सर्वात जास्त आवडायचे ते तिचे डोळेच! ती चमक देहभर फिरली की नुकताच अंतर्बाह्य शुद्ध करणारा पाऊस येऊन गेला आहे आणि आपण जास्त पारदर्शी, प्रवाही झालो आहोत असे वाटू लागे. तिला सगळेच संपूर्ण समजायचे.
आताही ते निळसर डोळे तसेच मंद हसत होते. आम्ही बसलेल्या तळ्याच्या आश्वासक काठांसारखे.
"काय झाले रे?", डोळे बोलले की ओठ हे कधीच कळले नाही. की ही एकच गोष्ट असते?
"काही नाही, कसले कसले विचार येत राहतात. किती समजले म्हणजे पुरेपूर समजले म्हणायचे? ही सगळी व्याप्ती कोणी ठरवली? बरे जे समजले त्याचेही प्रयोजन काय?", मला उच्चारून झाल्यावर आत्तापावेतो लखलखीत भासणारे प्रश्नही निरर्थक निस्तेज भासू लागले.
"काय काय समजले आहे?", तिने मुठीत मणी लपवलेल्या लहान मुलीसारखे निरागस हसत विचारले.
"हम्म, काय काय...म्हणजे थोडेसेच....पण नक्की नाही. तरीही....साहित्य-काव्य, संगीत, चित्रकला, शिल्पकला कदाचित...म्हणजे तंत्र म्हणून नव्हे...पण मन थरारते."
"आणि?"
"थोडे गणित, पदार्थविज्ञान, अभियांत्रिकी... असे अर्धेकच्चे खूप निघेल...तत्त्वज्ञान वगैरे!"
"आणि रोखठोक समजत काय नाही?"
"बाकी सारेच. उत्क्रांतीवाद, नीतिशास्त्र, रसायनशास्त्र, समाज, कायदा, राजकारण, जन्म-मृत्यू, अवकाश, स्मृतिवैशिष्ट्ये....बाकी सारेच!!"
ती तशीच निर्मळ हसली. क्षणात तिच्यावर संधिप्रकाशाचा एक वितळता सोनेरी कवडसा पडला. वाऱ्याची एक गार झुळूक आली आणि मी शहारतोय हे दिसल्यावर तिने आपले तेजस पंख उघडून मला मिटून घेतले. ती अनादि काळापासूनची राजहंसी आणि मी या जन्मात केवळ सान्निध्यामुळे झालेला तात्पुरता राजहंस.
तिने मला घेऊन जमीन कधी सोडली ते समजलेच नाही. मी तिच्यात मिसळून उडत होतो आणि तिच्या समवेतही होतो.
तळे, झाडे, रान...एकूणच मी जमिनीवर माझे माझे म्हणून जपलेल्या आयुष्याला एक नवा आकार आला होता.
एका निळ्या-पांढऱ्या ढगाच्या तुकड्यावर आम्ही थोडा वेळ विसावलो.
जणू काही अजून त्या आमच्या तळ्याकाठीच आहोत अशा अविर्भावात तिने बोलणे सुरू केले,
"ते बघ आपले पाणी, खालून किती अमर्याद विशाल वाटते, पण इथून त्याची सीमा स्पष्ट दिसतेय. ती देवदाराची झाडे...काठावरून दूरवर म्हणून इवली दिसतात...पण वरून त्यांची इतरांपेक्षा कितीतरी जास्त पटीने असलेली उंची कळते आहे. सगळा खेळ आहे तो आपल्या दृष्टीच्या मर्यादेचा...मग ती लौकिक असो वा अलौकिक. हे ज्ञान ज्ञान म्हणून जो जयघोष चालतो ते तरी पूर्णार्थाने कोणा शहाण्याला कळले आहे? हजारो वर्षांपूर्वी काही पूर्वपीठीका होत्या, आज काही जुन्या पुसून नव्या बनत आहेत, उद्या काही तिसरेच उजेडात येईल आणि आतापर्यंतचे सारे पुसले जाईल. हे सर्व "आहे", हा वर्तमान खरा कारण भूत वाहून गेलाय आणि भविष्याला पाहणारी नजर माणसाकडे तरी नाही.
तेव्हा.... कशासाठी आहे आणि काय नाही पेक्षा आहे म्हणून त्याचा उत्सव कर. एका तुटपुंज्या आयुष्यात इतके घडले तरी पुरे आहे.
काही उमगते आहे का?"
"थोडे थोडे....पण पडदा विरतोय बहुधा."
"काय कळले सांगशील?"
मी तिच्या नजरेत हरवून जात म्हणालो, "सध्या तरी अमुक अमुक समजत नाही हेच पूर्ण निःशंक सत्य....इतकेच उमगले आहे. बाकी काय समजतेय आणि किती याची मीमांसा करू नये...हेही ठीकच!"
प्रेमाने माझे मस्तक थोपटत तिने अचानक सूर मारला आणि सावरीच्या वाहत्या कापसासारखे आम्ही पुन्हा अलगद तळ्याकाठी आलो.
मी तिच्याकडे पाहिले तेव्हा ती दूर पाण्याच्या पार बघत माझा हात कुरवाळत होती. समोरचे सुखावणारे पाणी तिच्या अनावृत नाजुक पावलांचा वेध घेण्यासाठी आसुसून काठाशी झटत होते. दीप्तिमान पैंजणांची झळाळी ऋजुतेचा नाद झाली होती.
या बेहोषीत,
डोळे बोलले की ओठ हे कधीच कळले नाही.
की ही एकच गोष्ट असते?
-- अमेय
मस्त ! आवडल
मस्त ! आवडल
मस्त ! आवडल
मस्त ! आवडल
मस्त
मस्त
बापरे... कविता म्हणून ललित
बापरे...
कविता म्हणून ललित किंवा ललित म्हणून कविता... असं काही असलंच तर हे च... असच असणार.
खूप आवडलं...
<<डोळे बोलले की ओठ हे कधीच कळले नाही.
की ही एकच गोष्ट असते?
>>
मॅड.
सुंदरच! >>>सगळा खेळ आहे तो
सुंदरच!
>>>सगळा खेळ आहे तो आपल्या दृष्टीच्या मर्यादेचा...मग ती लौकिक असो वा अलौकिक. हे ज्ञान ज्ञान म्हणून जो जयघोष चालतो ते तरी पूर्णार्थाने कोणा शहाण्याला कळले आहे? हजारो वर्षांपूर्वी काही पूर्वपीठीका होत्या, आज काही जुन्या पुसून नव्या बनत आहेत, उद्या काही तिसरेच उजेडात येईल आणि आतापर्यंतचे सारे विसरले जाईल. हे सर्व "आहे", हा वर्तमान खरा कारण भूत वाहून गेलाय आणि भविष्याला पाहणारी नजर माणसाकडे तरी नाही. >>>> अप्रतिम
किती सुंदर लिहीलंय?!!! <<डोळे
किती सुंदर लिहीलंय?!!!
<<डोळे बोलले की ओठ हे कधीच कळले नाही. की ही एकच गोष्ट असते?> मॅड. >>>> +१११११
फार सुरेख! एक नंबर
फार सुरेख! एक नंबर
हे सर्व "आहे", हा वर्तमान खरा
हे सर्व "आहे", हा वर्तमान खरा कारण भूत वाहून गेलाय आणि भविष्याला पाहणारी नजर माणसाकडे तरी नाही.
तेव्हा.... कशासाठी आहे आणि काय नाही पेक्षा आहे म्हणून त्याचा उत्सव कर. एका तुटपुंज्या आयुष्यात इतके घडले तरी पुरे आहे.
अतिशय सुंदर......
खुप छान लिहिलेय.
एवढ्या धावपळीत काय काय सुचतय
एवढ्या धावपळीत काय काय सुचतय तुला , आणि ते काय मस्त उतरतय , जिओ!!
अ प्र ति म!!!
अ प्र ति म!!!
Excellent, speechless!
Excellent, speechless!
सुरेख!
सुरेख!