मुक्तांगणमध्ये संशोधनानिमित्त जायला लागल्यापासुन अनेक जुन्या लोकांशी भेटीगाठी झाल्या. ही मंडळी डॉ. अनिता अवचट यांच्या हाताखाली काम केलेली होती. यातली बहुतांश माणसे त्यांची पेशंट म्हणुन मुक्तांगणमध्ये दाखल झाली होती. व्यसनमुक्त झाल्यावर त्यातल्याच काहींना डॉ. अनिता अवचट यांनी म्हणजे मोठ्या मॅडमनी आपल्या हाताखाली घेतलं. ही मंडळी मुक्तांगणमध्ये काम करु लागली. मुक्तांगणमध्ये अशातर्हेने मोठ्यामॅडमच्या तालमीत तयार झालेली माणसे आजदेखिल कार्यरत आहेत. या माणसांशी मोठ्या मॅडमबद्दल बोलताना मला हे जाणवले कि एखाद्या भक्ताने आपल्या इष्टदेवतेबद्दल बोलावे जवळपास तेवढ्याच भक्तीभावाने ही मंडळी मोठ्या मॅडमबद्दल बोलत असतात. त्यांचे वागणे, त्यांची शिस्त, त्यांचे लहानसहान बाबतीतले बारीक लक्ष, त्यांच्या उपचाराची पद्धत सार्याबद्दल हे लोक भरभरुन बोलतात. मुक्तांगणच्या उपचारपद्धतीबद्दल सर्वप्रथम ऐकले तेव्हा हे सांगण्यात आले होते कि ही उपचार पद्धती गांधीवादावर आधारलेली आहे. गांधींची तत्त्वे व्यसनमुक्तीसाठी उपचारप्रणाली म्हणुन कशी काय वापरली जातात हे पाहण्याची उत्सुकता होतीच. पुढे मुक्तांगणला नियमित जाणे होऊ लागल्यावर गांधींचे तत्त्वज्ञान मुक्तांगणच्या उपचारपद्धतीमध्ये कसे एकरुप झाले आहे ते ही पाहिले. मुक्तांगणमध्ये या उपचार पद्धतीची सुरुवात मोठ्या मॅडमनी केली. संशोधनाच्या दरम्यान या उपचारपद्धतीचा अभ्यास करणे आवश्यक झाले होते. त्याचवेळी मुक्तांगणची उपचार पद्धत आणि गांधी तत्त्वज्ञान याचा तौलनिक अभ्यास करताना यावर एक लेखमाला लिहावी हा विचार मनात आला. ही लेखमाला लिहितानाच मोठ्यामॅडमना ही प्रेरणा कुठुन मिळाली असावी याचा देखिल शोध घ्यावा असे वाटले. या लेखमालेतील या पहिल्या लेखात याचाच मागोवा घेण्याचा मानस आहे. मोठ्या मॅडमचे विचार या बाबतीत काय होते हे जाणुन घेण्यासाठी मला अशा व्यक्तीशी बोलायचे होते जिने त्यांना दीर्घकाळ पाहिले असेल, त्यांच्याबरोबर काम केलेली असेल आणि आजही मुक्तांगणमध्ये कार्यरत असेल. ही माहिती देण्यास मुक्ता पुणतांबेकरांइतकी योग्य व्यक्ती शोधुनही सापडली नसती. आई म्हणुन त्यांना मोठ्या मॅडमचा सहवास लाभला आहेच. त्यांनी मुक्तांगणमध्ये मोठ्या मॅडमसोबत तीन वर्षे कामही केले आहे. शिवाय संचालिका म्हणुन त्या आज अनेक वर्षे मुक्तांगणमध्ये काम करताहेत. आपल्या आईबद्दल बोलण्याचे त्यांनी आनंदाने मान्य केले.
"आई स्वतः कधी मी गांधीवादी आहे असं म्हणत नसे. ते व बाबा यांच्यावर लोहीयांचा प्रभाव होता पण कुठल्याही "ईझम" किंवा वादाशी तिने स्वतःला चिकटवुन घेतलं नव्हतं" मुक्तामॅडम आपल्या आईबद्दल सांगत होत्या. " मला प्रकर्षाने आठवते ती तिची निर्भय वृत्ती. ती बिनधास्त होती. कशालाही घाबरत नसे. तिचा स्वभावही कडक होता. आम्हाला तिचा दरारा वाटत असे. लहानपणापासुन तिच्यावर संस्कार झाले ते तिच्या आईवडिलांचे. तिचे वडिल, म्हणजे आमचे आजोबा गोविंद नारायण सोहोनी हे स्वातंत्र्यसैनिक होते. आजी आजोबा दोघांवरही गांधींचा प्रभाव होता. दोघांचा स्वावलंबनावर ठाम विश्वास होता. घरात शिस्तप्रियता होती. भजने म्हणण्याचा प्रघात होता. आजोबा खादीचे कपडे घालीत. प्रौढ शिक्षणाचे वर्ग चालवित. आजी देखिल शिक्षणाच्या कामात त्यांना मदत करीत असे. आजोबा पेन्शनरांसाठीदेखिल काम करायचे. आज ठाण्यात जेथे ते राहायचे त्या रस्त्याला "गोविंद नारायण सोहोनी मार्ग" असे नाव दिले आहे. हे सारे आईने लहानपणापासुन पाहिले आणि त्याचे संस्कार आईवर झाले. आईमध्ये इतका पराकाष्ठेचा सेवाभाव होता कि ती लहान असताना घरी कामाला येणार्या बाईच्या घरी जाऊन ती तिच्या घरचे काम करीत असे. तु आमच्या घरी काम करायला आल्यावर तुझ्या घरचं काम कोण करणार असा प्रश्न तिला लहान असताना पडायचा. यानंतर आई आठवते ती म्हणजे एक अतिशय साधी व्यक्ती म्हणुन. आई म्हणजे साधेपणाच. पण ग्रेसफुल साधेपणा. मोठ्ठं कुंकु लावायची. कपाळावर मेण लावुन कुंकु रेखताना मी आणि यशो लहानपणी तिच्याकडे पाहात राहायचो. डॉक्टरहोण्याची इच्छा कदाचित तिच्या सेवाभावातुनच आली असेल. पण डॉक्टरच व्हायचं हे तिने ठरवलं होतं. डॉक्टर झाल्यावर आईचा सेवाभाव वाढत गेला. मग त्यातुन हमाल पंचायतीचा स्वस्त दवाखाना चालवायचा, मतिमंद मुलांसाठी शाळा चालवायची, अनाथाश्रमाचे काम करायचे, निवारा येथील वृद्धाश्रमात मानसोपचारतज्ञ म्हणुन जाऊन तेथील वृद्धांना मोफत मानसोपचार द्यायचे, दर रविवारी मुलिंबरोबर सेवाग्रामला जाऊन तेथे आपली सेवा द्यायची असा तिचा कार्यक्रम सुरु असे."
"सर्वसामान्यांना जे परवडते ते आपण वापरायचे आणि करायचे या भावनेतुन तिने आपल्या दोन्ही मुलींना म्युनिसिपाल्टीच्या शाळेत टाकले. पाचवीपर्यंत दोघी त्या शाळेत होत्या. यामुळे तथाकथित "चांगल्या" घरातले पालक आपल्या मुलांना यांच्या मुलिंबरोबर सुरुवातीला खेळायला पाठवत नसत. पण आईने कशाचीही पर्वा केली नाही. पुढे सर्व मुलं यांच्यात खेळायला येऊ लागली. मुक्तांगणची सुरुवात झाल्यावर तिच्या करड्या शिस्तीचा आणि निश्चयाचा प्रत्यय आला" मुक्ता मॅडम पुढे म्हणाल्या," व्यसनाधीन लोकांचे केस वाढलेले असत. काहींनी फॅशन म्हणुन देखिल केस राखलेले असत. ते बारीक कापण्याबद्दल तिचा कटाक्ष असे." हे ऐकल्यावर मला व्यसनाधीन रुग्णमित्रांचा अहंकार नाहीसा करण्याच्या मुक्तांगणमधल्या अनेक पद्धती आठवल्या. वाढलेले केस किंवा मुद्दाम मोठे राखलेले केस म्हणजे जणु व्यसनाचे एक बाह्य चिन्हंच. ते कापुन टाकुन व्यसनमुक्तीचा प्रवास सुरु करायचा म्हणजे व्यसनाशी संबंधित सर्व बाह्य लक्षणांपासुन रुग्णमित्रांना आधी मुक्त करायचे असे मोठ्या मॅडमच्या मनात असणार. व्यसनाशी नाते सांगणारे मोठे केस तसेच झुलवत ठेऊन व्यसनमुक्तीचा मार्ग कठीण होणार. मोठ्या मॅडम सायकियाट्रीस्ट होत्या. मनाचा फार सूक्ष्म विचार त्यांनी केला होता. "मुक्तांगणमध्ये कुठले चित्रपट दाखवायचे त्याच्या निवडीवरदेखिल त्यांचे बारीक लक्ष असे. उपचारांमध्ये आईचा सारा भर रुग्णमित्रांमध्ये नैतिक मुल्ये जोपासण्यावर होता." नैतिक मुल्यांशी संबंधीत एक अतिशय सुंदर गोष्ट मुक्ता मॅडमनी आपल्या आईबद्दल सांगीतली. एका मुक्तांगणमित्राच्या वाढदिवसाला हे लोक त्याच्या घरी गेले होते. हा बरेच दिवस सोबर राहिला होता आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे नेमकी त्याच दिवशी त्याची स्लिप झाली होती. घरी दु:खाचं वातावरण होतं आईने त्या मित्राला समजावलं. घरी आल्यावर तिने चहा पिणं सोडुन दिलं. तिचं म्हणणं असं कि आपण लोकांना दारु सोडायला सांगतो. ती त्यांची अत्यंत आवडती गोष्ट असते. आवडती गोष्ट सोडताना काय त्रास आणि वेदना होतात ते मला देखिल कळायला हवं."
"आईचा कडक स्वभाव मुक्तांगणमध्ये निवळत गेला. व्यसनी रुग्णमित्रांशी जास्तीत जास्त संबंध येऊ लागल्यावर हा बदल झाला असावा. तिचा स्वभाव करडा राहीला नाही" मुक्ता मॅडम आता आईच्या आठवणीत रमल्या होत्या." घरी बाबाची चळवळीतली खुप मंडळी येत आणि घरी आल्यावर ती आईच्या प्रेमात पडत आणि तिचेच मित्र होऊन जात" मोठ्या मॅडमच्या शेवटच्या दिवसांबद्दल बाबाच्या पुस्तकात वाचलं होतंच. मुक्तामॅडमनीही एकदा त्या दिवसांबद्दल बोलताना त्यांच्या धैर्याचा विशेष उल्लेख केला. मरणाला न घाबरणारी तिच्यासारखी व्यक्ती पाहिली नाही. असे त्या म्हणाल्या होत्या. कॅन्सरसारखा आजार होऊनही काळजी, चिंता, भीतीचा लवलेशही त्यांच्या चेहर्यावर नसायचा. बाबाच्या पुस्तकात वाचलं होतं कि केस गेल्यावर तिच्यासाठी विग आणला होता पण एखादवेळी घातल्यानंतर त्यांनी तो पुन्हा कधीही वापरला नाही. त्यांना केस गेल्यामुळे लोकांमध्ये वावरण्यात कधीही अवघडलेपणा वाटला नाही. महत्त्वाचं म्हणजे त्यांना जे ओळखत होते, ज्यांना त्यांचा स्वभाव परिचित होता त्यांनाही त्यांचं ते वागणं वेगळं वाटलं नाही." त्यांच्या हाताखाली उपचार घेललेल्या मंडळींशीही मी बोललो होतो. वायंगणसरांना त्यांनी ऑफेसमध्ये कामाला ठेवलं होतं. एकदा पोस्टात पाकिट टाकण्याचं काम त्यांना सांगीतलं. वायंगणसर निघाल्यावर रस्त्यात त्यांना मुक्तांगणच्या दुसर्या एका कर्मचार्याने मागुन येऊन थांबवलं. तिकिटाचा एक रुपया त्याच्या बरोबर मॅडमने पाठवला होता. एक रुपयाची बाब मॅडमच्या दृष्टीने शुल्लक नव्हती. व्यसनात भरपुर पैसे घालवलेल्या एका रुग्णमित्राला, मुक्तांगणमध्ये दाखल झाल्यावर पुन्हा पुर्वीच्या रॉयल सवयी आठवु लागल्या. तेव्हा दात घासायला आता टुथपेस्ट मिळणार नाही काही दिवस हळद मिठाने दात घास असं मॅडमने बजावलं होतं. साने सरांना व्यसनातुन बाहेर काढल्यावर त्यांची चाळीशी उलटल्यावरही त्यांचे लग्न मोठ्या मॅडमनीच लाऊन दिले. आपला पेशंट स्लिप झाल्यावर निराश झालेल्या ढवळे सरांना पेशंटला मदत करायची असेल तर त्यांच्यात अडकु नकोस हे सांगुन धीर देणार्या मोठ्या मॅडमच. अनेक गोष्टी माझ्या नजरेसमोर तरळुन गेल्या. त्यांनी स्वतः आपण गांधीवादी असल्याचं म्हटलं नसलं तरी अनेक घटनांमधुन मला त्यांच्यावरला गांधींचा प्रभाव जाणवला आणि तो तसाच मुक्तांगणच्या उपचार पद्धतीमध्येही उतरला आहे अशी माझी नम्र समजुत आहे.
'बी द चेंज यु वाँट टु सी इन द वर्ल्ड' असं गांधी म्हणाले होते. मोठ्या मॅडमनी हे आचरणात आणण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. स्वतःच्या आयुष्यात आणि मुक्तांगणच्या उपचारपद्धतीमध्येही. ज्या साधेपणाचा आग्रह त्यांनी मुक्तांगणमध्ये धरला तो साधेपणा त्यांनी आपल्या आयुष्यात बाळगला. हाताखालच्या व्यसनमुक्त झालेल्या मित्रांनाच समुपदेशक करणे हा तर मास्टरस्ट्रोकच म्हणता येईल. व्यसनमुक्तीचा उपदेश अशांनीच करावा जे स्वतः व्यसनमुक्त झालेत. त्यात इतरही फायदे अनेक. समुपदेशक त्यातुनच गेल्याने व्यसनाच्या खाचाखोचा त्याला पुर्णपणे माहित. शिवाय समोरच्या व्यसनाधीन व्यक्तीच्या मनात "याला काय माहित असणार दारु काय असते? आणि हा आपल्याला काय शिकवणार?" हे येण्याची शक्यता देखिल नाही. समोरच व्यसनातुन मुक्त झालेले उदाहरण समुपदेशकाच्या रुपाने उभे असलेले पाहुन व्यसनातुन बाहेर पडण्याची प्रेरणा माणसाला मिळते हा ही एक महत्त्वाचा भाग. गांधींच्या जीवनातील मधुर स्मरणे त्यांनी आपल्या आत्मकथेत सांगीतली आहेत. त्यापैकी एक स्मरण कस्तुरबांविषयी आहे. कसल्याशा आजारावर उपाय सांगताना गांधींनी आपल्या पत्नीला मीठ आणि कडधान्य सोडायला सांगीतले होते. यावर कस्तुरबांनी "मीठ आणि कडधान्य तुम्हाला कुणी सोडायला सांगीतले तर तुम्ही सुद्धा सोडणार नाही." असे उत्तर गांधीना दिले. त्याचाच आधार घेऊन गांधींनी वर्षभरासाठी मीठ आणि कडधान्य सोडुन दिले. कस्तुरबांनी रडून त्यांना तसे न करण्याबद्दल विनवले पण गांधी आपल्या निश्चयापासुन ढळले नाहीत. मोठ्यामॅडमनी वरील प्रसंगी चहा सोडताना अशाच तर्हेचा विचार केला असावा. व्यसनी व्यक्तीसाठी व्यसन सुटणं हे कर्मकठिण असतं. असे असताना आपल्याला असलेल्या काही सवयी जर आपण सोडुन पाहिल्या तर सवय सुटताना काय त्रास होतो हे तर कळेलच पण त्याहुन महत्त्वाचं म्हणजे दुसर्यांना काही करायला सांगताना ज्या नैतिक अधिकाराची आपल्याला आवश्यकता असते तो ही अशा तर्हेच्या त्यागाने प्राप्त होतो ही बाब मला अतिशय महत्त्वाची वाटते. मोठ्या मॅडमच्या आयुष्यातल्या अनेक घटनांवरुन या नैतिक अधिकाराबद्दल त्या फार जागरुक असाव्यात असे जाणवते आणि अशा तर्हेचा त्याग करुन त्यांनी आपल्या आचरणातुन हा नैतिक अधिकार प्राप्त करुन घेतला होता. या अधिकाराचे बळ फार मोठे होते आणि त्यामुळेच आजदेखिल त्यांचे नाव मुक्तांगणमध्ये देवाप्रमाणे घेतले जाते.
मुक्तांगणमधे काम करायला लागलेल्या मोठ्या मॅडम पुढे निवळल्या, त्यांच्यात तो करडेपणा पणा राहिला नाही हे वर आलं आहेच. त्याची जागा आता वात्सल्यपुर्ण मातृत्वाने घेतली. खुद्द गांधीच्या आयुष्यात विकासाचे असे टप्पे आले होते. लघवीचे भांडे उचलण्यास नकार दिलेल्या कस्तुरबांना गांधीनी हात धरुन घराबाहेर काढण्यासाठी दारापर्यंत ओढीत नेले होते. हीच घटना सांगताना गांधी म्हणतात मनात आणल्यास कस्तुरबाईच आज मला धमकी देऊ शकेल. आपल्या रुग्णमित्रांमध्ये नैतिक मुल्ये जोपासण्यावर कटाक्षाने भर देणार्या मोठ्या मॅडमना नैतिक बाबींमधला ढिलेपणा अजिबात खपत नसे. अशाच एका प्रसंगी एकाची कठोरपणे कानउघडणी करताना त्यांना मुक्तामॅडमनी पाहिले होते. पण याच मोठ्यामॅडम पुढे खुप क्षमाशील झाल्या होत्या. साधी राहणी तर आधीपासुनच होती. गांधीनी आत्मकथेत त्यांना सेवेबद्दल मिळालेले दागिने परत करण्याची घटना लिहिली आहे. मोठ्या मॅडमनाही दागिन्याची हौस नव्हती. जे काही होते ते सारे दागिने एका घरगुती प्रसंगात त्यांनी देऊन टाकले आणि पुढे कधीही दागिने घातले नाहीत. अशा अनेक प्रसंगातुन मला त्यांच्यावरील गांधींचा प्रभाव जाणवला. त्यांनी स्वतःला गांधीवादी म्हणुन म्हणवुन घेतले नसले तरी पुढे त्यांनी ज्या तर्हेची उपचारपद्धती मुक्तांगणमध्ये सुरु केली त्यात गांधीवादाची अनेक तत्त्वे दिसुन आली. आणि ही तत्त्वे व्यसनमुक्तीच्या मार्गावर ज्याला रामबाण म्हणता येईल असा उपाय ठरली. आमच्या संशोधनात "ओरीजनल थिंकींग" हा शब्द वापरला जातो. हे खरे ओरीजनल थिंकिग होते. काळाच्या फार पुढचा विचार त्यांनी केला होता. आज कुठल्याही व्यसनावर मुक्तांगणमध्ये उपाय योजला जातो, त्याची मूलतत्वे गांधीवादात आहेत. कालानुरुप मुक्तांगणमध्ये संगणक आले. इतरही आधुनिक साधने येतात, नवे प्रयोग होतात पण सत्य, अहिंसा, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, अस्तेय या तत्त्वांच्या चौकटीत मुक्ता मॅडमने आजदेखिल बदल केलेला नाही. कारण कुठल्याही व्यसनावर या तत्त्वप्रणालीत राहुन पुनर्वसनाचे काम करता येते हा मुक्तांगणचा इतक्या वर्षांचा अनुभव आहे. व्यसनाचा अभ्यास करुन, व्यसनमुक्तीतले कठिण टप्पे शोधुन काढुन त्यावर गांधीवादाचा अहिंसक मार्ग उपाय म्हणुन वापरणे यात मोठ्या मॅडमची अलौकिक प्रतिभा आणि बुद्धीमत्तेची झेप दिसुन येते असे मला नम्रपणे वाटते.
अतुल ठाकुर
छान लेख!
छान लेख!
लेख खूपच छान आहे.
लेख खूपच छान आहे.
छान ..,
छान ..,
छान लिहीलय.... धन्यवाद.
छान लिहीलय.... धन्यवाद.
अतुल ठाकूर, लेख चांगला आहे.
अतुल ठाकूर,
लेख चांगला आहे. डॉक्टर अनिता यांचं व्यक्तिमत्व तुमच्या हातून यथार्थपणे चित्रित झालंय. धन्यवाद.
माझ्या मते एका बाबतीत अवचट दंपती गांधींपेक्षा सरस ठरतात. गांधींकडे बिर्ला होते. अवचटांकडे तसे कोणी दिसंत नाही.
आ.न.,
-गा.पै.
अवचटांची मुक्तांगण हीही
अवचटांची मुक्तांगण हीही अनेकांच्या देणग्या व मदतीतुन सुरु झाली. त्यांच्य पुस्तकात दिले आहे.
मुक्तांगण प्रामुख्याने
मुक्तांगण प्रामुख्याने पुलंच्या देणगीतुन सुरु झाले.
सुरेख लेख! सुनंदा अवचट किती
सुरेख लेख! सुनंदा अवचट किती ग्रेट होत्या ह्याची कल्पना येते आहे. त्यांना मुक्तांगण मधले लोक देवासमान मानतात ह्यात बिलकुल आश्चर्य वाटत नाही.
सुरेख लेख.. बाबा आमटे असोत
सुरेख लेख.. बाबा आमटे असोत नाहीतर अनिल-सुनंदा अवचट.. किती अवघड काम किती नेटाने ही मंडळी करत आहेत, याची जाणीव करून देणारे हे असे लेख अधून मधून यायलाच हवेत.
किती अवघड काम किती नेटाने ही
किती अवघड काम किती नेटाने ही मंडळी करत आहेत, याची जाणीव करून देणारे हे असे लेख अधून मधून यायलाच हवेत. >> +1
अप्रतिम लेख.
अप्रतिम लेख.
सुरेख लेख.
सुरेख लेख.
लेख खूपच छान आहे...
लेख खूपच छान आहे...
सर्वांचे मनःपूर्वक आभार
सर्वांचे मनःपूर्वक आभार
खुप सुंदर लेख.. एक टायपो
खुप सुंदर लेख..
एक टायपो राहिला आहे. बघणार का ?
त्यांच्यात अडकु
आभार दिनेशदा सुधारणा केलीय
आभार दिनेशदा सुधारणा केलीय
खूप सुरेख लेख. योगायोगाने
खूप सुरेख लेख.
योगायोगाने अनिल अवचटांचे "मुक्तांगणाची गोष्ट' वाचतेय.त्यांची तळमळ,कष्ट आणि डेडीकेशन अचंबित करते.
लेख आवडला. अनिल अवचट हे
लेख आवडला. अनिल अवचट हे नेहमीच माझ्यासाठी एक आदरणीय व्यक्तिमत्व राहिलेले आहेत. दैववादाच्या चक्रात न अडकता स्वकर्तुत्वाने नि मुळातच त्यांच्यात असलेल्या माणुसकीच्या ओलाव्याने मुक्तांगणचा वटवृक्ष बहरला.
मस्त आहे लेख..
मस्त आहे लेख..