दीक्षा

Submitted by धनुर्धर on 18 May, 2015 - 09:11

. . . . . . . . दीक्षा . . . . . . .
आयुष्यात अश्या काही घटना घडतात की त्या घडत असताना आपण त्या वेळेस गंभीर असतो. पण त्या घडून गेल्या नंतर जेंव्हा आपण त्याचा विचार करू लागतो. तेंव्हा आपल्याच वागण्याचे आपल्याला हसू येते. अशीच एक घटना आमच्या बाबतीतही घडली. नितीन, सागर, मंगेश आणि मी अगदी लहानपणापासूनचे म्हणजे अगदी लंगोटी सुद्धा घालत नव्हतो तेंव्हा पासूनचे मित्र . कायम एकत्र . गावात आम्हांला चौकडी म्हणत असत. फिरणे, खेळणे, गप्पा मारणे सारे एकत्रच चालत असे. पण गेले काही दिवस नितीनच्या व सागरच्या वागण्यात बदल झाला होता. प्रत्येक वाक्याची सुरवात शिवीने करणारा नित्या आजकाल कुठल्यातरी बापुजींचे स्मरण करीत होता. तर नेहमी खो खो हसणारा सागर चेहरा गंभीर करून बापूजींची स्तुतीपर भजने आपल्या भसाड्या आवाजात गात होता.

. नदीजवळ एक मोठ उंबराच झाड होत. त्या झाडाखाली एक बसण्यासाठी बाकडं टाकल होत. तो आमचा बसण्याचा आड्डा होता. रोज तिथ हसण्या खिदळण्याचे आवाज यायचे मात्र आज वातावरण गंभीर होतं. "आयला आजपतुर आयुष्य वाया घालावलं लेका" नित्या तोंडावर पश्चातापाचा भाव आणून म्हणाला. "ए आरं! शिव्या द्यायच्या नाय म्हणून ठरलंय ना आपलं ? मग!". सागर म्हणाला.
"च्यामायला लक्षात च राहत नाय माझ्या बापुजी मला माफ करा". स्वतःच्या गालावर हाणत नित्यान दिलगीरी व्यक्त केली.
"ए आरं काय चाललय तुमचं? कोण हे बापुजी?" मी विचारलं.
"तुला बापुजी माहीत नाय!" माझ्याकडे एखाद्या अपराध्याकडे बघावे तसे बघत सागर म्हणाला.
"आरं बापुजी म्हजे कृष्णाचा आवतार हाये. लय मोठा संत. किती लोक त्यांची पुजा करत्यात."
" त्यांनी मेलेल गाढवबी जिवंत केलं." नित्यान माहिती दिली.
"तुला कोणी सांगितलं ".
"सद्यान" दोघेही एकासुरात म्हणाले.

नित्याकडून कळलेल्या माहितीनुसार सदा साने हा आमच्या गावातील बापुजींचा मोठा भक्त होता. मनाच्या शक्तीद्वारे तो कुठूनही बापूजींशी संपर्क साधू शके. गाढव जिवंत केल्याची कथा आंतरीक शक्तीद्वारे बापुजींनीच त्याला सांगितली म्हणे. आणि संध्याकाळी त्याने बापुजींच्या आरतीसाठी व प्रसादासाठी सगळ्यांना बोलावले होते. खाण्याचा विषय निघाला की लगेच मंगेश चर्चेत सामील झाला. गावात लग्न, पुजा, बारसे, दहावे, तेरावे कोणतेही कार्य असो पंगतीला हा दिसणारच. " कुठं बोलावलय?" मंगेश.
"त्याच्या घरी आणि कुठं".
संध्याकाळी सदाकडे भेटण्याचे ठरून बैठक मोडली .
संध्याकाळी चौघे मिळून सदाकडे गेलो. दरवाजा उघडताच धूपाचा सुगंध सगळ्यांच्या नाकात शिरला. समोर एका भिंतीवर एक तसबीर लावलेली होती. तिच्यात दाढीमिश्या वाढलेला, गळ्यात बर्याच प्रकारच्या माळा असणार्या माणसाचा फोटॊ होता. त्याने एक हात आर्शिवादासाठी पुढे केला होता.तसबीरी पुढे उदबत्ती लावलेली होती. काही सुकलेली फुले होती. बर्याच दिवसापासून पडलेली असावीत बहुतेक. आम्ही गेलो त्यावेळी आरती चालू झाली. सदा आरती म्हणत होता. मागे तीन चार जण टाळ्या वाजवत होते.
" जय देवा जय देवा जय बापु राया!
आरती ओवाळीतो दाखवी मज माया!
जय देव जय देव.
उकीरड्या वरी गाढव मेले
हात फिरवूनी जिवंत केले
चमत्कारी म्हणूनी लोक बोलीले
बापुजी हे नाव प्रसिद्ध झाले. जय देव ॥
सदरा नि पंचा हाच गणवेश
डोक्यावरचे वाढवले केस
दाढी आणि मिशी दिसे झकास
सदा म्हणे सुखविलास दास।जय देव" आरती सदानेच रचली होती. बहुतेक !
आरती झाल्यानंतर प्रत्येक जण तसबीरी पुढे जाऊन नमस्कार करू लागला व समोर ठेवलेल्या दानपेटीत पैसे टाकू लागला. मी ही पुढे झालो दर्शन घेतले. खिश्यात दहा रूपये होते . तेवढे पेटीत टाकले.

सद्यानी चार खडीसाखरेचे दाणे हातावर टेकवले. दहा रूपयाचे ते चार दाणे काही गोड लागले नाहीत.
कोणाची नजर नाही असे पाहून मंग्या पेटीत काहीच न टाकता फक्त पाया पडला.पण सदाच्या चाणाक्ष नजरेतून तो सुटला नाही त्याला खडीसाखरेच्या दोन दाण्यांवर समाधान मानावे लागले.
आरती संपल्यानंतर आम्ही पारावरती आलो. सदाही आमच्या बरोबर होता. पारावरती सदाचे बापुपुराण सुरू झाले . बापुंनी कसा आवतार घेतला. किती चमत्कार दाखवले. किती ठिकाणी आश्रम स्थापन केले. अनेक मोठे नेते आभिनेते बापुजींचे पाय कसे धरतात. इत्यादी त्याने तपशीलवार सांगितले. मधेच त्याचा भक्तीचा कड आनावर होई व तो आभाळाकडे बघत टाहो फोडी "प्रभोऽऽ"त्यावेळी त्याचे दोन्ही हात पसरलेले असत.
"अशा परमपुज्य बापुजींची कृपादृष्टी माझ्या सारख्या पामरावर पडली आणि माझे आयुष्य धन्य झाले". सदा बोलला. तो ' पामरावर' म्हणाला की 'वानरावर' हे मात्र मला नीट कळाले नाही.
"आयुष्याचे सोने करायचे असेल तर बापुचरणी लीन व्हा" बोलता बोलता सदाने पुन्हा आकाशाकडे तोंड करून त्याचे नेहमीचे 'प्रभो' केले. नेमके त्यावेळी वरून पांढरा चिपचिपा पदार्थ त्याच्या तोंडावर पडला. झाडावर पक्षांची घरटी होती. त्यांच्यापैकी कुणीतरी सदाच्या हाकेला 'ओ' दिली होती. आम्हाला हसू आले. "हसू नका बापुजी कशाही स्वरूपात आर्शिवाद देतील काही सांगता येत नाही". आपल्या तोंडावरील बापुजींचा आर्शिवाद पुसत सदा म्हणाला.
"परवा बापूजी आपल्या जिल्ह्यातील फुलगावच्या आश्रमाच्या ठिकाणी येणार आहेत. तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. तिथे तुम्हाला स्वतः बापुजी दीक्षा देतील. तेंव्हा तुम्हाला जर यायचे असेल तर प्रत्येकी १५० रूपये फक्त जमा करायचे बास!
बाकीच मी बघून घेईन. १५० रूपयात आयुष्याच कल्याण होइल तुमच्या"

सदा आत्मविश्वासाने बोलला. "च्या आयला दिडशे रूपयात कल्याण! हा तर मटकाच लागला राव". नित्या बोलला. नाईलाजास्तव आम्हालाही होकार द्यावा लागला. दुसर्या दिवशी दिडशे रूपये देण्याचे कबूल करून आम्ही घराकडे निघालो.
"दिडशे रूपयात हाँटेलात काय काय खायला मिळल रं?" जाता जाता मंग्या म्हणाला. त्याला कोणीच उत्तर दिले नाही. दुसर्या दिवशी नितीन व सागरच्या हट्टामुळे आम्ही सर्वानी प्रत्येकी दिडशे रूपये सदाकडे सुपुर्द केले. "उद्या तुमचा भाग्योदय होणार. सकाळी ठिक ६.३० ला आपण निघणार आहोत". एवढ बोलून सदा गुप्त झाला. दुसर्या दिवशी आम्ही सकाळी ं६.३० ला बस स्थानकावर हजर तर सदाचा पत्ताच नाही. मला आमच्या दिडशे रूपयांची काळजी वाटू लागली. सुमारे दोन तास वाट पहायला लावून सदा उगवला. "जरा ध्यान करत होतो त्यामुळ उशीर झाला". सदा जांभई देत बोलला. त्याच्या अवतारावरून त्याने अंघोळ केली नसावी हे माझ्या लक्षात आले पण त्यालाही काही आध्यात्मीक कारण असावे असे समजून मी गप्प बसलो. आम्ही गाडीत बसलो. गाडी सुरु झाली. सदा , नित्या व सागरच्या पुन्हा बापुजींवरच्या गप्पा सुरु झाल्या. सदाने पुन्हा आपले हात पसरून व तोंड आकाशाकडे करून प्रभो चा टाहो फोडला. तशी समोरच्या बाकावर बसलेलं एक जोडप दचकलं. विचित्र नजरेन त्याच्याकडे पाहू लागलं. बोलता बोलता सदान पुन्हा एकदा 'प्रभो' केला. आता मात्र त्या झोडप्याचा धीर संपला. ते बाकावरून उठून गेले व पुढच्या स्टॉपवर उतरले. आम्हाला बसायला ऐसपैस जागा झाली. तिकीट सदाने काढली. जशी जशी गाडी पुढे जाऊ लागली. तसा तसा मंग्याचा घोरण्याचा आवाज वाढू लागला. मी खिडकीतून बघत टाइमपास करू लागलो. तो पर्यंत आणखी दोघे तिघे सदाच्या गप्पात सामील झाले होते. तास दिड तास प्रवास केल्यानंतर गाडी स्टेशनमध्ये आली.

आम्ही गाडीतून उतरलो.
जवळपास ११ वाजत आले होते. बापुजींचा आश्रम असलेले फुलगाव इथून वीस किलोमीटर होते. सुदैवाने जायला बस होत्या. आम्ही बस मध्ये चढलो. गाडीत गर्दी खूप होती. आम्हाला बसायला जागा मिळाली नाही. कंडक्टर तिकीट काढू लागला. "तिकीट! तिकीट" ओरडत तो आमच्या जवळ आला. पैसे सदाकडे होते. पण सदा मख्खपणे दुसरीकडे बघत राहिला. कंडक्टर निघून गेला. सदाने नेहमीचे 'प्रभो' केले यावेळेस मात्र त्याला बर्याच बाकावरून प्रतिसाद आला. गाडी बापुजींच्या भक्तांनी भरली होती. अर्ध्या पाऊण तासात गाडी आश्रमाजवळ पोहचली. आम्ही गाडीतून उतरलो. आश्रमाकडे जाऊ लागलो. गर्दी खुप होती. आश्रमात पोहचलो. विस्तीर्ण परिसरात आश्रम पसरला होता. सर्व सुखसोयींनी युक्त अशी इमारत होती. समोर भव्य मंडप टाकला होता. जिकडे तिकडे बापुजींची पोस्टर्स लावली होती. स्पिकरवर बापुजींची स्तुतीपर भजने चालू होती. मंडपात जायला एका बाजूला 'एन्ट्री' होती. तिथे भक्तांची रांग लागली होती. आम्ही रांगेत उभे राहिलो. रांग हळूहळू पुढे जाऊ लागली. मंडपाच्या दरवाजावर एक दानपेटी मांडली होती. त्यावर बापुजींचा एक फोटो ठेवला होता. आत जाणारा प्रत्येक जण दानपेटीत पैसे टाकत होता. मी ही वीस रूपये टाकत आत प्रवेश मिळवला. बाकीच्यांनाही पैसे द्यावे लागले. वीस रूपये गेल्याने मंगेशचा चेहरा पडला होता. तेवढ्यात दीक्षा घेणार्यानी मंडपाच्या उजव्या कोपर्यात जमण्याची सुचना स्पीकरवरून करण्यात आली. आम्ही तिथे गेलो. जाताना अनेक वेळा सदाच्या ओळखीचे लोक भेटत होते. प्रभोचा गजर करत गळ्यात पडत होते. दीक्षेच्या ठिकाणी पोहचलो. दीक्षा घेणार्यांसाठी एक स्वतंत्र मंडप होता. त्याला चारही बाजूने पडदे लावले होते. आम्ही आत जाऊ लागलो तसे आम्हाला द्वारपालाने थांबवले.
"काय पायजे?"

"दीक्षा पाहिजे" भिक्षा मागितल्या सारखे नित्या बोलला.
"सामान आणलं का?" द्वारपाल.
"कसल सामान"
त्याने समोर बोट दाखवले.
तिथे एक दुकान होते. वर बोर्ड होता. 'दीक्षा का सामान' आम्ही सदाकडे पाहिलं . सदा तिथून निसटला होता. नित्या त्याच्या नावांन शंख करू लागला. मी त्याला आवरले. आम्ही त्या दुकानात गेलो. दीक्षेच्या साहित्याची चौकशी केली. एक संच ५०० रूपयाला होता. आपण दीक्षा घ्यायला आलो की शिक्षा घ्यायला तेच मला कळेना. शेवटी मी आणि मंगेशनी माघार घेतली. नितीन आणि सागर ने दोघांसाठी दोन संच घेतले. चप्पल स्टॅन्डवर चप्पल काढून ते आत गेले. आम्ही बाहेरच रेंगाळत राहिलो. मंगेश तेवढ्यात मंडपात काही खाण्याजोगे काही मिळते का ते पाहून आला. सुमारे एक तासानंतर नितीन व सागर बाहेर आले. त्यांचा अवतार पाहून आम्हाला हसू आवरेना. त्यांच्या डोक्यावर एकही केस शिल्लक नव्हता. गळ्यात बापुंचा फोटो अडकवला होता. खांद्यावर झोळी होती. खिश्यात होते तेवढे पैसे दक्षिणा म्हणून द्यावे लागले होते. चेहरे पडले होते. आम्ही आमचे हसू दाबले. चप्पल स्टॅडकडे चप्पल आणायला गेलो तर यांच्या चपलां गायब झाल्या होत्या. नितीने हळूच एक चांगली चप्पल बघून ती आपल्या पायात सरकवली. सागरने त्याचे अनुकरण केले. आम्ही मंडपाबाहेर आलो. नित्याने सदाला शिव्यांची लाखोली वाहीली.
सागरने गळ्यातील फोटो काढून फेकून दिला. नितीनच्याही गळ्यातला फोटो ओढला व फेकला. बापुजींच्या भक्तीची नशा उतरली होती. आम्ही तिथून निघालो. वाटेत एक उसाचे गुर्हाळ दिसले. खुप तहान लागली होती. आम्ही पाणी पिण्यासाठी तिथे गेलो. दोन दोन ग्लास पाणी पोटात रिचवले तेंव्हा बरे वाटले. तो पर्यंत आम्हाला गिर्हायिक समजून ऊसवाल्याने ऊस गाळायला सुरूवात केली होती. पाणी पिऊन आम्ही बाहेर निघालो.

तसे आम्हाला ऊसवाल्याने आडवले. "किती गल्लास पाहिजे?" ऊसवाला ग्लास पुसत बोलला. "नाय आम्हाला फक्त पाणी प्यायच होतं" सागर बोलला.
"मग हा गाळलेला रस काय करू"
ऊस वाल्याचा चेहरा रस काढून टाकलेल्या ऊसाच्या चिप्पाडा सारखा झाला.
"पण आम्ही कुठ ऊस गाळायला सांगितलं"
"ते काय मला माहित नाय रस प्यावाच लागलं माझ नुकसान मी करून घेऊ काय?" ऊसवाला दरडावणीच्या सुरात बोलला. आम्ही नाईलाजाने ओठांना ग्लास लावले. व ४० रूपये मोजले. व चरफडत तिथून निघालो. नित्याने तेवढ्यात सदाच्या नावाने चार दोन शिव्या फेकल्या. आम्ही बसमध्ये चढलो. तोबा गर्दी होती. बसायला जागा मिळाली नाही. उभ्यानेच प्रवास करावा लागणार होता. बस सुरू झाली. कंडक्टर "तिकीट ! तिकीट " करत पुढे आला. मी पैसे काढण्यासाठी खिशात हात घातला तेवढ्यात नित्याने माझा हात दाबला व मला शांत राहण्याची खूण केली. कंडक्टर निघून गेल्यावर मी विचारले " तिकीट का काढून दिले नाहीस?"
"येताना तरी त्या सद्यान कुठं काढली होती टिकीटं +++++ लेकाचा" नित्यान पुन्हा त्याच्यावर शिव्यांचा पाऊस पाडला. गाडीने वेग घेतला उभ राहून माझे पाय दुखत होते. माझी नजर मोकळी जागा शोधत होती. सदासारखे 'प्रभो'करावे असे मनात आले पण तो विचार मी झटकून टाकला. बस स्टेशनला आली. आणि व्हायचे तेच झाले. बसच्या दोन दरवाजातून दोन तिकीट चेकर तिकीटे चेक करून लोकांना खाली सोडू लागले. नितीन आणि सागर गर्दीचा फायदा घेऊन सटकले. मी आणि मंगेश मात्र सापडलो. आम्हाला मागच्या बाकावर बसवले. जमलेली गर्दी एखाद्या गुन्हेगाराला पहावे तसे आमच्याकडे पाहू लागली. "प्रत्येकी ५० असा १०० रूपये दंड लावा ह्यांना फुकट प्रवास करतात साले!" एक साहेब गरजला. मी चुपचाप शंभराची नोट त्यांच्याकडे दिली. तेवढ्यात नितीन व सागर तिथे हजर झाले.

"काय झालं साहेब" नितीनने पुढे होत विचारले.
"विनातिकीट सापडलेत. चांगला दंड लावला". साहेब आमच्याकडे बघत बोलला.
"जाऊ द्या साहेब एवढी वेळ माफ करा आमचे मित्र हायेत ते" नितीन काकूळतीला येऊन बोलला.
"म्हणजे तुम्ही यांच्या बरोबर होता काय?" साहेबाने बेरकीपणे विचारले. "हो आम्ही एकत्रच आलो होतो. आम्ही एकाच गावचे अगदी लहानपणापासून चे मित्र हाओत." साहेबांच रोख लक्षात न आल्यान सागरने धांदरटपणे माहिती दिली.
"अरे या दोघाना पण घ्या रे!" साहेबांनी इशारा करताच त्या दोघांना आमच्यात सामील करण्यात आले. दंडाची रक्कम चौपट झाली . दंड घेऊन आम्हाला सोडण्यात आले. आता घरी कसे जायचे हा प्रश्न आमच्यापुढे उभा राहिला. थोडेसे इकडे तिकडे फिरल्यानंतर आम्हाला आमच्या गावाकडे जाणारी एक जीप भेटली. आम्ही मागच्या हौद्यात बसलो. जीप भरल्यामुळं ड्रायव्हर खुश झाला. भरधाव वेगान जीप निघाली. जसे जसे गाव जवळ येऊ लागल तशी मनात धाकधुक वाढू लागली. आमच्या कोणाजवळही पैसे नव्हते. आम्ही एकमेकांना खूण केली. गाडी गावच्या वेशीजवळ थांबली. आम्ही खाली उतरलो. ड्रायव्हरला काही कळायच्या आत गावाकडे पळत सुटलो. मागून एक दगड व चार पाच शिव्यांचा आवाज आला पण मागे वळून पाहिले नाही.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी गप्पा मारत बसलो होतो. परवापर्यत बापुजींची स्तुती करणारे नितीन आणि सागर आज त्यांना शिव्या घालत होते. हे लोक कसे लुबाडतात ते आम्हला सांगत होते. तेवढ्यात त्यांना नदीच्या बाजूने सदा येताना दिसला. त्याला पाहताच नितीन आणि सागर चा रागाचा पारा चढला. सागरने धावत जाऊन त्याला पकडले. नित्याने त्याला काही बोलू न देता त्याच्या कमरेत लाथ मारली. वेदनेन सदा विव्हळला "प्रभोऽऽ"

. . . . . . . . . धनंजय . . . . . . . . . .

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बापरे Happy