मना तुझे मनोगत - १

Submitted by युनिकॉर्न on 27 May, 2015 - 16:04

बसमधून उतरल्या उतरल्या योगेशनी घड्याळ बघितलं.

"१२:१५ झालेत. आता सिक्युरिटीला १५-२० मिनिटं, म्हणजे २.३० ला फ्लाईट निघेपर्यंत २ तास तरी आहेत. काहीतरी बरं खाऊन घेता येईल." असा मनाशी विचार करता करता योगेशची सराईत नजर सिक्युरिटीच्या रांगांवर फिरली.

कंपनीच्या कामासाठी सारखं फिरावं लागत असल्यामुळे विमान प्रवास आता योगेशच्या अंगवळणी पडला होता. एअरपोर्टवर आला कि त्याच्यात 'अप इन द एअर' चा जॉर्ज क्लूनी संचारायचा जणू. सामान कोंबलेल्या भल्या मोठ्या बॅगा ओढणार्‍या लोकांना बघून आपल्या एका "कॅरी ऑन" मधे मावणार्‍या दुनीयेचा त्याला जास्तच अभिमान वाटायचा आणि त्यांच्या समोरून ती लीलया ओढत झपाट्याने निघून जाताना तो मनातल्या मनात हसायचा.

त्या दिवशीपण तो सिक्युरिटीमधून १० मिनिटात बाहेर पडला आणि झटकन बॅग घेऊन गेट कडे चालत निघाला. चालता चालता आजूबाजूच्या दुकानांवर नजर फिरवत होता पण आवडीचं असं काही दिसलं नाही. तसही पुढे मोठं फूड कोर्ट होतच. तिथे अजून खायचे ऑप्शन्स मिळतील म्हणून तो चालत राहिला. आठवडाभर भरपूर काम झालं होतं आणि आता त्याला घरचे वेध लागले होते. भरपूर काम संपवल्याचं समाधान आणि त्यानंतर मिळालेला थोडा मोकळा वेळ ह्यामुळे आज खुशीत होती स्वारी. हे असे शुक्रवार त्याला आवडायचे.

"आता विकेंडला काहीही विचार करायचा नाही. डायरेक्ट सोमवारी ऑफिसला पोचल्यावर काय ते पुढचं बघायचं. दोन दिवस नुसता आराम. दोन चार पिक्चर बघू घरी बसून. हम्म... मेडिटेरिनिअन, मॅक डी, फॅमिली पिझ्झा, पांडा एक्सप्रेस, सब वे, स्मूदी किंग. काय खावं बर आज? अशा वेळी हर्षा बरोबर असली कि बरं असतं. आज हे खाऊ; ते नको, असलं काय ते तिलाच सुचत. आपल्याला तसं काहिही चालतं. तिलाच फोन करावा का, काय खाऊ विचारायला? नाहीतरी प्लेन मधे बसल्यावर करायचाच आहे. संध्याकाळी घरी साधा स्वयंपाक असला तर बरं. आठवडाभर बाहेर खाऊन कंटाळा आलाय. पण १ पर्यंत मिटींग असणार होती नाही का तिची? नंतरच करुयात मग फोन. हम्म.. मग काय? सब वे इट इज!" असा विचार करून सब वे च्या रांगेत उभा रहायला योगेश वळाला आणि त्याच्या पोटात मोठ्ठा खड्डा पडला.

अबोली! किती वर्षांनी प्रत्यक्ष बघत होता तो तिला.. कॉलेजच्या शेवटच्या वर्षानंतर पहिल्यांदाच कदाचित. मनातल्या मनात त्यानी किती तरी वेळा असा 'अचानक भेटीचा' प्रसंग रंगवला होता. पण तसं प्रत्यक्षात घडलं तेव्हा मात्र तो हादरला! एवढ्या वर्षांनी आजही तिला बघताना त्याच्या काळजाचा ठोका चुकला. दोन क्षण काही म्हणजे काही सुचेना, मनात मात्र भावनांचा कल्लोळ उडाला. कॉलेजच्या त्या दिवसात तिला भेटायला जाताना वाटणारी उत्सुकता त्याला आज परत जाणवली. तेव्हा होणारी ती हृदयाची धडधड; कुणी ओळखीचं पकडणार नाही ना ह्याची भिती परत एकदा वाटली. तिचं खरतर अजूनही लक्ष नव्हतं त्याच्याकडे. त्याला एकदा वाटलं कि पटकन निघून जावं तिथून, पण पाय हलेचनात.

आणि मग त्याला जाणवलं कि ह्याच क्षणाची त्यानी वाट बघितली होती. ती भेटावी आणि अशी अचानक भेटावी असं त्याला खूप दिवसांपासून वाटत होतं. पण ती खरच अशी अचानक भेटेल असं कधी स्वप्नातही आलं नव्हतं. कधीतरी येणार्‍या तिच्या आठवणींनी ओला होणारा मनाचा कोपरा आता जणू तिच्या पावसात चिंब भिजत होता. किती वेळ उभा होता तो असा जागीच खिळून? फार फार तर दोन तीन सेकंद! पण त्या दोन तीन सेकंदात मनात पार उलथापालथ झाली होती.

आणि मग, तिचं त्याच्याकडे लक्ष गेलं. सेकंदाच्या अगदी शंभराव्या भागासाठीच तिच्या चेहर्‍यावर आलेला धक्का त्यालाही जाणवला पण लगेच ती ओळखीचं हसली. तोही हसला तसं त्याचं लक्ष गेलं तिच्या शेजारी ठेवलेल्या स्ट्रोलरकडे. तिचा लहान मुलगा त्यात झोपला होता.

ती बसली होती त्या टेबलापाशी तो गेला.

"हाय," ती हळूच म्हणाली.

कोणालाही भेटल्यावर आधी 'हाय' म्हणायची तिची सवय त्याला फार 'फॉर्मल' वाटायची. "रोज तर भेटतो आपण. आणि दिवसातुन दहा वेळा फोनवर पण बोलतो तरिही प्रत्यक्ष भेटल्यावर सुद्धा असं म्हणायची काय गरज आहे?", तो तिला म्हणायचा.

पण तरिही ती नेहमी 'हाय' म्हणायचीच. तो 'हाय' कधीच फॉर्मल नव्हता हे आज त्याला जाणवलं कारण आजच्या त्या 'हाय' मधे सुद्धा फॉर्मॅलिटी नव्हती.

"हाय, कशी आहेस?" हे विचारताना त्याला जाणवलं कि तो अजूनही थरथरत होता.

"मी मजेत. तू ?"

"मी पण छान आहे. हा ईशान ना?"

"हो."

"खूप गोड आहे. अजित नाही दिसते कुठे?"

"नाही.... मी ईशानला घेऊन डेन्व्हरला चाललीये, माझ्या मामीकडे."

"ओह!"

"तू?"

"मी कंपनीच्या कामासाठी आलो होतो. आज आता परत घरी.."

"नेहमी येतोस?"

"एका प्रोजेक्ट्साठी गेल्या महिन्यापासुन माझं तीन चार वेळा येणं झालं. हा प्रोजेक्ट संपला कि दुसरीकडे.... मी इथे बसलो तर चालेल?" त्यानी विचारलं.

"असा कधीपासून झालो मी? कधी कोणी मित्र भेटला तर असं कधीच विचारत नाही. तिच्याबरोबर असताना तर कधीच नाही.. आणि आज हे असं औपचारिक विचारणं? तिलाही ते जाणवलं असेल का?" योगेश मनातल्या मनात विचार करत होता.

"हो हो. बस ना. माझी फ्लाईट लेट आहे. त्यामुळे मला भरपूर वेळ बसायचय." ती सहज म्हणाली.

तो खुर्ची ओढून बसला.

"मनातली वादळं किती सहज लपवतात मुली! हिला मनातून माझ्यासारखच काही वाटत नसेल का?" बसता बसता त्याच्या मनात आलं.

"माझ्या फ्लाईटला पण बराच वेळ आहे. म्हटलं काहीतरी खायला घ्यावं आणि तू दिसलीस. व्हॉट अ को इंन्सिडन्स."

"हो ना." ती हसली.

आणि मग काही वेळ दोघही काही बोलले नाहीत. कदाचित अचानक "आपण हे काय करतोय" ह्या जाणीवेनी दोघांनीही अवघडल्यासारखं झालं होतं. तो नुसताच बघत होता आणि ती झोपलेल्या मुलाचं दुपटं नीट करत होती.

"तुझ्यासाठी काही खायला - प्यायला आणू?" त्याला विषय मिळाला!

"नको. थँक्स. आय अ‍ॅम फाईन" ती परत हसली.

ह्यावेळी त्यातली 'फॉर्मॅलिटी' त्याला जाणवली. आणि हेही जाणवलं कि हीच ती वेळ! आज नही तो कभी नही. एवढे दिवस मनात ठेवलेलं आज बोलूनच टाकूयात. काय व्हायचं ते होईल.

"अबोली...." तो एक सेकंद थांबला तसं तिनी थेट त्याच्याकडे बघितलं. "मला खूप दिवसांपासून तुझ्याशी बोलायचं होतं."

तिच्या चेहर्‍यावर आता अवघडलेपण आलं.

"आय नो, हे खूप भसकन होतय आणि तुला ऑकवर्ड वाटत असेल. पण खूप दिवसांपासून मला तुला हे सांगायचय आणि आज आपण हे असे अचानक भेटलोय. प्रत्यक्ष परत कधी भेटू माहिती नाही आणि हे मला फोनवर किंवा इमेल मधे लिहून सांगणं शक्य नाही. प्लीज, माझं ऐकून घेशील? हवं तर नंतर लगेच विसरून जा, पण मला बोलायचं ते बोलूदेत. आज नाही बोललो, तर संधी मिळूनही हे बोललो नाही ह्याचा सल राहिल माझ्या मनात."

"हं..." तिच्या चेहर्‍यावरचा अवघडलेपणा तसाच होता. पण आता ती त्याच्याकडे एकटक बघत होती.

योगेशनी एक मोठा श्वास घेतला.

"अबोली.... सॉरी! आय अ‍ॅम रिअली सॉरी."

** क्रमशः ***********************************

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users