भारतीय संस्कृती ही पर्यावरण विचारी आणि निसर्गसंवर्धक आहे. प्राचीन संस्कृत वाड्मयात त्याचे दाखले सर्वत्र मिळतात. वराहपुराणात सांगितलंय की -
यावत् भूमंडलात् धत्ते सशैलवनकाननम् ।
तावत् तिष्ठान्ति मेदिन्यां संतति, पुत्र पौतृकी ॥
म्हणजे जोपर्यंत या भूतलावर पर्वत, वने, आणि सरोवर आहेत तोपर्यंत तुम्ही, तुमची मुले व भावी पिढ्या सुखाने जगतील. हे वाक्य प्रश्नार्थक झालंय ना?
निसर्गसंरक्षण, संवर्धन, पर्यावरण, जागतिक तापमान वाढ... असे अनेक शब्द आज आपल्या काना - डोळ्यावर आदळत असतात व ह्या सगळ्याकडे काणाडोळा करून चालणार नाहीये हे अगदी सर्वसामान्यांच्याही ध्यानात येऊ लागलंय व त्यासाठी काही ठोस पावलं उचलली पाहिजेत हे नक्की पण 'कळतं पण वळतं नाही' अशी अवस्था अनेकांची आहे. कळलं व अमलात आणलं अश्या लोकांच प्रमाण किती व अश्या मूठभर लोकांनी करून असा कितीसा बदल होणार ? मी एकट्याने केल्याने काय होणार आहे असे म्हणून जो काहीच करीत नाही तो ती सर्वात मोठी चूक करतो. परिसंस्थेचा ऱ्हास न होऊ देता कायमस्वरूपी विकास साधता येऊ शकतो त्यासाठी प्रयत्न करण्याचे काम ऑयकॉस कंपनीच्या संचालिका 'उंच माझा झोका' पुरस्कार विजेत्या केतकी घाटे व मानसी करंदीकर गेल्या दहा वर्षापासून यशस्वीरीत्या करताहेत. केतकी घाटेशी ह्या विषयावर मारलेल्या सविस्तर गप्पा....

प्रश्न :बाळाचे पाय पाळण्यात दिसतात..... किंवा असं काही बाळकडू... संस्कार वगैरे.. तसं काही घडलं का?
उत्तर: एकदा आमच्या गोळेसरांनाही असाच प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले तसंच मीही म्हणते की संस्कार दर वेळीच असतात असं नाही. कळत्या वयात तुम्ही काय शिकता यावरही अनेक बदल घडू शकतात. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं काही माझ्या बाबतीत घटना घडल्याचं ऐकिवात नाही पण निसर्गाची आवड होती. माझे बाबा बागेत काम करायचे व त्यांच्याबरोबर मीही काम करायचे इतपतच काय ते बाळकडू! वेगवेगळ्या ठिकाणी फिरलोय...राष्ट्रीय उद्यानं बघितली... वनजीवनाची माहिती गोळा केलीये... असं काही लहानपणी घडलं नाही. माझी आजी कोंकणातली. तिला झाडाझुडुपांची खूप माहिती होती तिच्याबरोबरही काम करायचे. मला आता गंमत वाटते मी आता जी आहे त्याच्या अगदी विरुद्ध होते लहानपणी. मला बाग अगदी स्वच्छ आवडायची. पालापाचोळा गोळा करून फेकून द्यायची. बाबा म्हणायचे की अगं हा पालापाचोळा फेकून नाही द्यायचा, तो झाडांच्या मुळाशी ठेवायचा. मला ते काही पटायचं नाही किंवा बाबा पटवून देऊ शकले नाही आणि हेच मी आज जगाला पटवण्याचा प्रयत्न करतेय माझं बालपण चाळीसगावसारख्या खेड्यात पण पूरक वातावरणात गेलं. शिक्षण मराठी माध्यमातून झालं. लहानपणापासून नाटकाची प्रचंड आवड होती. शाळेत असताना नाटकातून काम करत होते, वकृत्व व निबंध स्पर्धेत भाग घेत होते. बारावी झाल्यानंतर पुरेश्या विद्यार्थी संख्या अभावी वनस्पतिशास्त्रात इच्छा असूनही पदवी घेता आली नाही. रसायनशास्त्र घेऊन बी एस्सी झाले अन पुढच्याच वर्षी वनस्पतिशास्त्र विभागात दोन विद्यार्थी आले. सरांनी मलाही विचारलं.मी प्रवेश घेतला आणि तीन विद्यार्थ्यांनिशी पदवी अभ्यासक्रम घेता आला. अन मी द्विपदवीधर झाले.
प्रश्न: पण मग नाटक सोडून ह्या क्षेत्राकडे कशी काय वळलीस?
उत्तर मी पदवीधर झाल्यानंतर पुण्यात आले. नाटकाचं वेड डोक्यात होतंच व निसर्ग संवर्धनाचंही. मोठी होऊन नाटकात वगैरे काम करीन व त्या माध्यमातून निसर्ग संवर्धनाचं काम करू शकेन असं वाटायचं. मी शाळेत असताना नाटकात भाग घेतच होते. महाविद्यालयातही एकांकिका, अखेरचा सवाल सारखी तीन अंकी नाटकंही केली होती. एनएसडीला अॅडमिशन घ्यायची, तीन वर्ष दिल्लीत राहायचं हे आत्मविश्वासानं भरलेलं स्वप्न होतं. अतुल कुलकर्णी व प्रसाद वनारसे हे माझे चांगले मित्र व त्यांनाही विश्वास होता की मला एनएसडीला प्रवेश मिळू शकेल. मी एनएसडीची मौखिक परीक्षा दिली... ....धक्काच बसला. असं कसं झालं ? मी त्यांना नकाराचं कारण विचारायलाही गेले .. नुसता अभिनय इथे उपयोगाचा नाही हे कळलं त्याचबरोबर राष्ट्रीय स्तरावरचं ह्या क्षेत्रातलं इतर घडामोडींचं सखोल ज्ञान असणं गरजेच आहे. तयारीनिशी परत परीक्षा देण्याचं ठरवलं.
चाळीसगावात राहून हे शक्य नव्हतं म्हणून मी पुण्यात आले. नाटकाशिवाय इतर काही उद्योग नव्हते. माझ्या एका मैत्रिणीने सुचवलं की तुला निसर्गाची आवड आहे तर तू इकॉलोजिकल सोसायटीचा नॅचरल रिसोर्सेस मॅनेजमेंट अॅन्ड सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा कोर्स का नाही करत? जो तिने केला होता. मलाही पटलं अन मी प्रवेश घेतला. गोळेसरांची दोन - तीन लेक्चर्सच ऐकली अन मी भारावूनच गेले, गंभीर झाले, विचार करू लागले. आपल्याकडची शिक्षण पद्धती इतकी ठोकळाबाज आहे की मुलांमध्ये चौकटीबाहेर जाऊन विचार करायच्या क्षमतेला वावच देत नाही किंबहुना ती क्षमता मारूनच टाकण्यात येते आणि त्यात भरीसभर पियर प्रेशर! मीच काय पण असेच विद्यार्थी घडवले जातात. असो! त्यानंतर महाजनसरांची लेक्चर्स झाली आणि मला खर्या वनस्पतिशास्त्राची ओळख झाली. कॉलेजात जे शिकले ती फक्त माहिती, ओळख होती. आंबा, जांभूळ, वड पिंपळ पलीकडे झाडं ओळखता येत नव्हती. शास्त्राचे खरेखुरे ज्ञान मला ह्या दोन गुरुंकडून मिळू लागले, झाडांकडे बघण्याची 'नजर' मिळाली. आनंददायी शिक्षणाचा अनुभव मी पहिल्यांदाच घेत होते. त्यात मी इतकी रमले की नाटक केव्हा मागे पडलं, लक्षातही आलं नाही. पुढचे दोन वर्ष ह्या दोघांकडून किती घेऊ अन किती नाही असं झालं.

प्रश्न: व्यवसायात पहिली संधी मिळणं खूप महत्त्वाचं असतं व ती संधी मिळाली की तिचं सोनं करणं तुमच्या हातात असतं, ते कधी व कसं घडलं?
उत्तर पुण्यात आले तर खरी पण आईबाबांची थोडी नाराजी पत्करूनच. नाईलाजास्तव एका ई पब्लिशिंग कंपनीत काम करत होते. योगायोग असा माझा हा अभ्यासक्रम पूर्ण झाला अन ही कंपनी बंद पडली. त्याचदरम्यान सुशिक्षित लोकांमध्ये खाजगी जमीन मालकी सुरू झाली होती. गोळेसरांनीही सुचवला की अश्या लोकांना जर का आपण संवर्धनाचा सल्ला दिला तर ते ऐकतील.परदेशात अश्या प्रकारे कामं करणारी भरपूर लोकं आहेत. आपल्याकडे मात्र अश्या संस्था तितक्याशा प्रचलित नाही. आपल्याकडे प्रदूषणावर, पर्यावरणावर काम करणार्या संस्था आहेत. कोर्स संपता संपता आम्ही तिघींनी मी, मानसी व मृणाल, ह्या क्षेत्रात कन्सलटन्सी सुरू करायचा निर्णय घेतला. त्याचवेळेस 'लवासा'चं (त्या वेळेला त्याचं नांव 'लेक सिटी' होतं) काम सुरू झालं होतं. फर्गुसन रोडला एका फ़्लॅटमध्ये ऑफिस होतं त्यांना ह्या पश्चिम घाटात जैव विविधता खूप आहे हे माहीत होतं. त्यांना त्याचं सर्वेक्षण करून हवं होतं. आमच्या करता ही एक उत्तम संधी चालून आली. जी आम्ही आनंदाने स्वीकारली. या बरोबरीनेच अजित शेलाट यांचं काम केलं, ते त्यांना आम्ही सल्लाकेंद्र सुरू करतोय हे कळल्यावर त्यांनी त्यांच्या पाच एकरापैकी एक एकराच सर्वेक्षणाचं व संवर्धनाचं काम दिलं. त्यांनी आम्हाला त्या एक एकरावर वाट्टेल ते प्रयोग करण्याचं स्वातंत्र्य दिलं होतं. एका वर्षात तिथे आश्चर्यकारक निकाल मिळाले. तिथल्या फुलपाखरांची, पक्ष्यांची, सुगरणीच्या खोप्यांची संख्या वाढली होती तर आमचा आत्मविश्वास अन उत्साह!


प्रश्न: 'लवासा' ने तुमच्या व्यवसायाला घाटदार वळणं मिळालं त्याबद्दल काय सांगशील.
उत्तर: घाटदार वळण मिळाल असं अगदी नाही पण अनुभव मात्र भरपूर मिळाला. तीन हजार एकराच जैवविविधतेचे सर्वेक्षण केल्यावर लक्षात आलं की नुसतं सर्वेक्षण करून काही उपयोग नाही त्याचं संवर्धन करणं गरजेचं आहे. आम्ही आठवड्याला तीन चार दिवस मुक्कामी राहून गावकर्यांच्या मदतीने हे काम जवळपास २ वर्ष केलं. ही २ वर्षे अतिशय कष्टमय होते पण खूप मजा आली. झाडं - पक्ष्यांचं नातं, पक्ष्या - पक्ष्यातलं नातं, वेगवेगळ्या झाडापक्ष्यांची वर्गवारी ओळखणं, स्थानिक लोकांजवळ असलेली माहिती, ते एकंदरीत ह्याकडे कश्या तर्हेने बघतात .... . असे अनेक कंगोरे तपासता आले, खूप काही शिकायला मिळालं, अनुभवायला मिळालं. एकदा गोळे सरांना बरोबर घेऊन गेलो. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुनरुज्जीवनाचा आराखडा तयार केला, संवर्धनासाठी काही उपाय योजना आखल्या. तिथे साधारण नव्वदेक ओढे आहेत त्यावर बांध घालणे, स्थानिक झाडं वाचवणं, जी वाचवू शकत नाही त्यांना दुसर्याजागी लावणं (transplantation), दोन जंगल जोडण्यासाठी कॅरिडॉर्स करणे अश्या बर्याच गोष्टी केल्या. पण या सगळ्या गोष्टी एकंदर प्रोजेक्टच्या तुलनेत अगदीच थोड्या होत्या. मुळातच पूर्ण प्रोजेक्टची आखणी परिसंस्थेला (ecology) धरून नसल्याने त्याला विरोध होऊ लागला पण बंद पडला नाही ! भारताची आर्थिक धोरण बघता विकास हा अपरिहार्य आहे, तो थांबवणं सामान्य माणसाकरता जवळ जवळ अशक्यप्राय. त्यामुळे ही हानी कमीत कमी करून विकास कसा साधता येईल यावर आम्ही भर देतो. लवासाचे सल्लागार अमेरिकेतले होते, त्यांना आम्ही हा पर्यावरणीय दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न केला. परंतु site वरच्या इंजिनीयर्सशी आमचे बरेच मतभेद व्हायचे. जुनी झाडं तोडून टाकू व नवी भरपूर झाडं लावू.. त्यात काय एवढं ? असा हा सर्वमान्य समज कसा गैरसमज आहे, हे पटवून देणं अवघड काम होतं. ओढे योग्य प्रकारे जोडणं, बांध घालणं, देशी झाडांचे महत्त्व अबाधित राहण्यासाठी त्यांची नर्सरी तयार करणं... अश्या अनेक गोष्टींवर, अनेक स्तरांवर तडजोडीने काही निर्णय घ्यावे लागले, चांगले वाईट दोन्ही. ह्या कामातून आम्ही घडत होतो, शिकत होतो. त्यामुळे आम्हाला पर्यावरणीय पुनरुज्जीवनासाठी (ecological restoration) काही मानक/स्टॅडर्डायझेशन करता आलं. ते भविष्यातील योजनांसाठी खूप आवश्यक व फायदेशीर होतं. सल्लागार म्हणून काम करताना तुम्हाला स्वतःला विषयातलं खूप सखोल अचूक ज्ञान व जाण असणं आवश्यक असतं, हा ही एक मोठा धडा शिकलो. दहा हजार एकराच ढोबळ सर्वेक्षण केलं. हिल स्टेशनच्या दृष्टिकोनातून व त्याप्रमाणे योजना आखल्या. ह्या सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो तो आर्थिक गणिताचा! हे सगळं करायचंय, ठीकेय पण त्याला खर्च किती येणार? ह्यात मानसी इंजिनियरिंगाची विद्यार्थिनी असल्याचा फायदा झाला. ह्यानंतर छोटी मोठी कामं मिळत गेली. इकॉलोजिकल रीस्टोरेशन हा आमच्या कामाचा अविभाज्य भाग बनवला, भलेही ते छोटंसं फार्म हाउस असो किंवा भलं मोठं रिसॉर्ट!
प्रश्न :इतकं वेगळ्या प्रकारचं तुमचं काम आहे ते लोकांपर्यंत कुठल्या माध्यमातून पोचवलंत ?
उत्तर : इकॉलॉजीचा कोर्स झाल्यानंतर झपाटलेलो होतो. डोक्यात भन्नाट कल्पना फेर धरायच्या. 'दुनिया को बदल डालो'साठी हे करू या ते करू या, सनदी अधिकारी होऊ या... बाहेर राहून काम करण्यापेक्षा शासनाचा भाग बनलो तर... इ. इ. लोकांपर्यंत पोचण्यासाठी 'किसान' 'एक्स्पो' 'आरोग्य' प्रदर्शनातून भाग घ्यायचो. लोकांना भेटायचो. काय करता तुम्ही? रिस्टोरेशन! समोरच्याच्या चेहर्यावरचे भाव 'हे काय असतं बुवा'! आम्ही देशी झाडांच महत्त्व सांगायचो ...... नंतर नंतर आम्हाला पाहून लोकांच्या कपाळावर आठ्या.. आल्या ह्या भाषण द्यायला...असे अनेक अनुभव घेतले. मग आम्ही आमच्या कामाला नावातून अर्थबोध होईल अशी नावं दिली 'नॅचरल रिसोर्स मॅनेजमेंट', 'इकॉलॉजिकल लँड्स्केपिंग', 'इको टूरिझम अँड डेस्टिनेशन डेव्हपमेंट'! पहिली पाच वर्ष खूप कामं मिळाली नाहीत पण मोजक्या लोकांपर्यंत पोचत होतो, पोटापाण्यापुरतं कमावत होतो. भारतात सगळ्याच बाबतीत विविधता आहे, तिन्ही ऋतूत जमीन, झाडी, पक्षी व प्राण्यांचा अभ्यास करायला मजा येत होती. तोंडी जाहिरातीतूनच आम्हाला कामं मिळत गेली. महाजनसरांनी काही पुस्तकं लिहिली. आम्ही तीनशे देशी झाडांची माहिती देणारी एक सीडी काढली त्यात महाराष्ट्राचा नकाशा आहे. तुम्हाला ज्या तालुका- जिल्ह्यातील देशी झाडांची माहिती हवी आहे तिथे टिचकी मारली की इत्थंभूत माहिती दिसते. तीन वर्षापूर्वी 'निसर्ग संवर्धन' पुस्तक प्रकाशित केलं. सीडी ला उत्तम प्रतिसाद मिळतोय खास करून संरचनाकारांकडून. महाराष्ट्रात काम सुरू आहे. इतरही राज्यातून थोडे प्रोजेक्ट्स केलेत, विचारणा होतेय. आमच्या कामाची सुरुवात मानसीच्या आऊट हाउसमधून झाली. आज आमचं स्वतःच ऑफिस आहे. इकोलॉजीच्या कोर्स केलेल्या चार मुली कर्मचारी आहेत, काही शिकाऊ विद्यार्थिनी (interns) असतात व साधारण एक सात आठ associates आहेत, जे प्रोजेक्टबेसिस वर काम करतात.

प्रश्न :सध्याच्या व भविष्यातील काय योजना आहेत?
उत्तर: सध्या महाबळेश्वर , पाचगणी, कोंकण, पुण्याजवळ काम सुरू आहे. अलीकडेच एक नवीन प्रोजेक्ट आम्ही सुरू केलाय. आपल्याकडे शासनप्रणित सरकारी नियमात, बंधनात जखडलेले अभयारण्य आहे. परंतु लोकसहभागाने खाजगी अभयारण्य करता येईल का असं आम्ही विचार केला. खरं तर हा विचार पूर्वी गोळे सरांनी देखील मांडला आहे तोच पुढे नेण्याचा प्रयत्न. त्यासाठी शहरातल्या सधन लोकांनी एकत्रित येऊन जमीन घ्यावी व तिचं संरक्षणसंवर्धन करावं. पानशेतजवळ साठ एकर जमिनीवर हे काम सुरू केलंय. तिथे एक निसर्गपूरक घर बांधणार व निसर्गतःच जी झाडी उगवतील, प्राणी, पक्षी, कीटक घरं करतील त्याचं संरक्षण-संवर्धन करणार त्यात तोटा होणारच नाही पण फायदा नक्कीच होणार त्याला पैशात मोजता येणार नाही. गुंतवणुकीवर शाश्वत परतावा मिळणार आणि तो म्हणजे केवळ आनंद व समाधान ! अशी भारतभर मॉडेल्स तयार करायची आहेत खाजगीस्तरावर. शासन किंवा काही सामाजिक संस्था पाणी, प्रदूषण, पर्यावरण सारख्या मानवकेंद्री प्रश्नांवर काम करतात पण ज्यात जैवविविधतेच्या संवर्धनाचा फारसा विचार केला जात नाही. ज्यांना शहरात नाही राहायचंय पण आडजागेत एकटे-दुकटे राहू नाही शकणार अश्या निसर्गपूरक जीवनशैली जगू इच्छीणार्यां निसर्गप्रेमी लोकांची वसाहत निर्माण करायची आहे. ही एक योजना डोक्यात आहे जी कधी प्रत्यक्षात येईल ते माहीत नाही पण प्रयत्न सुरू आहेत. कायद्यातील त्रुटीमुळे लवासामध्ये अनेक चुकीच्या गोष्टी झाल्या पण काही चांगल्याही घडल्या आहेत ह्याचा अर्थात आनंद आहेच. विकास करताना निसर्गाचं संवर्धन करणं व समाजात जागरूकता आणण्यासाठीचे प्रयत्न अव्याहत सुरू ठेवणार.
प्रश्न: व्यवसाय व छंद एकरूप झालेय म्हणायला काही हरकत नाही पण त्याव्यतिरिक्त अजून कोणते छंद आहेत ? नाटकाची आवड जपणं कश्या पद्धतीने सुरू आहे?
उत्तर: शास्त्रीय संगीताची आवड आहे व ते शिकतेय. चित्रकलेचीही आवड आहे ती कामानिमित्त जोपासल्याही जाते. इकॉलॉजिकल सोसायटीसाठी स्वयंसेवकगिरी करायला मनापासून आवडतं, ते करत असते. नाटक मागेच पडलंय पण रंगमंचावर काही गोष्टी सुरू ठेवल्यात. मी व माझा मित्र मंदार दातार 'कवितेतील वनस्पती' नावाने दृक - श्राव्य कवितावाचना एक कार्यक्रम करतो. ज्यात वनस्पतींचा उल्लेख असलेल्या इंदिरा संत, बोरकर, पद्मा गोळे ह्यांच्या कविता वाचतो आणि काही वनस्पतींबद्दल माहिती, गमतीशीर गोष्टींचं सादरीकरण करत असतो. अनुभव साठी 'स्वर्गीय सह्याद्री' हा लेख लिहिला होता, तो जरा विस्तृत लिहून, त्याचं अभिवाचनाचा कार्यक्रम चाळीसगावात केला होता. अश्यातर्हेने नाटकाची हौस भागवत असते. प्रायोगिक नाटकं बघते 'झाडं लावणारा माणूस' हे माधुरी पुरंदरेंलिखित नाटक आवडलं होतं. ललित वाचन फारसं होत नाही. कामासंबंधित अथवा निसर्गाविषयीचं वाचन करत असते. पुल केव्हाही वाचायला, ऐकायला आवडतात.
प्रश्न: आदर्श कोण आहेत?
उत्तर: अर्थात गोळेसर व महाजनसर! ज्यांच्यामुळे मी घडले, यशस्वी झाले. प्रसाद वनारसेचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो कारण जेव्हा मी एनएसडीला जाऊ नाही शकले तो माझ्या आयुष्यातील वाईट काळ होता त्यातून बाहेर पडायला त्याने मला खूप मदत केली. 'आई' ! मी घेतलेल्या निर्णयाला आईने कधी विरोध केला नाही उलट कायम माझ्या पाठीशी असते. आईबाबांचा कुठल्याही प्रकारचा दबाव नव्हता हे कर किंवा ते करू नको ...
प्रश्न: पुरस्कार व सन्मानांविषयी सांग.
उत्तर स्वतःच्याच पुरस्कारांविषयी बोलणं खरं तर आवडत नाही. पण पहिला पुरस्कार होता 'मराठा चेंबर ऑफ कॉमर्स' चा. हा पुरस्कार नावीन्यपूर्ण उद्योग करणार्यांना दिला जातो. तो आम्ही खूप आनंदाने स्वीकारला. एकदोन छोटे छोटे पुरस्कारही घेतले. झी चा पुरस्कार मिळाला तेव्हा स्वीकारायचा की नाही, दुविधा होती. गोळेसरांशी बोललो. हा तुमच्या कार्याला मिळालेला मान आहे व ह्या माध्यमातूनही तुम्ही लोकांपर्यंत पोचणार आहात, हा विषय पुढे जाणार आहे तर तो स्वीकारलाच पाहिजे.
प्रश्न: व्यवसायातल्या व वैयक्तिक आयुष्यातील चांगल्या वाईट आठवणी सांग.
उत्तर अनुभवांच गाठोडं चांगलं घेरदार आहे अर्थात चांगल्या वाईट दोन्ही त्यात चांगल्याचं डबोलं मोठं आहे. अतुल कुळकर्णीसाठी केलेलं कामं हे एक छान मॉडेल तयार झालंय. 'बायफ' बरोबर केलेलं केलेलं देवराई (sacred groves) पुनर्जीवनाचं काम. आम्ही सोळा देवरायांचा अभ्यास केला त्यातील दोन देवरायांच्या संरक्षणसंवर्धनाचं काम केलं. पुण्याजवळ अर्धा एकरावर बांधलेलं फार्म हाउस. जैन हिल्स, जळगाव करता साडे सातशे एकराचा पुनरुज्जीवन आराखडा. क्लब महिंद्रच्या तीन रिसोर्ट करता दिलेला सल्ला. पुण्याजवळच MIDC तल्या दोन कंपन्यांच्या आवारात केलेलं landscaping. अनेक चांगले प्रोजेक्ट्स सांगता येतील. शिक्षण क्षेत्रात काम सुरू आहेच. लहान मुलांसाठी शिबीर घेऊन त्यांना आवडेल त्या पद्धतीने त्यांना निसर्गाची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न करताना धमाल येते.
वाईट असे फारसे नाही पण काही गोष्टी पटवून देणं कठीण झालं व चुकीच्या गोष्टी घडल्या. हे लवासाच्या बाबतीत घडलं. तिथे एका ओढ्याच्या एका बाजूला एक जुनं दाट रान होतं दुसर्या बाजूला देवराई ज्यावर अनेक पक्ष्या प्राण्यांची वस्ती व वाट होती इकॉलॉजीच्या दृष्टिकोनातून हा भाग अत्यंत संवेदनशील. बरोबर त्याच्यामधून रस्ता बांधण्याच त्यांनी प्रयोजन केलं. खूप वाद विवादानंतर तो जरा बाहेरच्या बाजूने काढायचा ठरवलं. पण नुकसान झालच. एक प्रचंड उंबर होता जो त्यांच्या रचनेप्रमाणे वाटेत होता. आम्ही रचनेत बदल करायचं सुचवलं पण रचनेत बदल करण्याऐवजी त्याचं पुनर्रोपण करायचं ठरलं. मोठमोठ्या क्रेनने देखिल ते झाड उचलले जाईना. शेवटी ते कापावं लागलं ... जीव हळहळला. निसर्ग तुम्हाला लळा लावतो. मानसिक त्रास व्हायचा. ह्या सगळ्या घटना सुरुवातीच्या काळातल्या. नंतर कोणाबरोबर काम करू शकू किंवा नाही हे आम्हालाही अन लोकांनाही कळू लागलं. शासनाने एका कामाचे अर्धे पैसे बुडवले.
परंतु आजही आठवतो तो आमचा प्रोजेक्ट शेलाटांचा. ओसाड जमिनीवर झुडुपं लावली होती. पावसाळ्यात तिथे जाणं झालं नाही. तीन महिन्यानंतर तिथे गेलो... मन हरखून गेलं.. सगळी झुडुपं वाढलेली.. अन त्यावर बागडणार्या फुलपाखरांच्या झुंडीच झुंडी..
वैयक्तिक आयुष्यात गोळेसरांच्या बाबतीतल्या खूप छान आठवणी आहेत. सर अतिशय कडक , शिस्तप्रिय व काटेकोर. साडेपाच म्हणजे साडेपाचाला हजर पाहिजे फार झालं तर दीड मिनिट वाट बघणार नाहीतर चालू लागणार हे कामाच्या बाबतीत पण पितृह्रुदयही तितकेच. वडिलकीच्या नात्याने आमची सर्वतोपरी काळजी घ्यायचे.
प्रश्न: सर्वसामान्यांना निसर्गाचं संवर्धन करण्यासाठी काय सांगशील.
उत्तर: भारतीय तत्त्वज्ञान 'जगा आणि जगू द्या.' आपल्या ह्या वसुंधरेवर प्रत्येक जीवजंतूचा अधिकार आहे आणि तो अबाधित ठेवायचा असेल तर पाच 'आर' लक्षात ठेवा पाहिलं रिफ्यूज - खरेदी करण्यापूर्वी विचार करा. गरजेपोटी खरेदी करा. दुसरं रीड्युस - गरजा कमी करा. तिसरं रीयुज - पुनर्वापर करा/दुरुस्त करून वापरा. चौथं रिसायकल. आणि पाचवं (restore) शक्य असेल तिथे निसर्गच पुनरुज्जीवन करा. - शेवटी गांधीजी म्हणतात ते लक्षात ठेवणं अगदीच महत्त्वाचं 'Nature has given enough to satisfy our needs but not greed'
अरे वा, वेगळाच विषय आहे
अरे वा, वेगळाच विषय आहे यांच्या कामाचा. यांचे काम सामोरे आणल्याबद्दल धन्यवाद!
छान मुलाखत,मानसी करंदीकरवीशयी
छान मुलाखत,मानसी करंदीकरवीशयी वाचले होते .
मस्त ओळख आणि त्यांच्या
मस्त ओळख आणि त्यांच्या कार्याची माहिती.
खूप छान मुलाखत. केतकी घाटे
खूप छान मुलाखत. केतकी घाटे आणि टीम खूप छान आणि महत्वाचे काम करत आहेत. महत्वाच्या विषयांवर अशा डेडीकेशननी काम करणार्या लोकांची खरेच खूप गरज आहे.
मुलाखत खूप आवडली! केतकी घाटे
मुलाखत खूप आवडली! केतकी घाटे यांना प्रत्यक्ष भेटायला आवडेल. Loved that she also quoted Gandhiji's statement which is my most favorite too
खुप सुरेख ओळख आणि खुप सुरेख
खुप सुरेख ओळख
आणि खुप सुरेख पद्ध्तीने. ...:)
मुलाखत खूप आवडली.
मुलाखत खूप आवडली. लवासाबद्दलचे अनुभव वाचून हळहळायला झालं..
दोघींविषयी त्यांच्या कामा
दोघींविषयी त्यांच्या कामा विषयी माहीती होती तरीही मुलाखत आवडली.
खूपच सुर्रेख मुलाखत ...
खूपच सुर्रेख मुलाखत ... मंजूताईंना अनेक धन्यवाद ...
या मंडळींचे प्रत्यक्ष काम (एखादे का होईना) बघायला नक्कीच आवडेल -
मस्त मुलाखत. आभारी आहे.
मस्त मुलाखत. आभारी आहे.
धन्यवाद मंजूताई! खूपच छान
धन्यवाद मंजूताई!
खूपच छान मुलाखत. दोघींच्या कामाचं खूप कौतुक वाटतं.
मंजूताई खुप छान
मंजूताई खुप छान मुलाखत.
शेवटचा संदेश खुप छान.
सगळ्यांना मनापासून धन्यवाद!
सगळ्यांना मनापासून धन्यवाद! जिज्ञासा, शशांकजींच्या प्रतिसादाची वाटच बघत होते. शशांकजी केतकी नागपूरला आली होती तेव्हा ही मुलाखत प्राची (मैत्रीण) च्या गाडीतून तिच्या शेतावर जाताना घेतली व शेतावर प्रत्यक्ष काम करताना बघितलेही... मस्त अनुभव! इथे पुण्यात त्यांच्याऑफिसमध्ये भेटलो. ऑफिसमध्ये शिरल्या शिरल्याचं कळतं की हे निसर्गप्रेमींच आहे. मानसी नागपुरला येऊ शकली नव्हती.. तिच्याबद्दलही ऐकायला/लिहायला आवडेल .. बघू कधी जमतं ते...
भविष्यातल्या त्यांच्या योजना प्रत्यक्षात लवकरात लवकर येवो व त्यात मला एखादी झोपडी/कुटी मिळो
खूपच सुर्रेख मुलाखत ...
खूपच सुर्रेख मुलाखत ... मंजूताईंना अनेक धन्यवाद ...
या मंडळींचे प्रत्यक्ष काम (एखादे का होईना) बघायला नक्कीच आवडेल - >>> +1
आवडली मुलाखत! कौतुक आहे हं
आवडली मुलाखत! कौतुक आहे हं केतकी व मानसीचं!
मुलाखत अजुन पुर्ण वाचली
मुलाखत अजुन पुर्ण वाचली नाहीय. काल थोडीफार वाचली तेव्हा हे काहीतरी नविन काम आहे आणि यापुर्वी असे काही मी तरी ऐकले नाही असे वाटले.
आयकॉसला भेटायला नक्कीच आवडेल.
मंजूताइ, मुलाखत मस्त जमली
मंजूताइ, मुलाखत मस्त जमली आहे. ऊंच माझा झोका मधे ही ह्या दोघींच्या कामाने इंप्रेस झाले होते त्या मुळे इथे वाचताना जास्त मजा आली.
छानच झालीय मुलाखत !
छानच झालीय मुलाखत !
चांगली आणि अनुभवसंपन्न
चांगली आणि अनुभवसंपन्न असल्याने विचार वाचताना त्यामागील भूमिकाही पटत गेल्या. पाच 'आर' चे महत्त्व खूप पटते. "जगा आणि जगू द्या" हेच सत्य....या मुलाखतीतून ते छान प्रकट झाले आहे.
मस्त मुलाखत. धन्यवाद.
मस्त मुलाखत. धन्यवाद.
नेहमीच्या लोकांचे प्रतिसाद
नेहमीच्या लोकांचे प्रतिसाद आले की कसं छान वाटतं
अरे वा! वेगळेच कार्यक्षेत्र व
अरे वा! वेगळेच कार्यक्षेत्र व त्यात झोकून देऊन काम करणाऱ्या केतकी यांच्या व्यक्तिमत्त्वाची छान ओळख करून दिलीत, मंजूताई! केतकी व टीमच्या कामाला भरघोस शुभेच्छा!
मंजुताई, मुलाखत आवडली. चांगले
मंजुताई, मुलाखत आवडली. चांगले प्रश्न विचारलेत.
अशी सध्याच्या काळात अत्यावश्यक क्षेत्रात होणारी कामं आणि त्यात तळमळीनं काम करणारी, त्याबद्दल जागृती करणारी लोकं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचायला हवीयेत.
मानसी आणि केतकी दोघीही एकदम फोकस्ड काम करणा-या, खुप मेहनती आहेत.
कायम हसतमुख असतात.
सवड काढून एकदा मानसी करंदीकरचीही मुलाखत घ्या.
सुरेख आहे मुलाखत! आवडली.
सुरेख आहे मुलाखत! आवडली.
छान मुलाखत.
छान मुलाखत.
मुलाखत वाचुन भारावुन गेलेय.या
मुलाखत वाचुन भारावुन गेलेय.या मुलींचं काम खरच कौतुकास्पद आहे.शेवटच्या प्रश्नाचे उत्तर वाचुन अस वाटल की लहानपणी जशी आपण देशासाठी प्रतिज्ञा घेतो,तशीच पर्यावरणाच्या संवर्धनार्थ प्रतिज्ञा म्हटली गेली पाहिजे तरच बालमनावर या गोष्टी कायमस्वरुपी बिंबतील कदाचित हा माझा भाबडा आशावाद असेल पण यांना जसे तळमळीने शिकवणारे शिक्षक मिळाले तसे गुरु मुलांना मिळाले तर उद्याच्या तरुणाईची जगण्या राहण्याची शैली जास्तीतजास्त निसर्गाभिमुख असेल . धन्यवाद.मंजूताई!
किती धडाडीच्या आहेत या मुली!
किती धडाडीच्या आहेत या मुली! खरोखर कौतुकास्पद कामगिरी!
मंजुताई फार सुंदर मुलाखत. खूप
मंजुताई फार सुंदर मुलाखत. खूप वेगळी माहिती कळली.
शेवटच्या प्रश्नाचे उत्तर पण छान दिलंय केतकी यांनी. अशी जीवनशैली जास्तीतजास्त लोकांनी स्वीकारली तर किती छान होईल. प्रयत्न करायला हवेत. विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
आज सावकाशीने वाचली. खूप
आज सावकाशीने वाचली. खूप आवडली मुलाखत.
सगळ्यांना धन्यवाद! सई, भुक,
सगळ्यांना धन्यवाद! सई, भुक, अंजु प्रतिसाद खूप छान आहेत.
Pages