धुमारे

Submitted by मंजूडी on 2 July, 2008 - 07:49

दुपारची वेळ होती. दादा शांतपणे माईंनी वाढलेलं जेवण जेवत होते. माईंनी हळूच दादांकडे पाहून त्यांचा अंदाज घ्यायचा प्रयत्न केला. पण त्यांच्याकडे पाहून कसलाच थांग लागत नव्हता. माईंचही चित्त होतं कुठे ठिकाणावर.. सवयीने हात काम करत होते इतकंच. ते दोघंही खरंतर संध्याकाळ व्हायची आतूरतेने वाट बघत होते. देवकी आज निलयला घेऊन घरी येणार होती. दादा - माईंना निलय आवडला तरच ती त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेणार होती.

    देवकी........ तिला पाहून दादांना फार कणव दाटून यायची तिच्याबद्दल. जे काही घडलं तिच्या आयुष्यात त्यात तिची काय चूक होती? चांगलं पत्रिका पाहून दादांच्या एकुलत्या एक मुलाशी - आशिषशी तिचं लग्न ठरवलेलं.... लग्नाला केवळ एक महिना उरलेला असताना देवकीचे वडील गेले. केवढी खचून गेली होती देवकी आणि तिची आई..... पण केवळ धरलेला मुहुर्त टाळायचा नाही म्हणून देवकी लग्नाला तयार झाली. लग्न झालं आणि पाठोपाठच देवकीच्या आईनेही एक मुख्य जबाबदारी पार‍ पाडल्याच्या समाधानात डोळे मिटले. लागोपाठ आई-वडिल जाणं हा केवढा मोठा धक्का होता देवकीसाठी... पण देवकी आपलं सगळं दु:ख विसरून नविन घरात रूळायचा प्रयत्न करायला लागली. आपल्या लाघवी स्वभावाने माईंना, दादांना आपलंसं केलं. आशिष तर केवढा खुश होता तिच्यावर..... नितळ गोरा रंग, सुबक बांधा, आशिषला साजेशी उंची, शिक्षण आणि मुख्य म्हणजे मृदू मुलायम प्रेमळ स्वभाव. परमेश्वराकडून जादूई आवाजाची देणगी मिळाली होती देवकीला आणि वडिलांकडून गाण्याचा वारसा. त्या गाण्याच्या प्रेमातच तर आशिष पडला होता.
    देवकीसुद्धा आशिषशी अगदी समरस होऊन संसार करत होती. त्याच्या आवडी-निवडी जपत होती. दादा - माईंमध्ये स्वतःला सामावून घेत होती. पण तिचं असं सुखेनैव चाललेलं जीवन बहुधा नियतीला मंजूर नव्हतं. कंपनीत झालेल्या मोठ्या अपघातात सापडून आशिषचा मृत्यु झाला आणि देवकीच्या पायाखालची जमिनच सरकली. संसारसुखाची पुरेशी चव न चाखताच आशिष सगळ्यांना सोडून निघून गेला होता. ज्याच्यावर भविष्याची भिस्त ठेवली तोच देवकीच्या आयुष्यातून उठून गेला होता. आधी आई-वडिल, मग नवरा, प्राणप्रिय अशी माणसे एकामागोमाग निघून जाण्याचे केवढे दु:ख तरुण वयात तिला झेलावे लागले होते.
    आणि दादा - माई..... आपल्या डोळ्यांदेखत आपल्या तरुण मुलाचा मृत्यु त्यांना पहावा लागला होता. केवळ पुरुष म्हणून दादांना रडता येत नव्हतं. आणि आपल्यावर आता देवकीची जबाबदारी आहे ह्याची जाणीव होती म्हणून केवळ ते कोलमडून पडले नव्हते. पण माई तर पुरत्या खचून गेल्या होत्या. सहा महिने अंथरूणातून उठू शकल्या नव्हत्या. देवकीने पुन्हा एकदा आपलं दु:ख, आपल्या वेदना बाजूला सारल्या आणि माईंच्या आजारपणात त्यांचं अगदी सख्ख्या आईसारखं सगळं केलं. माईंनी देखिल देवकीच्या सेवेला न्याय दिला आणि जगण्याची उमेद धरली. आलेली परीस्थिती निमूटपणे स्विकारण्याशिवाय देवकीला गत्यंतरच नव्हतं. मात्र तिने कधीच आपल्या दुर्दैवाला दोष दिला नाही. हे सगळं पाहून दादा मनोमन खंतावत होते. देवकीच्या भवितव्याची चिंता त्यांना सारखी भेडसावत होती.

      दरम्यान, देवकीने आपलं मन गाण्यामध्ये गुंतवलं. तिने गाण्याच्या शिकवण्या घ्यायची तयारी दाखवली आणि तिला विद्यार्थीही मिळत गेले. देवकी आपलं एकटेपण सुरांमध्ये बुडवून टाकत होती. आपल्या वेदना विसरायचा असोशीने प्रयत्न करत होती. आता घरात चार मुलांची उठबस व्हायला लागली होती. त्यानिमित्ताने देवकीचंही बोलणं, वागणं मोकळं होत होतं. देवकीला जगण्याची एक दिशा मिळत होती. ती आपले विद्यार्थी घेऊन जिल्ह्याबाहेर स्पर्धा - परीक्षांसाठी घेऊन जात होती. नवनविन अनुभव गाठीशी बांधत होती. आणि अशाच एका स्पर्धेच्या वेळी तिची निलयशी ओळख झाली.

        निलय... अतिशय सुसंस्कृत, सभ्य आणि उमद्या मनाचा मुलगा होता. आपलं मेकॅनिकल इंजिनियरींग पुर्ण करून आपल्या गावी एक वर्कशॉप चालवत होता. 'गाणं' हा त्याचा छंद त्याने उत्तम रीत्या जोपासला होता. ह्या क्षेत्रात होणार्‍या प्रत्येक घडामोडीची माहिती ठेवून होता. आपल्या विद्यार्थ्यांकडून कमालीची तयारी करवून घेणार्‍या देवकीबद्दल त्याने ऐकलेलं होतंच. नम्रपणे बोलणारी देवकी पाहून, तिचं सात्विक, सोज्वळ रुप पाहून तो भारावून गेला होता. ती स्पर्धा संपल्यावर जमलेल्या एका अनौपचारीक मैफलीत कोणीतरी देवकीला गायचा आग्रह केला आणि तिचा तो आवाज, गाण्याची तयारी पाहून त्याचक्षणी तिच्या प्रेमात पडला होता. तिच्याशी ओळख वाढवून तिच्या परीचयात रहायला लागला होता. तिच्याविषयी, तिच्यावरच्या प्रेमाविषयी जेव्हा त्याला स्वतःला खात्री पटली तेव्हा वेळ न दवडता त्याने लग्नाविषयी देवकीला विचारलं होतं. परंतु त्यावेळी स्पष्टपणे देवकीने त्याला नकार कळवला होता.

          पण कुठूनतरी माईंना ह्याविषयी कळलं तेव्हा त्यांना खुपच आनंद झाला. देवकीच्या पुनर्लग्नाचा विषय तिच्याजवळ कसा काढू ह्याबद्दल त्या दुविधेत होत्या आणि अचानक निलयविषयी त्यांना समजलं होतं. दादांच्या मागे लागून त्यांनी निलयबद्दल माहिती मिळवली आणि त्याच्याविषयी खात्री पटल्यावर त्यांनी हे प्रकरण तडीस न्यायचं ठरवलं. पण देवकीने माईंनाही ठाम नकार दिला. म्हणाली, 'मी आशिषला विसरू शकणार नाही आणि केवळ एक तडजोड म्हणून लग्न करायचं तर निलयवर अन्याय होईल'. खरंतर देवकीचं पुन्हा लग्न करून देणं तिच्या पूर्ण आयुष्याच्या दृष्टीने आवश्यक होतं. पण त्यासाठी तिला तयार कशी करायची हा मोठा प्रश्न माईंना पडला होता.

            तिकडे एक वेगळीच समस्या दादांचं मन पोखरत होती. पेशाने दशग्रंथी ब्राम्हण असलेल्या दादांनी आजवर नोकरी कधी केलीच नव्हती. चार घरचं यजमानपद आणि वेळोवेळी होणार्‍या पूजा अर्चा यावरच त्यांनी संसार चालवला होता आणि आशिषचं शिक्षण पुर्ण केलं होतं. आशिषला व्यवस्थित नोकरी लागल्यावर त्याने हे सगळं दादांना बंद करायला लावलं होतं. नोकरी कधी केली नव्हती त्यामुळे त्यांची स्वतःची अशी काही पुंजी त्यांच्याजवळ नव्हती. त्यांच्या भविष्याची तरतूद म्हणजे आशिषच होता. त्याचंच असं काही होईल हे कधी दादा - माईंच्या स्वप्नातही आलं नव्हतं. त्याच्या फंडाचे, विम्याचे जे काही पैसे मिळाले ते गुंतवून त्याच्या व्याजावर आणि देवकीच्या शिकवण्यांवर आता घर चालत होतं. पण देवकीचं लग्न करून द्यायचं म्हणजे शिलकीतले पैसे खर्च होणार; अगदी साधं लग्न जरी केलं तरी आशिषचे म्हणून त्यातले थोडे पैसे तरी तिच्या नावे करावे लागणार; मग आपलं काय? पुढे आपला खर्च कसा चालणार? म्हातारपणातली दुखणी खुपणी कशी सावरायची पैशाशिवाय, देवकीशिवाय? असे कोते विचार आपल्या मनात येत आहेत ह्याचा त्यांना भयंकर राग येत होता. स्वतःचीच त्यांना लाज वाटत होती. आपलं संस्कारक्षम मन असा विचार कसा काय करू शकतं ह्याची त्यांना चीड येत होती. व्यवहारी बुद्धी वरचढ ठरू पाहत होती. विचार करकरून डोकं थकलं तरी काही मार्ग समोर येत नव्हता. शेवटी संकोचत त्यांनी माईंजवळ आपले विचार मांडले. पण माईंनी एका झटक्यात त्याचा निकाल लावला.
            त्या स्पष्टपणे म्हणाल्या, 'अहो, पैशाचं काय आहे एवढं. आपण हे राहतं घर विकून वृद्धाश्रमात जाऊन राहू. आपल्याला निवारा मिळेल आणि गाठीशी पैसा पण राहील. पण देवकीचं लग्न करून देणं आत्ता महत्वाचं आहे.' हा मार्ग आपल्याला कसा नाही सुचला ह्याबद्दल दादांना फार शरम वाटली पण समस्येतून मार्ग निघाला होता. आता देवकीला समजावण्याचाच प्रश्न होता.

              पुन्हा नव्याने संसार मांडायची देवकीला खरंतर भितीच वाटत होती. आणि असल्या काही गोष्टींवर तिचा विश्वास नव्हता तरी न जाणो निलयशी लग्न केल्यावर आशिषसारखं त्याचं काही झालं तर? आशिषच्या मधुर आठवणी अजून ती जवळ बाळगून होती. पण पुढच्या आयुष्याच्या दृष्टीने कोणाची तरी सोबत असणं जरुरीचं आहे हेही तिला समजत होतं. निलयला आपण स्विकारू शकू का? त्याच्याशी एकरुप होऊ शकू का? की केवळ आयुष्याची साथसोबत म्हणून त्याच्याशी लग्न करायचं? हे आणि असे अनेक प्रश्न तिची पाठ सोडत नव्हते. खरं म्हणजे निलय तिला आवडला होता पण कुठल्याही प्रकारचा धोका पत्करायला तिचं मन राजी होत नव्हतं.

                देवकी काहीच निर्णय घेत नाही म्हटल्यावर माई अस्वस्थ झाल्या. कसं पटवायचं ह्या पोरीला? आम्ही दोघे काय जन्माला पुरणार आहोत का हिच्या? आजचं जग कसंय, माणसं कशी आहेत? एकटीने आयुष्य काढणं इतकं सोपं असतं का? देवा, हीला सुबुद्धी दे. आमचा दोघांचाही काही नेम नाही, आमचं काही बरं वाईट व्हायच्या आत आमच्या डोळ्यादेखत हीचं लग्न होऊ दे अशी प्रार्थना रोज त्या देवाजवळ करत होत्या.
                देवकीलाही काय करावं समजत नव्हतं. दादा - माईंची काळजी तिला समजत होती. शेवटी त्या दोघांची घालमेल तिला बघवेना तेव्हा ती लग्नाला तयार झाली. पण निर्णय मात्र तिने त्या दोघांवर सोपवला. म्हणाली,' तुम्ही निलयला भेटा, त्याच्याशी बोला, त्याला पारखा आणि तुम्हाला तो आवडला तरच मी त्याच्याशी लग्न करेन.'

                  आणि ठरल्याप्रमाणे निलय संध्याकाळी आला. त्याच्याबद्दल जसं ऐकलं होतं तसाच तो होता. अतिशय सभ्य आणि मृदुभाषी. दादांच्या चेहर्‍यावरूनच माईंना त्यांची पसंती कळली. माईंनाही निलय अगदी आवडून गेला.
                  थेट लग्नाच्या मुद्द्यालाच हात घालत निलय म्हणाला,' दादा, तुमची देवकी मला आवडली. तिची साथ मला जन्मभरासाठी हवीशी वाटली म्हणून मी तिच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. लग्नाबद्दल तिला जेव्हा विचारलं तेव्हा म्हणाली की आमच्या लग्नातल्या जिलबीची चव अजूनही जीभेवर आहे. ह्याचा अर्थ स्पष्टच होता की ती आशिषला विसरू शकत नव्हती. पण मी समजू शकलो ते. आज ती लग्नाला कशी काय तयार झाली आहे ह्याचंच मला आश्चर्य वाटतंय. अर्थात, मला फार आनंदच झालाय ह्या गोष्टीचा... पण मी तिच्यावर कुठल्याही नात्याची जबरदस्ती करणार नाही. आशिषचं प्रेम तिला द्यायचा मी पूर्ण प्रयत्न करीन. फक्त जन्मभराची सोबत म्हणून तिने मला स्विकारले तरी माझी काही हरकत नाही. तिला जसं हवं आहे तसंच साधेपणाने लग्न करू. फक्त लग्नानंतर तिने एकटीनेच नव्हे तर तुम्ही दोघांनीही माझ्याकडे रहायला यायचं. मला आई - वडील नाहीत त्यामुळे घरात तुमच्यासारखी मोठी माणसं आली तर मला समाधान मिळेल. तुम्हाला माझ्या गावी येणं मान्य नसेल तर मी इथेच, ह्याच गावात माझं घर मांडायला तयार आहे. फक्त एकच की लग्नानंतर आपण एकत्र रहायचं. तुमची सोबत आम्हाला, आमची साथ तुम्हाला............ कसं म्हणताय?'
                  बोलायला शब्दच होते कोणाजवळ? देवकी, दादा आणि माई तिघेही अचंबित झाले होते. निलयकडून असा काही प्रस्ताव येईल ह्याची कल्पनाही कोणी केली नव्हती. देवकीचे, माईंचे डोळे आनंदाश्रूंनी पाझरत होते. निलयला ओळखण्यात आपण चूक केली ह्याबद्दलचा अपराधीपणा देवकीच्या मनात भरून आला होता. आपल्याबद्दल ह्याने एवढा विचार केलाय आणि आपण मात्र त्याच्याकडे केवळ एक तडजोड म्हणून बघत होतो ह्याबद्दल तिला स्वतःचा धिक्कार करावासा वाटत होता. आपल्या क्षूद्रपणाची तिला लाज वाटत होती.
                  निलयचा मोठेपणा पाहून दादा भारावून गेले होते. त्यांना पडलेल्या सगळ्याच प्रश्नांचा निचरा झाला होता. देवकीच्या गोड हसण्याने त्या बैठकीचा समारोप झाला. देवाजवळ दिवा लावून, पेढे ठेवून माईंनी सर्वांचेच तोंड गोड केले. नवे दिवस आले होते. होरपळलेल्या फांद्यांना नवे धुमारे फुटले होते........

                  -------समाप्त--------

                  गुलमोहर: 

                  मंजू कथाबीज चांगले आहे. पण अजून फुलवायला हवी होती. भराभरा सांगून टाकल्यासारखी वाटतेय.

                  संघमित्राला अनुमोदन.
                  मंजु तु हापिसात बसुन लिहित असल्याने थोडी गडबड होते अस वाटतय.
                  घरी मस्तपैकी एका कागदावर आधी लिहित जा जस सुचेल तस आणि मग परत वाचुन सुधारणा करु शकतेस.
                  किंवा इथेच अप्रकाशित ठेवुन तुला व्यवस्थित वाटली की मगच प्रकशित करु शकतेस.तोपर्यंत तिथे संपादीत करु शकतेस.
                  राग मानु नकोस सुचनेबद्दल. Happy

                  सन्मी आणि झकोबा........ सुचनांबद्दल अनेक धन्यवाद.
                  झक्या, अरे रागवेन कशाला? तुला खोटं वाटेल पण गेले १०-१२ दिवस ही कथा लिहित होते. ह्यावेळी एकदम शांतपणे लिहिली..... प्रयत्न करत रहायचं.. माझी पण सिक्सर बसेल कधीतरी..

                  गोड आहे.. अगदी विशफुल थिंकिंग! Happy मन्जू चांगलं लिहिलं आहेस.
                  .
                  सूनेचा पुनर्विवाह करून देणं- खूप मोठा आणि गुंतागुंतीचा विषय आहे. तो लघुकथेत मावणार नाही. याचीच दीर्घकथा लिहायचा विचार कर.
                  ----------------------
                  The cheapest face-lift is a SMILE
                  Happy

                  माझी पण सिक्सर बसेल कधीतरी..>>>>.
                  अरे हा कधीतरी फार लांब नाहिये Happy

                  मंजूडे, वाचली होती कधीच कथा. आणि 'व्वा' गेलाही तेव्हाच. प्रतिक्रिया अत्ता लिहितेय.
                  सुंदर कथाबीज. मोजकी चार पात्र इतक्या थोडक्यात कसली सणसणीत उभी केलियेस. राहुन राहुन वाटतय की अजून लिहील तर....?
                  थोडे अधिक प्रसंग, काही अजून संवाद...
                  अजून फुलली असती गं. तुझ्याकडे ती ताकद आहे... तब्येतीत लिही. वाट बघत्ये पुढच्या कथेची.

                  मंजु, मस्त लिहिलीय ग. कथाबीज अतिशय सुंदर... फुलवण्याच्या बाबतीत इतरांशी सहमत.
                  सिक्सर लागणारच लवकर. एकामागोमाग चौकार लागताय ते काय कमी आहे Happy
                  .
                  -प्रिन्सेस...

                  मंजूडी, आवडली गोष्ट. माझ्या मते थोडक्यात आणि सुटसुटीत झालीये. उगाच फापटपसारा नाहीये त्यामुळे छान वाटली. लिहित रहा.

                  मंजु छान लिहीलेस , लिहीत रहा , असेच चौकार मारत सिक्सर पण सहज होईल , आमच्या शुभेच्छा .

                  मन्जु,
                  खुप उशिरा वाचतेय.
                  कथाबीज उत्तमच. पण पुढच्या वेळी अशा उत्तम बीजासाठी तुझ्याकडुन दीर्घ कथेची अपेक्षा आहे.