचा आहे. हल्ली स्वित्झर्लंड चा कित्ता गिरवून हे देशही बॉलीवूड करांना इकडे शुटींग साठी बोलावणी धाडतात. कारण जस यश चोप्राने आपल्या सिनेमातून स्वित्झर्लंड लोकप्रिय केल आणि तिकडे जाणार्या पर्यटकां मध्ये भारतीयांची संख्या प्रचंड वाढली. त्याचं प्रमाणे हल्ली प्राग मधेही खूप शुटींग होतात. शेवटी पैसा महत्वाचा!!!! आणि ह्या शहराला तर त्याची चटक लागली आहे.
इकडची वाल्त्वा नदीही नखरेल. ह्या नदीवर खूप छान छान पूल आहेत. ह्या नदीच्या सफरीत आम्हाला केवढे खायला दिले!! पहिले वाईन, मग स्प्राईट, मग केक, मग आईस्क्रीम. ४० मिनिटात हे एवढे पदार्थ दिले !!!! म्हणूनच ह्याचे स्वरूप “या या मजा करा, विकत घ्या...आणि आम्हाला पैसे द्या’ असे वाटले.
प्राग मध्ये एक दिवस कमी पडतो आणि दोन दिवस जास्त होतात. कारण तेच ते आणि तेच तुम्ही सारखे नाही पाहू शकत. इकडचे खगोल घड्याळ मात्र पहाण्या सारखे आहे. बाराव्या शतकात उभारलेले हे घड्याळ प्रत्येक तासाला टोले देवून प्रत्येक राशी ची पोझिशन सांगते.
प्राग मध्ये फसवा फसवी पण खूप वाटली. रस्त्यात अनेक दुकाने दागिन्यांची होती. आणि जबरदस्त बार्गेन चालू होते. एक अंगठी आवडली तर त्याची किंमत आधी ५० युरो सांगितली. मी घाबरून २० युरो म्हणाले तर लगेच ती विकणारी मुलगी तयार झाली. १० युरो ला मागुया का असा विचार करत असतानाच नवर्याने बाजूला खेचून नेले. कारण शेजारी तीच अंगठी १५ युरो मध्ये होती. आपल्याला ह्या बाबतीत अक्कल नाही हे परत एकदा सिद्ध झाले आणि परत “तिकडून” सुनावूनाही झाले. शेवटी कोल्ह्याला द्राक्षे आंबट ह्या बाण्याने ‘मला घ्यायचीच नव्हती नुसते बघत होते’ म्हणून काढता पाय घ्यायला लागला. एका गळ्यातल्या सेट ने मात्र माझं मन अजून चोरलं आहे... पण परत असे तसे ‘इकडून’ ऐकायचे नव्हते म्हणून काढता पाय घेतला. तिकडे मुलीचे मन एका पोर्सेलीन च्या बाहुलीने चोरले. तिची किमत पाहून ( ११५ युरो) अशा बाहुल्या भारतात ह्याच पैशात जन्म भर येतील सांगून “इकडून” तिची बोळवण झाली.... ( पुढल्या वेळेला “बाबा नकोत” असा ठराव बहुमताने मंजूर झाला)
प्राग मधून आम्ही क्रेको ह्या पोलंड मधल्या शहरात जायला निघालो. जवळ जवळ १० तासांचा प्रवास. पण बहुतेक कंट्री साईड ने झाला. एक वेगळ्याच प्रकारची पिवळी फुले पहायला मिळाली. ही फुलं फक्त १५ दिवसच असतात. त्या १५ दिवसात ती काढतात, वळवतात व त्यांचा उपयोग खत व जनावरांचे खाद्य म्हणून करतात ( दिनेशदा नाव सांगा फुलांचे !!!). हिरव्या रंगावर ही फुले खुप सुरेख दिसत होती. ह्या सगळ्या भागात ही गंमत सारखी पहायला मिळत होती.
मध्ये एक सुरेख घर लागले जे ३०० वर्ष जुने आहे व ज्याचे आता हॉटेल झाले आहे. जेवण सुद्धा छान होते. एक वेगळ्याच सॉस मधला राईस त्यांनी दिला. आणि उत्कृष्ट अशी पालकाची भाजी. ज्यात जायफळ घालून त्याचा उग्रपणा एकदम काढून टाकला होता. तिकडचं घरी बनवलेलं चीजही उत्तम होतं. एक वेगळीच डेझर्ट वाईन त्यांनी दिली. त्याची चव फारच सुरेख होती. ती मधा पासून करतात अस सांगितले. अजून एक वाईन तिकडे मिळाली जी दुधातून (याक...!! ऐकून कससच झालं) सर्व्ह करतात. एकंदरीत प्रकार मला पचणारा नव्हता हे नवर्याच्या चेहेर्या वरून कळले.
हेच ते घर व आजु बाजुचा परिसर
आतले जुने स्वरुप तसेच ठेवले होते
क्रेको म्हणजे ह्या ट्रीप मधला हायलाईट होता. इकडे प्रचंड गोष्टी घडल्या. दुसऱ्या महायुद्धात नाझींचा सगळ्यात मोठ्ठा ज्यू ना मारायचा कारखाना म्हणजे ऑश्विझ आणि बर्कानाऊ इकडेच आहेत. नाझींनी क्रेको निवडायचे कारण हे की ते खूपच मध्यवर्ती ठिकाणी आहे. सगळ्या युरोपातून इकडे माणसे आणणे सोप्पे होते. परत हे खूपच निवांत जागी आहे. जरी ही जुनी पोलिश राजधानी असली तरी नाझी वर्चस्वाच्या काळात नाझी ना इकडे आपले चाळे लोकां पासून लपवायला ही जागा सुरक्षित वाटली.
आम्ही मात्र आमची सफर एका वेगळ्याच जागेने सुरु केली. वेलीक्झा salt माईन्स !!! एक अप्रतिम ठिकाण. पूर्वी जेंव्हा सोनं आणि मीठ ह्यांची किंमत एकाच होती, त्यावेळेस अशा अनेक खाणी अस्तित्वात आल्या. अस म्हणतात की काही कोटी वर्षं पूर्वी ह्या भागात समुद्र होता. त्यानंतर अनेक भूगर्भीय हलाचाली मुळे इकडे जमीन झाली. पण समुद्र काळात असलेल्या मिठा चे रुपांतर कठीण अशा दगडांमध्ये झालं. जे भूगर्भात दडून राहील. त्या वेळेस समुद्रातून मीठ काढायचे ज्ञान अवगत नव्हते. ह्या अशा खाणी वरच अवलंबून राहावे लागे. त्या मुळे ज्याच्या कडे मिठाच्या खाणी ची मालकी तो श्रीमंत ...अशी परिस्थिती होती. परत इतर खाणी पेक्षा इकडे काम करायला कामगार तयार असायचे कारण दगड किंवा कोळश्याच्या खाणी पेक्षा इकडचे जीवन खूपच सुकर होते. इकडे श्वसनाचे रोग वा लौकर मरण नव्हते. कारण क्षार व मीठा मुळे उलट हवा शुध्द असे. तरीही इतर समस्या होत्या. जशा खूप काळ काम केल्याने त्वचा सडत असे. कारण इकडे सतत ओल असे. बूट न घालता काम केले तर पायाच्या बोटांना भेगा पडत. अनेकदा ठिसूळ मीठ अंगावर पडून अपघात होत. असे अनेकदा अपघात झाल्यावर मग इकडच्या कामगारांनी खाली खाणीत एक चर्च बांधले. मीठ काढायची पद्धत ही अनोखी होती. हाताने मीठ वर चढवण्या ऐवजी ते लोक घोड्यां ना घाणा ओढायला लावत व त्या ची पुली बनवून मीठ एक एक मजला वर चढवत असत. ही खाण जवळ जवळ नऊ माजले खाली आहे..... आपल्याला आधी साधारण ३७० पायर्या उतरावया लागतात. सध्या गेली ३० वर्ष ही खाण बंद आहे. अजूनही इकडे मीठ आहे. पण ते आता महाग पडते. त्या मुळे त्याचा उपसा बंद आहे. त्याचं मुळे त्याचा आता पर्यटना साठी वापर होतो. आत मध्ये त्या कामगारांनी अप्रतिम शिल्प व झुंबर बनवली आहेत. हे सगळे मीठा चे आहे!!!!
पोलंड व विशेषत: क्रेको चा अभिमान म्हणजे पोप जोन पॉल II.... हे पोलंडचे व त्यातूनही क्रेको चे . त्या मुळे त्यांचे शिल्प बर्याच ठिकाणी दिसते. आतातर व्हेटीकन ने त्यांना संत पद बहाल केले आहे. त्यामुळे जागो जागी त्यांची शिल्प दिसतात.
खाणीत जागोजागी बसायच्या जागा आहेत. कारण साधारण पणे ३ तासाची सफर आहे. इकडे सतत १४ डिग्री पर्यंत तापमान असते. त्यामुळे थकायला होत नाही. खूप सुरेख रीत्या ही जागा सजवली आहे. खाली एक मोठ्ठा हाल सुध्धा आहे. तिकडे कार्येक्रम होतात.
आम्ही तिकडे फिरत असताना एक स्थानिक पोलिश ग्रुप आला होता. ते अतिशय भक्तीभावाने पोप च्या पुतळ्या समोर नतमस्तक झाले. ही भाबडी श्रद्धा अनेक वेळा दिसली. अनेक स्थानिक शाळा आणि कोलेज आपल्या ट्रिपा घेवून इकडे येतात. एका बंद पडलेल्या जागेचे त्यांनी सुरेख रुपांतर केले आहे.
ही वाट
हे मीठात कोरलेलं लास्ट सपर
हे चर्च
पुर्वी ह्या अश्या पायर्या होत्या
घोड्यान्ची पुली
क्रेकोचा राजवाडाही खास आहे. उंची वरची ही जागा शहराचे सुरेख दर्शन घडवते. पोप चे रहाण्याचे ठिकाण, त्यांनी कार्डिनल म्हणून खूप काल घालवला ती जागा. हे सगळं आता देवत्वाच्या उच्च्तेला पोचले आहे. पोप बद्दल ह्या लोकाना विशेष अभिमान दिसला. दुसरी अभिमानाची व्यक्ती म्हणजे कोपर्निकस !!!! त्यांचे कोलेजाही आता हेरीटेज वास्तू म्हणून सांभाळले आहे.
पोप चे निवासस्थान
क्रेको मधला आमचा दुसरा दिवस एका भयानक इतिहासाने उजाडणार होता. त्या आधीची संध्याकाळ एका वेगळ्याच जेवणाने झाली. एका स्थानिक ठिकाणी फार सुरेख जेवण मिळाले. ओलिव्ह ओईल मध्ये केलेली ब्रोकोली ची भाजी आणि अप्रतिम अशा चवीची लोणी आणि क्रीम घालून केलेली अप्रतिम अशी पालक ची भाजी. त्याच्या बरोबर भात. त्याचं बरोबर अर्गुला सलाड. अर्गुला ची पाने मी प्रथमच खाल्ली. मला आधी चव उग्र वाटली. पण नंतर मात्र चव फारच आवडली. त्या सलाड चे ड्रेसिंग वेगळेच होते.
त्या हॉटेल चा मालक पण गप्पिष्ट निघाला. एकंदरच पोलंड आणि त्याच्या सद्य स्थितीवर पोट तिडकीने बोलत होता. बोलता बोलता अचानक गप्प होवून उठून गेला. आधी आम्हाला आश्चर्याच वाटले. मग गाईड म्हणाली की इकडे पूर्वी रशियन राजवटी मध्ये प्रत्येक जण गुप्तहेर असल्या सारखा वागायचा. लोकांना एकमेकांची भीती वाटायची. लोक चुगल्या करायची. सरकार विरुद्ध बोलणारी लोक अचानक गायब व्हायची. त्याच मानसिकते मधून आजूनही हे लोक बाहेर पडलेले नाहीत. मधेच मिटून जातात. त्या मुळे इच्छा असूनही जास्त बोलत नाहीत. बाहेरच्याबरोबर ते मोकळे असतात पण स्थानिकांना च घाबरतात.
ही भावना मला नविन होती. आपण साधारण्तः बाहेरच्यान्ना बुजतो पण आपल्यां बद्दल खात्री बाळगुन असतो. अशी पण लोकं असतात ह्यावर विश्वास बसत नव्हता. परिस्थीतीने त्यानां असं संशयी बनवलं आहे.
पुढचा मुक्काम आयुष्यभर पुरेल असा अनुभव देणारा मिळाला.
भाग- ४ = ऑश्विझ – भयानक अनुभव = http://www.maayboli.com/node/54173
सुरेख चालु आहे
सुरेख चालु आहे लेखमाला....
पुढचा भाग खरच भयानक अनुभवा चा असेल्....आउसश्वित्झ बद्दल खुप वाचलयं मॅक्स म्युल्लर भवन मधे जर्मन चे शिक्षण घेताना, अनेक चित्रपट ही बघितले आहेत्....पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत
किती डोळसपणे फिरलात तूम्ही !
किती डोळसपणे फिरलात तूम्ही ! !!! ( माझ्याच्याने होत नाही ते . )
मीठाने जर्मनीमधलीही काही शहरे भरभराटीला आली. मासे खारवायला ते लागत असे. पण आता मासेही कमी झालेत आणि भरपूर मीठ काढल्याने, बांधकामासकट जमीन खचू लागलीय.
ती फुले, रेपसीड ची वाटताहेत.
वाईन आणि दूध.. एकेकाळी लोकप्रिय होते. गाईच्या दूधाची धार थेट वाईनच्या ग्लासमधे घेत आणि त्यातल्या फेसासकट ती पित. अजूनही क्रीम लिक्यूर लोकप्रिय आहेत. त्या फ्लेवरचे आईसक्रीमही असते.
पुढच्या भागाची वाट बघतोय.
क्लास वर्णन...मस्त फोटो....
क्लास वर्णन...मस्त फोटो....
छान, अशा प्रकारच्या माहितीची
छान, अशा प्रकारच्या माहितीची गरज होतीच. प्राग बद्दल ऐकून कधी एकदा व्हीझीट करतोय असे झालंय
खुपच छान वर्णन आणि फोटो
खुपच छान वर्णन आणि फोटो
छान चालू आहे मालीका मात्र
छान चालू आहे मालीका मात्र पुढचा भाग भयानक असणार आहे
छान लिखाण आणी फोटो.
छान लिखाण आणी फोटो.
ती फुले रेपसीडची (कनोल ऑइल?)
ती फुले रेपसीडची (कनोल ऑइल?) आहेत. युरोपमध्ये स्प्रिन्गच्या उत्तरार्धात जागोजाग दिसतील.
प्राहा शहरात फसवाफसवी भरपूर आहे - विशेषतः टॅक्सीवाले, रस्त्यावर माल विकणार्या लोकांकडून. मात्र चांगली लोकं जागोजाग भेटतील. आता प्राहामध्ये भरपूर भारतीय प्रवासी येतात - विशेषतः 'हनुमान' कपल्स.
प्राहा स्कँडिनेविअन लोकांसाठी फारच स्वस्त आहे. पण त्यांना अगदी पश्चिम युरोप/स्विससुद्धा स्वस्त वाटेल इतकी महागाई व महाग चलन त्यांच्याकडे आहे. मात्र भारतीयांना व मध्य युरोप (आगदी युरोझोनमधल्या लोकांनासुद्धा) मधल्या रहिवाश्यांना प्राहा फार स्वस्त वाटणार नाही.
प्राहा फिरण्यासाठी दोन दिवस जास्त आहेत हे मात्र पटले नाही. ह्या शहरात आठवडा काढला तरी कमी पडेल. एक दिवस तुम्ही चालत चालत टीव्ही टॉवरच्या टेकाडावर जाऊन मग दिवसभर कॅसल डिस्ट्रिक्ट फिरू शकता. मग संध्याकाळी चार्ल्स ब्रिज. एक दिवस ओल्ड टाउनमध्ये सहज जातो. Vysehrad टेकाडावरून दिसणारा शहराचा नजारा पण सुंदर आहे. एक दिवस फक्त आर्किटेक्चर साठी घालवता येईल - अनेक चर्चेस वेगवेगळ्या काळातली, शैलीची, जुन्या शहरातल्या गल्ल्या व तिथली घरे, नॅशनल थिएटर/म्युझिअमच्या बिल्डिंग.
पोप जॉन पॉलना गमतीने 'जीझस वर्जन २' म्हणतात क्रॅकोमध्ये
प्राहा फिरण्यासाठी दोन दिवस
प्राहा फिरण्यासाठी दोन दिवस जास्त आहेत हे मात्र पटले नाही. ह्या शहरात आठवडा काढला तरी कमी पडेल.>>>
ट्ण्याजी तुम्ही जे म्हणता आहात ते खरे असेल कदाचीत. पण नीदान त्या वेळेस तरी मला असेच वाटले. कदाचीत ह्या शहराची आणि माझी नाळ जुळली नाही.
हे म्हणणे मला बुडापेष्ट आणि लेक बोहिंज साठी वाटले..... तिकडे किती फिरु आणि किती नको असे झाले. बुदापेष्ट ला तर आता परतुच नये असे वाटले.
चांगली लोकं ही भेटली प्राहा मधे. आमच्या हॉटेल शेजारी एका दुकानात पाकिस्तानी विक्रेता होता. आम्ही मराठी बोलतोय पाहुन स्वतःहुन आला जवळ व 'हिंदुस्थान से है क्या?" अशी सुरुवात करुन मस्त गप्पा मारल्या. वतन से दूर हम दोस्त ही है.....
ती फुले रेपसीडची (कनोल ऑइल?)
ती फुले रेपसीडची (कनोल ऑइल?) आहेत.>>>
ट्ण्या.... हेच नाव मी आठवत होते..... कनोल ऑइल..... कर्रेक्ट
मस्त वर्णन , आता आधीचे दोन
मस्त वर्णन , आता आधीचे दोन भागही वाचायला लागतील.
आत्ता तिन्ही भाग वाचले..
आत्ता तिन्ही भाग वाचले.. मस्तच लिहिताय..
पुभाप्र..
वॉव मोकिमी मस्त लिहिलंयस
वॉव मोकिमी मस्त लिहिलंयस वर्णन.. खूप मजा येतीये वाचायला आणी फोटो पाहायला.
मिठा ची खाण.. खूपच ईंटरेस्टिंग ...
फारच मस्त सुरुये
फारच मस्त सुरुये लेखमाला....या शहरांबद्दल फारसे वाचले नव्हते...म्हणजे इतिहासात वाचले होते पण तिकडचे वर्णन नाहीच.
झकास महीती आणि खाद्यपदार्थांचे वर्णन पण मस्त...त्याचेही फोटो टाका ना..
छान लिहिले आहेस. तू तिथे
छान लिहिले आहेस. तू तिथे कशाला गेलीस? फिरायला? की तुम्ही तिथे राहता? नोकरी करता?
खुप छान प्रवासवर्णन मीराताई.
खुप छान प्रवासवर्णन मीराताई.
माझ्या पोलंडमधल्या काही महिन्यांच्या वास्तव्यात एक गोष्ट खुप प्रकर्षाने जाणवली की ते जर्मन्सचा अजुनही खुप तिरस्कार करतात. Warsaw, Crokow आणि Bydgoszcz मधे नाझींनी केलेल्या नरसंहाराच्या खुणा अजुनही दिसतात.
पोलंडमधे मुक्काम वाढवणार असलात तर झाकोपानेला नक्की जा. त्या ठिकाणाच्या प्रेमात पडाल तुम्ही. वेळ मिळाला तर मी एखाद दोन फोटो डकवेन उद्या परवा..
happy journey
छान लिहिताय. असेच अनुभव
छान लिहिताय. असेच अनुभव वाचायला आवडतील.
छान आहे सिरीज. प्रागबद्द्ल
छान आहे सिरीज. प्रागबद्द्ल अगदी काहीच माहित नव्हतं. हा भाग छान झाला आहे. अजून येऊदेत
छान लिहिले आहेस. तू तिथे
छान लिहिले आहेस. तू तिथे कशाला गेलीस? फिरायला? की तुम्ही तिथे राहता? नोकरी करता?>>>
फिरायला गेले होते बी.
पोलंडमधे मुक्काम वाढवणार असलात तर झाकोपानेला नक्की जा. त्या ठिकाणाच्या प्रेमात पडाल तुम्ही.>>>>
जाउन आलो प्रथम म्हात्रे !!!. खुप सुरेख आहे. पुढच्या भागा नंतर त्या बद्दल लिहिणार आहे.
सगळ्यांचे धन्यवाद!!!! वेगळा विषय आहे. नेहेमीचा चमक दमक युरोप नाही. इतिहासा बद्दल सहाजिकच जास्त लिहिल जातय माझ्या कडून. कारण ह्या प्रत्येक जागे शी भयानक आणि चमत्कारिक इतिहास जोडला गेला आहे. आणि तो समजला नाही तर त्या जागेला काहीच महत्व नाही.
जिथे जिथे वेगळे अनुभव आले, ते ते लिहायचा प्रयत्न आहे. काही काही जागा मिटून गेल्या होत्या. जसा अनुभव बर्लिन ला आला. ते लोक तुमच्याशी खात्री झाल्या शिवाय बोलतच नाहीत. त्या मुळे संवाद साधणे कठीण गेले. बहुतेक शहरी भागात हा अनुभव आला. तिकडच्या गाईड ही जेवढी माहिती गरजेची आहे तेवढीच देतात. जसे जसे आत घुसत गेलो, तशी तशी लोक जास्त अघळ पघळ वाटली. सगळ्यात मस्त लोकं स्लोव्हेनिया आनि झाकोपाने मधे भेटली. गाव समजायला तुम्हाला तिकडे लोकल बाजारात फेरी मारायला लागते. आम्हीही उत्साहाने जिथे शक्य आहे तिकडे लोकल मार्केट मधे खरेदी केली.
काही ठिकाणी खुप वेगळे खाणे टेस्ट केले. त्याचे फोटो टाकते लिहिण्या च्या ओघात
मीरा, मी युरोपावर एक छान
मीरा, मी युरोपावर एक छान दीर्घ लेख लिहिला आहे - फ्रान्सचे दिवस.. फ्रान्सच्या रात्री असे त्याचे नाव आहे. वेळ मिळाला तर वाच. लेख वर काढतो आहे.
सुन्दर ...
सुन्दर ...
अतिशय अप्रतिम लेखमाला
अतिशय अप्रतिम लेखमाला चललिय.
मला यात सर्वात आवडलेलि बाब ती अशी की तुमच्या सुरेख लेखन्शैलिने तुमचा लेख हा केवळ प्रवास वर्णन न वाटता अगदि तुमच्या बरोबरिने प्रवास केल्याचा अनुभव मिळत आहे.
मी हा पहिलाच लेख वाचला खूपच
मी हा पहिलाच लेख वाचला
खूपच सुंदर प्रकारे लिहिला आहे,
आता ईतरही वाचण्याशिवाय पर्याय नाही