जिलेबी ( यीस्ट न घालता)

Submitted by saakshi on 11 May, 2015 - 07:36
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

१. मैदा - १ कप
२. बेसन - २ टीस्पून
३. दही - २ टीस्पून
४. बेकिंग पावडर - ३/४ टीस्पून
५. पाणी - प्रमाण कृतीत
६. तूप/ बटर - २ टीस्पून
७. तळण्यासाठी तेल
८.पाकासाठी -
साखर - दीड कप
पाणी - पाऊण कप
वेलदोडा - १ बारीक कुटून
लिंबू रस - १ छोटा चमचा.

९.जिलेबी पाडण्यासाठी - आयसिंग कोन्/ तळाला छिद्र पाडलेले भांडे/ केचपची बॉटल/ साधा प्लॅस्टीक पिशवीचा बनवलेला कोन.

क्रमवार पाककृती: 

१. साखर आणि पाणी मिसळून मध्यम आचेवर पाक करून घ्यावा. वेलदोड्याची पूड मिसळावी.
अधूनमधून ढवळत रहावे. एकतारी पाक करून घ्यावा. आच बंद करून पाक बाजूला काढून ठेवावा. पाक घट्ट होऊन त्यात पुन्हा साखर तयार होऊ नये म्हणून एक चमचा लिंबाचा रस मिसळावा.
२. एका खोलगट भांड्यात मैदा, बेसन आणि दही एकत्र करून घ्यावे. जिलेबीला रंग येण्यासाठी अर्धा छोटा चमचा हळद मिसळावी. मग हळूहळू पाणी घालत मिसळावे. पीठ ड्रॉपिंग कंसिस्टंसी येईल असे भिजवावे, म्हणजे, अगदी पाणी नाही पण भज्यांसाठी भिजवतो त्यापेक्षा थोडे घट्ट.
३. १० मिनिटे मिश्रण तसेच ठेवावे. तोपर्यंत तेल तापवून घ्यावे. तेलातच तूप/ बटर टाकावे, त्याने जिलेबीला छान चव येते.
४. मग त्यात बेकिंग पावडर टाकून पुन्हा मिश्रण एकजीव करून घ्यावे.
५. तेल चांगले तापल्याची खात्री करून, मिश्रण कोनामध्ये भरून जिलेब्या पाडाव्यात. सोनेरी रंगावर तळून घ्याव्यात.
६. जिलेब्या बनवणे ही कला आहे,त्त्यामुळे पहिला घाणा बिघडू शकतो. सुरूवातीला लहान वेढ्याच्या जिलब्या पाडाव्यात. त्या चांगल्या जमल्या की मोठ्या म्हणजेच ४-५ वेढ्यांच्या जिलब्या पाडाव्यात.
७. गरम जिलब्या पाकात टाकाव्यात. पाकात १० मिनिटे ठेऊन ताटात काढून घ्याव्यात.
८. गरम किंवा थंड जशा आवडतील तशा गट्टम कराव्यात.

हे फोटो :

IMG-20150510-WA0040.jpgIMG-20150510-WA0038.jpg

वाढणी/प्रमाण: 
खाल तितक्या :)
अधिक टिपा: 

१.जिलब्या खूप वेळ पाकात ठेऊ नये, नरम पडण्याची शक्यता. कुरकुरीत, तरीही पाक मुरलेल्या जिलब्या जास्त छान लागतात.
२.मी जिलब्या पाडायला साधा प्लॅस्टीकचा कोन घरी करून वापरला होता. जसा मेहेंदीचा कोन करतो तसाच मोठा कोन करून वापरला तरी चालतो.

माहितीचा स्रोत: 
आंतरजाल
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा.. फोटो तर छानच ! ( त्या प्रतिसादातली लिंक, मूळ पाककृती एडीट करुन त्यात टाकली तर बरे. )

अरे वा.. अगदी मी करून बघण्यासारखी दिसतेय पाककृती..
फोटोही छान आलेत साक्षी

धन्यवाद मृण्मयी, सुलेखा, मनीमोहोर, बी, आरती, अश्विनी Happy

>>>>अरे वा.. अगदी मी करून बघण्यासारखी दिसतेय पाककृती..फोटोही छान आलेत साक्षी>>> धन्यवाद दाद Happy नक्की करून बघा आणि फोटो टाका Happy

>>>>अमेझिंग! गरम जिलबी खूप आवडते हा हू करत खायला. नक्की करणार प्रयोग.
चकलीचा सोवर्या वापरला तर?>>>> आशूडी, नक्की करा. सोर्या नाही वापरता येणार, इतकं घट्ट नाही करायचं पीठ. चमच्यातून खाली पडलं पाहिजे असं भिजवायचं. करून फोटो नक्की टाका Happy

Pages