एपिक चॅनेल

Submitted by स्वप्ना_राज on 22 January, 2015 - 09:50

"एकांत" ह्या एपिक चॅनेल वर दर गुरुवारी रात्री १०:३० वाजता (रिपिट टेलिकास्ट - शुक्रवार रात्रौ ८:३०) लागणार्‍या कार्यक्रमामध्ये भारतातल्या एके काळच्या गजबजलेल्या पण आता ओसाड झालेल्या जागांबद्दल माहिती देतात. हा कार्यक्रम बहुतेक नोव्हेंबर २०१४ पासून सुरु झाला असावा कारण हे चॅनेलच मुळी तेव्हा सुरु झालं. माझे सुरुवातीचे काही भाग चुकले असावेत. राजस्थानमधलं भानगढ, त्रिपुरातलं उनाकोटी आणि गुजरातमधलं लखपत ह्यावरील भाग मी पाहिले. आणि त्यावरची माहिती 'संथ चालती ह्या मालिका' इथे पोस्ट केली. ती कायमस्वरुपी साठवून ठेवावी अशी सूचना झाली म्हणून हा धागा काढला.

हे चॅनेल इथे उपलब्ध आहे - https://docs.google.com/spreadsheets/d/19tI8WWcHdygXnFWpwtOwRrco61eS-1GhemitlPpLVWo/pubhtml?gid=0&single=true

कार्यक्रमांचं वेळापत्रक - http://www.epicchannel.com/schedule

ह्या बीबीवर पुढील एपिसोडस ची माहिती आहे:

एकांतः
१. लखपत, २. उनाकोटी ३. कित्तूर किल्ला ४. न्यारमा ५. अंदमान सेल्युलर जेल ६. विलासगढ ७. हळेबिडू
८. शेखावतीमधलं रामगढ ९. काश्मीरमधलं मार्तंड मंदिर १०. शिवसागर - अहोम साम्राज्याची राजधानी ११..गुजरातचं चंपानेर १२. श्रीनगरच्या हरीपर्बत वरचा किल्ला १३. लडाखचा 'चिकटन' किल्ला
१४. अंदमान निकोबारचं रॉस आयर्लंड १५. जंजिरा किल्ला १६. लखनौ रेसिडेन्सी १७. विष्णुपुर १८. विजयदुर्ग
१९. बटेश्वर २०. हंपी २१. कुलधरा २२. कुंभालगढ २३. असिरगड २४. बिजापूर २५. कांगडा फोर्ट (हिमाचल प्रदेश)
२६. जागेश्वर २७. रामनगर २८. लेह पेलेस २९. किल्ला मुबारक ३०. मेहरोली आर्किओलॉजिकल पार्क
३१. तलक्कड, मालंगी आणि वोडीयार राजे

देवलोक - सीझन १:
१. रंग २. जीवजंतू ३. स्वर्ग नरक ४. शक्ती ५. गणपतीबाप्पा ६. देवदेवतांची शस्त्रं ७. देवतांची वाहनं ८. गंगा ९.तीर्थ १०.युग ११. देवांचं अन्न १२. सृष्टीची रचना १३. दिशा १४. देवी-देवतांचे विवाह १५. देवी-देवतांचे रूप बदलणं
१६. विष्णूचे अवतार, १७. ग्रह-नक्षत्र १८. पुराण, वेद ह्यातील वनस्पती १९. पूजा आणि विधी

देवलोक चा सीझन २ सुरु होणार आहे. त्याचा वेगळा धागा काढून इथे लिंक देईन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अन्जू, माझी एव्हढी चांगली मेमरी असती तर आणखी काय हवं होतं Happy अग नोटस काढून मग लिहिते मी. असो. सोमवारचा एपिसोड जन्जिरा किल्ल्यावर होता. त्याची माहिती टाकते. कालचा म्हणजे मन्गळवारचा एपिसोड भानगढ वर होता आणि आधीचा शुक्रवारचा उनाकोटी वर. हे एपिसोड्स आधी पाहिले होते म्हणून परत पाहिले नाहीत. आज कुठला आहे ते पहाते.

एकांतचा सोमवारचा एपिसोड होता जंजिरा किल्ल्यावर. १६ व्या शतकात बांधला गेलेला हा किल्ला सुमारे २२ एकरात पसरलेला आहे. किनार्यापासून १.५ किमी दूर असूनही ओहोटीच्या वेळेस सुध्दा पाण्यातून त्याच्यापर्यंत चालत जाता येत नाही कारण तेव्हाही पाण्याची खोली ४० फुट इतकी असते. ५ शतकं झाली तरी समुद्राच्या मधोमध हा किल्ला आजही उभा आहे.

किल्ला कसा बांधला गेला ह्याचा इतिहास मोठा मनोरंजक आहे. १४९० च्या सुमारास इथे फक्त एक दगड होता. कोळ्यांना समुद्री डाकूंपासून संरक्षण हवं म्हणून रामा कोळी नावाच्या कोळ्याने लाकडाचं बांधकाम केलं आणि त्याला नाव दिलं मेढेकोट. अहमदनगरच्या निजामशहाने आपला सुभेदार पिरम शहाला ३ जहाजांसोबत आक्रमण करायला इथे पाठवलं. त्यांनी समुद्र खवळला आहे, आमच्याकडे किमती माल आहे असं सांगत रामा कोळ्याकडे आश्रय मागितला. त्याने त्यांना एक रात्र राहायची परवानगी दिली. त्या रात्री त्यांनी त्याला खूप दारू पाजली. निजामशहाचे लपलेले सैनिक बाहेर आले आणि त्यांनी कोळ्याच्या सैनिकांचा पराभव केला. जजीरा म्हणजे सिद्द्याच्या अरबी भाषेत मध्ये बेट. त्याचा अपभ्रंश म्हणजे जंजिरा.

सिद्द्यांच्या बुरहानखानने ही लाकडी तटबंदी तोडून दगडाची बनवली आणि इथे सिद्द्याचं राज्य सुरु झालं. हे लोक मूळचे एबिसिनिया, इथिओपिया वगैरेकडचे. त्यांना गुलाम म्हणून भारतीय राजांना विकण्यात आलं होतं. पण अंगच्या गुणाच्या बळावर ते वर चढत गेले आणि त्यांनी जंजिऱ्यावर राज्य स्थापित केलं. तिथून ते समुद्रातली वाहतूक नियंत्रित करू लागले.

असं म्हणतात की इथे एक डोंगर होता त्याचे खडक आणून सिद्दीने हा किल्ला बनवला . त्यात चुना, रेती, मीठ, वितळलेले शिसे घातलं म्हणून हा किल्ला एव्हढा मजबूत आहे असंही म्हणतात. पेशवे, पोर्तुगीज, इंग्रज, डच सर्वांनी प्रयत्न करूनही हा किल्ला अजिंक्य का राहिला ह्याचीही एक कथा आहे. ह्या कार्यक्रमात ती पूर्ण सांगितली नाही. पण मी सध्या विश्वास पाटील ह्यांची 'संभाजी' वाचत आहे त्यात ही कथा दिली आहे ती अशी - नांदगाव नावाच्या गावात गणेश पंडित म्हणून विख्यात व्यक्ती होती. हे पंचांग पाहून मुहूर्त काढून देण्यात तरबेज होते. जंजिऱ्याच्या पायाभरणीचा मुहूर्त काढायला सिद्दी त्यांच्याकडे गेले तेव्हा ते घरी नव्हते. त्यांची मुलगी म्हणाली की मी बाबांकडे शिकलेय. मी काढून देते मुहूर्त आणि तिने अमृतयोगाचा मुहूर्त काढून दिला. ह्या मुहूर्तावर पायाभरणी झाल्याने हा किल्ला अजिंक्य राहिला म्हणे.

समुद्राच्या मधोमध असूनही ह्या किल्यात २ गोड्या पाण्याचे तलाव एके काळी होते. आता अर्थात ते दुरावस्थेत आहेत. इथल्या नगारखान्यात ३ तोफा आहेत - एकीचं नाव कलाल बांगडी. मराठी 'कलकलाट' ह्या अर्थी तिच्या आवाजावरून 'कलाल' तर तिच्यावर बांगडीच्या आकाराच्या ridges आहेत त्यावरून् 'बांगडी'. वाघाच्या मुखाचं चित्र असलेली म्हणून एक व्याघ्रमुखी. आणि तिसरीच नाव चालाक लोमडी कारण तिच्यावरून येणारा गोळा कुठल्या दिशेने येई ते शत्रूला कळत नसे. कलाल बांगडीचं वजन २२ टन्. ती पंचधातूची आहे - पितळ, तांबे, कथिल, चांदी आणि लोखंड. त्यामुळे उन्हात तापत नाही. कारण तशी ती तापली असती तर तोफगोळा सुटायच्या आधी तोफच फुटली असती.

ह्या किल्ल्यातून समुद्राखालुन ६० फुट खालून एक भुयार राजापुरी गावाकडे जायचं पण आता ते सरकारने बंद केलंय. तसाच एक छोटा दरवाजा आहे. तो बाहेरून दगडांनी झाकलेला असे. बाहेरून शत्रूला तो दगडांचा ढीग वाटे पण मुख्य दरवाजा पडला तर हा दरवाजा उघडून आतल्या लोकांना पळून जाता येईल अशी सोय होती.

शिवाजी महाराजांनी १३ वेळा प्रयत्न करूनही हा किल्ला हाती आला नाही. त्यांनी १६६१ मध्ये राजापुरी किल्ला जिंकला पण जंजिऱ्यावर हल्ला करायच्या आत अफझलखान महाराष्ट्रावर चाल करून आला त्यामुळे त्यांना ही मोहीम अर्धवट टाकून जावं लागलं. संभाजीने सुध्दा औरंगजेबाचा मुलगा अकबर ह्याच्या साथीने हा किल्ला घ्यायचा प्रयत्न केला. अगदी दगडी सेतू समुद्रात बांधून पण समुद्र खोल असल्याने हा प्रयत्न फसला. शेवटी त्यांनी १६९३ मध्ये पद्मदुर्ग बांधून सागरी किल्ल्याचं आपलं स्वप्न पूर्ण केलं असं काही जण म्हणतात. पण संभाजी १६८९ मध्ये वीरगतीस प्राप्त झाल्याने नक्की सांगता येत नाही.

१९४७ मध्ये जंजिऱ्याचे नबाब इंदूरला निघून गेले. ६ में १९४८ ला इथलं सिद्दी शासन संपलं. इथली कुटुंबं जी आत्तापर्यंत उदरनिर्वाहासाठी नबाबावर अवलंबून होती ती पोटापाण्यासाठी किल्ल्याबाहेर पडली. हळूहळू सर्व लोक किल्ला सोडून राजापुरीत राहू लागले. १९७५ पर्यंत सर्व लोक बाहेर पडले आणि मग इथे भारतीय पुरातत्त्व खात्याचा अंमल चालू झाला.

जंजिरा किल्ला अजूनही चांगल्या अवस्थेत आहे. इतकी वर्षे समुद्राच्या लाटांचा मारा होऊन त्याचे दगड झिजू लागले आहेत, पण त्यांच्या सांध्यामधले शिसे मिश्रण अजूनही शाबूत आहेत. आतले तलाव खुपच मोठे आहेत. आता त्यात शेवाळे झालेय पण स्वच्छ करता येतील असे वाटतेय. ( हे मी १९८७ सालामधले लिहितोय. पण अजून तसेच असावे. )

मी अगदी नुकतीच जाउन आलेय. त्यामुळे सगळ्या लींक्स व्यवस्थित लागल्या. गाईडने सांगितलेले अजुन काही..

१. संपुर्ण जंजिरा २२ एकर जागेवर वसवला आहे.

२. जंजिर्‍याच्या एका तलावात म्हणे.. सप्तरंग दिसावेत म्हणून त्या तलावाच्या वर जी राणी राहायची तिच्या खिडकिला सप्तरंगी काचा होत्या. त्याचे प्रतिबिंब पाण्यात पडून पाण्यात सात रंग दिसायचे. या तलावातले पाणी काढतांना पाण्यावर तरंग उमटून सप्तरंग हलु नयेत म्हणून खालुन पाणी काढायची वेगळी सोय आहे.

३. जंजिर्‍यामध्ये एक विशिष्ठ लेणी/ घुमट टाईप जागा आहे. तीथे खुप म्हणजे खुप गार वाटते. त्या जागी म्हणे दारुगोळा साठवला जायचा. आणि दारुगोळ्याने उष्णतेने पेट घेऊ नये म्हणून मुद्दाम ती गार जागा बनवली होती.

४. किल्ल्यात शिरल्या शिरल्या जी कबर आहे तिथे जातांनाच्या दगडी दरवाज्याच्या वर एक विशिष्ट चिन्ह आहे. वाघ का सिंह काहीतरी. तसे चिन्ह म्हणे भारतात इतर कुठेही कुठल्याही किल्ल्यावर दिसणार नाही.

हा किल्ला अजिंक्य का राहिला ह्याचीही एक कथा आहे. ह्या कार्यक्रमात ती पूर्ण सांगितली नाही.

>> सांगितली की.. तू लिहिली आहेस तीच सांगितली कथा.

जंजिर्‍याच्या अनेक वैशिष्ठ्यांपैकी मला हॅट्स ऑफ म्हणावेसे वाटते ते त्याच्या डिझास्टर मॅनेजमेंट (आपात्कालीन नियोजन) साठी. 'काय झाले तर काय करायचे' याची जंजिर्‍यावर किती व्यवस्थित व्यवस्था आहे.
(अर्थात किल्ला असल्याने असेल. आणि हा पहिलाच किल्ला आहे जो मी इतका व्यवस्थित पाहिला आहे.)

कार्यक्रमात उल्लेख केलेला तो नवाबाचा बंगला बाहेरुनही इतका सुंदर दिसतो.. आत जायचा मोह आवरत नाही. पण तो कोणालाही पाहायला ओपन नाहीये. का कोण जाणे.

आता सियासत विषयी:

कोणी बघतं का? माझ्याशिवाय घरात कोणाला हा चॅनल फारसा आवडत नाही त्यामुळे मी फार अधुनमधुन बघते.
सियासतच्या जाहीरातीत पेशवे, संभाजीराजे इ. दाखवतात पण मी जेव्हाही बघते तेव्हा सियासत मध्ये अकबर -सलीम - पाशा बेगम हिच स्टोरी दिसते. Sad

त्यात खुप दिवसांनी बघितल्याने आणि इतिहास कच्चा असल्याने काही लींक लागत नाही, शिवाय नवरा हा कोण-तो कोण असे सतराशे साठ प्रश्न विचारत बसतो.

ती लहान मुलगी कोण आहे? पाशा बेगम ची दासी? गोड दिसते आणि चुणचुणीत आहे. शिवाय खुप नजाकत/ अदब आहे तिच्या हालचालींमध्ये.

सियासत खूपच सुरेख सिरिअल आहे पियू. वेळ काढून बघत जा. ती लहान मुलगी म्हणजे निसा. ती पुढे सलीमची राणी बनते. नूरजहां म्हणून ओळखतात तिला.
या निसावर सलीमचे प्रेम असते आणि त्याला तिच्याशी लग्न करायचे असते. पण सलीमची महत्त्वाकांक्षी राणी जगत गोसांई अकबराचे कान भरते. (सलीम ने अकबराला विषप्रयोग करून मारायचा प्रयत्न केला असतो, हे ती अकबराला सांगते.) त्यामुळे, सूड उगवण्यासाठी अकबर निसाचे लग्न एका सरदाराशी करून देतो. तो सरदार फार क्रूर आणि वाईट चालीचा असतो. पण नंतर एका लढाईत तो मारला जातो. मग विधवा झालेल्या निसाशी सलीम लग्न करतो.
खूप गुंतागुंतीचा कहाणी आहे. नात्यांची गुंतागुंत, अहंकार आड आल्याने माणूस कसे अगम्य निर्णय घेऊ शकतो,मानवी मनाचे कंगोरे खूप सुरेख रित्या दाखवले आहेत. अभिनय आणि पात्रांची निवड खूप मस्त आहे.

ती लहान मुलगी म्हणजे निसा. ती पुढे सलीमची राणी बनते. नूरजहां म्हणून ओळखतात तिला.

>> Uhoh

मग मध्ये ते निसाचे एपिसोड्स पाहिले तो फ्लॅशबॅक होता कि स्टोरी पटापट पुढे चाललीये?
कारण आजकालच्या भागात निसाचे अलीकुलीशी लग्न ठरतांना दाखवले आहे.

आणि मी ज्या लहान मुलीविषयी बोलतेय ती पाशाबेगम ची दासी होती. मी जो एपि. पाहिला त्यात ती अकबराला पाहाण्यासाठी उत्सुक होती. त्या जाळीच्या लाकडी पडद्याआड पाशा बेगम सोबत उभी असते. अकबराच्या उठण्याची वाट बघत. मग मध्येच कोणीतरी लहान मुलगा हिला ढकलतो नी जाळी जवळपास पडायच्या बेतात असते. तेव्हा पाशा बेगम तिला जनानखान्यात परत जा असं सुचवतात. ती महालात हरवते तेव्हा चुकुन सलीमच्या एरियात येते. तेव्हा सलीम तिच्यापेक्षा बराच मोठा दाखवला आहे कि.

शिवाय याच भागात पाशाबेगम तिच्यासमोर एका साध्या आरश्याचा वापर करुन दोन लहान मुलींमधली ओढणीचोर शोधुन काढते.

सियासत ही अकबर, सलीम यांचीच कथा आहे. पेशवे वगैरे नाहीयेत.

>> आईंग? मग मी जाहीरातीत बघितलं कि "सत्तेसाठी आनंदीबाई ध चा मा करतात, मुघल संभाजीराजांचे डोळे फोडतात इ.". कि ती वेगळ्या मालिकेची जाहीरात आहे? Uhoh

मग मध्ये ते निसाचे एपिसोड्स पाहिले तो फ्लॅशबॅक होता कि स्टोरी पटापट पुढे चाललीये?
>>
स्टोरी पुढे गेलीये. छोटी निसा आता मोठी झालीये.
खरतरं या सिरियलचे बरेच भाग आधी झाले होते. पण मध्येच थांबवून पुन्हा पहिल्यापासून दाखवत आहेत.

आईंग? मग मी जाहीरातीत बघितलं कि "सत्तेसाठी आनंदीबाई ध चा मा करतात, मुघल संभाजीराजांचे डोळे फोडतात इ.". कि ती वेगळ्या मालिकेची जाहीरात आहे?
>> ती वेगळी. बहुतेक कहीसुनी.

सोमवारचा एकांतचा एपिसोड रामगढवर तर कालचा काश्मिरच्या मार्तंड मंदिरावर होता. दोन्ही एपिसोडस आधी पाहिलेले आणि इथे माहितीसुध्दा पोस्ट केली होती.

स्वप्ना, भानगढ बद्दल तू बहुतेक संचायामा वर लिहीलं होतं जे अर्थातच केव्हाच वाहून गेलं आहे. तुझ्याकडे तो राईटअप ठेवला असशील तर इथे पोस्ट करशील का प्लीज?

भानगड बद्दल लिहा प्लीज .
नूरजहा हि सलीम ची तिसरी आणि सलीम हा नूरजहाचा दुसरा नवरा ना . तिचं लग्न आधी एका सरदारा शी झालं होतं . सलीम ने नंतर तिला त्याच्यापासून वेगळी केली असं वाचनात आलंय

कि ती वेगळ्या मालिकेची जाहीरात आहे?>>>
ती कही सुनी ची जाहीरात आहे

rmd, अग माझ्याकडे राईटअप नाहिये त्याचा. आता मध्यंतरी एकांतचे रिपिट टेलिकास्ट झाले तेव्हा भानगढचा एपिसोड लागला होता. पण परत काय पहायचा म्हणून मी पाहिला नाही. Sad

एकांत - लखनौ रेसिडेन्सी

एकांतचा कालचा एपिसोड लखनऊ मधल्या ब्रिटीश कालीन 'लखनौ रेसिडेन्सी' वर होता. ईस्ट इंडिया कंपनीच्या वतीने Treaties करणाऱ्या अधिकाऱ्याना रेसिडेन्टस् म्हणत. १८ व्या शतकाच्या शेवटी जेव्हा मुघल साम्राज्याला ओहोटी लागली तेव्हा अवध उत्कर्षाला येत होतं. ईस्ट इंडिया कंपनीची दृष्टी तिथे वळली. त्यांनी अवधशी treaty केला. तेव्हा अवधाची राजधानी फैजाबाद इथे होती. ह्या treaty नुसार कंपनीचा रेसिडेन्ट अवध कोर्टात असेल असं ठरलं आणि अवधच्या राजकारणात कंपनीची लुडबुड सुरु झाली. पुढे ही राजधानी फैजाबादहून लखनऊ ला हलली. म्हणून हे रेसिडेन्टस् लखनौला आले. त्यांच्यासाठी बनवलेली ही जागा म्हणजे 'लखनौ रेसिडेन्सी'.

त्यातली रेसिडेन्सी ही पहिली इमारत. मग पुढे चर्च, ट्रेझरी, banquet hall असं बरंच काही उभं राहिलं. पण ह्या पूर्ण भागाला रेसिडेन्सी च म्हणतात. इथे २-३ बग्ग्या मावण्याइतका भव्य portico होता. banquet hall च्या पहिल्या मजल्यावर डान्स फ्लोअर् होता. संध्याकाळी एकत्र जमून जेवण घेण्याच्या, नाचगाण्याचे कार्यक्रम करण्याच्या ब्रिटीश परंपरेला धरूनच हे होतं. ट्रेझरी मधून इथल्या व्यापाराची सूत्रं हलत. ही खास नबाबाची परवानगी काढून बांधली होती म्हणे. काय पण तो इंग्रजांचा आज्ञाधारकपणा. जसं काही नबाबाने नाही म्हटलं असतं तर ट्रेझरी बांधलीच नसती. असो. इथे एक बेगम कोठी आणि इमामवाडा ही आहे. अवधच्या दुसऱ्या बादशहाची बायको मूळची ख्रिश्चन पण लग्नानंतर शिया मुस्लीम झाली. तिने हे दोन्ही बांधवलं म्हणे. इथे एक टेनिस कोर्टही होतं. पैकी चर्चचा नुसता plinth शिल्लक आहे. एक cemetery आहे. त्यातल्या बऱ्याच कबरीवर १८५७ ची तारीख दिसते.

१८१९ मध्ये इंग्रजांनी नबाबाला बादशहा बनवलं आणि अवधला राज्याचा दर्जा दिला. त्यामुळे मुघलांची ताकद कमी होईल असा इंग्रजांचा कावा होता. पण पुढे डलहौसीने हे राज्य annexe करायचा घाट घातला त्याला नबाबने विरोध केला. त्याने लखनऊ सोडलं. हे जेव्हा प्रजेला कळलं तेव्हा त्यांनी उठाव केला. ह्यामागे असंही एक कारण होतं की नबाबाचं सैन्य dismantle केलं गेलं. त्यातले प्रशिक्षित सैनिक बेरोजगार झाले. ते परत घरी जाऊ शकत नव्हते. इंग्रजांविरुद्ध उठाव होतोय म्हटल्यावर तेही त्यात सामील झाले. लोकांनी रेसिडेन्सी ला चहू बाजुंनी घेरलं.

१८५७ च्या बंडाची चाहूल लागताच आतल्या इंग्रजांनी आपल्या लोकांना एकत्र केलं. कडेच्या काही इमारती डायनामाइट लावून उडवून दिल्या जेणेकरून हल्ला कुठेऊन होतोय हे दिसेल. काही इमारतींची छतं उडवून दिली जेणेकरून त्यावर चढून कोणी हल्ला करू नये. आत एकूण १५०० सैनिक आणि १५०० सिव्हीलीयंस असे ३००० च्या आसपास लोक होते. कडेकोट बंदोबस्तामुळे कोणी आतले बाहेर जाऊ शकत नव्हते आणि बाहेरचे आत येऊ शकत नव्हते. इंग्रजांनी बाहेरच्या शहरातल्या भाईबंदांना संदेश पाठवला. पण आधी त्यांच्या मदतीला कोणीच येऊ शकलं नाही.

जवळजवळ ८७ दिवसांनंतर म्हणजे २५ सप्टेंबरला एक तुकडी रेसिडेन्सीपर्यत पोचली. ह्याला First Relief म्हणतात. पण ह्या प्रयत्नात त्यांचे बरेच सैनिक ठार झाले. उरलेल्यांच्या मदतीने रेसिडेन्सीतल्या सर्वांना सोडवणं शक्य नव्हत त्यामुळे ती तुकडीही रेसिडेन्सीमध्ये अडकून पडली. हळूहळू अन्न आणि औषधं ह्यांची ददात भासू लागली. जुलैच्या पावसाने रोगांची साथ पसरवली होतीच.

पण बाहेर इंग्रजांना बंड मोडून काढण्यात यश येऊ लागलं होतं. रेसिडेन्सीमधल्या लोकांना सोडवणं हा इंग्रजांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न होउन बसला होता. १९ नोव्हेंबर ला second relief म्हणजे दुसरी तुकडी आली आणि २४ नोव्हेंबर पर्यंत सर्वांना बाहेर काढण्यात आलं.

नंतर ते परत त्या ठिकाणी का आले नाहीत ह्याची बरीच कारणं आहेत. एक तर रेसिडेन्ट ह्या पदाची गरज राहिली नव्हती. दुसरं असं की कदाचित हा भाग उजाड ठेवण्यात 'आमच्याशी जॉ पंगा घेईल त्याची अशी हालत होईल' असा काही संदेश देण्याचा ब्रिटिशांचा हेतू असेल. काहीही असो पण एकेकाळी आलिशान इमारती असलेला हा भाग उजाड झाला तो कायमचाच.

एक मात्र खरं की ह्यानंतरची पुढची ९० वर्षं इंग्रजांनी इथे लावलेला युनियन जेक उतरवला नाही - अगदी सूर्यास्ताला सुध्दा नाही. भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या १-२ दिवस आधी मात्र त्यांनी तो उतरवला आणि इंग्लंडला नेला. तिथे तो अजून जपून ठेवला आहे म्हणे.

आता एकांत सोम-शुक्र दररोज असणार असं दिसतंय. किती एपिसोड्स पहाता येतील आणि इथे लिहिणं जमेल माहित नाही. Sad

एकांत - विष्णुपुर

विष्णुपुर कोलकात्यापासून १५० किमी अंतरावर. विष्णुपुर नावाच्या राज्याची ही राजधानी. इथे अजूनही जुन्या काळातल्या इमारती, मंदिरं आहेत. काही इथल्या लोकांना ठाऊक आहेत, काही नाहीत. जुन्या काळी हे एक अत्यंत सुंदर, समृद्ध आणि आदर्श राज्य होतं. विष्णूला समर्पित केलेल्या इथल्या मंदिरातली टेराकोटाची शिल्पं सुध्दा प्रसिद्ध. कोलकाता विश्वविद्यालयाने अभ्यास करून ह्या ठिकाणचं प्राचीनत्व सिद्ध केलेलं आहे. इथले राजे 'मल्ला राजे' ह्या नावाने प्रचलित. म्हणून ह्या भागाचं नाव मल्लाभूमी किंवा मालाभूम. आदी मल्ला हा इथला पहिला राजा. त्याच्याबद्दल एक आख्यायिका आहे.

जयनगरचा एक राजा पुरीला तीर्थयात्रेला निघाला होता. त्याची पत्नी गर्भवती होती. तिला त्याने ह्या गावात एका ब्राह्मणाकडे ठेवलं आणि पुढे निघून गेला. यथावकाश ती प्रसूत होऊन तिला मुलगा झाला. त्याचं नाव रघुनाथ ठेवण्यात आलं. ७ वर्षांचा असताना तो गुरं राखण्याचं काम करी. एक दिवशी दुपारी त्या ब्राह्मणाने पाहिलं तर झाडाखाली झोपलेल्या रघुनाथाच्या डोक्यावर दोन नाग फणा धरून होते. तेव्हा त्याने हा मुलगा सामान्य नाही हे ओळखलं. पुढे जाऊन हा मुलगा मल्ला राजघराण्यातील मूळ पुरुष बनला. आता पुरीला गेलेल्या त्या राजाचं काय झालं वगैरे बरेच प्रश्न ही कथा ऐकताना माझ्या मनात उगवले. असो.

ह्या घराण्यातला राजा जगत मल्ला ह्याने राजधानी जॉयपूर वरून विष्णुपुर ला हलवली.त्यावेळची एक कथा त्यांनी सांगितली. पण ती खूप लोकल एक्सेंट मध्ये असल्याने मला काही समजली नाही. तर त्यावेळी इथे माता मृण्मयीची प्रतिमा स्थापली गेली जी आजही पूजली जाते. ह्या मंदिरामागे जे खंडहर उर्फ भग्नावशेष आहेत तो पूर्वीचा राजमहाल होता असं म्हणतात. कालाय तस्मै नम: दुसरं काय. पूर्वी ह्या महालाला हवामहल म्हणत. तो कधी बांधला, कसा दिसायचा ह्याबद्दल कोणाला काहीच कल्पना नाही.

दहाव्या शतकात पश्चिम भारतावर मोगली हल्ला झाला. दिल्लीत त्यांची सत्ता आली. पुढे ती भारतभर पसरली. पण तरी विष्णुपुरचं राज्य ५०० वर्षं टिकलं. कारण एका बाजूला तीव्र प्रवाह असलेली दामोदर नदी आणि दुसर्या बाजूला सालाचं जंगल ह्यामुळे हा भाग तसा सुरक्षित होता. ह्या घराण्यातला राजा धारी मल्ला ह्याने मोगलांना कर द्यायचं कबुल केलं होतं. पण तो एव्हढा बेरकी होता की दिलेला कर काही ना काही बहाणा करून परत मिळवत असे असं म्हणतात. ह्या राज्यात अनेक किल्ले ह्यानेच बांधले. अश्याच १७ व्या शतकात बांधला गेलेल्या एका किल्ल्याचा एक तुकडा फक्त शिल्लक आहे. त्याचा दरवाजाच एव्हढा बुलंद आहे की त्यावरून त्याच्या कडेकोटपणाची कल्पना यावी.

इतिहासकारांचं ह्या ठिकाणाविषयी मत थोडं वेगळं आहे. त्यांच्या मते बीर हंबीर हा इथला मूळ पुरुष. त्याने राज्याच्या सीमा विस्तारल्या, इमारती बांधल्या, सैन्य उभारलं. वैष्णव धर्म स्वीकारलेला हा पहिला मल्ला राजा. त्याची मोगलांशी ही मैत्री होती त्यामुळे त्याच्या काळात विष्णुपुरमध्ये शांती होती.

रासमंच हे विष्णुपुर मधलं पहिलं मंदिर. ह्याचा आकार एखाद्या पेव्हेलीयन सारखा आहे. इथे मूर्ती नाही की पूजा होत नाही. पण वर्षातल्या एका दिवशी शहरातल्या इतर मंदिरातल्या मूर्ती इथे आणून पूजत. ही प्रथा १९३२ पर्यंत चालू होती. विष्णुपुरचं संगीत घराणं ही प्रसिद्ध आहे. इथली कोणतीही दोन मंदिरं एकसारखी नाहीत. इथल्या बांधकाम शैलीला Bengali Architecture म्हणून ओळखलं जातं. १८ व्या शतकातलं राधेश्याम ला समर्पित मंदिर इथे अजूनही वापरात आहे. बाकीच्या भग्न देवळातल्या मूर्ती इथे आणून ठेवल्या आहेत. १७५८ मध्ये हे बांधलं होतं. इथे पुजारी येतात आणि मूर्तींची पूजा करतात.

मग पूर्व भारताची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ह्या नगराचा नाश का झाला? हे राज्य लयाला गेलं ते मल्ला राजा चैतन्य सिंगच्या (१७४८-१८०६) काळात. हा इथला शेवटचा राजा ठरला. विष्णुपुर वर तेव्हा मराठ्यांनी हल्ला केला. त्यात त्याचं खूप नुकसान झालं. दुष्काळ पडला. त्यामुळे नगराची आर्थिक स्थिती खालावली. राजाला लोकांकडून कर वसूल करता आला नाही. त्यामुळे त्याचंही दिवाळं निघालं. १७५७ मध्ये इंग्राजाम्नी बंगालचा नबाब सिराज उद्दोला ह्याला प्लासीच्या लढाईत हरवल. त्याचा विष्णुपुरच्या ओसाड होण्याशी काय सम्बंध ते मात्र मला कळलं नाही.

कोणी धर्मक्षेत्र बघत का? आणि गुप्तहेरांवर एक मालिका लागते नाव विस्रले मी ती कोणी बघत का? दोन्ही छान आहेत.. कही सुनी पण आवडल मला..

धर्मक्षेत्र संपलं का? काल पाहिलं तर साक्षात वासुदेव कृष्ण आरोपी म्हणून उभे होते. आणि हिन्दी चित्रपटात शेवटी कसा व्हिलन्सना पश्चात्ताप होतो त्याप्रमाणे दुर्योधनाने कधीकधी वडिल माणसांचं ऐकावं हा सन्देश आपल्याला मिळाला असं सांगितलं. त्यावर कृष्णाने 'कधीकधीच का?' असं मिश्किलपणे विचारताच 'नेहमी' असं म्हणाला. मग 'संभवामि युगे युगे' असं कृष्णाने सान्गितलं. त्यावरून वाटलं. गुप्तहेरांवरची मालिका अदृश्य.

Pages