पिके जाताच गारांनी

Submitted by संतोष वाटपाडे on 11 May, 2015 - 01:19

पिके जाताच गारांनी
दया केली सराफांनी..

प्रभू तंटा सुटावा पण
नशीबाच्या लवादांनी..

जखम असली जरी मोठी
बरी होते दिलाशांनी..

गुन्हा नव्हताच मी केला
गुन्हा केला पुराव्यांनी..

नको विहिरीत डोकावू
असा आश्वस्त डोळ्यांनी..

उरी सांभाळले होते
किती काटे गुलाबांनी..

नको संबंध तू तोडू
प्रिये थोड्या दुराव्यांनी..

तहाची बोलणी झाली
गरीबीच्या दबावांनी..

मनुष्या सोड त्या जातीं
बनवल्या अंध लोकांनी..

दिला आधार आयुष्या
तुझ्या बंदिस्त हातांनी...

दिशाभुल नेहमी होते
भ्रमिष्टांच्या सवालांनी...

मला आयुष्य गेलेले
दिले माझ्याच स्वप्नांनी..

-- संतोष वाटपाडे (नाशिक)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रभू तंटा सुटावा पण
नशीबाच्या लवादांनी..

व्वा.

जखम असली जरी मोठी
बरी होते दिलाशांनी..

छान.

नको विहिरीत डोकावू
असा आश्वस्त डोळ्यांनी..

हा शेरही आवडला.
उत्तम शेर साधारण शेरांत हरवले तर जाणार नाही ह्याची काळजी घ्यायला हवी, असे वाटले.
शुभेच्छा.

छोट्या बहरात लिहीताना बरेच कष्ट पडतात ....मी प्रयत्न नक्कीच करेन... लांबी वाढवायच्या नादात गुणवत्ता घसरली गेलीय हे जाणवले मलाही...खुप खुप आभार समीरजी