साप

Submitted by धनुर्धर on 24 May, 2015 - 12:50

आभाळात सुर्याला ताप आला होता. त्याची धग जमीनीपर्यत जाणवत होती. रस्ते तापले होते. एखाद्या दगडावर पाण्याचे चार दोन थेंब जरी टाकले तरी, त्याची क्षणात वाफ होत होती. गरमीमुळे अंगावर कपडे नकोसे झाले होते. वारा पडला होता. हास्सऽऽ हूस्स करत पाटोळे गुरूजींनी दरवाजा आत लोटला व ते आत जाऊ लागले तोच फट् कन आवाज आला, पाठोपाठ गुरूजींची " आई ग ऽऽ" अशी किंकाळी एकू आली. त्यांचे डोके चौकटीला धडकले होते. इथे येऊन त्यांना महिना झाला होता. महिन्याभरात किमान दहा वेळा तरी त्यांचे डोके या चौकटीवर आपटले होते. दोनदा टेंगळे देखिल आली होती. एवढ्यावेळा देवळाच्या पायरीवर जर डोके आपटले असते तर देव प्रसन्न झाला असता पण, घरमालकाला पाझर फुटत नव्हता. ती चौकट काय बदलत नव्हता.
एका हाताने आपले डोके चोळत व मनाल्या मनात घरमालकाचा उध्दार करत गुरुजी आत गेले. माठामध्ये तांब्या बुडवून गटा गटा पाणी प्याले. पाटोळे बाई स्वयपांकात गुंतल्या होत्या. गुरुजी न्हाणीत गेले व, हात पाय न धुताच परत आले. न्हाणीत पाणीच नव्हते. "आज पाणी आणले नाय काय?"
गुरूजींनी बसता बसता एक प्रश्न टाकला. त्याला "हूं" एवढच उत्तर आलं.
"मंदा आली नाय का अजून?"
ह्या प्रश्नाचे उत्तर मानेनच नाही असं आलं. अशी उत्तर मुलांनी परिक्षेत दिली असती तर नापासच केलं असत एकएकाला! गुरूजींनी मनाशीच असा विचार करून टेबलावर पडलेला पेपर उचलला व ते पुढच्या खोलीत वाचत बसले. तेवढ्यात घामाघूम झालेली मंदा आत आली. "काय उनं पडलय" मंदा खुर्चीवर बसता बसता म्हणाली

. "पारा चाळीस डीग्रीवर गेलाय." गुरूजी आपला चश्मा सावरत म्हणाले. "यंदा खुपच कडक उन्हाळा पडलाय" मंदा म्हणाली. दोघांचे बोलणे होते न होते तेवढ्यात "सापऽऽ सापऽऽ " अशी पाटोळे बाईंची किंकाळी एकू आली. मंदा आणि गुरुजी स्वयंपाक घराच्या दिशेनं धावले. आत जाऊन पाहतात तो काय, एक हाताच्या मनगटा च्या जाडी एवढा एक साप भिंत आणि पत्राच्या मधल्या फटीमध्ये शिरत होता. मंदा आणि गुरुजींना फक्त त्याची शेपटीच दिसली. डोळ्याच पात लवत न लवतं तोच तो भिंतीवर कुठेतरी नाहीसा झाला. आता मंदानेही किंचाळी फोडली तर, गुरूजींची बोबडीच वळाली. तिघेही घराबाहेर आले व सापऽऽ सापऽऽ म्हणून ओरडू लागले. मंदाच्या मागे मागे आलेला डिगा गुरूजींच्या घराजवळ घुटमळून नुकताच परत चालला होता तोच त्याला ह्यांचे ओरडणे एकू आले. तो लगेच माघारी फिरला. तो पर्यंत देवळात पत्ते खेळत बसलेले सगळे उठून पळत आले. जो तो विचारू लागला "काय झालं? "
"सापऽऽ सापऽऽ" गुरुजी कस तरी म्हणाले.
"कुठय साप?" आबा पुढे येऊन म्हणाला. आबा म्हणजे गावातील पैलवान गडी, साप मारायला तरबेज! गावात कुठही साप निघाला की, पहिले बोलावणे आबाला जाई.
"त्या तिथं स्वयंपाक घरात" गुरुजी खोल गेलेल्या आवाजात म्हणाले. "ये काठी आणं रं " मागच्याला सांगून आबा आत शिरला, पाठोपाठ दोन चार जण त्याच्या मागोमाग आत गेले. इकडे डिगा गुरुजींना धीर देऊ लागला. "काय काळजी करू नका, आत्ता साप सापडेल". असे म्हणत त्याने मंदाकडे एक कटाक्ष टाकला. "तरी मी तुम्हाला सांगत होते या गावात बदली नका घेऊ म्हणून पण माझं ऐकतयं कोणं" बाई गुरूजींकडे रागाने बघत म्हणाल्या. "आता मला काय माहीत इथं साप येईल ते! अन् मनासारख्या ठिकाणी बदली करून घ्यायला माझा सासरा काय शिक्षणमंत्री हाये का?" गुरुजी नी बोलता बोलता टोमणा मारला. "शिक्षणमंत्री नसला तरी पंचवीस एकर वाला बागायतदार आहे आणि चांगले वाड्यात राहतात तुमच्यासारखे भाड्याच्या घरात नाही रहात " बाईंनी जोरदार प्रतित्तुर दिले. "बरं ते नंतर बघू! साप पकडू दे पहिला." गुरूजींनी नेहमीप्रमाणे क्षरणागती पत्करली. इकडे डिगा मंदाशी ओळख काढण्याचा प्रयत्न करू लागला. "आपण कॉलेजला जाता?"
"हो" मंदा कावर् या बावर् या नजरेने आत पाहत म्हणाली. "कितवीत आहात "
"S. Y. B com" मंदा त्रासीक नजरेनं त्याच्याकडे पहात म्हणाली. तेवढ्यात आतून गलका एकू आला "दिसलाऽऽ दिसलाऽऽ" त्या बरोबर घोळक्यातली अजून दोनचार जण आत घूसले. पुन्हा पळापळी सुरु झाली. ज्याला साप दिसला तो बाहेर आला. लोक त्याच्या भोवती जमा झाले. "आरं आस्सल नाग हे नाग! मी पाहिला तर! काळा कुळकुळीत हाये." लोकांची उत्सुकता वाढली. गावात बातमी गेली होती. बघ्यांची गर्दी वाढली. तेवढ्यात डिग्यान अपुर्ण राहिलेली बातचीत पुन्हा सुरू केली. "लय आवघड असल ना ते एन वाय का काय ते......" पुढचं काय त्याला आठवेणा. "अहो इथं चाललयं काय? आणि तुम्ही प्रश्न काय विचारताय मुर्खासारखे" मंदा त्याच्यावर खवळली. डिगाने इकडे तिकडे पाहून कुणी एकले तर नाही ना याची खात्री करून घेतली व तो मुकाट उभा राहिला. तेवढ्यात पुन्हा मागच्या बाजून गोंगाट एकू आला. पुन्हा कुणाला तरी साप दिसला होता. पुन्हा लोक त्याच्या भोवती जमले. "लय मोठ्ठं जनावर हाये लेका! अगदी पिवळं धम्मक! पाहूनच गार पडलो. बहुतेक धामन आसणारं!" बघणार् याने माहिती दिली. पहिल्याला नाग दिसला होता आत्ता ह्याला धामन दिसली. लोकांनाही कळेना नक्की काय चाललंय ते. तेवढ्यात धाडकण! काही तरी पडण्याचा आवाज आला. गडबडीत कुणाचा तरी धक्का भांड्याच्या कपाटाला लागला होता. सगळी भांडी खाली पडली होती. बाईंचा जीव वर खाली झाला. काठ्या आपटल्याचे आवाज झाले. "हाणाऽऽ हाणाऽऽ" असा गलका झाला. "आत्ता काय सापाच खर नाय!" डिगान पुन्हा संवाद साधण्याचा प्रयत्न केला. ह्या वेळेस मंदाने अश्या नजरेने त्याच्याकडे बघितले की, तो तिथून पसारच झाला. काठ्यांच्या आवाजामुळे आणि आरडाओरडी मुळे लोकांना वाटले साप मारला. सगळ्यांचे लक्ष दरवाजाकडे लागले. पाऊले वाजली आणि मेलेला उंदीर हातात धरून आबा बाहेर आला. लोक हसायला लागले तसा आबा खेकसला "दात काढायला काय झालं? अरं ह्या उंदरामुळच साप घरात शिरत्यात त्यामुळ ह्याला पहिला ठेचला."
"बरोबर आहे त्यांचे उंदरामुळे शेतीच खूप नुकसान होते." लगेच गुरूजींनी माहिती द्यायला सुरवात केली. "उंदीर हा प्राणी धान्याची खूप नासाडी करतो. त्याची मादी वर्षभरात . . " ह्या ठिकाणी गुरूजींना नक्की आकडेवारी आठवेना. "वर्षभरात बर् याच पिल्लांना जन्म देते. साप उंदरांना खातात म्हणून साप शेतकऱ्यांचे मित्र आहेत."
"मग मित्राला पाहून घाबरलात का?" गर्दीतून कोणीतरी म्हणाले. गर्दीत खदा खदा हसू लागली तशी गुरुजीनी आपली शिकवणी बंद केली व ते साप पकडण्याची वाट पाहू लागले. बराच वेळ शोधाशोध केली पण साप काही सापडेना. लोकांचा उत्साह कमी होऊ लागला. गर्दी पांगू लागली. एक एक जण काढता पाय घेऊ लागला. साप सापडत नसल्यामुळे आबा वैतागला होता. त्याने काठी हातात घेतली आणि तो पत्रा आणि भिंतीच्या फटीमध्ये ठोसू लागला. बराच वेळ झाला गुरूजींना धीर धरवेना ते आत जायला निघाले. इकडे काठीने ढोसलल्यामुळे साप चिडून बाहेर आला. आतल्यांची पळापळ झाली. आबानी काठी मारायला उगारली नि मागच्या बाजूने गुरुजी आत आले. काठी त्यांच्या डोक्यात बसली. "अगं! आई गं! मेलोऽऽ मेलोऽऽ " ओरडत मास्तर खाली बसले. आरडाओरडीमुळं आबाचा नेम चुकला. काठी सापाएवजी दुसऱ्या च कुणाच्या तरी पायावर पडली, तोही किंचाळला. गडबडीत साप सळ सळ करत दरवाजातून निघून बांबूच्या बेटात पसार झाला.
साप निघून गेला होता. मारणारेही निघून गेले होते. मंदा सापाच्या भीतीने मागे जावे की न जावे या विचारात होती. गुरुजी आपलं सुजलेल कपाळ चोळीत बसले होते आणि बाई तळलेल्या भज्याच्या प्लेटमध्ये एक भजं शिल्लक न ठेवणार् या गावकर् यांच्या नावाने बोटं मोडीत बसल्या होत्या.

. . . . . . . धनंजय . . . . . . .

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users